192/7: Necessity Of Patience

 

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्य फळें ।

प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥ १९२: ७ ॥

 

 

सातव्या अध्यायाच्या समारोप करण्याऱ्या ओव्यांमधील ही एक ओवी आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला होता तो अर्जुनाला इतका आवडला की त्याचे डोळे विस्मयाने चमकायला लागले व त्या शब्दांच्या सौंदर्याची त्याला हांव वाटू लागली. मग त्यावरच समाधान न मानता त्याने आपल्या विचारशक्‍तिच्या माध्यमातून त्या वचनांचा अर्थ काढायचा प्रयत्‍न केला व काढलेला अर्थ आपल्या जीवनात वापरून प्रचीतीरुपाने स्थिर करु लागला अशा अर्थाची ही ओवी आहे. या अध्यायातील उरलेल्या ओवींमध्ये ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की हे प्रयत्‍न करताना आलेले अपयश पाहून अर्जुन दचकला व असा विचार करु लागला की हे शब्द मृगजळासारखे केवळ दृष्टीसौंदर्य देणारे तर नाहीत? किंवा, ही केवळ आकाशातल्या ताऱ्यांची जळातील प्रतिमा आहे की काय (ज्यामध्ये खरी गोष्ट नाही तर तीचे केवळ प्रतिबिंबच आहे)? असा विचार आल्यामुळे त्याने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर द्यायला आठवा अध्याय सुरु होईल. सध्या आपण ह्या ओवीच्या माध्यमातून काय शिकायचे आहे ते पाहूया.

 

 

श्रवणातून झालेला बोध

 

 

सर्वसाधारणपणे आपल्याला बोध व्हायला एखादे वाक्यसुध्दा पुरेसे असते. आयुष्यात आपण अचानक अशी एक गोष्ट अनुभवतो की परमार्थातील अंतिम ज्ञान हे सत्य आहे अशी आपली खात्री पटते. उदाहरण म्हणून, जवळच्या माणसाचा अचानक वियोग झाल्यावर जगातील सर्व गोष्टींवरचे मन उडून जाणे किंवा अथक कष्टांनतरही अत्यंत सोपी वाटणारी गोष्ट प्राप्त झाली नाही की आपल्या प्रयत्‍नांनी आपण काहीही मिळवू शकू ह्यावरचा विश्वास उडून कुठल्यातरी अदृश्य शक्तीमुळेच हे जग चाललेले आहे ह्या गोष्टीवर विश्वास बसणे ह्या घटना आपण देऊ शकतो. अंतिम सत्य अशी जी घटना परमार्थात सांगितली जाते त्या गोष्टीचे आपल्या जीवनातील रुप वेळोवेळी आपल्याला जाणवत असते. परंतु झालेला हा बोध आपल्यामध्ये स्थिर नसतो. अगदी थोड्या वेळातच आपण आपल्या पूर्वस्थितीत परत जातो व आधीसारखेच जीवन जगू लागतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एखाद्या पुस्तकामध्ये वा प्रवचनामध्ये किंवा अर्जुनाप्रमाणे गुरुंच्या वचनांमध्ये आपला प्रथमदर्शनी विश्वास जरी बसला व उत्साहाने आपण जीवन ह्या विचारावरच आधारुन जगू अशी कल्पना करू लागलो तरी व्यवहारात आपले हे ज्ञान आपण उतरवू शकत नाही. अगदी हीच अवस्था अर्जुनाची झालेली आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. अर्जुनासारख्या उच्च प्रतीच्या शिष्यालासुध्दा असा प्रथम श्रवणात झालेला बोध आचरणात आणण्यामध्ये अडचण आली तर आपल्यासारख्यांचे काय? परंतू बुध्दीने एखादी गोष्ट जरी सत्य म्हणून स्वीकारली तरी ती आचरणात आणायला लागणारे धैर्य बुध्दी देतेच असे नाही हे आपल्याला माहित नसते. खरे म्हणजे मराठीत `कळते पण वळत नाही’ ही म्हण आहेच की! परंतु हे लक्षात न राहील्यामुळे जेव्हा आपल्याला झालेला बोध आचरणात आणण्यामध्ये त्रास होऊ लागतो, अशक्य होते तेव्हा आपला बोधावरचा विश्वासच उडायची शक्यता खूप असते. ज्याप्रमाणे अर्जुनाला वाटले की भगवान श्रीकृष्णांचे शब्द म्हणजे खरी वस्तू नसून एका वस्तूचा आभास आहे, त्याचप्रमाणे आपण परमार्थातील सत्याबद्दल विचार करु लागतो. आपल्याला वाटते की ह्या गोष्टी जरी चांगल्या वाटल्या तरी व्यवहारामध्ये वापरता येणे शक्य नाही. केवळ या कारणामुळेच परमार्थाच्या मार्गात अशा अनेक शिष्यांची उदाहरणे आपण बघू शकतो की ज्यांनी सुरुवात चांगली केली होती पण आचरणामध्ये सततच्या येणाऱ्या दोषांनी स्वतःच्या योग्यतेबद्दल शंका निर्माण होऊन, आपण परमार्थाच्या मार्गावर आहोत यावरची त्यांची श्रध्दा ढळली आहे. नाउमेद होऊन हा मार्ग आपल्याकरीता नाही अशी स्वतःची खात्री करून ते मार्गच्युत होतात. आपली ही अवस्था होऊ नये ह्याकरीता आपण प्रयत्‍न करायला हवेत.

वरील वाटकरूंची पदच्युत होण्याची अवस्था ही त्यांच्या साधनेतील अपयशामुळे आली नसून साधनेत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रगती झाली नाही ह्या घटनेने झाली आहे. दुःख हे कुठल्या एका गोष्टीत नसते तर त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या अपेक्षेत असते. आपल्या साधनेतील प्रगतीच्या अपेक्षा नकळत खूप मोठ्या असतात. मला लोकांचे दोष दिसले नाही पाहिजेत, दुसऱ्यांवरचा राग गेला पाहिजे, मन शांत झाले पाहिजे ह्या गोष्टी प्रगतीचा मानदंड म्हणून आपण मानतो. जेव्हा असे होत नाही तेव्हा आपल्याला वाटते की साधना करुन सुध्दा आपल्यात फार फरक पडलेला नाही. कधी कधी आजूबाजूची माणसेसुध्दा म्हणतात, `अरे तू साधना करतोस असे म्हणतोस आणि अजून तुझा राग गेला नाही?’ मग आपल्या साधनेच्या उपयोगाबद्दल शंका आपल्यात यायला लागते. पण लक्षात घ्या की प्रगतीच्या मोजमापाचे आपले हे माप खूप ढोबळ आहे. खरी प्रगती ही इतकी सूक्ष्म असते की ह्या ढोबळ मापांतून ती मोजता येत नाही. कधी कधी येणारा विजेचा करंट एवढा कमी असतो की तो उपकरणाच्या मोजायच्या क्षमतेच्या बाहेर असतो व म्हणून मोजताच येत नाही. आपली प्रगती अशीच आपल्या मोजमापाच्या कल्पनेच्या बाहेर आहे म्हणून स्वतःला दिसत नाही. दुसऱ्यांचे छोटे दोष आपल्याला लगेच दिसतात पण आपले मोठे दोष बाकीच्यांनी सांगूनसुध्दा आपल्यात आहेत हे पटत नाही. या वस्तुस्थितीचा परीणाम म्हणूनच साधनेने आपले छोटे छोटे दोष गेले आहेत हे आपल्याला कळतसुध्दा नाही. याउलट आपल्या आजूबाजूच्या लोकांना झालेली प्रगती जाणवत असते (कारण आपले छोटे दोष त्यांनी पाहिले असल्यामुळे ते गेलेले त्यांना जाणवतात). म्हणून असे म्हणतात की खरी प्रगती ही साधकाला स्वतःला तर जाणवत नाहीच आणि जरी दुसऱ्यांनी सांगितले की साधना चांगली चालली आहे तरी विश्वास बसत नाही. तेव्हा आपली प्रगती होत आहे की नाही हे स्वतः बघायचा नादच आपण सोडून दिला पाहिजे. आपली बुध्दी हे उपकरण याकरीता फारसे उपयोगी नाही हे आपल्याकरीता वरील ओवीचे पहिले सांगणे आहे.

आता तुम्ही जरी असे ठरविले की `नाही, दुसरे लोकसुध्दा आम्हाला म्हणतात की आमची प्रगती कमीच झाली आहे’. तर ठीक आहे, असे आपण गृहीत धरु की तुमची प्रगती खरोखर कमी आहे. तरीसुध्दा जरा विचार करा की कुठल्या संतांनी असे सांगितले आहे की सत्य काय आहे हे ऐकल्याबरोबर तुम्हाला मोक्ष मिळेल? रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु व विवेकानंदांसारखे शिष्य असले तरी शिष्यांची प्रगती लगेच झालेली दिसत नाही. झालेल्या बोधाप्रमाणे जर वागायला लागलो तर आपल्याला मोक्ष मिळाल्यासारखाच आहे. हे आपण ध्यानात घेतल्यावर, मोक्ष मिळणे ही साधी गोष्ट नाही हे आपल्याला माहिती असल्याने, जरी आपण झालेला बोध पूर्णपणे आचरणात आणू शकलो नाही तरी फार दुःख होणार नाही. व दुःख झाले नाही तर मार्ग बदलण्याची जरुरी भासणार नाही. खरे म्हणजे संत लगेच मोक्ष होईल अशी खात्री तर देत नाहीच, वर परत असे सांगतात की प्रगती ही हळूहळू झालेलीच बरी. कासवाच्या गतीने जरी प्रगती झाली तरी आपले गुरु आपल्यावर खूशच असतात. याचे कारण असे की आपल्या मनाची, देहाची अचानक झालेली प्रगती सहन करायची शक्‍ति नसते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की सामान्य साधकाला जर निर्विकार समाधी लाभली तर त्याचा देह २१ दिवसांत नष्ट होतो. त्या देहाची अशी तयारीच नसते की अत्यंत टोकाची अवस्था निर्विकार समाधीत भोगून परत जिवंत राहू शकेल. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील अजून एक गोष्ट ह्या सांगण्याच्या पुष्टीदाखल देता येईल. त्यांच्या एका शिष्याला सर्व जग व्यापून असलेले परमेश्वराचे रुप बघण्याची तीव्र इच्छा होती. एके दिवशी रामकृष्ण परमहंसांनी अत्यंत भावपूर्ण अवस्थेमध्ये समोर असलेल्या सर्व शिष्यांची मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला. संयोगाने हा शिष्य त्यावेळी तिथे होता. परत घरी आल्यावर त्याला सगळीकडे रामकृष्ण परमहंस दिसु लागले! जेवताना ताटामध्ये रामकृष्ण परमहंस, चालताना रस्त्यात रामकृष्ण परमहंस, ऑफिसमध्ये काम करतानासुध्दा सर्व ठिकाणी त्याला रामकृष्ण परमहंसच व्यापून उरले आहेत असे दिसु लागले. ह्या स्थितीने आनंद व्हायच्याऐवजी त्याचे मन चिंतेने व्यापून गेले. आता मी दररोजचे जीवन कसे जगू? माझ्यावर अवलंबून असलेल्यांचे काय होईल? ह्या चिंतेत त्याने समोर सगळीकडे असलेल्या रामकृष्ण परमहंसांना प्रार्थना केली की आपले हे रुप आवरा, मला सहन होत नाही. त्याक्षणी त्या रुपातून त्याची सुटका झाली व नेहमीचे जीवन सुरु झाले. अचानक प्रगती झाली तर त्या प्रगतीचे सर्व परीणाम सोसायची आपली तयारी नसते. म्हणूनच हळूहळू प्रगती होणेच उत्तम असे सर्व संत म्हणतात. खुद्द भगवान श्रीकृष्णांना आता तुमचे विश्वरुप आवरा असे अर्जुनाने अकराव्या अध्यायात सांगितलेच की!! म्हणून ऐकलेली बोधवचने जरी बरोबर आहेत असे वाटले तरी ती आचरणात आणायला वेळ हा लागणारच. याची आपली तयारी हवी, हा संयम आपल्यात आपण बाणवायला हवा. हळू प्रगतीबद्दल खेद न करीता झालेल्या छोट्या प्रगतीचा आनंद उपभोगायला आपण शिकले पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्याच्या एका किरणामध्येसुध्दा आपण आनंद मानतो (व पूर्ण सूर्य का मिळाला नाही याबद्दल खेद करीत नाही) त्याप्रमाणे झालेल्या बोधाचा एखादा अंश जरी आचरणात आणू शकलो तरी आपण आनंद मानायला पाहिजे आणि संपूर्ण ज्ञानी का झालो नाही याचा खेद करणे सोडून दिले पाहिजे.

संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा वापरता येतील याचा विचार करुन मग त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. त्यांचे शब्द जसेच्या तसे आचरणात आणण्यामध्ये साधना नसते तर आपल्या जीवनातील बंधनांचा विचार करुन त्यांना योग्य अशी वागणूक ठेवून भगवंताची आस्था ठेवण्यामध्ये खरी साधना असते.

उदाहरणार्थ, १). दुसऱ्यांचे दोष पाहू नये असे सर्व संत सांगतात. ते आपल्या जीवनात आचरणात आणण्यासाठी आधी आपण आपल्या अत्यंत जवळच्या लोकांमधील दोष पाहणे सोडले पाहीजे. अगदी त्यामध्येसुध्दा कालच्यापेक्षा आज एक कमी दोष दिसला तरी आपली प्रगती झाली आहे असे मानले पाहिजे. मग हळूहळू थोड्या कमी जवळीकीच्या माणसाचा एखादा दोष दिसणे बंद होईल.

२). आपण वारीत चालताना असा विचार करीत नाही की मला कुठे जायचे आहे ते माहित आहे मग लगेच तिथे का पोहोचत नाही? हळूहळू एक एक पावले टाकीतच आपण पंढरपूरला पोहोचतो. त्याचप्रमाणे संतांचे सांगणे म्हणजे शेवटी काय प्राप्त करायचे आहे हे माहिती करुन घेण्यासारखे आहे. ते प्राप्त करताना वेळ लागणारच. अशी जाणीव आपण सतत ठेवली तर निराश होण्याचे प्रमाण कमी होईल.

३). बरे नसताना जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा तो एक औषध लिहून देतो. तेव्हा आपल्या मनात असा विचार येत नाही की आता आपण बरे झालो. तो कागद घेऊन आपण केमिस्टच्या दुकानात जातो, औषध विकत घेतो व डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे दररोज घेतो. मगच थोड्या दिवसांनी आपण बरे झालो आहे की नाही याचा आढावा घेतो. त्याचप्रमाणे, गुरुंनी सांगितलेला मंत्र म्हणजे आपल्या भवरोगावरच्या एक औषधाचे नांव आहे. आता ते मनामध्ये लक्ष केंद्रीत करुन घ्यायचे आहे. तेसुध्दा गुरुंच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी किती दिवस सांगितलेले आहेत तोपर्यंत. मगच आपण बघितले पाहिजे की औषधाचा उपयोग झाला आहे की नाही. अशा दृष्टीकोनातून बघितले तरी प्रगती व्हायला वेळ लागणारच हे कळून येते.

थोडक्यात या ओवीचे सार सांगायचे म्हणजे, आपल्याला झालेला बोध संपूर्णपणे आचरणात आणण्याचा जो उताविळपणा आहे तो स्तुत्य असला तरी वास्तवात आणायला अत्यंत कठीण आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या अध्यायात (ओवी ४१ व ४२) अर्जुनाला म्हणतात की हळूहळू एक एक फांदी चढत आपण झाडावरच्या फळाकडे पोहोचतो, त्याचप्रमाणे हळूहळू प्रगती करुन घेत ध्येयाकडे गेले पाहिजे. आपले अंतिम ध्येय छोट्या पावलांमध्ये जो विभागू शकेल त्याचीच प्रगती ती पावले चालल्याने पटकन होईल. मग बघता बघता तो ध्येयाची प्राप्ती करुन घेईल.

 

 

स्वतःच्या प्रयत्‍नांचे महत्व

 

 

वरील ओवी ही एक गोष्ट सांगत आहे की साधनेत संयमाची जरुरी आहे. गुरु मिळाल्यावरसुध्दा लगेच आपले आयुष्य बदलून आपण परमेश्वराच्या जवळ जाऊन सुखात राहू अशी अपेक्षा ठेवू नका असे ज्ञानेश्वर महाराज ह्या ओवीद्वारे सांगत आहेत. काही साधकांना ह्याबद्दल शंका वाटण्याचा संभव आहे. त्यांना असे वाटत असते की गुरु मिळणे हीच एक आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. एकदा गुरुंनी आपले म्हटले की स्वतः काही करायची गरज त्यांना भासत नाही. स्वतः प्रयत्‍न करुनच साध्य प्राप्त होत असते हे त्यांना पटत नाही कारण त्यांच्या मते अशा विचारसरणीमुळे गुरुंच्या आशिर्वादाचे महत्व कमी होते. काही म्हणतात की परमेश्वर हा परम दयाळू आहे, तो आमची काळजी जर साधना केली तरच घेईल असे नाही, मग साधना करायला हवीच हे बंधन कशाला? परमेश्वराची प्राप्ती साधना केल्याशिवाय होणार नसली तर त्याच्यात व बाकीच्यांत फरक काय राहीला?

ह्या सर्व लोकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपली सर्वांची प्रगती होणार हे अगदी निश्चित आहे. जरी सध्या आपण साधना केली नाही तरी आपली व परमेश्वराची भेट होणार आहे हे पक्के आहे. परंतु ही भेट केव्हा होईल याची खात्री काही देता येणार नाही, याच जन्मामध्ये तो भेटेल की नाही हे सांगता येणार नाही. याचे कारण असे की जर आपण परमेश्वरावर सर्व सोडले तर त्याला वेळेचे बंधन घालायचे स्वातंत्र्य आपण गमावून बसतो. आणि बघा की सध्याचा जन्म हा परमेश्वराकरीता आपल्या अनेक जन्मांपैकी एक आहे. त्याबद्दल त्याला फार आपुलकी असणे शक्य नाही. आपली प्रगती तो आपल्या ८४ लक्षाव्या जन्मात करील किंवा त्याही पुढच्या वेळी करील. त्याच्या मर्जीप्रमाणे सर्व काही होण्याची परवानगी आपणच त्याला दिल्यामुळे केव्हा प्रगती व्हायला पहिजे हे ठरवायचासुध्दा अधिकार त्याचाच आहे. हे आपण कबूल केले पाहिजे. परंतु वरील आक्षेप जे कोणी घेतात त्यांची ही तयारी असतेच असे नाही. त्यांना वाटते, परमेश्वर सगळे करेल आणि ह्याच जन्मात करेल. त्यांच्या ह्या अपेक्षा पूर्ण करायला भगवान बांधील नाही हे ते विसरतात. म्हणून ज्या कोणाला ह्या जन्मातच परमेश्वराच्या जवळ जायचे आहे त्या सर्वांनी नियमित साधना करणे आवश्यक आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. नियमित साधना करण्यामध्ये गुरुंच्या आशिर्वादाला कमीपणा येत नाही. त्यांचे शब्द म्हणजे फळ नसून फळझाडाचे बीज आहे ही कल्पना केल्यास त्या बीजाची काळजी घेणे आवश्यक आहे हे आपल्याला पटेल. काळजी घेणे म्हणजेच साधना करणे. आणि फळ मिळायला वेळ लागेल हे सुध्दा ह्या रुपकाद्वारे स्पष्ट होते.

आता जे साधक नियमितपणे साधना करीत आहेत त्यांना असे वाटायचा संभव आहे की साधनेमुळे परमेश्वर प्राप्त होतो, मी साधना करीत आहे, म्हणजे माझ्या या प्रयत्‍नांमुळेच भगवान माझ्याजवळ येणार आहे. अश्या भावनेतून त्यांच्या मनात अभिमान येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास साधनेबद्दलच्या या अभिमानामुळे परमेश्वर परत दूर होईल. हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने साधना करावीच पण आपल्या प्रयत्‍नांचे खरे महत्वसुध्दा ओळखायची गरज आहे. खालील उदाहरणामुळे साधनेचे खरे महत्व कळून येईल.

काही काळापूर्वी घरातील कर्त्या पुरुषाने गृहिणीला घरात मदत करायची असते हा विचारच डोक्यात येत नसे. अजूनही अशी धमक (!) असलेले यजमान आहेतच. पण त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ही एक भाग्याची गोष्ट आहे!! म्हणून आपण काही वर्षांपूर्वींच्या यजमानाची कल्पना करु. हा भला गृहस्थ जर घरी असला की दर अर्ध्या तासाने चहाची मागणी करणार. थोड्या वेळानी घरातील बाईला दुसरी कामे असल्याने ती चहा करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन आपल्या स्वयंपाकात मग्न राहते. जर चहाची तल्लफ खूपच आली की हा गृहस्थ स्वतःच स्वयंपाकखोलीत जाऊन चहाचे भांडे कुठे असे विचारुन चहाकरीता पाण्याचे आधण ठेवतो. मग बिचाऱ्या बाईला वाटते की खरोखरच या माणसाला चहा हवा आहे. ह्या विचाराने आपली बाकी कामे बाजूला ठेवून ती त्याला म्हणते की तुम्ही बाहेर जा, मीच चहा करुन देते. आता ह्या लेकाला चहाचे भांडे कुठे हेसुध्दा माहिती नव्हते, तर चहा आणि साखर कुठे हे माहिती असण्याचा संभवच नाही. त्यामुळे लगेच हा बाहेर येऊन खुशीत चहा प्राप्त करुन घेतो. आपली अवस्था ही त्या यजमानासारखी आहे. साधनेतील प्रगती म्हणजे चहा. आपल्या गुरुंना, किंवा परमेश्वराला आपण नुसते बाहेर बसूनच सांगत असतो की प्रगती व्हायला हवी. ते त्यांच्या कार्यात मग्न असल्याने जर प्रगतीला उशीर झाला तर लगेच आपण साधना करायचा प्रयत्‍न करु लागतो, जसे त्या माणसाने चहा करायचा प्रयत्‍न केला होता. खरे म्हणजे, त्या माणसाप्रमाणेच आपल्याला खरी साधना म्हणजे काय? त्यामध्ये कुठल्या गोष्टी घालायच्या असतात याची काहीही माहिती नसते. परंतु ह्या अशा अत्यंत स्वल्प प्रयत्‍नांमुळेही आपले गुरु वा परमेश्वर आपल्यावर खुश होऊन नंतर कधीतरी होणारी प्रगती आत्ताच आपल्या पदरात टाकतात. ज्याप्रमाणे घरातील गृहीणीला पूर्ण कल्पना असते की `ह्यांना’ चहा करता येणार नाही, हे नुसते आव आणत आहेत पण तरीसुध्दा प्रेमामुळे ती ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चहा करते, त्याचप्रमाणे गुरुंनासुध्दा कल्पना असते की साधकाला मदत केली नाही तर साधनेत काही प्रगती होणार नाही, तरी आपल्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे ते त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करतातच. वरील उदाहरणातील बाई नुसता चहा यजमानांना देत नाही, तर दुपारी आपल्या मैत्रीणींना कौतुकाने सांगते की `ऐकलं का, आज हे चहा करायला निघाले होते, मीच नाही म्हटले’. मग सर्व मैत्रीणी तीच्या भाग्याचा हेवा करतात!! त्याचप्रमाणे आपले गुरुसुध्दा चारचौघांपुढे म्हणतात `इनामदारची साधना चांगली चालू आहे बरं का’!! ज्याप्रमाणे आपल्या मुलाचे अडखळत चालण्याचे प्रयत्‍न बघायला पालकांना आवडते, त्याचप्रमाणे शिष्याची खरी अवस्था काय आहे हे माहिती असूनसुध्दा, त्याचे कौतुक करायला त्यांना आवडते. शिष्याने ह्या गोष्टीची जाणीव सतत ठेवणे अत्यावश्यक आहे.

आपल्या साधनेचे खरे महत्व हे असे आहे. साधनेमध्ये भाव असायला पाहिजे, जीवनामध्ये साधनेशिवाय जगणे नकोसे झाले पाहिजे, प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचा हात दिसला पाहिजे या सर्व गोष्टींबाबत आपण अजाण आहोत. अशी आपली साधना सुरु असूनसुध्दा प्रगती का होत नाही अशी तक्रार करायला आपण कचरत नाही. परंतु भाग्याची गोष्ट म्हणजे गुरुंचे आपल्यावरचे प्रेम त्या गृहीणीच्या यजमानावर असलेल्या प्रेमापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून आपली प्रगती थोड्या, अर्धवट साधनेमुळेसुध्दा होऊ शकते. फक्‍त आपण थोडा संयम बाळगायला शिकले पाहिजे व छोटी पावले टाकत पुढे गेले पाहिजे. या ओवीतून हा धडा आपण शिकलो तरी खूप आहे.

 

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २७ डिसेंबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: