1011-13/18: Easy Path for Yog

 

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा ।

धुऊनियां मळवटा । बुध्दीचा तेणे ॥ १०११:१८ ॥

 

 

मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली ।

तसी शुध्दत्वें जडली आपणयां बुध्दी ॥ १०१२:१८ ॥

 

 

सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी ।

द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३:१८ ॥

 

 

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की `गुरुंनी दाखविलेल्या वाटेने चालून, विवेकाचे पवित्र ज्ञान प्राप्त झाले की त्यायोगे बुध्दीतील विकल्पांचा नाश होतो, ती शुध्द होते. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राला, ग्रहण सुटल्यावर, स्वतःची प्रभा परत प्राप्त होते त्याप्रमाणे बुध्दीला सांसारीक विषयांबद्दल वैराग्य येऊन, एखादी प्रेयसी सर्व जगाचे भान विसरुन प्रियकराजवळ जाते त्याचप्रमाणे, आपल्या आत्मरुपात मग्न राहायचे धैर्य प्राप्त होते.’

अठराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला साधक कुठल्या टप्प्यांनी मार्ग आक्रमित आपल्या ध्येयाची प्राप्ती करुन घेतो हे सांगितले आहे. वरील ओव्या ह्या वर्णनातील पहिल्या तीन ओव्या आहेत. या ओव्यांची सुरुवात त्यांनी गुरुंच्या मदतीने केलेली आहे. खरेच, साधकाच्या जीवनात परमार्थ जाणून घेण्याची प्रक्रीया त्याची आणि गुरुंची भेट होते तेव्हाच सुरु होते. आता पहिल्यांदा भेटलेले गुरु मानवी देहात असतीलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. खरे म्हणजे सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनात परमार्थात रस वाटण्याचे कारण सद्यस्थितीत अचानक आलेले दुःख असते. नेहमीच्या जीवनात रमलेले आपले मन बाहेर यायला अशा दुःखद क्षणांची जरुरी असते. ज्याप्रमाणे सुर्योदयाआधी क्षितीजावर अरुणोदय होतो व त्यातच पुढे भेटणाऱ्या सूर्याची खूण असते, त्याप्रमाणेच स्वतःवर आलेल्या आपत्तीमध्ये पुढे भेटणाऱ्या गुरुंशी आपली पहिली ओळख होत असते. तेव्हा गुरु दाविलिया वाटा या शब्दांतून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अशा गुरुंबद्दल सांगत आहेत की जो जन्मोंजन्मी आपल्याबरोबर आहे. ह्या जन्मात मानवी रुपात भेट होण्याआधीसुध्दा आपल्या जीवनात गुरु होतेच. तेव्हा त्यांचे रुप आपल्या मनातील अंतःर्स्फूती असे होते. जीवनातील आणिबाणीच्या क्षणीं कसे वागावे हे कुणी न सांगता आपल्याला कळते ते ह्रुदयातील सद्‌गुरुंच्या कृपेमुळेच. संयोगवशाने जरी आपल्याला प.पू. दादासाहेबांसारख्या सद्‌गुरुंचा अनुग्रह मिळाला तरी आपले नेहमीचे आयुष्य आपल्याला स्वतःच्या प्रेरणेनेच जगायचे असते. प्रत्येकाच्या नशिबात आपल्या गुरुंच्या शारीरीक सान्निध्यात राहणे लिहीलेले नसते. अशावेळी जीवनात आपले निर्णय स्वतःलाच घ्यायचे असतात. गुरुंचे स्मरण करुन आपल्या अंतःर्स्फूर्तीने जे समोर येईल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्‍न करीत राहणे असाच `गुरु दाविलिया वाटा’ ह्या शब्दांचा अर्थ आहे असे वाटते.

असे वागताना आपल्या हातून अनेक चुका व्हायचा संभव असतो. प्रत्येकवेळी मनात आलेले विचार आपल्या सद्‌गुरुंच्याच प्रेरणेने आले आहेत असे नसते. आपल्या गुरुंशी भेट होण्याआधी जे मुक्‍त जीवन आपण जगलेलो असतो ते काही आपण पाटीवर लिहीलेल्या अक्षरांसारखे पुसु शकत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी एकदाच कर्ज घेतले असेल तरी ते फेडायला अनेक वर्षे जावी लागतात व ते संपूर्ण फिटेपर्यंत आपल्याला त्याचा हप्ता वेळच्यावेळी द्यावाच लागतो, त्याचप्रमाणे पूर्वी मनात ठेवलेल्या इच्छांचा परीणाम आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धात भोगावा लागतो. त्यामुळे आपल्या मनातील संवेदना आपल्या पूर्वकर्मांचे फळ आहे की गुरुंनी दिलेला आदेश आहे हे कळायला मार्ग नसतो. तरीसुध्दा धाडस करुन आपल्या मनातील संवेदनांशी प्रामाणिक जीवन जगायचा प्रयत्‍न केला असता काही काळाने आपल्याला गुरुंच्या आदेशाचे ज्ञान होऊ लागते. कुठल्या संवेदना आपल्या मनाचे खेळ आहेत आणि कुठल्या संवेदना गुरुंनी केलेला उपदेश आहे हे कळायला लागते. (सर्वसाधारणपणे मनातील जे विचार जाणल्यावर आपण स्वतःच थक्क होतो की मला हे सुचले तरी कसे? ते विचार गुरुंनी आपल्याला भेट दिलेले असतात असे समजावे. स्वतःच्या कल्पनेच्या बाहेरुन असे विचार आलेले असतात, आणि आपले गुरु हे `अकल्पनाप्य कल्पतरो’ असे आहेत!) गुरुंनी सुचविलेल्या संवेदना कळायला लागणे म्हणजे `येऊनी विवेकतीर्थतटा’ होय. आपल्या मनातील अनंत विचारांपैकी कुठले विचार सद्‌गुरुंनी दिलेले आहेत हे कळणे म्हणजेच आपला विवेक जागृत होणे होय. एकदा आपला विवेक जागृत झाला की त्यानुसार जीवनात वर्तन करणे असे आपल्या साधनेचे स्वरुप बनते. कारण विवेक जे सांगत असतो ते म्हणजेच गुरु दाविलिया वाटा होय.

परंतु विवेकाचा आपल्या जीवनात उदय जरी झाला तरी लगेच आपल्या मनाच्या शंका फिटत नाहीत. आपली बुध्दी अनेक विकल्प आपल्या मनात आणते. `कशावरुन ह्या ठराविक संवेदनाच गुरुंचा आदेश आहे?’ असे विचार मनात येऊन आपल्या समजुतीबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. हा संदेह पूर्णपणे दूर करण्याकरीता आत्ता आपल्याला ज्या संवेदना गुरुंचे आदेश वाटत आहेत त्या आचरणात आणणे हाच एक पर्याय आहे. मनातील संभ्रमांकडे दुर्लक्ष करुन धैर्याने स्वतःच्या समजुतीप्रमाणे जीवनात वागणे ह्या क्रियेनेच आपल्या मनातील विकल्प नाहीसे होऊ लागतात. आपले विचार प्रत्यक्षात आचरणात आणून त्यामुळे आपली साधना वृध्दींगतच झाली आहे हे जेव्हा आपल्याला जाणविते तेव्हा आपोआपच मनातील विचार बरोबर आहेत की नाही याबद्दलचा संशय दूर होतो. अशा वागण्याने आपल्या बुध्दीला आपण मनातील स्फुरलेल्या विचारांवर विश्वास ठेवायला आपण शिकवित असतो. असे आचरण म्हणजेच `धुवुनि मळवटा बुध्दीचा तेणे’ होय.

थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वरीलपैकी पहील्या ओवीत असे म्हणत आहेत की आपल्या मनातील स्फुरलेल्या अनेक विचारांपैकी कुठले विचार आपल्या ह्रुदयातील सद्‌गुरुंनी दिलेले आदेश आहेत हे आपण लक्ष देऊन ठरविले पाहीजे व त्या विचारांशी प्रामाणिक राहून, कुशंका काढत न बसता, आपले जीवन जगले पाहीजे. अशा रीतीने जीवन जगायला प्रारंभ करणे हीच साधनेची खरी सुरुवात आहे.

पुढील दोन ओव्यांमध्ये असे आयुष्य जगले तर काय होईल याचे वर्णन आहे. ज्याप्रमाणे ग्रहण सुटल्यावर चंद्राची प्रभा त्याला परत मिळते (ग्रहण हे पौर्णिमेला असते हे ध्यानात घ्या. म्हणजे चंद्राची संपूर्ण प्रभा त्याला परत मिळते हे लक्षात येईल!!) त्याप्रमाणे आपली बुध्दी आपल्या स्वसरुपाचे ज्ञान प्राप्त करण्यातच गुंग राहील. खरे म्हणजे आपल्याला बुध्दी दिलेली आहे ती केवळ आपल्या आत्मरुपाचे ज्ञान करुन घेण्याकरीताच. परंतु व्यावहारीक जगातच तीचा पूर्ण उपयोग करुन आपण ती मलीन केलेली होती तो मलीनपणा जाऊन ज्या उद्देशाकरीता भगवंताने मानवाला बुध्दी दिलेली आहे त्याकरीता आपण तीचा वापर करु लागतो. आता व्यावहारीक जगातसुध्दा आपल्याला असे जाणविते की जेव्हा आपण योग्य काम (जसे वृध्द माता-पित्यांची सेवा करणे, दुसऱ्याला मदत करणे इत्यादी) मनापासून करतो तेव्हा आपल्यात एक वेगळीच शक्‍ती येते. उदाहरणार्थ, स्वतःच्या स्वार्थाकरीता काम करताना जो उत्साह आपल्यात असतो त्याच्या कितीतरी पटीने उत्साह आपल्या गुरुंच्या उत्सवात काम करताना, वा वारीमध्ये भाग घेण्यात असतो. हाच नियम पूर्णपणे शुध्द होऊन स्वचिंतनात असलेल्या बुध्दीला लागू होतो. ज्याप्रमाणे एखादी प्रेयसी सर्व जगाचे भान विसरुन आपल्या प्रियकराच्या सान्निध्याचा आनंद उपभोगण्यात दंग असते त्याचप्रमाणे मलीनपणा नष्ट झालेली बुध्दी आत्मरुपात मग्न असते.

श्रीज्ञानेश्वर महाराज हे बालब्रह्मचारी होते. ह्या अवतारात त्यांनी स्त्रीवर प्रेम करणे हे जीवनाचे अंग स्वतः अनुभविले नाही. परंतु त्यांची निरीक्षणशक्‍ती किती सूक्ष्म आहे ते वरील उदाहरणावरुन ध्यानात येईल. आत्मरुपात मग्न झालेल्या बुध्दीला त्यांनी प्रेयसीची उपमा दिलेली आहे, एकनिष्ठ पत्‍नीची नाही. याचे कारण असे की पती-पत्‍नीच्या नात्याबरोबर पत्‍नीला अनेक सामाजिक बंधने येतात. सासू-सासऱ्यांची काळजी घेणे, मुलांना सांभाळणे इत्यादी अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळून मगच तीला आपल्या पतीवर प्रेम व्यक्‍त करता येते. त्यामुळे जरी तीच्या मनातील पतीबद्दलचे प्रेम हे प्रेयसीच्या प्रियकारबद्दलच्या प्रेमाएवढेच शुध्द असले तरी ते व्यक्‍त करण्यामध्ये तीला बंधने असतात. परंतु प्रेयसीला अशी कुठलीही बंधने नसतात! आता प्रियकर आणि प्रेयसी ह्यातसुध्दा प्रियकराकडे आपले प्रेम व्यक्‍त करण्याचे धाडस नसते! ते संपूर्ण समर्पण, सर्व जगाकडे दुर्लक्ष करण्याची ती शक्‍ती केवळ प्रेयसीमध्येच असते, प्रियकराकडे नसते. प्रेयसीच्या उपमेतून ज्ञानेश्वर महाराज `आत्यंतिक प्रेमाची पराकोटीची स्थिती समाजाचे बंधन तोडून व्यक्‍त करणे’ हे एवढ्या सुंदरपणे वर्णन करीत आहेत की हे पाहून त्यांच्या दैवी प्रतिभेपुढे नतमस्तक व्हायला लागते! असो.

सांगायचे तात्पर्य हे की आपली विवेकाने निर्मळ झालेली बुध्दी अशारीतीने अत्यंत एकाग्रतेने आपल्या आत्मरुपाबद्दल विचार करु लागते असे ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचे आहे. मग आपली स्थिती `अर्जुना समत्व चित्ताचे, तेचि सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुध्दीचे, ऐक्य आथी’ अशी होते. `मनात उठलेल्या संवेदनांशी प्रामाणिक जीवन जगणे’ हा अत्यंत सहज मार्ग सर्व योगाचे सार प्राप्त होण्याकरीता वरील ओवींत ज्ञानेश्वर महाराजांनी सुचविला आहे. स्वतःच्या जीवनात त्यानुसार वर्तन करणे हे आपले कर्तव्य आहे.

॥ हरि ॐ ॥

(वारीत भंडीशेगाव येथे २३ जुलै २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: