(49+50)/5: Who Are You?

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

दीपाचेनि प्रकाशे । गृहीचे व्यापार जैसे ।

देही कर्मजात तैसे । योगयुक्‍ता ॥ ४९:५ ॥

 

तो कर्मे करी सकळे । परी कर्मबंधा नाकळे ।

जैसे न सिंपे जळी जळे । पद्मपत्र ॥ ५०:५ ॥

 

आपल्या देह म्हणजेच मी आहे हे भावना सर्वसाधारण जनांच्या मनात असते. लाखोंमधील एखाद्यालाच स्वप्रचीतीद्वारे स्वतःचे खरे आत्मरुप कळते. असे ज्ञान होऊन, त्या ज्ञानाच्या सतत अनुसंधानात राहणाऱ्याला योगयुक्‍त म्हणतात. ही स्थिती मानसिक असल्याने साधकाची योगयुक्‍त स्थिती आपणांस जाणून घेण्य़ास एकच मार्ग म्हणजे त्याचे व्यवहारातील वागणे होय. वरील दोन ओवींत ज्ञानेश्वर महाराज योगयुक्‍त माणसाचे दैनंदिन वागणे कसे असते याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणत आहेत `घरातील एका कोनाड्यात राहून आपल्या प्रकाशात कोण कसे वागत आहे याची पर्वा न करीता तटस्थपणे दीप प्रकाश देत असतो त्याचप्रमाणे योगयुक्‍त साधक अत्यंत तटस्थ राहून सर्व कर्मे करीत असतो. जसे कमलपत्र पाण्यात राहुनसुध्दा स्वतःला अजिबात ओलेपणा येऊन देत नाही तसेच त्याच्या तटस्थपणामुळे सर्व कर्मे करुनसुध्दा त्याला नवीन पाश पडत नाहीत’.

 

जगाकडे पहायचा आपला दृष्टीकोन

 

आपल्या मनात आपल्या स्वतःच्या एकसंध अस्तित्वाविषयी अजिबात संदेह नसतो. आपले शरीर लहानपणापासून कितीही बदलले असले तरी एकाच अस्तित्वाच्या शरीराची ही नैसर्गिक वाढ आहे हे आपल्याला ठाऊक असते. बाकीचे जग आपल्याला एकाच नावाने ओळखत आहे म्हणजे आपले अस्तित्व एकच असणार अशा बुध्दीवादाने एकसंध अस्तित्वाची समज आलेली नसते, तर काहीही कारणाशिवाय उपजतच आपल्याला ती जाणीव असते. खरे म्हणजे क्षणोक्षणी आपल्या देहात अनंत बदल होत असतात. असंख्य पेशी नष्ट होऊन त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात. परंतु सतत होत असणाऱ्या या बदलामध्ये एकच अस्तित्व रहात असते याबद्दल आपल्याला काही संशय नसतो. किंवा दुसरे उदाहरण म्हणजे काल संपूर्णपणे एकांतवासात राहून आज सकाळी झोपेतून उठल्यावर कालचे आपण आणि आजचे आपण एकच आहोत हे आपणां सर्वांना जाणविते यातच आपल्या न बदलणाऱ्या अस्तित्वाची खूण आहे. आपली व्यवहारातील वा समाजातील सर्व धडपड स्वतःच्या त्या अखंड अस्तित्वाला जपण्याकरीताच चालू असते. परंतु गंमतीची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष समाजात वावरतानामात्र आपण आपले हे अचळ अस्तित्व विसरतो व प्रत्येक घटनेला वेगवेगळे रुप घेऊन सामोरे जातो. याचा अर्थ असा की आपले जे न कधीही बदलणारे अस्तित्व आहे त्याच्या सुरक्षिततेकरीता, वृध्दीसाठी आपण नित्यनूतन रुपे घेऊन आचरण करीत असतो! ह्या विरोधाभासातच आपल्या सर्व सांसारीक बंधांची मेख असल्याने हा मुद्दा व्यवस्थित समजाऊन घेतला पाहीजे. खालील उदाहरणांतून आपण कशी वेगळी रुपे घेऊन वावरत असतो हे स्पष्ट होईल.

असे बघा जेव्हा कचेरीत काम करताना समोर आलेला मनुष्य आपला वरीष्ठ आहे याची जाणीव केव्हा होईल? तर जेव्हा आपण त्या माणसाच्या हाताखाली काम करणारे आहोत ही जाणीव होऊन त्यामध्ये आपण विश्वास ठेवला तरच. तेव्हा आपण कनिष्ठ माणसाचे रुप घेतल्याशिवाय वरीष्ठ निर्माण होत नाहीत. जेव्हा आपण कनिष्ठाचे रुप सोडतो तेव्हा आधी वरीष्ठ म्हणून मानलेला मनुष्य सामोरा आला तरी आपली वागण्याची पध्दत भिन्न असते. म्हणूनच आपला बॉस कचेरीच्या बाहेर, स्वतःच्या घरात, आपल्याला भेटला तरी आपण त्याच्याशी फार अदबीने वागूच असे नाही. कारण यजमानाची भूमिका घेऊन त्याच माणसाकडे बघितल्याने आपले वर्तन बदललेले असते. दुसरे उदाहरण म्हणजे समोर आलेली बाई माझी आई आहे असे आपण स्वतःला मुलाच्या रुपात घातल्याशिवाय म्हणू शकत नाही. मग त्या मुलाच्या रुपात जे वागणे अपेक्षीत आहे तसेच आपण वागायचा प्रयत्‍न करतो. याउलट त्या स्त्रीला स्वतःच्या पत्‍नीच्या रुपात बघितले तर आपण नवऱ्याचे रुप घेऊन त्याप्रमाणे बोलतो, हक्क दाखवितो. मग त्या स्त्रीने आपल्या आईसारखेच आपल्याशी बोललेले अजिबात चालत नाही! अजून एक उदाहरण म्हणजे आपल्याला उपदेशपर एखादे वाक्य श्रीगुरुंनी सांगितले तर कुशंका न काढता ते सांगत आहेत बरोबरच आहे असे आपण मानतो. मग कदाचित आपले सर्व जीवन त्या वाक्याप्रमाणे घालवायलासुध्दा आपण तयार असतो. याचे मुख्य कारण स्वतःला शिष्यरुपात आपण घातलेले असते. आता तेच वाक्य आपल्या मुलाने आपल्याला सांगितले तर `मला उपदेश सांगणारा तू कोण आहेस?’ असे त्याच्यावर ओरडायला आपण मागेपुढे बघत नाही कारण आपल्या वडीलपणाला त्याच्या उपदेश करण्याने धक्का लागलेला असतो!! अशा वेळी त्या वाक्यातले सत्यत्व कुठेही गेलेले नसले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नसतो कारण स्वतःला वडिलांच्या रुपात घालण्याचा एक परीणाम म्हणून आपल्याला मुलांपेक्षा जास्त कळते ही समजूत आपल्या मनात तयार झालेली असते. जरा विचार करा. तुमच्या असे लक्षात येईल की व्यवहारातील प्रत्येक घटनेतून आपल्या मनात कोणते विचार येतात हे आपण कुठल्या भूमिकेतून त्या घटनेकडे बघतो यावर ठरलेले असते. खुद्द त्या घटनेला फार महत्व नसते. म्हणूनच स्वतः निरनिराळ्या भुमिका जगतच आपण आपले आयुष्य व्यतीत करीत असतो असे म्हणण्यास हरकत नाही.

अशारीतीने हे स्पष्ट होते की जागृत अवस्थेत असताना प्रत्येकक्षणी आपण स्वतःला एका रुपात घालत असतो. आयुष्यभरच्या सवयीमुळे इतक्या सहजपणे ही गोष्ट होत असते की आपल्याला त्याची फार क्वचित जाणीव होत असते. जगातील घटनांमधून आपण जो काही निष्कर्ष काढत असतो तो आपण कुठल्या रुपातून त्या घटनेकडे बघत असतो यावर खूप अवलंबून असतो. ज्ञानेश्वरमाऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना `ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१॥’ असे म्हणते हे खरे आहे. परंतु स्वसंवेदनांनी आत्मरुप जाणून घ्यायच्या मार्गावर चालताना स्वतःच्या संवेदना आपल्या त्यावेळच्या वृत्तीवर किती अवलंबून आहेत हे सतत ध्यानात ठेवणे जरुरी आहे. गुरुंचे पाठबळ असल्याशिवाय व्यवहारातील घटनांतून पूर्णपणे रास्त भावतरंग मनात येत नाहीत म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज अठराव्या अध्यायात म्हणतात `जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो । स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥१०:१८॥’. स्वतःच्या संवेदनांचे बीज सद्‌गुरुंनी लावले तरच आपल्याला आत्मरुप जाणता येईल असे आपण यातून जाणून घेतले पाहीजे.

 

योगयुक्‍तांचा जगाकडे पहायचा दृष्टीकोन

 

आपल्या अशा विविध रुपे घेण्यामुळेच आपल्या कर्मांची फळे आपल्याला भोगावी लागतात. मुलगा म्हणून माझे रुप आहे त्यात लहानपणी आईचे ऐकणे व आईच्या वृध्दापकाळी तीची काळजी घेणे अध्यारुत आहे. कचेरीतील माझ्या वरीष्ठपणामुळे हाताखालच्या लोकांकडून काम करुन घेणे माझी जबाबदारी होते इत्यादी. तेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण स्वतः घेतलेली वेगवेगळी रुपे होय. यातसुध्दा आपले रुप छोटे असेल तर जबाबदारी कमी असते. उदाहरणार्थ लहानपणी आपल्यावर फार कमी जबाबदाऱ्या असतात. ऑफीसमध्ये कनिष्ठांवर कमी जबाबदाऱ्या असतात. जेवढा आपण स्वतःकडे मोठेपणा घेऊन जगाकडे बघू तेवढे आपण बाकीच्या लोकांच्या काळजीत गुंतू. म्हणून स्वतःला कर्मबंधांतून मोकळे करायचे असेल तर सर्व कर्मे करताना आपण असे एक रुप घेतले पाहीजे की आपल्यावर केलेल्या कर्मांची जबाबदारी येणार नाही. असे कुठले रुप असेल याचा आता विचार करु. आधी हे लक्षात घ्या की आपण जेव्हा एक वृत्ती धारण करतो, एक रुप जगत असतो त्या रुपाबरोबर नुसती बंधनेच येतात असे नाही तर कही स्वतंत्रतासुध्दा आपण प्राप्त केलेली असते. परत मागे दिलेल्या उदाहरणांकडे बघितल्यास ही गोष्ट स्पष्ट होईल.

कचेरीत वावरताना वरीष्ठांचे मन राखायचे बंधन येते हे खरे असले तरी त्या कचेरीत आपला एखादा नातेवाईक आला तरी आपण त्याला सांगू शकतो की मी तुझ्याकडे बाकी लोकांसारखाच व्यवहार करणार. म्हणजे, तो आपला नातेवाईक आहे म्हणून आपण त्याच्याशी थोडे वेगळे वागले पाहीजे या जबाबदारीतून आपण सुटलेलो असतो. प्रत्येक रुपाकडे बघितल्यास असेच आढळून येईल की धारण केलेल्या त्या रुपाबरोबर काही बंधने व काही मुक्‍ती आपोआपच आपल्या गळ्यात पडतात. कामावरुन थकून संध्याकाळी घरी आल्यावर मोकळे वाटते, ताण कमी होतो याचे कारण हेच की घरच्या माणसाचे रुप धारण केल्याने कचेरीतील जबाबदारींतून सुटका झालेली असते. याउलट घरी खूप कटकट असेल तर ऑफीसमध्ये केव्हा जातो असे होते कारण तिथे गेल्यावर घरच्या जबाबदारींतून मुक्‍ती मिळालेली असते!! तेव्हा आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की दरक्षणी आपण वेगवेगळी रुपे धारण करतो व त्या रुपांच्या अनुषंगाने आपल्यावर काही बंधने तर काही स्वतंत्रता प्राप्त होत असते. आता कुणि असे सांगितले की `बाबारे, तुझे असे एक रुप आहे की ज्यात कुठलीही बंधने नाहीत व त्या रुपात तुला संपूर्ण स्वतंत्रता प्राप्त होईल’ तर त्या स्वरुपाबद्दल साहजिकच आपल्याला नैसर्गिक ओढ लागेल आणि त्या रुपामध्ये राहण्याचा आपण प्रयत्‍न करायला लागू. कल्पना करा त्या रुपात गेल्यावर कामाच्या ठिकाणी वरीष्ठांबद्दलचे दडपण नाही आणि घरी आल्यावर गरातल्यांचे मन सांभाळायची जबाबदारी नाही! समाजात वावरताना प्रतिष्ठिततेचे बंधन नाही आणि व्यवहार करताना लोकप्रियतेबद्दल ताण नाही. आपण किती मोकळेपणाने वागू याची कल्पना हवी असेल तर स्वतःचे लहानपण आठवा. तेव्हा आपल्या वागण्यात जी मुक्‍तता होती, जीवनातील प्रत्येक प्रसंगाला एक प्रयोग म्हणून सामोरे जाण्याची निर्भयता होती तीला आठवा. अहो, घरात असलेल्या अंड्यांना घाण लागली आहे म्हणून त्यांना साफ करायला घरातील कपड्यांबरोबर वॉशिंगमशिनमध्ये बिनधास्त टाकणारा मुलगा मला माहीती आहेत! (अर्थात्‌ हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नव्हता हे वेगळे सांगायला नको!!) ही जी कुठलाही प्रयोग करण्याची मनाची तयारी होती त्यामुळे आपले जीवन दरक्षणी किती नाविन्यपूर्ण होते ते आठवा आणि कल्पना करा की आत्ता ह्या क्षणी तुम्हांला परत तसे जीवन जगण्याची मुभा आहे. तीसुध्दा लहानपणी असलेल्या वडिलांच्या धाकाशिवाय! मग तुम्हांला कल्पना येईल की ह्या रुपाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे ते.

आपली तटस्थता हेच ते रुप होय.

योगयुक्‍त साधक आपल्या आत्मरुपात इतका गुंगुन गेलेला असतो की हे सर्व जग त्याला भासमय दिसते. दुकानातून एखादी वस्तू आणायची आहे ह्या एकाच विचारात गुंग होऊन आपण रस्त्यात चालत असताना आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष नसते, कधीकधी जवळचा मित्रसुध्दा उभा असलेला दिसत नाही तशी ही गोष्ट आहे. स्वतःचे नित्य, निश्चळ असलेले रुप बघण्यात, त्या रुपात स्वतःला घालून जगण्यात योगयुक्‍त इतका दंग असतो की त्या रुपातून जीवन जगण्याने व्यवहारात वा समाजात वावरताना त्याला संपूर्ण स्वतंत्रता मिळते. जे कर्म त्याच्या हातून घडल्यासारखे दिसते ते आपण करीत आहोत याची जाणीव त्याला होत नसते. खूप दात दुखत असताना घ्रात आपण वावरत असतो खरे पण आपले सर्व लक्ष त्या दुखणाऱ्या दाताकडे असते; त्यामुळे काहीवेळाने तू काय करीत होतास असे विचारले तर आपल्याला खूप आठवावे लागते की कुठली कर्मे मी करीत होतो. वा घरी लक्ष गुंतले असताना बाहेर कसे वागत आहोत याचे भान आपल्याला नसते तशी ही गोष्ट आहे. काम करीत असताना त्याची जाणीव असते पण मन गुंतलेले नसते. म्हणून ते करुन झाल्यावर ते केल्याची आठवण रहात नाही. परमेश्वराच्या (म्हणजे आपल्या आत्मरुपाच्या) चिंतनात राहून अशा वागण्याने केलेल्या कुठल्याही कर्माची फळे आपल्याला बाधत नाहीत. आपली तटस्थता फक्‍त समाजातील वागण्यालाच लागू होते हे लक्षात घ्या. स्वतःच्या आत्मरुपाच्या ज्ञानाबद्दल अत्यंत आनंदाची भावना, गुरुकृपेबद्दलची कतज्ञता मनात सतत जागृत राहीलेली असतेच. त्यामुळे एक वेगळाच आनंद (जो दृष्य गोष्टींवर अवलंबून नसल्याने शब्दांत सांगण्यासारखा नसतो) मनात सतत असतो. तेव्हा ही तटस्थता म्हणजे मनाची शून्य अवस्था नसून `आनंदाचे डोही आनंदतरंग’ अशी असते. सर्व संतांनी ह्या अवस्थेचे इतके कौतुक केले आहे की आपणां सर्वांना त्याबद्दल परत सांगण्याची आवश्यकता आहे असे नाही. शिवाय तटस्थतेच्या रुपात कसे जायचे हे सांगायची वेळसुध्दा आज आहे असे वाटत नाही. आपल्या तटस्थतेच्या रुपाबद्दल आत्मीयता येणे हेच आजचे ध्येय आहे.

म्हणून आज माऊलींच्या वरील ओवींमार्फत आपण एवढेच बघितले की जीवनात तटस्थता अंगी बाणविल्याखेरीज अन्य कुठल्याही मार्गाने जाण्यात आपली जीवनातील ताणतणावांपासून पूर्ण सुटका होणार नाही. भगवंताची लीला हीच आहे की त्याने आपल्याला कुठले रुप घेऊन जगायचे याची स्वतंत्रता दिली आहे. मनुष्यजन्माबद्दल देवांनासुध्दा हेवा असतो तो केवळ याच कारणानी. हे लक्षात घेऊन आपण पूर्ण विचार करुन कुठल्या रुपात आपले आयुष्य व्यतीत करायचे हे ठरवायला हवे.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १९ ऑगस्ट २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

One Response to (49+50)/5: Who Are You?

  1. deepanjali म्हणतो आहे:

    जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
    असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
    की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
    एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: