(517-520)/9: Worshipping the Abstract God

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुरुवातीचे नमन

 

नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

ज्ञानेश्वरीतील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ह्या ओव्या म्हणून मगच आपण प्रवचनाला का सुरुवात करतो? याचे कारण असे की, ह्या ओव्यांतून ह्या प्रवचनाला (किंवा अध्यात्माच्या मार्गावर) आपण का आलो हे आपल्याला नीट ध्यानात येते म्हणून. कुठल्याही गोष्टीचा संपूर्ण फायदा आपल्याला हवा असेल तर ती गोष्ट आपण का करतो याचे सतत ध्यान ठेवणे जरुरी असते. नाहीतर त्या गोष्टीच्या मुख्य अंगाकडे दुर्लक्ष होऊन दुसऱ्या कमी महत्वाच्या अंगाकडेच लक्ष जायची शक्यता असते. अर्थात जी गोष्ट मुळात चांगली असते तीचा फायदा हा होणार असतोच पण संपूर्ण फायदा व्हायला हेतूचे ध्यान सतत ठेवणे जरुरी आहे. या गोष्टीचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा आपण तीर्थयात्रा करतो, आपल्या गुरुंच्या ठिकाणी जातो, तेव्हा साधनेत प्रगती व्हावी म्हणून आपण येथे आलो आहोत ह्या हेतूचे विस्मरण झाले तर आपल्या यात्रेचा व्हावा तेवढा फायदा होत नाही. यात्रेच्या ठिकाणाहून परत आल्यावर परत आपले आयुष्य नेहमीसारखेच सुरु होते. जेव्हा आपल्याला असे वाटते की देवाकडे लक्ष द्यायची वेळ आलेली आहे तेव्हा कुठल्या देवाकडे आपण जावे? विष्णूकडे, का रामाकडे का भगवान शंकराकडे आपण जावे? ज्ञानेश्वर महाराज पहील्या ओवीत म्हणत आहेत की आपल्या संवेदनांनीच जाणून घेऊ शकणाऱ्या, ज्याच्याबद्दल सर्व वेद लिहीले आहेत अशा देवाकडे आपल्याला जायचे आहे, त्या देवाचे निवासस्थान आपले आत्मरुप हे आहे. पहिल्या ओवीतील सांगितलेल्या परमेश्वराकडे जायचे आहे आणि त्या आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या परमेश्वराच्या जवळ जाण्याकरीता आपण येथे जमलो आहोत.

आपल्यापैकी बऱ्याचजणांना देवाच्या एका मूर्तीची आवड असते. संध्याकाळी रामाच्या देवळात जाऊन आले की मन प्रसन्न होते असा कित्येकांचा अनुभव आहे. ही देवाच्या एका ठराविक अवताराची आवड चांगली आहे यात प्रश्नच नाही, पण ह्या चांगल्या गोष्टीचा उपयोग करुन आपल्याला त्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट प्राप्त करायची आहे हे लक्षात ठेवा. ती मूर्तीप्रेमापेक्षा उच्च असलेली गोष्ट म्हणजे परमेश्वराचे आपल्या बरोबर असलेले अजोड नाते जाणणे होय. देवाच्या एका ठराविक मूर्तीवर भक्‍ती करणे लोकांना सोपे वाटते, याचे एक कारण असे की रामाची मूर्ती पाहीली की लगेच त्याचे अनेक चांगले गुण आठवितात. त्याचे सत्य बोलणे, आई-वडिलांचा मान राखणे, रावणाचा नाश करणे इत्यादी गोष्टी आठवून असा अवतार झाला हे किती बरे झाले असे वाटायला लागते व मन भरुन येते. त्याचप्रमाणे कृष्णाची मूर्ती बघितली की प्रत्येकाच्या मनात (त्याच्या वयानुसार!) एका आदर्श मुलाची, सख्याची, प्रियकराची वा गुरुची प्रतिमा दिसते व त्या आदर्शत्वामुळे आपल्या मनाला त्या अवताराबद्दल साहजिकच ओढ लागते, प्रेम उत्पन्न होते. मनात भक्‍तीचा आपोआप उदय होतो. ही गोष्ट अतिशय चांगलीच आहे यात प्रश्न नाही. परंतु ही मूर्तीमुळे निर्माण झालेली भक्‍ती हे एक साधन आहे (साध्य नाही) हे लक्षात ठेवणे जरुरी आहे. या भक्‍तीचा उपयोग करुन आपल्याला अजून पुढे जायचे आहे हे आपण विसरता कामा नये. वास्तविक पाहता अशा भक्‍तीने आपले मन बराचवेळ प्रसन्न राहते, दररोजच्या धकाधकीच्या जीवनाचा विसर पडतो हे खरे आहे. त्यामुळे ह्यापुढे जायचे कारण काय असे तुम्हांला कदाचित वाटेल. ह्या भक्‍तीत गुंगून न जाता त्याहूनही पुढे जायचे असेल तर अशा भक्‍तीचा तोटा काय हे आपण सतत नजरेसमोर ठेवले पाहीजे. एकदा मूर्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या भक्‍तीच्या तोट्याची पूर्ण जाणीव झाली की त्यापुढे जायला हवे हे तुम्हाला वेगळे सांगावे लागणार नाही.

मूर्तीवर, वा एखाद्या गुरुतुल्य व्यक्‍तीवर असलेल्या भक्‍तीचा एक मोठा तोटा म्हणजे आपल्या मनातील ही भक्‍ती आणि आपले दररोजचे जीवन यात आपल्याला काहीही संबंध दिसत नाही हा होय. ज्याला रामाची ओढ आहे, त्याने रामनवमी साजरी केली, दररोज त्याची पूजा केली की आपले जीवन कसेही जगायला तो तयार होतो. आपल्या नातेवाईकांशी कठोर वागणे आणि रामावर भक्‍ती असणे यात कितीजणांना विसंगती दिसेल? एकदा मूर्तीची पूजा केली की आपली भक्‍ती सिध्द झाली असे म्हणून आपण आपले नेहमीचे जीवन आहे तसेच ठेवतो. (अर्थात, काही अत्यंत सूज्ञ माणसे रामाच्या भजनातच दिवसाचे चोवीस तास घालवितात व त्यामुळे या भक्‍तीशिवाय वेगळे जीवनच त्यांना रहात नाही. परंतु आपली अशी पुढील प्रगती करुन घेणारी माणसे फार विरळा आढळतात. आपण त्यांना सोडून आपल्यासारख्या माणसांची गोष्ट बघू.) माझ्या बायकोशी मी कसा वागतो, माझ्या आईची काळजी कशी घेतो (वा कशी घेत नाही!) यामध्ये रामाचा संबंध काय आहे असेच आपल्याला वाटते. रामाच्या देवळातून घरी आल्यावर तुमची भक्‍ती कुठे जाते? फार थोडी माणसे असे म्हणतात की मी रामावर भक्‍ती करतो म्हणजे मला त्याच्यासारखेच वागावे लागेल. माझ्या आयुष्यात रामासारखे वागणे हेच माझे ध्येय असायला हवे असे म्हणून भक्‍ती करणारे या जगात किती असतील? आपण आहोत का? रामाच्या मूर्तीसमोर लोटांगण घालून घरी परत आल्यावर माझ्या मुलावर मी उगाचच ओरडलो किंवा बायकोला कारणाशिवाय कठोर शब्द बोललो तर त्यामध्ये मला माझ्या भक्‍तपणात काही विसंगती दिसत नाही. `शेवटी व्यवहार हा वेगळाच असतो हो, त्यात साधे राहून चालत नाही’ असे परत म्हणायला आपण मोकळे! आपल्या अशा वागण्यात आपली चुकी न दिसणे हा या भक्‍तीचा मोठा तोटा आहे. याचा अर्थ असा की आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या रामाच्या भक्‍तीचा उपयोग कसा करुन घ्यावा हे न कळणे हा आपल्या भक्‍तीचा कमीपणा आहे.

याउलट, देवाला आपण जर आत्मरुपात बघितले तर ज्याक्षणी आपण स्वयंपाक करीत आहोत, आपल्या सुनेशी बोलत आहोत वा आपल्या मुलांकडे बघत आहोत त्या प्रत्येकक्षणी आपल्याबरोबर देव आहेच की! मग ज्याप्रमाणे देवळात आपण देवाचा आदर राखायला वागण्यात शुचित्व राखतो त्याचप्रमाणे (देव सतत बरोबर असल्याने) जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण वागण्यात आपोआप शुचित्व ठेवायला लागू. दररोजचा व्यवहार करताना देवळात असल्यासारखे वागू. आपण सतत देवासमोरच आहोत ही जाणीव जेव्हा जागृत होते तेव्हा आपली भक्‍ती एका वेगळ्याच, उच्च, पातळीवर गेली आहे असे समजायला काहीच हरकत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला न आवडणारी माणसे देवळात भेटली तरी आपण त्यांच्याशी सभ्यतेने वागतो, त्याचप्रमाणे देव सतत जवळ आहे ह्या भावनेमुळे तुम्ही जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीकडे सहीष्णुतेने बघायला लागाल. तुम्ही मनाने चांगले व्हाल!

असे बघा, एखादी कृती करत असताना आपल्या मनात चांगले विचार असणे याला फार महत्व आहे. बाहेरुन कृती चांगली असणे हेसुध्दा चांगलेच आहे, पण त्यात आपले मन शुध्द नसेल तर आपल्याला त्या चांगल्या कृतीचा अध्यात्मिक फायदा फार होत नाही. म्हणूनच सामाजिक कार्य करणारी माणसे अध्यात्मिक जगात उच्च पातळीवर असतीलच असे नाही. एखादेवेळी पाहुणे आल्यावर तुम्ही त्यांना वेळच्यावेळी चहा करुन दिला हे चांगलेच आहे पण त्यावेळी तुमची मनःस्थिती कशी होती हे स्वतः पाहणे आवश्यक आहे. काय कटकट आहे या भावनेने चहा करणे आणि `अतिथी देवो भव’ या भावनेने चहा करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे सांगायला हवे असे नाही. कर्तव्य म्हणून दुसऱ्यांना मदत करीत असताना तुमच्या मनात काय विचार येतात हे फक्‍त तुम्हांला माहीत आहे. सगळे जग तुमच्या बाह्य कृतींकडे बघून वाहव्वा करीत आहे पण केलेल्या चांगल्या गोष्टी प्रेमाने केल्या आहेत की नाही हे फक्‍त आपल्या स्वतःला माहीत असते. आयुष्यात जेवढ्या गोष्टी तुम्ही प्रेमाने कराल तेवढी अध्यात्मात तुमची प्रगती लवकर प्रगती होईल कारण आत्मरुपी देव आपल्या प्रेमयुक्‍त वागण्यानेच प्रसन्न होत असतो.

मग प्रश्न असा येतो की मनाने चांगले व्हायचे कसे? त्याकरीता पुढील एक विचार फार उपयुक्‍त आहे. तो म्हणजे दुसऱ्याला मदत करताना जी कंटाळवाणेपणाची भावना आपल्या मनात होती ती फक्‍त आपल्याला माहीती आहे असे तुम्हाला वाटत आहे ते चुकीचे आहे हा होय. जर आत्मरुपात देव आहे तर त्या देवाला तुमच्या मनाच्या अवस्थेची पूर्ण जाणीव आहे हे सहजच आहे. जगात तुम्ही मोठे सामाजिक कार्य केले, दहा जणांनी कौतुक केले तरी त्याचे महत्व फार नाही. मी इतक्या लोकांना सल्ला दिला तो त्यांनी परत माझ्याकडे यावे ह्या हेतूने दिला की परत यायची पाळी कधीही येऊ नये म्हणून दिला हे फक्‍त दोघांना माहीती आहे. एक तुम्ही आणि दुसरा म्हणजे तुमच्या आत्मरुपातील देव. याची जाणीव तुम्ही सतत ठेवा. ही जाणीव सतत ठेवणे म्हणजेच आत्मरुपी देवाचे अस्तित्व मान्य करणे होय आणि म्हणूनच त्याची भक्‍ती करणे होय.

आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या सर्व चुका देवाला माहीती आहेत या भावनेने अस्वस्थ होऊ नका. मनुष्यजन्माला आल्यावर कुणीही आदर्श राहूच शकत नाही. मनुष्याचा देह आल्यावरच का, आपल्या हिंदू धर्मातील देवसुध्दा आदर्श व्यक्‍तीमत्व नाहीत हे ध्यानात घ्या. इंद्रासारखा देवांचा राजादेखील स्वतःच्या देहाचे रुप बदलून दुसऱ्याच्या पत्नीचा उपभोग घ्यायला उद्युक्‍त होतो, तर आपल्यासारख्यांच्या हातून चुका होणार यात नवल काय आहे? म्हणून आपल्या हातून घडलेल्या चुकांनी बेचैन होऊ नका. त्या स्वीकार करा व आत्मरुपात स्थित असलेल्या देवाच्या चरणांवर अर्पण करा, आदर्श व्यक्‍ती बनायचा अजिबात प्रयत्‍न करु नका. कुठल्या भावनेनी तुम्ही कार्य करीत आहात हे नीट बघा असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्‍त तेवढेच करणे अपेक्षित आहे हे ध्यानात घ्या. मी अमुक एका कारणाने अमुक एक वागलो हे मला कळले आता पुढे काय? तर पुढे काहीही करायचे नाही! फक्‍त लक्ष द्यायचे आहे. आपल्याला एका साच्यात (आदर्श व्यक्‍तिमत्वाच्या) घालायचे नाही हे ध्यानात ठेवा. खरे म्हणजे आदर्श व्यक्‍तीमत्वाची कल्पना काही एक नाही. उलट जेवढ्या व्यक्‍ती आहेत तेवढ्या आदर्शतेच्या कल्पना आहेत. उदाहरणार्थ, लग्न झाल्यावर मुलीला आदर्श सून बनायचे असते तर सासूला असे वागायची इच्छा असते की लोकांनी आपला आदर्श ठेवावा. मुलाला आईची काळजी व्यवस्थित घ्यायची असते. आपापल्या कल्पनेप्रमाणे आपण स्वतःला साच्यात घालायचा प्रयत्‍न करत असतो. परंतु अशा प्रयत्‍नात आपण हे विसरतो की परमेश्वराने अशी कुठलीही अट घातली नाही की आधी अमुक अमुक व्यक्‍ती बना आणि मग माझ्याकडे या. तुम्ही असाल तसे स्वीकार करायची त्याची तयारी आहे. त्याची आपल्याकडून अपेक्षा फक्‍त आपण त्याच्याकडे जायचा प्रामाणिक प्रयत्‍न केला पाहीजे एवढीच आहे. आत्मरुपी देवाकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न म्हणजेच आपण आहे तसे प्रामाणिकपणे स्वीकार करणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या जीवनाचे ध्येय आपल्या अगदी जवळ असलेल्या परमेश्वराचे रुप जाणून घ्यायचे आहे असे ठेवा. मग बाकीच्या फार गोष्टी कळल्या नाहीत तरी चालेल. एकदा श्री हनुमान शांतपणे वनात श्रीराम, श्रीराम असा जप करीत बसलेले असताना त्यांना कुणीतरी विचारले की एवढा श्रीरामाचा जप तूम्ही करता, आयोध्येला कसे जायचे हे आम्हांला सांगितले तर आम्हीसुध्दा श्रीरामाचे दर्शन घेऊ. यावर तो म्हणाला, बाबांनो मला श्रीराम श्रीराम हे नाम घेणे या शिवाय या जगातील कुठलीही गोष्ट माहीती नाही. आयोध्येचा मार्ग तर सोडाच, आज पौर्णिमा आहे की अमावस्या आहे वा आत्ता दिवस आहे की रात्र आहे हेसुध्दा मला नीट सांगता येणार नाही. तुम्हीसुध्दा या श्रीरामाचे नाव कसे घ्यायचे हेच शिका. बाकी काही महत्वाचे नाही. याउलट आपल्याला आज कुठली तिथी आहे हे माहीती आहे, आयोध्येला कुठली गाडी जाते हे माहीती आहे फक्‍त हनुमानासारखे श्रीराम कसे म्हणावे हेच माहीती नाही! मूळ गोष्ट बाजूलाच ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्येच आपले सगळे लक्ष आहे! आता वेळ आलेली आहे की आपले ध्येय तरी आपण व्यवस्थित ठेवले पाहीजे, जगण्याचा हेतू शुध्द असला पाहीजे. मग ते ध्येय साध्य करु की नाही, शुध्द हेतू आचरणात आणू की नाही ही गोष्ट आपण नंतर पाहू. आपल्या नमनाच्या तीन ओव्यांपैकी पहीली ओवी कुठले ध्येय ठेवणे बरोबर आहे, कुठला हेतू शुध्द आहे, हे सांगत आहे आणि म्हणून आपण ती दरवेळी म्हणतो. आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या देवाचे दर्शन घेणे असे आपले ध्येय ठेवून जीवनातील सर्व कर्मे करावी असे श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पहील्या ओवीत सांगत आहेत.

आता दुसऱ्या ओवीकडे बघा. जेव्हा आपले ध्येय आत्मरुप जाणून घेणे आहे असे आपण निश्चयपूर्वक ठरवितो तेव्हा बाकीच्या लोकांचे आपल्या जीवनातील महत्व कमी व्हायला लागते. मी आणि देव ह्या दोघांतलाच खेळ खेळायचा असल्याने बाकीची सर्व माणसे, घटना म्हणजे केवळ त्या आत्मरुप जाणून घेण्याच्या खेळाचे साहित्य ठरतात. अशावेळी आपल्याला एक पोकळी जाणविण्याची शक्यता असते, ती पोकळी भरुन काढण्याकरीता आपण `जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीजप्ररो, हणावनि’ ही ओवी म्हणतो. आता ही पोकळी कोणती जे जाणण्याकरीता जरा कल्पना करा की तुमच्या जीवनातून तुमची मुले, सुना, बायको, आई-वडिल या सर्वांना काढून टाकले तर तुम्हाला काय वाटेल? खरे पहायला गेले तर आयुष्यभर आपण सतत दुसऱ्याचा विचार करुन जगत आलो आहोत असे दिसेल. लहानपणी आई काय म्हणेल या विचाराने आपले वागणे घडत होते तर मोठेपणी बायको (बाईच्या बाबतीत सासरची माणसे!) व नंतर वृध्दाप्यकाळी समाज काय म्हणेल याची काळजी करीतच आपण जगलो आहोत. अगदी स्वतःच्या मनासारखे वागायला आपल्याला कधी-कधीच मिळाले आहे. दुसऱ्यांकरीता सतत तडजोड केल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांकडूनसुध्दा तशीच अपेक्षा असते. जीवन जगताना आपल्या अपेक्षा दुसऱ्यांनी पुऱ्या केल्या की जगण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. म्हणूनच बऱ्याच बायकांची आयुष्य सफल झाले ह्याची व्याख्या म्हणजे `समाजात मान आहे आणि मुलगा व सून माझ्याशी नीट वागतात बरं का’ अशी असते! अशावेळी ह्या सर्वांचे महत्व आपण कमी केल्यावर, त्यांच्या निघून जाण्याने, आपल्याला एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळते हे खरेच आहे पण त्याचबरोबर जीवनात एक पोकळीसुध्दा तयार होते. ती पोकळी भरुन काढणे आवश्यक आहे. सर्व जगाच्या नाशाने आपल्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरायला एकच व्यक्‍ती समर्थ आहे. ती म्हणजे आपले सद्‌गुरु.

सध्या मला माहीती नसलेल्या परमेश्वराला शोधून काढायचे आहे असे जीवनाचे ध्येय ठरविले आणि या जगातील कुठलीही गोष्ट मला त्या ध्येयापर्यंत पोहोचविणार नाही तर केवळ आपल्या संवेदनांनी मला माझ्या जीवनातल्या भगवंताला जाणून घ्यायचे आहे अशी खात्री झाल्यावर जी एकटेपणाची भावना निर्माण होते, तीला काढून टाकणे जरुरी आहे. त्याकरीता हा जो स्वसंवेदनाचा वृक्ष तुमच्या जीवनात तयार झाला आहे त्याचे बीज आपल्या गुरुंनी पेरले आहे हे लक्षात ठेवा. ही गोष्ट ध्यानात आल्यावर आपला जन्म होण्याआधीपासून गुरु आपली काळजी घेत आहेत व सतत घेणार आहेत ही खात्री तुमच्या मनात होईल व जगातील आपल्या एकलेपणाची भावना नष्ट होईल.

तुम्ही म्हणाल की मला कुणी अनुग्रह दिला नाही, मला कुणी मंत्र सांगितला नाही मग माझे गुरु आहेत असे मी कसे मानू? असे बघा, अनुग्रह देणारे गुरु हे तुमच्या सद्‌गुरुंची एक छाया आहे. ज्या गुरुंकडून तुम्ही मंत्राची वा अनुग्रहाची अपेक्षा करता, त्या गुरुंचा देह तुमचे गुरु नाहीत, तर त्या देहामार्फत तुमच्या स्वतःच्या सद्‌गुरुंनी एक बाह्य अवतार घेतला आहे असे तुम्ही मानले पाहीजे. श्री रमणमहर्षी नेहमी म्हणायचे की एकच गुरु या जगात आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की मी काही कुणाचा गुरु नाही, खरे गुरुतत्व हे एकच आहे, ते म्हणजे निर्गुण परमेश्वर. म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञानी गुरुंचा अनुग्रह मिळाला आहे त्यांनी आपल्या पूर्वप्रारब्धामुळे या जगात ह्रुदयातील सद्‌गुरुंचे प्रतिबिंब प्राप्त झाले आहे असे मानायला पाहीजे. आपले पूर्वसुकृत त्यांच्याएवढे चांगले नसले तरी निर्गुणरुपात आपल्या सर्वांकडे गुरु आहेतच ही भावना जागृत ठेवा. ह्या निर्गुण रुपातील गुरुंचे अस्तित्व आपल्या नेहमीच्या जीवनात बघायची सवय लावा. असे बघा की जेव्हा जेव्हा आपल्याला अत्यंत अस्वस्थ करणारी घटना घडते, मन पराकोटीचे चलबिचल होते तेव्हा तेव्हा आपल्या सर्वांना ह्या कठीण प्रसंगी कसे वागावे याचे एक आपोआप ज्ञान आतून होते. (आपण त्याप्रमाणे वागू शकतो की नाही हा भाग वेगळा आहे.) ही कठीण प्रसंगीची अंतर्स्फूर्ती कुठून आली? कशी आली? तुम्ही विचार केला तर असे दिसून येईल की त्या मोक्याच्यावेळी आतून आलेल्या सूचनेमध्ये कुठलीही भावना अजिबात नसते. अगदी निर्विकारपणे, एखाद्या परीक्षेतील प्रश्नाचे उत्तर द्यावे तसे आपल्याला कळते की आता काय करावे, कुणाला मदत मागावी, कसे वागावे. हे उत्तर आपल्या मानसिक चलबिचलतेहून अगदी भिन्न असते, जसे काही कुणी दुसऱ्या माणसाने उपदेश केला आहे असे आपल्याला तेव्हा वाटते. ह्या उत्तर येण्यातच आपल्या ह्रुदयातील निर्गुण रुपातील सद्‍गुरुचे अस्तित्व सिध्द होते हे ध्यानात घ्या. त्या उत्तरामधील तटस्थता असे सांगत आहे की हे उत्तर आपल्या बुध्दीने आलेले नाही. कधी कधी मिळालेले उत्तर एवढे विचित्र असते की आयुष्यात ते लागू करण्याचे धैर्य आपल्यात नसते! असे कसे करता येईल? या विचाराने आपण मग ते उत्तर आणि आपले आत्तापर्यंतचे जीवन (व आपल्या भविष्याच्या अपेक्षा) यात एक तडजोडीचा मार्ग काढतो. ही तडजोड करणे म्हणजे सद्‌गुरुंच्या सल्ल्याप्रमाणे न वागणे होय हे आपल्या लक्षातसुध्दा येत नाही व आपल्या नकळत आपण सद्‌गुरुंहून दूर जात असतो. साधनेच्या मार्गावर चालताना सुरुवातीला तुम्हाला असे वाटायची शक्यता आहे की मी कुणाची मुलगी नाही, आई नाही, बायको नाही, सून नाही तर मी आहे तरी कोण? या नात्यांमध्ये आपण सतत राहीलो असल्याने ओळखीने प्राप्त झालेली एक सुरक्षितता आहे ती गमावू अशी भीती तुम्हाला वाटेल (आणि ती वाटणे साहजिक आहे) तेव्हा तुम्ही फक्‍त असा विचार करा की मी जी काही व्यक्‍ती आहे तीच्याबरोबर सद्‌गुरु सतत आहेत. हे दुसऱ्या ओवीचे सांगणे आहे.

आता ही प्रक्रिया केव्हा सुरु करायची? जीवनाचे ध्येय बदलायची वेळ आली आहे हे केव्हा समजायचे ह्या करीता तिसरी ओवी आहे. ती पसायदानातील ओवी म्हणत आहे `पूर्ण होऊनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित’. तुमची सध्याची जी जीवनातील ध्येये आहेत ती सर्व पूर्ण झाल्यावर तुम्ही आदिपुरुषाला भजा (हा आदिपुरुष आणि पहिल्या ओवीतला `आद्या’ एकच आहेत. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्ञानेश्वर महाराज एकच गोष्ट परत परत सांगत आहेत!). आपली सध्याची जी ध्येये आहेत ती पुरी झाल्यावर आपण लगेच जीवनाचा अंत करायला तयार आहोत का? समजा तुमच्या मुलाला मैट्रीकच्या परिक्षेत उत्तम गुण मिळालेच पाहीजेत हे सध्याचे तुमचे ध्येय आहे, त्याकरीता अहोरात्र तुम्ही त्याच्या अभ्यासात मदत करीत आहात. त्या मुलाला खरेच चांगले गुण मिळाल्यावर तुम्ही असे म्हणत नाही की माझ्या सर्व इच्छा पुऱ्या झाल्या आहेत, आता पुढे काहीही नको. लगेच त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहीजे अशी इच्छा निर्माण होते. त्याचे सर्व शिक्षण पूर्ण झाले तरी आपले समाधान होत नाही. चांगली नोकरी पाहीजे, त्यानंतर चांगली बायको, त्याहीपुढे मूले, मग त्या मुलांच्या मुलांचे शिक्षण, मुंज आहेच की!! आपणच आपल्यापुढे सतत नवनव्या इच्छा निर्माण करीत असतो. त्याच्या पूर्तीमध्येच आपले समाधान ठरवितो. खरे म्हणजे कुठलीही गोष्ट आपण ठरविली नाही की ती मिळाल्यावर आपण लगेच जीवनाचा अंत करु. खरे म्हणजे जीवनाचे ध्येय पूर्ण झाले असेल तर मग पुढे जगायचे कशाला? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लगेच समाधी घ्यायची इच्छा व्यक्‍त केली कारण आता यापुढे जगण्यात काय अर्थ आहे असे त्यांना वाटले होते. परंतु आपल्या सर्व इच्छा अशा असतात की त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपले जीवन अस्वस्थ होते पण त्या पूर्ण झाल्यामुळे जीवनात फारसा फरक पडत नाही हे ध्यानात घ्या. म्हणूनच परत नवनव्या इच्छा निर्माण होतातच. हे तुम्ही पूर्ण जाणून घेतले की सध्याच्या इच्छांचा मोह, त्यांचा तुमच्यावर असलेला पगडा कमी होईल, हळूहळू त्या इच्छाच नाहीशा होऊ लागतील. ज्ञानेश्वरांना सर्वजण पूर्ण होऊन मग अध्यात्माला लागावे असे जे वाटत आहे ती पूर्ण होण्याची अवस्था म्हणजे हे सध्याच्या इच्छांचे क्षुल्लक रुप जाणविणे होय. त्या इच्छांच्या पूर्तीमध्ये खरे समाधान नसते तर त्या इच्छांचा आपल्या मनावर पगडा कमी होणे यात त्यांची पूर्ती असते हे जाणून घ्या. तेव्हा तिसरी ओवी आपल्याला काय सांगत आहे तर अध्यात्माच्या मार्गावर पूर्ण झोकून द्यायची अवस्था आली आहे हे ओळखायला सध्याच्या जीवनातील इच्छांचे महत्व कमी झाले आहे का हे आपण बघावे. जर त्या इच्छांमध्ये फारसा रस वाटत नसेल तर आणि तरच तुम्ही आत्मरुपी देवाचे अखंडित भजन करायच्या पातळीवर आला आहात. नाहीतर व्यावहारीक इच्छांबद्दल तात्पुरते वैराग्य आले असेल, त्यांचा तुमच्यावर असलेला पगडा कमी झाला नसेल तरी जबरदस्तीने निर्गुण परमेश्वराच्या प्राप्तीकरीता प्रयत्‍न सुरु करणे म्हणजे सध्याची खोली घाण आहे म्हणून शेजारच्या खोलीत जाण्यासारखे आहे. त्या खोलीतील घाणीचा वास दुसऱ्या खोलीत येणार आहेच. आधी ती खोली साफ करा (वैराग्य अंगात आणा) मग दुसऱ्या खोलीत जा (साधना सुरु करा) असे ज्ञानेश्वर महाराजांना पसायदानातील ह्या ओवीतून सांगायचे आहे असे वाटते. व्यवहारातील एखाद्या गोष्टीकरीता मी जगतोय असे जोपर्यंत तुम्हाला वाटत आहे तोपर्यंत तुम्ही आदिपुरुषाचे भजन करायला योग्य नाही हे लक्षात घ्या. जगात अशी एकही गोष्ट नाही की त्याच्या प्राप्तीकरीताच मी जगत आहे असे जेव्हा तुम्हांला वाटायला लागले तर तुमची खरी साधना करायची वेळ आलेली आहे असे माना. या वेळीसुध्दा तुम्ही साधना सुरु केली नाही तर तुमच्या जीवनाचा संपूर्ण फायदा तुम्ही घेतला नाही असे होईल. तिसऱ्या ओवीचे हे सांगणे आहे असे वाटते.

खरे म्हणजे इतकावेळ आपण जे ऐकले ते म्हणजे प्रवचन देण्यामागचा उद्देश्य स्पष्ट करणे होय, अजून मूळ प्रवचन सुरुच झाले नाही! परंतु हा वेळ फुकट गेलेला नाही. कुणीही आपल्याला एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्या मनुष्याचा हेतू काय आहे हे कळणे जरुरी आहे. हेतू शुध्द आहे अशी खात्री तुम्हाला झाली तर तुम्ही आपणहून आज ऐकलेल्या विचारांना गंभीरपणे घ्याल. असे बघा प्रवचनकार एका मोठ्या शाश्वत सत्याबद्दल बोलण्याचा प्रयत्‍न करीत असला तरी त्याच्यात आणि घरी येऊन स्वस्तात कपडे धुवायचा साबण विकण्याऱ्यात तत्वतः फरक आहे असे मला वाटत नाही. दोघांना आपल्याजवळ असलेली वस्तू तुमच्याकरीता चांगली आहे असे पटवून तुमच्या गळ्यात मारायची असते!! साबणाचा विक्रेता तुमचे कपडे स्वच्छ होईल असे सांगतो तर प्रवचनकार तुमचे जीवन शुध्द होईल असे म्हणत असतो! आता फुकटात प्रवचन ऐकायला मिळते असे तुम्ही म्हणाल तर प्रवचन ऐकण्यामध्ये तुम्ही पैश्यापेक्षाही फार मोलाची किंमत देत असता. ती गोष्ट म्हणजे तुमचे अवधान, अथवा पूर्ण लक्ष. ज्याप्रमाणे साबणाच्या विक्रेताच्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन ते पटले तरच तो साबण विकत घेता, त्याचप्रमाणे आजच्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन ते पटले तरच ऐकलेले विचार घरी न्या. विचार पूर्ण पटलेले आहेत तरी त्याप्रमाणे वागायची तयारी नाही असे मात्र करु नका. कारण त्यामध्ये तुम्ही स्वतःशी अप्रामाणिक राहता. आणि स्वतःशी अप्रामाणिक म्हणजे आपल्या ह्रुदयात असलेल्या देवाशी अप्रामाणिक राहणे होय. मग तुम्ही खरे भक्‍त कसे होणार? जे काही मनापासून पटले आहे ते सर्व आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करणे हेच आत्मरुपी देवाच्या खऱ्या भक्‍तीचे रुप आहे. अशा भक्‍तीनेच आपल्यातील सुप्त देवाची आणि आपली ओळख होत असते हे लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वागायचा सतत प्रयत्‍न करा.

 

आजचे निरुपण

 

आज आपण गीतेच्या नवव्या अध्यायातील सर्वांत शेवटच्या श्लोकावर विचार करण्याचा प्रयास करणार आहोत. तो श्लोक असा आहे:

 

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्तैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४ : ९ ॥

 

ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या अशा आहेत:

 

तूं मन हे मीची करी । माझ्या भजनी प्रेम धरी ।

सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥ ५१७: ९ ॥

 

माझेनि अनुसंधाने देख । संकल्पु जाळणे निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८:९ ॥

 

ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।

हे अंतःकरणींचे तुजपासी । बोलिजत असे ॥ ५१९:९ ॥

 

अगा अवघिया चोरिया आपुले । जे सर्वस्व आम्ही ठेविले ।

ते पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥ ५२०:९ ॥

 

ह्या ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: तूझे सर्व मन माझ्यावर ठेव, माझ्या भजनावर प्रेम ठेव आणि सगळीकडे मला एकालाच नमस्कार कर. माझ्या अशा अनुसंधानाने जीवनातले सगळे संकल्प जाळून टाक. मग तू माझा खरा भक्‍त होशील. असे जर तू केलेस तर तुझ्यात आणि माझ्यात काहीही फरक राहणार नाही. सगळ्यांपासून चोरुन ठेवलेला हा मार्ग मी तुला उघड सांगत आहे त्याप्रमाणे तू वाग आणि सुखी हो.

आत्तापर्यंत आपण असे बघितले की जे काही आपल्या मनाला पटेल, स्वसंवेदनाने जाणवेल त्याप्रमाणे वागायचा प्रयत्‍न करावा हा एक भक्‍तीचा प्रकार आहे. वरील श्लोकात भगवान श्रीकृष्ण असे सांगत आहेत की जगात जे काही होत आहे त्याला तू माझेच रुप समजून नमस्कार कर, तसे वागण्यामुळे तू माझ्या स्वरुपाला पावशील. आधीच्या विचारांशी सुसंगत असाच हा श्लोक आहे. तेव्हा आत्तापर्यंतचे व्यक्‍तव्यसुध्दा ह्या श्लोकावरचेच निरुपण आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा ह्या श्लोकाचा नुसता शाब्दीकच नव्हे तर परमार्थाच्या मार्गातला अर्थसुध्दा आपल्याला कळला आहे. आता उरलेला वेळ आपण ह्या अर्थाप्रमाणे का वागायला हवे याचा विचार करु.

अर्थात पहिले कारण म्हणजे भगवंतांनी आपल्याला सतत माझे ध्यान कर असे सांगितले आहे तेव्हा ते बरोबरच असणार हे आहे. देवाने सांगितले आहे त्याप्रमाणे आपण वागू शकतो की नाही हे बघणे म्हणजे आपल्या भक्‍तीची खरी परीक्षा आहे. आपल्या असे लक्षात येईल की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला फार गुण मिळत नाहीत! परंतु म्हणून निराश व्हायला काहीही कारण नाही. आपली विचारप्रणाली बुध्दीवादी असल्याने दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागू शकत नाही हे कळल्यावर त्या बुध्दीचा उपयोग करुन आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. त्याकरीता आपल्या बुध्दीला असे पटवून द्यायला हवे की सतत भगवंताचा विचार करणेच आपल्याला उपयुक्‍त आहे, आणि त्यानेच आपले जीवन परीपूर्ण होईल. एकदा बुध्दीला पटले की मग आपोआपच आपले मन देवाचा विचार करायला लागेल.

भगवंताच्या ध्यानातच खरे सुख आहे हे पटण्याकरीता सध्याच्या जीवनात तुम्हाला काय कमी आहे याचा विचार करा. तुमच्या जीवनात तुम्ही पूर्ण सुखी असाल तर आहात तसेच रहा की. परमेश्वराचा विचार करुन मग सुखी व्हायची काहीच जरुरी नाही. तेव्हा तुम्ही आधी स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि ठरवा की तुम्ही सुखी आहात की नाही. जर सुख अजून वाढावे अशी अपेक्षा असेल आणि भगवंताकडे जाऊन ते वाढत असेल तरच देवाकडे यायचा प्रयत्‍न करा. असे प्रयत्‍न आपण खूप मनापासून आणि दीर्घकाळ करु शकतो. जीवनातले दुःख सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे शारीरीक आणि दुसरे म्हणजे मानसिक. पहिल्यात शारीरीक वेदना जाणविते तर दुसऱ्या प्रकारच्या दुःखात मनाला अस्वस्थ वाटते. शारीरीक दुःख कमी करायला देवाची प्रार्थना करणे बरोबर नाही कारण अमूर्त देवाला सगुण देहाची काळजी करायला सांगणे तत्वतःच चुकीचे आहे. परंतु ज्या मनाला मानसिक दुःखात त्रास होत असतो ते मनसुध्दा अमूर्त आहे. त्याचे दुःख दूर करायला अमूर्त उपायच शोधायला हवा (ज्याप्रमाणे काट्याने काटा काढता येतो तशी ही गोष्ट आहे!). म्हणून साधना सुरु करण्याकरीता जीवनातले दुःख बघताना फक्‍त मानसिक दुःखच बघा.

खरे म्हणजे जीवनातले सगळे दुःख मानसिकच असते. शारीरीक वेदना केवळ निमित्तमात्र असते. लहानपणी भरदुपारच्या उन्हात, डांबरी रस्त्यावर अनवाणी पायांनी क्रिकेट खेळताना शरीराला काय कमी त्रास व्हायचा? पण तो अजिबात जाणवायचा नाही कारण त्यावेळी आपले सगळे लक्ष खेळाकडे असायचे. तेव्हा शरीराला वेदना झाली म्हणून दुःख होतेच असे नाही. याउलट त्याचवेळी खेळातून आईने काम करायला बोलाविले (जा, हे गहू गिरणीतून दळून आण!) की लगेच त्या दुपारच्या उन्हाची, तहानेची जाणीव होऊन दुःख व्हायचे, मनाची तडफड व्हायची! शारीरीक त्रास क्रिकेट खेळताना जास्तच असतो पण त्याने दुःख होत नाही तर जवळच्या दुकानात चालत जाण्यात दुःख होते. म्हणून शारीरीक व्यथांमध्ये दुःख नसते हे आधी जाणून घ्या व त्या बाजूला ठेवा. शरीरामध्येच इतके वर्षे गुंतून गेल्यामुळे शारीरीक व्यथांकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही हे मान्य आहे पण त्या व्यथांमध्ये तुमच्या दुःखाचे मूळ नाही ही सत्य परीस्थिती आपण जाणून घेतली पाहीजे. केवळ आत्तापर्यंत माहीती नव्हती म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. विचार करा आणि बघा की शरीर हे निर्जीव आहे आणि सगळे दुःख मनात होत असते. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करायला शिका. परमार्थाच्या प्रगतीत आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करता येणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तो गाठा.

मानसिक दुःखाकडे बघायचे झाले तर तुमच्या असे लक्षात येईल की तुम्ही सारखे दुःखातच आहात. सकाळी उठल्यावर नवऱ्याकरीता चहा केला पाहीजे. नंतर डब्यात जेवण द्यायला स्वयंपाक केला पाहीजे आणि तो नीट झाला पाहीजे, मग आंघोळ करुन भाजी आणायला जायला पाहीजे इत्यादींपैकी किती गोष्टी तुम्ही आनंदाने करीता? प्रत्येकवेळी छोट्या छोट्या दुःखालाच सामोरे जायला लागते. मग कधी कधी अचानक मुलगा वा नवरा म्हणतो की आज भाजी छान झाली होती तेव्हा सुख लाभते. पण असे सुख किती क्षणिक आणि दुर्मिळ असते हे आपण सर्व जाणतोच. आपल्या दररोजच्या जीवनातला कामाचा रगाडा आनंदाने करणारे फार थोडे भाग्यवंत जन्माला आले आहेत. आपण सर्वजण लहानपणी क्रिकेट खेळताना सूर्याचा तडाखा जाणवित नाही, तापलेला डांबरी रस्ता, डोक्यावरचा सूर्य जाणवित नाही अशा अवस्थेत आहोत. आपल्या संसाराच्या खेळात आपण एवढे गुंगून गेलो आहोत की हे दररोजची छोटी छोटी दुःखे आपल्याला जाणवित नाहीत. म्हणून आपल्याला संतांच्या सांगण्याप्रमाणे वागताना आईने बऱ्याचवेळाने खेळात फलंदाजी आलेली असताना `आत्ताच्या आत्ता दळण आण’ असे सांगितल्यावर कसे वाटते तसे वाटते. खरे म्हणजे त्या दळण आणण्यात कमी कष्ट आहेत आणि त्या कृत्याचा परीणाम चांगला आहे (आपल्याला वेळच्यावेळी जेवण मिळणार आहे!) हे माहीती असूनसुध्दा आपण खेळातच अधिक रमतो तशी आपली अवस्था आहे. दररोजच्या अनंत छोट्या छोट्या दुःखातून सुटण्याकरीता संसाराच्या खेळापासून थोडे अलिप्त होणे जरुरि आहे ही वस्तुस्थिती जाणून घ्या. मग तुम्हाला संसाराच्या खेळात अजून रमायचे असेल तर जरुर रमा. पण आज त्या खेळाची ओढ आधी जेवढी होती तेवढी नाही अशी तुमची अवस्था झाली असेल तर हा खेळ सोडायचे धैर्य दाखविणे जरुरी आहे.

एकदा तुमच्या मनात अशी भावना आली की मी सारखा उन्हात आहे की मग हा खेळ का खेळत आहे हा प्रश्न आपोआप येईल. सतत छोट्या छोट्या दुःखांची जाणीव झाली की सध्या संसारात जेवढे रमत आहात ते कमी कमी व्हायला लागेल. तेवढे तुम्ही देवाकडे जायचा आपोआप प्रयत्‍न करायला लागाल. `माझिया भजनी प्रेम धरी’ हे का करावे? तर त्याशिवाय जगणे असह्य आहे याची जाणीव झाल्यावरच. आणि ही जाणीव केव्हा होईल तर तुमच्या जीवनाकडे तुम्ही तटस्थतेने बघून त्यात दुःख आहे हे कबूल केल्यावरच. आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणे म्हणजेच आत्मरुपी देवाची भक्‍ती होय. `सर्वत्र नमस्कारी मज एकाते’ असे व्हायला, असा नमस्कार करायला, आधी आपण आपल्या जीवनातून थोडे दूर व्हायला हवे. आपला आपण स्वतःला नमस्कार करु शकतो का? आपल्या जीवनाकडे तटस्थपणे बघायला लागाल तेव्हा त्यातील परमेश्वराच्या रुपाला नमस्कार करायच्या ठिकाणी पोहोचाल. तुमच्या दररोजच्या जीवनाकडे जेवढे तुम्ही शांतपणे बघाल, स्वतःच्या भावनांचे विसर्जन करुन तटस्थपणे बघाल तेवढे तुम्ही परमेश्वराचे भजन करत आहात असे म्हणायला हरकत नाही. यालाच अनुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे सतत एका गोष्टीकडे लक्ष देणे. सतत स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे बघायचा प्रयत्‍न करणे म्हणजेच `माझेनि अनुसंधाने देख’. आयुष्यभर असे बघायचा चाळा लागला की स्वतःला काही हवे आहे असा विचार करायला वेळच उरत नाही. नुसते बघण्यातच आपला सर्व वेळ जात असल्याने आपल्याला स्वतःला काय हवे हा विचार करायलासुध्दा वेळ मिळत नाही. ही अवस्था म्हणजेच `संकल्पु जाळणे निःशेख’ होय. ज्याप्रमाणे रोमांचकारी सिनेमातल्या नटाच्या जीवनात घडणारे प्रसंग बघताना त्याला पुढे काहीतरी मिळावे अशी भावना यायला वेळच नसतो त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनात सतत होत राहीले की एक शांत भावना सतत मनात राहील. ही स्थितप्रज्ञता येईल त्यात तुम्ही राहीलात तर तुमच्यात आणि देवात काहीही फरक नाही असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. `ऐसा मिया आथिला होसी तेथ माझिया स्वरुपा पावसि’ असे ते अर्जुनाला सांगत आहेत हे लक्षात घ्या.

यात एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे. परमेश्वराजवळ गेल्यावर काय होईल याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात फार अतिरेकी कल्पना असतात. रामाने रावणाला मारल्याची आठवण येऊन, किंवा कृष्णाने अचानक प्रगट होऊन द्रौपदीला साड्या पुरविल्या ह्या गोष्टीने किंवा इतर कुठल्याही कारणाने देवाजवळ जाण्यात बऱ्याचवेळा आपण काही सिध्दींची अपेक्षा करीत असतो. जर आपण परमेश्वरासारखे झालो तर कुठेनाकुठे आपल्या सर्वांना असे वाटत असते की आपल्या हातात काही दिव्य शक्‍ती येतील. परंतु आपल्याला अशा दिव्य शक्‍ती असलेल्या देवाकडे जायचे नाही हे ध्यानात ठेवा. मूर्तींच्या देवाकडे जायचे नाही हे आपण पहिल्यांदाच बघितले. आपल्याला एवढ्या सूक्ष्म देवाकडे जायचे आहे की त्याच्यात सिध्दी असायला वावच नाही. आत्ता या क्षणी तो तुमच्यासमोर आहे असे मानायला हरकत नाही. तटस्थपणे बघण्यात देवाकडे जाणे आहे कारण तटस्थपणे बघायला एकाच जागा आहे ती म्हणजे परमेश्वराचे घर होय. म्हणून सतत जगातील सर्व गोष्टींपासून दूर झाल्यावर आपोआपच आपण देवाच्या रुपात विलीन होऊ हे लक्षात ठेवून आपण प्रयत्‍न केले पाहीजे. एवढी साधी गोष्ट म्हणजे साऱ्या परमार्थाचे सार आहे असे भगवान अर्जुनाला सांगत आहे. `अवघिया चोरीया आपुले, जे सर्वस्व आम्ही ठेविले’ ते आता उघड करुन सांगत आहेत.

तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपायला जाईपर्यंत आपले स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे पहायचा प्रयत्‍न करा असे या श्लोकाचे सांगणे आहे असे वाटते. रामायणातील खारीसारखा सतत प्रयत्‍न करीत रहा. मग रामाने अचानक त्या खारीला जवळ घेतले तसेच आत्मरुपी देव तुम्हांला जवळ घेईल. आपल्याच जीवनाकडे तटस्थपणे बघण्यातल्या आनंदाची एकदा सवय लागली की तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागलात असे समजा. हा आनंद उपभोगायची सवय लावून घ्या त्यामुळे कल्पनेच्या पलीकडची शांति तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याकडून फक्‍त प्रयत्‍नांची अपेक्षा आहे, प्रयत्‍न जरी नाही तरी विचार करा. स्वतःची स्वतः प्रगती करण्यातच खरा परमार्थ आहे असे सतत लक्षात ठेवा. नामदेवांच्याकडे दररोज स्वतः विठ्ठल जेवायला यायचे, पण देवाशी एवढी जवळीक असूनही त्यांना सर्वलोकांपुढे `मडके अजून कच्चे आहे’ हे ऐकावे लागले, ही मानहानी सहन करावी लागली. खरी प्रगती देवाच्या एका अवताराच्या सान्निध्यात नाही असे आपण ह्या गोष्टीवरुन शिकायला हवे. स्वतःचे मन कुठल्याही परिस्थितीत किती शांत आहे, प्रत्येक गोष्टीत देवाचा हात दिसत आहे की नाही याच्यातच आपली खरी प्रगती आपण पहायला शिकले पाहीजे आणि सतत प्रयत्‍न सुरु ठेवले पाहीजेत.

 

॥ हरि ॐ ॥

(पुण्यात दिनांक २६ मार्च २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: