विश्वास बोधाचा पाया आहे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जयांचे केलिया स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।

तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरुचे ॥ १:१३ ॥

श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या तेराव्या अध्यायात क्षेत्र-क्षेत्रज्ञयोग आणि नंतर कपिलमुनींचे सांख्यशास्त्र विशद केले आहे. जेवताना ताटातील एकाच पोळीचे अनेक छोटे तुकडे करुन आपण घास घेतो. त्याचप्रमाणे आपल्यासमोरील एकसंध जगताचे बुद्धीला आकलन होतील असे विभाग करुन दैनंदिन जीवनातील घटनांतून पारमार्थिक ज्ञान कसे मिळवायचे याचे विस्तृत वर्णन या अध्यायात केलेले आहे. साधकासमोर पारमार्थिक ज्ञान मिळविण्यास अनेक मार्ग असतात. तो कर्म, भक्ति, ध्यान आणि योग यापैकी कुठल्याही उपायाचा आधार घेऊन साधना करु शकतो. त्याजोडीला या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर ज्ञानयोग हा अजून एक मार्ग उघड केला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीची गुरुस्तुतीसुद्धा साधकाच्या बुद्धीस सूक्ष्म ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कशी येऊ शकेल याचे वर्णन करणारी आहे असे दिसून येते. यातून माउलींनी केवळ पाच ओव्यांतून (१) गुरुकृपेने साधकाची बुद्धी व्यापक कशी होते, (२) शब्दांतील सूक्ष्म अर्थाचे ज्ञान कसे होते, (३) झालेल्या ज्ञानाने जीवन सकारात्मक करण्याचा मार्ग कसा दिसतो आणि शेवटी (४) बुद्धीजनित ज्ञानाचे रुपांतर निखळ प्रेमात कसे होते याचे वर्णन केले आहे असे वाटते. अशा अर्थगर्भ, संक्षिप्त स्तुतीतील पहिल्या ओवीत श्रीमाउली म्हणत आहे ‘ज्यांचे स्मरण झाल्यावर कुठलीही विद्या ग्रहण करण्याचे सामर्थ्य बुद्धीस येते त्या श्रीगुरुंच्या चरणकमळांना मी वंदन करतो.

लक्षात घ्या की ‘विश्वास ठेवणे’ ही क्रिया नविन ज्ञान होण्याचा पाया आहे. शाळेत असताना जेव्हा शिक्षक व्याकरणाचे नियम वा रसायनशास्त्रातील सूत्रे सांगतात तेव्हा ते खरे सांगत आहेत यावर विश्वास ठेवला तरच विद्यार्थ्याची प्रगती होते. अगदी दररोजचे जेवण जेवतानासुद्धा वाढणाऱ्यावर विश्वास नसेल तर स्विकारता येत नाही! ही वस्तुस्थिती खास करुन आत्तापर्यंत स्वतः केलेल्या विचारांना मोडीत काढणाऱ्या ज्ञानाला जास्त लागू होते. अशी नवीन समजूत ‘ज्ञान’ आहे का ‘चुकीची माहिती’ आहे याचा निर्णय केवळ समोरील व्यक्तिवर आपला विश्वास किती दृढ आहे यावर घेतला जातो. विशेषतः ज्यांनी स्वतःच्या कष्टांनी (व्यावहारिक) प्रगती करुन घेतली आहे त्यांना आपल्या विचारसरणीच्या सत्यतेबद्दल इतका विश्वास असतो की ती सोडून नवी सोच स्विकारणे त्यांना अतिशय अवघड होते. आयुष्यातील घटनांकडे बघण्याची पारमार्थिक नजर सामान्य समजुतींपेक्षा वेगळीच असल्याने गुरुंवर विश्वास बसणे साधनेला अत्यावश्यक ठरते. म्हणूनच असे दिसते की सद्‌गुरुंच्या अनेक शिष्यांतील फारच थोडे साधक असे असतात जे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या आधीच्या समजूतीवर पाणी सोडतात. श्रीसंत गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मी अनेकांना रामनाम घ्यायला सांगितले पण त्यांतील फक्त ब्रह्मांनदबुवांनी ते कसे घ्यावे हे पूर्णपणे शिकून घेतले! असे पहा, ‘आनंद’, ‘भक्ति’, ‘ज्ञान’ इत्यादि दररोज वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांचा धारदार पारमार्थिक अर्थ आपल्या समजुतीच्या पलिकडचा असतो! या शब्दांवर संपूर्ण साधना उभी असल्याने साधनेचे सत्यरुप कळण्यास सद्‌गुरुंच्या शिकवणीवर संपूर्ण विश्वास असणे अत्यावश्यक आहे. श्री रामकृष्ण परमहंस बोधामृत या पुस्तक लिहिणाऱ्या महेन्द्रनाथ गुप्ता पहिल्यांदा जेव्हा ठाकुरांना भेटले तेव्हा ते बोलताना म्हणाले की माझी पत्नी सर्वसामान्य आहे, तीला ज्ञान कमी आहे. तेव्हा लगेच रामकृष्ण परमहंस खोचकपणे म्हणाले ‘आणि तुला खूप ज्ञान आहे. हो ना?’ त्याकाळातील दोन, तीन डिग्र्या असलेल्या आणि विद्यालयात मुख्याध्यापक असलेल्या गुप्तांना तोपर्यंत असे वाटत होते की त्यांना खूप माहिती आहे. पण गुरुंच्या मुखातून हे शब्द ऐकल्यावर त्याचक्षणी त्यांनी स्वतःच्या ज्ञानाचा अहंकाराचा त्याग केला! अशी तयारी असलेले शिष्य विरळा असतात.

हे सर्व इथे सांगायचे कारण म्हणजे पहिल्या बारा अध्यायांवर अतिशय मार्मिक आणि रसाळ निरुपण केल्यावरही वरील ओवीतून माउली प्रांजळपणे सांगत आहेत की निव्वळ सद्‌गुरुकृपेनेच मी या अध्यायातील श्लोकांचे विवरण करु शकणार आहे. परमार्थात ज्ञान होण्यासाठी आपल्या बुद्धीची पाटी पुसून स्वच्छ करुन सद्‌गुरुंसमोर ठेवायची असते. मग त्यांच्या कृपेने जी अक्षरे उमटतील त्यांवर निःसंदेह विश्वास ठेवून आपले आयुष्य जगायला लागले की प्रगतीचा मार्ग सुस्पष्ट होतो. आणि ही सवय निरंतर जागृत ठेवायला लागते. ज्याक्षणी आपण आता मला कळले असे म्हणतो त्याच क्षणी आपले वाहते स्वच्छ ज्ञान स्थिर होते आणि त्यावर प्रकृतीचे शेवाळ जमायला सुरुवात होते. परंतु बुद्धीला जर नित्यनूतन नजरेने जगाकडे बघायची सवय लागली की सद्‌गुरु शिष्याच्या अंतर्मनात अर्थाचा झरा वाहता ठेवतात. ते समोर असून त्यांच्या मुखातून शब्द ऐकायला हवेत याची आवश्यकता शिल्लक रहात नाही आणि घरबसल्या मनात गुरुकृपेचे बोल उमटायला लागतात. अशावेळी ‘अर्थ बोलाची वाट पाहे। तेथ अभिप्रावोची आभिप्रायाते विये। भावाचा फुलौरा होत जाये। मतीवरी ॥’ ही ओवी शिष्य अनुभवायला लागतो. स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता निव्वळ अंतर्स्फूर्तीने आलेल्या अर्थाने त्याचे जीवन सुफलित होते. वरील ओवीतील ‘वंदू श्रीचरण’ हे शब्द एकदा केलेल्या कृतीचे वर्णन नसून दिवसाचे चोवीस तास असलेल्या अवस्थेचे आहे असे वाटते. सहज आणि नितांत सुंदर जीवनाची सुरुवात सद्‌गुरुंच्या चरणांचे निरंतर वंदन केल्याने होते असे वरील ओवीतून माउली म्हणत आहेत असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥