395/15: Acceptance Without Judgement

 

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुरुवातीचे नमन

 

 

नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

 

 

कुठलीही गोष्ट करताना ती करण्यामागचा हेतू सतत लक्षात ठेवणे जरुरी असते. विशेषतः एखादे ध्येय खूप वेळाने प्राप्त होणार असेल आणि ते मिळविण्याकरीता एकच साधन सतत वापरायचे असेल तर ही गोष्ट अधिकच लागू पडते. जर ध्येयाकडे लक्ष ठेवले नाही तर त्याच्या प्राप्तीच्या साधनातच आपण रमून जायची शक्यता असते. कित्येकवेळा आपण बघतो की परमेश्वरप्राप्तीकरीता विष्णू हे आराध्य दैवत मानून लोक साधना सुरु करतात आणि विष्णूच्या मूर्तीमध्येच इतके रमून जातात की कोणी शंकराची स्तुती केली की अस्वस्थ होतात. विष्णूपूजा हे ज्या परमेश्वराच्या प्राप्तीचे साधन आहे त्या परमेश्वराचेच एक रुप भगवान शंकर आहे हे ते विसरतात कारण विष्णूपूजेच्या साधनामध्येच ते पूर्ण गुंगून गेलेले असतात. खरे म्हणजे हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या देवताच कशाला, सबंध हिंदू धर्म हा देखील परमेश्वरप्राप्तीचे एक साधन म्हणूनच निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे जगातील यच्चयावत धर्मांतील प्रत्येक धर्म म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची एक वाट आहेत. मग त्या वाटांमध्ये आपण का रमावे? प्रत्येक धर्म म्हणजे भगवान कुठे आहे हे दाखविणारे एक बोट आहे कारण या जगातील कुठलाही धर्म देव नाही असे म्हणत नाही व आपापल्या परीने देवाजवळ कसे जायचे असेच सांगतो. मग ते बोट काय दाखविते आहे हे बघायचे सोडून मला हिंदू बोट आवडते, मुस्लीम वा ख्रिश्चन बोट आवडत नाही असे का म्हणावे? श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की गावातील नदीला अनेक घाट असतात, हिंदू घाट, मुस्लीम घाट, वगैरे वगैरे. परंतु त्या सर्व घाटांनी एकाच नदीजवळ जायचे असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या धर्मांच्या मार्गांनी एकाच देवाजवळ जायचे आहे हे आपण लक्षात घेऊन स्वतःच्या मार्गाबद्दलचा वृथा अभिमान टाकला पाहीजे. त्या मार्गाने जी वस्तू मिळणार आहे त्या वस्तूची प्राप्ती झाली की नाही हे सतत पाहायचा ध्यास आपल्याला लागला पाहीजे.

हीच गोष्ट निर्गुण भगवंतांच्या उपासकालासुध्दा लागू पडते. ज्ञानेश्वरीच्या पहील्या ओवीमध्ये आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या परमेश्वराचे ध्यान करावे असे ज्ञानेश्वरमहाराजांना सांगायचे आहे. त्या रुपाच्या प्राप्तीकरीता स्वसंवेदनांवर पूर्ण विश्वास ठेवणे हा मार्गसुध्दा त्यांनी सांगितला आहे. ह्या मार्गाने चालताना आधी आपल्या मनाची पूर्ण ओळख आपणांस होते. सतत स्वतःकडे तटस्थ नजरेने पाहण्याची सवय झाली की आपल्या मनातील विचारांकडे आपण त्रयस्थासारखे पाहू लागतो. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे फार कठीण वाटत नाही. आत्मरुप जाणून घेण्याची इच्छा धरणाऱ्या साधकाच्या जीवनात अध्यात्मिक प्रगतीची ही पायरी येणे आवश्यक आहे. अशा अवस्थेत साधकाकडे आपल्या वाचेवर नियंत्रण येते. आपल्या मनातील भावना तटस्थपणे पाहता येत असल्याने त्यांचे यथास्तित वर्णन तो दुसऱ्यांना करु शकतो. एखाद्या वादामध्ये आपला मुद्दा कसा मांडावा हे त्याला विनासायास कळते. खरे म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे त्याला आपोआप प्राप्त झालेल्या सिध्दीच होत. ह्या सिध्दी उगाचच न वापरता स्वतःचे आत्मरुप जाणुन घ्यायचे आहे हे ध्येय जर तो साधक विसरला तर त्याच्यात दुसऱ्यांना उपदेश करायची भावना प्रबळ होते. वादात त्याच्यापुढे कुणीही टिकत नसल्याने त्याचे म्हणणे खोडून काढायला फारजणांना जमत नाही. त्याच्या स्वतःच्या मार्गाने न जाणाऱ्या साधकांची कुचेष्टा असा साधक करु लागतो. मग त्याच्यात आणि अत्यंत दुराग्राही अशा वैष्णव भक्‍तांत काहीच फरक नाही हे लक्षात ठेवले पाहीजे. कारण ही दोन्ही माणसे साधनेच्या मार्गावरच एवढे प्रेम करायला लागली आहेत की आपल्या ध्येयाचा विसर त्यांना पडला आहे. म्हणून प्रत्येक साधकाने स्वतःच्या मार्गाबद्दलचा अभिमान सोडून त्या मार्गाचा शेवट लवकरात लवकर गाठायचा आपला प्रयत्‍न चालू ठेवला पाहीजे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की साधकाने आपण आपले ध्येय विसरुन आपल्या साधनेच्या मार्गावरच प्रेम करायला लागलो आहोत हे कसे ओळखावे? साधनेचे ध्येय विसरुन स्वतःच्या साधनेच्या मार्गातच आपण आनंद मानायला लागलो आहोत का हे ओळखायचे एक सोपे साधन म्हणजे आपण किती लोकांना त्यांनी न विचारता उपदेश द्यायला लागलो आहोत हे आपण बघावे. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही जीवनात कसे वागावे याचे धडे (त्यांनी न विचारता) देत आहात तेवढे तुम्ही स्वतःच्या ध्येयापासून दूर जात आहात हे लक्षात घ्या. असे बघा की जेव्हा तुम्हांला स्वतःच्या कचेरीत जायची खरी घाई असते तेव्हा दुसरीकडे लक्ष न देता केवळ आपल्या ऑफिसमध्ये आपण वेळेवर कसे पोहोचू या काळजीत तुम्ही चटचट पावले टाकीत जात असतात, मग वाटेत एखादा रस्त्यांत थुंकला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला फुरसत नसते. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या परमेश्वरप्राप्तीच्या ध्येयाकडे नजर ठेवून साधना करीत असता तोपर्यंत दुसरे त्यांची साधना नीट करीत आहेत की नाही, त्यांचे जीवन व्यवस्थित आहे की नाही याकडे तुमचे फारसे लक्ष नसते, मग त्यांना सल्ला द्यायची गोष्ट तर दूरच राहीली. याउलट अजून कचेरीत जायला भरपूर वेळ आहे ही जाणीव असली तर वाटेतील प्रत्येक व्यक्‍तीच्या चालण्याकडे, वागण्याकडे, आपले आपोआप लक्ष जाते (कारण आपल्या मनाला वेळ घालविण्याकरीता काहीतरी साधन सतत हवे असते). असे लक्ष गेले की त्यांच्या वागण्यातील (तुमच्या दृष्टीने) असलेला कमीपणा सुधारण्याकरीता अनेक सूचना मनात येतात. आता ज्या लोकांना स्वतःच्या वाचेवर प्रभुत्व प्राप्त झाले आहे त्यांना अशावेळी थांबविणारे फार थोडे असतात. वेळप्रसंगी जोरात वाद घालून ही माणसे आपले म्हणणे बरोबर कसे आहे हे दुसऱ्यांना पटवून देतातच. हे करण्यानी त्यांनी दुसऱ्यांचे जीवन समृध्द केले आहे अशीच त्यांची प्रामाणिक समजूत असते. काही काळाने दुसऱ्यांच्या जीवन जगण्यामधील त्रुटी दाखवून देणे हा एक छंदच लागतो. साधक मूळतः प्रामाणिक असल्याने त्याने दाखविलेल्या त्रुटी ह्या पूर्णतः खोट्या नसतात, त्यांच्या सांगण्यातील खरेपणामुळे साधकाचा विरोध करणे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. तत्वतः दुसऱ्या माणसाला असे कबूल करावेच लागते की जो सल्ला साधक आपल्याला देत आहे त्यात काहीच चुकी नाही, पण आतून भावनिकरीत्या त्यांना पटलेले नसते. त्यामुळे त्यांच्या वागण्यात फारसा फरक पडत नाही. मग साधकाला आपला सल्ला परत द्यायची जरुरी भासते. असा सल्ला देण्यातच आपण दुसऱ्यांचे भले करीत आहोत अशी साधकाची समजूत होते. परंतु ही समजुत चुकीची आहे असे साधकाने जाणून घेतले पाहीजे. असा सल्ला देण्यात मूळतः दोन प्रचंड चूका आहेत.

पहिली चुक म्हणजे तुम्हांला दुसऱ्यांच्या वागण्यात ज्या काही चूका दिसल्या आहेत, त्या चुका स्वतः करण्यात त्या माणसाची पुढची प्रगती ठरलेली आहे हे तुम्ही विसरलेले आहात. ज्याप्रमाणे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात, त्याचप्रमाणे काही काही चुका स्वतः करुन त्यांचे परीणाम भोगल्याशिवाय त्यांच्या पलिकडे जाता येत नाही हे साधकाने लक्षात घेतले पाहीजे व त्या चुकांकडे लक्ष न देता त्यापासून दुसऱ्याने काही बोध घेतला आहे की नाही हे पहावे. दुसरे कारण म्हणजे अशा चुका सतत दाखविण्यामध्ये आपण आपल्या साधनेच्या मार्गातील `सहिष्णुता ठेवणे’ या महत्वाच्या संकेताचे उल्लंघन करीत आहोत. आपला मार्ग एवढा स्वकेंद्रीत आहे की या मार्गावर चालताना दुसऱ्याचा फारसा विचार आपल्या मनात येत नाही. आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या देवाचे दर्शन आपण आपल्या संवेदनांनी घेणार असल्याने तेथे दुसरा मनुष्य उभाच राहू शकत नाही. एकदा दुसऱ्यांचे महत्व आपल्या जीवनातून कमी झाले की त्यांच्यांशी कसेही वागायचे स्वातंत्र्य आपल्याकडे येते. ह्या स्वातंत्र्याचा संपूर्ण जबाबदारीने उपयोग करणे म्हणजेच सहिष्णुता. जबाबदारीशिवाय असलेले स्वातंत्र्य हे नेहमी विनाशालाच कारणीभूत होते. तेव्हा सहिष्णुता हा गुण आत्मरुप जाणण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या सर्व साधकांनी आत्मसात करणे जरुरी आहे नाहीतर त्यांची प्रगती थांबायची शक्यता असते. ही गोष्ट स्पष्ट करायला खालील उदाहरण बघा.

आपण बघतो की वर्तमानपत्रात अनेक बैंका झीरो परसेंट कर्जाची जाहीरात करतात. त्या प्रत्येक जाहीरातीत त्यांच्या घोषणेवर एक * असे चिन्ह काढलेले असते. मग जाहीरातीच्या अगदी खाली कुठेतरी सर्वांत लहान अक्षरात त्या *चा अर्थ म्हणून लिहिलेले असते `काही अटी लागू’!! त्या अटी इतक्या कडक असतात की त्यांच्या घोषणेचा फार फायदा सर्वांना होत नाही. ज्यांना त्या कडक अटी पाळता येतात त्यांना आणि त्यांनाच ती घोषणा खरी उपयोगी असते. त्या अटी लक्षात न घेता कर्ज घेतले व नंतर अटी पाळल्या नाहीत तर बाजारदरापेक्षा खूप जास्त दरात व्याज द्यावे लागते! त्याचप्रमाणे स्वसंवेदनांनी आपले आत्मरुप जाणून घेणे हे ध्येय त्या झीरो परसेंट कर्जाच्या घोषणेप्रमाणे ज्यांना आकर्षक वाटत आहे त्यांनी आधी ही सहिष्णुता असण्याची कडक अट सांभाळली पाहीजे हे लक्षात घेतले पाहीजे. या मार्गाने जाण्याचा प्रयत्‍न करुन मग सहिष्णुता पाळली नाही तर तुमची अध्यात्मिक प्रगती दूरच राहीली, या जगातील समाजामध्येसुध्दा तुम्ही दिसलात तर लोक दूर पळायला लागतील!

आपल्या नमनातील ओव्या ही सूचनाच आज देत आहेत असे वाटते.

 

 

निरुपणाच्या ओव्या

 

 

आज आपण पंधराव्या अध्यायातील दोन ओव्यांवर विचार करायचा प्रयत्‍न करु. भगवंताच्या प्राप्तीकरीता साधना व्यवस्थित चालू असतानासुध्दा भगवंताचे दर्शन लवकर का होत नाही असे बऱ्याच साधकांना वाटते. बऱ्याचजणांना साधनेत अनेक चांगले अनुभव आल्यानंतर पुढे काय करावे हे कळत नाही. ह्या प्रश्नांचे उत्तर सांगणाऱ्या ह्या ओव्या आहेत. गीतेतील पंधराव्या अध्यायामधील अकराव्या श्लोकावर केलेल्या निरुपणात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत:

 

 

ना ना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्‍ताफळे ।

तरी तयांचे काय कळे । मोल मान ? ॥ ३९५:१५ ॥

 

 

तैसा चित्ती अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्राचा सरावो ।

ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते ॥ ३९६:१५ ॥

 

 

ह्या ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: `ज्याप्रमाणे डोळे घट्ट बांधून घेऊन वासाद्वारे आपण मोत्यांचे खरे मूल्य कधीही ठरवू शकत नाही, त्याचप्रमाणे जिव्हेवर सगळी शास्त्रे नांदत असली तरी मनात थोडासुध्दा अहंकार असेल तर अनेक कोटी जन्म गेले तरी मला (म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरुपाला) जाणता येणार नाही.’ नेहमीप्रमाणे ह्या ओव्या आपल्याला साधनेकरीता काय सूचना देत आहेत ते बघायचा आता आपण प्रयत्‍न करु.

आयुष्यातील सर्व गोष्टी आपण आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फतच ओळखतो. काही गोष्टी अनेक इंद्रियांमार्फत ओळखता येतात. उदाहरण द्यायचे झाले तर पिकलेला हापूस आंबा बघा. तो बघून, किंवा वास घेऊन किंवा चव घेऊन वा हाताळून ओळखता येतो. याउलट काही गोष्टी बघायला एका इंद्रियाचाच वापर करावा लागतो. उदाहरणार्थ रेडीयोवरुन येणारे सुंदर गाणे आपण फक्‍त ऐकूच शकतो. ज्याला ऐकायला येत नाही त्याला त्या गाण्याची जाणीवसुध्दा होऊ शकत नाही. मोती हासुध्दा त्या गाण्यासारखा आहे. त्याचे खरे मूल्य हे त्याला पाहूनच कळते. डोळे सोडून बाकीच्या इंद्रियांमार्फत आपण त्याला जाणूच शकत नाही. म्हणून डोळे बांधून मोत्याचे मूल्य ठरविणे ही कल्पनाच मुळी एक हास्यास्पद गोष्ट आहे. त्यामुळे वरील उदाहरणात मोत्याचे मूल्य नीट ठरविता येणार नाही असे नसून हातात आलेली वस्तू मोती आहे याची अजिबात कल्पनाच करता येणार नाही असे ज्ञानेश्वर महाराजांना सूचित करायचे आहे. ह्या उदाहरणाचा संदर्भ ठेवून पुढची ओवी असल्याने ज्याच्या मनात अहंकाराची थोडीशी जाणीव आहे त्याला परमेश्वर अर्धवट दिसेल असे न समजता अहंकार असलेल्या माणसाला परमेश्वर म्हणजे काय हे अजिबात कळणार नाही असे आपण जाणून घेतले पाहीजे. पहील्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज नाकाच्या रुपकाद्वारे डोळे सोडून बाकी सर्व इंद्रियांना सूचित करत आहेत कारण जी गोष्ट नाकाला लागू होते तीच कानाला वा जिव्हेला वा त्वचेला लागू होते. म्हणून जिभेवर नाचणाऱ्या सरस्वतीद्वारे ते आपल्या जीवनातील सर्व उच्च अनुभवांचा उल्लेख करीत आहेत असे आपण समजले पाहीजे. अशा रीतीने विचार केला तर असे वाटते की ह्या ओव्यांचा पारमार्थिक अर्थ `साधनेमुळे वा जीवनातील कुठल्याही एका अनुभवामुळे एखादी अत्यंत उच्च मानसिक अवस्था प्राप्त झाली तरी जोपर्यंत आपल्या जीवनातून अहंकार पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर म्हणजे काय हे अजिबात कळणार नाही’ असा होऊ शकतो (स्मशानात आलेले आत्यंतिक वैराग्य घरी आल्यावर का टीकत नाही याचे हे एक स्पष्टीकरण आहे).

तेव्हा भगवंताला जाणण्याकरीता आपला अहंकार जाणे जरुरी आहे हे स्पष्ट होते. परंतु हा अर्थ स्पष्ट झाल्यावर आत्मरुपात (म्हणजे `मी’पणात) देव आहे आणि अहंकार नष्ट झाल्याशिवाय तो दिसणार नाही ह्या गोष्टी प्रथमदर्शनी विरोधाभासी वाटतील त्याबद्दल विचार करु. आपले आत्मरुप म्हणजे आपल्या मनातील विचार, देहाची अवस्था अशी ज्यांची समजूत आहे त्यांना हा विरोधाभास जाणविल्याशिवाय राहणार नाही. ही शंका नाहीशी करायला आत्मरुप ह्या शब्दाची व्याख्या आपण बदलली पाहीजे. परमेश्वराचे आपल्या जीवनातील रुप म्हणजे आत्मरुप असे आपण समजतो (आणि ते बरोबरच आहे) आणि ते जाणून घ्यायला आपल्या इंद्रियांमार्फत ज्या संवेदना होतात त्यांच्याकडे नीट लक्ष देणे हा एकच मार्ग आपल्यासमोर आहे असे आपल्याला वाटते (आणि हेसुध्दा बरोबरच आहे!). परंतु मनाला होणाऱ्या जाणीवांमध्ये काही आपल्या स्वतःला होत असतात तर काही दुसऱ्यांच्या वागण्यातून निर्माण होत असतात. ह्यामध्ये आपल्या मनात आपणहून होणाऱ्या जाणीवांकडेच जास्त लक्ष देणे (कारण हे माझे आत्मरुप आहे) व दुसऱ्यांच्या वागण्याने निर्माण होणाऱ्या संवेदनांकडे कमी लक्ष देणे (कारण ती घटना त्यांचे आत्मरुप आहे ह्या कल्पनेने) असे आपण करायची शक्यता आहे. हे असे करणे म्हणजे आपल्या आत्मरुपावर बंधने लादणे होय. आपल्या स्वतःच्या देह-मनाच्या संकुलातून उत्पन्न होणाऱ्या जाणीवांमध्येच आपले आत्मरुप शोधायचा प्रयत्‍न करणे चुकीचे आहे. ही भावना असणे म्हणजे अहंकार असणे होय आणि जगातील कुठल्याही व्यक्‍तीच्या वागण्याने मनात एखादी भावना निर्माण झाली तरी ती आपल्या स्वतःच्या करण्याने झाली असल्यासारखी मानणे म्हणजेच अहंकार नष्ट होणे होय. असे करण्याने आपण आपल्या संकुचित `मी’पणातून विश्वव्यापक `मी’पणात जात असतो. उदाहरणार्थ, दुसऱ्याला राग आला असे आपल्या वाटते तेव्हा आपल्यात सुप्त स्थितीत असलेल्या रागाचीच ओळख आपल्याला होत असते. कारण जर आपल्या मनामध्ये राग म्हणजे काय याची जाणीव अस्तित्वात नसती तर दुसऱ्याला राग आला आहे हे ओळखणे आपल्याला अशक्य झाले असते. एखाद्या लहान मुलाला कावळा सोडून दुसरा पक्षी माहीती नसला तर त्याला सर्व पक्षी कावळेच वाटतात त्याप्रमाणे आपल्या मनात केवळ आनंदच भरला असेल दुसऱ्यांचे काहीही वागणे आनंददायकच आहे असे वाटले असते. तेव्हा दुसऱ्याला राग आला, मला आला नाही हा विचार म्हणजे पळवाट आहे. या पळवाटेत आपण आपले खरे आत्मरुप ओळखण्यापासून दूर जात आसतो हे ध्यानात घेतले पाहीजे.

दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर परमेश्वराचे खरे रुप म्हणजे आपण एक अत्यंत सुंदर, विहंगम दृष्य मानू शकतो. आपल्या देह-मनाच्या मार्फत ज्या काही जाणीवा आपल्याला होत आहेत त्या म्हणजे आपल्या समोर असलेल्या खिडकीतून त्या दृष्याकडे पाहणे होय. तसे बघण्यात सबंध दृष्य आपल्याला दिसू शकत नाही. आपल्या या बंधनांची दया येऊन भगवान आपल्या जीवनात काही गोष्टी दुसऱ्यांच्या देह-मनामार्फत घडवून आणतो. त्याचे असे करणे म्हणजे त्या एकाच सुंदर देखाव्याचे दुसऱ्या एका खिडकीतून दृष्य दाखविण्यासारखे आहे. ज्याक्षणी आपण दुसऱ्या खिडकीतून दृष्य बघतो, त्याचक्षणी ते बघणे आपल्या जीवनाचाच एक भाग बनते. त्या खिडकीतून जे काही दिसले आहे त्यामुळे आपले जीवन अधिक प्रगल्भ बनले आहे हे आपण नाकारु शकत नाही. म्हणून आपले आत्मरुप म्हणजे केवळ आपल्या जगण्यातून आलेले विचार नसून दुसऱ्यांच्या वागण्यातसुध्दा आपलेच वेगळे रुप आपल्याला दिसत असते हे आपण मान्य करुन आपली `हे विश्वचि माझे घर, किंबहुना चराचर आपण जाहला’ अशी अवस्था प्राप्त करुन घेतली पाहीजे. ह्या गोष्टीचे एक अंतिम उदाहरण म्हणजे अकराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या स्वतःच्या खिडकीतून परमेश्वराचे दृष्य दाखविले हे होय (विश्वरुप दर्शन). अहंकाराचा नाश म्हणजे मनाची अशी अवस्था होणे हे असल्याने आत्मरुप जाणणे आणि अहंकाराचा नाश होणे यात काहीही विरोधाभास नाही हे सहजच लक्षात येते.

खरे म्हणजे अध्यात्मावरील कुठलेही पुस्तक उघडले तर ही एक गोष्ट (अहंकाराचा नाश) सगळीकडे सांगितलेली दिसते. ह्यामध्ये नवीन असे आपल्याला काही वाटत नाही. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अहंकार नष्ट कसा करावा याबद्दल जेव्हा आपण विचार करु लागतो तेव्हा ह्या मार्गातील कठीणता आपणांस जाणवू लागते. आज आपण अहंकाराचे एक लक्षण बघू. या लक्षणाचा नाश म्हणजेच अहंकाराचा नाश असल्याने ते लक्षण आपल्या जीवनातून काढायचा प्रयत्‍न करणे ही आपली परमेश्वरप्राप्तीची साधना होऊ शकते. अहंकाराचे हे लक्षण म्हणजे आपल्या जीवनातील `बरोबर’ आणि `चुक’ हे दोन शब्द होय. जेवढे आपल्या जीवनातून हे दोन शब्द नाहीसे होतील तेवढा आपला अहंकार कमी झाला आहे असे आपण समजण्यास हरकत नाही.

याचे कारण असे की आपल्या जीवनात काय बरोबर आणि काय चुक हे आपण आपल्या पूर्वानुभवानेच ठरवितो. ज्या गोष्टींबद्दल आत्मीयता वाटत असते व त्या करणे चुकीचे नाही असे अनुभवाने (वा कुणाच्या सांगण्याने) पटले असते त्यांनाच आपण बरोबर म्हणतो व बाकीच्या सर्व गोष्टींना चुक मानतो. ह्या सर्वांमध्ये आपल्या संकुचित मीपणाचीच छाप असते. आणि एक गोष्ट म्हणजे असे ठरविण्यात आपण जीवनात एक सातत्य बघत असतो. कालपर्यंत बरोबर असलेली गोष्ट आजसुध्दा बरोबरच असणार असे मानत असतो. परंतु भगवंताला सातत्याचे बंधन नाही हे आपण लक्षात घेतले पाहीजे. कालपर्यंत पापी असलेल्या अजामेळाने एकदाच प्राणापासून भगवंताचे नाम घेतल्याने मुक्‍त करायचे स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे. मग ते नाम त्याने आपल्या मुलाला बोलविण्याकरीता घेतले होते ह्याकडेसुध्दा तो दुर्लक्ष करु शकतो. आपल्या बरोबर-चुक ठरविण्यामध्ये परमेश्वराला बंधनात टाकत आहोत (म्हणजेच आपल्या आत्मरुपाला बंधनात पाडत आहोत, म्हणजेच संकुचित मी होत आहोत). हे लक्षात आले की गोष्टींची बरोबर-चुक अशी वर्गवारी करणे हे अहंकाराचे लक्षण आहे हे सिध्द होते.

गोष्टींची बरोबर-चुक अशी वर्गवारी न करणेच बरोबर आहे याचे अजून एक कारण आहे. ते असे: आपण असे मान्य केले आहे की परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे (`नमोजी आद्या’ असे आपण दरवेळी म्हणतो) आणि त्याचे पालन तो स्वतः करीत आहे असेसुध्दा आपण समजत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या आज्ञेनेच घडली आहे असे आपण मानायलाच हवे, मग कुठलीही गोष्ट चुक कशी असू शकेल? सर्व विश्वाच्या रचनेला, सर्वांच्या आयुष्याचा भविष्यकाळाला जाणणाऱ्या, परमेश्वराच्या हातून चुक घडणे शक्य नाही असे आपण मानतो आणि त्याचवेळी दुसऱ्यांच्या वागण्यावर ताशेरे ओढतो हे अगदी चुकीचे आहे हे स्पष्टच आहे. दुसरी व्यक्‍तीसुध्दा परमेश्वराच्याच सूचनेप्रमाणे वागत आहे हे विसरल्यामुळेच त्याच्या वागण्याबद्दल आपण बरोबर किंवा चुक अशी वर्गवारी करतो. तसे विसरणे म्हणजे परमेश्वरापासून दूर होणे असल्याने आपल्या अहंकाराचा वास त्यातून दिसत आहे असे आपण मानले पाहीजे.

व्यावहारीक रीतीने एखादवेळेस आपण बरोबर-चूक अशी वर्गवारी करु शकतो व कधी-कधी करावीच लागते (आईला मुलाला वळण लावावेच लागते) परंतु तसे करताना आतुन अशी पूर्ण जाणीव ठेवणे आवश्यक आहे की बरोबर-चुक ह्या गोष्टींमध्ये भगवंत नाही. अगदी आवश्यक असेल तेव्हाच, कुणी विचारले तरच अशी वर्गवारी करावी व अध्यात्मिक जीवनात कधीही करु नये. ह्या वागण्यातच आपल्या अहंकाराचा नाश आहे आणि असे वागण्यास आपल्याला कुणीही थांबविले नाही वा व्यवहाराची बंधने आड येत नाहीत. आहे त्या गोष्टींचा कुठलीही वर्गवारी न करीता पूर्ण स्वीकार करणे हे जेवढे जमेल तेवढा आपला अहंकार कमी झाला आहे असे आपण समजू शकतो.

पूर्वी हिंदी सिनेमात एक गाणे होते `जो तुमको हो पसंद, वोही बात करेंगे/ तुम दिनको अगर रात कहो, तो रात कहेंगे’. हे गाणे आपण परमेश्वराकरीता सतत गायले पाहीजे! ह्या गाण्यातील संपूर्ण शरणागती सिनेमातील नटाने त्याच्या प्रेयसीकरीता केली म्हणून त्या भावनेचे महत्व कमी होत नाही. हीच भावना आपण परमेश्वराकडे वळविली तर तो प्रसन्न होईल यात शंका नाही! परमेश्वराने अपल्यासमोर आणलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असे जेवढे आपण मानायला लागू तेवढा आपला संकुचित अहंकार विश्वव्यापक बनायला लागेल यात शंका नाही.

अशा रीतीने अहंकार कमी करायला आज एक नवीन साधन आपणांस सापडले आहे. हे साधन म्हणजे `स्वतःने वा दुसऱ्या कुणीही केलेल्या गोष्टींची बरोबर-चुक अशी वर्गवारी करणे कमी करुन आहे तशा त्या गोष्टी स्विकारायचा प्रयत्‍न करणे’ हा होय. आज नमनाच्या ओवींव्या अर्थ शोधताना आपल्याला असे जाणविले की `सहिष्णुता’ असणे ही आत्मरुपाला जाणून घ्यायला आवश्यक अट आहे. त्याच्याशी सुसंगत असाच हा विचार आहे. कारण जर दुसऱ्याच्या वागण्याकडे बरोबर का चुक अशा दृष्टीने बघितले नाही तर त्याच्या वागण्याबद्दल कठोर शब्द कसे बाहेर निघतील? आपोआप सहिष्णुता अंगात येईलच.

तुमच्या जीवनात एखादी व्यक्‍ती तुम्हाला शारीरीक बंधनात पाडत असेल तर दुसरी एखादी व्यक्‍ती शारीरीकच नव्हे तर पूर्ण मानसिक स्वातंत्र्यसुध्दा तुम्हाला देत असेल. पण दुसऱ्या व्यक्‍तीचे उदाहरण आपण पहिल्या व्यक्‍तीला देऊ नये. दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत अशी जाणीव मनात सतत ठेवून दोघांवर एकसारखे प्रेम करायचा जो प्रयत्‍न करीत आहे त्याचा अहंकार कमी झाला आहे, तो परमेश्वराच्या जवळ गेला आहे असे समजावे. ही गोष्ट आचरणात आणायला अजिबात कठीण नाही. ती आचरणात आणायला फक्‍त आयुष्यात घडलेली कुठलीही गोष्ट बरोबर आहे किंवा चुक आहे अशी वर्गवारी करणे आपण सोडले पाहीजे इतकेच. खरे म्हणजे अशा सततच्या वर्गवारी करण्याचा आपल्या मनाला खूप त्रास होत आहे. सतत एकप्रकारचे दडपण जे आपल्या मनावर आहे ते काढून टाकण्याची शक्‍ती ह्या क्रियेत आहे. खांद्यावर एका मणाचे ओझे असताना ते काढून टाकले तर कसे वाटेल तसेच आपल्या मनाला प्रत्येक गोष्टीकडे चांगली का वाईट या नजरेने न बघण्याने वाटेल. असे करण्याने अहंकार कमीच होतो असे नाही तर आपले जीवन मोकळेपणाने जगण्याची प्रचंड शक्‍ती आपल्यात येते. अहंकार जाणे हे सर्व दृष्टीने इतके चांगले आहे की सारासार विचार करणाऱ्या सर्व लोकांनी तो पूर्णपणे नष्ट करावा हे वेगळे सांगायची जरुरी नाही. आज आपण तो नष्ट करायला एक वेगळे शस्त्र मिळविले आहे. त्याचा उपयोग करुन आपले जीवन अधिक समृध्द बनवावे अशीच ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा वरील दोन ओव्यांत व्यक्‍त होत आहे असे वाटते.

 

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २१ एप्रिल २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: