12th Shloka/12: The Ultimate Sadhana

॥ ॐ श्री सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानद्‍ध्यानं विशिष्यते ।

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छांतिरनंतरम्‌ ॥ १२:१२ ॥

बाराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला भक्तियोग सांगितला. त्या अत्यंत रसाळ अध्यायातील हा बारावा श्लोक आहे. जरी प्रत्येक साधकाचा मार्ग भिन्न असला तरी सर्वसाधारणपणे साधक कुठल्या मार्गाने साधनेत प्रगती करतो याचे वर्णन करायला हा श्लोक त्यांनी वापरला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ह्यावरील भाष्य असे आहे:

अभ्यासाहुनि गहन । पार्था मग ज्ञान ।

ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१:१२ ॥

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।

त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२:१२ ॥

ऐसिया या वाटा । इहीचि पेणा सुभटा ।

शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणे ॥ १४३:१२ ॥

या ओव्यांचा शाब्दीक अर्थ आहे `अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान व ध्यानापेक्षा कर्मफलत्याग हा श्रेष्ठ आहे. या सर्वांचा कळस म्हणजे निरंतर शांतीचा साधकाचा उपभोग हा आहे. सर्वजण याच वाटेने चालून शांतीच्या घरात विश्रांती घेतात’. आज आपण ह्या ओव्यांचा आपल्या जीवनात काय अर्थ होऊ शकेल हे पहायचा प्रयत्‍न करु.

ज्ञानाचे खरे महत्व

आपण लहानपणापासून जीवनात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. शाळेत असताना सर्व अभ्यास हा ज्ञान प्राप्त होण्याकरिताच असतो अशी आपली खात्री असते. ज्ञानप्राप्तीची एक खूण म्हणूनच आपण आपले परीक्षेतील गुण बघत असतो. माणसाला जितक्या जास्त गोष्टींबद्दलची माहिती असेल तितके आपण त्याला महत्व देतो, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्‍न करतो. अगदी आपल्या पारमार्थिक साधनेतसुद्धा आपण `ज्ञानी’ व्हायचाच प्रयत्‍न करीत असतो. अशा रीतीने आत्तापर्यंत ज्ञान मिळविणे हे आपण सर्वात महत्वाचे मानले आहे. परंतु वरील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण वेगळेच सांगत आहेत. ते म्हणतात की (जराशा) अभ्यासाने ज्ञान प्राप्त हो‍ऊ शकते. ध्यान, कर्मफलत्याग व अखेर शांति ह्या सर्व गोष्टी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत! त्यांच्या या उद्‍गारांनी आपल्या मनात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आपण यावर विचार करायची आवश्यकता आहे.

सर्वसाधारणपणे साधकाच्या दररोजच्या जीवनामध्ये काही अडचणी आल्यानंतरच साधक परमार्थाच्या मार्गावर नेटाने चालायला लागतो. ज्याप्रमाणे तानाजीने पळून जायचे दोर कापल्यावरच त्याच्या सैनिकांनी प्राण पणाला लावून लढाई केली व विजय मिळविला, त्याचप्रमाणे आपल्या भौतिक जगामध्ये सुख मिळविण्याच्या आशा मावळल्यावरच परमार्थाच्या सूर्याचा उदय होतो. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात त्यांना आलेला प्रचंड आजार, श्री रमणमहर्षींना अचानक झालेली मृत्यूप्राय अवस्था, अर्जुनाला आलेला विषाद, बुद्धाला प्रत्येक गोष्टींचा दिसलेला अशाश्‍वतपणा इत्यादी अनेक घटना उदाहरणार्थ देता येतील. अशा अत्यंत महत्वाच्या क्षणी आपल्या जीवनांत एक वादळ निर्माण होते. आत्तापर्यंत महत्वाच्या मानत असलेल्या गोष्टींबद्दल आपण शंका घेऊ लागतो. आपले आयुष्य वाया गेले आहे की काय? या विचाराने आपण अत्यंत अस्वस्थ होतो व आपल्या जगण्याच्या धेयाबद्दल विचार करू लागतो. साधकावस्था प्राप्त होण्याआधीची ही घटना आहे. परंतु अशा घटनेची तीव्रता ही काही आयुष्यभर टिकण्यासारखी नसते. खरं म्हणजे कुठल्याच घटनेबद्दलची तीव्रता आयुष्यभर रहात नाहीं. काळ सर्व गोष्टींचे महत्व हळूहळू कमी करतो. म्हणून अशा अस्वस्थ अवस्थेत आपण असतानाच आपण अंतर्मुख होऊन जीवनाबद्दल खोल विचार केला पाहिजे. परंतु मन अस्वस्थ असताना आपली सारासार करण्याची बुध्दी कमी होते. म्हणून अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक असते. या विचार करण्याला मदत म्हणून आपण अशा व्यक्तींचीच साहजिक मदत घेतो की ज्यांच्या मनांत आपल्याबद्दल सद्‍भावना आहे, सहानुभूती आहे. आधीच्या आपल्या इच्छांबद्दल साशंक होऊन ही आपली शाश्‍वत वस्तू मिळविण्याची धडपड म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला `अभ्यास’ होय. अशा अभ्यासामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन लाभते, जो उपदेश मिळतो व जो विचार आपण करतो त्याचे फळ म्हणजे `ज्ञान’ हे होय. जर नशिबाने आपल्या जवळ श्रीगुरु असले व त्यांच्या सल्ल्यानुसार वागायले हवे अशी बुद्धी झाली तर आपले हे `ज्ञान’ साधनेच्या मार्गावर आपल्याला घेऊन जाते. नाहीतर जीवन हे असेच असते, कधी कधी दुःख हे होणारच त्याची सवय करायला हवी अशा विचाराचा पगडा आपल्यावर बसायची शक्यता असते. असे जर झाले, तर संतांच्या `जीवन हे केवळ सुखमय होऊ शकते’ अशा सांगण्यावर विश्वास ठेवायची आपली शक्‍ति रहात नाही. परंतु जर नशिब जोरावर असेल, पूर्व-प्रारब्ध चांगले असेल तर अशा मोक्याच्या वेळी श्रीगुरुंचे दर्शन होते व `परमेश्वराचे चिंतन हेच ध्येय ठेवायला हवे’, `सर्व जग हे परमेश्वराचेच रूप आहे’ अशा तऱ्हेचे (शाब्दिक) ज्ञान मिळते. थोडक्यात म्हणजे असे ज्ञान मिळवायला फारसे प्रयत्‍न करावे लागत नाहीत तर ते आपल्या हातात सत्‌संगतीने आपोआपच येते. एवढेच नव्हे तर आपल्या अस्वस्थ मनःस्थितीमुळे अशा प्रत्येक वाक्याला ते पूर्णपणे सत्य आहे असे आपण स्वीकारूसुद्धा शकतो. ह्या संपूर्ण स्वीकाराने आपण ज्ञानी होतो. परंतु आपले हे स्वीकारणे अत्यंत भावुक असते. ज्याप्रमाणे स्मशानातील वैराग्य घरी येईपर्यंत नाहीसे होते त्याचप्रमाणे भावनेची तीव्रता कमी झाल्यावर ह्या ज्ञानावरची श्रद्धा कमी व्हायला लागोतो. केवळ भावनेच्या जोरावरच (किंवा श्रद्धेवरच) हे ज्ञान आपण सत्य मानले असल्याने भावनेची तीव्रता कमी झाली की आपले ज्ञान कमी होते. सायकल चालवायला एकदा शिकले की परत शिकायला लागत नाही तसे हे ज्ञान नसते तर एखादी भाषा शिकण्यासारखे असते. एकदा शिकलेली भाषा जर वापरली नाही तर हळूहळू ती आपण विसरतो तसेच जर झालेले ज्ञान वापरात आणले नाही तर हळू हळू नष्ट होते. शिवाय पारमार्थिक ज्ञान हे इंद्रियांमार्फत कवटाळण्यासारीखे नसल्याने आपली त्यावरची श्रद्धा कमी झाली तर दृश्य गोष्टींतून ती परत मिळवायची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच अशा तऱ्हेच्या ज्ञानाला साधनेमध्ये अंतिम घटना असे भगवान श्रीकृष्णांनी मानलेले नाही. `भौतिक जगापलिकडे काहीतरी आहे, व त्यामध्येच खरे सुख दडलेले आहे’ हे ज्ञान भावुक रीतीने सत्य मानणे ही साधनेमधील एक महत्वाची घटना आहे याबद्दल संशय नाही, पण ती अंतिम घटना नाही हे भगवान श्रीकृष्णांना वरील श्लोकात सांगत आहेत. एकदा प्राप्त झालेले हे ज्ञान आपल्या आयुष्य़ात स्थिर होण्याकरीता त्या ज्ञानाचा असलेला श्रद्धेचा पाया बदलून तो `प्रचितीचा’ करायला हवा. हा पाया बदलायला साधना करायला हवी. अनेक पुस्तकांमध्ये आपण वाचलेले आहे की आत्मरूपाचा शोध हेच आपले ध्येय व्हायला हवे. कित्येकवेळा लिहीणाऱ्याबद्दलच्या आदरामुळे ते आपण सत्य आहे हे स्वीकारले देखिल आहे. तरीसुध्दा आपले आयुष्य बदलत का नाही? याचे कारण असे की ज्ञान मिळविण्यामध्येच धन्यता मानून आपण पुढे काहीच करत नाही. ह्या ज्ञानामुळेच सर्व जीवन बदलेल, अत्यंत सुंदर, अधिक अर्थपूर्ण होईल अश्या अपेक्षेत आपण राहतो. खरोखर जर आपल्याला आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकायचे असेल तर अशा ज्ञानाचे, वरील श्लोकामधे सांगितलेले, साधनेतील असे खरे महत्व आपण जाणून घेणे आवश्यक आहे.

ज्ञानानंतरची वाटचाल

जीवनातील आणिबाणीच्या क्षणी योग्य मार्गदर्शनामुळे अचानक प्राप्त झालेल्या ज्ञानानंतर साधकाने काय करावे? तर `ध्यान’ करावे असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. हे ध्यान म्हणजे `चिंतन व मनन’. ज्याप्रमाणे गायीचे गवत चरून झाल्यावर ती एका ठिकाणी शांत बसून रवंथ करते त्याचप्रमाणे मिळालेल्या ज्ञानावर आता शांतपणे विचार करायची आवश्यकता आहे. अशा विचाराने जे ज्ञान आपण सत्य आहे असे `मानले’ आहे ते मानणे-सवरणे बदलून ते ज्ञान सत्य आहे असे आपल्या जीवनात `सिद्ध’ होते. खरा परमार्थ `मानण्या-सवरण्यामध्ये’ कधीच नसतो. विचार करण्याने, आपण `परमेश्वराशिवाय या जगात काहीच सत्य नाही’ हे ज्ञान `सूर्य पूर्वेला उगवतो’ अशा ज्ञानाइतके सत्य मानायला हवे. कोणी जर कितीही वाद घालून हे सिध्द करायला लागला की सूर्य पूर्वेला उगवत नाही तर त्याच्या कुठल्याही कारणांवर आपण विश्वास ठेवत नाही. त्याचप्रमाणे, आपले हे ज्ञान खरे नाही असे कुणीही सांगितले तरी आपली त्यावरची श्रध्दा ढळली नाही पाहीजे. असे होण्याकरीता बाह्य, दृश्य जगातसुद्धा या ज्ञानाचा पडताळा आपल्याला दिसायला लागतो. कुठलीही गोष्ट दिसताक्षणीच ही आपल्या जीवनातून कधी नाहीशी होऊ शकते का? असा प्रश्न मनांत यायला सुरु होणे म्हणजे ध्यान. दरवेळी ऊत्तर `हो, नाहीशी होऊ शकते’ असे आल्याने अस्वस्थ होऊन आपले मन त्या गोष्टीमध्ये अडकत नाही. अशी अवस्था जीवनात सतत घडायला लागणे म्हणजे ध्यान. ही अवस्था म्हणजेच आपण मिळविलेल्या ज्ञानाबद्दल सतत विचार (चिंतन व मनन) करीत असणे.

आता आपण श्लोकात सांगितलेल्या साधकाच्या पुढच्या अवस्थेचा म्हणजे कर्मफळत्यागाचा विचार करू. सर्वसाधारणपणे कर्मफळ म्हणजे काय याबद्दलच आपल्या मनात चुकीची कल्पना असते. आपण परीक्षेतील मार्क हे कर्मफळ मानतो परंतु परीक्षेकरीता केलेला अभ्यास आपण कर्मफळ मानत नाही, तर कर्म मानतो ज्याचे फळ म्हणजे मार्कस्‌. मिळालेली नोकरी किंवा असलेल्या नोकरीतले प्रमोशन कर्मफळ आहे व नोकरीकरीता केलेले अर्ज, वगैरे कर्म आहे कर्मफळ नाही अशीच आपली समजूत असते. थोडक्यात म्हणजे जीवनात आपल्याला हवी अशी एखादी गोष्ट मिळणे किंवा न मिळणे या गोष्टीला आपण `कर्मफळ’ मानतो व ती गोष्ट मिळविण्याकरीता केलेल्या प्रयत्‍नांना आपण कर्मफळ मानत नाही तर कर्म मानतो. आपल्या मते अशा कर्मांचे जे फळ त्याला कर्मफळ म्हणतात. परंतु ही आपली कल्पना संपूर्णपणे चूकीची आहे! उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण मिळविणे ही गोष्ट चांगली आहे असे आपण आधी कधीतरी मानले होते म्हणूनच आपण खूप अभ्यास करु शकलो. म्हणजे आपले खूप अभ्यास करणे ही गोष्टसुद्धा `मार्कस्‌ मिळविणे चांगले आहे’ हे आपण मानण्याच्या कर्माचेच फळ आहे! म्हणजे ते कर्म नसून कर्मफळ आहे. तसेच नोकरी न करता नुसते घरात बसणे हे वाईट आहे ही गोष्ट आपण सत्य मानण्याच्या कर्माचा परिणाम म्हणजेच आपला नोकरी मिळवण्याकरीता प्रयत्‍न करणे हे होय. याचा अर्थ असा की नुसते नोकरी मिळणेच नव्हे तर नोकरीकरीता अर्ज टाकणे हे सुध्दा कर्मफळच आहे! अभ्यास करण्याआधीचे, अर्ज टाकण्याआधीचे आपले कर्म मनांत होत असल्याने ते आपल्याला दिसत नाही पण म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. अशा रीतीने विचार केला तर जीवनातील आपण केलेली प्रत्येक कृती हे कर्मफळच आहे असे आपल्याला दिसायला लागेल! केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या आधी `ही गोष्ट करायला हवी’ असे आपण मानतो व ते मानणे हे एक कर्मच आहे!

अजुन खोल विचार केल्यावर `अमुक एक गोष्ट करायला हवी’ हे मानणेसुध्दा त्याच्या आधी कुठलातरी विचाराला मान्यता दिल्याचे फळ आहे हे दिसू लागते! म्हणजे आपल्या जीवनातील मानसिक व शारीरीक ह्या सर्व क्रिया `कर्मफळ’ आहे असे आपल्याला दिसू लागते. गीतेत तर अगदी आपला सध्याचा जन्मसुध्दा पूर्वजन्मींच्या राहीलेल्या इच्छांचेच फळ आहे असे सांगितले आहे. म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात प्रथम अशी घटना म्हणजे आपला जन्म हीसुध्दा कर्म नसून कर्मफळ आहे असे सिध्द होते! असा विचार केल्यावर मग `कर्मफळत्याग’ ह्या गोष्टीचा भव्यपणा, व्यापकपणा आपल्याला पटू लागतो. त्याचे महत्व जाणवायला लागते. म्हणुनच भगवान श्रीकृष्णांनी साधकाच्या कर्मफळत्यागाला त्याच्या ज्ञानापेक्षा व त्यावरील त्याच्या ध्यानापेक्षा महत्व दिलेले आहे.

आता साधनेची सर्वात शेवटची व अत्यंत सुरस अशी अवस्था म्हणजे साधकाचा निरंतर शांतीचा उपभोग. दररोजच्या जीवनामध्येसुध्दा आपण अनुभव घेतो की दुसरे काहीही कारण नसतांना दुसऱ्याकरीता केवळ प्रेमामुळे घेतलेले कष्ट, केलेला त्याग आपल्याला एक वेगळेच समाधान देतो. ज्या गृहीणींनी घरातील लोकांकरीता कष्ट सहन केले आहेत, ज्या सर्व मातांनी आपल्या मुलांच्या सुखाकरीता अनेक त्रास सहन केले आहेत त्यांना हे शब्द लगेच पटतील. खरं म्हणजे कर्माच्या सिध्दांतामध्ये असे सांगितले आहे की सेवेचे खरे फळ हे सेवा करून घेण्याऱ्याला मिळत नसून सेवा करणाऱ्याला मिळत असते. आता आपण कल्पना करा की केवळ परमेश्वराकडे जायचे आहे अशा प्रेमामुळे, अशा इच्छेने केलेला वरील सर्वव्यापक कर्मफळत्याग ही परमेश्वराची सेवा आपल्याला किती सुख, किती शांती, किती समाधान देईल! भगवान श्रीकृष्ण म्हणतात की `निरंतर शांति मिळते’! तेव्हा शांति हे कर्मफळत्यागाचे आपोआप आलेले फळ आहे!! आता ही शांतीसुध्दा फळ असल्याने त्याचापण आपण त्याग करायला हवा का? अशी कुशंका घेणाऱ्यांनी प्रथम ही अवस्था अनुभवावी व मगच हा प्रश्न विचारावा असे सांगावेसे वाटते.

साधनेचा अनंतपणा

अशा रीतीने सर्व साधक या मार्गाने चालून शांतीच्या घरात स्थानापन्न होतात असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्वात पहिल्यांदा अस्वस्थतेतून होणारा अभ्यास, नंतर योग्य मार्गदर्शनामुळे झालेले ज्ञान, यानंतर त्या ज्ञानाबद्दल केलेला खोल विचार व सर्वात शेवटी स्थिर झालेल्या ज्ञानाशी प्रामाणिक राहून जगण्यामुळे करावा लागलेला कर्मफळत्याग. खरोखर, जर आपले ज्ञान ध्यानामुळे जर स्थिर झले असेल तर आपण आपोआपच बाह्य जगात कमी गुंतु लागतो. हे कमी गुंतणे म्हणजेच सुरु झालेला त्याग. तेव्हा ध्यानाने एकदा ज्ञान पक्के झाले, की त्यागाशिवाय जगणे शक्य नसते. अशा रीतीने हा प्रचंड वाटणारा कर्मफळत्याग साधक आपोआपच करायला लागतो. सुरुवातीला तर साधकाला कल्पनासुध्दा नसते की आपण इथपर्यंत आलो आहोत. कर्मफळत्याग हा साधनेतील सर्वात लांबलचक, कधीही न संपणारा भाग आहे. जेवढे आपण ह्या मार्गावर चालू तेवढी खोल गंभीर अशी शांति आपल्याला प्राप्त होते. या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते.

बंगालमध्ये पूर्वी गिरीशचंद्र घोष नावाचे थोर नाटककार व कवि होऊन गेले. अजूनही कोलकतामध्ये त्यांच्या नावाचा एक मार्ग आहे. या गिरीशचंद्रांचा रामकृष्ण परमहंसांवर पूर्ण विश्वास होता. ते रामकृष्ण परमहंसांना परमेश्वराचा अवतारच मानायचे व जो कोणी त्यांना भेटेल त्यांना ते रामकृष्णांबद्दल सांगून भेटायला आणायचे. एकदा रामकृष्ण परमहंसांना त्यांनी विनंती करून स्वतःला योग्य अशी साधना सांगायला सांगीतली. स्वतःचे वागणे अत्यंत मुक्त, स्वच्छंद असल्याने (कलाकार लोकांना कशीही वागण्याची जणू मुभाच असते!) रामकृष्णांनी सांगितलेली कुठलीही साधना त्यांना आपण करु शकू अशी वाटली नाही. सर्वात शेवटी रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितले की तुमचे सर्व जीवन आहे तसेच जगा, काहीही बदल करू नका. फक्त प्रत्येक गोष्ट मी रामकृष्ण परमहंसांकरीता करीत आहे ही भावना ठेवा. आता कर्मफळत्याग यापेक्षा काय वेगळा आहे?! परंतु गिरीशचंद्रांना ही गोष्ट अगदी सोपी वाटली व ते या साधनेला लगेच कबुल झाले! नंतर काही दिवसांनी गिरीशचंद्र रामकृष्णांसमोर दुसऱ्या कोणाला सांगत होते की `पूजेला फूले मी आणीन’. त्यावेळी लगेच रामकृष्णांनी त्यांना सांगितले की हे तू चुकीचे बोललास. एकदा तू सर्व गोष्टी माझ्याकरीता करण्याचे कबूल केल्यावर तू `रामकृष्णांची इच्छा असेल तर फुले आणीन’ हे शब्द वापरायला हवेत! गिरीशचंद्र यावेळी एकदम अन्तर्मुख होऊन गप्प बसले. नंतर बऱ्याच वर्षानी रामकृष्णांचे एक संन्यासी शिष्य शारदानंद यांना गिरीशचंद्रांनी सांगितले की अजुनही त्यांना प्रत्येक गोष्ट रामकृष्ण परमहंसांकरीता करता येत नाहीं! म्हणजे ते `कर्मफळत्याग’ या शब्दाचा अर्थ अजूनही पूर्ण जाणून घेऊन शकले नाहीत!

खरोखर कर्मफळत्याग हा इतका कठीण, इतका सूक्ष्म आहे की साधकाला पदोपदी जाणविते की त्याचा कर्मफळत्याग हा किती अपूरा आहे. कधीही कोणत्याही क्षणी आपला `मी’पणा जागृत होतो व कर्मफळत्याग नाहीसा होतो. पण सर्वांना ही गोष्ट करायचीच आहे. व आपल्याहातून हे कसे होईल असा निराशावादी विचार न करता फक्त आलेल्या क्षणावर लक्ष केंद्रित करून चालायचे आहे.

हे एवढे धैर्य कसे येईल? हा स्थिरपणा कशामुळे येईल? आपण जर कर्मफळत्याग या अवस्थेपर्यंत आलो असू तर त्यामध्येच आपण स्वतःला अत्यंत भाग्यवान मानले पाहिजे. मनाच्या अस्वस्थतेचा वेळी योग्य मार्गदर्शन किती जणांना मिळते? जगातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आणिबाणीचा प्रसंग हा येतोच. इंग्रजीमध्येतर अशा क्षणांकरीता mid-life crisis असे नांवसुध्दा दिलेले आहे इतकी ही घटना सर्वसामान्य आहे. परंतु किती थोडेजण परमार्थाच्या मार्गावर येताना दिसतात. आपल्या नशिबानी योग्य गुरू भेटून आपण ज्ञानप्राप्ती करून घेतली आहे. गुरू-कृपेच्या बळावर चिंतन-मनन करून आता आपण दररोजच्या जीवनांत हे ज्ञान वापरण्याच्या स्थितीत आलो आहोत ही घटनाच किती लोकांचा वाट्याला येते? आपण असे अत्यंत नशिबवान असताना कर्मफळत्यागाच्या वाटेवर न चालणे हे अत्यंत करंटेपणाचे लक्षण आहे असे आपल्या लक्षात आले पाहिजे. एखाद्या लहान मुलाच्या हातातील भारी रकमेचा चेक्‌ आपण केवळ ५ रूपयाचा रंगीत फुगा देऊन घेऊ शकतो त्याप्रमाणे आपली अवस्था जगात गुंगून कर्मफळत्याग न करण्यामध्ये आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्यावर इतकी गुरू-कृपा आहे की आपण येथपर्यंत पोहोचलो आहोत. त्याची कृतज्ञता म्हणूनतरी आपण या मार्गावर चालले पाहिजे ही भावना आपल्याला धैर्य व स्थिरता देते, नम्रता देते. जी शक्ति आपल्याला येथपर्यंत घेऊन आलेली आहे तीच आपली पुढेसुद्धा काळजी घेईलच हा विश्वास या अनंत वाटेवर साधकाला सतत साथ देतो. याशिवाय कर्मफळत्याग केल्याने त्याच्या मनातील शांतिला उत्तरोत्तर उधाण येत राहते. त्याचासुध्दा साधकाला या मार्गावर चालायला उपयोग होतोच.

आता शेवटी कर्मफळत्यागात साधना कशी संपते? आपल्या परमेश्वराच्या सततच्या सान्निध्याच्या ध्येयाचे काय झाले? अशी ज्यांची शंका आहे त्यांच्या करीता असे सांगावेसे वाटते की सर्व कर्मांचा त्याग केल्यावर जी स्थिती उरते ती परमेश्वररूपीच असते. उदाहरणार्थ, मुंबईच्या मार्गावर कोल्हापूर शहर बंगलोरपासून ६५० कि.मि. आहे. हे कळल्यावर त्या मार्गावर ६५० कि.मि. गेल्यावर वेगळी कोल्हापूरला जायची धडपड करावी लागत नाहीं. त्या ठिकाणी कोल्हापूर शहर असतेच. त्याचप्रमाणे सर्वकर्मांपासून अलिप्त असा केवळ परमेश्वरच आहे. जेव्हां सर्वकर्मफळांपासून (म्हणजेच प्रत्येक कर्माच्या आपलेपणापासून) आपले मन दूर रहाते तेव्हां त्या मनाला जायला एकच ठिकाण असते व ते म्हणजे परमेश्वराचे घर! कर्मफळत्यागातून अमित शांतीची, अपार सुखाची प्राप्ती होते याचे खरे कारण हेच आहे. म्हणूनच कर्मफळत्याग पूर्ण झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती होते व साधकाचे ध्येय त्याला मिळते.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये ९ डिसेंबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: