(685+686)/13:Happiness Is Acceptance!

 

 

॥ ॐ श्री सद्‍गुरू माधवनाथाय नमः ॥

 

 

पावो सूदलिया सवे । जैसे खिल्लर कालवे ॥

 तैसा भयाचेनि नावे । गजबजे जो ॥६८५ : १३ ॥

 

 

वायुचेनि सावाये । धू दिगंतवरी जाये ॥

दुःखवार्ता होये । तैसे जया ॥६८६ :१३ ॥

 

 

आज आपण तेराव्या अध्यायातील वरील दोन ओव्यांवर विचार करूया. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानी लोकांची लक्षणे सांगितल्यावर अकराव्या श्लोकामध्ये शेवटी सर्व अज्ञानी लोकांबद्दल `अज्ञानम् यदतोऽन्यथा’ असे उद्‍गार काढले. या तीन शब्दांची फोड करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जवळ जवळ २०० ओव्यांचा उपयोग केला. वरील दोन ओव्या यामधीलच आहेत. ज्या माणसाकडे साधनेबद्दल स्थैर्य नाही अशा माणसाचे वर्णन यामध्ये करण्यात आले आहे. या दोन ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: ज्याप्रमाणे एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये पाउल टाकताच ते सर्व ढवळून निघते त्याप्रमाणे भीतीदायक घटनेने त्याच्या आयुष्यात गदारोळ होतो. ज्याप्रमाणे वाऱ्याची छोटीशी झुळुकसुध्दा धुराला सर्व आकाशभर भटकायला लावते, त्याचप्रमाणे दुःखदायक घटनेने (साधकाचे) मन विचलीत होते.

 

 

अज्ञानी मनुष्य

 

 

या दोन ओव्यांमध्ये खोल शिरण्याआधी आपण अज्ञानी मनुष्याच्या ह्या फक्त तीन शब्दी वर्णनाबद्दल थोडा विचार करुया. `अज्ञानम् यदतोऽन्यथा’ ह्या शब्दांचा अर्थ असा होतो की `हे आधी सांगितलेले गुण ज्या माणसामध्ये नाहीत त्याला तुम्ही अज्ञानी समजा’.

सगळ्यात पहिली गोष्ट यातुन स्पष्ट होते की भगवान श्रीकृष्णांनी अज्ञानी लोकांची वेगवेगळी वर्गवारी केलेली नाही. उदाहरणार्थ, असे असे असल्यास गृहस्थाला २०% अज्ञानी समजावा, किंवा अमुक अमुक आढळल्यास तो १०० टक्के अज्ञानी समजावा असे काही श्रीकृष्णांनी सांगितलेले नाही. याचा अर्थ असा की ज्या लोकांमध्ये ज्ञानी लोकांच्या गुणांपैकी एकही गुण पूर्णत्वाने नसतो त्या सर्वाना त्यांनी एकसारखे मानले आहे. आपल्या आयुष्यामध्ये ही एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे. याचे कारण असे की आपल्यामध्ये अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, गुरू-भक्ती, शांति इत्यादींपैकी एकही गुण पूर्ण रुपात नाही याची जाणीव आपल्याला क्षणोक्षणी होत असते. तरीसुध्दा आपण स्वतःला इतरांपेक्षा ज्ञानीच समजत असतो. उदाहरणार्थ, साधनेत जरा प्रगती झाली, किंवा नियमीतपणे साधना होऊ लागली की लगेच आपण इतरांना साधना कशी करावी याचे सल्ले देऊ लागतो! किंवा एखाद्या व्यक्तीला अध्यात्माची ओढ नसेल, तर त्या व्यक्तीला आपण अत्यंत सामान्य मानू लागतो. परंतु भगवान श्रीकृष्ण ह्या तीन शब्दांमधून आपल्याला सांगताहेत की केवळ आपण साधनेच्या मार्गावर चालत आहोत म्हणुन `यदतोऽन्यथा’ ह्या वर्णनामधून बाहेर येऊ शकत नाही. साधनेमध्ये थोडी प्रगती झाली की साधकाला त्याची जाणीव होऊन त्याचा अभिमान वाढण्याचा संभव असतो व तो अभिमानच त्याच्या पुढील प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा असतो. अशावेळी अत्यंत प्रामाणिकपणाने साधकाने आत्मपरीक्षा करावी व हे पूर्णपणे जाणून घ्यावे की ज्ञानी लोकांच्या अनेक लक्षणांपैकी एकही लक्षण आपल्यामध्ये पूर्णत्वाने आढळत नाही. ह्या जाणिवेबरोबरच `अज्ञानम् यदतोऽन्यथा’ आपल्याला लागू होते ह्या गोष्टीचा स्वीकार करावा. ह्या स्वीकाराबरोबरच जी मानसिक नम्रता साधकामध्ये येईल तिच्यामुळे पुढच्या प्रगतीचा मार्ग आपल्याकरीता उघडतो. अशा नम्रतेमुळे साधक दुसऱ्यांना उपदेश करण्याच्या भानगडीत न पडता शांतपणे आपल्या मार्गावर चालत राहतो. खरं म्हणजे ज्या देवाने आपल्याला साधनेच्या मार्गावर चालण्यास उद्युक्त केले आहे तोच देव इतर सर्वांचीसुध्दा काळजी घेत आहेच की! मग आपण कशाला त्यांच्या साधनेत ढवळाढवळ करावी? पण आपल्या अतिउत्साहामध्ये ही गोष्ट आपण विसरतो व आपल्या जवळच्या माणसांना साधना कशी करावी, का करावी, साधनेशिवाय जगणे कसे चुकीचे आहे हे शिकवायला सुरूवात करतो. तुम्ही कदाचित्‌ असे म्हणाल की दुसऱ्याला आम्ही शिकवू पण आम्ही शिकवितो आहोत याचा मोठेपणा न घेता शिकवू. परंतु जीवनात असे घडू शकत नाही. शिष्याच्या मनात शिक्षकाबद्दल आदर असल्याशिवाय व शिक्षकाने त्या आदराचा स्वीकार केल्याशिवाय शिकणाऱ्याला ज्ञान होत नाही. उदाहरणार्थ, आपण सर्वजण अनेक भिकाऱ्यांना नम्रपणे भीक मागून जगताना बघतो, पण त्यांच्याकडून नम्रता आपण शिकू शकत नाही. लहान मुलाने चुकुन एखादी तत्वज्ञानाची गोष्ट आपल्याला सांगितली तर आपल्याला बोध व्हायच्याऐवजी त्याच्या अतिशहाणपणाचा रागच येतो याच्यामागचे कारण आपला मनात त्यांच्याबद्दल नसलेला आदर हे आहे. तेव्हा दुसऱ्याला अध्यात्मामध्ये मार्गदर्शन करणे आणि आपल्याकडे नम्रता घेणे या दोन गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात राहू शकत नाही.

म्हणून साधनेत आपली प्रगती झाली आहे असे वाटण्याऱ्या प्रत्येक साधकाने `अज्ञानम् यदतोऽन्यथा’ या शब्दांवर जरुर विचार करावा. `दुसऱ्याला मदत कराविशी वाटणे’ हा साधनेमधील अडथळा प्रत्येक साधकाच्या जीवनात कधीतरी येतोच! ज्ञानेश्वरीमध्ये, किंवा इतर कुठल्याही अध्यात्मिक पुस्तकांमध्ये बायको-मुलांना, इतर नातेवाईकांना साधनेच्या मार्गावर आणा, तसे केले तरच तुमच्या साधनेत प्रगती होईल असे सांगितलेले नाही. याचे कारण असे की जो स्वतः अज्ञानी आहे तो दुसऱ्यास ज्ञान शिकवू शकत नाही. जी गोष्ट आपल्याकडेच नाही ती गोष्ट आपण दुसऱ्यांना देउ शकतो का? म्हणुन जेवढ्या लवकर साधक या अडथळ्यावर मात करेल तवढे बरे! ही मात करण्याकरीता लागणारी नम्रता अंगात भिनण्यासाठी `अज्ञानम् यदतोऽन्यथा’ हा अत्यंत उपयुक्त श्लोक आहे.

 

 

साधकाचा अस्थिरपणा

 

 

आता दुसऱ्यांबद्दल फारसा विचार न करता आपण आपल्या स्वतःच्या साधनेच्या मार्गावर चालायला हवे हे निश्चित झाल्यावरसुध्दा साधकाला अत्यंत सावध रहायला हवे. आज विचार करायला घेतलेल्या दोन ओव्या हेच सांगताहेत. दुःख आणि भीति या दोन गोष्टींमध्ये साधकाचे धैर्य पहायची जी शक्ती आहे ती इतर कुठल्याही गोष्टींमध्ये नाही. कुठल्याही परीस्थितीत साधना न सोडायची साधकाची तयारी हे एक ज्ञानाचे लक्षण आहे. ते न दिसणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. वरील दोन ओव्या ही गोष्ट अधिक स्पष्ट करीत आहेत. साधना करीत असताना जर साधकाचे जीवन ताण-तणाव विरहीत असेल तर साधनेमध्ये अडथळे येत नाहीत. साधकाच्या जीवनामध्ये सर्व सोयी असल्यावर त्याने साधना करावी या गोष्टीमध्ये अजिबात नवल नाही. सर्व चांगले असल्यावर साधना झाली नाही तरच नवल आहे. म्हणून साधकाचे साधनेवरील प्रेम, वा `साधना करायला हवीच’ या भावनेची त्याच्या मनातील स्थिरता जर ओळखायची असेल तर जीवनातील अडचणीच्यावेळी त्याची साधना कशी होते हे बघायला हवे. सचिन तेंडुलकरच्या बॅटींगच्या कौशल्याची जाणीव त्याच्या गेल्या वर्ल्ड-कपमधील बाद फेरीमध्ये हिरव्या पिचवर शोएब अख्तर विरुध्दच्या खेळीत आहे. लीग अवस्थेतील नमिबीया विरुध्दच्या शतकामध्ये ती जाणीव नाही! तसेच हे आहे. ज्याप्रमाणे खरा खेळाडू जीवनामध्ये अशा आणिबाणीच्या खेळांची वाट पहात असतो त्याचप्रमाणॆ प्रत्येक साधकाने त्याच्या जीवनातील ताण-तणावांचे क्षण टाळायच्या ऐवजी त्यांचे उत्साहाने स्वागत करुन त्या क्षणांमधील आपले वागणे तपासले पाहीजे. आपल्या साधनेबद्दलच्या धैर्याबाबत खरी माहिती अशाच वेळी कळून येते. प्रामाणिकपणे विचार केला तर प्रत्येक साधकाला असे जाणवेल की प्रत्येक दुःखाच्या वेळी वा भीतीदायक प्रसंगाच्यावेळी त्याची साधनेबद्दलची आस्था कमी झाली होती. याचे कारण असे की:

ज्या प्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे साधना व आत्यंतिक दुःख एकत्र राहू शकत नाहीत. आपल्याबरोबर सद्‍गुरू आहेत ही भावना व भिति एकत्र नांदू शकत नाहीत.

म्हणून ह्या दोन ओवींचा साधकाकरीता खरा अर्थ असा आहे: जेव्हा-जेव्हा तुम्हाला आत्यंतिक दुःख किंवा भिति जाणविते तेव्हा-तेव्हा तुमची साधना कमी झालेली असते!

हा अर्थ आपण नीट जाणून घेतला पाहिजे. जीवनामध्ये अनेक शब्द आपण वापरतो व असे गृहीत धरतो की त्या शब्दांचा अर्थ जो आपल्या मनांत आहे तोच इतरांच्या मनात आहे. हे आपले गृहीत धरणे वस्तुस्थितीवर आधारित नसते. दुःख आणि भीति हे दोन शब्द असेच आहेत. प्रत्येकाची ह्या दोन शब्दांची व्याख्या वेगळी असते. एखाद्या गरीब माणसाला त्याचे शंभर रुपये हरविल्यावर जे दुःख होईल तेच दुःख श्रीमंत माणसाला हजार रुपये वाया गेल्यावरसुध्दा होणार नाही. लहान मुलाला बागुलबुवा या शब्दाचीच जी भीती वाटते ती मोठ्या माणसाला निर्मनुष्य जागी अंधारात चालताना सुध्दा वाटणार नाही. दुःख या शब्दाची व्याख्या एखाद्या गोष्टीत नसुन `प्रिय गोष्टींचा वियोग’ अशी आहे व भीति या शब्दाची व्याख्या एखाद्या घटनेत नसून `हव्या-हव्याशा वाटण्याऱ्या गोष्टीवर आलेले संकट’ अशी आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला वाटणारे दुःख, वाटणारी भीति ही आपल्या जीवनात घडलेल्या घटनेत नसते. या दोन गोष्टी आपल्या मनात कुठली गोष्ट प्रिय आहे, हवी-हवीशी आहे यावर अवलंबून आहेत. म्हणुनच नायजेरीयामध्ये गेली तीन वर्षे दुष्काळ पडला आहे व हजारो लोक बेघर होऊन अन्नाच्या शोधात वणवण फिरत आहेत ही बातमी आपल्याला एवढे दुःख देत नाही जेवढे आपल्या प्रिय व्यक्तीला झालेली मामुली जखम, आलेला बेताचा आजार देतो. कारण आफ्रिकेमधील राहणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला एवढी आत्मीयता नसते. आपली आत्मीयता स्वतःच्या सुखामध्ये व जवळील नातेवाईकांच्या सौख्यामध्ये एवढी खर्च झालेली असते की आपल्या मनात इच्छा येऊनसुध्दा बाकीच्या गोष्टींबद्दल आपण आत्मीयता आणू शकत नाही.

आता साधकाचे खरे ध्येय जर साधना करुन देवाची करुणा भाकणे हे असेल तर त्याची आत्मीयता यामध्ये इतकी खर्च होते की इतर सर्व गोष्टींमध्ये तो आपलेपणा आणूच शकत नाही. मग त्याला आत्यंतिक दुःख आणायची क्षमता त्याच्या जीवनातील इतर कुठल्याच गोष्टींमध्ये राहात नाही. बायकोला, मुलाला आलेले आजारपण तो इंडोनेशियामध्ये घडलेल्या भूकंपाप्रमाणे आपल्यापासून दूर आहे असे पाहू लागतो! स्वतःच्या सामाजिक स्थितीवर आलेली आपदा तो न्युयार्कवरील अतिरेकी लोकांच्या हल्ल्याइतकीच तटस्थतेने पाहू शकतो! म्हणजे वरील दोन ओवींमधून जर आपल्याला सुटायचे असेल तर आधी आपली मानसिक स्थिती अशी झाली पाहीजे की परमेश्वरापासून दूर राहणे ही एकच गोष्ट आपल्याला दुःख देऊ शकली पाहीजे व तसे आपल्या जीवनात कधीतरी होईल ही एकच भीति आपल्यामध्ये शिल्लक राहीली पाहीजे! अशा रीतीने दुःखामुळे व भीतीमुळे आलेला साधनेमधील अस्थिरपणा साधकाला भगवंताबद्दल आत्मीयता नसल्याचे दर्शवितो. साधकाचे लक्ष भगवंतापासून किती दूर आहे हे दाखवितो. म्हणूनच हे अज्ञानाचे लक्षण आहे.

 

 

धैर्य, स्थिरता प्राप्त करायची साधना

 

 

आत्ताच आपण बघितले की साधनेमध्ये धैर्य, भगवंताबद्दलच्या आस्थेमध्ये स्थिरता यायला भगवंताला आपण अत्यंत जवळचा मानला पाहिजे. हे आपण कसे मानू शकू? भगवंताच्या आत्यंतिक जवळिकेमुळे आपल्याला काय मिळेल? आयुष्यभर आपली प्रत्येक कृती फळापेक्षेने केलेली आहे. म्हणून भगवंताजवळ गेल्यावर काय मिळेल याची थोडीतरी कल्पना आल्याशिवाय आपण त्याच्या जवळ जाण्याकरीता लागणारी साधना करू शकत नाही. सर्व संत साहित्य वाचल्यावर आपल्यास आकर्षक वाटणारी एक गोष्ट म्हणजे भगवंताच्या जवळ गेल्यास मिळणारी अखंड शांति व समाधान. दररोजच्या जीवनामध्ये न मिळणाऱ्या ह्या गोष्टी संत आपल्याला देणार ह्या खात्रीने आपण त्यांच्याजवळ जातो व त्यांच्या सुचनेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांच्या समाधानामध्ये आपल्या सुखाची व्याख्या असते व ही सुखाची व्याख्या न बदलता आपण संतांकडून शाश्‍वत सुखाची अपेक्षा करीत असतो. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की इंद्रियांना आज एक गोष्ट मिळाली की उद्या त्याच गोष्टीमुळे मिळणारे सुख आजपेक्षा कमी असते. आज ज्या श्रीखंडाने तृप्ती दिली होती तेच श्रीखंड दररोज समोर ठेवले तर मिळणारा आनंद कमी कमी होत जातो. खरं म्हणजे काल मिळालेली गोष्ट आपण आज गृहीत धरतो व परवा त्याचा कंटाळा येतो. संत आपल्याला शाश्‍वत सुख व आनंद देण्याचा वायदा करतात पण त्यामध्ये एक मेख आहे. हे अमर्याद सुख व आनंद इंद्रियांमार्फत भोगता येईल असे ते आपणांस सांगत नाहीत. आपणसुध्दा त्यांच्या शब्दांवर इतके खुश असतो की सुख, आनंद या दोन शब्दांची त्यांच्या मनातील व्याख्या विचारायला विसरतो! आपण असे मानतो की आपल्या मनांत सुख म्हणजे जी काही संकल्पना आहे तीच त्यांची असेल. ह्या विसंगतीमध्येच अस्थिरतेचे मूळ आहे. याचे कारण असे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागून सुध्दा जेव्हा आपल्या मनासारखे सुख मिळत नाही तेव्हा आपण अस्वस्थ होऊन संतांकडे जातो आणि ते आपल्याला सांगतात की सर्व काही बरोबर चाललेले आहे व सुख आता फक्त हाकेच्या अंतरावर आहे. परंतु आपल्या जीवनातील व्यावहारिक सुखात फार फरक पडत नसल्याने त्यांचे हे शब्द आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनांत त्यांच्या शब्दांबद्दल शंका यायला लागते व इथेच अस्थिरता सुरू होते. तेव्हा स्थिरता प्राप्त होण्याकरिता हे जरुरी आहे की आपण संतांची सुखाची व्याख्या जाणुन घेतली पाहिजे. त्या व्याख्येचे सुख आपल्याला हवे असेल तरच आपली साधना आपण सुरू करायला हवी. नाहीतर आपल्याला पश्चिम दिशेला जायचे असताना पूर्व दिशेच्या मार्गावर चालण्यासारखी आपली साधना होईल. संत साहित्यातून पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे सर्व संत फक्त साधकाच्या सुखाची जबाबदारी घ्यायला तयार असतात. साधकाच्या मुलाला, बायकोला, आई-वडिलांना सुध्दा सुख मिळेल असे ते कधी सांगत नाहीत. त्यांच्या सुखाकरीता त्यांनी स्वतः साधना करणे जरुरी असते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या सुखाच्या व्याख्येमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या सुखाची अपेक्षा असेल तर ती बरोबर नाही. नीरो राजा सर्व रोम शहर जळत असताना शांतपणे व्हायोलीन वाजवत बसला होता अशी एक इतिहासातील घटना सांगतात. त्याचप्रमाणे आपली अशी तयारी आहे का की आजूबाजूचे सर्व जग उध्वस्त होत आहे तरी आपण संतांनी दिलेल्या आनंदामध्येच राहू. आपली अशी तयारी नसते! आपल्या सुखाच्या व्याख्येत जवळच्या माणसांच्या सुखाचीसुध्दा अपेक्षा असते. जवळच्या माणसांचेच सुख कशाला, अगदी आपल्या देहालासुध्दा वेदना होत असताना आपण आनंदी राहू शकतो. पण याची कल्पनासुध्दा आपल्याला नसते. संतांनी फक्त आपल्याला आनंद, अपरीमीत सुख द्यायचे कबूल केले आहे. आपल्या जवळच्या माणसांना, किंवा आपल्या देहाला सुस्थितीत ठेवायचे कबूल केलेले नाही हे आपल्याला अज्ञानामुळे लक्षात येत नाही! खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये देहाच्या वेदनेचा व आपल्या सुखाचा संबंध नाही हे लक्षात आणून देणाऱ्या अनेक घटना घडत असतात. घरातील गृहीणी आपल्या माणसांकरीता अत्यंत आनंदाने कष्ट करीत असते. लहान मुलाला पतंग उडवित असताना बोटाला झालेली मांज्याची जखम दुःख देत नाही तर क्रिकेटची मॅच खेळताना उन्हाचा ताप आपल्याला कधीच जाणवत नाही!

खरा आनंद म्हणजे भौतिक सुख नव्हे ही गोष्ट पटवून घेण्याकरीता आपण आनंदाची सांगड दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी लावली पाहीजे. मगच आपली ही आधीची चुकीची जोड निघून जाईल. म्हणून साधनेत स्थिरता प्राप्त होण्याकरीता आपल्याला सुख नक्की कशाने मिळते याचा साधकाने थोडा विचार करावा. असा विचार केल्यावर हे स्पष्ट होईल की आनंद हा `गोष्ट आहे तशी स्वीकारण्यामध्ये’ आहे. ज्या गोष्टींनी आत्तापर्यंत जेव्हा-जेव्हा सुख दिलेले आहे ते आपण त्या गोष्टींना स्वीकारण्याचा शिक्कामोर्तब दिल्यावरच. याचे कारण असे की गोष्ट संपूर्ण रीतीने स्वीकारल्यावर आपले मन सर्व धडपड थांबवून, शांत होऊन, आपल्या मूळस्थितीत स्थिर होते. आपले आत्मरुप हे आनंदमय असल्याने आपल्याला आनंदाचा लाभ होतो. नंतर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात परत घडल्या (जसे दररोजच श्रीखंड जेवायला मिळाले) तर आपली त्या गोष्टी स्वीकारण्याची क्षमता हळूहळू नाहीशी होते व म्हणूनच मिळणारे सुख हळूहळू कमी होत जाते. याउलट सर्व जगाच्या दृष्टीकोनातून वाईट असलेली गोष्ट जरी घडली (उन्हात खेळायला लागणे, आप्तजनांकरीता शारीरीक कष्ट सोसायला लागणे इत्यादी) तरिसुध्दा ती गोष्ट आपण स्वीकारली तर आनंद मिळू शकतो. म्हणून आपण हे स्वीकारायला हवे की स्वीकारामध्येच खरा आनंद आहे! सर्व संत आपल्याला हजारो वर्षे हेच सांगत आले आहेत की जीवनात घडलेली प्रत्येक गोष्ट चांगल्याकरीताच घडते असे मानून तिचा स्वीकार करा. व हाच परमेश्वराच्या दर्शनाकरीता सोपा मार्ग आहे. परंतु पाश्चिमात्य पध्दतीच्या शिक्षणामुळे आपली दुसऱ्यांवर कारणाशिवाय विश्वास ठेवण्याची क्षमता नाहीशी झाली आहे. म्हणून आपण ही गोष्ट आता परत आपली बुध्दी पणाला लावून शिकली पाहीजे.

वरील सर्व विचारांनी हे स्पष्ट होते की संतांची सुखाची व्याख्या ही `गोष्टींचा निरपेक्ष स्वीकार’ ही आहे. हे सुख आपल्याला हवे आहे का? सर्व साधकांनी असा विचार आधी केला पाहीजे व मगच संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला सुरुवात केली पाहीजे. तसे पाहिले तर या सुखाच्या व्याख्येमध्येच सर्व दुःखाचे निराकरण आहे! कारण दुःख हे केव्हा होते? जर अपेक्षेप्रमाणे गोष्ट घडली नाही तरच! तसाच भीति हा शब्दसुध्दा या व्याख्येमुळे आपल्या जीवनातून नाहीसा होतो. जेव्हा आत्यंतिक दुःख वा भीति आपल्याला जाणविते त्या वेळी झालेली गोष्ट आहे तशी आपण स्वीकार केलेली नसते व म्हणूनच स्वीकाराच्या साधनेच्या मार्गावरुन आपण च्युत झालेलो असतो. त्या प्रत्येक वेळी आपण अज्ञानी झालेलो असतो. जीवनातील किती गोष्टी आपल्याला दुःख देऊ शकतात यामध्येच आपण साधनेची प्रगती, परमेश्वराशी जवळीक बघायची असते. जेवढ्या कमी गोष्टींमुळे दुःख व्हायला लागेल तेवढे आपण परमेश्वराच्या जवळ गेलेलो असतो, तेवढी परमेश्वराबद्दलची आत्मीयता वाढलेली असते. शेवटी ती आत्मीयता एवढी टोकाला जाते की जगातील कुठलीही गोष्ट, अगदी आपला देहसुध्दा आपल्याला दुःख देऊ शकत नाही. अशा वेळी साधनेतील स्थिरता परमोच्चपदाला पोहोचलेली असते व साधक परमेश्वरापासून फार दूर नसतो.

परंतु हे सर्व आपल्या जीवनात घडून यायला आधी आपली सुखाची व्याख्या आपण संतांप्रमाणे `गोष्टींचा आहे तसा स्वीकार’ अशी केली पाहीजे व भौतिक जगातून सुखाची अपेक्षा करणे सोडले पाहीजे. या दोन गोष्टींमध्येच साधनेची खरी सुरुवात आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: