333/9: Look Inside, Not Outside

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अर्जुना वेदविदु जरी जाहला । तरी माते नेणता वायां गेला ।

कण सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३:९ ॥

 

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की ` अरे अर्जुना एखाद्याला जरी सर्व वेदांचे ज्ञान असले तरी त्याला माझ्या स्वरुपाचे ज्ञान नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ गेले असे समजायला हरकत नाही. नुसता कोंडा कितीही कांडला तरी त्यातून धान्याचा कण निघणे शक्य नसते त्याचप्रमाणे नुसत्या वेदांच्या ज्ञानात जीवनाचे खरे सार्थक होणे अशक्य आहे.’

 

वेदांचे भव्यत्व

 

भारतीय संस्कृतीत वेदांना अनन्यसाधारण महत्व आहे. असे म्हणतात की या जगात वेदांमध्ये नाही अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वातच नाही. एका दृष्टीने पहायला गेल्यास आपणांस असेसुध्दा म्हणता येईल की आपले संपूर्ण जीवन आपण वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी मूर्तरुप करण्यातच व्यतीत करतो! वेदांच्या व्यापकतेचे आकलन होण्यास श्रीगुरुचरित्रातील अध्याय सव्विस बघा. त्यात श्रीगुरु वेदांचे माहात्म्य वर्णन करताना म्हणतात की एकदा भारद्वाज ऋषींनी प्रचंड तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेतले व त्यांच्याकडे `सर्व वेद मला शिकवा’ असा वर मागीतला. त्यावेळी ब्रह्मदेव त्या मागण्याची पूर्तता करण्याची असंभवता स्पष्ट करताना म्हणाले: `मला स्वतःलाच सर्व वेद अगम्य आहेत. याचे कारण काय असे विचारशील तर हे सर्व वेद बघशील तर आपोआप कळेल.’ भारद्वाज ऋषींनी बघितले तर काय, त्यांना तीन उत्तुंग पर्वतांच्या आकाराएवढी वेदपुस्तकांची राशी दिसली व त्या दर्शनाने ते अत्यंत भयभीत झाले. अत्यंत विनम्र होऊन त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की आता मला पूर्ण कळून चुकले आहे की सर्व वेदांचे ज्ञान होणे अशक्य आहे. म्हणून ह्या सर्व वेदांचे सार म्हणून तूम्ही जे काही द्याल त्याचा अभ्यास करण्यातच माझे आयुष्य मी घालविन. हे ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्या तीन गिरीसमान राशींतून तीन मुठी वेद त्यांनी भारद्वाज ऋषींना दिले. त्या तीन मुठी वेदांच्या मंत्रजाळाचे सार म्हणून चार वेद तयार करुन ह्यांचा अभ्यास कर असा उपदेश ब्रह्मदेवांनी भारद्वाज मुनींना केला! ही गोष्ट सांगून श्रीगुरु ह्या तीन मुठी मंत्रांचे सार असलेल्या चार वेदांमध्ये काय आहे याची फक्‍त अनुक्रमणिकाच पुढील सव्वा-दोनशे ओव्यात सांगतात!! म्हणजे तीन गिरींसमान राशींतून तीन मुठी ज्ञानाच्या सारांशाचा अभ्याससुध्दा एका माणसाला शक्य नाही हे समजते. वेदांची भव्यता दर्शविणारे दुसरे उदाहरण म्हणजे ज्या व्यासमुनींनी चार वेदांचे भाग केले त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये जे काही घडले आहे वा घडणार आहे त्याबद्दल व्यासांनी आधीच भाष्य केले आहे व त्यांच्या त्या भाष्य करण्याने हे सर्व जग उष्टे झाले आहे. माऊलींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर `… व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७:१॥’.

वरील विवेचनानंतर हे स्पष्ट होते की वरील ओवीत भगवंत असे म्हणत आहेत की या जगात जे काही जाणणे शक्‍य आहे ते सर्व स्वतःच्या करतळावरील डोलणाऱ्या वाटोळ्या आवळ्याला जाणतो तितके स्पष्ट जाणले (म्हणजेच सर्व वेदांचे ज्ञान जरी प्राप्त केले) तरी ईश्वराचे खरे ज्ञान झाले नाही तर आपले जीवन व्यर्थ गेले असेच आपण मानले पाहीजे. म्हणूनच ह्या ओवीचा भावार्थ असा आहे की `तीन लोकांतील कुठल्याही एका गोष्टीत वा गोष्टींच्या समुच्चायाच्या प्राप्तीमुळे माझी प्राप्ती होणार नाही. जगातील वस्तूंमध्येच मला बघण्याचा प्रयत्‍न करणे हे अगदी मूळापासून फोल आहे.’ ज्या साधकांची परमार्थामध्ये प्रगती करण्याकरीता पुस्तके वाचली पाहीजेत, गूढ तत्वज्ञान ऐकले पाहीजे वा योग सामर्थ्य प्राप्त केले पाहीजे अशी समजूत आहे त्यांनी ह्या भावार्थावर जरुर विचार करावा.

 

तुझे आहे तुजपाशी!

 

परमार्थाच्या मार्गावर येण्याआधी जे काही आपण प्राप्त केले त्या सर्वांच्या लाभाकरीता काही अटी लागू होत्या. उदाहरणार्थ, लहानपणी वडिलांकडून हवे ते खेळणे मिळवायला त्यांना खुश करणे जरुरी होते. त्यानंतर मोठे झाल्यावर नोकरी मिळवायला पदवी हवी आणि त्याशिवाय आपल्या भावी वरीष्ठांना प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये प्रभावीत करणे जरुरी होते (किंवा कंपनीच्या मालकाशी ओळख जरुरी होती!!), मनसोक्‍त संसारसुख मिळण्यास पत्‍नीचे मन सांभाळणे महत्वाचे होते. आयुष्यभर आपण असेच बघत आलो आहोत की महत्वाची गोष्ट हवी असेल तर त्याच्या प्राप्तीकरीता ज्या अटी असतात त्या आपण पूर्ण केल्या तरच ती वस्तू मिळू शकते. (कधी कधी तर सर्व अटी सांभाळूनही मनपसंद वस्तू मिळत नाही, परंतु ती एक वेगळीच गोष्ट आहे.) परंतु ईश्वरप्राप्तीकरीता कुठल्याही गोष्टीची वा अनुभवाची आवश्यकता नाही, कुठलीही अट नाही हे आपण ह्या ओवीतून जाणले पाहीजे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की परमेश्वराची प्राप्ती सहजसाध्य आहे. तुम्ही भगवंतासाठी चोवीस तास जरी डोळ्यातून पाणी काढले तरी तो तुम्हाला भेटायला धावत येईल. अजामेळाने केवळ आपल्या मृत्यूसमयी मनापासून देवाचे नाम उच्चारले आणि त्याला भगवंतप्राप्ती झाली हे सर्वश्रुत आहेच.

खरे म्हणजे भगवंताच्या प्राप्तीकरीता काही अटी असल्या तर देवाचे देवपणच नाहीसे होईल. त्याने स्वतःबद्दल एखादी अट घातली तर ती अट पाळू न शकणाऱ्यांना तो कधीही मिळणार नाही असे होईल. उदाहरणार्थ, योगसामर्थ्याची अट असेल तर अपंग लोकांना देव दुर्लभ होईल. वेदांच्या ज्ञानाची, वा भक्‍तीची अट असेल तर अडाणी माणसांना वा बुध्दीवादी लोकांना देव दिसणे शक्‍य होणार नाही. देव ह्या शब्दामध्येच असे गृहीत आहे की तो दुर्बळांतील दुर्बळांना व सर्वांत शक्‍तीमान माणसाला उपलब्ध आहे; ज्ञानी आणि अडाणी या दोन्ही तऱ्हेच्या माणसाला प्राप्त होणारा आहे. अशी कुठलीही अट दिसत नाही की ती सर्व लोकांना पूर्ण करता येईल (सगळ्यांनाच पूर्ण करता आली तर ती अट कसली?!). म्हणूनच देवाच्या जवळीकीला आपण कुठलेही सामाजिक वा नैतिक वा शारीरीक अट जरुरी आहे असे आपण समजणे चुकीचे आहे. इतिहासात काही थोर माणसांनी स्वतःवर आपणहून बंधने लावली व त्या मार्गाने चालत जाऊन त्यांनी भगवंताची प्राप्ती करुन घेतली. पण ते पाहून आपण तीच बंधने स्वतःला लावली तरच आपल्याला देव लाभेल असे मानणे चुकीचे आहे हे जाणून घ्या.

उदाहरणार्थ भक्‍तीमार्ग बघा. अनेक थोर संतांनी भक्‍तीमार्गाची वाखाणणी केली आहे. कलियुगात भगवंताचे नाम घेणे हा उपाय त्यांना सर्वात सोपा वाटला व स्वतः आचरणात आणून त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श उभा केला. पण म्हणून नाम घेतले नाही तर भगवंत मिळणार नाही असे नाही. जगातील हजारो लोकांकरीता भक्‍तीमार्ग सोपा आहे असे जरी मानले तरी त्यामुळे माझ्याकरीता त्या मार्गावर चालणे बरोबर आहे हे सिध्द होत नाही. तो शोध प्रत्येकाला स्वतःच घ्यायला हवा. उदाहरणार्थ, भक्‍तीमार्गावर चालण्यास भगवंतावर वा आपल्या गुरुंवर संपूर्ण श्रध्दा हवी. असा पूर्ण विश्वास ठेवणे जर मला शक्य होत नसेल तर मग मी या मार्गावर जबरदस्तीने, बाकी माणसे चालतात म्हणून, चालणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे होय.

वस्तुस्थिती अशी आहे की भगवंत आपल्या आत्मरुपातच दडलेला असल्याने त्याच्या प्राप्तीचा मार्ग प्रत्येकाच्या जीवनात जन्मापासूनच ठरलेला असतो. स्वतः त्या मार्गावर चालून भगवंताची प्राप्ती करणारा आपला गुरुसुध्दा आपल्या जन्माबरोबरच ठरलेला असतो. या कारणास्तव खरे संत त्यांच्याकडे आलेल्या कुणालाही अनुग्रह देऊन आपला शिष्य बनवायचा प्रयत्‍न करीत नाहीत. एखाद्या पुण्यवंताला गुरु सापडला तरी त्या गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने चालून शेवटी आयुष्यात भगवंतप्राप्तीच्या साधनेचा आपला स्वतःचा मार्ग सापडणे ही एक अत्यंत महत्वाची आणि दुर्मिळ गोष्ट आहे. याहून पुढे केवळ आपल्याकरीता असलेल्या साधनेच्या त्या मार्गावर चालण्याचे धैर्य मनात उत्पन्न होणे हे अधिकच भाग्याचे वा खऱ्या गुरुकृपेचे लक्षण आहे. जीवशास्त्रातील उदाहरण द्यायचे झाले तर आपण असे म्हणू शकतो की आपल्या गुरुंनी सांगितलेली साधना आपल्या शरीरातील हाडांसारखी आहे. दृष्य नसलेल्या त्या हाडांमुळेच आपल्या शरीराला कणखरपणा आलेला असतो, सुदृढ आकार येतो. म्हणून त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु आपले दृष्य रुप हे केवळ आपल्या हाडांवर अवलंबून नसते. आपल्या पेशींचे, स्नायूंचे जे अनेक थर हाडांवर असतात त्या पेशींच्या व स्नायूंच्या थरांवरच आपले दृष्य रुप जास्त अवलंबून असते. त्याचप्रमाणे गुरुंच्या आदेशाप्रमाणे साधना करण्यातच आपली पूर्ण प्रगती होईल असे आपण न मानता त्यांनी सांगितलेली साधना करुन उरलेल्या वेळांत आपल्या स्वतःच्या अंतर्मनातील स्फूर्तीने जी साधना सुचेल त्याकडे लक्ष देणे साधकाला अत्यावश्यक आहे. काही काळाने साधकाला हे ध्यानात येते की गुरुपोनिर्दीष्ट साधना ही आपल्या स्वतःच्या अंतःर्स्फूतीवर पूर्ण विश्वास बसणे याकरीताच होती. खरी साधना अथकपणे, दिवसाचे चोवीस तास, आपल्या स्वसंवेदनांकडे तटस्थपणे बघून त्यांच्याशी सुसंगत व्यवहारात वागणे ही असते. साधनेचे जे अनंत मार्ग आहेत (भक्‍तीमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी) ते सर्व ह्या तटस्थतेच्या स्थितीपर्यंतच पोचवितात. मानसिक तटस्थता येणे, स्वतःच्या मनातील विकारांनी चलबिचल न होणे या स्थितीत आधीच्या सर्व मार्गांची एकरुपता होते. यानंतरची आपली साधना `सहज साधना’ होते. आयुष्यात जे काही तुम्हांला स्फुरेल त्याप्रमाणे वर्तन करणे इतके सोपे रुप आपल्या साधनेला येते. खरोखर, आपल्या स्वतःकडे ज्यांना तटस्थतेने बघता येते त्यांना भगवंताची प्राप्ती होणार यात काहीही संदेह नाही. असो.

याचा अर्थ असा की नुसते आपले साध्यच (म्हणजे परमेश्वराचे रुप) आपल्यामध्ये असते असे नव्हे तर ते प्राप्त करायची साधनादेखील आपल्यात सुप्तस्थितीत (स्वसंवेदनारुपात) आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही आपल्याला हवे आहे ते सर्व काही आपल्याकडेच जन्मापासून आहे! पण ज्याप्रमाणे आपल्याकडील दागिन्याचे खरे मूल्य सराफाकडून (म्हणजे दुसऱ्याकडून) कळते त्याचप्रमाणे आपल्यामध्ये दडलेल्या भगवंताला व त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला जाणण्याकरीता आपल्याला गुरुंची आवश्यकता असते हे ध्यानात घ्या. पूर्वजन्मींच्या सुकृतांनी आपल्याला ह्या जन्मात प.पू. श्री दादासाहेबांसारखे गुरु लाभले आहेत. त्यांनी सांगितलेली साधना मनापासून करुन त्याशिवाय आपला स्वतःचा मार्ग शोधण्यात आपण आपले सर्व सामर्थ्य खर्च केले पाहीजे. असे केले नाही तर `अकल्पनाप्य कल्पतरो’च्या बुंध्याशी बसून केवळ त्याच्या सावलीचा आनंद उपभोगीत बसण्यासारखे आपले जीवन होईल.

आत्ता जे काही सांगितलेले आहे त्याच्यावर चिंतन व मनन करा. मग ज्या अंतःर्स्फूर्ती येतील त्याकडे लक्ष देऊन त्या आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करा. असे वागताना सुरुवातीला काही चुका झाल्या तरी त्यांच्यामध्येच तुमचा खरा मार्ग सापडण्याची किल्ली आहे. आपले गुरु सर्वकाही करतील (आपली अध्यात्मिक प्रगतीसुध्दा!) ह्या विश्वासावर कितीकाळ आयुष्य काढायचे याचा निर्णय घेण्याची क्षमता केवळ तुमच्याकडेच आहे! परमार्थातील साध्य व साधना हे सर्व आपल्याकडे उपजतच आहे यावर विश्वास ठेवून त्यांना शोधायचा प्रयत्‍न करण्यातच आपले खरे हित आहे.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ७ जुलै २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा