(1400+1405)/18 : Merging with God

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।

तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ १४०० : १८ ॥

 

म्हणौनि मी होऊनि माते । सेवणे आहे आयिते ।

ते करी हाता येते । ज्ञाने येणे ॥ १४०५ : १८ ॥

 

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील वरील दोन ओव्यांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परमेश्वराला शरण कसे जावे याचा उपदेश करीत आहेत. ते म्हणतात: `ज्याप्रमाणे अलंकाराचे रुप गेल्यावर केवळ सोने शिल्लक राहते, किंवा तरंग शांत झाल्यावर नुसते पाणी राहते त्याप्रमाणे तू मला शरण ये. स्वतःला माझ्या रुपात विलीन केलेस की मला जाणून घेण्याकरीता तुला वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. असे संपूर्ण शरण जाणे तुला केवळ ज्ञानाने शक्य आहे.’ स्वतःला परमेश्वरामध्ये विलीन करायचे म्हणजे काय? कुठले ज्ञान प्राप्त केल्यावर हे शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरे बघायचा आपण आता प्रयत्‍न करु.

 

आपल्यामध्ये असलेले भगवंताचे सुप्त रुप

 

काही जणांची अशी कल्पना असते की जर आपल्याला भगवंतामध्ये विलीन व्हायचे असेल तर आपल्या शरीराचे काय होईल? आयुष्यभर शरीराचे रक्षण करायची सवय असल्याने भगवंताला अशा रीतीने शरण जाण्यामध्ये आपल्या शरीराचा नाश होणार असेल तर ते त्यांना सहन होत नाही. परंतु ही भीती बाळगायची काही गरज नाही. आपला देह आहे तसाच ठेवून आपण भगवंतामध्ये विलीन होऊ शकतो. आपल्या अस्तित्वाकडे बघायची आपली नजर फक्‍त बदलायची आवश्यकता आहे. आपल्यापैकी काही जणांनी “3-D” पोस्ट कार्ड बघितले असतील. सुरुवातीला त्यांच्यामध्ये आपल्याला काही चित्र दिसत नाही. परंतु त्या कागदाच्या पलिकडे एका बिंदूवर नजर स्थिर केली तर त्या कागदावरच्या विचित्र रेघोट्यांमध्ये अचानक एक सुंदर दृष्य आपल्याला दिसते. ते चित्र दुसऱ्या माणसाला आपण दाखवू शकत नाही. त्याला ते बघण्याकरीता स्वतः कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्या सध्याच्या जीवनातच भगवंताचे अस्तित्व आहे. ते दिसण्याकरीता आपल्या शरीराच्या पलिकडे आपली नजर स्थिर केली पाहीजे. मग आपल्याला भगवंताचे सुंदर रुप दिसेल. ते सतत बघत राहणे याचाच अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये विलीन करणे होय.

आपल्यामध्येच परमेश्वर आहे हे आपण कसे मानायचे? दररोजच्या जीवनात आपण इतक्या चुका करीत असतो की आपल्यासारख्या अत्यंत सामान्य माणसामध्ये भगवंत आहे याची आपण कल्पनासुध्दा करु शकत नाही. परमेश्वर म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीती नसते. त्यामुळे आपल्या परमेश्वराबद्दलच्या कल्पना अवास्तव असतात. कुणाला भगवंत म्हणजे एक अमर्याद शक्‍ति वाटत असते. ती आपल्यात नसल्याने भगवंत स्वतःमध्ये आहे हे ते मानू शकत नाहीत. कुणाला भगवंताच्या सर्वज्ञानाबद्दल आत्मीयता असते व भगवंताला आपल्यामध्ये शोधताना ते कुठल्यातरी सिध्दीच्या प्राप्तीची अपेक्षा करतात. तशी सिध्दी प्राप्त न करीता परमेश्वर आपल्यात जन्मजात आहे हे ते मानू शकत नाहीत. काही ना काही कारणाने आपण स्वतःमध्ये भगवंत आहे हे पूर्णपणे मान्य करायला तयार नसतो. याशिवाय काहीजण असे म्हणतात की भगवंत सगळ्यांत असेल तर तो पापी लोकांमध्येही आहे. हे कसे असू शकेल. भगवंत त्यांना पाप करण्यापासून थांबवत का नाही? अनेक कुशंका काढून आपण ही गोष्ट सिध्द करायचा प्रयत्‍न करतो की परमेश्वर ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम, श्री रामकृष्ण परमहंस वगैरे थोर लोकांमध्ये आहे हे खरे व आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांमध्ये आहे हे खोटे. परंतु हा सर्व वाद परमेश्वर म्हणजे काय हे जाणून न घेताच चालला असतो! परमेश्वराची जी अनंत रुपे आहेत त्यापैकी कुठल्या रुपात तो आपल्या जवळ आहे हे आपण विचारले पाहिजे. या रास्त प्रश्नाचे उत्तर असे आहे: खरी गोष्ट अशी आहे की परमेश्वराचे आपल्या जीवनातले रुप म्हणजे आपल्या मनाची शांति आहे. आपले मन जेव्हा शांत असते त्याक्षणी प्रत्यक्ष परमेश्वरच त्या रुपात आपल्या जवळ असतो.

हे असे कसे? माझ्या मनाची शांति मी केव्हाही मिळवू शकतो असे काही म्हणतील तर माझे मन कधीच शांत नसते असे काही म्हणतील. पहिल्या लोकांना परमेश्वर इतक्या सहजपणे प्राप्त कसा होईल अशी शंका येईल तर दुसऱ्या तऱ्हेच्या लोकांना आपल्यामध्ये परमेश्वर नाही याबद्दलची खात्री अजून दृढ होईल. पुढे जाण्याआधी ह्या आक्षेपांचे निरसन करणे आवश्यक आहे. ज्यांना असे वाटते की माझे मन कधीच शांत नसते त्यांनी आपल्या गाढ झोपेची अवस्था आठवावी. त्यावेळी त्यांना कुठल्याही दुःखाची जाणीव नव्हती. गाढ झोप लागली तर झोपेआधीची सर्व अस्वस्थता नाहीशी होऊन सकाळी अगदी ताजेतवाने होऊन जाग येते असा आपला सर्वांचा अनुभव आहे. म्हणजे तुमचे मन `कधीच’ शांत नव्हते असे कुणीच म्हणू शकत नाही. त्या शांत होण्यावर तुमचे प्रभुत्व नाही असे फारतर तुम्ही म्हणू शकता. आता ज्या लोकांना कधीही आपले मन आपण शांत ठेऊ शकतो असा अभिमान आहे त्यांनी स्वतः विचार करावा की कुठल्या उपायाने ते आपले मन शांत करु शकतात. या जगातील अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपले मन शांत ठेवेल असे खात्रीपूर्वक आपण सांगू शकतो. एखादा चांगला सिनेमा कधी मनाला प्रसन्नता देतो तर कधी मित्रांबरोबर घालविलेली संध्याकाळ आपल्याला समाधान देते. परंतु ते समाधान मिळण्याआधी आपण अशी खात्री कधीच देऊ शकत नाही की आज संपूर्ण समाधान मिळणार आहे. खरे म्हणजे संध्याकाळ चांगली गेली असे आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा आपल्या मनाला समाधान मिळाले आहे याची जाणीव आपल्याला होते. म्हणजे चांगली गोष्ट मिळाल्यावर समाधान मिळते असे नसून ज्या गोष्टीमुळे समाधान मिळते ती चांगली असे आपण सतत मानत आलो आहे. याचा अर्थ असा की मनाचे समाधान ही जीवनातील एक अशी गोष्ट आहे की तीच्यावर बाकीच्या गोष्टी करणे का न करणे आपण ठरवितो. एखादी गोष्ट चांगली आहे की नाही हे ठरवायचा आपला निकष म्हणजे त्या गोष्टीने आपल्या मनाला शांतता मिळाली की नाही हा असतो. ह्या दृष्टीने आपल्या जीवनाचा पाया म्हणजे ही शांति आहे. त्याचप्रमाणे जीवनातील आपल्या बऱ्याचशा उलाढालींचा हेतुही मनःशांति मिळविणे असतो. म्हणजे जीवनाचा उद्देश सुध्दा आपली मनःशांति आहे. परमेश्वराचे हे रुप आपल्या जीवनाचा पाया आणि कळस दोन्ही आहे!

आपल्याला मनाचे समाधान मिळेल ह्या आशेने अनेक गोष्टी आपण करतो व त्यातील काही आज काम करतात तर काही उद्या. आज ज्या लोकांबरोबर वेळ घालविल्याने मन प्रसन्न झाले आहे तीच माणसे उद्या आली तर समाधान मिळेलच याची खात्री आपण देऊ शकतो का? नाही हेच उत्तर आपल्याला ऐकायला मिळेल. अगदी साधना नित्य करणारे सुध्दा म्हणतात की आज साधना करुन मन शांत झाले नाही. काहीतरी चुकले असे वाटते! परमेश्वरप्राप्तीची साधनासुध्दा दरवेळी आपल्या मनाला शांति देईलच असे आपण सांगू शकत नाही. म्हणजे मनःशांति आपल्या हातात नसून ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे येते व जाते हे सर्वांच्या लक्षात येईल. खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपण सांसारीक गोष्टीमध्ये प्रसन्नता शोधत असतो आणि प्रसन्नता मिळाली तर त्या गोष्टीला आपलेसे करायचा प्रयत्‍न करतो. आपल्याला आशा असते की त्या गोष्टीमुळे आज सुख मिळाले, मन प्रसन्न झाले म्हणजे दररोज तसेच होईल. परंतु तसे होत नाही व म्हणून सतत नव्या नव्या गोष्टींच्या शोधात आपण भटकत असतो.

याचा अर्थ असा की आपली मनःशांति संसारातील कुठल्याही एका ठराविक गोष्टीवर अवलंबून नाही. जगातील सर्व गोष्टींच्या पलिकडे एकच अस्तित्व आहे. ते म्हणजे त्यांचा कर्ता उर्फ परमेश्वर होय. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे रुप म्हणजे मनाची शांति आहे. या जगातील प्रत्येक मानवाच्या जीवनात कधी ना कधी शांति भरलेली असतेच, कमीतकमी त्याच्या गाढ झोपेमध्ये तरी त्याला मिळतेच. ह्या दृष्टीने सर्व संत असे म्हणतात की प्रत्येकात परमेश्वर लपलेला आहे. त्या सध्या सुप्त स्थितीत असलेल्या परमेश्वराला शोधून काढून त्यामध्ये विलीन हो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.

 

साधकाच्या मनातील भगवंतामध्ये विलीन होण्यात असलेल्या शंका

 

मागील सर्व विवेचनामुळे हे स्पष्ट होते की भगवान श्रीकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वरामध्ये विलीन होण्याकरीता आपल्याला स्वतःच्या मनःशांतीत सतत राहीले पाहीजे. इथे काही लोक असा प्रश्न करतील की ही शांति गुरुंनी सांगितलेल्या साधनेने मिळवायला पाहीजे की मी स्वतः शोधून काढायची आहे? जर गुरुंनी सांगितलेल्या मार्गानेच शांति उपलब्ध होत असेल तर व्यवहारात एखादे काम मनासारखे झाल्यावर आपल्याला जे सुख लाभते, जी शांति प्राप्त होते ती खोटी आहे का? जर सांसारीक सुख खरे नाही असे मानले तर प्रपंचातल्या सुखाला मी सोडायचे का? साधनेने प्राप्त होणारी शांति प्रापंचिक गोष्टींच्या लाभाने होणाऱ्या शांतीपेक्षा वेगळी आहे का?

हा संभ्रम आपल्या साधनेबद्दल असलेल्या सध्याच्या अनास्थेचे मूळ आहे. जन्मापासून आपल्याला शारीरीक आनंद उपभोगायची इतकी सवय लागली आहे की ती सवय आपण सहजा सहजी सोडू शकत नाही. खरे म्हणजे त्या छोट्या सुखांनी आपल्याला इतका आनंद दिला आहे की ते सुख सोडायची आवश्यकता आपल्याला भासत नाही. म्हणून जर आपल्याला असे वाटले की साधनेचा आनंद उपभोगण्याकरीता आधी व्यवहारातील आनंद सोडायला हवा तर आपली साधनेबद्दलची आस्था नकळत कमी होते. मग जेव्हा साधना आणि व्यवहारातील एखादी गोष्ट यामध्ये द्वंद निर्माण होते तेव्हा दरवेळी साधना करु असे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आपल्याला ही भीती वाटते की समजा हे सध्याचे सुख सोडले आणि साधनेचे सुख मिळाले नाही तर `ना घर का ना घाट का’ अशा धोब्याच्या कुत्र्यासारखी आपली अवस्था होईल. त्यामुळे साधनेत पूर्णपणे झोकून द्यायला आपले मन तयार होत नाही. तेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर आपण नीट समजले पाहीजे.

लक्षात घ्या की खरे सुख हे एकच आहे. ते प्राप्त करण्याचा मार्गही एकच आहे. तो मार्ग म्हणजे आपल्या मनाने घडलेल्या गोष्टीचा संपूर्ण स्वीकार करणे. ह्याचा अर्थ असा की व्यवहारात जेव्हा आपल्याला सुख लाभते ते साधनेने प्राप्त केलेल्या सुखापेक्षा तत्वतः अजिबात भिन्न नसते! मग आपले सांसारीक सुख कितीही छोट्या वा अत्यंत मोठ्या कारणाने मिळालेले असो. उदाहरणार्थ, कधी ते सुख खूप दमलेले असताना सिगारेटचा एक झुरका घेतल्यावर मिळते, तर कधी आवडत्या व्यक्‍तीबरोबर मनासारखा वेळ घालविल्यावर ते मिळते तर कधी खूप कष्ट घेऊन प्राप्त केलेली गोष्ट हातात घेतल्यावर ते मिळते. कुठल्याही निमित्ताने आपल्या इंद्रियांमार्फत जे सुख आपण उपभोगतो त्यामध्ये आणि मन खूप एकाग्र करुन ध्यान केल्यावर, किंवा आपल्या गुरुंची सेवा केल्यावर मनाला जे बरं वाटतं त्यामध्ये काहीही फरक नसतो. आपल्याला सुख लाभते ते आपल्या मनाची चलबिचल थांबल्यामुळे प्राप्त झालेले असते. मनाची ती चंचलता थांबवायची कशी ह्याचा मार्ग फक्‍त दरवेळी वेगवेगळा असतो एवढेच. सांसारीक माणसाचा मार्ग व्यवहारातील गोष्टींच्या प्राप्तीमध्ये वा आपल्या प्रिय माणसांच्या सहवासामध्ये असतो तर पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्यांचा साधनेतील पयत्‍नांमध्ये असतो. परंतु ह्या सर्व मार्गांचा शेवट म्हणजे मनाची शांतता (म्हणजेच परमेश्वराचे सान्निध्य) एकच असतो.

वरील गोष्टीच्या पुष्टीकरीता ज्ञानेश्वरीकडे बघितल्यावर असे दिसेल की इंद्रियांनी प्राप्त होण्याऱ्या सुखाचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी पाचव्या अध्यायातील २२व्या श्लोकावर विवेचन करताना केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की `इंद्रियांच्या सुखात रहायचा प्रयत्‍न करणे म्हणजे आकाशात चमकलेल्या विजेच्या प्रकाशात जग पहायचा प्रयत्‍न करण्यासारखे आहे, यांनी दिलेले सुख म्हणजे सापाच्या फणीच्या सावलीने उंदराला जे सुख मिळते तसे आहे किंवा ढगाची सावली आहे म्हणुन घर कशाला बांधायचे असा विचार करण्यासारखे आहे.’ आता जोपर्यंत सापाची फणी डोलत आहे तोपर्यंत त्या फणीचि सावली व एका झाडाची सावली ह्यात फरक आहे का? विज चमकल्यावर जो उजेड पडतो त्यात व दिव्याच्या उजेडात काही फरक आहे का? फरक एवढाच आहे की सापाच्या फणीची सावली, मासा पकडण्याकरीता ठेवलेले गळातील आमिषाचे अन्न, वा ढगाची सावली अत्यंत अनित्य आहेत व त्या निघून गेल्यावर पुढे परत दुःख लिहून ठेवले आहे. ते सुख उपभोगण्यातच पुढे दुःख मांडून ठेवले आहे. पण जोपर्यंत ते सुख लाभत आहे तोपर्यंत त्या सुखात व साधनेच्या सुखात काही फरक आहे असे कुणी संतांनी सांगितलेले दिसत नाही. गोंदवलेकर महाराजसुध्दा एका प्रवचनात म्हणतात की `प्रापंचिक माणसे म्हणतात की इंद्रियांचे सुख आम्ही प्रत्यक्ष उपभोगतो, याउलट तुमच्या परमेश्वराच्या नामाचे सुख पुढे कधीतरी मिळेल या आशेवर आम्हांला जगावे लागते ते मी मानतो. मला तुमच्या इंद्रियांतर्फे मिळणाऱ्या सुखाबद्दल दोष दाखवायचा नाही तर ते आपल्याला सतत मिळेल या तुमच्या कल्पनेचा विरोध करायचा आहे. नित्य मिळणारे सुख हवे असेल तर ते विषयात मिळणार नाही हे तुम्हांला पटले की भगवंताच्या नामाची गोडी तुम्हाला येईल’ (पहा: गोंदवलेकर महाराज प्रवचने, दिनांक १८ फेब्रुवारी).

या सगळ्याचा अर्थ असा की साधनेमुळे आपल्याला काही वेगळे सुख मिळणार आहे असे नाही. जगात एकच सुख आहे व ते आपल्याला सतत, नळात असलेल्या पाण्यासारखे (पाणीटंचाई नसताना!!) केव्हाही उपलब्ध व्हायचे असेल तर साधना करणे, परमेश्वरात विलीन होणे आवश्यक आहे. ज्या लोकांना साधना केल्यामुळे माझ्या प्रपंचातील आवडत्या सुखांचा त्याग करावा लागणार आहे असे वाटत आहे त्यांनी ही भीती पूर्ण सोडून द्यावी. साधनेने तेच सुख सतत मिळणार आहे अशी खात्री ठेवावी व खुशाल साधनेच्या मार्गावर चालत रहावे.

एकदा का आपल्या जीवनातील परमेश्वराचे रुप कळले की आपण परमेश्वरापासून किती दूर आहोत हे स्वतः जाणून घेऊ शकतो. परमेश्वराचे रुप शांती असल्याने जर तो आपल्याजवळ असला तर आपण शांत असलो पाहीजे. म्हणजे सतत आपल्या स्वतःच्या सुखात जर आपण रहात असलो तर परमेश्वरापासून आपण फार दूर नाही हे स्पष्ट होते. याउलट मनःशांती म्हणजे काय हेसुध्दा आपल्याला कळत नसेल तर भगवंतापासून फार दूर आहोत हे सर्वांनी जाणावे. किती साधना केल्यावर भगवंताचे दर्शन होईल हा प्रश्न ज्यांना आहे त्यांसर्वांनी आपल्या जीवनाकडे `कारणाशिवाय मनःशांति किती आहे’ हा निकष लावून बघावे व स्वतःच या प्रश्नाचे उत्तर शोधावे. असे आढळून येईल की उगाचच मन शांत राहणे आपल्याला ठाऊकच नाही, मग ती अवस्था उपभोगणे दूरच राहीले.

परंतु आपण निराश होऊ नये. जगातील सर्व गोष्टींची सुरुवात अशी अत्यंत लहान स्वरुपातच झाली आहे हे आपण लक्षात ठेवावे. उदहरणार्थ, सध्या विमानाचा प्रवास इतका सहज झाला आहे पण सुरुवातीला पहिले उड्डाण केवळ १५ सेकंदांचे होते व त्याचीच वाहव्वा होत होती. आय.बी.एम. ह्या कंपनीने पहिला संगणक अमेरिकन सैन्याकरीता बनविला तो चार खोल्याभरुन होता व जेव्हा त्या कंपनीच्या चालकांना असे विचारले की २५ वर्षंनंतर किती संगणक विकले जातील तर खूप विचार करुन ते म्हणाले `चार!’. त्यावेळी संगणकात डेटा घालायला पंच कार्डस्‌ असायची. एका ठराविक क्रमानी ती घातली नाहीत तर सर्व ओंफस व्हायचे! सध्या संगणक इतका सर्वसाधारण झाला आहे पण त्याची सुरुवात अशी होती. हीच गोष्ट आपण प्रत्येक शोधाबाबत बघू शकतो. सुरुवातीला गाडीपेक्षा घोडा जास्त जोरात धावत असे व प्राण्याशिवाय चालणारी गाडी असणे हे केवळ गंमतीचे लक्षण होते. आता घोडागाडी शोधून सापडत नाही! टेलेफोनबद्दल हेच सांगता येईल. अगदी त्याचप्रमाणे आत्ता आपल्याजवळ मनःशांति कधीतरी आहे, तीच्यावर आपले प्रभुत्व नाही म्हणून निराश होऊ नये. जसे प्रयत्‍न आपण सर्वांनी मिळून वरील शोधांना जास्त आत्मसात करण्याकरीता केले तसेच प्रयत्‍न सत्‍संगतीने, सर्वांच्या बरोबर, आपल्या गुरुंच्या सान्निध्यात शांतीच्या प्राप्तीकरीता करावे.

व्यवहारातील वरील उदाहरणांनी तुमचे समाधान झाले नसेल तर निराश न होता मनःशांतीरुपी भगवंताच्या सान्निध्यात जायचे प्रयत्‍न करण्याकरीता दुसरे कारण आहे. ते म्हणजे सर्व संतांनी आपल्याला दिलेले आश्वासन. कुठल्याही संतांचे लिखाण पाहिल्यावर हे आढळून येते की भगवंताच्या प्राप्तीकरीता त्यांनी आपल्या पूर्वजीवनाला काही अटी घातल्या नाहीत. आहात तसे या, काही बदलायची गरज नाही. भगवंताचे नाव मनापासून घ्या, तेवढेच पुरेसे आहे असे सर्व सांगतात. याकरीता उदाहरण म्हणून घाण पाण्याचा प्रवाह गंगेच्या पाण्यात मिसळल्यावर सागरात जातोच असे ते सांगतात. गढूळ प्रवाह म्हणजे आपले सध्याचे अस्तित्व, गंगेचा प्रवाह म्हणजे आपली मनापासून केलेली साधना व सागर म्हणजे परमेश्वर. तेव्हा ज्या संतांनी आयुष्यात कधीही खोटे सांगितले नाही त्यांच्या या बोलण्यावर तरी आपण विश्वास ठेवला पाहीजे व मनातील सर्व शंका पूर्णपणे काढून सर्व लक्ष सतत मनःशांति मिळवायच्या साधनेकडे लावले पाहिजे.

 

भगवंतामध्ये आपले अस्तित्व विलीन करणे म्हणजे काय?

 

आता भगवंतात विलीन कसे व्हावे ते बघायचा आपण प्रयत्‍न करुया. एकच गोष्ट अनेक स्तरांवर अस्तित्वात असते. मुंगी असे आपण म्हणतो तेव्हा कधी एक अत्यंत लहान प्राणी ह्या हेतूने म्हणतो तर कधी आपल्या वजनाच्या अनेकपटीने जड गोष्टी उचलून अथक प्रयत्‍न करणारा जीव ह्या अर्थाने म्हणतो तर कधी अत्यंत आखीव-रेखीव समाज बनविणारा प्राणी ह्या अर्थाने म्हणत असतो. दुसरे उदाहरण म्हणजे माझ्या आईच्या मनातला मी, माझ्या मुलाच्या मनातला मी, माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याच्या मनातला मी अशी माझी अनेक रुपे एकाचवेळी मी सांभाळत असतो. ह्या तीन्ही व्यक्‍ति एकाचवेळी माझ्यासमोर आल्या तरी भांबावून न जाता सर्व नाती व्यवस्थित सांभाळतो. काही काळानंतर यातील कुठले अस्तित्व माझे मूळ स्वरुप आहे हे मी स्वतःच विसरलेलो असतो! मला परमेश्वरात विलीन करायचे तर यापैकी कुठले अस्तित्व विलीन करायचे? का ही सर्व एकदम विलीन करायची? हा संभ्रम आपल्या मनात उत्पन्न होतो.

या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याकरीता आपला उद्देश्य काय आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. साध्य काय आहे यावर साधना अवलंबून असते. आपले ध्येय शांतीरुपी भगवंताच्या रुपात विलीन होण्याचे आहे म्हणून आपले असे अस्तित्व शोधले पाहिजे जे आपल्याला शांतीपासून परावृत्त करीत आहे. असा कुठला स्वभाव आहे की जो आपल्याला मनःशांति मिळू देत नाही? जर तो स्वभाव काढून टाकला तर आपोआप शांति प्राप्त होईल व भगवंताचे सान्निध्य सदासर्व राहील. तो स्वभाव काढून टाकणे म्हणजेच आपण भगवंताच्या रुपात विलीन होणे होय.

एखद्या गोष्टीमुळे आपली शांति ढळायला एकच कारण आहे. अगदी शारीरीक दुःखसुध्दा आपल्या मनाची शांति ढवळेलच असे नाही. उदाहरणार्थ आपण बघतोच की आपल्या गुरुंच्या उत्सवामध्ये भाग घेताना आपल्याला शारीरीक कष्ट होत असतात, वारीमध्ये दररोजच्या आपल्या सवयीच्या गोष्टींमध्ये तडजोड करण्याशिवाय पर्यायच नसतो. परंतु त्यावेळी आपण आनंदाने सर्व कष्ट सहन करतो. तेव्हा कुठल्याही गोष्टीमुळे आपली शांति ढळत नसते. एखाद्या गोष्टीमुळे आपली शांती ढळते तेव्हा त्याचे कारण ती गोष्ट तशी घडली हे नसून म्हणजे त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या अपेक्षा हे आहे. जेव्हा अपेक्षेप्रमाणे गोष्ट घडत नाही तेव्हा आणि तेव्हाच आपली मनःशांति ढळते. याउलट एखाद्या गोष्टीपासून आपली काही अपेक्षा नसेल तर ती गोष्ट घडली नाही तरी मनःशांति ढळत नाही व मिळाली तर अजून मन प्रसन्न होते. म्हणजे ज्या गोष्टींमधून आपल्याला काही अपेक्षा नाही अशा गोष्टी करणे हे सतत सुखावह असते. आयुष्यभर कुठलातरी एक उद्देश्य समोर ठेवून जगणे यात आपण सर्वस्व मानत असतो त्याला अगदी विरुध्द असा हा विचार आहे. परंतु अपेक्षेविरहीत गोष्टी करणे याशिवाय शांति टिकवून ठेवायला दुसरा पर्याय नाही हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

परंतु अशा अनेक अपेक्षा असतात की त्या ठेवणे आपण अगदी योग्य मानत असतो. माझ्या मुलाने चांगले वागावे, समाजात कुणाला त्रास न होईल असे वागावे, नातेवाईकांकडून आपल्याला सहकार्य मिळावे, अडी-अडचणीला ते कामाला यावेत इत्यादी अनेक अपेक्षा आपल्या जीवनाचे एक अंग बनलेल्या असतात. आपले वागणे स्वतःच्या अपेक्षेमुळेच ठरत असल्याने काही वेळाने आपल्या आजूबाजूचे सर्वजण आपल्या अनेक अपेक्षेंमध्येच आपले व्यक्‍तिमत्व मापत असतात. उदाहरण म्हणजे, `घरी आल्यावर ह्यांना चहा लागतोच’, `मित्राची मदत करायला हा नेहमी तयार असतो’, `बायकोला दुःख झालेले ह्याला अजिबात चालत नाही’ `गुरुंनी सांगितले तर हा काहीही करेल पण मी सांगितले तर करेलच असे नाही’ इत्यादी अनेक गुण लोकांना आपले व्यक्‍तिमत्व काय आहे हे सांगत असतात. परंतु आपल्या ह्या प्रत्येक गुणांमागे स्वतःच्या वागण्याबाबत आपली कुठलीतरी अपेक्षा दडलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अत्यंत जपलेले व काळजीपूर्वक जोपासलेले हे आपले व्यक्‍तिमत्व आपण परमेश्वराच्या चरणीं अर्पण केले पाहिजे, विलीन केले पाहिजे. आपले असे आखीव व्यक्‍तिमत्व जेवढे कमी होईल तेवढे आपण समाजात मोकळे वागू शकू, तेवढ्या आपल्या स्वतःच्या वागण्याबद्दलच्या अपेक्षा कमी होतील. आणि जेवढ्या आपल्या अपेक्षा कमी असतील तेवढ्या जास्त सुखात आपण राहू, परमेश्वराच्या सान्निध्यात राहू.

आपल्या मनातील अपेक्षा म्हणजे काय तर गोष्टी कशा असाव्या याबद्दलची आपली ठाम मते. अपेक्षा कमी करणे म्हणजे आपल्या मनातील पूर्वग्रह आपण काढायला हवेत. जेवढे आपले पूर्वग्रह कमी होतील तेवढे आपण सत्य परीस्थितीच्या जवळ जाऊ शकतो. ह्या प्रक्रीयेची अंतिम अवस्था म्हणजे आपले मन इतके निर्मळ, पूर्वग्रहविरहीत होईल की घटना कशीही घडली तरी ती आहे तशी स्वीकारणे हा आपला स्वभाव होऊन जाईल. स्वतःची ठाम मते खरी बदलली आहेत की नाही हे कळणे कठीण असते. आपण योग्य मार्गावर जात आहोत की नाही हे कळण्याकरीता आजूबाजूचे लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बघायला हवे. आपली मते जर खरोखर बदलली असतील तर एखाद्या घटनेवर आपली प्रतिक्रिया इतकी नैसर्गिक, व स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या शिक्क्याशिवाय होईल की आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य होत राहील. `हा माणूस असे वागू शकेल असे आधी वाटले नव्हते बुवा’ असे कौतुकाचे बोल ते उघडपणे बोलतील. आपल्या नैसर्गिक प्रतिक्रिया जेव्हड्या जवळच्या लोकांना नवीन वाटतील तेव्हढा जास्त बदल आपल्यात झाला आहे हे आपण जाणावे. आपल्या मनातील शांति जेव्हा अधिक प्रगट होऊ लागते तेव्हा आजूबाजूच्या लोकांना आपल्याबद्दल एक आकर्षण वाटू लागते. जास्त लोक आपल्या जवळ रहायचा प्रयत्‍न करु लागतात. आपली काहीही कष्ट न करीता वाढलेली लोकप्रियतासुध्दा आपली साधनेतील प्रगती दर्शविते. अशा रीतीने आपले मन निर्मळ होत आहे की नाही हे बघण्याचे अनेक मार्ग साधकाकडे असतात. प्रगती होत आहे याचा आनंद मानून सतत साधना अधिक वाढवित राहणे, म्हणजे अधिकाधिक गोष्टींबद्दलची आपली ठाम मते बदलणे ज्यांना जमेल त्यांना परमेश्वराच्या रुपात विलीन होण्याचा मार्ग सापडला आहे असे मानायला हरकत नाही.

 

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक २४ फेब्रुवारी २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s