(19+20)/1: Action And Thoughts

॥ ॐ श्री सद्‍गुरू माधवनाथाय नमः ॥

अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।

मकार महामंडल । मस्तकाकारे ॥ १९:१ ॥

हे तिन्ही एकवटले । तेथे शब्दब्रह्म कवळले ॥

ते मियां श्रीगुरूकृपा नमिले । आदिबीज ॥ २०:१ ॥

ज्ञानेश्वरी सुरू करताना ज्ञानेश्वरांनी गणपतीला नमन केले आहे. वरील दोन ओव्या ह्या नमनाच्या शेवटच्या दोन ओव्या आहेत. आज आपण ह्या दोन ओव्यांवर विचार करू.

वेदांमधील ॐ

वेदांमध्ये सर्व जग हे ॐ ह्या शब्दात सामाविले आहे असे अनेक ठिकाणी नमूद केले आहे. मांडुक्य उपनिषद तर केवळ ॐ म्हणजे काय हे स्पष्ट करीण्याकरीताच लिहीले गेले आहे. खरं तर अद्वैत सिध्दांताची परमावधी म्हणजे (१) मांडुक्य उपनिषद (२) त्यावर केलेली गौडपाद ऋषींची कारिका व (३) या दोघांवर असलेली जगद्‍गुरू आदिशंकराचार्यांचे भाष्य ही त्रिकूटी आहे. वरील दोन ओव्या माडुक्य उपनिषदाचाच संदर्भ देत आहेत.

या उपनिषदामध्ये ॐ या शब्दाचे चार भाग करण्यात आले आहेत. (१) अ (२) उ (३) म व (४) शांतता.

शांतता असल्याशिवाय ॐ या शब्दाचा उच्चार होऊ शकत नाही. ॐकार व्हायच्या आधीची शांतता व झाल्यानंतरची शांतता ह्यामध्ये तत्वतः काहीच फरक नाही म्हणुन ही एकच मानली आहे.

यामधील अकार हा जागृत अवस्थेचे किंवा बाह्य जगाचे दर्शन दाखवितो, उकार हे स्वप्नावस्थेचे नाव आहे व मकार म्हणजे प्रज्ञा. ही अवस्था पूर्णपणे अनुभवायला पहिल्या दोन गोष्टींची अनुपस्थितीची गरज असते. केवळ गाढ झोपेतच आपण बाह्य जग व स्वप्ने यांपासून मुक्‍त असतो. म्हणून म ह्या शब्‍दाने आपली गाढ झोपेची अवस्था म्हणजे `सुषुप्ति’ प्रदर्शित होते. शांतता हा चवथा भाग असल्याने ती `तुरीया’ (संस्कृतमध्ये तुरीयाचा अर्थ चवथा भाग असा आहे) अवस्था दर्शविते. या अवस्थेमध्ये आपण पहिल्या तिन्ही अवस्थेपासून भिन्न असतो व यामधूनच पहिल्या तीन गोष्टी प्रसवितात व यातच त्या विलीन होतात. मांडुक्य उपनिषदात ॐ चा अर्थ असा सांगितला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे जरी वेदामध्ये या भागांना १,२,३,४ असे नंबर दिलेले असले तरी त्याचा अर्थ पहिला भाग आधी येतो व मग दुसरा भाग येतो असा नसून पहिल्या भागातून दुसऱ्या भागाबद्दल माहिती मिळते व दुसऱ्या भागाकडे नीट लक्ष दिल्यावर तिसऱ्याकडे जाता येते असा आहे. जसे आंब्याचे फळ हे पहिल्यांदा कोय, मग गर आणि शेवटी साल असे न येता ते सर्व बरोबर घेऊन एकदमच उत्पन्न होते व हळूहळू या तीन्ही गोष्टी बरोबरच वाढतात तसे आपले जग एकाचवेळी हे तिन्ही भाग बरोबर घेऊनच जन्माला येते. जागृत अवस्थेमधील साधनेमुळेच आपल्याला बाकीच्या अवस्थांची जाणीव करून घ्यायची असते असा याचा अर्थ आहे.

देवाचे निर्गुण रुप आणि सगुण रुप.

गणपती हे परमेश्वराचे रुप आहे. आपण जेव्हा परमेश्वर या शब्दाने देवाला आठवितो तेव्हा त्याच्या निर्गुण रुपाबद्दल विचार करत असतो. एखाद्या विशिष्ट देवाची मुर्ती तेव्हा आपल्या मनात नसते. उदाहरणार्थ एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडली की आपण परमेश्वराच्या कृपेनेच ती झाली असे मानतो कारण आपल्याला कल्पना नसते की विष्णु, गणेश, वा मारुती पैकी नक्की कोणी आपल्याला मदत केली आहे!! परमेश्वर म्हंटले की आपण मोकळे होतो. नाहीतर मदत केली असायची शिवाने आणि आपण गणपतीचे आभार मानायचो. परंतु पूजा करताना आपले मन स्थिर होण्याकरिता आपण अमूर्त अशा परमेश्वराला न भजता एखाद्या ठरविक मूर्तीची पूजा करीतो, ठराविक गोष्टींसाठी ठराविक देवांचीच पूजा करीतो. म्हणूनच जेव्हा विघ्न-निवारण व्हावे अशी आपली अपेक्षा असते तेव्हा गणपतीची पूजा करून, त्याला वंदन करूनच आपण कामाला सुरुवात करतो. अशा रीतीने आपल्या दररोजच्या आयुष्यातसुध्दा आपण देवाच्या सगुण व निर्गुण या दोन्ही रुपांची आराधना, त्यांचे स्तवन करीत असतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही व कोणी देवाचे निर्गुण रुप असे शब्द वापरले की आपण उगाचच बिचकतो!!!

विघ्न निवारण करीण्याकरीता गणेशाचे स्तवन करून ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा ही प्रथा पाळल्यासारखी दिसते. परंतू त्यांच्या दृष्टीच्या थोरपणामुळे त्यांना गणपतीच्या सगुण रुपातच निर्गुण रुपाची जाणीव होते व एकाचवेळी ते दोन्ही रुपाची पूजा करू शकतात. त्यामुळे त्यांचे हे वंदन जगावेगळे होते. म्हणूनच गणपतीच्या हातातील विविध शस्त्रे व गोष्टी त्यांना कशासारख्या दिसतात? तर मोदक म्हणजे वेदांत, परशु म्हणजे तर्कशास्त्र, कंबरेवर असलेली मेखला म्हणजे व्यासमुनींची बुध्दी वगैरे. आपले असे गणेशाचे वर्णन संपविताना ज्ञानेश्वर महाराजांनी वरील दोन ओव्या वापरल्या आहेत व त्यामध्ये ॐकाराला गणेशाच्या मूर्तीत फार सुंदर रीतीने दर्शविले आहे.

पहिल्या अ भागाबद्दल ते म्हणतात की `अकार चरणयुगुल’. चरणयुगुल हे पायांचा भाग असल्याने यामार्फत ज्ञानेश्वर महाराज केवळ पायच नव्हे तर सर्वच इंद्रिये सूचित करीत आहेत असे आपण मानू शकतो. बाह्य सृष्टीबद्दलचे सर्व ज्ञान ह्या इंद्रियांमार्फतच आपल्याला होत असल्याने साहजिकच ज्ञानेश्वर महाराज बाह्य सृष्टीबद्दल बोलत आहेत हे स्पष्ट होते. आपण बाह्यसृष्टी ही आपल्याशिवाय स्वतंत्र अशी अस्तित्वात आहे असे मानतो (आपल्या सर्वांची अशी खात्री आहे की मी असो वा नसो सृष्टी ही अस्तित्वात राहणारच). परंतु ज्ञानेश्वर महाराज ह्या रुपकामार्फत आपल्याला असे सांगत आहेत की आपल्याकरीता केवळ अशाच गोष्टी अस्तित्वात आहेत की ज्यांचे ज्ञान आपण आपल्या स्वतःच्या इंद्रियांमार्फत करू शकतो. उदाहरणार्थ, खाली मान करुन चालताना वर आकाशात एखादा सुंदर पक्षी उडत गेला तर आपण त्याला अस्तित्व देऊ शकत नाही. याउलट एखादा मनुष्य पक्षी निरीक्षणाकरीता बसला असेल तर त्याच्या जीवनामध्ये ह्या घटनेला खूप महत्व येते. तो कदाचित्‌ असेसुध्दा म्हणेल की आजचा दिवस हा पक्षी दिसल्यामुळे सार्थकी पडला! अशा रीतीने बाह्य जग हे सर्वांकरीता एकच आहे ह्या आपल्या पूर्ण खात्रीलाच ज्ञानेश्वर महाराज तडा देतात. बाहेरील जगाला शरीराच्या इंद्रियांमध्ये पाहण्यामध्ये बाहेरील एकाच जगाचे प्रत्येक व्यक्तीकरीता असलेले भिन्नपण फार सुंदर रीतीने प्रदर्शित केले आहे.

दुसरा भाग उकार म्हणजे स्वप्नावस्था. स्वप्न ही गोष्ट माणसाच्या मनामध्ये घडत असल्यामुळे बाहेरील जगाला त्याचे ज्ञान होणे शक्य नसते. खुद्द त्या व्यक्तीलासुध्दा आपल्याला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाची जाणीव असतेच असे नाही. परंतु व्यक्तीच्या बहुतेक कृती ह्या त्याने पाहिलेल्या स्वप्नांमुळेच होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्याचे स्वप्न श्रीमंत व्हायचे असेल तर जगातील त्याची वागणूक ही साधनेत खूप प्रगती करायची स्वप्ने बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा निश्चित वेगळी असेल. खूप वेळा आपल्या मनांत कुठल्या गोष्टींचा पगडा आहे ही माहिती करून घ्यायला आपला जगातील वागण्याचा अभ्यास करणे हीच एक गोष्ट आपल्या हातात असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्वप्ने ही आपल्या पूर्वकर्मांवर अवलंबून असतात. ज्या गोष्टींची आपल्याला कल्पना असते त्यांच्याचबद्दल आपण विचार करू शकतो, स्वप्ने बघू शकतो. म्हणूनच लहान मुलाचे स्वप्न चॉकलेटच्या दुनियेत रहायचे असेल तर तरूण माणसाचे स्वप्न स्वर्गप्राप्तीचे असेल तर साधकाचे स्वप्न स्वानंदमय जीवन जगण्याचे असेल. अशा रीतीने बाह्य जग हे स्वप्नील जगावर परीणाम करीते. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्न ह्या स्थितीला पोटाची उपमा दिली आहे. पोटामध्ये खाल्लेल्या सर्व गोष्टींच्या पचनक्रियेला प्रारंभ होतो. म्हणुन आपण पोट हे पचनक्रियेचे रुपक असे मानू शकतो. तसे जर आपण मानले तर ही उपमा किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्याप्रमाणे पोटांत येणारे अन्न हे बाहेरील जगातल्या धडपडीमुळेच येते त्याचप्रमाणे आपली स्वप्ने ही आपल्या जगातील अनुभवांवरच आधारीत असतात. ज्याप्रमाणे पोटांतील पचनक्रिया घडलेल्याची जाणीव सर्वांना शरीराला (म्हणजे इंद्रियांना) मिळालेल्या पोषणातूनच होऊ शकते, त्याचप्रमाणे कोणाचे स्वप्न काय आहे हे त्याच्या बाहेरील जगातील वागणुकीमध्येच दिसुन येते. अशा सर्व दृष्टीने बघितल्यास `उ’ कार या अक्षराने वेदांनी स्वप्नावस्था दाखविली आहे तीच ज्ञानेश्वरांनी `उदर विशाल’ या वर्णनात दाखविली आहे हे स्पष्ट होते.

`म’ हे अक्षर सुषुप्ति म्हणजे आपली व प्रज्ञेची एकरुपता दाखवीतो. ही अवस्था जागृत व स्वप्ने या दोघांकडे लक्ष ठेऊन असते. आपल्या बुध्दीने एखादी गोष्ट चांगली व दुसरी वाईट असे आपण ठरविले की त्याचप्रमाणे जगातील आपली वागणूक होते व कुठली स्वप्ने आपण बघावित हे आपल्याला स्पष्ट होते. म्हणुनच बुध्दीचे शरीरातील स्थान `मस्तक’ हे ज्ञानेश्वरांनी `म’ काराला रुपक म्हणुन दिलेले आहे.

आता राहिली `तुरीया अवस्था’, ॐकाराचा चवथा भाग. या शांततेला ज्ञानेश्वरांनी संपूर्ण शरीर ज्या पोकळीमध्ये, ज्या आकाशात दिसत आहे त्याची उपमा दिली आहे. `हे तिन्ही एकवटले । तेथे शब्दब्रह्म कवळले ।’ या शब्दांतून ते चवथी अवस्था दर्शवित आहेत. शरीर असले किंवा नसले तरी या अवकाशात काही फरक पडत नाही व अवकाश नसले तर शरीर दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आत्मरुपात शरीराच्या असण्यामूळे वा नसल्याने काही फरक पडत नाही व आत्मरुपाशिवाय शरीर असू शकत नाही. म्हणून तुरीया अवस्था आपली व आत्मरुपाची एकरुपता दर्शविते. अशा या अवस्थेला ज्ञानेश्वर महाराज किती महत्व देतात हे त्यांच्या `ते मियां श्रीगुरूकृपा नमिले । ‘ या शब्दांतून प्रकट होते. या अवस्थेची जाणीव होणे व महत्व वाटणे ही क्रिया केवळ गुरू-कृपेनेच होते असे ते सांगत आहेत. या अवस्थेतच `आत्मरुप’ आपण जाणून घेऊ शकतो व याचाच ध्यास साधकाने सतत ठेवावा अशी सूचना तो आपणा सर्वांना देत आहेत.

अशा रीतीने ही गोष्ट स्पष्ट होते की वेदांतील निर्गुण देवाचे ॐ असे जे वर्णन आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांना परमेश्वराच्या प्रत्येक सगुण रुपात दिसत होते (कारण कुठल्याही अवताराला पाय, पोट व मस्तक असतेच!). त्यातून कदाचित ज्ञानेश्वर महाराजांना असे सुध्दा सुचित करायचे असेल की जरी तुमची देवाच्या एखाद्या सगुण रुपावर श्रध्दा असली, तरी त्यातूनसुध्दा तुम्ही परमेश्वराच्या निर्गुण रुपाकडे पोहोचू शकता. त्याकरीता साधना न बदलता फक्‍त आपली त्या सगुण रुपाकडे पहायची दृष्टी बदलायची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर `मला स्वतःला तुम्ही असे केलेले अत्यंत आवडेल’ असेच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ह्या रुपकामार्फत सांगत आहेत. साधनेचे ध्येय आपले आत्मरुप जाणुन घेणे हेच आहे असे जे त्यांनी आपल्याला पहिल्याच ओवीत स्पष्ट केले आहे त्याला साजेल असेच हे सुंदर रूपक आहे.

साधनेवरील परिणाम

आता आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ह्या रूपकाचा कसा उपयोग करून घेऊ हे पाहूया. थोडक्यात सांगयचे म्हणजे वरील रुपकाचा साधकाच्या जीवनाशी संबंध असा आहे:

जे काही आपल्याला आत्ता महत्वपूर्ण वाटत आहे त्याच्याशी अत्यंत प्रामाणिक राहून जीवन जगा. अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्या स्वप्नांना साकार करायचा प्रयत्‍न करा. हा तुमचा प्रयत्‍नच तुम्हांला त्या स्वप्नांतुन मुक्तता देत आहे. ही स्वप्ने आयुष्यातून गेल्यावरच म्हणजे त्यांचे महत्व कमी झाल्यावरच तुमच्यामध्ये नवीन स्विकारायची क्षमता येणार आहे.

हा अर्थ काढण्याचे कारण असे आहे. काही वेळापूर्वीच स्वप्ने बघणे ही अवस्था पचनक्रियेसारखी आहे हे आपण बघितले. जर नवीन, अधिक अर्थपूर्ण जीवन जगून परमेश्वराच्या जवळ जाण्याचे स्वप्न बघायचे असेल तर आपल्या पोटांत आधी आपण त्याकरिता जागा केली पाहीजे व ते स्वप्न बघण्याकरीता लागणारी भूक जाणविली पाहीजे. पोटातील ही जागा आधीच्या अन्नाचा निचरा झाल्याशिवाय होत नाही आणि तो निचरा होण्याकरीता अन्नांतील घटक सर्व इंद्रियांना पोहोचणे जरूरी असते.

आपण सुखाची कल्पना प्रथम भौतिक जगातील गोष्टी मिळण्यामध्ये करतो. तिथूनच सर्वांची सुरूवात होते. म्हणुन आपल्या सर्व ऐहिक सुखाच्या अपेक्षा प्रामाणिकपणे आपल्याशी कबूल करून त्या मिळविण्याच्या, पूर्ण करण्याचा आपला प्रयत्‍न ही खरी म्हणजे साधनेचीच सुरूवात आहे. म्हणूनच संत लोक आपल्या भौतिक सुखाच्या इच्छा (आपली सामाजिक स्थिती सुधारणे, मुला-बाळांचे आयुष्य मार्गाला लागणे इत्यादी) पूर्ण होण्याकरीतासुध्दा आशिर्वाद देतातच. कितीतरी लोकांना दादासाहेबांनी व्यावहारीक दृष्टीकोनांतून मदत केलीच आहे. परंतु त्यांच्या या मदतीचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला संपूर्ण जीवन अशा इच्छांमध्येच व्यतीत करायला परवानगी दिली आहे. आपल्या या इच्छांचा निचरा होऊन आपले मन साधनेच्या मार्गावर चालायला मोकळे होईल या अपेक्षेने ते आपल्याला मदत करीत असतात. हे आपण संपूर्णपणे जाणून त्याप्रमाणे वागले पाहिजे. असे जाणले नाही तर आपल्या ऐहीक सुखाची अपेक्षा आपण कधीच सोडू शकणार नाही. आपल्या सध्याच्या इच्छा, आकांक्षांची एकतर पूर्णता झाल्याशिवाय किंवा त्या ठेवण्यामध्ये असलेली विफलता जाणविल्याशिवाय साधक आत्मरुपी देवाकडे जाणार नाही याची ज्ञानेश्वरांनासुध्दा पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी पसायदानामध्ये `किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनी तिहीं लोकी। भजिजो आदिपुरुखी। अखंडित॥’ असे सांगितले असावे. त्यांची अपेक्षा आपण सर्व विचार, सर्व आकांक्षा सांडून लगेच आत्मरुपाचा शोध घ्यावा ही नसून `तिही लोकांमध्ये पूर्ण होऊन’ मगच आदिपुरुषाची आराधना करावी ही आहे. आपल्या पोटांतील इच्छांचा निचरा होऊन मग मोकळ्या झालेल्या जागेत साधनेचे अन्न जावे अशीच त्यांची देवाजवळ मागणी आहे.

जोपर्यंत आपल्याला सद्य परिस्थितीत समाधान, सुख आणि शांति मिळत आहे तोपर्यंत आपल्या हातून ती परिस्थिती बदलायची सुतराम शक्यता नसते. ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहीजे व तीचा स्वीकार केला पाहीजे. ही प्राथमिक गोष्ट वरील रुपकावरून लगेच कळू शकते. जर हातपाय व्यवस्थित आहेत व पोट भरलेले आहे, डोक्यांत मनासारखी वस्तू मिळाल्याचा आनंद आहे तर आपले शरीर नवीन खाद्य मिळवायला कशाला धडपड करेल? तेव्हा साधकाची साधना सुरू व्ह्यायला, म्हणजे साधकाला दृश्य गोष्टींतील आनंदापासुन आत्मरुपापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेला सुरू करायला, त्याच्या जीवनांत आणीबाणीचा प्रसंग येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या आयुष्यात युध्द करण्याबद्दल प्रचंड निराशा निर्माण झाल्यावरच साधनेला (म्हणजे गीता-श्रवणाला) सुरूवात झाली त्याप्रमाणे आणिबाणीचे प्रसंग जीवनांत येणे साधनेकरीता आवश्यक आहेत. अशा आणिबाणीच्या प्रसंगामध्ये मध्ये जर त्याला योग्य मार्गदर्शन लाभले तरच त्याची साधना सुरू होऊन नीट मार्गावर जायचा संभव असतो. ह्यावेळी त्या साधकाचे स्वप्न बदलते, जीवनाचा उद्देश्य वेगळा होतो व म्हणूनच बाह्यजगातले त्याचे वागणे बदलते. ह्या बदलालाच तो साधना करीत आहे असे नाव देतो.

ही गोष्ट आपल्या मनावर पुर्णपणे बिंबली पाहीजे. एकदा का ही गोष्ट पटली की जीवनातील खडतर प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. अश्या प्रसंगामुळे जे दुःख होते त्याचा उपयोग साधक आपली साधना आता कशी करायला हवी हे ठरवायला करतो. उदाहरणार्थ, बायको अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर राग येण्यापेक्षा आपली अपेक्षा कितपत बरोबर होती याचा विचार तो करू शकतो. किंवा साधनेमध्ये खंड पडला तर निराश न होता, या पडलेल्या खंडातून मला साधनेपेक्षा कुठली गोष्ट जास्त प्रिय आहे हे कळले या आनंदात तो राहतो. परंतु हे सर्व कळायला घडलेल्या घटनेतून त्याला दुःखाची जाणीव अत्यंत तीव्रतेने झाली पाहीजे. जेवढा आणिबाणीचा क्षण मोठा असेल तेवढा साधकाला जोराचा झटका बसतो व तेवढे त्याचे आयुष्य बदलू शकते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे पोटांत एक व ओठांत दुसरे अशी अवस्था जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत आपण नवीन काही शिकण्याची शक्यता नसते. कारण अशा वागण्याने पोटातील इच्छा पोटातच राहतात. अत्यंत प्रामाणिकपणाने कबूल करा की मला अमुक अमुक गोष्टींतच स्वारस्य वाटते व आपले आयुष्य त्या गोष्टींकरिताच खर्च करा. पण जेव्हा जेव्हा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत तेव्हा तेव्हा अंतर्मुख होऊन आपल्या स्वप्नांच्या योग्यतेबद्दल विचार करा. अशा साधनेमुळे साधकाचा प्रामाणिकपणा वाढतो, मनांतील इच्छांचा निचरा होतो व नवीन, अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण जीवन जगायला तो पात्र होतो. आपली स्वप्ने व गणेशाच्या मूर्तीचे `विशाल उदर’ यांचा संबंध आपण असा जोडून हा धडा शिकला पाहीजे. या रुपकाचा आपल्याकरिता हाच सर्वात मोठा उपयोग आहे.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर येथे २० ऑक्टोबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: