(156+157)/5: The Witness Attitude

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फांटे ।

जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ॥ १५६:५ ॥

 

तैसे मनपण मुद्दल जाये । मग अहंभावादिक के आहे? ।

म्हणोनि शरीरेचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७:५ ॥

 

ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की `ज्या पडद्यावर संसाराचे चलतचित्र दिसत आहे तो मनोरुपी पडदा फाटून गेल्यावर आपले संकुचित, स्वतःच्या देहावर अवलंबून असलेले, अस्तित्व आपोआप नाहीसे होते. ज्याप्रमाणे एखाद्या जलाशयातील पाणी बाष्पीभूत होऊन नाहीसे झाले की त्यातील सूर्याचे प्रतिबिंबरुपी (छोटे) अस्तित्व नाहीसे होऊन तो आकाशातल्या आपल्या मूळ रुपातच दिसू लागतो, त्याचप्रमाणे ज्या मानवाच्या मनाचा लय झाला आहे तो आपल्याला स्वतःच्या ब्रह्मरुपी स्वरुपातच पाहू लागतो.’

 

साधनेला कोण बसतो?

 

आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्तरांवर आपले जीवन जगत असतो. प्रत्येक स्तराच्या वेगवेगळ्या गरजा असतात व त्या आपल्याला भागवाव्या लागतात, त्याशिवाय पर्याय नसतो. उदाहरणार्थ, जेव्हा स्वतःला पुत्राच्या रुपात आपण बघतो तेव्हा आपल्या आई-वडिलांच्या आदेशानुसार वागावे लागते. याउलट स्वतःला वडीलांच्या रुपात पाहील्यावर आपल्या संततीला वळण लावण्याचे कर्तव्य आपल्या अंगावर आपोआप येते, ते दुसऱ्यावर आपण ढकलू शकत नाही. आयुष्यभरच्या सवयीने आपल्याला स्वतःचे रुप दरक्षणी बदलत आहे हे जाणवत देखील नाही. ऑफिसमध्ये वरीष्ठांसमोरील आपले रुप विचार करायला वेळ मिळणार नाही इतक्या कमी वेळात आपण बदलून हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी वागतो. आपण स्वतःला एकाच अस्तित्वानी जाणत असलो तरी व्यवहारातील आपल्या अनेक रुपांमुळे आपल्याबद्दल वेगळ्या व्यक्‍तींच्या मनात वेगवेगळी प्रतिबिंबे उमटत असतात. जो गृहस्थ घरी आल्यावर जवळच वाजत असलेला फोनदेखील आपल्या बायकोला `जरा बघ ग’ असे म्हणून उचलायला सांगतो तोच बाहेर, त्याच्या मित्रांमध्ये, सगळ्यांना आपणहून मदत करणारा म्हणून प्रसिध्द असू शकतो, नव्हे तसा तो असतोच, कारण उपयोगी पडणे हा आपला स्वभावच असल्याने तो घरात नाही तर दुसरीकडे कुठेतरी बाहेर येतोच! जीवनातील एखाद्या गोष्टीकडे बघितल्यावर आपल्या मनात कुठले विचार उद्‌भवतात हे आपल्या त्यावेळच्या रुपावर अवलंबून असते. म्हणूनच एका सुंदर तरुणीकडे भाऊ या नात्याने बघणे आणि मित्र या नात्याने बघणे यातून आपल्या मनात संपूर्ण वेगळे विचार येतात. किंवा `आज आपल्याकडे भरपूर पैसे आहेत’ ह्या जाणीवेत आपण असलो तर हजार रुपयांचे नुकसान झाल्यामुळे आपण फार अस्वस्थ होत नाही पण पैशांची जरुरी असली तर शंभर रुपयांकरीता आपण बेचैन होतो. अशा अनेक उदाहरणांनी आपल्याला असे सिध्द करता येईल की `आपल्या विश्वात ज्या कुठल्या घटना घडतात, त्यातून आपण कुठला बोध घेतो हे आपल्या त्यावेळच्या रुपावर अवलंबून असते.’ अगदी खरी गोष्ट पहायची झाली तर घडलेल्या घटनेला फार महत्व नसते. (आपल्यामध्ये एक नैसर्गिक शक्‍ती आहे की जीच्या प्रभावाखाली आपण व्यवहारातील सर्वात प्रचंड आघाताला किंवा सगळ्यात आत्यंतिक सुखाला सहज सामोरे जाऊ शकतो. परंतु त्या नैसर्गिक शक्‍तीचा उपयोग करायला आपण आपल्या सर्वात नैसर्गिक रुपात असायला हवे ही अट आहे!) सर्वसाधारणपणे आपण घटनेलाच महत्व देतो व त्यावेळी आपण कुठल्या रुपात होतो हे बघायचासुध्दा प्रयत्‍न करत नाही. एकाच घटनेमुळे आपल्या मनात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी आंदोलने येतात हे पदोपदी जाणवूनसुध्दा आपले लक्ष बाह्य घटनेवरच स्थिर राहते, स्वतःवर कधीच येत नाही ही एक नवलाचीच गोष्ट आहे. (आता आपल्या अशा वागण्यालासुध्दा संयुक्‍तिक कारण आहे, पण त्याबद्दल विचार केल्यास आपण मूळ मुद्यापासून दूर जाऊ म्हणून आत्ता एवढ्यावरच थांबू.) जगाला `माया’ असे नाव देण्यामागे आपल्याभोवतीं घडलेल्या घटनांचे असलेले कमी महत्व हे एक मुख्य कारण आहे.

वरील नियम आपल्या साधनेलासुध्दा लागू पडतो. साधनेचा उपयोग काय ह्याबद्दल विचार करताना `साधना करणे’ ही घटना आपल्या आयुष्यात घडताना आपण आपल्या कुठल्या रुपात होतो हे बघणे जरुरी आहे. एकच देह दररोज सकाळी ध्यान लावून बसत असला तरी मनाची अवस्था वेगवेगळी असली तर एकाच व्यक्‍तीने ती साधना केली असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे तो देह असलेल्या व्यक्‍तीने आपली साधना निरंतर चालू ठेवली आहे असे मानणे चुकीचे आहे!! उदाहरणार्थ, एक दिवस घरातील आजारी व्यक्‍तीचा आजार बरा व्हावा ही इच्छा मनात असताना ध्यान केले व दुसरे दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्‍तीचा सहवास मिळावा असा ध्यास असताना ध्यान केले तर त्या ध्यानाला बसलेल्या व्यक्‍ती भिन्न होत्या असेच आपणांस मानावे लागेल. आणखी, त्या दोघांपैकी कुणीच दोन दिवस सतत साधना न केल्याने, साधनेचे अपेक्षित फळ कुणालाच मिळत नाही! इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही दिवशी आपण साधनेमुळे मनातील इच्छा पूर्ण होतील असे मानले नव्हते. तरीसुध्दा आपल्या मनाच्या भिन्न अवस्थांमुळे आपण भिन्न रुपे धारण केली होती (पहिल्या दिवशी कुटुंबाची काळजी करणारी व्यक्‍ती होतो तर दुसऱ्या दिवशी स्वकेंद्रीत होतो).

वरील विवेचनाने हे स्पष्ट होते की नैमित्तिक साधना करताना आपणांस एकाच रुपात बसणे आवश्यक आहे. दरवेळी मनाची भिन्न अवस्था ठेवून साधना करुन साधनेचा जो उपयोग होईल त्यापेक्षा शतपटीने जास्त फायदा मनाच्या एकाच अवस्थेत साधना केल्याने होईल. ह्यामध्ये हे लक्षात घ्या की आपले आपणच ठरवायचे आहे की कुठल्या रुपात आपण सातत्याने रहायचे आहे. कुणाला स्वतःच्या गरीबीची जाणीव असलेले व्यक्‍तिमत्व (म्हणजे श्रीमंतीचा ध्यास असलेले व्यक्‍तीमत्व) ठेवायचे असेल, तर कुणाला घरातील कर्त्या माणसाचे व्यक्‍तीमत्व ठेवायचे असेल. ज्याप्रमाणे एका आईला आपल्या मुलाची लुटुपुटीच्या खेळातील सर्व रुपे एकसारखी दिसतात, त्याचप्रमाणे तुमच्या गुरुंना व्यवहारातील तुमची सर्व रुपे एकसारखीच वाटत असतात. तेव्हां त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करु नका! निर्णय संपूर्णपणे तुमचा आहे. ह्या दृष्टीकोनातून वरील दोन ओव्यांकडे बघितल्यास असे म्हणता येईल की त्यांतून ज्ञानेश्वर महाराज तुम्हांला तुमच्या अजून एका अस्तित्वाची जाणीव करुन देत आहेत, तुम्हांला अजून एक पर्याय देत आहेत. नुसते एवढेच नव्हे तर, ह्या नव्या अस्तित्वाबद्दल तुमच्या मनात ममत्व निर्माण करण्याकरीता, त्या अस्तित्वामध्ये तुम्ही आणि भगवंत यात काहीच फरक रहात नाही असेसुध्दा सांगत आहेत. आपले हे अस्तित्व कुठले, त्याला ओळखायचे कसे हे आपण शिकले पाहीजे. मग त्या रुपाबद्दल आपल्याला ममत्व वाटले तर त्या रुपात मग्न राहायचा प्रयत्‍न आपल्या हातून आपोआपच होईल.

 

स्वतःचे अमूर्त रुप बघायचा एक मार्ग

 

आपण आत्तापर्यंत असे बघितले की आपली बालपण, तरुण्पण, वृध्दाप्य अशा ढोबळ रुपांपेक्षाही वेगळी अशी अनेक रुपे आहेत. क्षणा-क्षणाला, समोर आलेल्या घटनेनुसार आपले रुप बदलत असते. आता ह्या वाक्यामध्येच कुठले रुप आपण घ्यावे याचा संकेत आहे! कुठल्या आधारावर आपण असे म्हणतो की ही सर्व रुपे माझी आहेत? आपण असे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा ह्या सर्व रुपांहून वेगळे असे आपले एक रुप आहे व त्या रुपाच्या दृष्टीकोनातून व्यवहारातील आपले सर्व भाव एकाच व्यक्‍तीचे आहेत. असे जर नसले तर आपणांस असे मानावे लागेल की आपला क्षणोक्षणी जन्म होत आहे! एकाच व्यक्‍तीची मुलगा, वडील, कर्मचारी, वरीष्ठ अधिकारी, दाता, कर्ता अशी अनेक रुपे आहेत असे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा ह्या सर्वांत आपल्याला एकाच व्यक्‍तीची सावली दिसत असेल. माझे नाव एकच होते म्हणून मी एकच व्यक्‍ती आहे असे आपण म्हणू शकत नाही कारण एकाच नावाच्या दोन व्यक्‍ती असू शकतात. सगळेच श्री. विठ्ठल कुळकर्णी ज्ञानेश्वरांना जन्म देत नाहीत ना सर्व श्री. रामभाऊ गोडबोले स्वामी स्वरुपानंद होऊ शकतात!! तेव्हा माझ्या सर्व रुपात माझे नाव एकच होते म्हणून मी एकच आहे अशी पळवाट आपण शोधू शकत नाही. आपणांस अधिक विचार करायची जरुरी आहे.

घटना जेव्हा घडते, तेव्हा त्यानुसार आपण नवीन रुप धारण करण्याआधी ती घटना घडली आहे हे आपल्या लक्षात येणे जरुरी आहे. घटनेची नोंद झाल्यावरच त्यानुसार आपण वागू शकतो. ही नोंद कोण घेतो? आपले ते रुप सतत एक आहे हे लक्षात घ्या. स्वतःच्या भावनांचे आरोपण न करीता केवळ घटना जाणून घेणारे आपले जे `साक्षीरुप’ अस्तित्व आहे ते जन्माला आल्यापासून एकच आहे. बदलत काय आहे, तर आपली प्रतिक्रीया. ज्याप्रमाणे आपल्या मनाची प्रगल्भता वाढत जाते त्याप्रमाणे घटनेवरची आपली प्रतिक्रीया बदलत जाते, जास्त संयुक्‍तीक होत जाते. आपल्या प्रतिक्रीया स्वतःच्या व्यावहारीक ज्ञानावर, आपल्या शरीराच्या गरजांवर, सामाजिक जबाबदारींवर अवलंबून असल्याने त्या सतत बदलत असतात, त्यात सातत्य नसते व म्हणूनच आपली वेगवेगळी रुपे निर्माण होतात. परंतु ह्या सर्व रुपांचे मूळ भोवतालच्या घटनांचे अस्तित्व जाणून घेणे हे आहे. ते जाणून घेणारे आपले अस्तित्व हेच आपल्या भिन्न रुपांचे मूळ आहे. म्हणूनच साक्षीरुपात सतत असणे, स्वतःच्या भावनांचीसुध्दा फक्‍त नोंद करीत राहणे हे आपले खरे अस्तित्व आहे असे मानण्याशिवाय आपणांस गत्यंतर नाही. स्वतःच्या मनातील भावनांमध्ये गुंतून न जाता त्यांना आपण त्रयस्था सारखे बघू लागतो तेव्हा आपल्या `मनोरुपु पटु फांटे’ अशी अवस्था झाली आहे असे मानण्यास हरकत नाही. मन व देह यांच्या संकुलाला आपले खरे अस्तित्व मानणे सोडून जेव्हा आपण साक्षीरुपात स्थिर होतो तेव्हा आपले `मनपण मुद्दला’पासून गेले आहे असे आपण समजू शकतो. अशी अवस्था केवळ आपल्या साक्षीरुपात येत असल्याने आपल्या `ब्रहरुप होये’ ह्या अवस्थेचे सर्वांत जवळचे वर्णन म्हणजे आपले साक्षीरुप होय. जीवनात घडलेल्या गोष्टींपासून बोध घ्यायचा आपला नाद सोडून दरक्षणी फक्‍त घडलेल्या गोष्टीची नोंद घेत राहणे असे जे आपले रुप आहे त्याबद्दल ममत्व वाढवा असे वरील ओवींत ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे असे वाटते. अगदी साधना करतानासुध्दा साक्षीभाव सोडू नका. त्या रुपातच सर्व क्रिया करा, मग तुमच्यात व भगवंतात काही फरक नाही असेच ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत.

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s