247/12:Where Are Saints?

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।

हे पढविलो जी आम्ही । श्रीनिवृत्तीदेवी ॥ २४७:१२ ॥

 

श्री ज्ञानदेवांनी वरील उद्‌गार १२व्या अध्यायाचा शेवट करताना काढले आहेत. ह्या ओवीने त्यांनी भक्तीयोगावर असलेल्या भावपूर्ण अशा या अध्यायाची सांगता केली आहे. ओवीचा शाब्दीक अर्थ असा आहे: `ज्ञानदेव असे म्हणत आहेत की तुम्हां संतांना शरण जाऊन आपुलकीने सेवा करावी हेच आम्हाला श्री निवृत्तीनाथांनी शिकविले आहे’. आपण आता नेहमीप्रमाणे या ओवीच्या खोलात शिरून श्री ज्ञानदेवांना कुठला अर्थ अभिप्रेत होता याचा अंदाज घ्यायचा प्रयत्‍न करुया.

 

संत कोणाला म्हणावे?

 

ज्याकुणी परमार्थाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्‍न केला आहे त्या सर्वांना सत्‌संगाच्या महत्वाबद्दल अधिक काही सांगायची जरूरी नाही. सर्व संतांनी या विषयाबद्दल इतके काही लिहीले आहे की आपणा सर्वांच्या मनात सत्‌संगाबद्दल अपार आदर आहेच. आपल्याला माहितीच आहे की ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला चांगला शिक्षक मिळाला की त्याच्यात असलेल्या उपजत बुध्दीचा योग्य उपयोग होऊन परीक्षेत यश लाभते त्याचप्रमाणे साधकाला सत्‌संग लाभला तर साधनेत येणाऱ्या अडचणींवर लवकर मात होऊन भरभर प्रगती होते. अशा परीस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी काढलेले हे उद्‌गार आपण फारसा विचार न करीताच स्वीकारु शकतो. परंतु परमार्थामध्ये दरवेळी अत्यंत सोप्या वाटणाऱ्या विचारातच अशी मेख असते की ती मेख जर आपण नीट ओळखू शकलो नाही तर हे विचार दररोजच्या जीवनात वापरणे आपल्याला कठीण होते. कधी कधी तर वापरायचा प्रयत्‍न केला असता आपल्या अर्धवट ज्ञानामुळे अशा वागण्याने आपल्याला अपाय व्हायची शक्यता असते. हा अपाय आपल्या अर्धवट ज्ञानामुळे झाला आहे हे न जाणल्यामुळे आपण त्या विचारांवरचाच विश्वास गमावून बसतो. श्री रामकृष्ण परमहंस या बाबतीत अतिशय सुंदर गोष्टी सांगत. यापैकी दोन गोष्टी अशा आहेत.

१). एका साधूने आपल्या सर्व शिष्यांना जगातील सर्व जीवांमध्ये परमेश्वर बघायला सांगितले. त्यानंतर बाजारात फिरताना शिष्यांना आरडा-ओरडा ऐकू आला की एक मत्त हत्ती त्यांच्याकडे येत आहे. बाकी सर्व शिष्य पळून गेले परंतु एका शिष्याला आपल्या गुरुंच्या सांगण्याची आठवण झाली व तो परमेश्वर आपल्याला कशी इजा करील ह्या भावनेने मुद्दामच मध्ये उभा राहीला. अर्थात, हत्तीने तिथे येऊन त्याला आपल्या सोंडेत घेऊन दूर भिरकावून दिले व तो बेशुध्द झाला. शुध्दीत आल्यावर गुरुंना बघून त्याने विचारले की तुम्हीं तर सांगितले की हत्तीतसुध्दा देव आहे मग मला इजा का झाली? यावर गुरु हसून म्हणाले की ज्याप्रमाणे हत्तीत देव आहे त्याचप्रमाणे बाकीच्या लोकांतसुध्दा देव आहेच की. त्या लोकरुपी देवांंच्या बोलण्याकडे तू लक्ष दिले नाहीस म्हणून तुला हत्तीरुपी देवानी शिक्षा केली!

२). एका गावाच्या माळरानात अत्यंत विषारी साप रहात होता. गायी चारणाऱ्या सर्व गुराखी पोरांकरीता तो एक मोठा धोकाच होता. एके दिवशी एक साधू त्या मार्गाने जात असताना गुराखी मुलांनी त्यांना त्या सापापासून जपायला सांगितले. साधूला अनेक मंत्र माहिती असल्याने तो त्याच मार्गाने मुद्दाम गेला. जेव्हा तो साप त्याला दंश करायला आला तेव्हा त्यांनी एक मंत्र म्हणून त्याला एखाद्या दोरीसारखा निष्प्रभ करून टाकला. नंतर त्याला जवळ घेऊन त्यांनी त्याला उपदेश केला की असा लोकांना त्रास देण्यामुळे काय मिळेल याचा तू विचार केला आहेस का? आता मी तुला एक मंत्र देतो तो तू सारखा जप व अहिंसेने रहा. तुझी खूप प्रगती होईल व मिळालेल्या जन्माचे सार्थक होईल. सापाने ती गोष्ट मान्य केली व त्याप्रमाणे वागायचा तो प्रयत्‍न करु लागला. असे काही दिवस गेल्यावर गुराखींना कळून चुकले की आता साप अगदी मवाळ झाला आहे. त्या सापाची भीति संपूर्णपणे त्यांच्या मनातून गेली व ते त्याच्याशी पाहिजे तसे खेळू लागले. एके दिवशी खेळताना त्यांनी त्याला गरगर फिरवून दूर भिरकावून दिले. साप अगदी मृतप्राय अवस्थेत पडलेला पाहून त्यांची अशी समजूत झाली की तो आता मेला. नंतर १२ वर्षांनी साधू परत येवून सापाची चौकशी करू लागले तेव्हा त्यांनी सांगितले की तो मेला. साधूंना हे माहित होते की त्यांची व सापाची भेट परत होणार होती म्हणून मुलांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता ते सापाला त्यांनी ठेवलेल्या नावाचा उच्चार करीत शोधू लागले. एका बिळात जीव मुठीत धरून राहणाऱ्या त्या सापाने आपल्या गुरुंचा आवाज ओळखला व बाहेर येऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्याची अशी अवस्था पाहून साधूने त्याचे कारण विचारले. नुसती फळे खाऊन राहण्याने अशी अवस्था होणार नाही हे त्यांना पूर्णपणे माहित होते. सापाची सात्विकबुध्दी वाढल्याने त्याला त्याच्या अश्या परीस्थितीच्या कारणाचा विसर पडला होता. नंतर थोड्यावेळाने त्याला गुराखी मुलांचे वागणे आठविले व त्याने सर्व गोष्ट सांगितली व म्हणाला की त्यांना माझ्यात पडलेला बदल माहित नसल्याने त्यांनी मला असा त्रास दिला असावा. ह्यावर गुरु त्याला म्हणाले `अरे मी तुला कोणाला इजा करु नकोस असे सांगितले होते. पण तू तर फूत्कार करायचेपण सोडलेस! ते कशाला? दुरुन जर तू फूत्कार करीत राहीला असतास तर ही अवस्था तुला भोगावी लागली नसती’.

म्हणून अत्यंत सोपी वाटणारी, संपूर्णपणे कळली आहे अशी वाटणारी गोष्टसुध्दा व्यवहारात वापरताना काळजी घ्यावी लागते. आपल्या जीवनातले अजून एक उदाहरण म्हणजे शेअर मार्केटचे. सर्वांना माहित असते की कमी भावात शेअर्स विकत घ्यायचे असतात व जास्त भावात विकायचे असतात. परंतु हे ज्ञान व्यवहारात वापरताना कुठला भाव कमी हे कळणे आवश्यक असते. ते न कळताच जर आपण पैसे गुंतवू लागलो तर फटका बसल्याशिवाय रहात नाही. आता वरच्या ओवीतली मेख म्हणजे संतसेवा करायला हवी हे आपल्याला कळले तरी संत कोण हे ओळखायचे कसे हे काही आपल्याला माहिती नसते. मग आपण हल्लीच्या काळात खरे संत आहेत तरी कुठे अशी तक्रार करून हा मार्ग आपल्याकरीता नाही अशी समजूत करून घेतो. आपले जीवन इतके चाकोरीबध्द आहे की अश्या जगण्यामध्ये कोणी संत आपल्याला भेटतील असे आपल्याला वाटत नाही. परंतु सत्‌संगतीबद्दल असलेल्या ओढीमुळे आपण संताच्या शोधात सतत असतोच. आपल्या ओढीचा परिणाम म्हणून मग आपण तीर्थक्षेत्री जातो, जिथे आपल्याला खरे संत भेटायची शक्यता वाटते. तिथेसुध्दा आपण कोणावरही विश्वास टाकत नाही. ज्यांचे अधिक शिष्य आहेत ते अधिक चांगले असणार असा विचार करून आपण प्रतिष्ठित माणसांकडेच जातो. म्हणजे आपण संत अशाच माणसांना मानायला तयार असतो की ज्यांनी अनेक शिष्य केले आहेत. अशावेळी आपली व त्यांची खाजगीत भेट होणेच शक्य नसते (कारण आधीच्या शिष्यांमध्येच ते गुंग असतात) मग आपुलकीने सेवा करायची गोष्ट तर दूरच राहीली! म्हणजे आपल्याकरीता ह्या ओवीचा मार्ग बंद आहे की काय?

असा अर्थ काढण्याआधी आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल विचार करुया. कधी आपण विचार केला आहे का की आपला जन्म कशाकरीता झाला आहे? सध्या संसारातील एखादी गोष्ट मिळविण्याकरीता जरी आपण जगत असलो तरी त्याच्याकरीताच आपला जन्म झाला आहे असे आपण म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ, आत्ताच्या ध्येयाची वस्तू मिळाली तरी त्या वेळी आपल्या आयुष्याचा अंत होणार नाही याची खात्री सर्वांना असतेच. आपल्याला पुढे जगायचे असतेच. म्हणजेच केवळ ती वस्तू मिळविण्याकरीताच आपला जन्म झालेला नाही ही गोष्ट स्पष्ट होते. `परमेश्वराकडे जायला जे अनंत मार्ग आहेत, त्या प्रत्येक मार्गावर चालण्याऱ्या व्यक्तीची वाटचाल प्रत्यक्ष बघण्याकरीताच भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे’ ह्या दृष्टीकोनातून बघितले तर असे म्हणता येईल की आपला जन्म हा साधनेतला एक ठराविक मार्ग चालण्याकरीताच झाला आहे. आयुष्याचे ध्येय म्हणजे हा आपला मार्ग चालून शेवटी परमेश्वराची भेट घेणे. जन्मवेळी आपल्याला परमेश्वराने ह्या मार्गावरील एका ठराविक स्थळी ठेवून आता तू तुझा खेळ सुरु कर असे सांगितले असावे. परमेश्वरानेच एक खास मार्ग आपल्याकरीता राखून ठेवला असल्याने जेव्हा तो मार्ग आपल्यासमोर येतो तेव्हा आपोआपच त्याच्याबद्दल एक प्रकारची आत्मियता वाटते. त्या मार्गाने जाण्याची ओढ आपल्यामध्ये अकारण येते. तशी ओढ, आत्मीयता इतर मार्गांबद्दल वाटत नाही. म्हणून आपल्या सर्वांचा असा अनुभव आहे की एकाला चांगली वाटणारी साधना दुसऱ्याला चांगली वाटेलच असे नाही. आपला स्वतःचा असा मार्ग सापडणे ही एक फार मोठी घटना आहे. तो सापडला की आपल्या साधनेत एक वेगळाच जोर येतो, साधना करायला आनंद वाटतो व प्रगती पटापट होते. म्हणूनच गुरु प्रत्येक शिष्याला एकच साधना सांगत नाहीत. ते त्याच्या मार्गाला पूर्ण जाणून असतात व त्यांचा सल्ला त्या ठराविक मार्गावर चालण्याकरीता उपयोगी असतो. खालील उदाहरणावरुन ही गोष्ट अगदी स्पष्ट होईल.

श्री रामकृष्ण परमहंसांच्या संन्यासी शिष्यांची साधना वेगवेगळी होती. एकदा स्वामी विवेकानंदांनी दुसऱ्या शिष्याला `गंमत बघ’ असे म्हणून स्वतःच्या ध्यानाच्या अवस्थेत मला स्पर्श कर असे सांगितले. त्या शिष्यालासुध्दा मजा वाटून तो विवेकानंदांच्या गुडघ्याला हात लावून बसला. एक छोटासा विजेचा झटका बसल्यासारखी संवेदना त्याला झाली व ती गंमत त्याने सर्वांना सांगितली. हे सर्व एका खोलीत पहाटे ३च्या सुमारास झाले. त्यावेळी रामकृष्ण परमहंस दुसऱ्या खोलीत झोपले होते. थोड्या वेळाने रामकृष्णांनी विवेकानंदांना आपल्या खोलीत बोलाविले व रागावून म्हणाले `बँकेत रक्कम जमा व्हायच्याआधीच उधळपट्टी सुरु केलीस? तुला माहिती आहे का की तुझ्या या कृतीमुळे या साधकाचे कीती नुकसान झाले ते? मी त्याला अत्यंत काळजीपूर्वक एका मार्गाने नेत होतो आणि आता त्या सर्वावर तुझ्या एका कृतीने पाणी पडले. तरी तो मुलगा नशिबवान आहे, नाहीतर त्याला जन्मभर नुकसान भोगावे लागले असते.’ नंतर खरोखरच रामकृष्णांनी त्या शिष्याला आधीचा मार्ग सोडून विवेकानंदांसारखी अद्वैत साधना शिकवायला सुरुवात केली.

साधनेत म्हणूनच कित्येक वेळा एकाच प्रश्नाची वेगवेगळ्या शिष्यांकरीता दिलेली उत्तरे वेगवेगळी असतात. आता हा विषय निघालाच आहे म्हणून दोन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात: १). आपण असे बघतो की भीडेखातर बऱ्येच साधक आपल्या गुरुंना प्रश्न विचारायला कचरतात. तो प्रश्न ते आपल्या मित्रामार्फत किंवा जवळच्या व्यक्तीमार्फत विचारतात. आता ही दुसरी व्यक्ती व्यावहारीक दृष्टीने आपल्या कितीही जवळची असली (भाऊ, बहीण, आई, वडील इत्यादी) तरी साधनेमधील तीचा मार्ग आपल्या मार्गापासून पूर्णपणे भिन्न असू शकतो त्यामुळे आपल्या प्रश्नांची त्यांना मिळालेली उत्तरे आपल्याला पूर्ण लागू होतीलच असे नाही हे आपण जाणून घेतले पाहीजे. गुरुंबद्दल असलेली आपली भीड आपण मोडली पाहीजे. असे झाले नाही तर आपलेच नुकसान आपण करून घेत आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

२). प्रत्येक साधकाचा मार्ग भिन्न आहे ह्या वस्तुस्थितीचा दुसरा परिणाम म्हणजे नुसती पुस्तके वाचून आपली फार प्रगती न होणे हा होय. याचे कारण असे की पुस्तके, प्रवचने ही सगळी सर्वसाधारण माणसांना गृहीत धरून लिहीली असतात, सांगितली असतात. आपल्या स्वतःच्या मार्गामध्ये त्यांचा उपयोग होईलच अशी खात्री त्यामुळे देता येत नाही. त्यामुळे जरी वाचताना, ऐकताना मन प्रसन्न झाले, तरी साधनेत ह्या गोष्टींचा परिणाम गुरुंच्या आपल्याकरीता दिलेल्या सल्ल्याइतका कधीच प्रभावी होऊ शकत नाही हे आपण लक्षात ठेवून आपल्या गुरुंची सेवा मनोभावे करावी व साधनेत प्रगती करावी असे सांगावेसे वाटते.

आता मूळ मुद्याकडे परत येऊया. साधकाच्या स्वतःच्या जन्माबद्दलच्या अशा दृष्टीकोनामूळे हे दृष्य जग त्याला एखाद्या साप-शिडीच्या खेळासारखे त्याला दिसू लागेल. प्रत्येक क्षणी आपलाल्या कधी शिडी तर कधी सापाशी सामना करावा लागत आहे असे भासू लागते. याचा अर्थ असा की, प्रत्येक घटनेने एकतर आपण भगवंताच्या जवळ जातो वा जगात गुंतून त्याच्यापासून दूर जातो हे कळायला लागते. ह्या खेळामध्ये परमेश्वराचे स्थान अंतिम ठिकाणी आहे. परंतु देवाचा स्वभाव हा परम दयाळू असल्याने तो नुसताच स्थानापन्न राहून हा खेळ निर्विकारपणे बघू शकत नाही. आपल्याला मदत करायला तो उत्सुक असतो. म्हणूनच प्रत्येक आणिबाणीच्या क्षणी आपल्या मदतीला कोणीतरी येतेच. म्हणून असे सांगावेसे वाटते की:

साधनेत मदतीला येणारी प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती ही आपण संतांसमान मानली पाहीजे. संत कोणाला मानावे ह्या प्रश्नाचे अंतिम उत्तर हे आहे.

प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात परमेश्वराकडे जाण्याच्या साधनेत ज्यांची ज्यांची मदत झाली आहे अशा सर्वांना संत मानले पाहिजे. माझ्या जीवनातला संत तुमच्या जीवनात संतस्थानी असेलच असे नाही. एवढेच नव्हे तर काल माझ्या जीवनात संतस्थानावर असलेला गृहस्थ आज त्या पदावर असेलच असेसुध्दा मी निश्चितपणाने सांगु शकत नाही! आजचे त्याचे वागणे माझ्याकरीता मदतीचे असेलच असे आपण सांगू शकतो का? म्हणजे संतपणा आपण एखाद्या व्यक्तीला, घटनेला न देता, त्या घटनेमुळे आपल्यामध्ये झालेल्या बोधाला दिला पाहिजे व मग ज्या गोष्टीमुळे आपल्याला बोध झाला त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या घटनेला व व्यक्तीला महत्व दिले पाहीजे. संतांची ही व्याख्या जरी पटायला कठीण वाटली तरी ह्या व्याख्येच्या सत्यतेबद्दलच्या पुष्टीकरीता अनेक संदर्भ देता येतील. खालील गोष्टच पहा:

अवधूत जेव्हा संन्यासी अवस्थेत फिरत होते तेव्हा एका घारीला तलावात सूर मारून एक मासा पकडताना त्यांनी बघितले. जशी ती घार मासा घेऊन वर निघाली तसे तिच्यामागे तीन-चार कावळे लागले. त्यांनी तिला कुठेही बसू दिले नाही. शेवटी कंटाळून तिने तो मासा आपल्या पंजातून टाकून दिला. असे झाल्याक्षणी ते सर्व कावळे घारीला सोडून त्या माश्यामागे गेले. हे बघून अवधूताने जमिनीवर त्या घारीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांना ह्या घटनेने कळले होते की जीवनात जोपर्यंत आपण भौतिक सुखाचा मासा पकडून राहीलो आहोत तोपर्यंत आपल्यामागे चिंता, काळजी या रुपांचे कावळे लागणारच. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे पकडलेला हा मासा सोडणे. हा बोध त्यांना ह्या घटनेने झाला म्हणून त्यांनी त्या घारीला आपल्या २४ गुरुंपैकी एक गुरु मानले.

अवधूतांनी जर एका घारीला गुरुपदावर बसविले तर आपल्यासारख्या लोकांनी ज्या व्यक्तींमुळे आपल्या साधनेत मदत होत आहे अशांना संत मानायला काय हरकत आहे? संतांची अशी व्याख्याच ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत होती नाहीतर त्यांनी त्यांच्या सर्व श्रोत्यांना संत म्हटलेच नसते.

 

संत ओळखण्यामधील अडचणी

 

संतपणाची अशी व्याख्या करायला आपण घाबरतो याला अनेक कारणे आहेत…

१). आपल्या अपेक्षा. आपल्या मनात संत म्हणजे काय याच्याबद्दल ठराविक अपेक्षा असतात. उदाहरणार्थ, जो आपल्या नातेवाईकांबरोबर तावातावाने भांडतो त्याला संत म्हणण्यापूर्वी आपण दहादा विचार करतो. श्री गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या नातेवाईकांवर दावे लावून आपली जमीन परत मिळविली होती. परंतु त्यामुळे त्यांच्या संतपणावर काही बाधा आली नव्हती हे आपण विसरतो. खरं म्हणजे आपला व संतांचा सहवास कीती थोड्यावेळाकरीता असतो. सहवासाचे सर्व क्षण मिळवून जेमतेम काही महीने होत असतील. परंतु आपले त्यांच्या वागण्यावर घातलेले बंधन मात्र त्यांच्या अखंड जीवनाकरीता असते. कारण आपल्या मागेसुध्दा त्यांनी आपल्या संतांच्या व्याख्येप्रमाणे वागणूक केली नाही तरी आपण त्यांना संतस्थानावरुन काढायला मागेपुढे पहात नाही. आपल्या थोड्या सहवासाकरीता त्यांना असे आयुष्यभर बंधन घालणे कितपत संयुक्तिक आहे याचा आपण विचार करायला हवा व आपल्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा कमी करायला हव्यात.

२). आत्मविश्वासाची कमतरता. आता एखाद्या माणसाला आपण जरी संत मानले तरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या माणसाचा आपल्यासारखाच अनुभव येईल अशी काही खात्री नसते. म्हणून ते त्या माणसाला संत मानतीलच असे नाही. एखाद्या टोकाच्या वेळीतर ते त्या व्यक्तीला अगदी सर्वसामान्य मानण्याचीही शक्यता असते. अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते. जर आपला आत्मविश्वास कमी असला तर हे अशक्यच होते. म्हणून संतांची ही व्याख्या आपण करत नाही.

३). आपली भावनिकता. सारासार विचारबुध्दी असणे व ती सतत वापरणे हे आपल्याला जमत नाही. याचा परिणाम असा होतो की दुःख झाले की आपण दुःख नक्की कुठल्या गोष्टीमुळे झाले याचा निर्णय लावू शकत नाही. मग दुधाने पोळले म्हणून ताकसुध्दा फुंकून प्यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीला जरी आपण मदत करणाऱ्या लोकांना संत म्हणू शकलो तरी त्यांनी पुढच्यावेळी संतांप्रमाणे वर्तन केले नाही तर आपल्याला प्रचंड धक्का बसून आता परत मी कोणालाही संत म्हणण्याची चूक करणार नाही असे ठरवितो.

खरोखर संतांची अशी व्याख्या करून जीवनात वापरायला मनाची एक लवचिकता आवश्यक असते. कालची गोष्ट आज घडली तरी तीच्याकडे नवीन नजरेने कितीजण बघू शकतात? मनाला जुन्या गोष्टींच्या नजरेमधून आजच्या गोष्टींकडे बघायची जी सवय आहे ती आपल्याला बदलायला हवी.

 

संतांची सेवा कशी करावी?

 

आत्ताच आपण बघितले की संत ह्या शब्दाची व्याख्या आपण बदलली त्याचा परिणाम म्हणजे आज संत असलेली व्यक्ती किंवा घटना उद्या संत म्हणून आपल्याला वाटेलच असे नाही. आज जर एखाद्या लहान मुलाच्या बोलण्याने मला बोध झाला असेल तर उद्या त्याने होईलच असे नाही. याचा अर्थ असा की दररोज आपल्याला डोळे उघडे ठेऊन जगायला हवे. काल क्षुल्लक वाटणारी गोष्टसुध्दा आज आपल्याला धडा देऊ शकेल असा सतत विचार करून आपण जीवनातील प्रत्येक घटनांना सामोरे जायला हवे. आयुष्यभर असे सतर्क राहणे ही आपली संतांची पहिली सेवा आहे. ह्या सेवेवर खरेतर संतांचे अस्तित्वच अवलंबून आहे! एवढी दूरगामी, निरंतर व निरहंकारी सेवा जर आपण करु शकलो तर आपण जवळ-जवळ बाजी मारल्यासारखीच आहे. कारण परमेश्वर ही सेवा बघून अत्यंत प्रसन्न होतो व आपल्या जीवनांत अशाच घटना घडवायला लागतो की प्रत्येक गोष्टच आपल्याला संतासारखी दिसू लागते. या दृष्टीकोनातूनच असे म्हणतात की साधनेत एक वेळ अशी येते की सर्व जग आपल्याला मदत करीत आहे अशी जाणीव साधकाला होते.

संतांची दुसरी सेवा म्हणजे घडलेल्या गोष्टीरुपी संतामुळे जो काही बोध आपल्याला झाला आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करणे ही होय. मगाशी सांगितलेल्या दोन गोष्टींमधील शिष्याने व सापाने कळलेला बोध आचरणात आणण्याचा प्रयत्‍न केला होता. जरी तो त्यांच्या अंगावर आला व गुरुंनी त्यांना ताडन केले तरी गुरुंच्या मनात त्यांच्याबद्दल जास्त आपुलकीच निर्माण झाली असेल यात काही शंकाच नाही. गुरुंची अशी आपुलकी मिळविणे फार थोड्या भाग्यवंतांच्या नशिबात असते. म्हणून त्या दोघांच्या अतिउत्साही वागणुकीमुळे त्यांना जरी शारीरीक इजा झाली तरी साधनेत प्रगतीच झाली असे म्हणायला हवे. गुरुंच्या मनात आपुलकी उत्पन्न होणे याशिवाय अजून एक गोष्ट आपल्या अशा प्रयत्‍नाने होते. ती म्हणजे आपल्या बोधामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या जाणवितात. झालेला बोध आचरणात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही तर नुसती `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी आपली साधना व्हायला लागते. आचरणात आणण्याचा प्रयत्‍न न केल्यामुळे झालेल्या बोधाचा उपयोग नुसता आपला अहंकार वाढण्यामध्ये होतो. साधकाने या धोक्यापासून सावध रहावे.

संतांची सेवा करायला या दोन गोष्टी खूप आहेत. अशी सेवा करायला जे मानसिक धैर्य लागते, जो आत्मविश्वास लागतो तो गुरुंच्या पाठबळाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात `हे पढविलो जी स्वामी । श्री निवृत्तीदेवी’. खुद्द ज्ञानेश्वर महाराजांना ही सेवा करायला निवृत्तीनाथांची मदत घ्यावी लागली मग आपल्यासारख्यांचे काय?!! हे धैर्य प्राप्त होऊन संतांची सेवा आपल्या हातून व्यवस्थित घडू दे याकरिता आपण सर्वांनी आपल्या गुरुंची सेवा आधी करायला हवी. सध्या आपली हीच साधना आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १६ डिसेंबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: