(1104+1105)/13: True Nature of the World

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

देह तंव पांचांचे झाले । हे कर्माचे गुणीं गुंथले ।

भंवतसे चाकीं सूदले । जन्ममृत्यूंच्या ॥ ११०४:१३ ॥

 

हे काळानळाच्या कुंडी । घातली लोणियाची उंडी ।

माशी पांख पाखडी । तंव हे सरे ॥ ११०५:१३ ॥

 

`आपला देह पाच महाभूतांपासून निर्माण झाला आहे, त्याची शाश्वतता आपल्या कर्मांच्या सातत्यामुळेच आहे आणि ते जन्म व मृत्यू याच्या चक्रांत गुंतलेले आहे. काळाच्या अग्नीकुंडात घातलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखे याचे अस्तित्व आहे आणि नष्ट होण्यास याला मोजतासुध्दा येणार नाही इतका कमी वेळ लागतो.’ असा या ओव्यांचा अर्थ आहे.

 

संसारात शाश्वत सुख का मिळत नाही?

 

आपल्या देहाचे अस्तित्व दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. ज्या पाच तत्वांपासून आपला देह बनला आहे त्यांना आपण कधीतरी बघितले आहे का? पाणि, आकाश, पृथ्वी, वायू आणि अग्नी यांच्यामुळे आपला देह बनला आहे हे आपण केवळ ऐकलेले आहे व सांगणाऱ्या व्यक्‍तीबद्दल अत्यंत आदर असल्याने त्याबद्दल आपण शंका घेतली नाही. परंतु स्वसंवेदनांनी आपल्यापैकी कितीजणांनी हे विधान प्रत्यक्ष पडताळून पाहीले आहे? ज्याप्रमाणे एका घड्याळाचे भाग आपण संपूर्ण सुटे करुन परत लावू शकतो त्याप्रमाणे आपल्या देहाचे हे पाच भाग आपल्यापैकी कितीजणांनी पाहीले आहेत? ज्या देहाच्या सुखाकरीता अहोरात्र कष्ट आपण घेत असतो त्याच्या निर्मितीबद्दलच आपण इतके अंधारात आहोत हे लक्षात घ्या. एखादी गोष्ट निर्माण कशी करायची हे माहीत नसले तर त्या गोष्टीला आहे तसे ठेवण्याची प्रचंड जबाबदारी आपल्यावर येते. कारण जर ती बिघडली वा नाहीशी झाली तर त्याप्रमाणे दुसरी मिळेलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. म्हणून देह निर्माण करण्याच्या प्रक्रियेबद्दलची आपली अजाणताच आपल्या देहाबद्दलच्या आत्यंतिक आत्मीयतेला कारणीभूत आहे.

ठीक आहे, जरी आपला देह कसा निर्माण झाला हे कळले नाही तरी फारसे बिघडले नाही असे आपण म्हणतो. आपण रेडियो वा टी.व्ही. विकत घेतो तो कसा निर्माण झाला हे माहीत नसतेच तरी त्यापासून सुख मिळतेच की. त्याचप्रमाणे ह्या देहापासून सुख मिळवायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. दैववशाने हा देह प्राप्त झाला आहे तर त्यामार्फत सुख उपभोगायला काहीच हरकत नाही. परंतु हा देह किती काळ टिकेल याची आपण खात्री करुन घेतली पाहीजे. ज्याप्रमाणे आधुनिक उपकरणे विकत घेताना त्याच्या चालण्याबद्दल `ग्यारंटी’ लिहून घेतो त्याप्रमाणे आधी आपल्या देहाबद्दल काही खात्री आपण मिळविली आहे का? जर कुणी खात्री दिली नसेल तर हा देह उद्या नष्ट होईल का नाही याबद्दल आपण साशंकच राहणार. आता दरवेळी टी.व्ही. चालू करताना तो चालू होणार आहे की नाही याबद्दल खात्री नसेल आणि तो केव्हाही चित्रे दाखविणे बंद करील याची जाणीव जर आपल्याला असली तर त्यामार्फत आपल्याला सुख कितपत मिळेल? म्हणून आपले सुख ह्या देहावर अवलंबून ठेवण्याआधी त्याच्या आयुष्याबद्दल आपण विचार केला पाहीजे.

वरील ओव्यंमध्ये आपल्या ह्या मूलभूत गरजेचे उत्तर दिलेले आहे. आपल्या देहाच्या अस्तित्वाबद्दल काही खात्री देण्याचे सोडाच, याउलट ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की हा माल आत्ता चालू आहे हे खरे पण कधी बंद पडेल याची काहीही खात्री कुणी देऊ शकत नाही. एखाद्या स्कूटरचा भाग बदलायचा असेल तर दोन पर्याय असतात, एक म्हणजे खरा, कंपनीने निर्माण केलेला, भाग घेणे आणि दुसरा म्हणजे `उल्हासनगरचा’ अत्यंत स्वस्त भाग घेणे. ह्या दुसऱ्या भागाबद्दल `कोई ग्यारंटी नही साब’ असेच आपण ऐकतो. त्याप्रमाणे आपल्याला सर्व संत सांगत आहेत की `ह्या देहाची काही ग्यारंटी नाही साब’! मग तुम्हांला हाच विकत घ्यायचा असेल तर स्वस्तात मिळेल. त्याप्रमाणेच ह्या देहावर सुख अवलंबून ठेवायचे असेल तर लवकर मिळेल. पण ते कधी बंद होईल याची खात्री आपण देऊ शकत नाही. जी लोक स्कूटरकरीता दुय्यम दर्जाचा भाग बसवितात त्यांना अनुभवाने हे कळलेले आहे की ऐन मोक्याच्या क्षणीच तो भाग बिघडतो! मग `ओरीजिनल’ भाग घ्यायला पाहीजे होता असा पश्चात्ताप व्हायला लागतो पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्याचप्रमाणे जर देहावर सुख अवलंबून ठेवण्यातच धन्यता मानली तर ऐन तारुण्याच्या भरात असे झटके मिळायला लागतील की पश्चात्तापाशिवाय तुम्ही काही करु शकणार नाही.

वरील ओव्यांचे भावार्थ म्हणणे असे आहे!

आता ह्या देहाची ही दशा असेल तर त्यावर अवलंबून असलेल्या गोष्टींचे अस्तित्व अजूनच क्षणभंगूर आहे हे सिध्द होते. ह्या जगातील सर्व गोष्टी आपण आपल्या देहामार्फतच जाणू शकतो. आपण लक्ष दिल्याशिवाय जगातील कुठल्याही गोष्टीला अस्तित्वच प्राप्त होत नाही. म्हणून ह्या जगातील कुठलीही गोष्ट, कुठलीही व्यक्‍ती आपल्याला शाश्वत आनंद देऊ शकत नाही. अत्यंत आदरणीय, पूजनीय असे आपले गुरुसुध्दा आपल्याला सतत आनंदाची प्राप्ती करुन देऊ शकत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहीजे. तसा आनंद उपभोगायला आपण स्वतःच प्रयत्‍न केले पाहीजेत (म्हणजे साधना केली पाहीजे). याशिवाय आपले प्रयत्‍न शरीराच्या वा मनाच्या पातळीपेक्षा अधिक व्यापक, खोल पातळीवर केले पाहीजेत. आपली अशी अवस्था आपण ओळखली पाहीजे की ती आपल्या शरीरावर वा मनावर अवलंबून नाही. ती अवस्था म्हणजे आपले आत्मरुप होय. आपल्या सुखाचा पाया आत्मरुपावर ठेवला तर आणि तरच आपल्याला अपरीमीत, अमर्याद आनंदाची प्राप्ती होईल हे जाणा. तसे संपूर्ण जाणून त्याप्रमाणे जीवनात अथक प्रयत्‍न करायला लागा असाच वरील ओवींचा आपल्याला आदेश आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या आदेशानुसार वागण्यातच खरा स्वार्थ आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक २३ जुन २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारीत.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: