53/1: Bhagavadgita in our life

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

जे अपेक्षिजे विरक्‍ति । सदा अनुभविजे संती ।

सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३:१ ॥

 

श्रीमद्‌ भगवद्गीतेवरच्या आपल्या प्राकृत भाषेतील टीकेचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ज्ञानेश्वर महाराज गीतेबद्दल जे प्रशंसोद्गार उच्चारतात त्यामधील एक ओवी आज निरुपणाला घेतली आहे. श्री स्वामी स्वरुपानंदांच्या ज्ञानेश्वरी नित्यपाठातही वरील ओवी अंतर्भुत केली आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील तत्वज्ञानाबद्दल पहिल्या अध्यायातील ५० ते ५५ ओवींत ज्ञानेश्वर असे महाराज म्हणतात की `महाभारतरुपी कमळातील परागकण असा हा कृष्णार्जुनांचा संवाद आहे. किंवा सर्व शब्दब्रह्म व्यासांनी आपली बुध्दी वापरुन ढवळुन जे नवनीत (लोणी) प्राप्त केले ते त्यांच्या ज्ञानाग्नीच्या आंचेवर कढवून व विवेकाने कडसून आलेले सुगंधित तूप म्हणजे ही गीता आहे. “विरक्‍त लोकांना हीच्या तत्वज्ञानाचे अपरोक्ष ज्ञान व्हावे अशी अपेक्षा असते. सर्व संत ह्याच ज्ञानाचा संतत अनुभव घेत असतात व जे (आत्मरुपाचे पूर्ण ज्ञान होऊन) सोऽहम्‌ ध्यानात परायण आहेत त्यांना आकर्षित करणारी ही गीता आहे”. भगवद्गीतेबद्दल प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी प्रशंसोद्गार काढले आहेत व सनक आदी ऋषी हीचे आदराने पठण करतात.’ गीतेतील तत्वज्ञान इतके सूक्ष्म आहे की त्याचा अपरोक्ष बोध व्हायचा असेल तर आपले मन अतिशय संवेदनाशील केले पाहीजे. घरात विजेचा पुरवठा होत आहे की नाही हे बघायला साधारण `टेस्टर’ पुरतो. परंतु वीजेचा सूक्ष्म असा काही मायक्रोवोल्ट करंट येत आहे की नाही हे जर बघायचे असेल तर महागडे उपकरण आणणे जरुरी असते. त्याचप्रमाणे व्यावहारीक ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आपले नेहमीचे मन व बुध्दी पुरेशी आहे पण गीतेतील तत्वज्ञान काय आहे हे बघण्याकरीता आधी आपले मन व बुध्दी अत्यंत सक्षम आणि आतुर बनविली पाहीजे. म्हणून माऊली म्हणते की `जैसे शारदीयेचे चंद्रकळे । माजी अमृतकण कोंवळे। तें वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे ॥ ५६:१॥ तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥५७:१॥’. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच गीतेचे महत्व आणि त्यातील ज्ञान प्राप्त करण्याकरीता मनाची कुठली अवस्था असावी हे माऊलींनी स्पष्ट केले आहे.

 

आपल्या साधनेने कुठले फळ प्राप्त होईल?

 

आपल्या दररोजच्या जीवनात ज्या कर्मांच्या पूर्तीने आपल्याला हवे ते फळ प्राप्त होण्याची शक्यता असते अशाच कर्मांना आपण स्वतःहुन प्रारंभ करतो. परमार्थाचा मार्ग स्वतःहुन चालायचा असल्याने साहजिकच त्या मार्गावर चालणाऱ्यांना आपल्या आवडीचे फळ मिळणार आहे याची जाणीव असणे जरुरी आहे. म्हणून साधना सुरु करताना आपल्या अपेक्षा काय आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती होण्याची शक्यता कितपत आहे हे बघणे जरुरी आहे. जेवढे फळ मोठे असेल तेवढी त्याच्या प्राप्तीसाठी जास्त कष्ट घ्ययची आपली तयारी असते. त्या फळप्राप्तीच्या आशेमुळे सर्व समाजाच्या विरुध्द जायलासुध्दा आपण तयार असतो. याकारणास्तव आपली साधना सुरु करताना त्यातून कुठले फळ अपेक्षित आहे याची पूर्ण जाणीव होणे आवश्यक आहे.

वरील ओवींतून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते की गीतेच्या अभ्यासाने व्यावहारीक लाभ होईल असे ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीत. आपण देवीमाहात्म्य वाचलेत तर त्यातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाचे फळ लिहिलेले दिसून येते. कुठल्या अध्यायांच्या ठराविक पारायणांनी राजा वश होईल, वा शत्रूंचा नाश होईल इत्यादी. हीच गोष्ट गुरुचरीत्राच्या अध्यायांत बघायला मिळते व शिवलीलामृतातही असेच व्यावहारीक लाभ सांगितले आहेत. मनात व्यावहारीक इच्छा धरुन ह्या पोथ्या वा त्यातील ठराविक अध्याय यांचे निरंतर पारायण करणारी असंख्य माणसे आहेत आणि त्यांना त्या पोथ्यांच्या सामर्थ्याचे अनुभव आलेले आहेत. खरे म्हणजे वरीलपैकी सर्व पोथ्यांत अत्यंत गूढ तत्वज्ञान भरलेले आहे. उदाहरणार्थ, वानरगीतेत सर्व गीतेचे तत्वज्ञान आहे. परंतु साधारणतः पुत्रप्राप्तीची इच्छा धरुनच बहुतांशी लोक वानरगीतेचे पठण करतात असे दिसून येते कारण सुरुवातीलाच ह्या स्तोत्राच्या नित्यपठणाने स्त्रिया गर्भवती व्हायची खात्री दिली आहे. जर आपल्यापैकी कुणाला वरीलपैकी वा बाकी कुठल्याही पोथीबद्दल त्यापासून मिळणाऱ्या व्यावहारीक फळांमुळे आदर असेल तर आपण जरुर ती पोथी वाचा. पण अपेक्षित फळ प्राप्त झाल्यावर आपले पठण थांबवू नका! यांतील प्रत्येक पोथीमध्ये तुम्हांला मोक्ष मिळेल असे तत्वज्ञान आहे. ते बघण्याची नजर आपल्यात नाही इतकेच. कुठलीही व्यावहारीक इच्छा न धरीता तुम्ही आदराने वरील पोथींचे पारायण करुन बघा म्हणजे तुम्हांला याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही. भौतिक फळ मिळेल असे का लिहिलेले असते तर आपल्याला त्या पोथ्या वाचण्याची सवय व्हावी म्हणून. आपल्याकडून ह्या पोथ्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मनासारखे फळ दिले की केवळ त्यांच्या प्रेमाखातर आपण त्यांचे पारायण करावे व त्यातील सूक्ष्म रसाचा आस्वाद घ्यावा. असो.

तेव्हा केवळ ज्ञानेश्वरीत नव्हे तर प्रत्येक अध्यात्मिक पोथीत त्या पोथीच्या नित्य पठणाने कुठले फळ अपेक्षीत आहे हे कथन केलेले असते. परंतु ज्ञानेश्वरीत कुठलेही भौतिक फळ लिहिलेले नाही ही महत्वाची गोष्ट आहे. वर सांगितलेल्या सर्व पोथ्या आपल्याला देह-मनाचे सुख देऊन मग त्यांच्या भोगापलिकडे आपण जाऊ अशी आशा ठेवतात पण भगवद्गीतेला ही तडजोड मान्य नाही! म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला कमळातील परागाची उपमा दिली आहे. कमळ हे फूल सर्व जगाला प्रिय असले तरी त्यातील परागांचे महत्व फक्‍त भुंगे जाणू शकतात! दृष्य जगात जे गुंतले आहेत त्यांना कमळाच्या फुलाचा मोठा आकार, त्याचा रंग आणि पाकळ्यांची सुंदरता भुलावत असली तरी भुंगे फक्‍त परागकणांचे सेवन करतात. श्री रामकृष्ण परमहंस सामान्य लोकांना माश्यांची उपमा द्यायचे. ते म्हणायचे की ज्याप्रमाणे माश्या कुठेही बसतात, कधी विष्ठेवर वा कधी गुळावर वा कधी मधावर व नंतर परत कचऱ्यावर. त्या सगळ्यांतून त्यांना सारखेच पोषण मिळते! त्याचप्रमाणे आपण कधी व्यवहारात गुंततो तर कधी परमार्थात रंगतो परत आपल्या नोकरीची काळजी करतो. त्या सर्वांत आपल्याला एकसारखाच आनंद मिळत असतो. परंतु ज्याप्रमाणे भुंगे फक्‍त फुलांवरच बसतात त्याप्रमाणे संतमंडळी फक्‍त परमार्थातच स्वारस्य दाखवितात. अशा संतांना सदाप्रिय असलेली गोष्ट म्हणजे गीता होय. तेव्हा गीतेचे नित्यपठण करुन आपणांस कुठलेतरी भौतिक सुख मिळणार आहे अशी अपेक्षा ठेऊ नका असे आपण वरील ओवीतून शिकले पाहीजे. केवळ श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे आणि त्यांच्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी नित्य ज्ञानेश्वरी वाचावी हे यातून स्पष्ट होते.

 

आपल्या जीवनातील भगवद्गीता

 

इथे अजून एक अर्थ सांगावासा वाटतो. तो असा की गीता वा ज्ञानेश्वरी या शब्दातून केवळ ते ग्रंथ सूचित होतात असे नसून आपली सर्व साधना ध्वनित होते. हे कसे असे विचाराल तर पहा: प्रत्येक गोष्टीचे आपल्या जीवनात एक प्रतिबिंब असते आणि एकाच गोष्टीचे वेगवेगळ्या लोकांच्या जीवनातले रुप भिन्न असू शकते (नव्हे भिन्न असतेच!). उदाहरणार्थ, मला तुम्ही फार कमी ओळखता. एक ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारी, उच्च शिक्षण असलेली व्यक्‍ती असेच तुमच्या जीवनात माझे रुप आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला माझ्याविषयी आदरयुक्‍त भावना असण्याची शक्यता आहे. परंतु माझ्या पत्‍नीच्या मनातील माझे रुप वेगळे असू शकेल. तीने मला खूप जवळून पाहीले असल्याने माझ्याबाबतीतील तिचे ज्ञान वेगळे असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे माझ्या मुलाच्या वा मित्रांच्या मनातील माझे रुप ह्या दोन्ही रुपांपेक्षा वेगळे असू शकते. तेव्हा एकाच व्यक्‍तीचे प्रत्येकाच्या जीवनात वेगळे रुप असू शकते. केवळ व्यक्‍तींबद्दल नव्हे तर सर्व गोष्टींना ही बाब लागू होते. उदाहरणार्थ, लाल रंगाची वाहतूक पोलीसाच्या मनातील व्याख्या सिग्नलच्या लाल रंगाची असेल तर एका सर्जनच्या मनात लाल रंग या शब्दामुळे रक्‍ताची आठवण जागृत होईल तर मद्यशाळेत नियमित भेट देणाऱ्याला त्याच्या आवडत्या पेयाचा रंग आठवेल!! किंवा बरेच वेळा एखादे जुने गाणे ऐकल्यावर आपणांस ते गाणे पहिल्यांदा ऐकलेल्या क्षणाची आठवण येऊन आपण तो क्षण परत जगतो. खरोखर, आपल्या जीवनात एका वस्तूने काय संदर्भ घेतला आहे यावर आपली त्या वस्तूची व्याख्या ठरलेली असते, आस्था निश्चित होत असते.

आता ही गोष्ट ज्ञानेश्वरीला लावली तर काय दिसेल? आपल्या जीवनातील गीतेचे वा ज्ञानेश्वरीचे रुप कुठले असेल? मगाशी आपण बघितले की भगवद्गीतेच्या अभ्यासामुळे आपल्या जीवनात केवळ एकच गोष्ट प्राप्त होणार आहे आणि ती म्हणजे भगवंताचे अनुसंधान. म्हणून ज्ञानेश्वरीचा आपल्या जीवनातील खरा अर्थ म्हणजे आपली भगवंतप्राप्तीकरीता असलेली धडपड (म्हणजे साधना) असेच म्हणावे लागेल. आपली परमार्थाच्या मार्गातील सर्व साधना म्हणजेच आपल्या जीवनातील गीता होय. म्हणून या ओवीच्या निमित्ताने असे सांगावेसे वाटते की परमार्थात जी काही साधना आपण करीत आहोत तीचा उपयोग भौतिक सुखे मिळविण्यास न केलेला बरा. भगवंतांना साधनेचा असा उपयोग अपेक्षित नाही. असे बघा, भगवंतकृपेने आपल्याला श्रीगुरु लाभलेले आहेत आणि आपण कुठल्या कॉलेजमधे प्रवेश घ्यावा, कुठली गाडी विकत घ्यावी, वा कुठले घर विकत घ्यावे असे विचारतो हे कितपत योग्य आहे? असे विचारणे म्हणजे गुरुंचा उपयोग गुरुचरित्रासारखा करणे होय, भगवद्गीतेसारखा नव्हे! बरे, असे विचारले तरी त्यानंतर आपण केवळ त्यांच्या प्रेमाकरीता साधना का करीत नाही? त्यांच्या आज्ञेचे पूर्ण पालन का करीत नाही? यावर विचार करायची वेळ आलेली आहे असे वाटते. आलेले गंडांतर टळण्याकरीता शिवलीलामृताचे हजारवेळा पारायण केले हे चांगलेच. पण आलेल्या संकटाचे निवारण झाल्यावर ती पोथी कपाटात ठेवू नका! केवळ साधनेकरीता साधना करावी असे जेव्हा तुम्हाला मनापासून वाटावे लागेल तेव्हा तुम्ही गुरुंचा खरा उपयोग करुन घेत आहात असे समजा.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ८ सप्टेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: