Shloka 69/2: Detachment is Beautiful!

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

 

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमि ।

 

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९:२ ॥

 

 

 

 

गीतेच्या या श्लोकावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालील निरुपण केले आहे:

 

 

देखें भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।

आणि जीव जेथे चेइले । तेथ निद्रित जो ॥ ३५५:२ ॥

 

 

 

तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुध्दि ।

तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६:२ ॥

 

 

 

`ज्याबाबतीत हे सर्व जग अज्ञानी आहे त्याची पूर्ण ओळख ज्याला आहे आणि जिथे सर्व जगाचे ध्यान सतत लागलेले आहे त्या ठिकाणाची वार्तासुध्दा ज्याला नाही तो मनुष्य प्रत्यक्ष परमेश्वराचेच रुप आहे असे मानायला हरकत नाही’ असे त्यांना वरील दोन ओवींत म्हणायचे आहे.

जगातील प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान असते. कोणी सुतारकाम जाणतो तर दुसरा एखादा अभियांत्रिक विद्या मिळवितो. खरे म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने एका ठराविक गोष्टीवर बाकीच्यांपेक्षा जास्त प्रभुत्व मिळविलेले आहे. व्यवहारात जर ती गोष्ट अधिक उपयोगी असली (जसे वैद्यकीय ज्ञान) तर आपण त्या माणसाला यशस्वी म्हणतो. व्यवहारात अनुपयोगी असली (उदाहरणार्थ कामचुकारपणा, हो या गोष्टीवरसुध्दा प्रभुत्व मिळविणे सोपे नाही. काही माणसांना हे खूप चांगले जमते!!) तर अयशस्वी म्हणून त्याचा सहवास आपण टाळतो. भिन्न माणसांचे ज्ञान भिन्न असल्याने एकच गोष्ट जगातील सर्व लोकांना चांगली माहीती असू शकेल असे आपणांस वाटत नाही. परंतु अशा सर्वमान्य गोष्टीचा शोध आपण जगातील गोष्टींमध्ये न घेता मानसिक घडामोडींमध्ये घेतला तर असे स्पष्ट दिसून येते की स्वतःचे सुख प्राप्त करुन घेणे ही गोष्ट सर्व लोकांना माहीती आहे. सुख म्हणजे काय, ते कसे मिळवायचे याबाबतच्या प्रत्येकाच्या कल्पना भले वेगवेगळ्या असोत, पण सुख मिळविले पाहीजे हा विचार सर्वांच्या जीवनाचा मूलभूत पाया आहे यात शंका नाही. केवळ त्या विचारावरच आपण आपले सर्व जागृत आयुष्य घालवित आहोत. तेव्हा सर्व जगाचे ध्यान सतत कुठे लागले आहे याचा विचार केल्यास `स्वतःचे सुख मिळविणे’ या गोष्टीशिवाय दुसरी गोष्ट आपणांस आढळत नाही. म्हणून वरील श्लोकात ह्या भावनेचाच उल्लेख केला आहे असे मानायला हरकत नाही. अर्थातच वरील भावनेच्या विरुध्द `कुठल्याही कारणाशिवाय कर्म करणे’ ही जी भावना आहे तीच्याबद्दल हे सर्व जग उदासीन आहे हे साहजिकरीत्या सिध्द होते. त्यामुळे वरील ओवींचा भावार्थ असा होतो की `खरा योगी स्वतःच्या सुखाबद्दल अनभिज्ञ असतो. त्याचा कर्म करण्याचा हेतु केवळ ते कर्म करणे हे योग्य आहे असा असतो, दुसरे कुठलेही कारण शोधायचा प्रयत्‍न न करीता तो काम करीत असतो’.

एकदा हा भावार्थ पटला की स्वामी विवेकानंदांनी ह्या श्लोकाद्वारे कर्मयोगी माणसाचे वर्णन का केले आहे हे स्पष्ट होते.

 

 

 

कर्मयोग

 

 

 

संन्यास न घेता संसारात राहून जी माणसे परमार्थाच्या मार्गात पुढे जाण्याचा प्रयत्‍न करीत असतात त्यांना कर्मयोगाचे साहजिकच आकर्षण वाटते. जीवनात कर्म करीत भगवंताच्या जवळ जाण्याचा हा मार्ग त्यांना सोयिस्कर वाटतो. विशेषतः ज्यांना दुसऱ्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे अशक्य वाटते, भक्‍ती सहजासहजी जमत नाही, त्यांना हा मार्ग अजून आपलासा वाटतो. परंतु कर्मयोग म्हणजे काय याबाबतची आपली कल्पना योग्य आहे की नाही हे आधी त्यांनी आधी जाणून घेतले पाहीजे. वरील श्लोकात जर कर्मयोग्याचे वर्णन केले असेल तर भगवंताला कर्मयोग्याकडून काय अपेक्षा आहेत ते कळायला आपण या श्लोकाचा उपयोग करुन घेऊ शकतो.

वरील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग्याने ठराविक काही कर्मे केलीच पाहीजेत असे बंधन घातलेले दिसत नाही. समोर आलेली कर्मे परीपूर्ण करण्याचा अट्टाहाससुध्दा भगवंतांना अपेक्षित नाही हे लक्षात घ्या. योग्याच्या हातून घडणाऱ्या कर्मांकडे त्यांचे लक्ष नसून कर्म करण्याच्या त्याच्या हेतूकडे भगवान बघत आहेत असे दिसून येते. याचा अर्थ असा की कर्मयोग म्हणजे `चांगली’ कर्मे करणे वा कर्मे `चांगल्या रीतीने’ करणे असा होत नाही. कुठेलेही कर्म करताना मनाची योग्य अवस्था असणे म्हणजे खरा कर्मयोग होय. तेव्हा ज्यांना कर्मयोगाबद्दल ओढ वाटत आहे त्यांनी आधी ही मानसिक अवस्था कुठली हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याचे उत्तर म्हणजे तटस्थता ही कर्मयोगास आवश्यक अशी मानसिक अवस्थता होय.

हे असे का? योग (म्हणजे आपले व परमेश्वराचे मिलन) म्हणून कर्म करायचे असेल तर घडणाऱ्या कर्मात आपण गुंतता कामा नये हे स्पष्ट आहे. आपण कर्मात का गुंततो तर त्या कर्मापासून आपल्याला काहीतरी फळाची अपेक्षा असते म्हणून. अगदी सामाजिक कार्य करतानासुध्दा आपल्याला जाणविलेल्या सामाजिक अन्यायाचे निराकरण होणार आहे ही अपेक्षा असतेच. दानधर्म करीत असताना त्यापासून पुण्य मिळणार आहे याची जाणीव असते. फळाच्या या अपेक्षा कुणाला असतात? आपले जे निर्गुण स्वरुप आहे त्याला कुठल्याही अपेक्षांची जरुरी भासत नाही. ते आहे त्या अवस्थेत सुखी आहे. तेव्हा आपल्या सर्व अपेक्षा आपल्या संकुचित (म्हणजे देह-मनाच्या) अस्तित्वामुळे निर्माण झाल्या आहेत. मला जे काही हवेसे (वा नकोसे) वाटत आहे ते माझ्या `श्रीधर इनामदार’ ह्या अस्तित्वावर आवलंबून असलेल्या अनुभवांवर आधारीत आहे. कारण माझ्या सर्व इच्छांचे ओझे फक्‍त जागृत अवस्थेतच मला जाणविते. ज्या क्षणी मी गाढ झोपेत असतो, माझ्या निर्गुण स्वरुपात विलीन झालेलो असतो तेव्हा कुठलीही अपेक्षा, कुठलाही हव्यास मला नसतो. म्हणून आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्या, भगवंतापासून दूर करणाऱ्या, मानवी अस्तित्वामुळेच आहेत हे कळून येते. केवळ या कारणामुळे फळाच्या अपेक्षेने (मग भले ते फळ समाजाच्या दृष्टीने `चांगले’ असेल) केलेले कर्म ताज्य आहे असे सर्व संत सांगतात. ज्यावेळी आपले सर्व लक्ष भगवंताकडे असेल तेव्हा भौतिक जगाबद्दल आपल्याला ना आत्मीयता वाटेल ना घृणा. अशा तटस्थ भूमिकेत जगाकडे पाहण्यातच आपल्या ग्राह्य, अग्राह्य अपेक्षांचा नाश होत असल्याने कर्मयोग्याने आपल्या मनाची तटस्थता, म्हणजे जी गोष्ट आहे तशी पाहण्याचा संयम, आहे की नाही हे आधी बघितले पाहीजे. जोपर्यंत आपली नजर पूर्वग्रहांपासून मोकळी होऊन घटना आहेत तशा बघण्याची कुवत प्राप्त करुन घेत नाही तोपर्यंत आपल्याला कर्मयोगी बनायचा संभव नाही.

ही गोष्ट अंमलात आणायला सोपी नाही. याचे कारण असे की आयुष्यभर आपल्याला हेच शिकविले आहे की आपले जीवन आवडत्या गोष्टींच्या प्राप्तीकरीताच घालविले पाहीजे, जेवढ्या मनपसंद गोष्टी जमवाल तेवढा आपला पुरुषार्थ सिध्द होईल. असे म्हणतात की `खोटी गोष्ट जर शंभरवेळा सांगितली तर जगाला ती खरी वाटते’ (हिटलरच्या गोबेल्स या मंत्र्याचे हे विधान जगप्रसिध्द आहे). मग लहानपणापासून सतत `आत्मीयता ठेवल्यानेच खरे सुख मिळते’ हे जे ऐकले आहे ते आपल्याला खरे वाटते यात नवल काय आहे? आयुष्यभरच्या सवयीमुळे गोष्टींमध्ये गुंतुन राहण्यात आपल्याला जी गंमत वाटते तेवढी गंमत त्यापासून अलिप्त राहण्यात वाटत नाही. अलिप्ततेमध्ये आपण सुखाचा नाश बघतो. परंतु खरी गोष्ट याच्या अगदी विरुध्द आहे.

असे बघा, कुठलीही गोष्ट संपूर्ण उपभोगायला आपण त्या गोष्टीपासून अलिप्त राहणे जरुरी आहे. साखरेला स्वतःची गोडी कळते काय? सुंदर व्यक्‍तीला स्वतःचे सौदर्य पाहता येते का? दुसऱ्यांनाच या गोष्टीचा खरा आनंद लुटता येतो. जरा विचार करा, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सुख मिळाले आहे त्या सुखाची जाणीव तुम्हांला कधी झाली? तर त्या गोष्टीबद्दल विचार केल्यावरच. तेव्हा आधी ही गोष्ट मनातून काढून टाका की तटस्थतेमध्ये आपल्या जीवनाच्या आनंद उध्वस्त होणार आहे. मनाची तटस्थता हा आपला नैसर्गिक गुण आहे. तटस्थतेमुळे आनंदाचा नाश होईल ही आपली भीती आपल्याला ह्या स्वरुपात जाऊन देत नाही हे लक्षात घ्या. मी तटस्थ झालो तर माझ्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे काय होईल ही भीती व्यर्थ आहे. तटस्थता म्हणजे निष्क्रियता वा आळस नव्हे. याउलट स्वतःच्या शारीरीक सुखाबद्दलची ओढ कमी झाल्याने तुम्ही दुसऱ्यांना मदत करायला अजून सतर्क रहाल. तटस्थतेमध्ये वस्तू आहे तशी जाणण्याची शक्‍ती आहे. त्या शक्‍तीमुळे तुम्ही नाही म्हणालात तरी तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडालच.

भगवंताकडे लक्ष ठेवल्याने भौतिक जीवनाबद्दल तटस्थ राहून जीवन जगताना कसे वाटते याचे एक सुंदर उदाहरण म्हणून अचानक पाहीलेल्या सूर्यास्ताचे देता येईल. आपल्या सर्वांना कधीना कधी रस्त्यातून फिरताना सुंदर सूर्यास्त दिसला आहे. नेहमीची, जमिनीवरच आजूबाजूला फिरणारी, आपली नजर काही कारणाने आकाशाकडे जाते आणि अचानक विहंगम दृष्य दिसते. मावळणारा सूर्य, त्याचा तांबट पिवळा प्रकाश, त्याने उजळून निघालेले विचित्र आकाराचे ढग आणि मंद मंद सुटलेला वारा आपल्याला जाणवितो आणि आपले मनोविश्व प्रसन्न होते. मग त्यावेळी सूर्याच्या भोवतालचे काळे ढगदेखील त्या दृष्याची शोभाच वाढवित आहेत असे वाटते. अशा दृष्याची ना आपण अपेक्षा केलेली असते ना काही कल्पना. हा देखावा काही क्षणातच नाहीसा होणार आहे हे आपल्याला पूर्ण माहीत असूनदेखील त्यामुळे आपल्या आनंदात काही बाधा येत नाही. सूर्यास्त अजून सुंदर करावा असे देखील आपणास वाटत नाही. आपण फक्‍त स्तब्ध राहून समोर आलेले दृष्य उपभोगीत असतो. मोहाने लडबडलेल्या दृष्टीने आपले जीवन बघत असताना अचानक कधी तटस्थता आली व त्या नजरेत आपले जीवन तुम्ही बघितले तर स्वतःचे जीवन म्हणजेच असे सुंदर, विहंगम दृष्य आहे असे तुम्हांला दिसेल. सलत असलेल्या कुठल्यातरी दुःखाचे काळे ढगसुध्दा जीवनाची शोभाच वाढवित आहेत हे तुम्हांला प्रकर्षाने जाणवेल. सध्याची आहे ती सुंदर अवस्था काही वेळाने नाहीशी होणार आहे हे माहीती असून तुमचा आनंद कमी होणार नाही वा जीवन अजून सुंदर, परीपूर्ण करावे या भावनेचा स्पर्शसुध्दा तुम्हांला होणार नाही. फक्‍त निर्भेळ आनंद मनसोक्‍त उपभोगत तुम्ही आपले आयुष्य जगत रहाल!!

विचार करा. स्वतःची तटस्थतेबद्दलची भिती काढलीत तर एवढे सुंदर जीवन जगायला मिळेल. याउलट, तटस्थता अंगी बाणवली नाही तर कर्मयोगाच्या मार्गावरचे पहीले पाऊलसुध्दा तुम्हाला टाकता येणार नाही. खरोखर, मनुष्याने तटस्थतेला टाळणे यापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट जास्त आत्मविनाशकारी नाही. तुम्ही तुमच्या जीवनात नैसर्गिक तटस्थतेला आनंदाने सामोरे जायचे की जगातील एखाद्या गोष्टी/व्यक्‍तीच्या प्राप्तीच्या मोहात गुरफटून बसायचे याचा निर्णय तुम्हांलाच घ्यायचा आहे. ऑल द बेस्ट!!

 

 

 

॥ हरि ॐ ॥

 

 

(बंगलोरमध्ये दिनांक २६ मे २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारीत.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: