(136+159)/2:The Search Of Constant In Change

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

ते तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १३६ : २ ॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमें गा ॥ १५९ : २ ॥

कुरुक्षेत्रामध्ये युध्द करायला आलेल्या आपल्या आप्तजणांकडे बघून अर्जुनाला संपूर्णपणे विषाद आला. त्याने युध्द करायचे सोडून, हातातील गांडीव धनुष्य खाली टाकून भगवान श्रीकृष्णांना सांगितले की ह्या माझ्या आप्त मंडळींना मारुन जे राज्य भोगायचे त्यापेक्षा न लढता आत्ता जे काही आहे त्यात समाधान मानून रहाणे हेच मला योग्य वाटत आहे. युध्द करण्याची मला अजिबात इच्छा होत नाही व माझ्या शस्त्रांनी माझ्याच नातेवाईकांचा, गुरुजनांचा प्राण मला घ्यावा लागणार आहे ही कल्पनासुध्दा मला सहन होत नाही. मी काय करायचे ह्याबद्दल संभ्रम उत्पन्न झाला असल्याने नक्की कशात माझे खरे हित आहे ते आता मला कळत नाही. त्याच्या ह्या बोलण्यावर विस्मित होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश करायला प्रारंभ केला. ते म्हणतात की तू फक्‍त त्यांच्या शरीराचा नाश करु शकशील. परंतु ह्या सर्व व्यक्‍तींचे अस्तित्व त्यांच्या शरीरापुरतेच मर्यादीत नाही. खरे सांगायचे झाले तर प्रत्येक व्यक्‍ती म्हणजे त्या शरीरामार्फत प्रगट झालेले एकसंध असे चैतन्यच आहे. तु त्यांना त्या रुपात जाणून घे. आणि समजा तू आत्ता ह्यांचा वध न करीता निघून गेलास तरी ते कधीतरी मृत्यू पावणार आहेतच. ज्याक्षणी व्यक्‍ती जन्माला येते त्याक्षणीच ती व्यक्‍ती मरण पावणार व परत जन्माला येणार हे निश्चित असते. वाळूने भरलेले एखादे घटिकायंत्र जसे आपण उलट-सुलट करत असतो त्यासारखाच हा प्रकार आहे. आता आपण भगवान श्रीकृष्णांच्या ह्या बोलण्यामध्ये दडलेला अर्थ आपल्या जीवनातील उदाहरणांवरुन जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु.

आपल्या जीवनातील भीष्म

सर्वसाधारणपणे आपल्या भोवती जेवढी जास्त आप्त माणसे असतील, स्वतःच्या विचारांशी जुळणारे विचार असलेले मित्र असतील तेवढे जास्त आपण सुखी असतो. खरोखर, आपण कुठल्याही शहरात रहायला गेलो तरी वरील दोन प्रकारच्या माणसांच्या सहवासाने जे सुख आपल्याला लाभते ते इतर कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीमध्ये नसते. म्हणूनच आपण बघतो की परदेशी गेलेली माणसे तिकडे कितीही यशस्वी जीवन जगत असली तरी परत आपल्या घरी, आपल्या मित्रांच्या सहवासात आल्यावरच खऱ्या मानसिक सुखाचा उपभोग घेतात. ज्या लोकांना भौतिक गोष्टींमध्येच सुख लाभते असे वाटते, त्यांना ही सत्य गोष्ट कळत नाही. पाश्चिमात्य संस्कृतीत स्वतःच्या जीवनाला परीपूर्ण करण्यामध्येच खरा पुरुषार्थ मानला जातो. त्या ध्येयाकडे जाताना वाटेत आपले सख्खे बंधू, स्वतःचे आई-वडिल जरी आले तरी वेळ पडल्यावर त्यांचा त्याग करुन आपली स्वतःची उन्नती साधून घेण्यात त्यांना अजिबात चुकीचे वाटत नाही. परंतु खरे सुख वरील वर्णन केल्याप्रमाणे असल्याने ते फक्‍त आपल्याला निर्माण करता येत नाही. ह्या विसंगतीमुळे आपण बघतो की पाश्चिमात्य जगातील बरेच लोक (किंवा पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे वागणारे आपण) सुखाच्या शोधात सतत भटकत आहेत.

आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये स्वतःची भौतिक प्रगती आपल्या सोयऱ्यांपेक्षा मोठी नसते. त्यामुळे दुसऱ्याला न दुखावता जे काही सुख प्राप्त होते त्यातच खरा आनंद आपल्याला मिळतो. म्हणूनच कित्येकवेळा आपण स्वतःकडे पडते घेऊन, घरच्यांची मने सांभाळण्यामध्येच आपले खरे हित मानतो. अर्थात, आपल्या आजूबाजूच्या लोकांची मनःस्थिती आपल्यासारखीच असेल तर दुसरी माणसेसुध्दा आपल्या स्वतःच्या सुखाकरीता न झटता दुसऱ्यांच्या (म्हणजे आपल्या!) सुखाकरीता प्रयत्‍न करीत असणार म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल याची खात्री असतेच. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सुख मिळत नाही असे होत नाही. फक्‍त सुख मिळण्याचे साधन केवळ आपले प्रयत्‍न न राहता आपल्या कुटुंबियांच्या एकत्र सहयोगाने ते मिळते. सुख प्राप्त करण्याच्या प्रयत्‍नांमधल्या ह्या फरकाने आपल्या सुखामध्ये आपल्या माणसांचा हातभार आहे ही जाणीव आपल्यात सतत असते. त्यामुळे आपल्या आप्तमंडळींबद्दल एक वेगळाच आपलेपणा निर्माण होतो. ह्या प्रक्रीयेचा शेवट म्हणजे आपल्या सुखाची कल्पनाच इतकी बदलते की स्वतःच्या देहाच्या सुखापेक्षा आपल्या कुटुंबियांच्या, मित्रांच्या समाधानामध्ये आपण खरे सुख आहे असे मानायला लागतो. ह्या गोष्टीचे प्रमुख उदाहरण म्हणजे भारतीय कुटुंबातील गृहीणी होय. घरातील माणसांच्या सुखाकरीता जीवापाड प्रयत्‍न करायला तीला अजिबात वाईट वाटत नाही. हे माझे कामच आहे अशा कल्पनेनेच समोर येणारी सर्व कर्मे अत्यंत आनंदाने ही बाई करीत असते. ह्या पार्श्वभूमीवर अर्जुनाचा विषाद आपल्याला लगेच पटतो. गीतेच्या पहिल्या दीड अध्यायातील अर्जुनाची वक्‍तव्ये सर्वांना पटण्यासारखीच आहेत.

परंतु हे दोन्ही विचार चुकीचे आहेत. खरे सुख हे कुठल्या गोष्टीच्या वा कुणाच्या सान्निध्यात प्राप्त न होता आपल्या स्वतःच्या जवळ सतत असते. गीतेतील हा विचार श्रीकृष्णांनी अर्जुनाला पटवून दिला व म्हणून अर्जुन परत युध्दाला तयार झाला. हा विचार पटवून देण्याच्या प्रक्रियेत वरील ओवीमधून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सांगायचा प्रयत्‍न केला आहे की `बाबारे, तू ज्या कुणाला भीष्म म्हणून जवळ केले आहेस, आपले मानले आहेस तो खरा कोण आहे याची तुला कल्पना आहे का?’ तसे पहायला गेल्यास अर्जुनाने पहिल्यांदा भीष्मांना पाहिले होते आणि आत्ता युध्द करताना जसे ते दिसत आहेत ह्यामध्ये खूप फरक आहे. वयोमानाप्रमाणे त्याच्या केसांचा रंग बदलला असणारच. नुसते शरीर नव्हे तर, वय जसे वाढेल तसे आपल्या मनातील विचारांत सुध्दा आमुलाग्र बदल झालेला असतो. ह्या सर्वांत कुठला भीष्म अर्जुनाला पसंत आहे? खरी गोष्ट ही आहे की भीष्माच्या वागण्यातील ठराविक गुण अर्जुनाला अत्यंत प्रिय आहेत. त्यांच्या शरीरावर अर्जुनाचे प्रेम का आले? तर ह्या शरीरामार्फत अर्जुनाला आवडणाऱ्या गुणांना (एका प्रतिज्ञेचे आयुष्यभर पालन करणे, योग्य विचार करुन कुठलीही क्रिया करणे इत्यादी) बाह्य जगात भीष्म पितामहांनी प्रगट केले म्हणून. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ही गोष्टच दिसून येते. ठराविक व्यक्‍ती आपल्याला आवडतात याचे खरे कारण त्यांच्या वागण्यातील लकबींमध्येच असते. अगदी शारीरीक आकर्षणाबद्दल बघितले तरी असे दिसून येईल की प्रत्येक सुंदर व्यक्‍ती आपल्याला प्रिय होतेच असे नाही. म्हणजे आपल्याला दीर्घकाळ आवडणाऱ्या व्यक्‍ती त्यांच्या एका विशिष्ट स्वभावामुळेच आपल्याला प्रिय असतात. जर तो ठराविक स्वभाव आपल्याला दुसऱ्या कुणामध्ये दिसला नाही तर आपण त्या गुणाची सांगडच त्या व्यक्‍तीबरोबर घालतो. (जसे भीष्म म्हटल्यावर त्यांची प्रतिज्ञा सर्वांना आपोआपच आठवते.) मग आपली त्या व्यक्‍तीबद्दलची हवेपणाची भावना अधिक तीव्र होते. अशा अर्थाने अर्जुनाच्या मनातील भीष्माबद्दलचा मोह त्यांच्या स्वभावामुळेच झाला होता हे आपण जाणल्यावर मग भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचे आहे ते लगेच स्पष्ट होते. ते म्हणतात की ज्या स्वभावामुळे तुला भीष्मांबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे, तो स्वभाव तुला दुसऱ्या एखाद्या व्यक्‍तीत दिसेल, किंवा कमीतकमी त्या व्यक्‍तीच्या वागण्याची आठवण तर तुझ्या मनात कायम राहीलच. त्यामूळे भीष्मांचे अस्तित्व तुझ्या जीवनात सतत आहेच. त्यांचा देह जरी गेला तरी त्यांच्या गुणांच्या रुपात ते तुझ्या जीवनात राहणारच आहेत तेव्हा तू असा विचार करु नकोस की त्यांचा नाश होणार आहे. तुझ्याकरीता फक्‍त त्यांच्या अस्तित्वाचे रुप तेवढे बदलणार आहे. आणि त्याच्या अस्तित्वामध्ये (म्हणजे देहामध्ये) बदल रोज घडत असतोच आणि देहाचा नाशही आज ना उद्या घडणार आहेच. तेव्हा तुला त्यांच्या देहाच्या नाशाकरीता स्वतःला जबाबदार समजायची काहीच गरज नाही असे ते अर्जुनाला सांगत आहेत.

वरील ओवींतून आपल्या जीवनात ही एक गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे: आत्ता ज्या व्यक्‍ती आपल्याला प्रिय आहेत, त्या मुख्य करून त्यांच्या स्वभावामुळे प्रिय आहेत. त्यांचा शारीरीक दृष्टीकोनाने जरी वियोग झाला तरी ती सर्व माणसे त्यांच्या अंगभूत असलेल्या गुणांच्या आठवणीच्या रुपात आपल्या जवळ राहतातच. याशिवाय सध्याच्या जीवनात नीट बघितले तर वियोग झालेल्या व्यक्‍तीचे गुण दुसऱ्या एखाद्या माणसामध्ये थोडेफार आढळतीलच. म्हणजे या अर्थाने वियोग झालेली व्यक्‍ती एखादे दुसरे रुप आपल्या जीवनात घेऊन आली आहे ही भावना आपल्यात येईल. असा विचार करुन आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण वियोगांना तोंड द्यायची शक्‍ती आपण ह्या ओवींतून मिळवू शकतो. थोडक्यात म्हणजे, आपल्या जवळच्या माणसांच्या आकर्षणात त्यांच्या शरीरापेक्षा त्यांच्या अंगभूत गुणांचा जास्त हातभार आहे हे आपण बघायला शिकले पाहिजे. त्या व्यक्‍तीचे हे अभिजात गुण म्हणजेच तीचे चैतन्यरुप आहे असे आपण मनू शकतो.

परंतु दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात दडून बसलेले अनेक चैतन्यरुपी भीष्म ह्या ओवीवर केलेल्या वरील विचारामुळे प्रगट होतात! वर आपण बघितले की भीष्मांचा भीष्मपणा त्यांच्या स्वभावामध्ये आहे व ते त्यांचे चैतन्यरुप आहे. याबद्दल अजून खोल विचार केला तर असे म्हणता येईल की काही व्यक्‍ती आपल्या जीवनात केवळ चैतन्यरुपातच अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ, एखाद्याला ज्ञानेश्वर महाराजांबद्दल खूप आत्मीयता असेल तर त्याच्या जीवनात ज्ञानेश्वर महाराज (ह्या आवडीच्या रुपात) जिवंत आहेत असे आपण मानू शकतो. किंवा, एखादा गुण आपल्याला आवडत असला (उदहरणार्थ, स्वतःला विसरुन दुसऱ्यांना मदत करणे, केलेल्या मदतीचा मोबदला न घेणे इत्यादी) तर त्या गुणांबद्दलची आपली आवड ही आपल्या आई-वडिलांबद्दलच्या आवडीइतकीच सत्य आहे. आता त्या गुणांप्रमाणे वागणारी व्यक्‍ती आपल्या जीवनात जर अस्तित्वात नसली तर ते गुण चैतन्यरुपातच अस्तित्वात आहेत. जीवनात मोक्याच्या क्षणी निर्णय घेताना आपण आपल्या आवडणाऱ्या गुणांविरुध्द सहसा काही करत नाही. ज्याप्रमाणे आवडत्या व्यक्‍तीविरुध्द सहसा आपण जात नाही अगदी तशीच ही गोष्ट आहे. म्हणजे, त्या गुणांचे महत्व मोक्याच्या क्षणी एखाद्या जीवलग व्यक्‍तीएवढेच आहे. म्हणून, जेव्हा आपण आपल्या माणसांची गणना करतो तेव्हा त्यामध्ये केवळ भोवती असलेल्या सर्व व्यक्तींचाच विचार न करीता त्याबरोबर आपण आपल्या मनातील सुप्त आवडींचासुध्दा अतंर्भाव केला पाहिजे. आपल्या माणसांमध्ये हे सगुण रुप नसलेले विचारसुध्दा आपण सामील केले पाहीजेत. म्हणजे संसारामध्ये आपण गुंततो याचे कारण केवळ आपल्या भोवतालच्या व्यक्‍ती नसून त्यामध्ये आपल्याला आवडणाऱ्या सर्व मानसिक भावनांचादेखील समावेश आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.

आता संसाराच्या पाशातून सुटणे हे अर्जुनाने हस्तिनापुराचे राज्य मिळवण्यासारखे आहे असे जर आपण मानले तर आपले पाश तोडण्याकरीता असलेले सर्व प्रयत्‍न (म्हणजे आपली साधना) हे कुरुक्षेत्रातील लढाईसारखे आपल्याला दिसू लागतील व आपली अवस्था अर्जुनासारखी दिसू लागेल. ह्या लढाईमध्ये केवळ आपल्या दुर्गुणांवर (म्हणजे दुर्योधन, दुःशासन या सारख्या शत्रुंवर) संयम आणायचा आहे असे नाही तर चांगल्या गुणांच्याही (म्हणजे भीष्म, द्रोणाचार्य यासारख्या शत्रुंचा नाश) पलीकडे आपल्याला जायचे आहे. हे चांगले गुण कुठले? मला आयुष्यामध्ये काही जबाबदाऱ्या आहेत, त्या पूर्ण पार पाडल्यावरच मी साधना करीन, समोरचा मनुष्य असहाय्य आहे, त्याला मदत करण्यातच खरी साधना आहे इत्यादी विचार म्हणजे आपल्या जीवनातील भीष्म आहेत हे आपण खात्रीपूर्वक ओळखले पाहिजे. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या सात्विक गुणांच्याही पलिकडे जाणे भाग आहे. परंतु सात्विक गुणांचा त्याग करताना आपली अवस्था अगदी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखीच होते. मग `चांगल्या गुणांपलीकडे का जायला हवे?’ किंवा `हे गुण सोडून जे जगायचे त्यापेक्षा मेलेलेच बरे’ असे विचार मनात घोंघावू लागतात व आपण लढाई करण्यास नकार देतो! साधना सुरु ठेवण्याकरीता आपली ही अगतिक अवस्था बदलणे अत्यावश्यक आहे. योग्य सल्ला देऊन परत शस्त्र उचलणण्यास श्रीकृष्णांनी अर्जुनाला लढाई परत सुरु करायला भाग पाडले. तसे साधनेमुळे माझ्या चांगल्या गुणांच्याही पलीकडे जायचे आहे हे कळल्यावर जो गोंधळ होतो, त्याचे निरसन करुन साधना परत सुरु करायचे धैर्य कसे मिळवायचे हे आपण आता बघू.

सतत साधना चालू ठेवण्यासाठी लागणारे धैर्य कसे मिळेल?

एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटते तेव्हाच आपल्या अंगात ती गोष्ट प्राप्त करण्याकरीता करायला लागणाऱ्या कष्टांचे ओझे सहन करायची शक्‍ती येते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला हे माहीत असते की परीक्षेत चांगले मार्क्स मिळविणे जरुरी आहे. पण ते गुण मिळविण्याकरीता अभ्यास करायची ताकद ह्या ज्ञानाने येत नाही. तशी येत असती तर आपण सर्वजण खूप अभ्यास करुन यशस्वी झालो असतो. ज्यांना मनापासून गुण मिळवायची इच्छा असते असे काही विद्यार्थीच जरूर असलेला अभ्यास करु शकतात. किंवा, कालपर्यंत अभ्यास न करणारा विद्यार्थीसुध्दा अचानक अभ्यास करायला लागतो हे कित्येकवेळा आपण पाहिले असेल. याचे कारणसुध्दा हेच आहे. आज त्याला अभ्यास करायलाच हवा याची मनापासून जाणीव झाली आहे व म्हणून त्याच्या वागण्यात फरक पडला आहे. ही गोष्ट आपण फक्‍त वरील उदाहरणात नव्हे तर जगातील सर्व गोष्टींत बघू शकतो. जरा विचार केला तर असे आपणांस दिसून येईल की एखाद्या गोष्टीकरीता आपण अथक प्रयत्‍न तेव्हाच करु शकतो की जेव्हा ती गोष्ट हवीच अशी संशयविरहीत जाणीव आपल्याला होते. एवढेच नव्हे तर जेव्हा अशी इच्छा आपल्याला नव्हती तेव्हा ती गोष्ट मिळविण्याकरीता प्रयत्‍न जरी सुरु केले तरी पहिल्या, दुसऱ्या अडचणीमध्येच आपण आपला नाद सोडून दुसरी गोष्ट करायला लागलो होतो.

आपली साधनासुध्दा ह्या नियमाला अपवाद नाही. याचा अर्थ असा की साधना जर अथक चालू ठेवायची असेल तर आपल्याला ती करायलाच हवी याची संशयविरहीत जाणीव झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण अर्जुनाच्या युध्द करु का नको या संभ्रमाकडे पाहिल्यास असेच दिसून येईल की त्याच्या मनात युध्द करण्याचे कारण हस्तिनापुरचे राज्य मिळवायला हवे हे होते. जेव्हा त्याला असे वाटले की आप्तजणांचा सांभाळ हे राज्यप्राप्तीहून उच्च कोटीचे कर्म आहे तेव्हा त्याच्या मनातून राज्य मिळविण्याची आत्यंतिक इच्छा नाहीशी झाली व त्यामुळे ते मिळवण्याची साधना (म्हणजे युध्द) नाही केली तरी चालेल असे त्याला वाटले. अशा रीतीने विचार केल्यास हे स्पष्ट होते की जर साधना अडथळ्यांचा सामना करतानासुध्दा चालू ठेवायची असेल तर आधी आपल्या मनात साधना करणे हे जीवनातील अत्यंत उच्चप्रतीचे कर्म आहे ही भावना आपण उत्पन्न करायला हवी. म्हणजे, जर साधना होत नसेल तर ती होत नाही याचा विषाद करीत बसण्यापेक्षा आपण आपला वेळ मी साधना का करावी याचा विचार करण्यात घालविणे जरुरी आहे. जर आपल्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे उत्तर आपल्याला मिळाले तर आणि तरच आपण साधना अखंडीत चालू ठेवू शकतो.

आता ही गोष्ट स्पष्टच आहे की प्रत्येक साधकाचे साधना का करायला हवी याचे कारण निराळे असते. जेवढे साधक आहेत तेवढी त्यांची साधना करायची कारणे आहेत! तेव्हा मी हे सांगू शकत नाही की तुम्ही साधना का करावी. ते तुम्हांला आपले आपणच शोधून काढायचे आहे. परंतु अनेक गोष्टींमागील एकता जर आपण बघायची झाली तर आपण असे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे आपण साधना आपले इहलोकातील व परलोकातील आयुष्य सुखात जावे म्हणूनच करतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असेल पण ही गोष्ट सगळ्यांना समान आहे की सुखात आपण आनंदी असतो व असे सतत आनंदी राहण्याकरीताच साधनेचा वापर आपण करतो.

ह्या पार्श्वभूमीवर साधना का करावी याचे एक कारण आपण देऊ शकतो ते म्हणजे: साधना जर केली नाही तर जे सुख आपल्याला मिळेल त्यापेक्षा अधिक सुख साधना करुन मिळणार आहे म्हणून आपण साधना करावी.

अर्थात आपले हे कारण आपल्याला पूर्णपणे पटले पाहीजे. जर ते पटले नाही तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. म्हणून, आपली जी काही स्वतःची सुखाची व्याख्या आहे, त्यानुसार विचार करुन आपण हे बघितले पाहिजे की व्यवहारात, संसारात, आटापिटा करुन आपल्याला जे सुख मिळायची अपेक्षा आहे ते सुख साधना केल्यावर मिळणाऱ्या सुखाच्या तुलनेत जास्त आहे की कमी आहे? जर ते कमी आहे असे तुम्हांला वाटले तर तुमच्या हातून व्हायला हवी तेवढी साधना होणार नाही. याउलट तुमची अशी खात्री झाली की साधनेने मिळणारे सुख हे संसारातील परमोच्च सुखापेक्षाही अधिक आहे, तर तुम्ही नाही म्हटले तरी तुमचे मन तुम्हांला साधना केल्याशिवाय राहू देणार नाही!

काही जण असे म्हणतील की आमची सुखाची कल्पना स्वतःचे घर असावे, गाडी असावी अशी आहे. भरपूर पैसा असावा अशी आहे. काही म्हणतील की आम्हांला आमच्या बायको-मुलांबरोबर जगण्यातच सुख लाभते. गुरुंनी सांगितलेल्या साधनेने हे सुख मिळेल असे काही आम्हांला वाटत नाही. अशा सुखाकरीता साधना केल्यापेक्षा साधनेचा वेळ आम्ही आमचा व्यवहार नीट करण्यात घालविला तरच आमचे सुख आम्हांला मिळेल हे स्पष्ट आहे. मग आम्ही असे कसे म्हणू की साधना अधिक सुख देईल? असे असूनसुध्दा गुरुंवरच्या श्रध्देने आम्ही साधना करतोच. पण आमचा व्यवहार सांभाळून मग करतो. जेव्हा साधना आणि आमचा व्यवहार परस्पर विरोधी होत नाहीत तोपर्यंत आमची साधना चांगली असते. पण या दोघांमध्ये एकच गोष्ट करायला आम्हांला वेळ असतो तेव्हा आम्ही साहजिकच व्यवहाराला प्राधान्य देतो. यात आमचे काय चुकते?

हा मुद्दा अगदी बरोबर आहे. खरे म्हणजे तुम्ही स्वतः असा विचार जरी केला नाही तरी तुमच्या आजूबाजूचे, स्वतःला तुमचे साथीदार म्हणविणारे लोक तुम्हाला हेच सांगत असतील. ह्या मुद्याचा नीट विचार केला नाही तर आपण साधना नीट न होण्याचे खऱ्या कारणाकडे दुर्लक्ष केले असे होईल. म्हणून विनासंकोच आपण ह्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे.

असा विचार करा की सुखाची कल्पना काही गोष्टी मिळविणे उदाहरणार्थ, `घर, गाडी, पैसा असावा’ किंवा `काही ठराविक व्यक्‍तींबरोबर सतत असावे’ ही आपण कुठल्या आधारावर ठेवली? सुख म्हणजे काय हे ठरवायला हेच पर्याय आहेत असे काही नाही. उदाहरणार्थ, माझ्या देशाचे भले व्हावे, दहा जणांनी मला मान द्यावा असे सुध्दा आपण सुखाच्या कल्पनेत सामावू शकलो असतो. हे व इतर अनेक पर्याय आपल्याकडे असताना आपण काही ठराविक गोष्टींचीच निवड का केली? ह्याचे उत्तर असे आहे की ह्या कल्पना आपल्याला आवडल्या म्हणून. काही गोष्टी बघितल्या क्षणीच आपल्या मनात बसतात तर काहींबद्दल तेवढा आत्मीयतेचा भाव येत नाही. ज्या गोष्टी असव्यात असे आपल्याला मनापासून वाटते त्यांचाच आपण सुखाच्या कल्पनेत अंतर्भाव करतो. म्हणजे आपल्या मनाचे समाधान हे एकच सुखाचे खरे कारण आहे व ते सर्वांना लागू पडते. ते समाधान कुठल्या गोष्टींनी होईल हे प्रत्येक माणसावर अवलंबून असल्याने सुखाची कल्पना प्रत्येक माणसाची वेगळी दिसते. याचाच अर्थ असा की आपण व्यवहारातील सर्व प्रयत्‍न अशाकरीता करतो की ज्यायोगे आपल्या मनाला शांती, समाधान प्राप्त होईल. घर असावे, पैस असावा ह्या गोष्टींमधून आपल्याला काय हवे आहे तर मनाचे समाधान. पण आपली ही समजूत कितपत योग्य आहे? पैसे मिळाल्यावर समाधान लाभले अशी एकतरी व्यक्‍ती तुमच्या आयुष्यात आहे का? घर बांधल्यावर आता दुसरे काही नको, मनाची अत्यंत शांत परिस्थिती प्राप्त झाली आहे असे म्हणणारा एक तरी मनुष्य तुम्हाला माहीती आहे का? उलट त्या वस्तूंना प्राप्त केल्यावर दुसरी भूक मनात निर्माण झालेली आपण सतत बघत आहोत. बिल गेट्‌स सारखा जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य देखील अजून पैसे हवेत म्हणून अथक प्रयत्‍न करतोच आहे. भारतासारख्या दूर देशात येऊन आपले प्रॉडक्‍ट विकायचा त्याचा प्रयत्‍न दुसरे काय दर्शवितो? संसारातील प्रत्येक गोष्टीबद्दल आपण असे पाहू शकतो. उदाहरणार्थ, ज्याला जगात मान आहे अशा मनुष्याचे आत्मचरीत्र वाचल्यावर हे लक्षात येते की मान-सन्मानामुळे ह्या गृहस्थाला मानसिक सुख, समाधान मिळालेले दिसत नाही. अगदी सामान्य माणसांसारखेच त्याच्या आयुष्यातही दुःख आहेच. मग कुठल्या आधारावर आपण असे ठरविले की संसारातील काही वस्तू मिळण्यामध्ये सुख लाभेल. खरोखर, जी माणसे ` तुमचा परमेश्वर केवळ मानण्यामध्ये आहे. तो प्रत्यक्ष दिसत नाही’ असे म्हणतात त्यांना हे कळत नाही की ते स्वतः ज्या सुखाकरीता धडपडत आहेत, जे सुख त्यांनी जगातील काही गोष्टींच्या प्राप्तीमध्ये मानले आहे ते सुखसुध्दा मानण्यामध्येच आहे. त्याला प्रत्यक्ष अस्तित्व नाही! तेव्हा असा विचार करुन आपण हे पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे की सध्याची आपली सुखाची दृष्य कल्पना काहीही असो, त्यामागील अदृष्य सत्य हेच आहे की आपले सुख हे आपल्या मनाच्या शांतीमध्ये असते. ज्याक्षणी आपले मन शांत होते, स्तब्ध होते व अजून काही हवे अशी मागणी करीत नाही त्याक्षणीच आपल्याला सुखाची जाणीव होते. त्या मनाच्या दृष्य मागण्या पुरवुन आपण ते शांत करायचा प्रयत्‍न करीत आहोत म्हणून सध्याची आपली सुखाची कल्पना काही गोष्टींच्या मिळवण्यामध्ये आहे. परंतु बाह्य जग हे आपल्या मनापासून एक वेगळ्याच स्तरावर आहे. बाह्य जगातील कुठलीही गोष्ट आपल्या मनाला स्पर्श करु शकत नाही. मग त्या स्तरावर कीतीही प्रयत्‍न केले तरी मनाचे संपूर्ण समाधान कसे होईल?

जर खरे सुख हे मनाच्या पातळीवर असेल, तर ते प्राप्त करायचे प्रयत्‍न त्याच पातळीवर केले पाहिजेत. नाहीतर आपले प्रयत्‍न हे योग्य ठिकाणी पोहोचणार नाहीत. जगातील गोष्टींच्या प्राप्तीमध्ये मानसिक सुख पहाणे हे बंगलोरमध्ये पाणी ओतून रत्‍नागिरीतील हापूस आंब्याच्या झाडाकडून फळाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आपले प्रयत्‍न हे मनाच्या पातळीवरच झाले पाहीजेत. मनाच्या पातळीवरील खरे प्रयत्‍न म्हणजेच आपली साधना. म्हणजे साधना न केल्याने जे प्रयत्‍न करुन आपण सुख शोधत असतो, तेच सुख मिळण्याकरीता जवळचा मार्ग म्हणजे साधनाच होय. हा विचार ज्यांच्या मनात स्थिर झाला आहे, त्यांना साधना सतत चालू ठेवायचे धैर्य आपोआप प्राप्त होईल.

साधना आपण का करीत नाही? तर आपल्या मते साधनेमुळे जे मिळणार आहे त्याला दुसरे पर्याय असतात म्हणून. हे दुसरे पर्याय म्हणजे व्यवहारातील गोष्टींची प्राप्ती. परंतु वरील विचारांमुळे हे स्पष्ट होईल की बाकीचे पर्याय हे सशाच्या शिंगासारखे कल्पित आहेत. त्यांना सत्यत्व नाही. मग हे दुसरे पर्याय आपोआप नाहीसे होतील व आपली नैसर्गिक सुखाचा शोध घेणारी प्रवृत्ति आपल्याला साधना करायला भाग पाडील. मग आयुष्यातील आवडीच्या गोष्टी (म्हणजे आपले स्वतःचे भीष्म व द्रोणाचार्य) समोर आल्या तरी त्या संसारात अडकवू शकणार नाहीत, साधनेपासून वंचित करु शकणार नाहीत. आपल्या ह्रुदयातील सद्‌गुरुचे बोलणे (म्हणजे श्रीकृष्णांचे बोलणे) आपल्याला सतत साथ देत राहील.

ज्याप्रमाणे तानाजीने पळून जायचे दोर कापल्यावर सैनिकांना युध्द केल्याशिवाय दुसरा पर्याय राहीला नाही त्याप्रमाणे जगताना साधना न करण्याचा पर्याय आपल्याकरीता राहणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातून जी साधना होईल ती इतकी जीवापाड असेल की आपले यश हे ठरलेलेच आहे. तानाजींच्या सैनिकांनी ज्याप्रमाणे सिंहगड मिळविला, ज्याप्रमाणे अर्जुनाने हस्तिनापुरचे राज्य प्राप्त केले, त्याचप्रमाणे परमेश्वराची, म्हणजे आपल्या मनात सतत असलेल्या सुख-शांतीची, आपल्याला प्राप्ती होईल. हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला संदेश आहे. आपण त्याप्रमाणे वागायचा निर्धार करुन जगायला सुरुवात केली तर साध्य हाताशीच ठेवले आहे!!

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १० फेब्रुवारी २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: