(187+188)/3: A key to obtain tranquillity

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आणि हे कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।

ऐसा अभिमान झणें चित्ता । रिगों देसी ॥ १८७:३ ॥

 

तुवां शरीरपरां नोहावे । कामनाजात सांडावें ।

मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८:३ ॥

 

परमार्थात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते. ती म्हणजे या मार्गातील आपले सर्व प्रयत्‍न संसारातील स्थूल गोष्टींना नियंत्रण करणाऱ्या सूक्ष्म शक्‍तीला जाणून घेण्याकरीता करायचे असतात. असे बघा, एखाद्या जंतूमुळे अंगात ज्वर भिनला तर आपण केवळ ताप कमी करण्याचे औषध घेत नाही तर त्या जंतूंचा नाश करण्याचे औषधही घेतो. ह्या उदाहरणातील जंतू हे चढलेल्या तापाचे सूक्ष्म कारण आहे आणि आपल्याला पूर्ण कल्पना असते की जोपर्यंत ह्या मूळ कारणाचा नाश होत नाही तोपर्यंत आपणांस ज्वरापासून पूर्ण सुटका नाही. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या जगाच्या अस्तित्वाचे सूक्ष्म कारण म्हणजे आपला अहंकार आहे. संसारातील संकटांवर मात करण्याचे आपले जे व्यावहारीक प्रयत्‍न असतात ते केवळ ताप कमी व्हावा म्हणून गोळ्या घेण्यासारखे आहे. त्यांनी कदाचित आलेली अडचण दूर होईल पण परत कधीही दुसरी अडचण केव्हा निर्माण होण्याची शक्यता रहातेच. याचे कारण असे की आलेल्या अडचणींच्या मागे असलेल्या सूक्ष्म कारणाला आपण जाणलेले नसते. फार कमी लोकांना अशी जाणीव असते की संसारातील अडचणींचे मूळ आपल्यामध्येच आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा आपला जो अहंकार आहे त्या अहंकाराचाच एक दूरगामी परीणाम म्हणजे अंगावर आलेल्या अडचणी होय. जोपर्यंत त्या अहंकारावर आपण प्रभुत्व मिळवित नाही तोपर्यंत आपणांस संसारज्वरापासून पूर्ण सुटका होणार नाही. आपल्या श्रीगुरुंकडे जाऊन त्यांनी सांगितलेली साधना करणे म्हणजे आपल्या संसाररुपी तापाच्या कारणांना काढून टाकणे आहे. ज्याप्रमाणे एखादा चांगला डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाला औषध सांगायच्या आधी त्याला त्याच्या रोगाचे निदान सांगून तो रोग जाण्याचा उपाय सांगतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण वरील ओवीत अर्जुनाला सांगत आहेत की तुझ्या सर्व विवंचनेचे कारण म्हणजे तुझ्यावर असलेला `मी अर्जुन आहे’ ह्या विचाराचा पगडा होय. ते म्हणत आहेत की `हे सामोरे आलेले युध्द म्हणजे कर्म आहे आणि त्याला संयुक्‍तिकरीत्या तोंड देणारा कर्ता मी आहे ह्या विचाराचा शिरकाव मनात येऊन देऊ नकोस. त्याकरीता तू आपल्या शरीरात स्वतःचे अस्तित्व पाहू नकोस आणि स्वतःच्या मनातील आपल्याच इच्छांमध्ये गुंतू नकोस. मग जे काही समोर भोग येतील ते खुशाल भोग’.

 

सर्व सुखदुःखांचे मूळ आपल्यातच आहे

 

दररोजच्या व्यवहारात आपण बाह्य गोष्टींना मनातील भावनांचे श्रेय देत असतो. या वस्तुस्थितीचे उदाहरण म्हणून अनेक दाखले देता येतील. आपण व्यवस्थित भोजन झाले म्हणून बरे वाटले असे म्हणतो, किंवा मित्रांबरोबर वेळ घालविला म्हणून आनंद वाटला असे मानतो वा डोके दुखत होते म्हणून कंटाळा आला यावर विश्वास ठेवतो. आता खरी गोष्ट अशी आहे की आपले मन हे शरीरापासून फार वेगळे आहे. मुख्य म्हणजे ते नुसते शरीरापासून वेगळे नाही तर त्यावर अवलंबूनसुध्दा नाही, स्वतंत्र आहे. म्हणूनच कित्येकवेळा शरीराने एखादे कर्म करीत असताना आपले मन कुठेही भरकटू शकते किंवा झोपेत स्वतःचे शरीर एकाच ठिकाणी स्थिर असले तरी स्वप्नात आपले मन पाहीजे तिथे फिरुन येऊ शकते. क्षणोक्षणी आपल्या मनाच्या शरीरापासून असलेल्या स्वतंत्रतेचे धडे मिळूनसुध्दा आपण शारीरीक भोगालाच स्वतःच्या मनाच्या ठराविक अवस्थेचे कारण का समजतो हे या जगातील सर्वात मोठे कोडे आहे! केवळ मनच मनाच्या भोगाला कारणीभूत होऊ शकते. म्हणून खरी बाब ही आहे की आपल्या अपेक्षेमध्ये आपल्या दुःखाचे (आणि म्हणूनच सुखाचे) मूळ असते. बाह्य गोष्ट कशी आहे याला फारसे महत्व नसते तर त्या गोष्टीतून आपल्याला कुठली अपेक्षा होती हे महत्वाचे असते. म्हणूनच एखाद्याला परीक्षेत ९० टक्के गुण मिळवूनसुध्दा दुःख होते तर कुणाला आपण पास झालो यातच आनंद मिळतो. परंतु ही दोन्ही मुले आपल्याला मिळालेल्या गुणांनाच आपल्या दुःखाचे व सुखाचे कारण समजतात. त्यांची अशी समजूत होण्याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या पालकांना असेच वागताना बघितलेले असते! ज्या ज्या वेळी आपल्याला दुःखाची जाणीव होते त्या प्रत्येकवेळी आपल्या कुठल्यातरी अपेक्षेला तडा गेलेला असतो हे जाणून घ्या. अर्जुनाला कुरुक्षेत्रात विषाद झाला त्याचे कारण हेच आहे. पहिल्या दोन अध्यायातील त्याचे वक्तव्य बघा म्हणजे तुम्हाला हे संपूर्णपणे कळेल की आपण कसे वागावे, कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जगावे याबद्दल त्याच्या मनात ठाम कल्पना होत्या. त्यामधील काही विचारांना या युध्दामुळे ठेंच लागणार होती आणि त्यामुळे अर्जुनाचा जीव कासाविस झाला.

वरील विवेचनाने हे स्पष्ट होते की एखाद्या अनिवार्य घटनेने आपल्या अपेक्षेला तडा जात असेल तर दुःख करीत बसण्यापेक्षा आपण आपली अपेक्षा बदलू शकतो. नव्हे, तसे वागणेच आपल्या खऱ्या हिताचे आहे कारण आपल्या हातात असलेली ही एकच गोष्ट आहे. पण ज्याप्रमाणे माकड सापळा म्हणून ठेवलेल्या शहाळ्यातला गुळ काढण्याकरीता घातलेला हात शिकाऱ्याने पकडले तरी काढत नाही त्याचप्रमाणे एखाद्या अपेक्षेने दुःख होत असले तरी आपण अपेक्षेला घट्ट धरुन ती न बदलता घटनेला वा दैवाला दोष देत बसतो. हे असे का घडते? जगातील सर्वच माणसे ही एकच चुक, स्वतःला दुःख होत असताना देखील, सतत का करीत असतात?

याचे मुख्य कारण असे की आपण कोण याबद्दल असलेली आपली गैरसमजुत. स्वतःच्या अपेक्षा बदलणे बरोबर नाही पण दैवाला दोष देणे बरोबर आहे असे आपण का समजतो तर ज्या काही अपेक्षा आपण बाळगलेल्या आहेत त्या सर्वांमागे रास्त कारणे आहेत अशी आपली ठाम समजूत असते. असे बघा, मी पालक आहे मग माझ्या अजाण मुलाने मी सांगतलेले ऐकण्यातच त्याची भलाई आहे ही इतकी ठाम समजूत आहे की जेव्हा तो मुलगा स्वतःचे निर्णय आपणांस सांगू लागतो तेव्हा आपणांस दुःख होते. ते दुःख एखाद्या परक्या माणसाने हाच निर्णय सांगितला असता तर झाले नसते कारण त्याच्या आयुष्यात आपल्याला फारसे स्वारस्य नसते. पण माझ्या मुलाने ही चुक करु नये असे आत्यंतिकरीत्या वाटते आणि म्हणून दुःख होते. आपले अस्तित्व एक पालक म्हणून बघण्याचा हा एक परीणाम आहे. काही म्हणतील की मी माझ्या मुलाला कसेही वागू द्यायला तयार आहे पण समाज मला दोष देईल त्याचे काय? इथे तुम्ही एक नागरीक असे स्वतःचे अस्तित्व ठरविलेले आहे! तुम्ही जरा विचार केला तर असे दिसून येईल की प्रत्येक दुःखद घटनेला सामोरे जाणारी तुमच्यातील व्यक्‍ती वेगळी होती. मुलाच्या वागण्याचे दुःख करणारे रुप वडील होते, पती नव्हते. नोकरीत बढती मिळाली नाही याचे दुःख करणारा वडील नव्हता तर समाजात पुढे जायची इच्छा असणारा इसम होता. आपल्याच अनेक वेगवेगळ्या रुपांत आपण भिन्न स्वप्ने बघितलेली असतात आणि त्यांच्या भंगाचे दुःख वा पूर्तीचे सुख भोगण्यास आपणांस त्या रुपातच जावे लागते. आपण एका रुपात मग्न असताना दुसऱ्या रुपाचे स्वप्न पुरे झाले तरी आपणांस फार आनंद होत नाही. म्हणूनच विरही स्त्रीला प्रियकराशिवाय दुसरे काहीही लाभले तरी आनंद होत नाही आणि आईला आपल्या मुलाच्या कर्तृत्वातच खरा आनंद मिळतो.

आता आपले असे एक रुप आहे की त्यामध्ये गेल्यावर जगातील कुठल्याही गोष्टीने फारसे दुःख (आणि म्हणूनच आत्यंतिक आनंदसुध्दा!) होणार नाही. गाढ झोपेत ते रुप आपण दररोज उपभोगतो. एकदा गाढ झोप लागली की त्या आधी तुम्हांला मनस्वी आनंद झाला होता का जीवघेणे दुःख झाले होते याचा काही संबंध नसतो. ती गाढ झोप एकच असते. त्या रुपात ना आपल्याला देह असतो ना काही आकांक्षा. वरील दोन ओवींमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असा उपदेश करीत आहेत की तू स्वतःला आपल्या अमूर्त रुपात पहायला शिक. एकदा तुला तुझ्या निःसंग रुपाची सवय झाली की मग तू या जगातील सर्व भोगांना स्थितप्रज्ञतेने तोंड देऊ शकशील. तुझे भोग सुटणार नाहीत, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्‍ती तुला प्राप्त होईल. जोपर्यंत समुद्रातील मासा पृष्ठभागाजवळ असतो तोपर्यंत त्याला पाण्यातील लाटांचा त्रास होतो. पण एकदा तो समुद्राच्या तळाशी स्थिर बसला की वर कितीही वादळ झाले तरी त्याला त्रास होत नाही तशी ही गोष्ट आहे! आपण एकदा आपल्या आत्मरुपाच्या तळाशी स्थिर झालो की प्रारब्धाच्या भोगांनी आपले मन विचलित होत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ताक घुसळून लोणी एकदा काढले की नंतर परत ताकात घातले तरी ते ताकापेक्षा वेगळेच राहते. त्याचप्रमाणे एकदा आपले शरीर आणि मन यापेक्षा वेगळे अस्तित्व बघितले की शारीरीक वा मानसिक अडचणींनी आपण अस्वस्थ होत नाही. त्या रुपात गेल्यावर मी कर्मे करणारा कर्ता आहे ही भावना निघून जाते. शरीरावरची आस्था पळून जाते आणि आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षांकडे तटस्थपणे बघण्याचे सामर्थ्य येते. असे एकदा झाले की अवसरोचित येणारे सर्व भोग भोगण्यास आपण समर्थ होऊ. ज्याप्रमाणे पालकाची इच्छा आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभे रहावे अशि असते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. परमेश्वराच्या ह्या इच्छेची पूर्तता करण्याचे प्रयत्‍न करणे हेच आपल्या जीवनाचे खरे ध्येय आहे. त्या ध्येयाकडे केव्हा जायचे हे ठरवायची वेळ आता आली आहे!

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २३ सप्टेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: