(103-105)/4: Know Thyself. Rest Will Follow.

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।

आणि फलापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३:४ ॥

 

आणि हे कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिध्दी नेईन ।

येणें संकल्पेंही जयाचे मन । विटाळे ना ॥ १०४:४ ॥

 

ज्ञानाग्नीचेनि मुखें जेणें जाळिलीं कर्मे अशेखें ।

तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । ओळख तूं ॥ १०५:४ ॥

 

गुरुआज्ञेप्रमाणे साधना करीत असताना साधकाची प्रगती इतकी नैसर्गिकरीत्या होत असते की ती त्याच्या नकळत होते. परंतु, अचानक आलेल्या एखाद्या आपत्तीकाळातील स्वतःच्या शांत मनाची त्याला जाणीव होते व त्याला आश्चर्य वाटते की संकटांना इतक्या धैर्याने तोंड द्यायची क्षमता आपल्यात कधी आली? दुसरे कुठलेही कारण न आढळल्याने आपल्या गुरुंच्या कृपेलाच तो कारणीभूत समजतो आणि यामुळे त्याच्या गुरुंबद्दलच्या भक्‍तीत अजून वृध्दी होते. भक्‍तीतील वृध्दीमुळे साधकाला गुरुंच्या आदेशाप्रमाणे वर्तन करण्यात अधिकच उत्साह येतो व त्याची परमार्थात अजून प्रगती होते. आपण एकदा ह्या सुंदर चक्रात गुंतलो की आपली साधना `सहज’ होते, आणि प्रगती नैसर्गिकरीत्या होत राहते. अशा ह्या सुलभ मार्गाची सुरुवात म्हणजे कुठलीही भौतिक अपेक्षा न ठेवता गुरुंच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करावे असे वाटणे होय. ज्या भाग्यवान साधकांना हा मार्ग सापडला आहे त्यांच्या प्रगतीचे एक मुख्य लक्षण म्हणजे त्यांना असे स्पष्ट दिसायला लागते की दैनंदिन जीवनात बहुतेकवेळा आपल्या मनात वेगळे विचार असतात आणि हातून निराळेच कर्म होत असते. आपल्या शरीराने घडलेल्या कर्मात आपल्या मनाचा सहयोग असणे फारच क्वचित घडते. आपले शरीर म्हणजे आपण नाही असे पूर्वीच स्वसंवेदनांनी जाणले असल्याने साधकाच्या मनात आपल्या हातून घडलेल्या कर्मांबद्दल कर्तेपणा घेण्याबद्दल शंका येते. काही काळाने या विचारांचा परीपाक होतो व साधकाला अचानक, अपरोक्षपरीत्या, असे ज्ञान होते की स्वतःच्या हातून जे काही कर्म होत आहे त्याचा कर्ता आणि आपण यांत फारसा संबंध नाही. नदीमध्ये नावेतून जाताना ज्याप्रमाणे तटावरचे स्थिर वृक्ष मागे चालत जात आहेत असे भासते ते खरे नाही याची जाणीव आपल्याला असते. त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रवाहात आपल्या स्वरुपरुपी नौकेत बसल्यामुळे व्यवहाराच्या तटावर आपले रुप कर्म करीत आहे असे बघण्यातला फोलपणा त्याला जाणवायला लागतो. हातून घडलेल्या कर्मांकडे अत्यंत तटस्थपणे पहायची शक्‍ती त्याला प्राप्त होते. ह्या अवस्थेत मुरुन ती अंगात भिनल्यावर त्याची काय अवस्था होते याचे वर्णन करणारा गीतेत चवथ्या अध्यायातील एकोणिसावा श्लोक आहे: `यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ १९:४ ॥’ त्यावर विवेचन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वरील ओव्या सांगीतल्या आहेत. साधकाच्या अशा अवस्थेबद्दल ते म्हणत आहेत की `आपल्या हातून घडलेल्या कुठल्याही कर्माबद्दल त्या पुरुषाच्या मनात खेद उत्पन्न होत नाही आणि केलेल्या कर्मांपासून कुठल्याही फळांची अपेक्षा त्याच्या मनात उद्‌भवत नाही. याशिवाय आता एखादे कर्म मी करीनच वा हातात असलेले कर्म व्यवस्थित पार पाडीन या विचारांचा स्पर्शसुध्दा त्याच्या मनाला होत नाही. आत्मज्ञानाच्या अग्नीने त्याने स्वतःचे कर्तृत्व जाळलेले असते. अशा मनुष्याकडे प्रत्यक्ष ब्रह्मच मनुष्यरुप घेऊन पृथ्वीवर अवतरले आहे ह्या दृष्टीने तू बघ’.

 

कर्तृत्वाचा अभिमान नसण्याची आवश्यकता

 

आपल्या मनात दरक्षणी संकल्प-विकल्पांचे जाळे गुंतले जात असते. अशा जगण्याची इतकी सवय आपल्याला झालेली आहे की जेव्हा काही करायला नसते तेव्हा आपण बेचैन होतो, `बोअर झालो’ असे म्हणायला लागतो! अचानक मिळालेल्या रिकाम्या वेळात आपल्याला कधीही असे वाटत नाही की शांत मन ठेवून नुसते बसून असणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. परंतु व्यवहारातील ध्येय काय असे विचारले तर खूप पैसे मिळवून `आरामात’ आयुष्य जगायचे वा कर्तृत्ववान मुलांना जन्म देऊन वृध्दापकाळी कुठलीही काळजी न ठेवता `सुखात’ आयुष्य जगायचे असे उत्तर आपण देतो. असे ध्येय असतानासुध्दा ज्याक्षणी काही करायला नसते तेव्हा आपल्या व्यावहारीक ध्येयाची प्राप्ती झालेली आहे असे आपण का मानत नाही? बेचैन का होतो? याचे कारण असे की आपल्याला पूर्ण जाणीव असते की हा रिकामा वेळ क्षणिक आहे, शाश्वत नाही. हातात घेतलेली अनेक कामे अजून पूर्ण व्हायची आहेत. आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या कर्मांचे अपेक्षित फळ येणार आहे की नाही याबद्दल खात्री नसते. तेव्हा आत्ताच्या रिकाम्या वेळाबद्दल आनंद व्हायच्या ऐवजी जीवनपटातील हे तात्पुरते मध्यांतर संपल्यावर परत सुरु होणाऱ्या रगाड्याची काळजी असते. दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे आनंद म्हणजे काय याबद्दलची आपली एक विशिष्ट कल्पना. कुणाला चांगले भोजन मिळाले तरच आनंद होतो, लहान मुलाला किती चॉकलेट मिळाली यावर दिवस अवलंबून असतो तर युवकाला मैत्रिणीच्या सहवासातच आनंद असतो. तेव्हा एकतर मागे काय घडले आहे त्याच्या निर्णयाची अपेक्षा म्हणून वा पुढे काय होणार आहे याबद्दलच्या काळजीमुळे वा कशात सुख आहे याबद्दल ठाम मते असल्याने आपणांस अचानक प्राप्त झालेल्या रिकाम्या वेळाची पर्वा नसते.

आता अशी कल्पना करा की वर वर्णन केलेल्या तिन्ही गोष्टी तुमच्या जीवनात नाहीत. ना तुम्हाला पूर्व कर्मांची काळजी आहे, ना वर्तमान काळात काय हवे आहे याची जाणीव आहे ना भविष्यात कुठले फळ अपेक्षित आहे. असे असताना तुम्हाला काही काळ शांत बसायला मिळाले तर तुम्ही कंटाळून जायच्याऐवजी मिळालेल्या सुखाबद्दल भगवंताचे ऋणी व्हाल. अशा वेळी `बोअर’ होण्याऐवजी प्रत्येक क्षण पूर्णपणे उपभोगाल. आणि मनाची अशी अवस्था असताना सर्व जीवनच रिकामा वेळ आहे हे जाणविले तर तुमची अवस्था ` देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणे नाहीं समस्ता । संसारदुःखा ॥३३८:२॥’ अशी होईल! सतत सुख मिळावे ह्या हेतुनेच आपली कर्मे होत असल्याने वरील अवस्थेबद्दल आपल्या मनात एक साहजिक आपुलकी निर्माण झाली पाहीजे. ज्या मार्गाने ही स्थिती प्राप्त होते त्या मार्गाची थोडीशी ओळख तरी करुन घ्यावी असे वाटले पाहीजे. आपल्या मनाला ह्या मार्गाबद्दल ओढ लागणे म्हणजेच आपल्या जीवनातला खरा परमार्थ (परम+अर्थ) आहे. एकदा ही ओढ उत्पन्न झाली की तीच्या प्रभावाने आपोआप साधना सुरु होते. मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल वा दासबोधाचा अभ्यास कराल. रमण महर्षींच्या प्रभावाखाली याल वा गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे सतत राम नाम जपायचा प्रयत्‍न कराल. प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे. (आणि कुठला मार्ग आपला आहे हे कळायलाच खूप वेळ लागतो. पण तो एक वेगळा विषय आहे.) याशिवाय अशा अनंत मार्गांपैकी प्रत्येक मार्गाची मनुष्याच्या आयुष्यातील प्रतिबिंबे निराळी आहेत (राम नाम कसे घ्यावे यावर प्रत्येकाला मते असतात! ज्ञानेश्वरीच्या एकाच ओवीचा अर्थ प्रत्येकाला वेगळा समजतो इत्यादी). परंतु इतक्या सर्व वैविधतेमध्ये मार्गावर चालण्यामागची मानवाला असलेली शाश्वत सुखाची ओढ एकच आहे. ही ओढ म्हणजेच भगवंताचे आपल्या जीवनातले सध्याचे रुप होय! या जगात एकच भगवंत आहे, म्हणूनच ही ओढ एक आहे. त्या ओढीमुळेच आपण भगवंताला जाणू शकण्याची शक्यता निर्माण होते. अनंत मार्गांची सुरुवात म्हणजे ही ओढ जशी एक आहे त्याचप्रमाणे सुरुवातीनंतर भिन्न असणाऱ्या ह्या अगणित मार्गांचा शेवटही (म्हणजे भगवंताची प्राप्ती) एकच आहे. आपण सर्वजण एकाच बिंदूतून आपला मार्ग सुरु करतो व एकाच ठिकाणी संपवितो!! ज्याठिकाणी आपणाम्स पोहोचायचे आहे त्या अंतिम जागेची सुरुवात म्हणजे आपण केलेल्या कर्मांबद्दलचा कर्तेपणा टाकणे होय. मनुष्याचा कर्तेपणा जाणे हा त्याच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. कर्तेपणा गेल्याशिवाय साधनेच्या मार्गाच्या शेवटाची सुरुवात होत नाही हे कळल्यावर कर्तृत्वाचा अभिमान सोडणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल.

 

पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय कर्तेपणा जात नाही

 

आपण आयुष्यात एकातरी गोष्टीचा त्याग केला आहे का? तुम्ही म्हणाल `हो, मी सिगारेट पिणे सोडले आहे’, किंवा `आता मी स्वतःच्याच मनाप्रमाणे गोष्टी व्हाव्या हा आग्रह सोडला आहे’ इत्यादी. पण जरा विचार करा, आत्तापर्यंत ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्याआधी ती गोष्ट जवळ ठेवण्यापेक्षा सोडणे योग्य आहे ह्या ज्ञानाचा तुम्ही अंगिकार केला होता हे तुमच्या ध्यानात येईल. त्या ज्ञानप्राप्तीचा परिणाम म्हणून आपण त्याच्या विरोधाभासी वर्तन म्हणजे कधी सिगारेट पीणे सोडतो, वा आपलेच खरे हा हट्ट सोडून तडजोड करतो. पहील्या अध्यायात अर्जुन जेव्हा हातातील धनुष्य टाकून होणाऱ्या युध्दाबद्दल खेद व्यक्‍त करतो तेव्हा ज्ञानेश्वरीत माऊली असे म्हणते की अर्जुनाचा मनात कौरवांबद्दल, भीष्माबद्दल दया उत्पन्न झाली तेव्हा त्याच्या मनातील वीरवृत्ती आपोआप निघून गेली. करुणा ही युध्दातील शौर्याच्या विरुध्द असल्याने त्याच्या हातातील धनुष्य आपोआप गळून पडले. त्यामुळे कर्तेपणाचा त्याग करायचा असेल तर कर्तेपणा चुकीचा आहे हे ज्ञान आधी मिळविले पाहीजे. मग आपोआपच कर्तेपणा नष्ट होईल.

कुठले ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्तेपणा नष्ट होईल? आपल्या स्वरुपाचे ज्ञान झाल्यावर! आणि आपले रुप एक आहे का? असे बघा की आपल्या पालकाच्या रुपाला मुलावर चांगले संस्कार केल्याचा अभिमान आहे. आपल्या विद्यार्थीपणाला परीक्षेत पहिला आल्याचा गर्व आहे आणि आपल्या नवरेपणाला सुशील बायकोबद्दल आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा आपण पालक असतो तेव्हा परीक्षेत किती गुण मिळाले आहेत याच्याशी संबंध नसतो वा आपण कचेरीत किती उच्च पदावर काम करीत आहोत याचा विचार नसतो. आपल्या प्रत्येक कर्माचा कर्ता म्हणजे आपले एक रुप आहे हे तुम्हाला दिसून येईल. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा बाजूला लिहीलेल्या आकड्यांवर फिरत असतो त्याप्रमाणे आपण एका रुपातून दुसऱ्या रुपात सतत फिरत असतो व प्रत्येक रुपाच्या अनुषंगाने कर्मे करीत असतो. आपले सर्व जीवन असे निरनिराळ्या रुपातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यातच व्यतीत झाले आहे हे तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. अशी वस्तुस्थिती असल्याने कुठल्या रुपाला स्वरुप म्हणावे याचा संभ्रम आपल्या मनात साहजिकपणे उत्पन्न होतो.

खऱ्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजे काय तर ह्या सगळ्या अस्थिरतेत आपले एक रुप स्थिर आहे हे जाणविणे व त्या रुपात मुरुन राहणे. ज्याप्रमाणे घड्याळाच्या काट्याचे एक टोक परीघावर फिरत असले तरी दुसरे टोक केंद्रस्थानी स्थिर असते त्याचप्रमाणे आपले एकच अस्तित्व ही वेगवेगळी रुपे घेत आहे हे स्वसंवेदनापूर्वक जाणणे म्हणजेच स्वरुपाचे ज्ञान होणे होय. जन्मापासून आपण एकच व्यक्‍ती आहोत याबद्दल आपल्याला अजिबात संदेह नसतो. उदाहरणार्थ, धंदा चालला म्हणून रंकाचे राव झालो तरी एकाच व्यक्‍तीने गरीबीतून कष्ट करुन श्रीमंती प्राप्त केली आहे हे सर्व जाणतातच. हे आपले अचल रुप कुठले? का आपण असे समजतो की `मी’ आधी लहान मुलगा होतो आणि आता `मला’ लहान मुलगा झाला आहे? तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी या दोघांना एक मानण्याकरीता त्यांच्यात कुठलेतरी साम्य असले पाहीजे. ते आपण शोधले पाहीजे. स्थळ-काळात न सापडणारी वस्तूच या दोन्ही रुपांना समान असू शकते. आपल्यामध्ये अशी कुठली वस्तू आहे याचा शोध घ्या. त्या वस्तूलाच आपण `सो अहम्‌’ असे म्हणू शकतो. ह्या स्वरुपाचे ज्ञान झाले की बाकी दुसऱ्या रुपांचे मिथ्यत्व आपोआप लक्षात येते व त्या रुपांकडून घडलेल्या कर्मांबद्दलचा कर्तेपणा नष्ट होतो.

ज्या लोकांना आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे ते आपल्या अशा रुपात अडकून पडले आहेत की ज्या रुपात राहून त्यांनी आपल्या मनाप्रमाणे कर्मे केली आहेत. सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेट खेळतो या रुपातच अडकून पडला तर मैदानाबाहेर त्याचे अस्तित्वच नाही असे आपल्याला समजावे लागेल. घरी गेल्यावर बायको-मुलांपुढे त्याला आणि आपल्या प्रत्येकाला कौटुंबिक रुपातच सामोरे जावे लागते. तेव्हा एका रुपाला (मग त्या रुपाचे कर्तृत्व सचिनच्या खेळाप्रमाणे कितीही महान असो!) महत्व देण्यात आपण स्वतःचे संपूर्णत्व गमावतो आहे हे लक्षात आले की आपली साधना सुरु झाली आहे असे समजावे. परमार्थात आपले काम स्वतःचा शोध घेणे सुरु करणे एवढेच आहे. बाकी सर्व बघायला भगवंत समर्थ आहे यात शंकाच नाही. चला, आपण सर्व जण आपापल्या शोधात लागू या!

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १ सप्टेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

2 Responses to (103-105)/4: Know Thyself. Rest Will Follow.

  1. raj म्हणतो आहे:

    there are different ways for god.,but how i will selected particularly any one ? and how i know that my way is correct way ?

  2. Shreedhar म्हणतो आहे:

    तुमचा प्रश्न (आपला मार्ग नक्की कुठला हे कसे कळणार?) फार चांगला आहे. बहुतांशी साधक या प्रश्नात अडकलेली दिसून येतात. याचे उत्तर असे आहे:

    परमार्थामध्ये कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाही. साधनेच्या मार्गाबद्दलही नाही. तेव्हा ‘मला एक मार्ग सापडेल आणि त्यातून परमानंदाची प्राप्ती होईल’ ही अपेक्षा आपण सोडली पाहिजे. आत्ता जी साधना तुम्हांस प्रिय वाटत आहे ती तुम्ही आचरणात आणा. जेव्हा त्या साधनेला सोडून नवीन मार्गावर चालायची वेळ येईल तेव्हा जरुर भगवंत तुम्हाला मदत करायला येईल. जर तुम्हाला कुठलीच साधना फार प्रिय वाटत नसेल तर जी साधना सहज करता येईल अशी खात्री वाटत आहे ती सुरु करा. जर कुठलीही साधनासुध्दा माहिती नसेल तर देवाचे नाव घ्यायला सुरु करा. बाकी सर्व आपोआप होईल, जर तुम्ही प्रामाणिकपणे साधना करीत असाल तर. तुमच्या स्वतःच्या वैयक्‍तिक प्रयत्‍नांना माझ्या शुभेच्छा!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: