(1108+1109)/13: Where is Permanent Happiness?

 

 

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

 

या देहाची ही दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।

पैं नित्य शुध्द आपैसा । अनादिपणें ॥ ११०८:१३ ॥

 

 

 

सकळु ना निष्कळु । अक्रिय ना क्रियाशीळु ।

कृश ना स्थूळु । निर्गुणपणे ॥ ११०९:१३ ॥

 

 

 

`आपल्या देहाच्या अगदी विरुध्द असा आपला आत्मा आहे. त्याचा ना कधी जन्म झाला आहे ना त्याला इंद्रियांनी जाणून घेणे शक्‍य आहे. म्हणून कुठल्याही शब्दांनी आपण त्याचे वर्णन करु शकत नाही.’ असे वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहेत.

 

 

 

शाश्वत सुखाचा शोध कुठे घ्यावा?

 

 

 

साधना सुरु करण्यास आपण जेव्हा उद्युक्‍त होतो, तेव्हा आपल्यासमोर कुठलेतरी ढोबळ ध्येय असते. कुणाला प्रिय व्यक्‍तीच्या वागण्यातून ठेंच लागलेली असते, कुणाला प्रपंचातील कुठल्यातरी वस्तूचा हव्यास असतो, तर कुणाला मानसिक शांति हवी असते. आपल्या जीवनात काहीतरी कमी जाणविल्याशिवाय साधना गंभीरपणे सुरु होत नाही असे सर्वसाधारणपणे दिसून येते. स्वतःच्या जीवनरुपी रहाटगाड्यात पुढे न जाता सद्यस्थितीत मिळालेल्या सुखाचेच रवंथ करीत जर आपण बसलो तर आयुष्यात परत पुढे चालण्यास उद्युक्‍त करायलाच आपल्या पाठीवर दुःखाचे आसूड ओढले जातात. आपल्या मनाला जेव्हा आत्यंतिक वेदना जाणवते तेव्हा आपले जीवन ढवळून गेलेले असते. दुर्दैवाच्या तशा प्रत्येक क्षणांत आपले आयुष्य अजून परीपूर्ण करण्याची क्षमता असते हे लक्षात घ्या. त्या क्षमतेचा तुम्ही किती फायदा घेता यावर परत दुःखाचे डोंगर कोसळणार की नाही हे ठरलेले असते.

आपण कशा पध्दतीने दुःखाचा सामना करावा, की ज्यायोगे आपल्या जीवनातील विवंचना कायमची निघून जाईल? वरील ओवींमधील `या देहाची ही दशा’ ह्या शब्दांचा अर्थ आपण व्यवस्थित जाणून घेतला पाहीजे. आपला देह पाच तत्वांनी बनला आहे हे आपल्याला माहीती आहेच. याचा अर्थ असा की देह स्वयंभू नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या देहाची जाणीव कितीवेळा असते? दिवसातल्या प्रत्येक क्षणी आपल्या देहाचे अस्तित्व जाणवित असते का? ऑफिसच्या कामाकरीता एका ठिकाणी जायच्या गडबडीत जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्या शरीराला पूर्ण विसरुन गेलेलो असतो. चांगला सिनेमा बघताना आपण इतके गुंगून जातो की देहाची शुध्दच आपल्याला नसते (त्यामुळेच सिनेमागृहातील खुर्चीतील ढेकूण चावत आहेत हेसुध्दा कळत नाही!!). ज्या ज्यावेळी आपण एकाग्र होऊन काम करीत असतो त्या त्यावेळी आपल्या देहाचे भान आपल्याला नसते हे जरा विचार केल्यावर कळते. ज्या आपल्या देहाला आपण दिवसातून इतकेवेळा विसरत असतो त्याच्या स्वास्थ्यामध्ये आपले सुख आहे ही आपली कल्पनाच चुकीची आहे हे लक्षात घ्या. देहाच्या भोगात सुख आहे ही भावनाच इतकी चुकीची आहे की आपण जरा शांतपणे विचार केला तर तीचे मिथ्यत्व लक्षात यायला वेळ लागत नाही. सुख मिळायला आपल्या मनाचा सहयोग असणे अत्यावश्यक आहे व देहाच्या लाडात मनाचा सहयोग मिळेलच असे कधीच आपण सांगू शकत नाही (असे बघा, घरातील आवडती व्यक्‍ती अचानक गंभीर आजारात पडलेली असेल तर त्यावेळी देहाच्या भोगातून सुख मिळेल काय?).

देहापलीकडे मन असल्याने आपण शाश्वत सुखाकरीता मनाच्या समाधानाकडे पाहू शकतो. ज्यावेळी आपल्या मनाचे पूर्ण समाधान झालेले असते त्यावेळी आपण सुखी असतो याबद्दल काही शंकाच नाही. खरे म्हणजे देहाचे आपण कोडकौतुक करतो याचे मुख्य कारण म्हणजे बऱ्याचवेळा देहाच्या भोगाने मनाचे समाधान होत असते हे होय. परंतु दरवेळी तसे होत नाही. व देहाच्या आसक्‍तीबद्दलचे, त्यामुळे मनाचे समाधान होते, हे खरे कारण जर आपण विसरलो तर आपण भांबावून जातो. दुःखाच्या गर्तेत पडतो. तेव्हा स्वसंवेदनांनी हे कळले की देहाच्या भोगातून मनाचे समाधान, म्हणजे सुख, मिळेलच असे नाही तर मनाच्या समाधानाकरीता काहीतरी दुसरा उपाय आपण शोधला पाहीजे. त्यातच आपल्याला सुखाच्या सातत्याची आशा आहे.

खरे म्हणजे `नैतिकतेने वागावे’ असे जे आपल्याला लहानपणापासून शिकविलेले आहे त्याचा पाया हाच आहे. तुम्ही नैतिकतेने वागाल तर त्या वागण्यातून तुम्हांला मनाच्या शांतीची, समाधानाची प्राप्ती होण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. निदान देहाच्या भोगातून जितकेवेळा मनाचे समाधान मिळते त्यापेक्षा नक्कीच जास्त वेळा नैतिकतेने वागल्यावर मिळते. अर्थात, नैतिकतेने वागून देहाचे भोग प्राप्त होतात तेव्हा दुधात साखर पडल्यासारखे सर्वांत जास्त सुख होते! परंतु दरवेळी हे जमतेच असे नाही. उदाहरणार्थ, दुसऱ्याची सेवा करायला हवी या नियमात आपल्या देहाला कष्टच होतात! परंतु तरीसुध्दा मनापासून सेवा करताना मनाला आनंदच होतो. (म्हणूनच गुरुंच्या ठिकाणी गेल्यावर, वा वारीत, शारीरीक कष्ट झाले तरी आनंद कमी होत नाही, उलट वाढतो.) तेव्हा शाश्वत सुखाच्या शोधात आता आपण नैतिकतेने वागावे ह्या विचारापर्यंत आलो आहोत.

परंतु नैतिकतेने वागण्यात सुख अहे असे समजण्यात दोन चुकीच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या संस्कारावर आपल्या नैतिकतेच्या कल्पना अवलंबून असतात. त्या सर्वांच्या सारख्याच असतील असे नाही. आपण बघतोच की गायीचे मांस खाणे हिंदूंना निषिध्द आहे तसे इतर धर्मांच्या लोकांना नाही. चार वेळा लग्न करायला एक धर्म परवानगी देतो तर काहीत एकपत्‍नीव्रताची थोरवी गायली जाते. वेगवेगळ्या धर्मांचेच कशाला, एकाच घरात वाढलेल्या भावांच्या नैतिकतेबद्दलच्या कल्पना अगदी वेगळ्या असू असतात. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचे `दीवार’ सिनेमातील उदाहरण थोड्याफार प्रमाणात आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण बघतोच. एकत्र कुटुंबपध्दत नाहीशी होण्याच्या कारणांपैकी भावंडांच्या नैतिकतेबद्दलच्या कल्पना भिन्न असणे व त्याप्रमाणे वागायची मुभलत मिळणे ही महत्वाची कारणे आहेत. दगडात कोरलेल्या अक्षरांसारख्या नैतिक कल्पना स्थिर नसल्याने कुठल्या कल्पनांना आपण नैतिकरीत्या योग्य मानावे याबद्दल आपला संभ्रम होतो हा पहीला तोटा. म्हणजे जेव्हा आपण ठराविक कल्पना जीवनभर अंमलात आणण्यात सुख शोधायला लागतो तेव्हा आपल्याच मनाने ह्या कल्पना निवडलेल्या असतात. त्यामुळे मनच मनाला सुखात ठेवायचा प्रयत्‍न करीत आहे हे दिसायला लागते. हे कसे शक्य आहे?

दुसरा महत्वाचा तोटा म्हणजे नैतिकतेच्या सर्व व्याख्या समाजावर अवलंबून असतात. जर जगात मी एकटाच शिल्लक राहीलो आहे, दुसरे कोणी नाही अशी अवस्था निर्माण झाली तर आपल्याला कसेही वागायला मुभा आहे असे आपण लगेच मान्य करतो. नैतिकतेची सर्व बंधने द्वैतात आहेत आणि ज्याठिकाणी दोन वस्तू आहेत तेथे, त्यांच्या भिन्नत्वामुळेच, विसंवाद आहेच. जेथे विसंवाद आहे तेथे दुःख दडलेले आहे. म्हणून काही नैतिक नियमांनुसार आयुष्यभर वागूनसुध्दा शेवटी सुखात, आनंदात आपले जीवन गेले असे म्हणणारी माणसे आपणांस आढळत नाहीत.

वरील विवेचनाने आपल्याला देह आणि मन याच्यापलिकडे कुठेतरी शाश्वत सुख शोधायचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देह-मनाच्या संकुलाबाहेरच्या जागेचे वर्णन कसे करणार? जे जे शब्दात वर्णन करता येते ते सर्व या भौतिक जगात वा मानसिक विचारांत सामील होते. त्यामुळे आपल्याला अशी वस्तू शोधायला हवी की जीचे संपूर्ण वर्णन आपण कधीच कुणाला करु शकणार नाही. जी कुठल्याही गुणांच्या आणि क्रियांच्या मार्फत जाणून घेता येत नाही. आत्तापर्यंतच्या विवेचनावर चिंतन व मनन करुन शाश्वत सुखाच्या प्राप्तीकरीता अशा जागेचे अस्तित्व जरुरी आहे हे आधी स्वतःला पटवून द्या. मग तशी जागा, स्थळ अस्तित्वात आहे की नाही याचा तुम्ही आपोआपच विचार करायला लागाल.

एकदा तुमचा गुणांच्या पलिकडे असलेल्या गोष्टीचा शोध, दुसरा पर्यायच नाही ह्या हेतुने, सुरु झाला की मग वरील ओव्यांतील आत्मरुपाच्या वर्णनात तुम्हांला स्वारस्य वाटू लागेल. नाहीतर दुरुन त्या ओव्यांच्या सांगण्याला नमस्कार करुन (वा जवळून ओवीपूजा करुन!!) तुम्ही आपल्याच ध्यासात मग्न रहाल. आत्मरुप जाणून घेणे हे फक्‍त थोर लोकांनाच शक्‍य आहे, ती आपल्या आवाक्यातील बाब नाही असे मानायला तुम्ही का मोकळे होता? तर त्या आत्मरुपावाचून तुमचे फार अडत नाही म्हणून. अत्यंत तहान लागली की जीवाचा आटापीटा करुन तुम्ही पाणी मिळविताच. मग ते माझ्या आवाक्यात आहे का, त्याकरीता किती किंमत मोजावी लागेल याचा विचार तुम्ही करुच शकत नाही. तसे तुम्हांला आत्मरुपाच्या ज्ञानाच्या बाबतीत वाटले पाहीजे. आपली सर्व साधना आत्मरुपाबाबत ही जीवघेणी तहान निर्माण करण्याकरीताच आहे हे ध्यानात ठेवा. एकदा ही तृष्णा निर्माण झाली की आपल्याला काही करायची गरज नाही. आत्मरुपात मग्न होऊन आपण सदा सुखी होऊ. ज्ञानेश्वरांच्या आत्म्याच्या वरील वर्णनात आपल्याकरीता त्याच्या प्राप्तीबद्दल अभिलाषा निर्माण करण्याचाच उद्देश्य आहे. ही एकच अभिलाषा, हा एकच हव्यास, हा शेवटचा मोह ठेवण्यास आपल्याला अनुमती आहे! त्याचा आपण लाभ घ्या.

 

 

 

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: