213/12: God’s Expectation

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आपण नेहमीच्या तीन ओव्या म्हणून सुरुवात करु.

 

सुरुवातीचे नमन

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

आपण का सर्वजण इथे एकत्र येतो याचा आपण सुरुवातीला विचार करु. आपल्याला दर शनिवारी ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकावेसे का वाटते? दर बुधवारी किंवा दररोज साधना कराविशी का वाटते? कुठली शक्‍ती आपल्याला हे सर्व करायला भाग पाडत आहे? सर्वसाधारणपणे आपण असे बघतो की गोष्ट जरुरी आहे असे भासल्याशिवाय आपण करत नाही. जोपर्यंत आपण आपल्या सध्याच्या स्थितीत सुखात असतो तेव्हा दुसरे काही करावेसे आपल्याला वाटतच नाही. याचे एक उदाहरण म्हणून भरदुपारी चारा खाऊन चिखलात बसून शांतपणे रवंथ करणाऱ्या म्हशीकडे बघा. सर्व जग जरी तीला घाण समजत असले तरी ती आपल्या सुखात मग्न असते. तीचे पोट भरलेले असते व अंगावरचा चिखलाचा थर दुपारच्या कडकडीत उन्हाच्या धगीपासून तीला वाचवत असतो. यापुढे काही करण्याची आवश्यकता वाटत नसल्याने ती शांतपणे डबक्यात बसून असते. आपण आपले आयुष्य असेच जगत असतो. जेव्हा आपल्याला काही नवीन करायला कुणीतरी भाग पाडते, मग ती शक्‍ति आपल्या मनातील इच्छा असो, वा समाजाची आपल्याकडून अपेक्षा असो, तेव्हाच आपल्या सध्याच्या स्थितीत बदल करायचा विचार आपण करतो. जेव्हा आपल्या कुठल्यातरी अपेक्षा पुऱ्या होत नाहीत तेव्हा आपण सध्याच्या अस्तित्वाबद्दल नाखूश होऊन ते बदलायचा विचार करु लागतो. म्हणून खऱ्या अर्थाने साधना सुरु करण्यापूर्वी आपल्या सध्याच्या जीवनाबद्दल थोडेतरी अस्वस्थ असणे जरुरी आहे. परमेश्वराच्या जवळ जाण्याकरीता एक कुठलातरी हेतू आपल्या मनात असला पाहीजे. बाकीच्या लोकांना कितीही क्षुल्लक वाटणारा का असेना, पण कुठलातरी बोचणारा प्रश्न मनात ठेवून आपण परमेश्वराच्या जवळ जायचा प्रयत्‍न केला पाहीजे.

अर्जुनाला गीतेचा उपदेश केव्हा झाला? भगवान श्रीकृष्ण त्याचे मार्गदर्शक आयुष्यभर होते, पण त्यांनी गीता केव्हा सांगितली? तर जेव्हा अर्जुनाला स्वतःच्या सध्याच्या आयुष्याबद्दल संभ्रम उत्पन्न होऊन, जी गोष्ट तो आयुष्यभर विचार न करीता करत होता (म्हणजे युध्द लढणे) त्याबद्दलच निराशा उत्पन्न झाली तेव्हा. अगदी द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुध्दा त्याची एवढी निराशाजनक परीस्थिती नव्हती कारण त्या गोष्टीचे कर्तुत्व युधिष्ठिराच्या माथ्यावर त्याने ठेवले होते व स्वतःच्या जीवनाबद्दल त्याला संभ्रम उत्पन्न झाला नव्हता. परंतु जेव्हा हातात धनुष्य आहे आणि आत्ता आपल्या मित्रांना, नातेवाईकांना स्वतः मारायची जी वेळ आली आहे ती आपल्या स्वतःच्या निर्णयांनी आली आहे हे पूर्णपणे जाणविल्यावर त्याच्या मनात जी अस्वस्थता आली तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णांना योग्य प्रश्न विचारायला सुरुवात केली. योग्य प्रश्नांना योग्य उत्तर (म्हणजे गीता) मिळून तो ज्ञानी झाला. आपल्या गुरुंना योग्य प्रश्न विचारणे ही गोष्ट महत्वाची आहे कारण आपल्या गुरुंना कधीही कुठल्याही गोष्टीची घाई नसते. याचे कारण असे की आपली सध्याची अवस्था ते आपल्या अनेक जन्मांत आलेल्या अनंत अवस्थांपैकी एक मानत असल्याने त्यांना त्याबाबत फारशी आत्मीयता नसते. आपल्याला ह्या सत्यस्थितीची जाणीव नसते. पूर्वजन्मीचे कुणी बघितले आहे आणि उद्या काय होणार आहे हे कुणाला माहीती आहे असा आपला विचार असतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीबद्दल आपल्याला प्रचंड आत्मीयता असते. डोळ्यावर झापड बांधलेल्या घोड्याला फक्‍त समोरचे दिसत असते, आजूबाजूचे काही दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सध्याच्या परीस्थितीच्या मोहाने आधी घडलेल्या वा पुढे होणाऱ्या सर्व गोष्टींबद्दलचे अज्ञान होते व सद्य परीस्थितीत आपण पूर्णपणे गुंतुन जातो. परंतु गुरु स्वतःला अशा बंधनात घालत नाहीत आणि म्हणून ते शांत असतात. त्यांना आपल्यावर आलेली सध्याची आपत्ती आधी आलेल्या अनेक कठीण प्रसंगापेक्षा फार वेगळी वाटत नसते. त्यांना माहीती असते की अशाच अनेक मन चलबिचल करणाऱ्या घटना आधी घडल्या आहेत आणि पुढेही अनेकवेळा येणार आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावरील एका वाळूच्या कणाला आपण जेवढे महत्व देतो तेवढेच महत्व ते आपल्या सध्याच्या घटनेला देत असतात. त्यामुळे ते आपण जो प्रश्न विचारु त्याचेच उत्तर देऊन शांत राहतात. म्हणून आपण जेव्हा साधना करतो तेव्हा काहीतरी प्रश्न आपल्यासमोर असणे चांगले असते. जर तो प्रश्न बरोबर असला तर आपली प्रगती पटापट होते. जर चुकीचा असला तर हळू होते. म्हणून योग्य प्रश्न जवळ ठेवून त्याच्या उत्तराच्या उद्देशाने साधना केलेली खूप चांगली असते.

म्हणूनच आपण दरवेळी वरील तीन ओव्यांनी प्रवचनाला सुरुवात करतो. वरील तीन ओव्यांपैकी पहिली ओवी असे सांगत आहे की आपल्या साधनेचे ध्येय `भजिजो आदिपुरुखी’ असावे. परमेश्वराच्या ज्या रुपातून हे सर्व जग निर्माण झाले आहे त्याचे थोडेसे ज्ञान आपल्याला व्हायला हवे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून साधना करावी.

आता ज्ञानेश्वरीमध्ये असे लिहिले आहे की मनाची सतत शांत अवस्था असणे ही गोष्ट परमेश्वराचे खरे रुप जाणून घेण्याकरीता आवश्यक आहे. मनाची शांति हे साधनेचे अंतिम ध्येय नाही तर आपल्या प्रगतीचा एक टप्पा आहे. म्हणजे आदिपुरुषाला ओळखायचे असेल तर आधी मनाची अशी शांति मला मिळाली पाहिजे की जी जगातील कुठल्याही गोष्टीच्या अभावाने नाश पावणार नाही अशी अपेक्षा ठेवून साधना करावी. कठीण परीस्थितीतसुध्दा मानसिक शांतता प्राप्त करायची असेल तर आपण साधना करताना अनुकुल स्थितीच असावी अशी अपेक्षा ठेवणार नाही. आपली साधना नीट होण्याकरीता दुसऱ्यांना बंधनात ठेवणार नाही. उदाहरणार्थ, माझे ध्यान चालू आहे, मग टी.व्ही. बंद ठेवा असे सांगणार नाही किंवा घरातील छोट्या मुलाला आता गप्प बसायला हवे असा धाक देणार नाही. कारण बाहेरील परीस्थिती अनुकुल असताना जी शांतता मिळेल त्याच्या पलीकडे आपल्याला जायचे असल्याने आपली साधनासुध्दा प्रतिकूल परीस्थितीत करायला हवी हे आपल्याला कळते. अशा रीतीने साधनेचे ध्येय एकदा ठरविले की साधनासुध्दा बदलते. खरे म्हणजे मनाची सतत शांति हे आपली जन्मजात अवस्था आहे. लोकमान्य टिळकांनी `स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’ अशी घोषणा केली व आपण सर्व त्या वाक्याचे कौतुक करतो. परंतु मानसिक शांति हे तर आपले स्वरुपच आहे, ते आपण कसे गमावले याचा विचार आपण कधी करीत नाही. तो आता केला पाहीजे. लक्षात घ्या की आपण स्वतःच असे ठरविले आहे की `चांगले घर असण्यात माझ्या मनाची शांतता आहे’ वा `चांगली नोकरी, भरपूर पैसे असण्यात मनाची शांतता आहे’ किंवा `घरातील सर्व मंडळींनी प्रेमाने राहण्यात माझे समाधान आहे’. मानसिक शांतीच्या आपण केलेल्या अशा कृत्रिम व्याख्येंमध्येच सहज असलेली शांति आपण गमावली आहे हे आपल्या लक्षात आले पाहीजे. याचा अर्थ असा नव्हे की वरीलपैकी एका गोष्टीच्या प्राप्तीमुळे आलेली मानसिक शांति खोटी आहे. व्यवहारात मनासारखे झाल्यावर जी शांतता मिळते आणि साधना चांगली झाल्यावर जी शांतता मिळते त्यांत काहीही फरक नाही. फरक एवढाच आहे की व्यवहारातल्या गोष्टींनी मिळणारी शांतता फार वेळ टिकू शकत नाही. ज्या मार्गानी ती आली आहे त्याबद्दलचे आपले ममत्व निघून गेले की शांतीसुध्दा निघून जाते. उदाहरणार्थ, आज घर छान आहे म्हणून समाधान असेल तर उद्या त्यापेक्षा अधिक चांगले घर असावे अशी इच्छा झाली तर ते आधीचे सुख निघून जाते. सध्याच्या नोकरीची सवय झाली की अजून चांगली नोकरी असावी असे वाटायला लागून परत मन अस्वस्थ होते इत्यादी. याउलट साधनेमुळे प्राप्त झालेली मनाची शांतता दृष्य कारणाशिवाय असल्याने सतत आपल्या जवळ राहू शकते. इथे काही साधक म्हणतील की नाही, साधनेची शांततासुध्दा निघून जाते हा आमचा अनुभव आहे. तसे सध्या जरी होत असले तरी उद्या साधना वाढल्यावर ती सतत राहू शकेल ही क्षमता त्या शांततेमध्ये असते. संसारातल्या सुखाने मिळणाऱ्या मानसिक शांतीत ही क्षमता नाही. म्हणून सतत शांतता हवी असेल तर पारमार्थिक प्रयत्‍न करणेच आवश्यक आहे. ही मूळ भूमिका मनात ठेवून जो साधक साधना करेल त्याची प्रगती फार लवकर होईल.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवाची आहे की आपल्या मनाची अवस्था शांत आहे हे फक्‍त आपल्यालाच कळते. ही शांति दुसऱ्यांना सांगायची आवश्यकता नसते, उलट तसे दुसऱ्यांना सांगण्याच्या आपल्या प्रयत्‍नामध्येच ती आपण गमावतो! फक्त आपली आपण उपभोगण्याची ही गोष्ट आहे. असे बघा, आपण अस्वस्थ आहे हे बाकीच्यांना कसे कळते? तर आपल्या उपस्थितीत ते स्वतः अस्वस्थ होतात तेव्हा. आपले काही शब्द म्हणा किंवा आपली शारीरीक चलबिचल म्हणा त्यांना अस्वस्थ करुन अशी जाणीव करुन देते की आपले मन शांत नाही. त्यांना आपल्या अशांततेची जाणीव करुन द्यायला हाच एक उपाय आहे. त्याचप्रमाणे आपली शांतता त्यांना सांगायची असेल तर आपल्याबरोबर असताना त्यांना स्वतःला शांत वाटले पाहीजे, आपली सोबत हवीहवीशी वाटली पाहीजे. या त्यांच्या वाटण्यातच आपली शांति त्यांनी ओळखली आहे असे आपण मानून शब्दांमध्ये ती सांगायला जाऊ नये.

आता शेवटची गोष्ट म्हणजे ही शांत अवस्था ओळखायची कशी? दोन गोष्टींनी आपण शांत अवस्था ओळखू शकतो. पहीली गोष्ट अंतर्गत आहे, आपली आपण शोधायची आहे. ती म्हणजे आपला तटस्थपणा. मन शांत होणे म्हणजे त्याचा नाश होणे नव्हे. मनातील विचार येतजात असतातच. परंतु आपण त्यामध्ये गुंतत नाही. आपल्याच मनातील सर्व विचार आपण तटस्थपणे जेव्हा पहायला लागतो तेव्हा आपले मन शांत व्हायला लागले आहे हे आपण ओळखावे. आपण सकाळी सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला ही जाणीव असते की आज अमुक अमुक गोष्टी करायला हव्यात तरी त्यांच्याकडे आपण तटस्थपणे पाहून अजून पाच मिनिटे झोपले तर चालेल का याचा विचारसुध्दा आपण करत असतो. ही जी तटस्थता असते ती आपल्या शांतीचेच लक्षण आहे. अशी आपल्या मनाची तटस्थता सतत आपल्याजवळ राहीली पाहीजे, सतत आपल्या मनाकडे आपण झोपेतून उठल्यावर कसे बघतो तसे बघू शकलो पाहीजे. किंवा जेव्हा आपले पोट भरलेले असते तेव्हा आवडती वस्तू समोर आली तरी आपण कधी खातो तर कधी खात नाही. त्याप्रमाणे आपले मन शांत असले की एवढी प्रसन्नता सतत जवळ असते की मनातल्या इच्छांकडे आपण असेच तटस्थतेने पाहू शकतो. दुसरि गोष्ट म्हणजे बाह्य आहे, समाजाकडे बघून जाणायची आहे. ती म्हणजे शांत मनाच्या माणसाच्या अस्तित्वाचे जगातील कुणाला ओझे वाटत नाही. तेव्हा आपली शांत अवस्था ओळखण्याकरीता किती लोकांना कारणाशिवाय आपण आवडतो ते बघावे. राजकीय नेते सभेला पैसे देऊन माणसे आणतात तसे सतत दुस्ऱ्यांकरीता चांगले वागायचे ओझे न घेता किती माणसे आपल्या जवळ आहेत ते बघावे. स्वतःचे आयुष्य नेहमीप्रमाणे जगताना जर जास्त माणसे जवळ यायला लागली तर आपले मन शांत होत आहे असे मानावे. जर तो नंबर कमी होत असला तर शांति गमावली हे ध्यानात ठेवावे.

तर, मनाची शांत अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी ह्या हेतूने आपण इथे नियमितपणे एकत्र जमतो हे सारखे लक्षात ठेवावे. सतत हे ध्येय समोर ठेवल्याने वायफळ गप्पा करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा आपण ह्या सत्संगाचा अधिक चांगला उपयोग करुन घेऊ.

 

निरुपणाच्या ओव्या

 

हे विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३:१२ ॥

 

मग याहीवरी पार्था । माझिया भजनीं आस्था ।

तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४:१२ ॥

 

आज आपण बाराव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आवडणाऱ्या भक्‍ताचे जे वर्णन केले आहे त्याबद्दल विचार करु. तो श्लोक असा आहे:

 

तुल्यनिंदास्तुतिमौंनी संतुष्टो येनकेनचित्‌ ।

अनिकेतः स्थिरमतिर्भक्‍तिमान्मे प्रियो नरः ॥ १९:१२ ॥

 

ह्या श्लोकाचे विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यामधील दोन ओव्या आज निरुपणाला घेतलेल्या आहेत. त्यांचा अर्थ असा आहे: `ज्या माणसाच्या मनात हे सर्व विश्व माझे घर आहे ही जाणीव पूर्णपणे झाली आहे, एवढेच नव्हे तर हे सर्व दृश्य जग म्हणजे माझेच रुप आहे हे त्याला माहीती आहे. यानंतर जेव्हा तो माझ्यावर भक्‍ति करतो तेव्हा मी त्याला माझ्या डोक्यावरील मुकुटातील मण्यासारखा मानतो.’ नेहमीप्रमाणे या शाब्दीक अर्थापलीकडे जायचा आपण प्रयत्‍न करु व बघू की आपल्या साधनेकरीता ह्या ओव्यांचा कसा उपयोग करुन घेता येईल.

 

परमेश्वराला आवडणारे भक्‍त

 

वरील ओव्यांतील पहिल्या ओवीमध्ये भक्‍ताची जी अवस्था वर्णन केली आहे ती कशी आहे? तर ह्या जगात जे जे काही घडत आहे ते माझेच रुप आहे हे त्याला पूर्णपणे माहीती आहे. म्हणजे नक्की काय? असे बघा, आपल्या स्वतःच्या शरीरातील किती गोष्टी आपल्याला आवडत असतात? खरे म्हणजे स्वतःच्या शरीरामुळे आपल्याला अनेक बंधने पडत असतात. समाज आपल्याला शरीरानेच ओळखत असल्याने सामाजिक स्थितीला अनुसरुन आपण रहायला पाहीजे याचे एक सतत दडपण आपल्यावर असते ते केवळ आपल्या शरीरामुळे आले आहे. मोठी नैतिक बंधने तर सोडाच, पण `मला व्यवस्थित कपडे घातले पाहीजेत’, `केस अस्ताव्यस्त न ठेवता राहीले पाहीजे’ इत्यादी अनेक क्षुद्र बंधनेसुध्दा आपण विनातक्रार पाळत असतो. आपल्या शरीराला नीट ठेवण्याकरीता इतके कष्ट घ्यावे लागतात तरी शरीराबद्दलचे आपले आकर्षण कायमच राहते. हाच नियम वरील साधक जगाला लावू लागतो. हे विश्वच जर माझे शरीर असेल तर त्यातील काही घटना आपल्या आवडीप्रमाणे झाल्या नसल्या तरी आपण आपल्या शरीराला कधी कधी दुखणे होते तसे स्वीकारले पाहीजे. म्हणजे, समजा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी `हे जग असे निष्ठुर कसे आहे’ असा विचार आपण केला नाही पाहीजे. आपली पाठ दुखायला लागते तेव्हा आपण पाठीच्या अस्तित्वाबद्दल तक्रार न करीता ते दुःख दूर करायला डॉक्टरकडे जातो त्याचप्रमाणे आवडती वस्तू वा व्यक्‍ती मिळाली नाही तरी त्याबद्दल हे असे का झाले याबद्दल विचार न करीता जो लगेच त्या वस्तूच्या, व्यक्तीच्या अनुपस्थितीत आता काय करु शकू असा विचार करायला लागतो त्याची मनःस्थिती `हे विश्वचि माझे घर’ व्हायला लागली आहे असे आपण समजले पाहीजे.

खरे म्हणजे घडलेल्या गोष्टीचे दुःख आपल्याला का होते? तर आपल्या मनात एक असते आणि घडते दुसरेच म्हणून. आपले त्या घटनेवर पूर्ण प्रभुत्व नाही याची पूर्ण जाणीव अशा वेळीच आपल्याला होते. आपल्या क्षमतेला हा एक धक्का बसलेला असतो. आपल्याला हे अजिबात आवडत नाही की आजूबाजूच्या घटनांवर आपले काहीच प्रभुत्व नाही. घटना त्यांना पाहीजे तशा घडत आहेत आणि आपण असहाय्यपणे फक्‍त बघत आहोत ही कल्पनासुध्दा आपल्याला सहन होत नाही, मग ती परीस्थिती सहन करणे दूरच राहीले. लहानपणापासून आपल्या कर्तुत्वाने सर्व मिळविले आहे हे आपण इतके मानलेले असते की आता आपल्या ताब्याबाहेर कुठली गोष्ट झाली की आपले मन अस्वस्थ होते. मग ती तशी का झाली, त्याचे कारण काय? याचा विचार आपण करायला लागतो. जर उत्तर सापडले तर आपले मन शांत होते कारण त्या उत्तरामध्ये आपण असे समजतो की परत आपला ताबा त्या घटनेवर आला. पण जर ही घटना अशी का घडली हे कळूच शकले नाही तर आपण फारच अस्वस्थ होतो. आपल्या बुध्दीला तो एक आघात असतो. तेव्हा आपण हे लक्षात घेतले पाहीजे की जरी प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असते हा कर्माचा नियम खरा असला तरी ते कारण अत्यंत सूक्ष्म असू शकते. गोष्ट मोठी असली तरी त्यामागचे कारण तेवढेच मोठे असले पाहीजे असा काही कर्माचा नियम नाही. लहानपणी कधी एक गोष्ट आपल्या शाळेतल्या बाईंनी सांगितलेली असते, आणि तीचा परीणाम आपल्या सबंध जीवनावर होऊ शकतो. बऱ्याच काळाने आपण एका परीस्थितीमध्ये असे का वागलो याचा विचार करायला लागलो तर लहानपणींचे हे सूक्ष्म कारण आपल्याला मिळेलच असे नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतात की ज्यांचा खरा परीणाम खूप काळानेच आपल्याला जाणवितो. त्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे. तेव्हा आधी संपूर्ण सारासार विचार करुन आपण हे जाणले पाहीजे की आपल्या बुध्दीच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीचे कारण शोधण्यात वेळ वाया घलविण्यापेक्षा गोष्ट आहे तशी स्वीकार करण्यातच खरा बुध्दीचा उपयोग आहे हे जेव्हा साधकाच्या लक्षात येते तेव्हा त्याचे मन जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार करायला तयार होते. असा विनातक्रार स्वीकार सतत करीत राहणे म्हणजेच `हे विश्वचि माझे घर’ अशी अवस्था होणे होय.

आता ही अवस्था होणे म्हणजे दगडाच्या मूर्तीसारखे जगाकडे बघणे नव्हे. तुमच्या मनाला सुख आणि दुःख हे जाणवित राहतेच. पण तुम्ही कधीच पराकोटीचे सुखी होत नाहीत वा पराकोटीचे दुःखी होत नाही. सध्याच्या आपल्या मनमानी जगण्यामध्येसुध्दा एक वेगळी गंमत आहे. जेव्हा तुम्ही संसारातील ठरावीक गोष्टींच्या उपस्थितीमध्ये सुख मानून त्या गोष्टींच्या प्राप्तीकरीता अथक प्रयत्‍न करता आणि त्या गोष्टी मिळतात तेव्हा तुम्हांला जे सुख लाभते ते सुख `मिळाली तर मिळाली, नाही तर नाही’ अशा प्रयत्‍नांतून प्राप्त झालेल्या गोष्टीमध्ये कधीच नसते. आत्यंतिक इच्छा ठेवून जगण्यामध्ये सुखाची अत्यंत परमावधी गाठता येते (व त्याप्रमाणेच दुःखाची सगळ्यांत कठोर जाणीव होऊ शकते). असे हे टोकाचे जीवन जगण्यामध्येसुध्दा एक गंमत आहेच, नाही असे नाही. परंतु ही गंमत आपण फार काळ उपभोगू शकत नाही. तरुणपणी असे जगणे ठीक आहे परंतु अगदी सर्वांत स्वच्छंदी जगणाऱ्या सिनेमा नटाच्या वा नटीच्या मनातसुध्दा लग्न करुन एकप्रकारचे संयमित जीवन जगावे ही भावना कधीतरी होतेच. ज्ञानेश्वर महाराजसुध्दा असे म्हणत नाहीत की तुमच्या मनाची अशी पराकोटीचे सुख भोगायची इच्छा असताना ती दाबून ठेवून साधना करा. आपल्या नेहमीच्या तीन ओव्यांपैकी `किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकी’ या ओवीतून ते असेच सुचवित आहेत की तुमच्या आत्यंतिक इच्छा असल्या तर त्या आधी पूर्ण होऊ देत मग तुम्ही `भजिजो आदिपुरुखीं अखंडित’ असे रहा. याचा अर्थ असा की ज्या वेळी तुम्हाला असे वाटायला लागते की जीवनात एक संयम असलेला बरा त्या वेळी केवळ आधीच्या आठवणींत रमून न जाता सध्याच्या मनाच्या अवस्थेशी प्रामाणिक राहून संयमित जीवन जगण्याचा प्रयत्‍न सुरु करा. आणि ही अवस्था येईलच. आपल्या जीवनातील अत्यंत पराकोटीची अवस्थासुध्दा स्वरुपानंदाच्या मानाने खूप छोटी आहे. ही सत्य परीस्थिती आपल्याला स्वच्छंदी जगण्यापासून खेचून साधनेच्या, संयमित जीवन जगण्याच्या मार्गावर लावेलच यात अजिबात शंका नाही.

म्हणून आपण आधीच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींत रमून काही वेळ तसेच जगायचा जरी प्रयत्‍न केला, तरी शेवटी साधनेला लागूच यात शंका नाही. एखाद्याला प्रत्येक शुक्रवारी सिनेमाचा पहिला खेळ बघितलाच पाहीजे असा शौक असतो. काही काळाने त्याची ती प्रतिमा जपायची म्हणून तो दर शुक्रवारी जाऊ लागतो मग अजून काही काळाने त्याच्या जुन्या मित्राने विचारले की अजून `फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चालू आहे का? तर आता त्यात एवढी गंमत वाटत नाही अशी कबूली द्यायला तो लाजत नाही. आपण प्रामाणिक राहिलो तर आधी ज्या गोष्टींने आपल्याला सुख लाभत होते ते आता आपल्याला मिळत नाही हे आपण कबूल करतो. परमेश्वराचा हा एकच दोर आहे जो आपल्याला त्याच्याकडे खेचून नेत आहे. जर मिळणाऱ्या गोष्टींमधून सुख सतत तेवढेच असते तर आपण कधीच बदललो नसतो. भगवंताने हे जग असे निर्माण केले आहे की त्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये सुख द्यायची ताकद आहे पण कुठल्याही गोष्टीमध्ये सतत सुख द्यायची ताकद नाही. निरंतर सुख द्यायची शक्‍ति त्याने फक्‍त आपल्याकडे ठेवली आहे व त्या शक्‍तीची ओढ आपल्याला त्याच्याकडे खेचत आहे. ह्या शक्तीचे आपल्या जीवनातले अस्तित्व म्हणजे आपल्याला अचानक आपल्या जीवनातील आवडणाऱ्या गोष्टींबद्दलची आत्मीयता कमी होणे. काहीही कारण नसताना आपल्याला त्या गोष्टींमधला रस कमी झाल्यासारखा वाटतो. ह्यांच्याकरीता मी इतके जीवापाड प्रयत्‍न का करीत होतो असा प्रश्न भेडसावयाला लागतो. गंमत म्हणजे आपली ही स्थिती आपण कुणालाही समजावून देऊ शकत नाही. परंतु ही कारणविरहीत मानसिक बेचैनी म्हणजेच साधनेचे पहीले पाऊल असे आपण मानले पाहीजे. ह्या अवस्थेला यायला आधी आपण ज्या गोष्टींचा हव्यास आहे त्या पुऱ्या करायचा प्रामाणिक प्रयत्‍न केला पाहीजे. तुम्हाला `शॉपिंग’ची आवड असेल तर खिशातील सगळे पैसे संपेपर्यंत खरेदी करा आणि बघा काय वाटते ते? सतत बंधनात राहून माफक खरेदी करीत राहीलात तर तुमच्या जीवनातील खरेदीची आवड कधीच नष्ट होणार नाही. रामकृष्ण परमहंसांना अचानक अंगावर रेशमी भरजरी कुडता असावा अशी इच्छा झाली, त्यांनी लगेच त्यांच्या मथुर बाबूंना ते सांगून ती पुरी केली. सिल्कचा कुडता घालून ते म्हणाले `हे मना बघ हा रेशमी कुडता असा असतो, त्याच्यापासून हे असे सुख मिळते. साधनेच्या, कालीमातेच्या नावातल्या सुखापेक्षा हे मोठे आहे का?’ जेव्हा नाही असे उत्तर आले तेव्हा त्यांनी लगेच तो कुडता काढून फेकून दिला. मथुरबाबूंच्या सेवकाने ही वार्ता त्यांना जाऊन तक्रारपूर्वक सांगितली तेव्हा ते म्हणाले, `असू दे, `बाबा’ कसे वागतात हे आपल्या सारख्यांना कळणे शक्य नाही. तू त्यांना काही बोलू नकोस.’ अर्थात इच्छा संपूर्णपणे पूरी करण्यात सारासार विचार करणे जरुरी आहे. खुद्द रामकृष्ण परमहंस ही गोष्ट सांगून नंतर म्हणायचे की क्षुद्र इच्छांपासून मोकळे व्हायला हा मार्ग बरा आहे पण काही इच्छांवर नुसता विचार करुन त्या मनातून दूर करणेच बरे. परंतु आपले जीवन सर्वसामान्य असल्याने आपल्या इच्छासुध्दा साधारणच असतात. त्या शक्यतो पुऱ्या करायचा प्रयत्‍न करण्यातच आपल्याला त्यांच्यापासून मुक्तिचा मार्ग आहे.

आपण इच्छा करतोच तरी का? तर आपणच त्यांना महत्व दिलेले असते म्हणून. तुम्हांला कुणी येऊन सांगितलेले होते का की अमुक एक व्यक्‍ती तुमच्या जीवनात यायलाच हवी? तुमचे तुम्हीच ठरविले होते की ही व्यक्‍ति वा वस्तू माझ्या जीवनात असायलाच हवी. ही व्यक्‍ती वा वस्तू मिळाली तर जीवन सुखद होईल अशी त्यामागची आपली भावना त्या इच्छेचे कारण होती. स्वतःच एका गोष्टीला महत्व द्यायचे आणि मग आता ती नाही म्हणून आपणच शोक करायचा हे कितपत योग्य आहे? हे सर्व विश्वच जर आपले घर आहे, आपलेच एक रुप आहे, तर आवडणारी गोष्ट न मिळणे ही घटनासुध्दा माझेच रुप आहे असे आपण समजले पाहीजे. आता तुम्ही असे म्हणाल की काही ठराविक गोष्टी (पैसा, घर, कुटुंब वगैरे) जीवनात असाव्यात असे सर्वचजण मानतात. ते सर्व चुकीचे कसे असू शकतील? परंतु लोकांनी योग्य मानलेल्या सर्व गोष्टी तुम्ही योग्य मानल्या आहेत का? स्त्रियांच्या बाबतीत बहुतांशी लोकांची मते अजून जुन्या पठडीतील असतात, अशा लोकांचे प्रमाण सुधारक लोकांपेक्षा जास्तच आहे पण म्हणून किती बायका बहुमताप्रमाणे वागतील? याचा अर्थ असा की आपल्याला जे आवडेल तेच आपण लोकांकडून घेत असतो, लोकांना आवडते म्हणून आपण आपले आयुष्य कसे घालवायचे हे ठरवित नसतो. मग आवडत्या गोष्टींबाबत का ही सबब सांगायची? आवडणारी गोष्ट जरी बघितली तरी तीच्यामध्ये नावडणारे पैलू असतातच. परंतु त्यांचे प्रमाण आवडणाऱ्या पैलूंच्या मानाने कमी असते. खरोखर, या जगातील अशी कुठलीही गोष्ट नाही की संपूर्णपणे चांगली आहे, म्हणून या जगातील अशी कुठलीही व्यक्‍ति वा गोष्ट अशी नाही की संपूर्णपणे वाईट आहे (कारण जर ती पूर्ण वाईट असली तर तीचा नाश ही पूर्ण चांगली घटना झाली असती). कुठलीही कठीण आपत्ती संपूर्णपणे दुःखद नसते, त्या विपरीत परिस्थितीतच पुढच्या वाढीची बीजे असतात. म्हणून मैनेजमेंटच्या अभ्यासात नेहमी हे सांगतात की `कंपनीला जेव्हा कठीण काळ समोर येतो त्यामध्येच चांगल्या, नवीन धंद्याची सुरुवात असते हे लक्षात ठेवा.’ एका धंद्यात कठीण काळ आल्यामुळे तुम्ही दुसऱ्या धंद्याचा विचार करु लागतात. जर तुम्ही साबण बनवित असताना मंदी आली तर केवळ कंपनीचे अस्तित्व शाबूत ठेवण्याकरीता संगणकाचा धंदा चालू केलात आणि त्यातच तुम्हाला प्रचंड यश मिळाले तर साबणाच्या धंद्यातील मंदी तुम्हांला चांगली होती का वाईट?! श्री. अझिम प्रेमजी यांची अगदी हीच अवस्था झाली होती. आता विप्रो कंपनीचे नाव संगणकाकरीताच जास्त प्रसिध्द आहे, त्यांच्या आधीचा शिकेकाई साबणाचा धंदा अजून चालू आहे पण त्यामुळे श्री. प्रेमजी कधीच सर्वांत श्रीमंत माणसांपैकी एक गणले गेले नसते. त्यांच्या आधीच्या धंद्यावर जी बिकट परीस्थिती आली होती त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आता अधिक चांगले आहे. `केस कापायला वेळ काढायला पाहीजे, काय कटकट आहे!’ ह्या बिकट परीस्थितीवर मात करुन आपण जेव्हा केस कापून येतो तेव्हा आपले व्यक्तिमत्व अजून चांगले झालेले असते नाही?!!

सांगायचा अर्थ असा की कुठलीही वाईट परीस्थिती ही आपल्या मनाच्या सध्या काय अपेक्षा आहेत यावर अवलंबून असते. काही काळ गेल्यावर आपण सध्याच्या परीस्थितीकडे मागे वळून बघितले तर असेसुध्दा वाटायची शक्याता आहे की आपल्या जीवनातली ती सर्वांत चांगली गोष्ट होती! जसे अझिम प्रेमजींना आत्ता वाटत असणार की शिकेकाई साबण न विकला जाणे ही बिकट परीस्थिती त्यांच्यावर आली हे सर्वांत चांगले झाले. जर असे होऊ शकेल तर आपल्या साधनेने असे वाटायचा वेळ आपण करु शकतो. वीस वर्षांनी आपल्या लहानपणाकडे बघताना नुसते सुखच दिसते परंतु लहानपणी सतत नुसती बंधनेच जाणवत होती. तसे आज आपल्याला जी परिस्थिती बिकट वाटत आहे ती वीस वर्षांनी चांगली वाटण्याऐवजी परवाच चांगली वाटावी, परवातरी कशाला आजच थोड्यावेळाने तीच्यातील चांगल्या बाजू जाणवाव्यात किंवा अत्यंत टोकाची तयारी म्हणजे थोड्या वेळाने कशाला, आत्ताच, ती परीस्थिती समोर असतानाच मन शांत रहावे हे आपण साधनेन प्राप्त करु शकतो.

खरी गोष्ट अशी आहे की देव आपल्याला सतत त्याच्याकडे खेचत आहे. त्याच्या खेचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जगातील गोष्टींचे आकर्षण आपल्या मनातून कमी होत जाणे. ते कमी होण्याकरीता तो कधी आपल्या इच्छा पूर्ण करतो तर कधी मुद्दाम अपूर्ण ठेवतो. याउलट आपल्या इच्छा आपल्याला जगातील गोष्टीकडे खेचत असतात. हा खेचाखेचीचा खेळ सतत चालू आहे. परंतु हे विश्वचि माझे घर अशी मती ज्याची स्थिर झाली आहे त्याला जगातील सर्व गोष्टींबद्दल आत्मीयता असते. म्हणजे त्याने आपल्या इच्छेचा दोर हातातून टाकून दिला आहे असे आपण समजू शकतो. मग आपोआपच तो भगवंताकडे जायला लागतो कारण भगवंताच्याविरुध्द दुसरी शक्तीच अशा साधकाच्या जीवनात नसते. मग जे काय त्याच्या जीवनात घडते ती त्याची साधनाच असते. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गोष्टी त्याला परमेश्वराचे अस्तित्व जाणवून देत असतात व तो सतत अनुसंधानात असतो. ही अवस्था ह्या ओवीत वर्णन केली आहे. असा साधक सतत स्वतःच्या आनंदात मग्न राहून आपल्या स्वतःच्या मार्गाने देवाकडे जातच असतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक घटना म्हणजे त्याची साधना बनते. सहज स्थितीमध्ये सतत राहून तो प्रत्येक क्षणी परमेश्वराच्या जवळ जात असतो. निरुपणाच्या पहिल्या ओवीमध्ये साधकाची ही अवस्था वर्णन केली आहे.

मग पुढे काय होते?

जर ह्या मनुष्याला जगात काय चालले आहे याबद्दल फारशी पर्वा नसेल तर त्याचे समाजातील वागणे कसे राहील? ज्या वस्तूची आपल्याला पर्वा नसते तीच्याबद्दल आपण उदासीन असतो. त्याचप्रमाणे हा साधक आता समाजापासून अलिप्त राहून स्वतःच्या जगातच राहणार का? हा प्रश्न आपल्या मनात उद्‌भवतो. हो असे घडू शकते, परंतु भगवंताला काय आवडते ते जाणून घ्यायला दुसरी ओवी बघा.

 

`मग याहीवरी पार्था, माझिया भजनी आस्था, तरी तयाते मी माथा, मुकुट करी.

 

महाराष्ट्रात असे संत होऊन गेले आहेत की ते कचऱ्याच्या ढीगावर रहात होते. कुणी जवळ जाऊन साधनेबद्दल, परमेश्वराबद्दल प्रश्न विचारले तर शिव्यागाळ करुन त्यांना पळवून लावायचे. त्या कृतीने त्यांच्या ब्रह्मज्ञानामध्ये काही कमीपणा येत नाही हे आपण ध्यानात ठेवले पाहीजे. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात अशीच एक घटना घडली होती. ती अशी:

एक फकीर एके दिवशी अचानक दक्षिणेश्वर मंदीरात आला. काली मातेच्या मंदीरासमोर येऊन त्याने दोन श्लोक असे म्हटले की रामकृष्ण परमहंसांना सर्व मंदीर हादरले असा भास झाला. देवीला नमस्कार करुन नंतर तो साधु मंदीरासमोर कुणीतरी टाकून दिलेल्या प्रसाद खात असलेल्या कुत्र्याकडे गेला. गळ्यात हात घालून त्याने कुत्र्याला बाजूला केले व राहीलेला प्रसाद त्याने खाल्ला. रामकृष्ण परमहंस म्हणाले की त्या कुत्र्याने त्याला अजिबात विरोध केला नाही. तो ते अन्न खात असताना रामकृष्ण परमहंस आपल्या भाच्याला म्हणाले, `बघ, हा मनुष्य खरा ब्रह्मज्ञानी आहे!’ तेव्हा त्यांचा भाचा, ह्रुदयराम, त्या साधूच्या मागे मागे जायला लागला. मला काहीतरी उपदेश करा असे वारंवार विनवू लागला. साधूने ह्रुदयरामकडे अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी त्याच्या मनधरणीचा त्रास येऊन तो शेजारच्या गटाराकडे गेला व त्यातील पाणी पिऊन म्हणाला की `हे पाणी आणि तुझ्या गंगामैयेचे पाणी यात काही फरक नाही हे जाणून घे!’ तरीसुध्दा ह्रुदयरामची भुणभुण बंद झाली नाही तेव्हा त्याने दगड उचलून मारायला सुरुवात केली आणि एका क्षणात तो तिथून नाहीसाच झाला. हे सर्व रामकृष्ण परमहंसांनी बघितले व ते धावत कालीजवळ जाऊन म्हणाले की `मला हे असे कोरडे ब्रह्मज्ञान नको!, मला तुझ्या भक्‍तांचा सहवास उपभोगायची इच्छा सतत असू दे.’ रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे की `मला साखर खायची आहे, साखर व्हायचे नाही!’

आपण हे लक्षात ठेवले पाहीजे की त्या साधूच्या तशा वागण्याने त्याचे ब्रह्मज्ञान कमी होत नाही व रामकृष्ण परमहंसांच्या साखर खायच्या इच्छेने त्यांचे ब्रह्मज्ञान कमी होत नाही. दोन्ही सारखेच आत्मज्ञानी आहेत. परंतु भगवंताला कोण आवडतो? तर रामकृष्ण परमहंसांसारखे भक्‍त. आत्मज्ञान जरी प्राप्त झाले तरी रस्त्यावरच्या दिव्यासारखे उभे राहून बाकी साधकांचा मार्ग जो उजळत राहतो त्याला भगवान श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर घेऊन नाचतात असे ही ओवी आपल्याला सांगत आहे.

बऱ्याचजणांना साधना सुरु करतानाच अशी शंका असते की साधनेमुळे मी स्वतःतच मग्न रहायला लागलो तर माझ्या ह्या जगात मी एक उपद्रवी जंतू होईन. मग माझ्यावर अवलंबून असलेल्यांचे काय होईल? असा विचार करुन ते साधनाच कमी करतात! ही नसती शंका जगाच्या ओढीमुळे आपल्या मनाने समोर केली आहे हे जाणून घेऊन आपण तिकडे दुर्लक्ष केले पाहीजे व आपली साधना सुरु ठेवली पाहीजे. आज सुरुवातीला आपण असे बघितले की स्वतःच्या मनाची सतत शांत अवस्था प्राप्त व्हावी हे उद्देश्य ठेवून आपण इकडे एकत्र आले पाहीजे. पण आता याहीपुढे जाऊन असे ध्येय ठेवले पाहीजे की माझ्या मनाची शांती मी मिळविनच पण त्याहीपुढे जाऊन जीवन असे जगीन की ज्यामुळे बाकी लोकांना माझा फायदा होईल. झाडावरच्या एखाद्या सुंदर फुललेल्या फुलासारखे मी आयुष्य जगायचा प्रयत्‍न करीन. हे कसे? बघा:

जरा विचार करा, की बागेतील एक फुल कधी लोकांना आपणहुन सांगते का की माझ्याकडे बघा? ते आपले आयुष्य शांतपणे जगत असते, त्याच्या असण्यातच लोकांना सुख द्यायची ताकद त्याच्यात असते. पण म्हणून ते लोकांवर जबरदस्ती करीत नाही की माझ्याकडे चांगले सौंदर्य आहे त्याचा उपभोग घ्या. समजा दहा हजार माणसे त्या फुलझाडासमोरुन गेली तरी त्यातील फक्‍त दहा जणांचे त्या फुलाकडे लक्ष जाईल व त्यामध्येसुध्दा एखादाच त्याच्या सौंदर्याने आपल्या जीवनात आनंद प्राप्त करुन घेईल. पण त्या फुलाला त्याचे काही दुःख नसते. ते त्या सर्व लोकांबाबत तेवढेच उदासीन असते व आपले जीवन जगत असते. आपण त्या फुलाप्रमाणे जगायचे ध्येय समोर ठेवून साधना केलेली सर्वांत चांगली आहे. आपल्या जीवनात इतकी माणसे आपल्यासमोर येतात त्यातील जास्त करुन माणसे तुम्हाला फार महत्व देणार नाहीत. जी थोडी माणसे तुम्ही कसे जीवन जगत आहात हे बघायचा प्रयत्‍न करतील त्यातीलसुध्दा बहुतेकजण तुमच्या साधनेचे, जीवनाच्या उदात्त ध्येयाचे, कौतुक करणार नाहीत. अगदी एखादाच असे म्हणेल की किती सुंदर ह्या माणसाने आपले आयुष्य घालविले आहे. त्या सर्वांबद्दल एकसारखी आपुलकी ठेवून आपले जीवन आपल्या पध्दतीने जगणे हे आपले ध्येय आपण ठेवले पाहीजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपले आयुष्य शांतपणे जगत रहावे. फुल जसे दुसऱ्याच दिवशी सुकते, तसेच आपले आयुष्य तरी किती मोठे आहे? पण त्या क्षणभंगुरतेचा विषाद न ठेवता आहे तो क्षण जगा हे आपल्याला ह्या दोन ओवींवरुन शिकायचे आहे. असे एक मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आपण जगायला सुरुवात केली तर आयुष्य अत्यंत सुंदर होईल व जे काही घडेल त्याला शांतपणे सामोरे जायची शक्‍ति आपल्यात येईल. प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घ्यायला तयार होईल हे आपण जाणले पाहीजे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक ३ मार्च २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: