Shloka 65/2: Keeping Our Mind Calm

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।

प्रसन्नचेतसो ह्याशु बुध्दिः पर्यवतिष्ठते ॥६५ : २॥

 

गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या मनाची अवस्था अगदी दोलायमान होती. त्याला कुठली गोष्ट करणे योग्य आहे याचे ज्ञान हवे होते व ते ज्ञान त्याच्या मनावर नीट ठसवायला भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली. वरील श्लोक ब्रह्मानंदात सतत राहणाऱ्या योग्याचे, मन शांत व स्थिर असलेल्या महान पुरुषाचे, वर्णन करीताना भगवान श्रीकृष्णांनी उच्चारला आहे. या पासष्टाव्या श्लोकावर निरुपण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात:

 

देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।

तेथ रिगणे नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८:२ ॥

 

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।

तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९:२ ॥

 

तैसें ह्रुदय प्रसन्न होये । तरी दुःख कैंचे कें आहे ।

तेथ आपैसी बुध्दी राहे । परमात्मरुपीं ॥३४०:२॥

 

जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।

तैसा स्थिरबुध्दि स्वस्वरुपु । योगयुक्‍तु ॥ ३४१:२ ॥

 

ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या ओव्यांचा शाब्दीक अर्थ स्पष्टच आहे. ते म्हणत आहेत: `ज्या मनुष्याचे चित्त प्रसन्न असते त्याला दुःख कसे होईल? ज्याच्या पोटातच अमृताचा झरा आहे त्याला तहान-भूक लागते का? ज्याचे ह्रुदय आनंदीत आहे त्याचे मन आपोआपच भगवंतावर स्थिर होते, जशी कोनाड्यात ठेवलेल्या दिव्याची ज्योत न हलता स्थिरपणे तेवत असते तशीच ही अवस्था आहे.’ शाब्दीक अर्थ सरळ असला तरी त्यावर अधिक विचार करुन आपल्या साधनेत त्यांचा कसा उपयोग करुन घ्यायचा हे पहायचा प्रयत्‍न आपण आता करुया.

 

आपल्या मनाची सतत असलेली दोलायमान अवस्था

 

वरील ओव्यांतून वर्णन केलेल्या मनाच्या सतत प्रसन्न अवस्थेबद्दल आपल्याला लगेच आत्मीयता वाटते. याचे कारण असे की जी गोष्ट आपल्याकडे नसते त्याबद्दलचे आकर्षण आपोआप निर्माण होते आणि सध्या आपले मन अशा स्थितीपासून खूप दूर आहे. आपले मन इतके चंचल आहे की ते काही करुन स्वस्थ ठेवण्याकरीताच आपली बरीचशी शक्‍ति खर्च होत असते, ते सतत प्रसन्न राहण्याची गोष्ट तर आपल्या कल्पनेच्या बाहेरचीच आहे. परंतु सध्या जरी मनाची शांत अवस्था अप्राप्य वाटली तरी आपण हे लक्षात घेतले पाहीजे की जोपर्यंत आपले मन प्रसन्न नाही तो पर्यंत आपल्याला दुःखाची जाणीव राहणारच. म्हणून दुःख नको असेल तर सतत प्रसन्न राहणे आवश्यक आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्याकरीता आपण स्वयंपाकखोलीत ठेवलेल्या भांड्याचे उदाहरण देऊ शकतो. आपण बघतोच की एखादे भांडे स्वच्छ करुन जर तसेच रीकामे उघड्या फडताळात ठेवले तर काही काळाने त्यामध्ये धूळ जाऊन ते घाण होतेच. मग पुढच्या वेळी वापरताना त्याला परत विसळून घेणे आवश्यक होते. ते सतत स्वच्छ ठेवण्याकरीता एकतर फडताळाचे दार बंद करुन त्यात ठेवले पाहीजे किंवा भांड्यात पाणी भरून ठेवले पाहीजे. त्याचप्रमाणे आपल्या मनाला दुःखविरहीत ठेवण्याकरीता एकतर त्याला बाहेरच्या जगापासून अलिप्त ठेवले पाहीजे (जसे काही भांड्यावर झाकण घातले आहे) किंवा त्यात प्रसन्नता भरुन ठेवली पाहीजे. आता जगातील गोष्टीपासून मनाला अलिप्त ठेवायला आपल्याला सतत समाधीतच रहायला हवे. ते आपल्याला शक्य नाही. म्हणून ते सतत प्रसन्न कसे रहावे याचा अभ्यास करणेच आपल्यासारख्या साधकांना योग्य आहे. तेव्हा सध्या कठीण वाटले तरी आपले मन प्रसन्न कसे ठेवावे हे आपल्याला शोधणे भाग आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात (गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण परमहंस, भाग १, पान २४८) `कोणत्याही मार्गाने गेलात तरी परमेश्वराची प्राप्ती मन शांत झाल्याशिवाय होत नाही.’ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अठराव्या अध्यायात साधकाची टप्या-टप्यानी प्रगती कशी होते हे सांगताना लिहिले आहे की `मनाची शांति मिळाल्यावरच खरे ज्ञान होऊ शकते.’ खरोखर, परमेश्वरप्राप्तीच्या मार्गात आपले मन शांत होणे व तसेच सतत राहणे हा एक महत्वाचा टप्पा आहे.

मन शांत, प्रसन्न ठेवण्याकरीता एक मार्ग म्हणजे आधी ते का अशांत आहे, दुःखी आहे याचा शोध आपण घेणे. जर जन्मापासूनच आपण अशांत असलो तर मन शांत करणे खूपच अवघड होईल. याउलट असे लक्षात आले की आपल्या जीवनात कधीतरी मन शांत होते व नंतर त्याची नीट काळजी न घेतल्याने ते आता अशांत झाले आहे तर आपले काम सोपे होईल. मग आपण ते शांत कधी होते याचा विचार करु व नंतर का अशांत झाले याचा शोध घेऊ व परिस्थिती परत आधीसारखी करायचा प्रयत्‍न करु. असा विचार करुन गतआयुष्याचा आढावा घेतल्यास असे ध्यानात येईल की आपल्या लहानपणी आपण सर्वांत जास्त सुखी होतो. सुख हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असल्याने लहानपणी आपले मन जास्तीत जास्त शांत होते असे आपण मानायला हवे.

खरे म्हणजे लहानपणी आपल्यावर सध्यापेक्षा अधिक बंधने होती, पण तरी असे वाटते की तेव्हा आपण सुखी होतो. केवळ आपण नव्हे तर जगातील बरीचशी माणसे असे म्हणतील की लहानपणी ते जास्त सुखी होते. प्रत्येक गोष्ट करायला आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागायची हे जरी आठवले तरी तेव्हाच जास्त सुखी होतो असेच सर्व म्हणतात. तेव्हाच्या सुखाचे कारण शोधायचा प्रयत्‍न केल्यास असे दिसून येईल की तेव्हा प्रत्येक गोष्टीवर स्वतः निर्णय घेण्याचे बंधन आपल्याला नव्हते व म्हणून एक प्रकारची शांतता आपल्या आयुष्यात होती. बाबांनी परवानगी दिली की मग ती गोष्ट बरोबर आहे की चूक याचा सतत विचार करायची आवश्यकता नव्हती व म्हणून आपले सर्व लक्ष केवळ ती गोष्ट करण्याकडे असायचे. याचा अर्थ असा की आपले तेव्हाचे सुख सतत आपल्या मनासारखे घडण्यामध्ये नव्हते. जरा विचार करा की लहानपणी कितीवेळा आपल्या मनासारखे घडायचे? तुमच्या लक्षात येईल की फार कमीवेळा आपल्या मनासारखे झाले होते. कुठलेही खेळणे हातात येण्याआधी आपल्या मनाविरुध्द असलेल्या कित्येक गोष्टी पालक आपल्याकडून करुन घ्यायचे (तुझी खोली साफ कर, शाळेचा अभ्यास संपव, संध्याकाळी लहान बहीणीकडे बघ इत्यादि!!) तेव्हाकुठे मनासारखी एखादी गोष्ट मिळायची. अगदी एखाद्या चॉकलेटची क्षुल्लक इच्छासुध्दा आपल्या पालकांच्या मर्जीशिवाय पुरी होणे शक्य नव्हते. आपली एकप्रकारची असहाय्य अवस्था लहानपणी सतत होती. परंतु आत्ता (व लहानपणीसुध्दा) आपली सुखाची व्याख्या आपल्या मनासारखे सतत घडणे ही आहे. आपले मन अस्वस्थ व्हायला एकच कारण आहे, ते म्हणजे मनासारखे न घडणे.

याचा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष लहान असताना कधी एकदा आपण मोठे होतो आणि आपल्या मनासारखे वागू शकतो याचा सतत ध्यास आपल्याला असायचा हे आठवेल. केवळ आपल्यालाच नव्हे तर आजसुध्दा प्रत्येक लहान मुलाचे एकमेव ध्येय म्हणजे लवकरात लवकर मोठे होणे हेच असते!! म्हणजे आज जरी आपले लहानपण आनंदीत होते असे वाटले तरी प्रत्यक्ष लहान असताना आपल्या सुखीपणाची जाणीव आपल्याला नव्हतीच. परंतु आज ती लहानपणची केविलवाणी अवस्था आठविली तरी त्याबद्दल एवढे वाईट वाटत नाही व असे वाटते की `लहानपण देगा देवा!’. हे असे का? याचे कारण असे की आपल्या मनाला त्यावेळच्या चांगल्या गोष्टींचे महत्व जास्त वाटते. तेव्हा आपल्या मते अत्यंत वाईट वाटलेल्या (म्हणजे मनाविरुध्द झालेल्या) गोष्टींचे खरे क्षुल्लक रुप आज आपण बघू शकतो.

असा विचार केल्यावर वाटते की `अरे, आज जरी तणावाखाली आहोत असे वाटत असले तरी कदाचित उद्या आपल्याला आजच्या जीवनात किती सुखी होतो असे वाटायची शक्यता आहे!’ तुम्ही बघाल की तुमच्या कॉलेजच्या जीवनाबद्दल तुम्हाला कीती ओढ आहे. प्रत्यक्ष ते जीवन जगताना आयुष्य आजच्या सारखेच तणावाखाली होते व संपूर्ण सुख असे नव्हतेच. परंतु आज त्याबद्दल विचार करताना फक्‍त नाक्यावर मजेत घालविलेल्या अनेक संध्याकाळी आठवितात व असे वाटते की ते दिवस परत परत जगावेत! तेव्हा अशी खूपच शक्यता आहे की आजच्या दिवसांकडे तुम्ही उद्या खूप प्रेमाने बघाल व म्हणाल की `बरे झाले असते जर हेच दिवस सतत राहीले असते.’

पण उद्या कदाचित चांगले वाटेल म्हणून आजचा ताण नाहीसा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवाय वरील विचारांनी हे सिध्द होते की ताणविरहीत अवस्था आत्तापर्यंत आपण केव्हाही वर्तमानकाळात फार उपभोगीली नाही. कारण ज्या काळी आपण सुखी होतो असे आज वाटते तेव्हाचे जीवन जगताना सुखीपणाची जाणीव नसल्याने तेव्हा सुध्दा जीवन आजच्यापेक्षा फार वेगळे नव्हते. अशा रीतीने वर्तमानकाळात सतत कुठल्या ना कुठल्या ताणाखाली जगल्याने आपले मन एवढे नाजूक होते की अगदी छोट्याशा प्रसंगाने ते विचलीत होऊ शकते. एखादी ताणलेली स्प्रिंग छोट्या स्पर्शाने कंप पावून खूपवेळ हलत राहते तसे आपले मन सतत दोलायमान असते.

जी गोष्ट आपल्याकडे नसते त्याचे अत्यंत नैसर्गिक आकर्षण मनाला असते. आपले मन जेवढे तणावाखाली असेल तेवढी आपल्याला शांत स्वभावाची ओढ लागते. ती मानसिक शांतता आपल्याला प्राप्त करणे शक्य आहे का? असे विचार यायला लागतात. कुणाच्या पाऊलांवर पाऊल टाकून चालले तर आपले मन सतत सुखी राहील असा विचार आपण करु लागतो. अशा वेळी कर्मधर्मसंयोगाने जर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेल्या गीतेशी आपली ओळख झाली तर वरील श्लोकाचे एक नैसर्गिक आकर्षण आपल्याला वाटते. ह्या श्लोकातील अवस्था आपल्या जीवनात येऊ शकेल काय असा विचार (अगदी अर्जुनाप्रमाणेच!) आपण करु लागतो व साधनेच्या मार्गावर यायला उद्युक्‍त होतो.

जेव्हा साधनेच्या मार्गावर चालायचा प्रयत्‍न आपण करायला लागतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपली अवस्था वरीलप्रमाणे असते. अशावेळी कुठल्यातरी भौतिक गोष्टीची कमतरतेमुळे मनाची अशांतता आली आहे असे जर आपल्याला वाटले तर त्या गोष्टीची प्राप्तीकरीता गुरुंचा सल्ला आपण मागतो (माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळेल का?, मला प्रमोशन मिळेल का, माझे शारीरीक दुखणे कमी होईल का? इत्यादी). परंतु काही भाग्यवान लोकांना सुरुवातीपासूनच ही जाणीव असते की भौतिक गोष्टींमध्ये शांतता नसून तीचे अस्तित्व स्वतंत्र आहे. त्यांचा गुरुंकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो व त्यांची साधना वेगळी असते. आपण सर्वांनी त्या मार्गावर चालणेच योग्य आहे. तो मार्ग कुठला ते आता आपण बघू.

 

मन शांत कसे होईल?

 

आपली लहानपणीची आनंदी स्थिती परत कशी प्राप्त होईल? मुख्य म्हणजे आनंदी असताना आपल्या आनंदाची जाणीव पुढे कधीतरी न होता वर्तमानकाळातच कशी राहील?

जरा विचार केल्यावर असे आढळून येईल की आपल्या कर्मांची जबाबदारी दुसऱ्यावर सोपविली की आपली त्या कामाबद्दलची मालकीपणाची जाणीव कमी होते. आपण बघितले असेल की स्वतःचे घर हलविताना जुने सामान काढायला घेतले की त्यातील प्रत्येक गोष्टीकडे बघून आपण जुन्या आठवणींत हरवून जातो व त्या टाकून देण्याऐवजी परत तशाच दुसऱ्या घरात नेतो. परंतु हेच काम दुसऱ्यावर सोपविले तर तो त्यातील बऱ्याच गोष्ट आता उपयोगी नाही असा विचार करुन टाकून देतो व नव्या घरात फार थोडे निरुपयोगी सामान जाते. अगदी ह्यासारखेच केलेल्या कर्मावर आपलेपणाचा शिक्का बसला तरच आपण त्याच्या फळाबद्दल अपेक्षा ठेवतो. एखाद्या दुसऱ्या माणसाने कितीही मोठे काम केले तरी त्यात आपल्याला फारशी आत्मीयता नसते. मग त्या कर्माच्या फळाबद्दल विचार करण्यात आपला वेळ आपण वाया घालवित नाही. हीच गोष्ट आपल्या लहानपणीच्या आनंदाच्या मागे दिसते. एकदा बाबांनी परवानगी दिली, की मग परत ती गोष्ट करणे योग्य आहे का असा विचार करण्यात तेव्हा वेळ वाया न घालविता ती गोष्ट करण्यात आपले संपूर्ण लक्ष असते. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट करताना आईने अडविले नाही तर ती करणे बरोबर आहे असे मानून निश्चिंतपणाने आपण करतो. मोठेपणी आपण केलेल्या कर्मांची जबाबदारी देण्यासारखी व्यक्‍ती आपल्याजवळ नसल्याने आपल्याला सर्व कर्मांच्या योग्यतेबद्दल स्वतःच निर्णय घेणे भाग पडते. ज्या ज्या वेळी केलेली कर्मे बरोबर आणि चूक यांच्या सीमारेषेवर असतात त्या त्या वेळी आपले मन संभ्रमात पडते व त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. हा मानसिक ताणच दोलायमान अवस्थेचे मूळ असल्याने मन मग सतत चंचल राहते.

याचा अर्थ असा की व्यवहारात वागताना सतत येणारा मानसिक ताण जर आपल्याला कमी करायचा असेल तर एक मार्ग म्हणजे आपली सर्व कर्मे दुसऱ्या माणसाची जबाबदारी आहे असे समजून करणे होय. अर्थात हे केव्हा करता येईल तर जोपर्यंत आपण केलेल्या कर्माची जबाबदारी समाज आपल्यावर लादत नाही तोपर्यंतच. सैन्यातल्या शिपायाला का गोळी चालविलीस असे कोणी विचारत नाही. त्याच्या ऑफिसरला त्याबद्दल जबाबदार ठरविण्यात येते हे आपण बघतोच. परंतु जर आपण त्या अधिकाराच्या पदावर असलो तर जबाबदारीतून सुटका करुन घेता येत नाही. अशावेळी काय करावे? शिवाय त्या शिपायालासुध्दा स्वतःच्या जीवनात बायकोशी कसे वागायचे हे स्वतःच ठरवायचे असते. म्हणजे गोळीबारीच्या जबाबदारीतून तो सुटला तरी दुसरी एखादी जबाबदारी त्याच्या अंगावर येतेच. संसारात अशी एकही व्यक्‍ती आपल्याला आढळत नाही की आपल्या सर्व कामांची जबाबदारी त्यावर सोपवून आपण निश्चिंत रहावे. कोण अशी जबाबदारी घ्यायला तयार होईल हो? वाल्याच्या कुटुंबातली माणसे त्याच्या वाटमारीची जबाबदारी अंगावर घ्यायला तयार झाली का? त्याच्या कर्माचे फळ उपभोगूनसुध्दा ते म्हणाले की तू कसे पैसे कमावलेस ह्याच्याशी आमचा संबंध काय? आम्हांला फक्‍त मिळविलेल्या पैशाशीच कर्तव्य आहे. दुसऱ्या कशाशी नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील माणसांनासुध्दा आपल्या कर्मांमध्ये स्वारस्य नसते तर त्या कर्मातून उत्पन्न झालेल्या फळाबद्दल असते. ते फळ त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आले तर त्यांना चालत नाही. हे आपल्याला पूर्ण ठाउक असल्याने आपले प्रयत्‍न अजून जास्त होतात व त्यातून अजून ताण निर्माण होतो.

परंतु ह्या अवस्थेतून सुटण्याचा उपाय आहे. तो म्हणजे आपल्याजवळ सतत असलेले असे अस्तित्व शोधून काढणे की ज्याला आपण आपली कर्मे विनासंकोच अर्पण करु शकतो. ते अस्तित्व म्हणजेच आपल्या ह्रुदयी स्थित असलेले सद्‌गुरु होय. हे सद्‌गुरु ओळखायचे कसे? तर जीवनात एखाद्या कठीण प्रसंगी जे अंतःस्फुरण आपल्याला झालेले असते ते ह्या सद्‌गुरुंचे `दृष्य’ रुप होय. एरवी हे आपल्या जिवंत असण्याच्या भावनेत सुप्तस्थितीत असतात व घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे निर्विकारपणे बघत असतात. जेव्हा आपल्याला त्यांची खरी जरुरी भासते तेव्हा त्यांच्या करुणामय स्वभावामुळे ते अंतःस्फुर्तीच्या रुपात प्रगट होऊन आपल्या मनाला योग्य दिशा दाखवितात. आपल्या कर्मांची सर्व जबाबदारी सद्‌गुरुंना देणे म्हणजे काय? तर आपल्या सर्व कर्मांबाबत `मला तेव्हा तसे वाटले म्हणून केले. त्यात चुक झाली असेल तर पुढच्या वेळी दुरुस्त करायचा प्रयत्‍न करीन.’ असे नि:संकोच कबूल करणे होय. कुठलीही गोष्ट आपल्या ‘instinct’ किंवा ‘gut feeling’ मुळे आपण केली आहे असे खुशाल जाहीर करा व आपल्या जबाबदारीतून मुक्‍त व्हा.

परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या कर्मांना इष्ट फळ प्राप्त होते तेव्हासुध्दा तुम्हांला केलेल्या कर्मांचा कर्तेपणा सद्‌गुरुंनाच दिला पाहिजे. नाहीतर फळ मिळाले नाही तर ते कर्म सद्‌गुरुंचे व मिळाले तर आपले असे अप्रामाणिक जीवन तुम्ही जगाल व त्यात सुख शोधून सापडणार नाही. अशा असत्याच्या पायावर सुख, शांति तर मिळणारच नाही, उलट आपली अवस्था खालील गोष्टीतील ब्राह्मणासारखी होईल.

एका गावात एक ब्राह्मण रहात असे. त्याने घराभोवती अतिशय कष्ट घेऊन बाग तयार केली होती व तीच्या सौंदर्याचा खूप अभिमान त्याला असे. एकदा एक वृध्द, आजारी व भूकेने बेजार झालेली गाय त्याच्या घरासमोरुन जात होती. ही सुंदर बाग बघून व त्यात असलेल्या सतेज हिरवळीचा मोह होऊन ती आत घुसली व ते गवत खाऊ लागली. घरातून ब्राह्मणाने हे बघितले. अत्यंत राग येऊन तो बाहेर आला व एक मोठी काठी घेऊन त्याने त्या गायीला जोरदार तडाखा दिला. आधीच गलितगात्र असलेल्या गायीच्या मर्मावरच तो आघात झाला व त्याचक्षणी तीने प्राण सोडला. ह्या घटनेबरोबर लगेच गोहत्येचे पाप ब्राह्मणासमोर आले व त्याच्या शरीरात घुसू लागले. त्याबरोबर तो म्हणाला की `थांब, माझ्या उजव्या हाताचा स्वामी इंद्र आहे. उजव्या हाताने मी प्रहार केला, म्हणजे ते पाप इंद्राचे आहे. तू त्याच्याकडे जा.’ हे ऐकून पाप इंद्रासमोर जाऊन उभे राहीले आणि सर्व घटना कथन करुन त्याच्या शरीरात घुसु लागले. तेव्हा इंद्र म्हणाला `थांब, मी आत्ताच त्या ब्राह्मणाकडे जातो व ह्या गोष्टीचा निकाल लावतो.’ इंद्राने लगेच एका वृध्द ब्राह्मणाचा देह धारण केला व वरील ब्राह्मणाकडे येऊन त्याच्या बागेची स्तुती करु लागला. ब्राह्मणाने खुश होऊन त्याला प्रत्येक झाडाची ओळख करुन दिली व त्या प्रत्येक झाडाच्या रुजण्याकरीता किती कष्ट त्याने घेतले हे सांगायला सुरुवात केली. होता होता ते दोघे गाय मरुन पडली होती त्या ठीकाणी आले. ते पाहून ब्राह्मणरुपी इंद्राने विचारले की हे वाईट कर्म कुणी केले? आत्तापर्यंत स्वतःच्या प्रयत्‍नाचे कौतुक करणाऱ्या ब्राह्मणाला काहीच सांगता आले नाही! लगेच इंद्राने आपले खरे रुप दाखविले व म्हणाला ` ही सर्व बाग तू तुझ्या कष्टाने केलीस असे म्हणतोस मग ही गाय तेवढी मी मारली असे कसे तू म्हणू शकतोस? हे तुझे पाप तू तुझ्याकडेच ठेव!’

तेव्हा जबाबदारीच्या ताणापासून पूर्ण सुटका हवी असेल तर केलेल्या सर्व गोष्टीचे कर्तुत्व आपण सद्‌गुरुंना दिले पाहीजे. आपल्या सोयीप्रमाणे, केवळ न आवडणाऱ्या गोष्टींचे कर्तुत्व त्यांच्या माथ्यावर ठेवून खरे सुख कधीच लाभणार नाही. `सद्‌गुरुंना कर्मांचे श्रेय देणे’ ह्या वरवर सोप्या वाटणाऱ्या मार्गावरील एकच कठीण गोष्ट आहे. ती म्हणजे एखादी गोष्ट मनासारखी झाली व त्याबद्दल सर्व जगाने आपले कौतुक केले तरी त्या प्रशंसेमध्ये वाहून न जाता ती गोष्ट माझ्या ह्रुदयातील सद्‌गुरुंनीच केली असे स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करणे व तसे सर्वांना सांगणे. ज्याकुणां भाग्यवंतांकडे लोकांनी केलेल्या स्तुतीकडे लक्ष न देण्याचे धैर्य आहे त्यांनी हा मार्ग जरुर चोखाळावा. मानसिक शांती प्राप्त करण्याचा अगदी जवळचा मार्ग म्हणजे आपले सर्व कर्तुत्व (व अकर्तुत्व!) सद्‌गुरुंच्या चरणीं दान करणे हा होय. जेवढे तुमच्या मनातील `मी काही केले आहे’ किंवा `मला हे करायलाच हवे’ असे भाव कमी आहेत तेवढी तुमच्या मनात शांति भरलेली आहे. आपल्या लहानपणी असलेल्या सुखाचे मूळ कारण स्वतःच्या वागण्याबद्दल कुठल्याही नसलेल्या अपेक्षेमध्ये आहे व ते सध्याच्या जीवनातसुध्दा आपण लागू करु शकतो.

नीट विचार करा. वर सांगितलेली गोष्ट परत परत पडताळून घ्या. आपल्या मनाची ही सवय आहे की एकदा गोष्ट पूर्ण पटली की ती करायला ते सतत तयार असते, त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल जरा तरी शंका असली तर ती गोष्ट करायला ते टाळाटाळ करते. ज्याप्रमाणे सुईच्या भोकातून घालायच्या दोरातील एखादा बारीक धागा जरी बाहेर राहीला तरी तो दोरा पूर्णपणे आत जात नाही, त्याचप्रमाणे मनात एखाद्या गोष्टीबद्दलच्या सत्यतेबद्दल थोडी जरी शंका असली तर ती गोष्ट पूर्णपणे आपल्या हातून घडत नाही. तेव्हा संपूर्ण विचार करुन वर सांगितलेल्या गोष्टींची सत्यता आपल्या जीवनात पडताळून घ्या व मगच पुढे जा.

 

जगाकडे बघायचा एक दृष्टीकोन

 

आत्तापर्यंत आपण बघितले की

१. साधना सुरु करण्याआधीच्या आयुष्यात सुखीपणाची जाणीव स्वतःच्या भूतकाळातील अस्तित्वाबद्दल जास्त होती, वर्तमानकाळात एवढी नव्हती.

आणि

२. सध्याच्या जीवनात सुख शोधायला एक जवळचा मार्ग म्हणजे केलेल्या सर्व कर्मांची जबाबदारी आपल्या सद्‌गुरुंकडे सोपविणे हा होय.

आता हा मार्ग आयुष्यामध्ये कसा अंमलात आणावा हे आपण बघू. जर एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने महत्वाची नसेल तर ती गोष्ट करण्याचे श्रेय सहजपणे आपण दुसऱ्याला देऊ शकतो. चार जणांनी मिळून ऑफीसमध्ये एखादे काम पुरे केले आणि त्या कामावर बढती मिळणे किंवा न मिळणे अवलंबून असले तर त्या चारही जणांत माझ्यामुळेच ते काम कसे छान पार पडले हे सांगण्याची चुरस लागते. याउलट त्याच चार जणांनी मिळून सहलीला जाण्याचे ठरविले तर छान सहल झाल्यावर कुणामुळे सहल चांगली झाली याबद्दल त्यांच्यात स्पर्धा होत नाही. याचे कारण असे की सहल छान होण्यातच त्या सर्वांना पुरेसा आनंद मिळाला असतो. त्याचे श्रेय कुणालाही मिळाले तरी तो आनंद कमी होत नाही. याचा अर्थ असा की ही चार माणसे सतत एकमेकांशी स्पर्धा खेळत नसतात. जेव्हा जरुरी असेल तेव्हाच ते दुसऱ्यावर वरचढ होण्याचा प्रयत्‍न करतात. ही गोष्ट आपण सर्व बाबतीत बघू शकतो. आता आपल्या जीवनातील आपल्या सर्व कर्तुत्वाचे श्रेय जर सद्‌गुरुंना द्यायचे असे आपण ठरविले तर आधी जीवनातील घडामोडींना आपण सद्‌गुरुंपेक्षा कमी महत्व दिले पाहीजे.

परमेश्वर, किंवा आपल्या जीवनातील त्याचा अवतार, म्हणजे ह्रुदयातील सद्‌गुरु याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होईल हे आधी आपण बघितले पाहीजे. असे जीवापाड प्रेम करण्याकरीता एक उपाय म्हणजे जीवनाकडे बघायचा खालील दृष्टीकोन होय. ज्या लोकांना खेळांबद्दल आत्मीयता आहे त्यांना हा दृष्टीकोन पटेल असे वाटते.

एखादा खेळाडू जेव्हा त्याच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवितो तेव्हा आपले स्वतःचे प्राविण्य किती आहे हे बघायला तो सतत उत्सुक असतो. उदाहरणार्थ, एखाद्या पहिलवानाला `कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वश्रेष्ठ’ असा किताब मिळाल्यावर तो भारतातील सर्वश्रेष्ठ आहे हे सिध्द करायचा प्रयत्‍न करतो. त्यात यशस्वी झाला तर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेऊन सर्व जगातील श्रेष्ठ पहिलवान आहे हे सिध्द करायचा प्रयत्‍न करतो. बुध्दीबळातील जागतिक किताब मिळविणारा मग अनेक जणांशी एकाचवेळी खेळून हरवायला बघतो. त्यातही त्याला यश आले तर तो डोळे बांधून अनेक जणांविरुध्द एकाचवेळी जिंकायचा प्रयत्‍न करतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या प्राविण्याचे लक्षण म्हणजे परीस्थिती विपरीत असूनही आपण जिंकतो का नाही हे पहायचा प्रयत्‍न सर्व खेळाडूंचा असतो. हाच नियम आपण परमेश्वराला लावून बघू शकतो. जगाकडे बघायचा हा एक नवा दृष्टीकोन असा आहे:

हे सर्व जग, त्यातील सर्व जीव हे परमेश्वराने स्वतःच्या प्राविण्याचे खरे रुप बघण्याकरीता केले आहेत. हा एक खेळ तो खेळत आहे. ह्या खेळाचे नियम असे आहेत: सुरुवातीला आपण सर्व त्याच्यापासून खूप लांब आहोत व आपल्याला त्याच्याशी जाऊन मिळायचे आहे. रग्बी खेळात एक चेंडू मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे न्यायचा असतो, ते करताना प्रतिस्पर्धी त्याला विरोध करतात. त्याचप्रमाणे तो हा खेळ खेळत आहे. खेळाचे मैदान म्हणजे हे आपले जग. आपल्या मनातील सद्‌गुरुंच्या रुपात तो आहे व त्याचे प्रतिस्पर्धी म्हणजे आपल्याला जगात गुंतविणारे विचार. जगातील वस्तूंमध्येच सुख मिळेल असे जेव्हा आपल्याला प्रकर्षाने वाटते तेव्हा आपले प्रतिद्वंदी वरचढ असतात व जेव्हा परमेश्वराशिवाय जगण्यात अर्थ नाही असे जेव्हा वाटते तेव्हा सद्‌गुरु वरचढ असतात! मनुष्याला आपल्याकडे खेचण्यात परमेश्वर एवढा पटाईत आहे की एका माणसाला आपल्याकडे आणण्यात त्याला आता गंमत वाटत नाही. म्हणून हा खेळ तो एकदम सर्व जीवांशी खेळत आहे. (जसे विश्वनाथन आनंद अनेक जणांशी एकदम डाव खेळतो.) त्यातही त्याला आता गंमत वाटत नाही. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुगानंतर त्याच्यात मोक्ष देण्याच्या खेळामध्ये एवढे प्राविण्य आले आहे की कलीयुगात त्याने आपला डाव अजून कठीण केला आहे. या युगातील नवीन मेख म्हणजे खुद्द भगवंताने (म्हणजे उपजत, नैसर्गिक) आपल्याला लावलेली जगाची ओढ! (जसे अनेक जणांशी खेळताना आनंद डोळे बांधायला लागतो). ह्या युगातील माणसे इंद्रियांमार्फत प्राप्त होणाऱ्या सुखाला जेवढे प्राधान्य देतात तेवढे आधीच्या युगात दिसत नाही. आपल्या स्वतःच्या विरुध्द एवढी विपरीत परीस्थिती स्वतःच निर्माण करुन तो आपल्या सर्वांना स्वतःकडे आणत आहे. दृष्य जगाचे खरे रुप असे आहे हे आपण मानू शकतो.

ह्या जगाकडे अशा दृष्टीने बघितल्यास त्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्व कमी होऊ शकते. जरी एखादी वस्तू मिळाली नाही तरी क्रिकेटच्या खेळात एखादा झेल सुटल्यावर जेवढे दुःख होते तेवढेच होईल. आपले जीवन हा एक परमेश्वराने मांडलेला खेळ आहे व याचे उद्दिष्ट परमेश्वर प्राप्ती आहे हा दृष्टीकोन सतत बाळगल्यास केलेल्या सर्व कर्मांचे फळ खऱ्या खेळाडूला म्हणजे सद्‌गुरुंना देण्यास आपले वावगे वाटणार नाही. जीवनातील सर्व यश-अपयशांमध्ये आपण देवाच्या खेळामध्ये किती पुढे आलॊ आहोत हेच पहात राहू व खेळ लवकर संपवून स्वस्थानी जाऊन निश्चिंत राहू. अशा शांत, निश्चिंत रहाण्याचे एक वर्णन म्हणजेच श्री ज्ञानेश्वरांच्या वरील ओव्या होय.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १७ फेब्रुवारी २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: