(263+264)/15: Believe in Your Experiences

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुरुवातीचे नमन

 

ज्ञानेश्वरी भगवद्गीतेतील भावार्थ उकलून दाखविण्याकरीता लिहीली आहे. ह्या पद्यरुपात असलेल्या भाष्यातील एक किंवा दोन ओव्या घेऊन आपल्या नेहमीच्या जीवनात त्या ओव्यांचा कसा उपयोग करायचा हे बघायचा प्रयत्‍न आपण नेहमी करतो. आपल्या सर्व प्रवचनांचा हाच एक उद्देश्य आहे, दुसरा काही नाही. परंतु प्रवचन सुरु करण्याआधी ज्ञानेश्वरीला रोजच्या जीवनात वापरायची प्रक्रीया कशी करावी, का करावी याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

दरवेळी ह्या ओव्यांचा नवीन अर्थ आपल्याला समजतो. आज त्या काय म्हणत आहेत? पहिल्या ओवीत ज्ञानेश्वरांनी आपण कुठल्या देवाच्या जवळ जायचा प्रयत्‍न करीत आहोत हे स्पष्ट केले आहे. ते सांगत आहेत की अशा देवाला आपण जाणण्याचा प्रयत्‍न केला पाहीजे की ज्याच्यामुळे ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. म्हणून ते म्हणतात `नमोजी आद्या’. आद्या ही अशी शक्‍ति आहे की जी सर्वसृष्टीच्या आधी होती व तीच्यामुळे हे विश्व निर्माण झाले आहे. भौतिकशास्त्रात जग निर्माण कसे झाले याबद्दल अनेक सिध्दांत आहेत. त्यापैकी सर्वांत प्रचलित म्हणजे big bang theory होय. थोडक्यात याबद्दल सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की यात असे मानले जाते की सुरुवातीला सर्व जग एका अत्यंत सूक्ष्म रुपात अस्तित्वात होते. त्या अवस्थेतील एका कणाचे वजन आपल्या सर्व पृथ्वीच्या वजनापेक्षाही जास्त असेल. अशा त्या अत्यंत घन पदार्थाचा अचानक एक मोठा स्फोट होऊन अनेक तुकडे झाले व ते तुकडे म्हणजेच हे सर्व तारांगण. ह्या रुपकामध्ये आद्या शब्दाचा अर्थ तो मोठा स्फोट होतो. याउलट वेदांतामध्ये असे मानले जाते की हे सर्व जग, हे सर्व विश्व देवाने केवळ लीला म्हणून निर्माण केले आहे. त्याने आपल्यापैकी प्रत्येकाला निर्माण करुन वेगवेगळ्या स्थितीत ठेवले आहे व ठेवलेल्या परीस्थितीतून आपण मार्ग कसा काढतो हे तो बघत आहे. आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडतात त्या सर्वांना आपण कसे उत्तर देत आहे तो बघत आहे. हाच त्याचा खेळ आहे. पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की अशा त्या देवाचे अनुसंधान आपल्याला ठेवायचे आहे. थोडक्यात म्हणजे तुमच्या दृष्टीने ज्या परमेश्वरापासून ही सर्व सृष्टी जन्माला आली आहे त्या देवाची भक्‍ति आपल्याला करायची आहे.

ह्या आदिपुरुषाची लीला कशी आहे? तो कसा खेळत आहे? याची कल्पना करायला व मनात ती कल्पना स्थिर व्हायला आपण खालील उदाहरण नीट बघू. कल्पना करा की मुंग्यांच्या वारुळाकडे मुंग्यांची रांग लागली आहे. प्रत्येक मुंगीच्या तोंडात काहीतरी आहे व त्या सर्व एका रेषेत वारुळाकडे जात आहेत. अशावेळी एक मुलगा तेथे येतो. थोडा वेळ अगदी स्तब्ध राहून तो कौतुकाने मुंग्या कसे अन्न घेऊन चालल्या आहेत ते बघेल. पण लगेचच वेळात त्याचा कंटाळा येऊन तो काहीतरी चाळे करायला लागेल. एक छोटीशी काठी घेऊन तो त्या रांगेच्या मधेच काय ठेवील, थोडे पाणी घेऊन तो मुंग्यांच्या मार्गात काय ओतेल…. त्याच्या चंचल मनात जे काय येईल त्याप्रमाणे वागून त्या मुंग्यांचे शिस्तबध्द वागणे मोडून मग काय गंमत होते हे पहायला तो लागेल. त्याच्या मनात मुंग्यांना जाणून बुजून त्रास द्यायचा नसतो तर केवळ स्वतःचा वेळ घालविण्याकरीता तो काहीतरी मार्ग शोधत असतो. खरे म्हणजे कुणी त्याला येऊन सांगितले की तुझ्या अशा वागण्याने मुंग्यांना इजा होत आहे तर त्याला त्यात आश्चर्यच वाटेल. तो कदाचित ते मान्यसुध्दा करणार नाही! आपले व्यवहारातील वागणे वरील उदाहरणातील त्या मुंग्यांसारखे आहे व तो मुलगा म्हणजे परमेश्वर. आपल्या सर्वांना कल्पना असते की आपल्याला काय मिळवायचे आहे व त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुठले कष्ट घ्यायला हवेत. आपले जीवन शक्यतो एका शिस्तबध्द पध्दतीमध्ये जगून आपण आपले अस्तित्व सुखी ठेवण्याचा प्रयत्‍न करीत असतो. ज्याप्रमाणे मुंग्या एका शिस्तीत वारुळात अन्न जमा करुन आपल्या भविष्याची तरतूद करीत असतात, अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात एक-एक गोष्टी जमा करीत असतो. दुरुन परमेश्वर अगदी मजेत हे सर्व बघत असतो. मुंग्यांप्रमाणेच आपल्या शारीरीक क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कष्ट आपण घेत आहे याचा त्याला थोडा वेळ आनंद होतो पण थोड्याच वेळात त्या एकरंगी खेळाचा कंटाळा येऊन तो आपले मनोरंजन करण्याकरीता आपल्या प्रयत्‍नांमध्ये अडथळा आणून मग आपण काय करतो हे पहायला लागतो. म्हणजे वरील उदाहरण आपल्या मनावर बिंबले तर आपल्या व्यावहारीक जीवनामधील सर्व अडथळे हे खुद्द परमेश्वराने निर्माण केले आहेत असे आपण मानू शकतो.

वरील उदाहरणातील लहान मुलाप्रमाणे केवळ स्वतःच्या मनोरंजनाकरीता भगवंत आपल्याला एवढा त्रास देत आहे हे कळल्यावर काही जणांना त्याच्या निर्दयतेबद्दल वाईट वाटेल. परंतु कुठलेही उदाहरण संपूर्णपणे एखादी गोष्ट सांगू शकत नाही. त्यातील मुलाने त्या मुंग्या निर्माण केल्या नव्हत्या! परंतु परमेश्वराला `आदिपुरुष’ मानले तर असे समजायला हवे की आपल्या सर्वांना त्यानेच निर्माण केले आहे. जर आपण स्वतः एखादी वस्तू निर्माण केली (समजा चहा केला) आणि ती मनासारखी झाली नाही तर त्या वस्तूचे काहीही करायला आपण मागेपुढे बघत नाही (जसा न आवडलेला चहा मोरीत ओतून देतो!), मग परमेश्वराला हे स्वातंत्र का असू नये?! जर आपले अस्तित्वच त्याच्यामुळे आहे तर त्याने आपल्याला व्यावहारीकदृष्टीने थोडा त्रास दिला तर आपण त्याला दुष्ट न मानता आपले काय चुकले म्हणून तो आपल्याला हा त्रास देत आहे हे बघितले पाहिजे.

भगवंताच्या निर्दयतेबद्दल तक्रार न करण्याकरीता दुसरे कारण आहे. तेसुध्दा आपण वरील उदाहरणामध्ये बघू शकतो. रांगेतील मुंग्यांना त्रास देणाऱ्या मुलाचे लक्ष जर काही अशा मुंग्यांकडे गेले की त्या खूप वाट चुकल्या आहेत तर तो अचानक एक काठी घेऊन त्यांना त्या काठीवरुन रांगेतील मुंग्यांजवळ नेतो व मग काय मजा येते ते बघत राहतो. त्या मुंग्यांना आपले सहकारी अचानक भेटलेले पाहून खूप आनंद होतो. एकमेकांची तोंडे जवळ आणून त्या आपल्या आनंद व्यक्‍त करतात व परत रांगेत लागतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात ह्या भगवंताने कितीतरी वेळा मदत केली आहे. चुकलेल्या मुंग्यांना ज्याप्रमाणे वेगळ्या विश्वातील मदतीच्या हाताशिवाय मार्ग सापडणे अशक्य होते, अशा अनाकलनीय मदतीशिवाय त्या आपला चुकलेला मार्ग परत शोधू शकल्या नसत्या, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण अनेकवेळा आपला साधनेचा मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गाने जायचा प्रयत्‍न करीत असतो. अशावेळी आपल्या चुका लक्षात आणून देणारा दुसरा कुणी नसून तोच भगवंत आहे की ज्याच्या वागण्याचा आत्ता तुम्हांला त्रास होत आहे. त्या परमेश्वराचे मदतीचे हात आपण ध्यानात ठेवले पाहीजेत व त्याच्या निष्ठूर स्वभावाबद्दल तक्रार करणे सोडले पाहीजे. आज पहिल्या ओवीचे आपल्याला हे सांगणे आहे असे वाटते.

मग जेव्हा आपल्या आयुष्यात दुःखद घटना घडतात व त्यामागील कारणे आपल्याला दिसत नाहीत तेव्हा काय विचार करावा? खरोखरच, आपल्या सगळ्यांना जीवनात कधी ना कधी कारणाशिवाय दुःख भोगावे लागले आहेच. कितीही प्रामाणिकपणे विचार करुन आपली चुक काय आहे हे शोधण्याचा प्रयत्‍न केला तरी अशावेळी आपली काय चुक होती की ज्यामुळे मला हा त्रास भोगावा लागत आहे याचे उत्तर आपल्याला सापडत नाही. शेवटी माझ्या आयुष्यात असे होणे ही परमेश्वराचीच इच्छा आहे असे मानण्याशिवाय काहीच गत्यंतर नसते. ह्या कठीण क्षणी परमेश्वराबद्दलची भक्‍ती कशी जागृत ठेवावी? याच्या उत्तराकरीता आपण परत वरील उदाहरणाकडे बघू. त्या मुलाने रांगेतील मुंग्यांना त्रास दिल्यानंतर काय होते? त्यातील काही मुंग्या आपला रस्ता परत शोधून काढतात. मध्ये काठी असेल तर त्या काठीला वळसा घालून परत वास घेत आपल्या पुढे गेलेल्या बांधवांना शोधून रांगेत येतात. अशावेळी त्या मुलाला खूप आनंद होतो. त्या स्वतःच्या प्रयत्‍नांनी वाट परत शोधणाऱ्या मुंग्यांबद्दल त्याला एक वेगळाच आदर वाटायला लागतो. मग तीचे वाट शोधणे हा कौशल्याचा भाग आहे की केवळ नशिबाने त्या परत मार्गावर आल्या आहेत हे पहायला तो परत त्रास देतो. जर सतत तीन-चार वेळा त्रास देऊनसुध्दा जर ती मुंगी आपली रांग शोधून काढत असेल तर तो त्या मुंगीचा नाद सोडून दुसऱ्या मुंगीकडे जातो! आपल्या अडचणीच्यावेळी आपण अशा शहाण्या मुंगीसारखे वागायला हवे. आपल्या परमार्थातील ध्येयापासून जर काही गोष्टी अचानक आपल्याला दूर नेत असतील तर आपल्यापरीने त्यांच्यावर मात करायचा प्रयत्‍न करून परत आपल्या ध्येयाकडे आपली वाटचाल सुरु ठेवली पाहीजे. ह्याकरीता साधनेचे ध्येय कुठले हे आपण सतत लक्षात ठेवायला हवे. नमनाच्या तीसऱ्या, पसायदानातील, ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आपले अंतिम ध्येय `भजिजो आदिपुरुखी, अखंडित’ हे असायला हवे. आपल्या सध्याच्या जीवनाच्या रगाड्यात आपल्याला एवढा वेळ मिळत नाही की आपण ह्या ध्येयाकडे जाऊ. मुलाने मुंग्यांच्या रांगेत घातलेली काठी, ओतलेले पाणी म्हणजे आपल्याच व्यवहारातील विविध आकांक्षा. आपल्या सगळ्या व्यावहारीक इच्छा (मग त्या `चांगल्या’ इच्छा असू देत किंवा `वाईट’ इच्छा असू देत) म्हणजेच भगवंताने निर्माण केलेले अडथळे होतात. त्यांच्यावर मात करुन (म्हणजे व्यावहारीक जगातील इच्छांबद्दलची आपली आत्मीयता कमी करुन) आपल्याला परत साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या माणसांकडे जाऊन रांग लावायची आहे. आज आपल्या नमनातील तीसऱ्या ओवीचे सांगणे असे वाटत आहे.

आता दुसरी ओवी काय म्हणत आहे हे पाहूया. जेव्हा तो मुलगा रांगेतील मुंग्यांना मार्गापासून विचलीत करतो तेव्हा त्यातील एखादी मुंगी आपला रस्ता, आपले मित्र यांपासून फार दूर जाते. ती मुलाच्या डोळ्याआड होण्याची पाळी येते. तेव्हा अचानक त्याला रस्ता अगदी पूर्णपणे चुकलेल्या मुंगीची दया येऊन तो तीला हातात घेऊन, किंवा काठीवर चढवून परत आधीच्या मार्गाजवळ आणतो. अजून त्या मुंगीला याची कल्पना आलेली नसते की अचानक ती आपल्या ध्येयाच्या खूप जवळ आली आहे. ती तशीच सैरभैर हिंडत असते, पण तीच्या नकळत कुणीतरी मदत केलेली असते. ह्या मदत करणाऱ्या शक्‍तीवर (म्हणजे मुलावर) मुंगीचा काही ताबा नसतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण व्यावहारीक जीवनात पूर्ण गुंगून जातो, तेव्हा आपल्या परमेश्वरप्राप्तीच्या ध्येयापासून खूप दूर जाऊन आपण परमेश्वराला संपूर्ण विसरतो. तेव्हा त्याला दया येऊन तो आपल्या जीवनात गुरु आणून त्यांच्या मार्फत आपल्याला स्वतःजवळ आणतो. गुरु भेटल्यामुळे आपण अचानक, काहीही कष्ट न करीता, किती एकदम देवाजवळ आलो आहोत याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. म्हणून अजून आपण त्या मुंगीसारखेच इकडे-तिकडे भटकत असतो. गुरुंच्या येण्यामुळे (व त्यांच्या येण्यावर आपला ताबा नसतो! त्यांना योग्य वाटेल तेव्हाच ते येतात) आपण आपल्या खऱ्या मित्रांच्या, खऱ्या ध्येयाच्या जवळ आलेलो असतो. सध्याच्या जीवनातून परमेश्वराकडे जायचा मार्ग कुठला हे आपल्याला गुरु सांगतात. आपल्या नेहमीच्या अस्तित्वापेक्षा, आपल्या कल्पनेच्या बाहेर असलेल्या, संपूर्ण वेगळ्या अशा दुनियेत नेण्याचे सामर्थ्य असलेल्या गुरुंना आपण घट्ट पकडले पाहीजे. या करीताच आपण नेहमी नमनात `जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो..’ ही ओवी वाचतो. आज ह्या ओवीचे आपल्याकरीता सांगणे हे आहे असे वाटते.

आपण नेहमी या तीन ओव्या वाचून मगच प्रवचन सुरु करण्याचे कारण काय आहे हे आज अशा रीतीने एका मुलाच्या मुंग्यांशी खेळण्याच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट झाले आहे! ह्या तीन ओव्यांचे अर्थ इतके अनंत आहेत की पुढच्यावेळी आपल्याला त्यांचे अजून एक वेगळे अंग पहायला मिळेल अशी आशा आपण करु.

 

निरुपणाच्या ओव्या

 

गीतेच्या पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्व म्हणजे काय हे स्पष्ट करण्याकरीता एका वृक्षाची उपमा दिली. हा वृक्ष कसा आहे? नेहमी दिसणाऱ्या झाडांसारखा हा नाही तर ह्या वृक्षाचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तो `उर्ध्व मूलम्‌ अधो शाखा’ असा आहे. म्हणजे ह्या वृक्षाच्या फांद्या खाली आहेत आणि मूळे वर आहेत. परमेश्वरप्राप्तीचे आपले ध्येय असले तरी हे सर्व जग ज्या परमेश्वराने निर्माण केले आहे त्याला भेटायचे कसे हे आपल्याला अजून माहीती नाही. ज्याप्रमाणे एका शेतकऱ्याला भेटायला त्याच्या शेताच्या पलीकडे जाऊन त्याच्या झोपडीत त्याला शोधावे लागते त्याचप्रमाणे आपल्याला आदिपुरुषाकडे जाण्याकरीता ह्या विश्वाच्या पलिकडे गेले पाहीजे, म्हणजेच ह्या संसाररुपी वृक्षाचा नाश केला पाहीजे. त्याला मूळापासून तोडून टाकले पाहीजे. जर मूळे खाली असती तर ती आपल्या आवाक्यात आली असती व त्यांना तोडून टाकणे सोपे झाले असते. हा वृक्ष काढून टाकणे इतके सोपे नाही हे दर्शविण्याकरीता ह्याचे मूळ वर आकाशात आहे असे सांगितले आहे. आपण जमिनीवर, खूप खाली आहोत हे त्याच्यात अध्यारुत आहे. आसपासच्या झाडाला तोडून टाकले तरी त्याचे मूळ शाबूत राहीले असल्याने परत ह्याची वाढ होणार आहे असा इशाराही `उर्ध्व मूलम्‌’ सांगण्यात आहे. खाली असलेल्या, आपल्या आजूबाजूच्या शाखा म्हणजे काय? तर त्या म्हणजे आपले भोवतालचे जग. त्या फांद्या म्हणजे आपल्या मनातील सर्व विचार, सर्व आकांक्षा, भोंवतालच्या सर्व घटना की ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो किंवा खूश होतो. थोडक्यात म्हणजे सध्या आपण आपले अस्तित्व ज्यात मानले आहे ते सर्व केवळ फांद्यांसारखे आहे, त्याचे मूळ वर दुसरीकडे आहे हे ह्या रुपकाद्वारे भगवान अर्जुनाला सांगत आहेत.

ह्या वृक्षाचा नाश करायचा असेल तर तो कसा आकार पावला हे आपण आधी जाणले पाहीजे. मगाशी आपण मुंग्यांच्या वारुळाशी असलेल्या मुलाच्या उदाहरणाने ह्या जगाच्या निर्मितीबद्दल विचार केला होता. आता हा वृक्ष म्हणजे जर आपले सर्व विश्व आहे तर त्याची निर्मिती आणि जगाची उत्पत्ती यात काहीच फरक नाही. भगवान असे सांगतात की ह्या वृक्षाचे मूळ अगदी छोटे आहे आणि ते म्हणजे आपली अस्तित्वात येण्याची इच्छा. मला आकार हवा हा अहंकार निर्माण झाला की ह्या वृक्षाचे मूळ रुजायला लागते. मग त्यातून त्रिगुणी कोंब निघतो. त्यानंतर घटना व त्यावरील आपली प्रतिक्रिया मग त्या प्रतिक्रियेमुळे झालेली घटना व परत त्यावरच्या आपल्या अनंत प्रतिक्रिया यांच्या खेळाने हा वृक्ष फोफायला लागतो. बघता बघता त्याचे रुप अतिशय प्रचंड होते व जसजसा तो वाढत जातो, तसतसे आपण त्याच्या वाढत्या कोंबाबरोबर खाली-खाली येऊन आपल्या मूळस्वरुपापासून दूर होत जातो. इथे काही जण विचारतील की आपण मूळस्वरुपाशी स्थिर का नाही? याचे कारण असे की आपण स्वतःला आधीच्या घटनांतून निर्माण झालेल्या जगातच ठेवत असतो. जर काल काय झाले याबद्दल आज आपल्याला पर्वा वाटली नसती तर काल फोफावलेल्या फाद्यांपासून आपण दूर आहोत असे समजायला हरकत नाही. परंतु आपण काल अमुक एक घडले म्हणजे आज तमुक घडेल असे सारखे मानत असल्याने काल वाढलेल्या झाडाबरोबर आपलासुध्दा प्रवास सुरु असतो हे स्पष्ट आहे. जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला जे काही बघतो ते सर्व पूर्वग्रहदूषित नजरेतून पहात आहोत तोपर्यंत आपण मूळापासून दूर-दूर जात आहोत हे मानायला हरकत नाही.

ह्या वृक्षाचे नांव अश्वत्थ असे आहे. हे नांव का? तर जी गोष्ट प्रत्येक क्षणाला नाश होत आहे, जी गोष्ट अजिबात शाश्वत नाही, स्थिर नाही, त्या गोष्टीला अश्वत्थ म्हणतात व ह्या जगातील कुठलीही वस्तु स्थिर रहात नाही म्हणून ह्या संसारवृक्षाचे नाव अश्वत्थ असे आहे.

आता तुम्ही विचाराल की ह्या जगातील कुठलीही वस्तू स्थिर कशी नाही? मला स्वतःला मी जन्मापासून अस्तित्वात आहे हे जाणवत आहेच की. त्याचप्रमाणे आग्र्यातील ताजमहाल वगैरे गोष्टी तर कितीतरी वर्षे अस्तित्वात आहेत. मग वस्तू क्षणभरही स्थिर नाही हे कसे? ही गोष्ट स्पष्ट होण्याकरीता काही उदाहरणे बघू. आपल्या सर्वांना हे माहीती आहे की हातात मशाल घेऊन रात्रीच्या काळोखात जोरजोरात गोलगोल फिरवली तर आपल्याला आगीचे एक वर्तुळ दिसते. त्या वर्तुळाला काहीही अस्तित्व नसते तरी आपल्या दृष्टीला ते खरे भासते. याचे कारण असे की आपल्या मनात त्या मशालीच्या एका स्थितीची जाणीव नाहीशी होण्याआधीच ती परत फिरुन त्याजागी आलेली असते. मग ती सततच तिथे आहे असे आपल्याला वाटते. सिनेमा बघताना खरे म्हणजे आपण स्थिरचित्रे एकापाठोपाठ बघत असतो पण ती इतक्या वेगाने बदलत असतात की आपल्याला त्या चित्रातील मनुष्य हलत आहे असा भास होतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा अनेकवेळा नाश होत असतो व परत ती जन्माला पावत असते. आपल्याला हे न कळल्यामुळे आपण सतत जिवंत आहोत हे आपण मानत असतो. परंतु गाढ झोपेमध्ये वा ध्यानामध्ये आपण आपल्या अस्तित्वाला इतका वेळ विसरतो की तेव्हा आपण कुठे होतो हे कुणी विचारले तर सांगता येत नाही. मग आपण असे मानतो की तेव्हा आपण जिवंत असणारच नाहीतर आज मला माझेपणाची जाणीव कशी झाली असती? तेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच आपण प्रत्यक्ष न जाणता आपली बुध्दी वापरुन असे ठरवत असतो की आपण सतत अस्तित्वात आहोत. झोपेतील वा ध्यानामधील आपली अवस्था बाजूला ठेवली आणि जागृत अवस्थेकडे जरा नीट बघितले तरी असे जाणून येईल की आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला सतत नसते. समजा आपण बागेत जाण्याकरीता चालत आहोत तर चालताना आपण चालण्यामध्येच इतके तन्मय होऊन जातो की आपल्याला दुसरे काहीच सुचत नाही. मग मध्येच शेजारुन जाण्याऱ्या वाहनाने भोंगा वाजविला तर आपल्या स्वतःची जाणीव आपल्याला होते. किंवा कुठल्यातरी विचारात आपण कित्येकवेळा `हरवलेलो’ असतो मग एकाग्रता भंगल्यावर स्वतःला परत शोधून काढतो!! जरा शांतपणे विचार केला तर आपले अस्तित्वच आपण क्षणोक्षणी विसरुन परत भानावर येत आहोत हे जाणवून येईल. अशा रीतीने जर आपले अस्तित्वच सतत नाश होऊन परत जन्माला येत आहे तर बाकीच्या जगाची गोष्टच करायला नको. म्हणून या संसारवृक्षाचे नांव अश्वत्थ आहे.

ही गोष्ट ज्याला पूर्णपणे कळली आहे त्यालाच आयुष्यात काही कळले आहे असे श्रीकृष्ण पुढे म्हणतात (पंधराव्या अध्यायातील पहिल्या श्लोकात `यस्तं वेद स वेदवित्‌’ असे म्हटले आहे). म्हणजे हे ज्याला माहीत नाही त्याला काहीच माहीती नाही असे त्यांना सांगायचे आहे. आपल्या आयुष्यात कळून घेण्यासारखी ही एकच गोष्ट आहे. त्यांच्या अशा सांगण्याने हे स्पष्ट होते की भगवंताला आपल्याकडून काय हवे आहे? आपण सर्व ह्या आदिपुरुषापासून जन्माला आलो आहोत आणि ज्याप्रमाणे प्रत्येक पित्याला आपला पुत्राने शिकून मोठे व्हावे असे वाटते त्याचप्रमाणे परमेश्वरालासुध्दा आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. परंतु आपण काय शिकायला हवे की ज्यामुळे त्याचे समाधान होईल याचा विचार आपण केला पाहीजे. आपण पैसे कसे कमवायचे हे शिकायचे, का बायको-मुलांबरोबर सुखाने कसे नांदायचे हे शिकायचे, का समाजाची काळजी कशी घ्यायची हे शिकायचे? ते म्हणत आहेत की ह्या संसारवृक्षाचे रुप जो जाणतो तोच काही शिकलेला आहे असे मी मानतो. म्हणजे आपल्याला हा जो मानव जन्म प्राप्त झाला आहे त्याने आपल्या पित्याला आनंद होणार असेल तर केव्हा? तर जेव्हा आपण आपले अंतिम ध्येय ह्या संसारवृक्षाला जाणून घेणे हे ठेवून ते ध्येय प्राप्त केले तरच.

हा सततचा नाश आणि नवी घडण इतक्या पटापट होत असतो की आपल्याला त्यात सातत्य दिसते. परंतु नवीन निर्माण झालेले जग कधी कधी अचानक एवढे वेगळे असते की आपल्याला आश्चर्याचा झटका बसतो. लहानपणी मला कारले कधीच आवडत नव्हते मग अचानक त्याची चव आवडायला लागली तेव्हा मला वाटले की हे कसे झाले? अत्यंत जवळची व्यक्‍ती अपेक्षेपेक्षा एकदम वेगळी वागली की असे कसे ती वागली या विचाराने मन अस्वस्थ होते हे आपण कित्येकवेळा बघतोच. अशावेळी त्या व्यक्‍तीने आपले रुप बदलले आहे असे आपण न मानता आपल्याला आधी नीट कळले नव्हते असे आपण ठरवितो. म्हणजे जगाच्या नित्य नूतनपणाची जाणीव झाल्यावरसुध्दा त्याचा स्वीकार करण्याऐवजी आपण दुसरा पर्याय शोधतो कारण जग स्थिर आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसते. याचाच अर्थ असा की भगवंतांच्या मते आपल्याला अजूनपर्यंत काहीच कळलेले नाही! तर असा हा प्रचंड मोठा संसारवृक्ष आपण कसा उन्मळून टाकणार? ज्या वृक्षाची मूळे आपल्यापासून खूप दूर वर आकाशात आहेत त्याचा संपूर्ण नाश करणे कसे शक्य आहे? हे विचार मनात येणे साहजिकच आहे. आजच्या ओव्या आपल्याला एक मार्ग सांगत आहेत. त्या ओव्या अशा आहेत:

 

शरदागमीचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा ।

कां उदयला रवि आंधारा । घोटु भरी ॥ २६३:१५ ॥

 

ना ना उपवढ होतां खेवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो ।

स्वप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसे ॥ २६४:१५ ॥

 

 

ह्या वृक्षाला तोडायचे कसे? तर ज्याप्रमाणे शरदऋतुत वारा सुटला की आपोआप आकाशातील काळे ढग नाहीसे होतात, किंवा ज्याप्रमाणे सूर्य उगविल्यावर काळोखाचा नाश होतो वा जागे झाल्यावर स्वप्नातील वेदना नाहीशा होतात त्याचप्रमाणे आपल्या रुपाची सतत जाणीव ठेवल्यावर आपोआप हा अश्वत्थ वृक्ष नाहीसा होईल असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत.

ओव्यांतील सर्व उदाहरणांत जी काही गोष्ट काढून टाकायची आहे (आकाशातील ढग, रात्रीचा अंधार, स्वप्नातील दुःख) ती हळूहळू नाहीशी होत नाही तर एकदम नाश पावते हे दिसून येते. त्याचप्रमाणे ह्या संसारवृक्षाच्या फांद्या एकएक करीत तोडून टाकायच्या नसून त्या सर्व वृक्षाला एका क्षणांत नाहीसे करुन टाकायचे आहे. अर्थात तो सतत नाश पावत असल्याने हे कठीण नाही असे वाटले तरी तो परत जन्माला येऊ नये याकरीता ज्या गोष्टीने तो नाश पावला आहे ती गोष्ट सतत करायला हवी. ज्याप्रमाणे सतत जागृत राहीले तर स्वप्न कधीच पडणार नाहीत वा सूर्य सतत आकाशात असला तर रात्र कधीच होणार नाही त्याप्रमाणे आपल्या सत्य स्वरुपाची (म्हणजे स्व) जाणीव (म्हणजे प्रतीति) सतत (म्हणजे धारा) ठेवली (स्वप्रतीति धारा) तर हा वृक्ष नुसताच नाश पावणार नाही तर परत नवे रुप घेऊन निर्माणसुध्दा होणार नाही असा या ओव्यांचा भावार्थ आहे. माझे सत्य रुप कुठले? या जगामध्ये आपण सर्वजण अनेक रुपे घेऊन वावरत असतो. उदाहरणार्थ, आज मी एका मुलाचा बाप आहे तर उद्या एका विद्यार्थ्याचा शिक्षक तर परवा एका आईचा मुलगा. यातील कुठले रुप माझे खरे रुप आहे? आपले खरे रुप ओळखायचे असेल तर असे रुप बघितले पाहीजे की जे नाहीसे झाले तर बाकी सर्व रुपे नाहीशी होतील. मग ते काढलेले रुप खरे आहे व बाकी सर्व रुपे त्याची ह्या जगातील प्रतिबिंबे आहेत असे आपण मानू शकतो. यातील एखादे रुप माझे खरे रुप असेल तर त्याच्याशिवाय माझे जगणे अशक्य झाले पाहीजे. परंतु वरील तिन्ही उदाहरणामध्ये हा गुण दिसून येत नाही. जेव्हा मला स्वतःचा मुलगा वा विद्यार्थी नव्हता तेव्हासुध्दा मी अस्तित्वात होतोच आणि माझी आई नजरेआड गेली तरी माझ्या अस्तित्वात काही फारसा फरक पडत नाही. तेव्हा या जगातील नक्की कुठले रुप माझे आत्मरुप आहे हे मला आजपर्यंत कधीच कळलेले नाही हे स्पष्ट होते. जी माणसे आपल्या शरीराला आत्मरुप मानत आहेत त्यांना शारीरीक इजा होऊन शरीरात बदल झाला तर आपले नाव बदलायला हवे हे कळले पाहीजे! परमार्थातील वरवर सोप्या वाटणाऱ्या मार्गामध्ये एकतरी मेख असतेच. `आपल्या आत्मरुपामध्ये रहा, बाकी काही करायला नको’ या मार्गातील मेख म्हणजे आत्मरुप काय आहे हे न कळणे होय.

खरे म्हणजे आपल्या जीवनातील `मी जिवंत आहे’ ही जी भावना आपल्या मनात आहे त्याच्याशिवाय आपले जगणे कसे शक्य आहे? म्हणजे आपण जिवंत आहोत ही आपली भावनाच आपले आत्मरुप आहे असे म्हणायला हरकत नाही. आपली बाकी सर्व रुपे ह्या भावनेवरच अवलंबून आहेत. याउलट ही जिवंत असण्याची भावना आपल्या आईवर, मुलावर, मित्रांवर किंवा ह्या विश्वातील कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही हे जेव्हा संपूर्णपणे आपल्याला कळून येते तेव्हा आपले आत्मरुप आपण जाणले आहे असे समजावे.

ही गोष्ट संपूर्णपणे कळली असे केव्हा समजावे? असे बघा, पैसे देऊन कुठलीही वस्तू विकत घेता येते हे कळल्यावर आपल्याला कुठल्याही एका वस्तूपेक्षा पैशाचे महत्व जास्त वाटते. मग काही कारणाने पैसे असूनदेखील एखादी गोष्ट मिळाली नाही तरी आपले मन प्रचंड अस्वस्थ होत नाही कारण ती परत कधीही विकत घेता येईल ही खात्री आपल्याला असते. त्याचप्रमाणे आपल्या जिवंत असण्यावर सर्व विश्व अवलंबून आहे हे पूर्णपणे जाणविल्यावर जगातील कुठलीही वस्तू आत्ता मिळाली नाही तरी आपल्यामुळेच हे जग आहे ह्या विचाराचा आधार राहून आपण फार निराश होत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला प्रचंड अस्वस्थ करु शकत नाही, निराश करु शकत नाही तेव्हा आपल्याला आपले खरे रुप कळले आहे हे समजावे.

ही गोष्ट कळायला सोपी आहे असे वाटले तरी आचरणात आणायला खूप कठीण आहे. गाढवाच्या समोर काठीवर गाजर लावले तर ते त्याला अगदी जवळ आहे असे वाटून त्याच्या आशेने दिवसभर तो पळत राहतो. अगदी त्याचप्रमाणे माझ्यावर ह्या सर्व जगाचे अस्तित्व अवलंबून आहे म्हणजे मी ह्या सर्व जगापेक्षा मोठा आहे हे कळले असे वाटते परंतु व्यवहारात वागताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे न कळल्याने आपण आपली दररोजची धावपळ थांबवू शकत नाही.

म्हणून मला या शब्दाचा दुसरा अर्थ द्यावासा वाटतो. `स्वप्रतीतिधारा’ म्हणजे आपल्या आत्मरुपात सतत मग्न राहणे असा आहेच पण `स्वतःला आलेल्या अनुभवावर संपूर्ण विश्वास ठेवणे’ असाही होऊ शकतो (म्हणजे `स्वप्रचीतिधारेचा वाहो’). असा अर्थ आपण घेतला तर दररोजच्या जीवनात आपण तो अंमलात आणू शकतो. या शब्दांचा अर्थ मग असा होतो की व्यवहारात तुम्हाला जे काही अनुभव आले आहेत त्यावर आणि त्यावरच पूर्ण भरंवसा ठेवून तुम्ही सतत वागावे, स्वतःच्या अनुभवाने जे ज्ञान झाले आहे त्यावरच पूर्ण विश्वास ठेवून रहावे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती तुमच्याशी व्यवस्थित वागत असली तर मग कितीही जणांनी त्याच्या विचित्र वागण्याबद्दल तक्रार केली तर असे समजावे की त्यांच्याशी तो विचित्र वागत असेल पण माझ्याशी नीट आहे. सर्वसाधारणपणे आपण असा विचार करतो की इतकेजण खोटे कशाला बोलतील? आणि त्यामुळे आपण आपले त्या माणसाशी वागणे बदलतो. बाकीच्या माणसांचेच कशाला आपल्या स्वतःच्या जीवनात काल एखादी व्यक्‍ती चांगली वागली म्हणून आपले मत तीच्याविषयी चांगले झाले असले तर उद्या ती व्यक्‍ती वाईट वागायला लागली तरी आपण आपल्या आधीच्याच मतावर चिकटून राहतो व ती आता बदलली आहे हे मानायला तयार होत नाही. (सचिन तेंडुलकरची फलंदाजी पूर्वीसारखी राहीली नाही हे आपल्यापैकी कितीजण मान्य करतील? आपण सर्व अजून त्याच्या जुन्या रुपातच अडकलेलो आहोत!!) इथे `धारा’ या शब्दाचा खरा अर्थ लक्षात येतो. ज्याप्रमाणे नदीच्या धारेत सतत नावीन्य असते, जुनेच पाणी एका ठिकाणी साचून रहात नाही, त्याचप्रमाणे आपण सतत आपल्या सध्याच्या अनुभवांवर विश्वास ठेवला पाहीजे. काल काय घडले होते याबद्दल विचार करण्यात आज फार वेळ वाया घालवू नये हे ह्या शब्दात अध्यारुत आहे. आपले पूर्वग्रह वापरुन जीवन जगू नये हे श्री ज्ञानेश्वरांना `स्वप्रतीतिधारेचा वाहो’ या शब्दांत सांगायचे आहे असे वाटते. धारा म्हटली की सतत वाहणारा प्रवाह नजरेसमोर येतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या आत्ताच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्‍न सतत केला पाहीजे. मग तुमच्या ध्यानात येईल की किती आपले जग सतत बदलत आहे. या संसारवृक्षाला अश्वत्थ म्हणण्याचे कारण तेव्हा तुम्हाला समजेल! आपल्या विचारांत, आजूबाजूच्या माणसांच्या वागण्यात इतके नाविन्य तुम्हाला सतत आढळेल की कुठलीही वस्तू स्थिर नाही हे तुम्हाला स्वसंवेद्यांनी जाणवेल.

जर आपण स्वप्रतीतिच्या धारेत सतत वाहत असलो तर कुठलाही साचाच आपल्या जीवनात शिल्लक रहात नाही मग त्याप्रमाणे वागण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. उदाहरणार्थ, अशा काही म्हाताऱ्या बायकाचे जीवन बघा की ज्यांना अजूनही आपल्या मुलाच्या संसारात खूप लक्ष द्यावेसे वाटते. त्यांना हे माहीती आहे की आता मी म्हातारी झाले आहे, मला आता देवाबद्दल विचार करायला हवा, संसारातील लक्ष कमी करायला हवे. मग आपल्या स्वतःची संसाराची ओढ कमी झालेली नसली तरी त्या `आदर्श वृध्दपणाच्या’ साच्यात जबरदस्तीने स्वतःला बसवायचा प्रयत्‍न त्या करायला लागतात. परंतु ज्याप्रमाणे मातीचा लेप फारवेळ चिकटून रहात नाहीत त्याचप्रमाणे जबरदस्तीने खऱ्या मानलेल्या गोष्टींची ओढ फारकाळ रहात नाही. परत तुम्ही तुमच्या सत्य परीस्थितीकडे येताच. याउलट प्रामाणिकपणे असे कबूल केले की जरी शास्त्राप्रमाणे मला देवाकडे जायचे प्रयत्‍न करायची वेळ आली आहे तरी माझी संसाराची ओढ कमी होत नाही तर आधी आपल्यामध्ये काही कमी आहे याची जाणीव निर्माण होऊन एक नम्रपणा अंगात येईल. शिवाय का संसाराची ओढ आहे याबद्दल विचार करावासा वाटेल व संसारातील सुखाच्या कमीपणाची प्रकर्षाने जाणीव होऊन देवाची ओढ हळूहळू लागेल. पण अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची नाटके केली तर यापैकी काहीही न होता निव्वळ आपली फसवणूकच होईल.

थोडक्यात सांगायचे म्हणजे सतत आपल्या स्वतःकडे प्रामाणिकपणे बघत राहून जे काही जाणवले आहे ते जसेच्या तसे स्वीकारणे हा `स्वप्रतीतिधारेचा वाहो’ या शब्दांचा अर्थ होऊ शकतो. आपले आत्मरुप जाणून घेऊन त्यात सतत राहाणे हे तर आहेच पण ह्या दुसऱ्या अर्थाचा आपण दररोजच्या जीवनात उपयोग करुन घेऊ शकतो. अशा तऱ्हेने जीवन जगण्यात जे समाधान आहे ते स्वतः अनुभविल्याशिवाय कळणार नाही. ज्याप्रमाणे स्वतंत्रतेचे महत्व दुसऱ्यांना सांगता येत नाही त्याचप्रमाणे कुठल्यातरी साच्यात घालण्याचे बंधन झुगारुन दिल्यामुळे जो आनंद होतो तो दुसऱ्यांना सांगता येत नाही. ह्या आनंदातच अश्वत्थ वृक्षाचे सत्य रुप दिसण्याचे सामर्थ्य आहे. व ते रुप कळण्यामध्येच खरे ज्ञान आहे.

आता तुमच्यापैकी काही म्हणतील की मी कधीच स्वतःला एका साच्यात घातले नाही. मला जसे वाटेल तसेच मी वागलो आहे. मग मला ज्ञान का होत नाही? जरा तुम्ही विचार करा की आयुष्यात तुम्ही कितीवेळा तडजोड केली आहे. आपल्या प्रत्येकाच्या इतक्या इच्छा असतात आणि त्यातील अनेक इच्छांनी दुसऱ्यांना त्रास होणार असतो हे आपल्याला माहीत असते. मग दरवेळी आपण मला पाहीजे तसेच झाले पाहीजे असे म्हणत नाही. दुसऱ्यांकरीता आपण आपले वागणे अनेकवेळा बदलत असतो. ही तडजोडच नाही का? किंवा आजच्या आपल्या कित्येक इच्छा स्वतःच्याच कालच्या इच्छेंच्या विरुध्द असतात. अशावेळी स्वतःची छबी टिकविण्याकरीता आपण कित्येकवेळा मनात वेगळे वागायची इच्छा असूनसुध्दा कालच्यासारखेच आज वागतो. म्हणजे परत तडजोड आलीच. ही तडजोड करणे सर्वांना भागच आहे कारण या अशाश्वत अश्वत्थ वृक्षात आपण शाश्वत सुख शोधत आहोत. हा मूळ विरोधाभास सर्वांच्या जीवनातल्या तडजोडीला कारणीभूत आहे. आजच्या जीवनात कालच्या जीवनाशी सुसंगता शोधणे हे मूळतःच एवढे चुकीचे आहे की ते सातत्य शोधणे आपल्या सर्वांच्या दुःखाला कारण होते.

स्वीकार करा की आपण कालच्यापेक्षा आज वेगळे आहोत. स्वीकार करा की काल चांगले असलो तरी आज आपण तसेच राहू हे सांगता येणार नाही. स्वतःच्या जगण्यातील नित्यनूतनतेला स्वीकार करा आणि पहा की तुमच्या संसाराचे काय होते. असे सतत वागण्यानंतरसुध्दा जी काही गोष्ट स्थिर राहीली आहे तीच सत्य आहे असे माना. जीवनात सातत्य शोधण्याचा प्रयत्‍न करु नका. सातत्यामध्ये सुरक्षितता आहे म्हणून आपली त्याच्याकडे ओढ आहे पण खरी सुरक्षितता सत्य परीस्थिती जाणण्यात आहे, खोट्या सातत्यात नाही हे स्वीकार करा आणि पहा किती मोकळे वाटते ते.

आपण सातत्य तरी का शोधत असतो? कारण आपल्या मनाला अनिश्चिततेबद्दल भीति वाटत आहे. ही जन्मजात भीति आपल्याला कुठलीही गोष्ट आहे तशी स्वीकारण्यास थांबविते. जेवढे आपले जीवन अनिश्चित आहे तेवढी आपल्याला जास्त काळजी आहे. परंतु अनिश्चितता, नित्यनूतनता हाच या जगाचा नियम आहे. म्हणून आपल्या सर्वांना काळजीपासून सुटका नाही. ज्याप्रमाणे मीठ साखरेसारखे गोड का नाही, आपल्याला जगायला श्वास घ्यावा का लागतो याचे दुःख आपण कधी करत नाही त्याचप्रमाणे जिवनातील अनिश्चिततेचा स्वीकार आपण का करीत नाही? त्यात सातत्य का शोधायला लागतो? परंतु जेव्हा स्वप्रतितिधारेचा वाहो वाहायला लागला तर सातत्य पहायला आपल्याला वेळच मिळणार नाही. मग तुम्हा स्वतःला कळून येईल की अनिश्चिततेचा उगाचच आपण बागुलबुवा बनविला होता. दररोज वेगळे जीवन जगण्यातला आनंद कळला की आधीचे जीवन एकच जेवण सतत खाण्यासारखे वाटायला लागेल. खरे म्हणजे साधू परमेश्वराच्या शोधात फिरते संन्यासी का होतात? तर ह्या अनिश्चिततेचा बागुलबुवा स्वप्रतीतिने दूर पळवायलाच. दररोज वेगळ्या गावात जाऊन केवळ भगवंताच्या आधारावर दिवसेंदिवस जगले की अनिश्चिततेबद्दल कशी भीति वाटेल? आपल्याला जर खरे संन्यासी व्हायचे असेल तर दूर दूर भटकायची काहीच जरुरी नाही. तुमच्या स्वप्रतीतिधारेचा वाहो तुम्हाला ठिकठिकाणी फिरवून परमेश्वराकडे नेईलच. मग ह्या संसारवृक्षाची काळजी करायचे काहीच कारण तुम्हाला राहणार नाही असे श्री ज्ञानेश्वर महाराज आपणांस सांगत आहेत.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १७ मार्च २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: