1/15: Renew Your Sadhana

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आता ह्रुदय हे आपुले । चौफाळूनियां भले ।

वरी बैसऊं पाउले । श्रीगुरुची ॥ १ : १५ ॥

 

गुरुभक्‍तीविषयी ज्ञानेश्वर महाराजांना आत्यंतिक आत्मियता आहे. जवळ-जवळ प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरुंबद्दल जे उद्‌गार काढले आहेत त्यावरुन त्यांच्या मनातील आपल्या गुरुंविषयी असलेला आदर प्रगट होतो. पंधराव्या अध्यायाची सुरुवातसुध्दा त्यांनी निवृत्तीनाथांना नमन करुनच केली आहे. हे नमन कुठल्याही बाह्य साधनाने न करीता, निव्वळ आपल्या भावांनी त्यांनी गुरुंची मानसपूजा केली आहे. अशा या नमनाची सुरुवात म्हणजे वरील ओवी आहे. ओवीचा अर्थ असा आहे: आता स्वतःचे ह्रुदय स्वच्छ, निर्मळ करुन त्यावर श्रीगुरुंची पाऊले (आपण) बसऊ.

 

साधनेची नित्य सुरुवात

 

वरील ओवीमधील `आता’ ह्या शब्दात काय अर्थ दडलेला आहे ते आधी बघू. आपल्यामध्ये दोन प्रकारचे साधक आहेत. एक असे की ज्यांनी आपली साधना नुकतीच गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे आणि दुसरे असे की साधना करायला हवीच अशी पूर्ण खात्री पटून साधनेच्या मार्गावर खूप काळ चालत आहेत. या दोघांकरीता `आता’ या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे.

पहिल्यांदा आपण साधना आत्ताच सुरु केली आहे अशांचा विचार करु. साधनेची सुरुवात करताना साधकाच्या मनाची एक विशिष्ठ अवस्था असते. आत्तापर्यंतचे आयुष्य ज्या तऱ्हेने घालविले असते त्याबद्दल एक प्रकारची निराशा आलेली असते. ही निराशा येणे जरुरी आहे कारण जोपर्यंत सद्य जीवनाबद्दलची ओढ कमी होत नाही तोपर्यंत नवीन मार्गावर जाण्याची तयारी आपल्यात नसते. खास करुन जर नवीन मार्ग आधीच्या मार्गाची मर्यादा स्पष्ट करणारा असेल, त्या मार्गावर जाण्याचे फोलपण दाखविणारा असेल तर आपली त्या मार्गावर चालण्याची उत्सुकता अजूनच कमी असते. हा नवीन विचार स्वीकारला तर आत्तापर्यंत चुकीच्या रस्त्यावर चालत होतो हे आपण मान्य केले असे होईल असे आपणास वाटते व हे मान्य करण्यास आपण तयार असतोच असे नाही. परंतु एखाद्या आणिबाणीच्या प्रसंगामुळे आपण आपल्या संपूर्ण जीवनाचा प्रामाणिकपणे आढावा घेऊ लागतो व आपल्याला असे वाटते की काहीतरी बदलण्याची आवश्यकता आहे. सध्याचा कठोर प्रसंगातून जरी आपण कसेतरी बाहेर पडलो तरी तशीच एखादी घटना परत कधीतरी येणार आहेच. असे प्रसंग कधीच येऊ नयेत या करीता साधना सुरु करायला हवी, त्याशिवाय पर्याय नाही हे आपल्या मनात ठसते. दृष्य साधनेची सुरुवात अशा वेळीच सुरु होते. दृष्य साधना हा शब्द अशा करीता वापरला आहे की खरे म्हणजे जो काळ आपण साधनेविरहीत घालविला आहे तोसुध्दा सध्याच्या साधनेकरीता आवश्यक होता. ज्याप्रमाणे वारीत आपले ध्येय चालत पंढरपूर गाठण्याचे असले तरी आपण सतत चालत नाही तर ठराविक वेळी थांबतो व नाश्ता, जेवण करतो. याशिवाय रात्री तंबू ठोकून विश्रांती घेतो. हा सर्व वेळ आपण वाया गेला असे म्हणत नाही, कारण ही विश्रांती घेतल्याने आपल्या पुढच्या चालण्याला जोर आलेला आहे हे आपल्यास माहिती असते. त्याचप्रमाणे साधना सुरु करायच्या आधीचा काळ वाया घालविला असे म्हणू नये. खरं म्हणजे आपल्या दृष्टीने वाया गेलेला तो काळसुध्दा साधनेचाच एक भाग होता. साधना ही जन्मोंजन्मी चालत असते व सतत साधना करीत राहणे अशक्य असते. म्हणून सध्याच्या आयुष्यामधील हा साधनेविरहीत वाटणारा काळ अनेक जन्मी चालणाऱ्या साधनेमधील तात्पुरत्या विश्रांतीसारखा आपण मानले पाहिजे. आपण बघितले असेल की गुरु कधीही साधनेबद्दल आपल्याला घाई करीत नाहीत. त्यांचा संयम दांडगा असतो. त्याचे कारण हेच आहे. त्यांना माहिती असते की सध्या ह्या साधकाच्या साधनेचा मार्ग सांसारीक जीवन पूर्णपणे जगणे हाच आहे. याला आत्ताच भगवंतप्राप्तीची ओढ लावण्यात अर्थ नाही. परंतु हा विचार साधकाच्या मनात सहसा येत नाही. म्हणून त्याला आपल्या परमेश्वरप्राप्तीच्या साधनेची सुरुवात आत्ताच होत आहे असे वाटते. अशा साधकांकरीता `आता’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे. आत्ता या क्षणी त्यांना जी गुरुभक्‍तिची गरज प्रकर्षाने वाटत आहे त्याचेच हे शब्दरुप आहे.

परंतु हा शब्द केवळ साधनेची सुरुवात करणाऱ्यांकरीताच आहे का? जे साधक सध्याच्या जन्मात साधनेच्या मार्गावर वर्षोंवर्षे चालत आहेत त्यांनी या शब्दाकडे दुर्लक्ष करावे का? अशा साधकांनी माझी वर वर्णन केलेली साधनेविरहीत अवस्था पूर्वी एकदा होती पण आता नाही अशी कल्पना करून वरील ओवीतील `आता’ या शब्दाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. याचे कारण असे की साधनेची दरक्षणी सुरुवातच होत असते! हे कसे? तर खरी साधना म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकरीता आपण केलेला सततचा प्रयत्‍न होय. परमेश्वराची लीला अशी आहे की तो आपले स्वरुप नित्य बदलत असतो. आधुनिक लढाईतील तोफा स्वयंचलीत असतात आणि एकदा गोळा सोडला की लगेच आपली सध्याची जागा सोडून दूर दुसरीकडे जातात, कारण शत्रूपक्षाकडे अशी यंत्रे असतात की गोळ्याचा मार्ग बघून ते त्याच्या उगमाचे स्थान शोधू शकतात व त्या उगमावर आपले तोफगोळे सोडतात. मग जर ती तोफ त्याच ठीकाणी असेल तर नेस्तनाबूद होते. अगदी अशाच तऱ्हेने ज्यावेळी आपली साधनेत प्रगती होते तेव्हा आपल्याला जाणीव होते की `अरे दुसऱ्यांशी प्रेमाने वागणे हेच खरे आहे’ किंवा `गोष्ट आहे तशी स्वीकारणे याशिवाय साधना काय आहे?’ किंवा `जे जे होत आहे ते ते सर्व आपोआप घडत आहे, माझे कर्म हे निमित्तमात्र आहे’ इत्यादी इत्यादी. थोडक्यात म्हणजे ज्या सर्व गोष्टी संतांनी सांगितल्या आहेत त्यांच्या सत्यतेबद्दल खात्री होऊ लागते व प्रत्येक वेळी आता खरी साधना कळली असे वाटू लागते. ही जाणीव होणे म्हणजेच परमेश्वर म्हणजे काय याची थोडी जाणीव होणे होय. ज्यावेळी साधना कळली असे आपणास वाटते त्या वेळी परमेश्वर म्हणजे काय याबाबतचे आपले मत एका ठिकाणी स्थिर झालेले असते. परंतु भगवंत ही काही स्थिर वस्तू नाही. त्याचे रुप नित्य बदलत असते आणि म्हणूनच आपल्या जीवनातील त्याच्या रुपाचे प्रतिबिंबसुध्दा नित्य वेगळे असते. हा सततचा बदल इतका हळूवार, सूक्ष्म, असतो की तो आपल्याला कळतसुध्दा नाही. आणि जर परमेश्वरच बदलला तर त्याच्या प्राप्तीकरीता जरुरी असणारी साधना पण बदलणारच. म्हणून आपल्या स्वतःच्या साधनेचे रुपसुध्दा हळूच बदललेले असते हे आपणास जाणवत नाही. दुसरे उदाहरण म्हणजे ज्याप्रमाणे मुष्टीयुध्दाच्या (boxing) खेळामध्ये प्रतिद्वंदी आपण त्याच्यावर प्रहार करु नये म्हणून आपले स्थान सतत थोडे थोडे बदलत असतो, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या जीवनातील त्याचे रुप सतत बदलत असतो. अत्यंत सूक्ष्म असा हा बदल आपल्या जाणिवेच्या बाहेर असतो. परंतु काही काळाने हा सुक्ष्म बदल आपल्याला जाणवतो. साधनेत बदल झाला आहे हे जाणविण्याचे लक्षण म्हणजे कालपर्यंत खूप आवडणारी साधनेतील एखादी गोष्ट आपल्याला कमी आवडेनाशी होते व आधी महत्वाची न वाटणारी गोष्ट करायला मन उत्सुक होते. मग कधी दररोज ध्यान लावलेच पाहिजे असे वाटणे कमी होते तर कधी जी व्यक्ती आधी साधनेत खूप मदत करते म्हणून अत्यंत आवडीची होती तीच्याबद्दलची आस्था कमी व्हायला लागते. याउलट असेसुध्दा होऊ शकते की जी व्यक्ती आधी साधनेच्या दृष्टीने महत्वाची वाटत नव्हती तीचे महत्व वाढू लागते. हे बदल साधकाला जेव्हा जाणवितात तेव्हा तो अस्वस्थ व्हायची शक्यता असते. सर्व काही चांगले चालू असताना हे वेगळे विचार का मनात येत आहेत असे त्याला वाटायची संभावना असते. असा विचार करुन जर तो साधक आधीच्याच साधनेला चिकटून राहीला तर त्याची प्रगती थांबायची शक्यता असते. अशावेळी चांगली गोष्ट (म्हणजे कालपर्यंत व्यवस्थित होणारी साधना)सुध्दा क्षणभंगुर आहे हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे व त्या ठराविक साधनेमध्ये गुंतून राहता कामा नये. म्हणून अशा वेळी ह्या साधनेत मुरलेल्या साधकांनीसुध्दा आपले ह्रुदय परत साफ करुन साधनेची नवी सुरुवात करायला हवी. स्वसंवेदनाने जाणीव झालेल्या गोष्टींचा जो स्वीकार त्यांनी साधना सुरु करताना केला होता तसाच आता या नवीन संवेदनांचा स्वीकार करुन नव्या मार्गावर उत्साहाने चालायला सुरुवात केली पाहिजे.

म्हणजे, साधनेत दृढपणे स्थिर असलेल्या साधकांकरीता `आता’ या शब्दाचा अर्थ `केवळ सध्याच्या साधनेतच गुंतून राहू नका, परमेश्वराच्या जवळ जाण्याकरीता नवीन मार्ग नित्य शोधत रहा’ असा आहे. साधनेतील बाह्य कर्मे जरी एकच राहीली तरी त्या कर्मांबद्दलचा आपला दृष्टीकोन सतत बदलत असतो म्हणून साधना ही नित्य नवी असते. व्यवहारात आपण बऱ्याचशा गोष्टी विचार न करीता, सवयीने करत असतो (जसे दात घासणे, आंघोळ करणे इत्यादी) परंतु साधना जरी नित्यनैमित्तिक असली तरी केवळ सवयीने कधी करु नये. दरवेळी साधना नाविन्याने करावी हा आदेश ह्या ओवीमध्ये अध्यारुत आहे. आपले गुरु साधना मनापासून करा असे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनादेखील केवळ सवयीने साधना करु नका असेच सांगायचे असते. साधकांनी लक्षात ठेवावे की ही ओवी पंधराव्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला नाही, म्हणजे साधनेत स्थिर झालेल्या लोकांकरीताच हा संदेश ज्ञानेश्वर महाराजांना द्यायचा आहे असा होऊ शकतो.

 

निर्मळ ह्रुदय म्हणजे काय?

 

आता आपण `चौफाळूनियां भले’ या शब्दांचा साधकांकरीता अर्थ काढायचा प्रयत्‍न करुया.

मगाशी आपण बघितले की साधनेची सुरुवात करताना असे वाटायचा संभव असतो की आत्तापर्यंतचे माझे आयुष्य मी वाया घालविले आहे. विशेषतः जर साधनेची सुरुवात आयुष्याच्या उत्तरार्धात ज्यांनी सुरु केली आहे अशा लोकांना सारखे असे वाटत असते. ज्या आणिबाणीच्या प्रसंगाने त्यांना संसाराबद्दल वैराग्य आलेले असते, त्याच्या प्रभावाखाली त्यांना आधीच्या जीवनाबद्दल प्रचंड निराशा उत्पन्न होते व त्यामुळे आपल्या पूर्वीच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षणांचा त्यांना विसर पडतो. खरे म्हणजे आधीचे आयुष्य आपण ज्या तऱ्हेने घालविलेले असते त्याला योग्य कारणे असतातच. कधीतरी आपण कारणाशिवाय वागतो का? पण गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की ती गोष्ट तशीच करण्यामागील आपल्याला तेव्हा जाणविलेली कारणे विसरतो व स्वतःला दूषणे देऊ लागतो. आत्ता कळलेली गोष्ट आधीच आपल्याला का कळली नाही असा विचार करु लागतो. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडत असते व म्हणून आत्ता झालेला बॊध आधी होणे शक्य नव्हते हे आपण विसरतो. दुसरी बाब म्हणजे काही काही गोष्टींचा परिणाम हा बऱ्याच काळाने आपल्याला कळतो. उदाहरणार्थ, मुलांवर आपल्या हातून योग्य संस्कार घडले आहेत की नाही हे ती मुले मोठी झाल्यावरच कळते, किंवा वर्षभर केलेला अभ्यास पुरेसा होता की नाही हे परीक्षेचा निकाल लागल्यावरच कळते, वा सध्याची शिरावर असलेली जबाबदारी हाती घेणे बरोबर आहे की नाही हे जबाबदारीची गोष्ट पूर्ण झाल्यावरच जाणविते इत्यादी. अशा कर्मांची फळे कर्म केल्यानंतर खूप वेळाने येत असल्याने त्यावेळच्या आपल्या वागण्यामागची असलेली अनेक सूक्ष्म कारणे आपण विसरलेलो असतो. मग जेव्हा कर्मफळ अपेक्षेप्रमाणे येत नाही तेव्हा आपण का असे वागलो हा प्रश्न विचारु लागतो. त्याला आत्ता उत्तर सापडणे शक्य नसते म्हणून स्वतःला दोष देण्याशिवाय आपल्याला पर्याय रहात नाही. असे जेव्हा वारंवार घडू लागते तेव्हा आपली पूर्ण खात्री झालेली असते की आधीचा काळ आपण निव्वळ वाया घालविला आहे. संयोगवशाने अशावेळी जर गुरुंची भेट झाली तर आपली दृष्य साधना सुरु होते. म्हणून साधनेची सुरुवात करताना बऱ्याच साधकांच्या मनात स्वतःच्या पूर्ववागणूकीबद्दल निराशावादी दृष्टीकोन असण्याची शक्यता असते. हा भाव गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवायला उपयोगी पडतो. गुरुंच्या उपदेशाची प्रचीती येण्याआधी त्यांच्या शब्दावर भरंवसा ठेवणे जरुरीचे असते. मग प्रचीती आली की हा विश्वास अजून दृढ होतो व साधनेकरीता लागणारी एकाग्रता आपल्यात येऊ लागते. तेव्हा साधना गंभीरपणे करायला सुरुवात ज्यांनी नुकतीच केली आहे, त्यांच्याकरीता `चौफाळूनियां भले’ या शब्दांचा अर्थ `आपल्या आधीच्या जीवनातला फोलपणा पूर्णपणे जाणून घेऊन गुरुंना अनन्यभावाने शरण जाण्याची मानसिक स्थिती’ असा होऊ शकतो.

आता ज्या लोकांना साधनेबद्दल आत्मीयता येऊन काही काळ झाला आहे, त्यांनी आपले ह्रुदय कसे साफ ठेवावे हे आपण बघूया. अशा लोकांमध्ये काही असे असतात की आपली साधनेत प्रगती होत नाही अशी त्यांची खात्री असते. ह्या ठाम विचाराने त्यांच्या मनात साधनेच्या उपयुक्ततेबद्दल साशंकता येण्याची शक्यता असते. इतका वेळ साधना करीत आहे तरी म्हणावे तसे अनुभव का येत नाहीत? अशा विचाराने त्यांचे मन विदीर्ण होऊ लागते. मग बाकीच्या साधकांकडे बघून त्यांची प्रगती किती आहे हे बघायचा छंद त्यांना लागायची संभावना जास्त असते. साधनेतल्या प्रत्येक अनुभवाकडे ते आसुसलेल्या नजरेने बघत त्या अनुभवांचा उपभोग घ्यायचा, त्याबद्दल सगळ्यांना सांगायचा प्रयत्‍न ते करतात. ह्या सर्वांचे मूळ म्हणजे साधनेतील स्वतःच्या प्रगतीबद्दल त्यांच्या ठायी असलेली कमीपणाची भावना. पुष्कळ वेळा साधना चांगली होत नाही हे मानायचे मुख्य कारण म्हणजे, न आलेले अनुभव हेच होय. अशा लोकांकरीता ह्रुदय साफ करणे या शब्दांचा अर्थ मनाला संयम शिकविणे असा होतो. त्यांनी हा संयम अंगात येण्याकरीता असा विचार केला पाहिजे: प्रत्येक साधकाची ज्याप्रमाणे साधना वेगळी असते, त्याचप्रमाणे त्या साधनेचे फळ काय आहे हेसुध्दा वेगवेगळे असते. कुणाला समोर निळा प्रकाश दिसेल, तर कुणाला व्यावहारीक गोष्टींमधील अडचणी कमी होत आहेत असा अनुभव येईल. अजून कुणाला सुगंध येईल तर कुणाला मानसिक शांति प्राप्त होईल. म्हणून आधी आपल्याला जो अनुभव हवा आहे तो मिळेलच याची खात्री नसते हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. कोणा एकाला दिव्य दर्शन झाले म्हणजे ते ज्यांना झाले नाही त्यांनी आपली प्रगती कमी आहे असे मानायचे काहीच कारण नाही. अगदी साधना नीट होणे अशी जरी प्रगतीची व्याख्या आपण ठेवली तरी आपल्या जीवनातील `नीट होणे’ या शब्दांचा अर्थ दुसऱ्यांच्या जीवनातील नीट होण्यासारखाच असेल याची खात्री कुणी देऊ शकत नाही. सेतु बांधताना खारीने केलेली मदत ही माकडांच्या मोठे दगड टाकण्याच्या मानाने क्षुल्लकच होती (याशिवाय वाळूच्या कणांवर `श्रीराम’ लिहिलेले नसल्याने ते बुडायची शक्यता होतीच!!). अशा वेळी खारीने जर अशी समजूत करुन घेतली असती की `मी काही दगड आणले नाहीत, चिमुटभर वाळूच आणू शकले, म्हणजे माझी साधना (मदत) काही माकडांच्या एवढी चांगली नाही’ तर ती संपूर्ण चुकीची होती हे आपण जाणताच. कारण शेवटी श्रीरामांनी खारीचेच जवळ घेऊन कौतुक केले, माकडांचे नाही. याचे कारण असे की तीच्या क्षमतेच्या मानाने केलेली मदत फार मोठी होती. एखाद्या मुंगीने साखरेचा एक कण जरी आणला तरी ती मदत माझ्या दोन किलो साखर आणण्यापेक्षा जास्त आहे. कारण मी दहा किलो साखरसुध्दा आणू शकलो असतो पण आणली फक्त दोन किलो!! याउलट मुंगीने आपले सर्वस्व पणाला लावून आपल्या क्षमतेच्या मानाने खूपच जास्त साखर आणली आहे. आता साधनेत आपली स्वतःची क्षमता किती आहे हे आपण जाणत नाही मग दुसऱ्याची क्षमता जाणण्याचा प्रश्नच येत नाही. मग दुसऱ्याने अमुक-अमुक साधना केली आणि आपण तशी करु शकत नाही याचे दुःख कशाला आपण बाळगायचे? आपल्या परीने जे काही होत आहे ते बघून त्यात अजून थोडी भर टाकायचा प्रयत्‍न करणे हा दृष्टीकोन त्यापेक्षा बरा! अशी मनाची सतत भावना ठेवणे म्हणजेच आपले ह्रुदय साफ ठेवणे होय. ज्या साधकांना आपल्या साधनेबद्दल, त्यामधील प्रगतीबद्दल, खरोखरची निराशा आहे त्यांच्या करीता त्या शब्दांचा अर्थ वरील प्रमाणे आहे. त्यांच्या मनातील निराशा झटकून देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. निराशेची काजळी झटकल्यामुळे साधना सतत तेवत ठेवायला जरुरी असलेला संयम आपल्यात येतो.

आता ज्यांची साधना चांगली चालू आहे त्यांच्याकरिता ह्रुदय स्वच्छ करणे म्हणजे काय हे पाहू. खरे म्हणजे सर्वात सावध ह्या लोकांनीच राहीले पाहीजे. मगाशी आपण बघितले की परमेश्वराचे रुप हे सतत नित्य नवे असते. साधनेच्या बळावर गुरुकृपा प्राप्त करुन घेतली की परमेश्वराचे सान्निध्य जाणवायला लागते. मनात एक वेगळाच आनंद भरुन वाहू लागतो व घडणारी प्रत्येक गोष्ट बरोबर आहे याचा विश्वास वाटायला लागतो. अशा वेळी साधकाने स्वतःवर नियंत्रण ठेवून वागायला हवे. आपल्याच सुखामध्ये मग्न राहून कर्तव्यांची उपेक्षा करणे बरोबर नाही हे जाणून त्याने बाह्य जगात सर्वसामान्य माणसाप्रमाणेच वागले पाहिजे. आपली कर्तव्ये जर पार पाडली नाहीत तर त्याचा परिणाम शेवटी आपल्या साधनेवर होणार आहे हे जाणून त्याने जबाबदाऱ्यांचे पालन केले पाहिजे. आपली ही सध्याची उच्च अवस्था केवळ परमेश्वर कृपेने आली आहे, स्वतःच्या साधनेचा भाग हा जरुरी असला तरी साधनेच्या मानाने फळ प्रचंड मोठे आहे याची सतत जाणीव ठेवून अंगात नम्रता बाणविली पाहिजे. आपल्या सध्याच्या आनंदाच्या पुढेसुध्दा अनेक टप्पे गाठायचे आहेत हा विचार करुन साधना अजून नेटाने चालविली पाहिजे अशी मानसिक भूमिका ठेवायला हवी. ह्या सर्व गोष्टी करणे म्हणजेच उच्च प्रतीच्या साधकाने आपले ह्रुदय `चौफाळणे’ होय.

 

श्रीगुरुंचे महत्व

 

सर्वांत शेवटी आपण श्रीगुरुंच्या पावलाला स्वच्छ ह्रुदयात स्थापन करण्याबद्दल विचार करु. साधनेची सुरुवात करत असणाऱ्या साधकांसाठी गुरुंचे महत्व स्पष्टच आहे. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हाच आपला ह्या जन्मातील साधनेचा मार्ग भगवंताने निश्चित केलेला असतो. आपले भाग्य असेल तर तो मार्ग साधनेच्या सुरुवातीलाच आपल्याला सापडतो. परंतु तो सापडून, हा मार्गच आपल्याकरीता योग्य आहे ही खात्री व्हायला वेळ लागतो, मनाची एक विशिष्ट तयारी लागते. ही तयारी करण्याकरीता योग्य असलेली साधनाच गुरु आपल्याला सांगत असतात. तेव्हा त्यांच्या पावलांवर नजर ठेवून चालणे याचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही.

साधनेत ठराविक ठिकाणी अडकून पडल्यामुळे आपली प्रगती होत नाही अशी भावना असलेल्या साधकांनी आपली निराशा झटकून गुरुंकडे जाऊन मनमोकळेपणे आपल्या व्यथा सांगितल्या पाहिजेत. सध्याच्या स्थितीतून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपल्या मनातील शैल्य गुरुंना संपूर्णपणे सांगून आपला भार कमी करणे हा होय. ज्या कारणांमुळे आपली प्रगती होणे थांबले आहे ती कारणे योग्य रीतीने जाणायला आपल्या गुरुंव्यतिरीक्त दुसरी व्यक्‍ती नाही. ते एखादवेळेस असे सुध्दा सांगतील की `सर्व काही व्यवस्थित चालले आहे’. अशा वेळी त्यांच्या शब्दावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. प्रगती ही योग्य वेळीच जाणविलेली बरी, म्हणून आत्ता प्रगती आहे हे न जाणविणे जरुरीचे आहे अशी भूमिका आपण घेतली पाहिजे. ह्या साधकांना मनातील निराशेवर मात करुन ही भावना धारण करणे म्हणजेच गुरुंची पावले आपल्या ह्रुदयात बसविणे होय. यातील काही साधकांना गुरु म्हणतील की `खरेच साधनेचे फळ कमी आहे, तू आता अमुक-अमुक कर म्हणजे फायदा होईल’. आपण एक पोथी वाचत असलो तर त्याच्या जोडीला दुसरे एखादे पुस्तक देतील, ठराविक मंत्राच्या माळा करायला सांगतील. अशा साधकांनी त्यांच्या सूचनेप्रमाणे वागणे म्हणजेच गुरुंची पावले आपल्या ह्रुदयात प्रतिष्ठापित करणे होय.

आता राहीली गोष्ट साधनेत सर्व काही व्यवस्थित चालू असणाऱ्या साधकांची. आधी सांगितलेल्या सर्व अवस्था ह्यांच्या जीवनात पूर्वीच आलेल्या असतात व आता बांध फुटून मोकळ्या वाहणाऱ्या नदीप्रमाणे साधना नित्य होत असते. एका ठराविक प्रगतीनंतर साधकाला जाणवायला लागते की खरी साधना म्हणजे काही वेगळेच काम आहे. संतांच्या `काही न करणे हे करायचे आहे’, `साधना दिवसाचे २४ तास करायची असते’ अशा वाक्यांचे अर्थ त्यांना कळायला लागतात. ह्रुदयात स्थित असलेल्या सद्‌गुरुंच्या प्रेरणेने जीवन जगायला अत्यंत आवडायला लागते. आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट साधनेत मदत करणारी आहे याबद्दलचा विश्वास स्वसंवेदनाने जाग्रुत होतो व `सहज साधना’ जगायला सुरुवात होते. ह्या भाग्यवंतांना आपला स्वतःचा मार्ग सापडलेला असतो व त्यावर चालत जाण्याचे धैर्य प्राप्त होते. अशा वेळी श्रीगुरुंचे महत्व काय आहे? साधनेला पूर्ण आकार आलेला असताना नित्य-नैमित्तिक साधनेचे, गुरुंच्या भक्‍तिचे महत्व कमी न होता वाढलेलेच असते हे त्यांनी जाणले पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता आल्यावरसुध्दा ज्याप्रमाणे आपल्या मनातील पालकांबद्दलचे महत्व कमी न होता त्यांच्या शिकवणुकीबद्दल आदर वाढतो तशी ही गोष्ट आहे. श्रीगुरुंबद्दलचा हा आदर त्यांच्या पुढील साधनेला कणखरपणा देतो, आकार देतो. ज्याप्रमाणे सर्वांच्या शरीरात एकसारखीच हाडे असली तरी बाह्य रुप खूप वेगळे असते, त्याचप्रमाणे गुरुंनी सर्वांकरीता सांगितलेल्या साधनेमधूनच हे साधक वेगळे रुप धारण करतात, वेगळ्याच अनुभवांचा लाभ घेतात. आपल्या गुरुंचा सल्ला तंतोतंत पाळून त्याशिवाय आपल्या स्वतःच्या अशा खास मार्गावर चालत राहणे म्हणजे त्यांनी श्रीगुरुंची पावले आपल्या ह्रुदयात स्थापन करणे होय.

अशा रीतीने ह्या ओवीचा अर्थ प्रत्येक साधकाकरीता आपण पाहू शकतो. आपली स्वतःची अवस्था जाणून घेऊन आपला अर्थ आपणच बघायचा आहे. ज्ञानेश्वरीमधील प्रत्येक ओवीत असे सामर्थ्य आहे की त्यावर विचार केल्यास आपल्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळू शकेल. ओव्यांमधील शाब्दीक सुंदरतेतच गुंगुन न जाता आपण पुढे जायला हवे. ओवीचा अर्थ माझ्या जीवनात काय होऊ शकेल याचा सतत विचार जर आपण केला तर ज्याप्रमाणे श्रीराम खारीवर प्रसन्न झाले त्याचप्रमाणे श्रीज्ञानेश्वरी आपल्यावर प्रसन्न होईल व जवळ घेऊन, पाठीवर हात फिरवून आपले समाधान करील. आपले काम फक्‍त (खारीप्रमाणे) स्वतःच्या कुवतीप्रमाणे प्रयत्‍न करणे हे आहे. अशा साधनेतला जो आनंद आहे तो सहज प्राप्त होणारा आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशीच ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १३ जानेवारीस दिलेल्या प्रवचनावर आधारित)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: