59/7: Stop judging your own sadhana

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमी काय अग्नी आहे ? ।

तैसा विकारु हा मी नोहे । जरी विकारला असे ॥ ५९:७ ॥

 

भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानविज्ञान योग सांगतात. ते म्हणतात की ज्याच्या प्राप्तीने सर्व जाणीवा नष्ट होतात, मनातील संकल्प-विकल्पांचा नाश होतो ते ज्ञान होय, बाकी सर्व प्रपंच, हे सर्व दृष्य जग म्हणजे विज्ञान होय व आपल्या शरीर आणि मनाच्या मार्फत जे ज्ञान होत आहे ते सत्य आहे असे मानणे म्हणजे अज्ञान होय. माऊली म्हणते

 

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउली निघे । तर्कु आयणी नेघे । आंगी जयाचां ॥ ५:७ ॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान । तेथ सत्यबुध्दी ते अज्ञान । हेही जाण ॥ ६:७ ॥

 

ह्या प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीने माझी प्राप्ती होणे शक्य नाही हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज अनेक उदाहरणे मांडतात. ते सांगतात की ज्याप्रमाणे आकाशात ढग असतात पण त्या ढगात आकाश नसते, त्या ढगांत पाणि असते पण पाण्यात ढग नसतो, त्या पाण्यामुळे वीज लखलखते पण त्या वीजेत पाणि नसते त्याचप्रमाणे माझ्यामुळे हे जग निर्माण झालेले असले तरी त्यात मी दिसणार नाही. `ज्याप्रमाणे अग्नीमुळेच धूर निर्माण होतो पण त्या धुरात अग्नी सापडत नाही त्याप्रमाणे या जगातील यच्चयावत गोष्टींचा उगम माझ्यामुळेच झाला आहे हे सत्य असले तरी त्यामध्ये मला पहायचा प्रयत्‍नसुध्दा तू करु नकोस.’

 

साधनेची फलश्रुती बघणे थांबवा

 

जेव्हा आपण कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीकरीता आटापिटा करतो तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहो की नाही हे बघण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. ही सवय व्यवहारातील वस्तूंच्या प्राप्तीकरीता उपयुक्‍त आहे आणि म्हणूनच ती आपल्या अंगात भिनलेली आहे. परंतु परमार्थात ही सवय एक अडथळा ठरायची शक्यता असते. याचे कारण असे की योग्य मार्ग कुठला हे ठरविण्याकरीता काय प्राप्त करायचे आहे हे पूर्णपणे जाणणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, श्रीमंतीची प्राप्ती करण्यासाठी पैसे हवेत, प्रेमाची प्राप्ती करण्यासाठी सुह्रुद हवेत, आप्त माणसे जवळ असावी लागतात इत्यादी. त्यामुळे आपण या गोष्टी आधीपेक्षा जास्त आपल्याजवळ आहेत का हे बघून मार्गाची उपयुक्‍तता ठरवू शकतो. परंतु आपल्या अध्यात्मिक साधनेचे अंतिम ध्येय कुठले आहे? तर आत्मरुपी परमेश्वराच्या सतत जवळीकेची. त्या भगवंताचे खरे ज्ञान झाले की वर माउलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराचे बंधन व मनाचे ओझे आपणांस जाणवित नाही. अशा परमेश्वराची प्राप्ती हळूहळू होत नसते. गुरुंनी साधना करीत असताना अचानक अपरोक्ष ज्ञान होते त्याआधी ते होणार आहे याची कल्पनासुध्दा नसते. त्यामुळे ते ज्ञान होण्याआधी आपली साधना बरोबर चालली आहे की नाही याबद्दल आपणांस खात्री होणे कठीण असते. आता आयुष्यभरच्या सवयीने आपण साधना चांगली चालू आहे की नाही हे बघायला लागलो तर आपला हिरेमोड व्हायची शक्यताच जास्त असते. म्हणून आपण आपल्या श्रीगुरुंनी सांगितलेली साधना निरपेक्षतेने करणे जरुरी आहे.

अत्यंत निरपेक्षतेने साधना करण्याचा एक परिणाम म्हणून `आज ध्यान चांगले झाले नाही (वा चांगले झाले)’ किंवा `काय करु, मनासारखी साधना होत नाही’ असे म्हणणेच आपण सोडून दिले पाहीजे. कारण वरील उच्चारांत आपणांस साधनेने काय हवे आहे आणि त्याकरीता कुठले प्रयत्‍न करणे जरुरी आहे हे पूर्णपणे माहीती आहे असे ध्वनित होते. परंतु बँकेतील पैशामध्ये श्रीमंती दिसते त्याप्रमाणे कुठल्या गोष्टींच्या प्राप्तीत भगवंत दिसतो हे तुम्हाला माहीती आहे का? मनाच्या शांतीत भगवंत असला तर काही मादक द्रव्ये घेऊन जेव्हा आपले मन अविचल होते, जड होते तेव्हा आपण भगवंताच्या जवळ गेलो होतो असे मानतो का? एखाद्या रुग्णाला उपचारांकरीता पूर्णपणे बधिर केल्यावर आपण त्याचे परमेश्वराच्या जवळ गेल्याबद्दल अभिनंदन करतो का?!! मग ध्यानात मन शांत झाले तरच साधना चांगली झाली असे आपण कुठल्या आधारावर मानतो? खरे म्हणजे आपली प्रगती पहायची सवयच आपणांस असे विचार करण्यास भाग पाडते, दुसरे काही नाही. त्यामुळे जर आपल्या हातून सतत साधना व्हायची असेल तर आधी आपली ही व्यावहारीक सवय परमार्थाला लावणे आपण सोडले पाहीजे. आपल्या गुरुंवर श्रध्दा असावी असे आपण जरुर मानतो, पण त्या श्रध्देला अंगात कसे भिनवावे हे आपल्याला ठाऊक नसते. आपले प्रगती पहायचे प्रयत्‍न गुरुंवरील श्रध्देला घातक आहेत हे लक्षात घ्या. गुरुंवर खरा विश्वास असता तर केवळ त्यांनी सांगितले आहे म्हणून आपली साधना आपण निरंतर करीत राहीलो असतो. ज्याप्रमाणे देवळात गेल्यावर दानपेटीत काही रुपये टकल्यावर त्याचा काय फायदा झाला हे आपण बघत नाही त्याप्रमाणे गुरुंच्या आदेशाने समृध्द झालेली साधना केवळ ती करणे योग्य आहे याकरीताच आपण केली पाहीजे. गुरुंच्या समोर दानपेटीत टाकलेले हे प्रयत्‍न आहेत ही जाणीव मनात ठेवून आपण साधना करीत रहावी.

एकदा ही गोष्ट मनाला पूर्णपणे पटली की आपल्या साधनेचा संबंध जगातील गोष्टींना लावून तीची उपयुक्‍तता पटविण्याचे आपले प्रयत्‍न आपोआप थांबतील. आज निरुपणाला घेतलेली ओवी आपणांस हाच उपदेश करीत आहे. याचे कारण असे की जगातील कुठल्याही गोष्टीच्या (मग त्यात `मनाची शांती’ यासारख्या अदृष्ट गोष्टीही येतात) प्राप्तीमध्ये जर भगवंत नसेल तर भगवंतप्राप्तीच्या साधनेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही हे सहजपणे सिध्द होते. म्हणूनच खरी साधना करायला आधी साधकाच्या मनात धैर्य असणे जरुरी असते. वानरगीतेतील `धैर्य निर्भयत्व अंगी येई, शत्रूंचे भय लवही नाही, हनुमंतभक्‍ताचे पाही, सामर्थ्य आहे अगाध’ या ओवीतील धैर्य हा शब्द साधकाचा अविचलितपणाच दर्शवित आहे. आपले मन साधनेबाबत चलबिचल का होते तर त्या साधनेत आपली प्रगती बघण्याच्या आपल्या नादामुळे. एकदा हा छंदच आपण सोडून देऊन साधना करायला लागलो की मन विनाप्रयास साधनेबद्दल निश्चळ होईल.

आता तुम्ही म्हणाल की केवळ साधनेकरीता साधना करणे असे मानणे कसे शक्य आहे? आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीला आम्ही एवढे प्राधान्य दिलेले नाही मग साधनेला कसे देऊ? परंतु असे म्हणण्यामध्ये तुमची चुकी होत आहे. असे बघा की दररोज भोजन केलेच पाहीजे हे तुम्ही मान्य केले आहे की नाही? दरक्षणी श्वास घेतलाच पाहीजे याबाबत तुम्ही तक्रार करता का? याचे कारण असे की या दोन गोष्टींना तुम्ही अनन्यसाधारण महत्व दिले आहे. त्या केल्या नाहीत तर आपले आयुष्यच नष्ट होईल याबाबत तुमची एवढी खात्री पटली आहे की या बाबतीत तुम्ही परत परत विचार करीत आपला वेळ वाया घालवित नाही. त्याचप्रमाणे साधनेला तुमच्या आयुष्यात तुम्ही इतके महत्व दिले की मग तुमची साधना का करायला पाहीजे हे बघायची सवय निघून जाईल. तेव्हा ही गोष्ट तुमच्या हातातील आहे, अशक्य नाही. साधना न केल्यामुळे होणारी भगवंताशी ताटातूट डोळ्यासमोर ठेवली की आपोआप आपल्या अंगात साधना करण्याचे धैर्य येईल. आपण न घाबरता हे धैर्य अंगी बाणविणे सुरु केले पाहीजे. गुरुंच्या एका वाक्याच्या अर्थासाठी संपूर्ण आयुष्य वेचायची तयारी ठेवून आपण साधनेच्या आखाड्यात उतरले पाहीजे.

परंतू आयुष्यभर करायला पाहीजे म्हणून दररोजची साधना अचाट ठेवायची जरुरी नाही. बंगलोरहून दिल्लीला चालत जायचे असेल तर पल्ला खूप मोठा आहे यात शंका नाही. पण म्हणून आपण उड्या मारुन तो पल्ला कमी करीत नाही तर जवळच्या दुकानात भाजी आणायला जाताना जशी पाउले टाकतो तसेच चालत आपण दिल्लीला जातो. फक्‍त प्रत्येल पाउल उचलताना अजून खूप वेळ चालत जायचे आहे हा निर्धार आपल्याजवळ बाळगतो. त्याचप्रमाणे आयुष्यभर साधना करताना दररोजची साधना जसा वेळ मिळेल, जशी इच्छा होईल तशीच करा, फक्‍त ती साधना आयुष्यभर करणार आहे ही भावना मनात जागृत ठेवा. मग ज्याप्रमाणे बँकेत उघडलेल्या रिकरींग डिपॉझिटमध्ये नेहमी भरायची रक्कम कितीही छोटी असली तरी शेवटी भरभक्कम पैसे मिळतात, त्याचप्रमाणे दररोजची साधना कितीही छोटी असली तरी त्यातील सातत्याने भगवंत प्राप्त होईल. यात शंका ठेवू नका.

खरोखर, आपली साधना आयुष्यभर चालणार आहे ही खात्री साधकाच्या मनात होणे हा एक त्याच्या साधनेतील महत्वाचा टप्पा आहे. कुठलाही अतिरेक न करीता हळूहळू आपल्या मार्गाने जाण्याचे धैर्य प्राप्त होण्याचे भाग्य हा टप्पा गाठल्यावरच लाभते. वरील ओवीतून जगातील कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या साधनेचे फळ न पाहणे हा आदेश घेण्यामुळे आपण ह्या महत्वाच्या टप्प्याजवळ आलो आहोत. चला आपले प्रयत्‍न अजून जोरात करुया.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २९ सप्टेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: