22/1: The Everpresent SadGuru

 

॥ ॐ श्री सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

मज ह्रुदयी सद्‍गुरू । जेणे तारीलो हा संसारपुरू ॥

म्हणऊनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी ॥ २२:१ ॥

 

ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाला व शारदेला वंदन करुन झाल्यावर ज्ञानेश्वरांनी गुरुंचे स्तवन केले आहे. ह्या ओवीत गुरूंचे वंदन करायच्या आधीच ते गुरूचा सबंध महिमा आपल्याला सांगत आहेत. त्यांच्या गुरूला त्यांनी इतक्या जवळ केले आहे की त्यांचे गुरू हे सद्‍गुरू होऊन त्यांच्या काळज्या दूर करीत आहेत असे ते म्हणत आहेत. या ओवीचा अर्थ असा आहे की `माझ्या ह्रुदयातच गुरू आहेत आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जीवन व्यतीत केल्याने हा संसाररुपी महापूर मी तारुन गेलो आहे व हे साध्य होण्याकरीता जो विवेक लागतो त्याच्याबद्दलचा आदर (त्यांच्याच कृपेने) मला प्राप्त झाला आहे.’

आज आपण नेहमीप्रमाणे ह्या अर्थाचा आपल्या जीवनात कसा उपयोग केला की साधनेत प्रगती व्हायला आपल्याला मदत होईल हे पाहूया.

 

 

सद्‍गुरूला ओळखायची गरज

 

लहानपणापासूनच आपण असे शिकत असतो की निर्हेतुक कर्म हे कनिष्ठ प्रतीचे आहे. हे कसे? असे तुम्ही विचाराल तर त्याचे उत्तर असे आहे. अगदी लहान मुलाला खेळत असताना बघूनसुध्दा आपण त्याला `तु काय करतो आहेस?’ असा प्रश्न विचारतो! आता तो मातीत खेळत आहे ही गोष्ट अगदी स्पष्टच असते पण फक्त त्यावर आपले समाधान होत नाही. मी किल्ला बनवित आहे, खायला पोळी करत आहे किंवा मातीचे लाडू करत आहे अशापैकी काही उत्तर येईपर्यंत आपले प्रश्न सुरुच राहतात! हीच गोष्ट त्याने काढलेल्या चित्राची असते. चित्र बघून आपण लगेच विचारणार `कशाचे आहे?’ माणसाचे असेल तर विचारणार `हा कोण?’ मनात आल्यासारखे रंग ओतले आहेत, काहीही काढायची इच्छा नव्हती असे सांगितले तर लोकं वेड्यांत काढतात हे मुलांना लगेच कळते. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी मुलांच्या मनावर आपोआप असा परिणाम होतो की कुठलीही गोष्ट ही पुढे काहीतरी निश्चित अशी वस्तू मिळणार आहे याकरीता करायची असते. नुसते `मी खेळतोय’ असे सांगितले तर लोकांचे समाधान होत नाही तर अशा करण्याने पुढे काहीतरी मिळणार आहे म्हणून मी मातीत खेळतोय असे सांगितले तर आणखी प्रश्नांचे उत्तर द्यावे लागत नाही असे त्याला जाणविते! अशा अनंत छोट्या-छोट्या गोष्टींतून त्याला कळायला लागते की जास्त प्रश्न टाळायचे असतील, लोकांकडून प्रशंसा मिळवायची असेल तर हेतू ठेवून कर्म करण्यातच शहाणपणा आहे. काही काळाने ह्याबद्दल त्याची इतकी खात्री होते की तो स्वतःच असे प्रश्न त्याच्या मित्रांना विचारायला लागतो! अजून जरा मोठा झाल्यावरतर त्याच्यावर वेळ वाया जाऊ न देण्याची जास्तच जबाबदारी येते. अश्या स्थितीत लहानपण काढले असल्याने मोठेपणी कारणाशिवाय कुठलीही गोष्ट आपण कशाला करू? म्हणूनच आधी सद्‍गुरूंशी नाते का जोडायला हवे, त्याने काय फायदा होईल हे आपण बघायला हवे.

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही गद्यात लिहीली नाही तर ओवीबध्द पद्यात लिहीली आहे. साडेतीन पदांच्या प्रत्येक ओवीत पहिल्या तीन पदांत यमक आहे. त्यांनी कवितेच्या अश्या पाळलेल्या बंधनाचा वाचकाला प्रत्यय येतोच. दुसरी गोष्ट म्हणजे कवितेमध्ये वस्तुस्थिती वास्तविक रुपातच दाखवायचे बंधन नसते. अतिशयोक्ती हा अलंकार कवितेमध्ये वापरायला पूर्ण मुभा असते. इंग्रजीमध्ये तर अशा वापराला poetic liberty असे नांवही दिले आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी कवितेची रचनात्मक बंधने पाळली, त्याचप्रमाणे त्यांनी ह्या मुक्ततेचा वापरही प्रत्येक क्षणी केला आहे. त्यांची गुरू-भक्तीपर स्तवने याची आपल्याला खात्री देतीलच. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक वाचकाने ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. आपण जेव्हा ज्ञानेश्वरीचा उपयोग आपल्या साधनेकरीता करतो तेव्हा साहजिकच आपल्या जीवनांत आपण ज्ञानेश्वरी वापरायचा प्रयत्‍न करतो. अशा वेळी प्रत्येक ओवीतील भाव अत्यंत टोकाच्या रुपात असल्याने आपल्या सर्वसाधारण जीवनात तो आपल्याला अनुभवात येणे शक्य नसते. किंवा तो भाव जसाच्या तसा आचरणात आणणे अशक्य होते. त्यामुळे ज्ञानेश्वरीला आधार मानून जगायची जरी अगदी प्रामाणिक इच्छा असली तरीसुद्धा ती आपल्याला पूर्ण करणे अवघड होते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन लाभले तरच आपला मार्ग मोकळा होतो.

जीवनांत आपल्याला हे मार्गदर्शन करण्यासारखा एकच गुरु आहे व तो म्हणजे आपल्या ह्रुदयातला सद्‍गुरु. हे मार्गदर्शन लाभण्यासाठी आपण सद्‌गुरुंच्या जवळ गेले पाहीजे. आता ह्रुदयातील सद्‍गुरुच सर्वात योग्य मार्गदर्शक कसा? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ह्रुदयातच असल्यामुळे तो आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतो. सर्व जगाला जरी आपण फसवू शकलो तरी सद्‍गुरूंना फसविणे शक्य नसते. सद्‌गुरुंना आपली सद्य परीस्थिती संपूर्णपणे माहिती असल्याने त्यांचा सल्ला हा आपल्याकरीता अगदी रामबाण उपाय असतो. याशिवाय आपल्या ह्रुदयातच ते असल्याने त्यांना शोधायला कधीही फार दूर जावे लागत नाहि, ते सतत आपल्याजवळ असतातच. या कारणांमुळे असे म्हणता येईल की सद्‌गुरुच आपल्याला सर्व परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करु शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे: सद्‌गुरुंचा सल्ला आपण ओळखायचा कसा? तर आपल्याला ज्यावेळी आतून स्फुरण होते की अमुक एक गोष्ट अमुक तऱ्हेने करायला हवी, ते स्फुरण म्हणजे सद्‍गुरूंचा सल्ला होय. असे स्फुरण त्यांच्याच प्रेरणेने होत असते. म्हणजे सद्‌गुरुंशी जवळीक का करावी? तर आपली साधना दररोजच्या जीवनामध्ये वापरता येण्याकरीता, व साधनेचा खरा फायदा करुन घेण्याकरीता आपण सद्‌गुरुंशी जवळीक साधली पाहीजे.

परंतु ह्या बाबतीत आपण अत्यंत सावध राहिले पाहिजे. कारण सद्‍गुरू प्रेरणेने आलेले स्फुरण निरपेक्ष दृष्टीने बघणे ही एक खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या पूर्व इच्छांचा व दूराग्रहांचा आपल्या बघण्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या पूर्वग्रहांविरुध्द स्फुरण आले तरी त्याप्रमाणे वागण्याचा मानसिक निर्धार आपल्याजवळ नसतो. याउलट आधी ठरविल्याप्रमाणेच विचार सुचला तर आपण आनंदाने ती गोष्ट करतो व नंतर सद्‍गुरूंनी सांगितले म्हणुनच मी तसा वागलो असे म्हणायलासुध्दा आपण मोकळे होतो! म्हणून जीवन सद्‍गुरूंच्याच सल्ल्याने जगून साधनेत प्रगती करायची असेल तर आधी आपली दृष्टी निर्मळ, स्वच्छ व पूर्वग्रहविरहीत केली पाहिजे. नाहीतर आपण स्वतःलाच फसवित राहू व शेवटी आपल्या प्रामाणिक प्रयत्‍नांनीसुध्दा साधनेत प्रगती का होत नाही अशा विचाराने अस्वस्थ होऊ.

जन्मजात दृष्टी अशी निर्मळ असणे ही गोष्ट आपल्यासारख्यांच्या नशिबात नाही. म्हणून आपण सुरुवातीला मार्गदर्शन घ्यायला सद्‍गुरू सोडून दुसऱ्या कोणाकडे जायला हवे. अशा ठिकाणी आपण जायला हवे की जेथे अत्यंत योग्य सल्ला मिळू शकेल. म्हणून ज्ञानेश्वरीसारख्या पुस्तकांचे, दादासाहेबांसारख्या गुरूंचे आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान असायला हवे. ही गोष्ट आपण जाणून त्यांच्या मदतीने शेवटी आपल्या पायावर उभे रहायला शिकले पाहिजे. याचा अर्थ असा की जरी आपण सुरुवातीला गुरुंवर पूर्णपणे अवलंबून असलो तरी आपले प्रयत्‍न (म्हणजे साधना) ह्रुदयातील सद्‍गुरूंचा सल्ला जाणून घेण्याच्या पात्रतेला येण्याकरीता सुरु असले पाहिजेत. ही गोष्ट म्हणजे एखाद्या मुलाने सुरुवातीला आई-वडिलांची मदत घेऊन, शेवटी आपल्या पायावर उभे राहून, त्यांचा भार हलका करणे तशी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून वा गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे वागून शेवटी आपल्याला काय शिकायचे आहे? तर हे की आपल्या ह्रुदयातील सद्‍गुरुंशी अनन्य नाते जोडणे. अनेक नाती अशी असतात की त्यांना सांभाळणे हे आपल्याकरीता प्रचंड अवघड होऊन जाते. सद्‌गुरुंशी नाते हे इतके पक्के असले पाहीजे, इतके जवळीकेचे असले पाहीजे की सद्‍गुरूनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट असेल तशी स्वीकारायची आपली तयारी असली पाहीजे. एखाद्या लहान मुलाला जर आईने सांगितले की उद्या घरी येणारा मुलगा तुझा लहान भाऊ आहे, तर काहीही शंका न काढता जसे ते मूल आईच्या शब्दांवर विश्वास ठेऊन नवीन आलेल्या मुलाकडे आपलेपणाने बघते तसे आपण आपल्या जीवनांत सद्‍गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे आलेल्या गोष्टींकडे बघायला हवे. आपली जेव्हा अशी तयारी होते तेव्हा केवळ सद्‍गुरूच नव्हे तर ज्ञानेश्वरी, आपले गुरूसुध्दा अत्यंत प्रसन्न होतात व स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या धडपड करण्याऱ्या आपल्या अशा शिष्याला मनापासून आशिर्वाद देतात. म्हणून परमेश्वराची प्राप्ती, अखंड शांतीचा शोध अश्या कुठल्या ध्येयाकरीता जरी आपली साधना सुरू असली तरी या गोष्टी प्राप्त होण्याकरीता दररोजच्या जीवनांत आपण आपली साधना वापरली पाहिजे. साधनेचा असा उपयोग करायला शिकले पाहीजे. याकरीता आपण आधी आपल्या ह्रुदयातील सद्‍गुरूंशी संधान बांधले पाहिजे. नंतर आपला देह प्रारब्धावर सोडून सद्‍गुरू सांगतील तसे वागणे आपण करायला शिकू. साधनेमध्ये सद्‍गुरूंशी असा सततचा संबंध जोडल्यामुळे भराभर प्रगती होऊन साधक आत्मसंतुष्ट होतो व लवकर आपल्या ध्येयाच्या जवळ येतो. सद्‌गुरुंशी संधान बांधायला हे खरे कारण आहे.

 

 

सद्‍गुरूंशी नाते जोडायची साधना

 

 

आता सद्‌गुरुंशी जवळीक साधायला पाहीजे हे स्पष्ट झाले तरी आपल्या मनाला त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्‍न करण्यासाठीसुध्दा कारण लागते. ही साधना करण्याकरीता वरील ओवीच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे कारण सांगितले आहे. ते म्हणतात `जेणे तारीलो संसारपुरू’. म्हणजे ह्या सद्‍गुरूच्या जवळीकेमुळे आपल्याला संसाराचा जो महापुर आपल्या भोंवती पसरला आहे त्यावर मात करायची आहे. हा हेतू ठेवून आपण सद्‍गुरूंशी संबंध जोडायचे प्रयत्‍न करायला हवेत असे त्यांना सांगायचे आहे.

अर्थात ही गोष्ट कोणालाही पटण्यासारखीच आहे. साधनेमध्ये, परमार्थाच्या मार्गावर, पहिले पाऊल टाकल्याक्षणीच आपल्या ध्यानात येते की सर्वजण ह्या संसाररुपी महासागरातून तारण्यासाठीच प्रयत्‍न करीत आहेत. एवढी सर्व माणसे चूक कशी असतील? असा विचार करुन आपण त्यावर विश्वास ठेवतो व साधनेचे ध्येय भवसागर तारण्यासाठीच आहे असे मानतो. सुरुवातीला बऱ्याच जणांचे असे मानणे स्वतःवर आलेल्या अनुभवांवरसुध्दा आधारीत असते. नुकताच झालेला प्रेमभंग, जवळच्या माणसांना न जाणविलेली आपली एखादी आकांक्षा, प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्‍नांना आलेले अकारण अपयश इत्यादी घटनांनी खचून जाऊन आपण हा सर्व संसार दुःखमयच आहे अशी कल्पना करतो व संतांच्या भवसागर तारण्याच्या गोष्टीला प्राधान्य देतो. परंतु आपली ही खात्री फार वेळ टिकत नाही. प्रेमभंग झालेल्या माणसाला दुसरी व्यक्ती आवडायला लागली की आधीचे दुःख तो विसरतो. अचानक जवळच्या माणसाने प्रेमाने चौकशी केली तर त्याने आधी दुर्लक्ष केल्याचे विसरतो. `काळ सर्व गोष्टींना ठीक करतो’ अशा अर्थाची मराठीत एक म्हणच आहे. भावनेची तीव्रता कमी झाल्यावरसुध्दा आपण भवसागर तरायला हवे अशी भावना ठेऊ शकतो पण त्यामध्ये असलेली सत्यतेची जाणीव आपल्याकरीता कमी झालेली असते. सर्व जगाला आपण फसविले, खुद्द स्वतःला फसविले तरी ही सत्य परीस्थिती बदलत नाही व म्हणूनच ह्रुदयातील सद्‍गुरू फसत नाहीत. ज्या क्षणी भावनेची तीव्रता कमी झाल्यामुळे आपण परत पूर्वीसारखेच संसारात लक्ष द्यायला लागतो त्या वेळी सद्‍गुरू आपल्या स्थानी परत जाऊन आपल्यापासून दूर होतात.

आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकली असेलच की एकदा भगवान विष्णु घाईघाईने लक्ष्मीचा सहवास सोडून निघाले कारण एक भक्त त्यांचे स्मरण करताना जग विसरला होता व धोब्याच्या वाळत घातलेल्या कपड्यांवरून चालत गेला व म्हणून तो धोबी त्याच्या मागे काठी घेऊन लागला होता. परंतु वेळीच भक्ताला त्याच्या जपातून जाग आली व त्याचे स्वतःचे धोब्यापासून सुटण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. त्यामुळे अर्ध्या वाटेत आलेले भगवान विष्णू आता माझी गरज नाही हे जाणून वैकुंठाला परत गेले व लक्ष्मीला म्हणाले आधी एक धोबी आणि एक भक्त होता पण आता दोन्ही धोबीच झाले आहेत म्हणून मी मदत करायला गेलो नाही!

आपले सद्‍गुरू असेच दर आपत्तीला आपल्या मदतीला येणारच असतात पण आपलाच त्यांच्यावर एवढा विश्वास नसतो. म्हणून त्या दुःखातून सुटण्याकरीता आपली स्वतःची धडपड सुरू होते व ते आपल्यापासून दूरच राहतात. त्यामुळे जर सद्‍गुरूंशी जवळीक साधायची असेल तर एखाद्या नावडत्या घटनेमुळे आलेले दुःख आपण तटस्थरीतीने बघायला शिकले पाहीजे. जेव्हा आपण ते दुःख निवारण्याकरीता धडपड करीत नाही, तेव्हा सद्‌गुरु स्वतः येतात व आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती व्हायला लागते. त्याचप्रमाणे एखादी आवडती गोष्ट झाली तरी आपण तीचा आनंद उपभोगायच्याऐवजी तटस्थ राहीलो तर सद्‌गुरु येऊन आपल्याला त्या गोष्टीचा खरा अर्थ दाखवितात. म्हणजे आपले वैराग्य आपल्याला आवडत्या गोष्टीत सुध्दा टिकवायला हवे. असे जर आपल्याला करता आले तर आपली जी काही अवस्था होईल त्यामूळे सद्‍गुरू सतत येतील व त्यांच्याशी जवळीक साधायची संधी आपल्या हातात येईल. सद्‌गुरुंशी जवळीक साधण्याची साधना अशी असते.

जगातील गोष्टींपासून तटस्थ रहायचे असेल तर सर्व गोष्टींचे नश्वरत्व आपण जाणून घेतले पाहीजे. सुफी पंथामध्ये याकरीता एक सुंदर गोष्ट सांगतात. एकदा एका राजाने दरबारात घोषणा केली की जो कुणी त्याला अशी वस्तु देईल की जी त्याला दुःखात आनंद व आनंदात दुःख देऊ शकेल त्याला पाहिजे ते इनाम मिळेल. सर्वांचे प्रयत्‍न फोल ठरल्यावर शेवटी त्याच्या राज्यातील एका साधूने त्याला घालायला एक अंगठी दिली व सांगितले की प्रत्येक क्षणी ह्या अंगठीकडे पाहिल्यास तुझ्या मनासारखे होईल. त्या अंगठीवर एवढेच लिहीलेले होते `हा क्षणसुद्धा जाणारच आहे’.

आपणसुद्धा सतत ह्या अंगठीकडे पहायला शिकले पाहीजे. प्रत्येक गोष्टीमधील अशाश्‍वतपणा जाणुन घ्यायला वरील वाक्यासारखे औषध नाहीं! अशा सततच्या विचाराने जगातील कुठल्याही गोष्टीत आपण गुंतुन रहात नाही व त्या गोष्टीचे खरे रूप आपल्यासमोर प्रगट होत रहाते. अशी आपली साधना जेवढी निरंतर होत राहील तितके सद्‌गुरु आपल्या जवळ येतील व तितक्या आपल्या ह्रुदयातील भावना आपल्याला स्पष्ट दिसायला लागतील. ह्या सर्व भावना म्हणजे सद्‍गुरुंचेच रूप असल्याने अशा रीतीने आपली व सद्‍गुरूची भेट सतत होत राहील. सहवासानेच प्रेम जडत असल्याने सततच्या भेटीचा अंतिम परीणाम म्हणजे सद्‍गुरूंवर प्रेम व श्रद्धा बसणे हे आपोआप घडते.

म्हणजेच सद्‍गुरूंच्या जवळीकीची साधना `प्रत्येक गोष्टीतील नश्वरतेमुळे असलेली निरर्थकता स्वसंवेदनाने जाणून घेणे’ हीच होय. हे जाणून घेण्यासाठी मनाचा तोल कधीही न ढळता आपण जगात वावरायला हवे व त्या करीता लागणारा विवेक आपल्यात हवा. हे सर्व जाणल्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात: `म्हणऊनि विशेषे अत्यादरू । विवेकावरी ॥’

 

सद्‍गुरुंच्या जवळीकीचा परिणाम

 

आता अशा रीतीने सद्‍गुरुंशी जवळीक झाल्यावर साधकाचे जीवन कसे होईल? `संसारपुरू तारणे’ म्हणजे काय? खरं म्हणजे ही जवळीक अंतरंगात होत असल्याने जगातील फार थोड्या लोकांना कल्पना येईल की साधकाचा आणि सद्‍गुरूंचा असा अतुट संबंध जोडला गेला आहे. परंतु प्रत्येक मोक्याच्या क्षणी, प्रत्येक संकटाच्या वेळी असलेले साधकाचे संतुलन पाहून बाह्य जगालासुद्धा अशी जाणीव जरूर होते की ह्या माणसामध्ये काहीतरी फरक पडला आहे. बाह्य जगाकरीता दिसणारा असा हा एकच फरक साधकात पडतो. अर्थात्‌ हा एक बदल काही थोडा नाही. काही काळ गेल्यावर सर्वांची अशी खात्री पटायला लागते की कुठल्याही गोष्टीवर सारासार विचार करून घ्यायचा असेल तर ह्या साधकाकडे जावे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता गोष्ट आहे तशी ऐकून त्यावर योग्य सल्ला द्यायचाच ह्या माणसाचा प्रयत्‍न असतो ही गोष्ट सर्वमान्य होऊ लागते व साधकामुळे त्याचा आजूबाजूचा माणसांना एक खरा मित्र भेटल्याचा मनापासून आनंद होतो. खरं म्हणजे साधकाचा आणि सद्‍गुरूंचा अतुट संबंध जुळल्याची एक खूण म्हणजेच जगातील त्याचा होणारा हा सर्वमान्यपणा. दहाव्या अध्यायात गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेच आहे की एकाचे मोठेपण अनेकजण मान्य करतात तेव्हा त्या माणसामध्ये माझे अस्तित्व आहे हे तू जाण. सद्‍गुरू आणि परमेश्वरामध्ये भिन्नत्व नसल्याने साधक सद्‍गुरुमय झाल्यावर त्याच्यामधील परमेश्वराचे अस्तित्व सर्वांना प्रामुख्याने प्रत्ययास येते व म्हणून जगाचे त्याच्याबद्दलचे प्रेम वाढायलाच हवे.

ही झाली बाह्य जगाची बाजू. आता साधकाला स्वतःला काय वाटते? हे आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे आपली ही वाढलेली प्रतिष्ठा त्याला आश्‍चर्यजनक वाटते. त्याला संपूर्ण खात्री असते की त्याने सांगितलेल्या गोष्टी ह्या सूर्यप्रकाशाइतक्या ढळढळीत आहेत. म्हणून आपण दिलेल्या सल्ल्याला लोकं महत्व देत आहेत हे पाहूनसुद्धा त्याच्या मनात अहंकार उत्‍पन्न होत नाहीं. कसा होणार? कारण सद्‍गुरु प्रसन्न झाल्यावर ते त्याची काळजी सतत घेत असतात म्हणून ह्या उपाधीची बाधा ते त्याला होऊन देत नाहीत! दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुले आई-वडिलांवर पालन-पोषणाची जबाबदारी टाकून आपले खेळ निवांत खेळत असतात त्याप्रमाणे त्याच्या मनात सद्‍गुरू काळजी घेतील अशी खात्री असल्याने तो जगात अत्यंत निरीच्छपणे नांदु शकतो. मनातील शांतीचा उपभोग घेत देहाने सद्‍गुरू सांगतील तसे वागायचा त्याचा छंद होतो व त्यामध्ये तो पूर्ण गुंगून जातो. समाजाच्या दृष्टीकोनातून दुःखाचे डोंगर जरी त्याच्यावर कोसळले तरी तो डगमगत नाही. अशी स्थिती प्राप्त करून तो सर्व जगाकडे अत्यंत आपलेपणाने बघत राहतो. आता पुढे काही करायचे आहे ह्या कल्पनेतून पूर्ण मुक्त होऊन तो परमेश्वराच्या दर्शनाची वेळ शांतपणे पाहू लागतो. खरोखर ज्ञानेश्वरांनी आपल्याला ह्या ओवीत आपल्या स्वतःमध्येच लपलेल्या अनंत अशा आनंदाचा ठेवा प्राप्त करायचा मार्गच उघडून दिला आहे. मेख फक्त एवढीच आहे की तो ठेवा प्राप्त होण्याकरीता जगातील गोष्टींमधून सुख मिळेल ही आपली कल्पना पूर्णपणे गेली पाहीजे. म्हणजे संसार हा महापूरासारखी एक आपत्ती आहे हे जाणविले पाहिजे. आपली फक्‍त ही गोष्ट स्वीकारायची तयारी हवी!

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १५ जुलै २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधरित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: