755/13: Some Common Confusions

 

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

कडाडी लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा ।

तैसा न देखे पुढां । वार्धक्य आहे ॥ ७५५:१३ ॥

 

 

तेराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानी माणसांची लक्षणे सांगितल्यावर `अज्ञानम्‌ यदतोऽन्यथा’ अशा शब्दांमध्ये सर्व अज्ञानी लोकांची बोळवण केली. या तीन शब्दी वर्णनाची फोड करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जवळ-जवळ २०० ओव्यांचा उपयोग केला. वरील ओवी या ओव्यांपैकीच आहे. तरुणपणी वार्धक्याचा विचार न करणे हे अज्ञानी माणसाचे लक्षण यांत प्रगट करण्यात आले आहे. या ओवीचा शाब्दीक अर्थ असा आहे: `ज्याप्रमाणे कड्यावरुन लोटलेली गाडी वा शिखरावरुन उताराला सुटलेला धोंडा आपला शेवट काय होणार आहे याचा विचार करीत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य (आत्ताचे तारुण्य जाऊन) पुढे वार्धक्य येणार आहे याचा विचार करीत नाही’. या ओवीपासून काय धडा घ्यायचा ते आता आपण पाहूया.

 

 

आपले साधनेबद्दलचे अज्ञानीपण

 

 

 

ओवीचा अर्थाकडे वळण्याआधी थोडे काही शब्द आपल्या अज्ञानाबद्दल. अज्ञान ही गोष्ट अशी आहे की जी केवळ भूतकाळातच अस्तित्वात असते! जोपर्यंत आपण अज्ञानी आहोत तोपर्यंत आपल्या अज्ञानाची कल्पनाच नसते. आपण अज्ञानी आहोत ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी ते अज्ञान नाहीसे होऊन त्याच्या ऐवजी `आपण अज्ञानी आहोत’ हे ज्ञान येते. म्हणूनच असे म्हणतात की अज्ञान हे फक्‍त भूतकाळातच जगते. अज्ञान हे नेहमी झाकलेले असते आणि ते उघडे करण्यातच त्याचा अंत आहे. आपल्या साधनेच्या समजूतीबद्दल ही गोष्ट लागू आहे का हे आपण आधी बघूया. मग या ओवीवर विचार करु.

साधना कशी करायची असते? या प्रश्नाबद्दल आपल्यामध्ये ज्ञान की अज्ञान आहे हे आपण पाहूया. आपल्यापैकी फारच थोडे असे भाग्यवान आहेत की ज्यांना जन्मापासूनच परमेश्वराबद्दल ओढ लागली आहे. सध्या आपण अशा थोर लोकांना बाजूला ठेवून आपल्यासारख्या लोकांबद्दल विचार करु. आपला जन्म परमेश्वराने आपल्याला आखून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठीच झाला आहे. चोरवाटांवर न जाता जर ह्या पूर्वनियोजित मार्गावर आपण चाललो तर आपली प्रगती फार लवकर होते व परमेश्वराची प्राप्ती आपोआप होते. भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायात स्वधर्माचे असे कौतुक करून अर्जुनाला युध्द लढायला सांगितले आहे. परंतु कुठला मार्ग आपला आहे हे सांगायला भगवान श्रीकृष्ण आपल्याजवळ नाहीत. ते भाग्य प्राप्त व्हायला आपली योग्यता आधी अर्जुनाएवढी झाली पाहिजे. म्हणून सध्या सारासार विचार करण्याची जी आपली बुध्दी आहे तीचा वापर करुनच स्वतःचा मार्ग शोधून काढला पाहिजे. आपली साधना नक्की काय आहे हे ठरवायला आपल्या आधीच्या आयुष्याचा उपयोग आपण करायला हवा. हे प्रथमदर्शनी साधनेविरहीत असे जे आपले जगणे होते त्याच्यामध्येच आपल्या खऱ्या साधनेची बीजे दडलेली असतात. साधनेपूर्वीच्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या गोष्टींमध्ये रमलो होतो हे बघितले पाहिजे. आवडणाऱ्या गोष्टी आपला नैसर्गिक कल दाखवितात व त्यावरून आपला मार्ग मिळण्याची शक्यता असते. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींपैकी बऱ्याचशा सामाजिक मान्यतेमुळे असतात. अशा गोष्टी आपण वेगळ्या परिस्थितीत वाढलो असतो, वेगळ्या समाजात जन्म पावलो असतो तर आवडल्या असत्याच असे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. म्हणून त्या आवडी नैसर्गिक नाहीत. अशा गोष्टींमध्ये विद्यार्थीदशेत चांगले गुण मिळविणे, मोठेपणी चांगली नोकरी मिळवून आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांची काळजी घेणे वगैरे येतात. अशा गोष्टींमध्ये आपण नैसर्गिकरीत्या रमलो होतो की सामाजिक प्रतिष्ठा वाढेल या कल्पनेने रमलो होतो हे आपल्याला कळत नाही. सध्या आपण ह्या गोष्टी बाजूला ठेऊया. मग बहुतेक जणांच्या असे लक्षात येईल की अशा ढोबळ गोष्टी बाजूला केल्या तर आपल्याला नक्की काय आवडते हे कळण्याऐवजी जीवनात एक पोकळीच निर्माण होते. दररोजच्या जीवनात आपण एवढे दंग झालो असतो की आपल्याला स्वतःला नक्की कुठली गोष्ट करायला आवडेल हेसुध्दा आपण विसरलेलो असतो. परंतु तरी काळजीचे कारण नाही. ह्या अवस्थेतपण आपल्या जीवनात नक्की काय करायला आपल्याला आवडेल हे आपण शोधू शकतो. याकरीता आपल्याला स्वतःचे असे जीवन बघायला हवे की समाजाचा फरसा विचार न करीता आपण आपल्या मनाप्रमाणे वागत होतो. हे स्वातंत्र्य आपल्याला फक्त आपल्या लहानपणी होते.

मुलांचे आयुष्य मित्रांमध्ये, स्वतःच्या उद्योगांमध्येच जास्त व्यतीत होत असते. आणि मित्रसुध्दा सारखे बदलत असतात. एखाद्या मित्राची व आपली आवड भिन्न असेल तर लगेच त्याला आपल्या मित्रांमधून काढायची निष्ठूरता लहानपणी आपल्यात असते. मोठेपणी मित्र सांभाळालायला हवेत म्हणून आपल्या मनाला आपण मुरड घालतो तर लहानपणी आपण मित्रच बदलायला तयार असतो. म्हणून आपली खरी आवड आपल्या लहानपणीच्या वागण्यावरून कळण्याची शक्यता असते. दुसरे कारण म्हणजे आपला जन्म हा पूर्वजन्मींच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्याकरीता झाला आहे असे गीता म्हणते. म्हणजे ज्या आवडी लहानपणी नैसर्गिकरित्या असतात त्यामध्ये आपल्या आधीच्या जीवनाबद्दल, त्या जीवनातील मार्गाबद्दल माहिती असणारच. आता कुठल्या वागण्यावरुन काय निष्कर्ष काढायचा हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. खालील उदाहरणांवरुन आपल्या साधनेचा कल कसा ओळखायचा याची कल्पना येऊ शकेल.

१). काही मुलांचा स्वभाव खेळणी मोडून परत जोडणे, फोन व विजेच्या तारांना हात लावू नकोस असे सांगितले तरी काय होते? या विचाराने मुद्दाम हात लावणे असा असतो. अशा मुलांपासून तुटू शकणाऱ्या, मोडू शकणाऱ्या सर्व गोष्टी दूर ठेवाव्या लागतात. ही मुले मोठी झाल्यावर केवळ दुसऱ्यांनी सांगितले म्हणून साधना करायची शक्यता फार कमी असते. त्यांना तसे करायला लावले तर त्यांचे मन साधनेतून उडून जायची शक्यता असते. जीवनात वेगवेगळे प्रयोग करून पुढे जायच्या साधनेत ह्यांना नैसर्गिक रस असायची शक्यता आहे.

२). काही मुले दुसऱ्यांनी चॉकलेट दिले तरी पालकांनी होय म्हटल्याशिवाय घेत नाहीत. काही मुले सदैव आपल्या आईचा पदर धरुन मागे-मागे फिरत असतात. अशा मुलांना मोठेपणी एका आदर्श व्यक्तिमत्वावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांचे अनुकरण वा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यात अत्यंत रस वाटेल.

३). काही काही मुले सतत आई-वडिलांना `कंटाळा आला आहे, आता काय करु?’ असे विचारुन भंडावून सोडतात. अशा मुलांना मोठेपणी गुरुंनी सारखे प्रोत्साहन दिलेले खूप आवडेल, तसे नाही झाले तर आपली साधना चालू आहे की नाही याबद्दल संभ्रम उत्पन्न होण्याची संभावना जास्त असते. म्हणून गुरुंशी सतत संबंध असलेला यांना चांगला.

४). याउलट काही मुलांना वेळ कसा घालवायचा असा कधीच प्रश्न पडत नसतो. काही खेळायला जरी नसले तरी ते आपल्याच तंद्रीत राहून वेळ घालवितात. अत्यंत शांत अशा मुलांचा पालकांना त्रास नसतो. मोठेपणीसुध्दा एकाच विचारावर लक्ष केंद्रित करून त्या विचाराचे पूर्ण ज्ञान स्वतः मिळवायला त्यांना आवडते. एकलव्यासारखे एका ठिकाणी बसून गुरुंनी कधीतरी सांगितलेल्या वाक्यावर विचार करुन झालेल्या बोधाप्रमाणे जीवन जगले तर त्यांची प्रगती सतत गुरुंबरोबर राहण्यापेक्षा लवकर होईल.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण सर्वांनी आपल्या बाळपणावर विचार करुन बघितले पाहिजे की कुठल्या वर्गवारीमध्ये आपण बसतो. यावरुन साधनेकरीता कुठला मार्ग आपल्याकरीता ठेवला आहे याची थोडी कल्पना आपल्याला येऊ शकेल. गुरुंनी जी नित्य-नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत, जो मंत्र आपल्याला दिला आहे त्याचे नित्य ध्यान करुन बाकीचे जीवन जो आपल्या अशा मार्गावर चालण्यातच घालवितो त्याची साधनेत प्रगती होणार हे वेगळे सांगायची गरजच नाही.

साधनेबद्दलचे आपले सध्याचे अज्ञान म्हणजे साधनेला दररोजच्या जीवनामध्ये आणण्याची जरुरी न भासणे ही होय. हे न करण्याने आपण दोन जीवने जगत असतो. एक म्हणजे साधनेचे, ज्यात गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागायचे बंधन आपण मानतो आणि दुसरे व्यवहारातले. जेव्हा व्यवहारातसुध्दा आपण साधनेबद्दल विचार करु लागतो तेव्हा आपल्याला आपला मार्ग सापडला आहे हे समजायला हरकत नाही. सर्व जीवन साधनामय झाल्याशिवाय प्रगती होणार नाही म्हणून आपली साधना दररोजच्या जीवनात कशी वापरता येईल याचा सतत विचार आपण केला पाहिजे. असा विचार करण्याची गरज भासायला लागली की साधनेबद्दलचे आपले अज्ञान उघडे होऊन नाहीसे होते.

 

 

तरुणपणींची वागणूक

 

 

 

आता आपण वरील ओवीवर विचार करुया. वार्धक्य या शब्दाची सांगड आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांशी घालतो. म्हणून ह्या ओवीत या शब्दाचा अर्थ `मृत्यूकाळची अवस्था’ असा आपण घेऊ शकतो. म्हणजे `तरुणपणींच्या वागण्यामध्ये अज्ञानी मनुष्य मृत्यूकाळी काय होणार आहे याची जाणीव ठेवत नाही’ असा या ओवीचा अर्थ होतो. मग `कडाडी लोटला गाडा’ व `शिखरौनी सुटला धोंडा’ आपल्या तरुणपणींच्या वागणूकीची उदहरणे होतात. ह्या दृष्टीने बघितल्यास (१) मृत्यूकाळी काय होते? व (२) या दोन रुपकांद्वारे ज्ञानेश्वर महाराज कुठल्या गोष्टी दर्शवित आहेत? हे प्रश्न साहजिकच उद्‌भवतात. या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे देता येतील.

(१) मृत्यूकाळी काय होते? आपण अशी कल्पना करु शकतो की मृत्यूकाळी आपण एका परीक्षेला सामोरे जाणार आहोत व त्या परीक्षेत किती गुण मिळवू यावर आपली पुढची अवस्था ठरणार आहे. आपले सर्व जीवन हे जणू त्या परीक्षेला सामोरे जाण्याकरीता लागणारा अभ्यास करायला दिलेला वेळ होता. कुठले प्रश्न या परीक्षेत विचारणार आहेत? सर्वसाधारण परीक्षेत जे काही प्रश्न असतात त्या सर्वांना जवळ-जवळ सारखेच गुण असतात. म्हणजे १०० गुणांकरीता आपण साधारणपणे १० गुणांचे १० प्रश्न सोडवितो. अशा परीस्थितीत एखादा प्रश्न सोडविता आला नाही तरी फार नुकसान होत नाही. त्यामूळे आपण काही कठीण भागाचा अभ्यास न करीता त्या भागावर प्रश्न आले तर ते सोडायची तयारी ठेवू शकतो. परंतु ह्या अंतिम परीक्षेची गोष्ट वेगळी आहे. या परीक्षेमध्ये एकच प्रश्न ८० मार्कांचा आहे व बाकीचे सर्व प्रश्न मिळून जेमतेम २० टक्के गुण होतात! त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न जर आपल्या हातून सुटला तर परीक्षेतील अपयश ठरलेलेच आहे. याउलट हा एकच प्रश्न सोडविला व बाकीचे सर्व हातातून सुटले तरी फार नुकसान होत नाही. म्हणून आपले सर्व जीवन हा ८० गुणांचा प्रश्न कसा सोडवायचा याचाच विचार करीत आपण घालविले तर या परीक्षेत यश मिळण्याचा संभव जास्त आहे. हा प्रश्न कुठला? आपण परमेश्वराची आठवण केवळ त्याच्यावरील प्रेमाकरीता किती वेळा काढली? हा तो प्रश्न होय.

एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडली म्हणून होणारे परमेश्वराचे स्मरण हे बाकीच्या २० मार्कांमध्ये आहे. केवळ परमेश्वराकरीता परमेश्वराचे स्मरण आपण कितीवेळा करतो, आपला किती काळ अशा चिंतनात व्यतीत होतो हे आपण पहायला हवे. साधारणपणे आपली मनःस्थिती अशी असते की सध्या अमुक-अमुक गोष्टींची मला अत्यंत गरज आहे व त्या मिळाल्यावर जो काही वेळ मिळेल तो भगवंताच्या स्मरणात घालवू. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की ही विचारसरणी कधीही न बदलणारी आहे. आत्ताच्या गरजा पूर्ण झाल्या की लगेच दुसऱ्या निर्माण होतात किंवा प्राप्त झालेली स्थिती तशीच राहू दे याकरीता आपले प्रयत्‍न सुरु होतात. त्या सगळ्यामधे परमेश्वराचे निर्हेतुक स्मरण राहूनच जाते. तरुणपणीच्या ह्या अवस्थेत मग आपण म्हणू लागतो की म्हातारपणी माझ्यामागच्या जबाबदाऱ्या कमी होतील व त्यावेळी मी देवाच्या स्मरणातच जीवन घालवीन. जे देवाचे फुकटचे स्मरण आपली सर्व इंद्रिये सुस्थितीत असताना घेऊ शकलो नाही ते आपण गलितगात्र अशा म्हातारपणात घेऊ हे आपण कुठल्या आधारावर ठरवितो हेच कळत नाही. खरे म्हणजे आत्ता मला खूप काम आहे, मी देवाचे नाव नंतर घेईन ही एक पळवाट आहे. अशा निर्हेतुक नाम घेण्यात सध्या आपल्याला रस वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. ह्या वस्तुस्थितीचा आपण स्वीकार केला पाहिजे कारण स्वीकाराशिवाय बदल होण्याची शक्यता नाही. आणि बदल झाला नाही तर अखेरच्या क्षणी ह्या महत्वाच्या पश्नाला `कधीच नाही’ हे उत्तर देऊन नापास होण्याची पाळी येण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

संत साहित्य वाचल्यावर आपल्या ही एक गोष्ट दिसून येईल की प्रत्येक संताचा मार्ग भिन्न असला तरी परमेश्वराचे स्मरण निरपेक्ष बुध्दीने करणे ही एक गोष्ट सर्वांच्या सांगण्यात आहे. सर्वजण त्यांच्या पध्दतीने हेच सांगत आले आहे आहेत. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर महाराज नवव्या अध्यायात म्हणतात की `परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोष बरवा । करिती माझा ॥ २०८:९ ॥’. परमेश्वराच्या प्रेमापोटीच नाम घ्या, मृत्यूकाळी हे तुमचे निरपेक्ष नाम घेणेच तुमच्या मदतीला येणार आहे असे सर्व संतांचे सांगणे आहे.

याचा अर्थ असा की संतांनी देवाचा हा अंतिम पेपर फोडला आहे!! दहावीचा प्रश्नसंच फुटल्यावर बोर्ड निराळी परीक्षा घेते तसे येथे होईल का?!! नाही. कारण देवाच्या संमतीनेच संतांनी हा पेपर फोडला आहे. इथे परीक्षा घेणाऱ्यालाच परीक्षार्थींबद्दल एवढे प्रेम आहे की तो पेपर फोडायलासुध्दा तयार आहे. काहीही करुन आपण पास व्हावे अशीच देवाची पण इच्छा आहे. म्हणून त्यानेच त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांना (म्हणजे संतांना) अशी आज्ञा केली आहे की जा, अगदी चौकात उभे राहून सगळ्यांना हा पेपर सांगा. परंतु आपल्यापैकी कितीजणांचा संतांवर विश्वास बसतो? फुकटात मिळालेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायची क्षमता आपण सध्याच्या काळात गमावून बसलो आहोत. म्हणून संतांनी आपणहून सांगितलेल्या ह्या पेपरवर विश्वास न ठेवता आपण आपल्याच प्रयत्‍नांत मग्न राहतो. याला काय करावे?

आता उरलेल्या २० टक्क्यांमध्ये आपल्या बाकी सर्व कर्मांचा गोषवारा घेण्यात येतो. म्हणूनच आपण नैतिकदृष्ट्या कितीही योग्य जीवन जगलेलो असलो अथवा समाजामध्ये कितीही जणांना मदत केलेली असली तरी अशा सर्व गोष्टींनी आपल्याला जास्तीत जास्त २० गुण मिळू शकतात. म्हणजे आपण नापासच! अशा सर्व गोष्टींमुळे स्वर्गप्राप्तीपेक्षा अधिक काही मिळत नाही व जन्म-मरणाच्या फेऱ्यातून अशा कर्मांनी सुटका होत नाही हे आपण लक्षात ठेवून साधना केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या `न पुढे देखां । वार्धक्य आहे’ या शब्दांतून हा धडा आपण शिकायला हवा.

(२)क. कडाडी लोटला गाडा म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांना तरुणपणी असे वाटते की जर मी स्वतःच्या रास्त आकांक्षांना योग्य मार्गाने मिळविण्याचा प्रयत्‍न केला व हे करताना समाजाला उपयोगी असे काम केले तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल. या गोष्टींपेक्षा देवाचे वेगळे असे का करायला पाहिजे? असा प्रश्न त्यांच्या मनात सारखा असतो. त्यांचे असेसुध्दा म्हणणे असते की तुम्हींच सांगता की देव सर्वांत आहे मग समाजसेवेत देवाचे समाधान का होत नाही? ज्याप्रमाणे एखाद्या गाड्याची अगदी रास्त इच्छा असते की आपल्याला उडायला मिळाले तर किती चांगले होईल व ती इच्छा तो स्वतःला कड्यावरून लोटून पुरी करतो तसे आपले हे विचार आहेत. त्या गाड्याच्या स्वतःहून लोटून घेण्यामुळे जगाचे काही नुकसान होत नाही, तो सर्वमान्य पध्दतीप्रमाणेच कोणालाही त्रास न देता आपली इच्छा पुरी करीत असतो. पण म्हणून पायथ्याशी त्याचे शतशः तुकडे होणार आहेत ही वस्तुस्थिती बदलत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जगन्मान्य अशा वागण्यामुळे दुसऱ्या कोणालाही आपण आयुष्यात त्रास दिला नाही तरी अंतिम परीक्षेतील ८० टक्के गुण चुकायचे रहात नाहीत.

हे असे का? ह्यामध्ये परमेश्वराच्या सर्वांबद्दलच्या प्रेमाला बाधा येत नाही का? असे ज्यांना विचारावेसे वाटते त्यांच्याकरीता उत्तर असे आहे. आपली सामाजिक सेवा म्हणजे जे आपल्याकडे आहे व दुसऱ्याकडे नाही ते त्यांना देण्याचा आपला प्रयत्‍न होय. जर आपल्याकडेच मानसिक शांतता नाही, समाधान नाही तर कितीही प्रयत्‍न करुन आपण ते दुसऱ्यांना देऊ शकू का? म्हणजे आपल्या अशा सामाजिक सेवेमुळे फारतर लोकांना शारीरीक सुखात आपण ठेवू शकू पण त्यांच्या मनातील अपूर्णतेचा सल काढू शकणार नाही. आपल्या अशा सेवेला खरी मदत म्हणता येईल का? सत्य परिस्थिती ही आहे की आपल्या सेवेने त्यांचे सध्याचे प्रश्न आपण दूर करून नविन प्रश्न निर्माण करीत आहोत. प्रश्नच नाहीसे करणे ही खरी मदत होय व ती आपण न केल्यामुळे परमेश्वर आपल्याला त्याचे गुण देत नाही. म्हणजे मी कधी सामाजिक सेवा करु नयेच की काय? असा विपर्यासयुक्त प्रश्न विचारण्याआधी जरा विचार करा. समाजसेवेतच अंतिम ध्येय न मानणे याचा अर्थ समाजसेवा न करणे होत नाही. आपल्याला काय करायचे आहे तर परमेश्वराचे अधिष्ठान ठेवून समाजसेवा करायची वेळ जेव्हा येईल तेव्हा ती करणे. आपणहून सेवेकरीता सेवा करण्यात अर्थ नाही. जी सेवा कर्मधर्मसंयोगाने आपल्या वाट्याला आली आहे ती परमेश्वराकरीताच करीत आहोत अशा विचाराने आपण केली पाहिजे. अशा वागण्यामध्ये आपण ८० मार्कांची तयारी करीत असतो. परंतु ही बुध्दी किती समाजसेवकांमध्ये असते?

(२)ख. शिखरौनी सुटला धोंडा म्हणजे काय? दुसऱ्या तऱ्हेच्या माणसांचे वागणे मनमानी असते. आपल्या आकाक्षांच्या पूर्तीसाठी कुठल्याही मार्गाने जायची त्यांची तयारी असते. ज्याप्रमाणे उताराला सुटलेल्या धोंड्याच्या मार्गात येणाऱ्या कुठल्याही जीवाची धडगत नसते त्याचप्रमाणे अशा लोकांच्या इच्छापूर्तीमध्ये अडथळा आणणाऱ्यांची अवस्था होते. नैतिकरीत्या, धर्माप्रमाणे चालण्याचे बंधन अर्थातच ही माणसे पाळत नाहीत. अशा स्वकेंद्रीत, स्वार्थी माणसांना देवाचे दर्शन होणार नाही हे कळायला फार वेळ लागत नाही. ज्या देवाचे रुपच करुणामय आहे त्याच्याकडे दुसऱ्यांना त्रास देऊन जाता येणे शक्यच नाही. परंतु इथेसुध्दा साधकाने एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ती अशी की अशा लोकांची स्वार्थी वागणूक त्यांना परमेश्वरापासून दूर ठेवत आहे. त्यांचे ध्येय जरी उदात्त असले तरी फरक पडत नाही. म्हणजे, साधना करीत आहोत म्हणून दुसऱ्यांना त्रास द्यायची मुभा आपल्याला अजिबात नाही. आपणाला ध्यानाला बसता यावे म्हणून त्यावेळी जर घरातील इतर सर्वजण जीव मुठीत धरून वावरत असतील तर आपले वागणे हे शिखरौनी सुटलेल्या धोंड्यापेक्षा वेगळे होत नाही. अशा ध्यानाच्याशेवटी परमेश्वराचे दर्शन कसे घडेल? तो तर बिचारा आपल्या ध्यानामुळे ज्यांना त्रास होत आहे त्यांची काळजी घेण्यात मग्न आहे. आपल्याकडे बघायला त्याला वेळच नाही!!

अशा रीतीने हे स्पष्ट होते की बाकी सर्व व्यर्थ आहे, केवळ परमेश्वराच्या नामातच मुक्ती आहे या विचारावर विश्वास ठेवून मनापासून देवावर प्रेम करायला आपण शिकले पाहिजे. असे जर झाले तरच आपले अज्ञानीपण भूतकाळात जमा होईल!

 

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक ११ नोव्हेंबर २००६ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधरित.)

One Response to 755/13: Some Common Confusions

  1. डॉ.नूतन पोळ म्हणतो आहे:

    हे वाचून माझ्या ज्ञानात फार भर पडली व वेळोवेळी श्री. सदगुरू कृपेने जे मनात चिंतन होतहोते ते बरोबर आहे याची खात्री पटली. फार आभारी आहे.

    डॉ. नूतन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: