Shloka 46/18: The Puja of the Abstract God

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

हे विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।

आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥ ९०६:१८ ॥

 

अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत ।

म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ॥ ९११:१८ ॥

 

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥ ९१७:१८ ॥

 

प्रत्येकाला भगवंताची ओढ असते. या जगात कुणीही असा नाही की ज्याला देवाची ओढ नाही. अर्थात हे वाक्य पूर्ण जाणून घेण्यास भगवंताने कुठले रुप आपल्या जीवनात घेतले आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. कुणी श्रीकृष्णांचे नाम घेतो तर कुणाला शंकराची उपासना आवडते. जी माणसे आमचा कुठल्याही भगवंतावर विश्वास नाही असे म्हणतात त्यांची अशी खात्री असते की ठराविक कर्मांचे फळ चांगले असते आणि काही कर्मे न केलेली बरी. म्हणजे हे जग काही नियमांनी बांधलेले आहे अशी त्यांची समजूत असते व त्या नियमांना जाणून घेऊन निसर्गांच्या ह्या नियमांत स्वतःला ते बांधून घेतात. त्यांचे आपले जीवन समृध्द करायचा अथक प्रयत्‍न करीत असणे ह्या वस्तुस्थितीलाच दर्शविते. त्यामुळे आपण असे मानू शकतो की अशा लोकांच्या जीवनातले परमेश्वराचे रुप म्हणजे त्यांना कळलेले निसर्गाचे नियम आणि व्यवहारातील प्रगतीचे त्यांचे सततचे प्रयत्‍न हीच त्यांची परमेश्वरप्राप्तीची साधना होय. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की भगवंताच्या ज्या कुठल्या रुपाची ओढ असते त्याप्रमाणे साधकाला ईश्वर प्राप्त होतो. ह्या वस्तुस्थितीमुळे आपल्यापुढे दोन पर्याय उपलब्ध होतात. त्यातील पहिला म्हणजे आपण सध्या जे काही जीवन जगत आहोत त्यात काहीही फरक करायची गरज नाही असे मानणे व दुसरा पर्याय म्हणजे आपल्या सध्याच्या वर्तनाने कुठला भगवंत आपल्याला प्राप्त होईल हे बघून त्या रुपात ईश्वराचे ध्यान करणे योग्य आहे का नाही यावर विचार करणे.

पहिल्या मार्गाने गेल्यास आपल्या सद्यजीवनात तत्वतः फार फरक पडणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हा मार्ग जे लोक सध्याच्या आयुष्याबद्दल अत्यंत प्रसन्न आहेत त्यांनीच फक्‍त आपलासा म्हणावा. आता तुम्हांला वाटेल की अशी खूप कमी भाग्यवंत माणसे असतील. परंतु सत्य परीस्थिती वेगळी आहे. समाजातील बहुतांशी लोकांना आपले जीवन अजून चांगले व्हावे असे सतत वाटत असले तरी त्यांना सद्यपरीस्थितीबद्दल आत्यंतिक बोचणी नसते. ते म्हणतात `आपली अवस्था अजून चांगली असावी हे खरेच पण सर्व बाजूने विचार केला तर आहे ती परीस्थिती एवढी वाईट नाही’. आपल्यापेक्षा हलाखीची अवस्था असलेल्या लोकांकडे बघून स्वतःच्या जीवनाबद्दल आनंद आपण सर्वजण मानतो. खुद्द अर्जुनाला सुध्दा कुरुक्षेत्रात येण्यापूर्वी आपल्या क्षत्रिय धर्माचा खरा कंटाळा आला होता का? खरे म्हणजे त्याच्या आधीच्या जीवनात क्षत्रिय धर्माचे पालन करण्यामुळे कितीतरी बिकट प्रसंग आले होतेच की. पण प्रत्येकवेळी अर्जुनाने त्या संकटांना धीरोदात्तपणे तोंड दिले होते. म्हणूनच कुरुक्षेत्रात पदार्पण करण्याआधी त्याच्या जीवनातल्या श्रीकृष्णांचे रुप वेगळेच होते. गीतेचा उपदेश ऐकताना अकराव्या अध्यायात विश्वरुपाचे दर्शन घडल्यावर त्याला आपल्या पूर्वजीवनातील भगवंतांच्या रुपाबद्दल खेद निर्माण जाहला (पहा गीतेतील श्लोक ४० ते ४४, अध्याय ११). अशा रीतीने हे स्पष्ट होते की प्रत्येकाच्या जीवनातला भगवंत वेगळा असतो आणि स्वतःच्या जीवनातले परमेश्वराचे रुप केव्हाही बदलण्याची शक्यता असते. भगवंतप्राप्तीची साधना त्याच्या रुपावर अवलंबून असल्याने (उदाहरणार्थ, बाळकृष्णाकडे वात्सल्याभावाने बघायला पाहीजे तर श्रीरामांकडे दास्यभावाने. शक्‍तीपीठाची साधना वेगळी असते आणि भौतिक जगात देव पाहणाऱ्यांनी केलेली पोथ्यांची पारायणे वेगळीच असतात.) स्वतःला कुठल्या देवाची खरी आस्था आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे बघणे ही साधनेची पहिली पायरी आहे. त्याचबरोबर आपणांस कालपर्यंत ओढ असलेल्या भगवंताच्या रुपाबद्दल आजपासून पुढे कमी आत्मीयता वाटणे शक्य आहे ही जाणीव मनात ठेवणे अत्यावश्यक आहे. जीवनातल्या भगवंताच्या अशा बदलत्या रुपामुळेच सध्याच्या भगवंताच्या रुपापेक्षा अजून व्यापक रुपाचे आपल्या जीवनात आगमन होण्याची शक्यता असते. नाहीतर बदलाची संभावनाच नसती. ह्या सर्व बदलांचे अंतिम ठिकाण म्हणजे आपल्या आत्मरुपात स्थित असलेला भगवंत. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थदीपिकेच्या पहिल्या ओवीतच गणेशस्तवन सुरु करायच्या आधी त्यांनी `ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जयजयस्वसंवेद्या । आत्मरुपा ॥’ असे म्हटले आहे. याशिवाय जवळजवळ प्रत्येक अध्यायात त्यांनी आत्मरुपी देवाच्या स्तुतीपर अनेक ठिकाणी प्रशंसोद्गार काढले आहेत.

ज्या कुणाला आत्मरुपी देवाबद्दल आत्मीयता वाटत असेल त्यांनी साधना कशी करावी? सर्वात्मकी भगवंताची साधना कशी करावी हे स्पष्ट करणाऱ्या वरील ओव्या आहेत. या तीन ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहे की `आपल्यापुढे जे काही कर्म आले आहे त्यामध्येच आपले अस्तित्व अवलंबून आहे (आपुला अनन्य वोलावा) आणि ती कर्मे करण्यातच सर्वांच्या आत्म्यात स्थित असलेल्या देवाची खरी सेवा घडते. अरे अर्जुना, समोर आलेली कर्मे हे भगवंतांच्या इच्छेनेच आलेली असतात आणि म्हणून त्याच्यापाशी जायला हा एक राजमार्ग आहे कारण प्राप्त झालेली सर्वकर्मे त्याच्या इच्छेनेच आली आहेत या भावनेने केली (म्हणजे त्यालाच पूजा म्हणून अर्पण केली) तर त्या सर्वात्मक ईश्वराला अनावर आनंद होतो’. त्या अनावर आनंदाच्या भरात आत्मरुपी देव आपले नित्यनूतनरुप साधकाला क्षणोक्षणी दर्शवायला लागतो. साधकाच्या साधनेची पूर्तता व्हायला लागते!

 

जीवनातील अमूर्त देवाची आवश्यकता

 

व्यावहारीक जीवनात आपण एवढे दंग झालेले असतो की आपल्याकडे परमेश्वरासाठी फार थोडा वेळ असतो. त्या थोड्या वेळाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याची आपली प्रवृत्ति असल्याने आपणांस भगवंताच्या साहजिकपणे प्राप्त होणाऱ्या रुपाची एक नैसर्गिक ओढ असते. देवाला गणपति वा विष्णू अशा रुपात बघितले की दोन फायदे होतात. एक म्हणजे त्याच्या प्राप्तीची साधना स्पष्ट होते. उदहरणार्थ, ठराविक स्तोत्रे म्हटली पाहीजेत, त्याच्या देवळात (म्हणजे ते रुप जिथे असते तिथे) ठराविक तिथींना जायला हवे इत्यादी. दुसरा फायदा म्हणजे ह्या देवाच्या प्राप्तीमुळे काय लाभ होणार आहे याची आपणांस स्पष्ट कल्पना येते. याचे कारण असे की प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी हे दररोज म्हटल्यामुळे काय लाभ होतो हे लिहिलेले असते. उदाहरणार्थ, गणेशपूजेने सर्वविघ्ने नष्ट होतात, नित्य विष्णुसहस्त्रनाम उच्चारल्याने निर्वाणकाळी प्रत्यक्ष विष्णू दर्शन देतो इत्यादी. त्यामुळे आपल्या जीवनाची मुख्य ध्येये व्यावहारीक असूनही देवपूजेत गेलेला वेळ `वाया’ गेला असे कधीच आपल्याला वाटत नाही!! त्यामुळे अशा देवाची साधना करण्यास आपणांस उत्साह येतो. या कारणांमुळेच असे दिसून येते की सर्वसाधारणपणे साधकाची देवाबद्दलची पहिली कल्पना म्हणजे त्याचा कुठलातरी अवतारच असतो, `भक्‍तीमार्ग’ आपणांस सोपा वाटतो! अशा स्थितीत कुणी अमूर्त, आत्मरुपी देवाची स्तुती करु लागला तर त्यात आपणांस फारसे स्वारस्य नसते. आपली अशी अवस्था असल्याने आपल्या जीवनात अमूर्त देव असलाच का पाहीजे याचा विचार आपण केला पाहीजे. आपल्या मनाला एखादी गोष्ट पटली की ती गोष्ट केल्याशिवाय आपण रहात नाही. म्हणून एकदा आपल्याला आत्मरुपी भगवंत भजण्याच्या अनिर्वायतेची खात्री पटली की आपली ओढ आपोआपच त्याच्या `सर्वात्मकी’ रुपाकडे जाईल आणि त्याची वरील ओवींत वर्णन केलेली पूजा करण्यास आपण उद्युक्‍त होऊ.

भगवंताच्या सर्वात्मकी रुपाबद्दल आस्था निर्माण करण्यास पहिले उदाहरण व्यावहारीक घेऊ. असे बघा, संसाराच्या रहाटगाडग्यात महिनोंमहीने पिचल्यावर त्या सर्वांपासून सुटका होण्यास आपण रजा टाकतो व एका निसर्गरम्य स्थळी जाऊन विश्रांती घेतो. तिथे जाऊन नेहमीच्या आयुष्याबद्दल अजिबात विचार न करण्याने आपली `बॅटरी’ रीचार्ज होते व आपला रोजच्या जीवनातील उत्साह परत येतो. मग जेव्हा आपणांस या जगातील लोकांच्या वर्तणुकीचा कंटाळा येईल तेव्हा उत्साह परत येण्यास आपण अशी जागा शोधली पाहीजे जिथे दुसऱ्या कुणाची छायासुध्दा नाही. म्हणजे, ह्या जगातील सर्व घडामोडींमुळे आपल्या मनात जी विचारांची वादळे निर्माण होतात त्यापासून दूर जायला असे ठिकाण शोधले पाहीजे की जिथे संसाराचा शिरकाव झालेला नाही. देवाच्या कुठल्याही अवतारामध्ये आपणांस अशा ठिकाणी घेऊन जायची शक्‍ती नाही. त्यांच्या उपासनेचा परीपाक झाल्यावर ते जास्तीत जास्त त्यांच्या ठिकाणी तुम्हांला नेऊ शकतात. तिथे जरी आयुष्य सध्यापेक्षा चांगले असले तरी नियमानुसार वर्तन नाही केले तर पतन व्हायची शक्‍यता असतेच. परंतु आत्मरुपी स्थित असलेल्या अमूर्त देवाच्या सान्निध्यात संपूर्ण जगाचा विसर पडतो. आपले आत्मरुप जगातील कुठल्याही वस्तूवर अवलंबून नाही व म्हणून त्यापासून स्वतंत्र आहे. त्यामुळे जरी आपणांस केवळ या जगामध्ये पुढे जाण्यातच स्वारस्य असले तरी मध्ये सुट्टी घेऊन जाण्यास असलेली जागा म्हणूनतरी आपण अमूर्त रुपाची ओळख करुन घेतली पाहीजे!! आपले आत्मरुप म्हणजे स्वतःच्या जीवनातील सुंदर समुद्रकिनारा आहे. तिथे जाऊन मजा करण्याचा आपला जन्मसिध्द अधिकार आहे!!

अमूर्त देवाबद्दल ओढ वाटण्यास दुसरे आणि खरे कारण म्हणजे त्याचे अस्तित्व ही एकच खरी वस्तुस्थिती आहे आणि बाकी सर्व कल्पनेचा खेळ आहे. ज्याप्रमाणे सध्या अधिकारावर असलेल्या मुख्यमंत्र्याला तुम्ही आपले मानले नाही तरी त्याने केलेले नियम तुम्हांला पाळावेच लागतात, त्याचप्रमाणे जरी अमूर्त रुपाला तुम्ही आपलेसे केले नाही तरी (त्याच्या अस्तित्वावरच सर्व जग चालत असल्याने) त्याच्या नियमाप्रमाणेच तुम्हाला चालावेच लागणार आहे हे लक्षात घ्या. सर्व देवदेवतांचे अस्तित्व केवळ ह्या अमूर्त रुपावरच अवलंबून असल्याने एकदा आत्मरुपी स्थित देवाची प्राप्ती झाली की बाकी सर्व देवांशी सहजपणे जवळीक होईल हे ध्यानात घ्या. असे बघा की तुम्हांला परम तपस्या करुन सतत तुमच्या इष्टदेवतेचे निरंतर सान्निध्य लाभले तर काय होईल? भगवंताच्या श्रीशंकर या एका रुपाशी संलग्न होण्याकरीताच उमादेवीने तपस्या केली व त्यामुळे श्रीशंकरांचे जे सान्निध्य पार्वतीला लाभले तसे इतर कुणाला लाभले नाही. पण शेवटी त्या पार्वतीलासुध्दा असा प्रश्न पडला की ज्या शिवाचे ध्यान मी सतत करीत होते तो स्वतः कुणाचे ध्यान लावून बसला आहे? (सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात `.. जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी ॥१५३:६॥’.) ह्या विचाराने उद्विग्न होऊन देवीने शंकराला हे रहस्य विचारले व त्याचे निरसन करण्याकरीता आदिनाथ शंकरांनी जो उपदेश केला त्याचे सार म्हणजे अमूर्त देव आहे. तो उपदेश ऐकण्याकरीता प्रत्यक्ष विष्णूंनी एका मत्स्याच्या उदरात आश्रय घेतला व त्यातूनच श्री मत्स्येंद्रनाथांचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे. म्हणजे संपूर्ण नाथपरंपरेचा उगम केवळ पार्वतीच्या अमूर्त देवाबद्दलच्या उत्सुकतेने झाला आहे हे लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही आत्ता अमूर्त रुपाला महत्व द्या व न द्या, आपल्या सर्व साधनेचा शेवट ह्या अमूर्त रुपाच्या ओळखीतच होणार आहे हे सतत ध्यानात ठेवा मग विनाप्रयास तुमच्या मनात ह्या रुपाबद्दल आस्था उत्पन्न होईल.

एकदा ही आस्था निर्माण झाली की आपण आपली सर्व कर्मे करताना स्वतःच्या आत्मरुपाबद्दल जागृत राहू. नेहमीच्या जीवनातील प्राप्त कर्मे करीत असताना आत्मरुपाची जाणीव ठेवणे म्हणजेच `स्वकर्मकुसुमांनी’ आपण सर्वात्मक देवाची पूजा करणे. एकदा ह्या पूजेचा छंद लागला की आपली साधना फळाला पोहोचली असे समजण्यास हरकत नाही. परंतु ह्या स्थितीला हस्तगत करण्यासाठी आधी आपण अमूर्त देवाची आपल्या आत्मरुपात पुजा करणे जरुरी आहे. हा मार्ग कितीही खडतर वाटला तरी निराश न होता देवावर विश्वास ठेवून आपण त्यावर चालायला सुरुवात करुया. शेवटी आपल्या हातात तेवढेच आहे!

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १५ सप्टेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: