420/6: The way of controlling mind

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

कां जे यया मनाचे एक निके । जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके ।

म्हणोनि अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥ ४२०:६ ॥

 

सहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवंताला गाठण्याच्या अनंत मार्गांपैकी एक असलेल्या योगसाधनेचे वर्णन केले आहे. योगमार्गातील साधेनेचे यथासांग वर्णन करताना त्या मार्गातील प्रगतीचे अनेक टप्पे श्री ज्ञानेश्वर महाराज विस्तृत वर्णन करुन सांगतात. सर्वांत शेवटी योगसाधकाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की

म्हणोनि असो ते विशेषे । आपणपयासारिखे । जो चराचर देखे । अखंडित ॥४०४:६॥

सुखदुःखादि वर्मे । कां शुभाशुभे कर्मे । दोनी ऐसे मनोधर्मे । नेणेचि जो ॥४०५:६॥

हे समविषम भाव । आणिकही विचित्र जे सर्व । ते मानी जैसे अवयव । आपुले होती ॥४०६:६॥

एकदा ही अवस्था प्राप्त झाली की साधक आणि भगवंत यातील द्वैत निघून जाते. माऊली म्हणते

तयाही देह एकु कीर आथी । लौकिकी सुखदुःखी तयाते म्हणती ।

परी आम्हाते ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥ ४०८:६॥

योगसंपन्न साधकाचे आपल्या मनावरील प्रभुत्व पाहून अर्जुनाला स्वतःला ही अवस्था प्रप्त होईल की नाही याबाबत संदेह निर्माण झाला. त्याने भगवान श्रीकृष्णाला विचारले की माझे मन इतके चंचल आहे की त्याच्यावर वरील वर्णन केल्याप्रमाणे नियंत्रण ठेवणे मला शक्य नाही असे वाटते. तेव्हा भगवान म्हणतात की तुझे म्हणणे खरे आहे. या मनाचा स्वभावच चंचल आहे. आणि त्यात स्वतःच्या मनाला जन्मापासून आपणच सतत महत्व दिल्यामुळे ते खूपच सोकावलेले आहे. परंतु अशा वस्तुस्थितीतही आपण हळूहळू त्याला मार्गी लावू शकतो. ज्याप्रमाणे अत्यंत लाडावलेल्या मुलाला शिस्त लावताना संयमाची जरुरी असते त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाला तारतम्य शिकविले पाहिजे. मनाला योग्य वळण लावण्यास आपण त्याच्या स्वभावाचाच उपयोग करुन घेतला पाहिजे. वरील ओवीत ते म्हणत आहेत की `मनाला ज्यात गोडी वाटेल त्यात ते अखंड रमायला तयार असते म्हणून त्याला भगवंतप्राप्तीच्या साधनेची गोडी लावायची असेल तर आपण साधनेतील अनुभवांची आठवण त्याला सतत दिली पाहिजे.’

साधनेतील अनुभवांचे महत्व

श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की साधनेतील अनुभव हे आगगाडीने जाताना वाटेत लागणाऱ्या स्टेशन सारखे असतात. (म्हणजे ज्या साधकांना कमी अनुभव येतात त्यांनी खेद न करीता आपण जलद गाडीत बसले आहोत असे मानावे!) त्या सुखद अनुभवांमध्येच रमण्यात साधक मार्गभ्रष्ट होण्याची संभावना असते. इतर सर्व संतसाहित्यात सुध्दा ध्यान वा मंत्रजप करताना आलेल्या अतींद्रिय अनुभवांना फार महत्व देऊ नये असे सांगितलेले आढळते. परंतु एका गोष्टीला फार महत्व न देणे म्हणजे तीच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे नव्हे! खरी गोष्ट अशी आहे की प्रामाणिकपणे साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यातील प्रत्येक घटना त्याच्या साधनेला उपयुक्‍तच असते. याचा अर्थ असा की साधनेतील अनुभवांपासूनसुध्दा आपण स्वतःच्या साधनेकरीता धडा शिकला पाहिजे. वरील ओवीमध्ये आपण स्वतःला आलेल्या अनुभवांचा आपल्या साधनेकरीता कसा उपयोग करुन घ्यावा हे सांगितले आहे.

आधी हे अनुभव कुठले ते आपण पाहू. जीवनातील कुठल्या सुखाला साधनेचे फळ मानायला हवे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपल्या कल्पनेबाहेर जे सुख मिळालेले असते ते श्रीगुरुकृपेने मिळाले आहे असे समजावे. माऊली अठराव्या अध्यायात म्हणते `जयजयदेव श्रीगुरो। अकल्पनाप्य कल्पतरो …॥१०:१८॥’. साधनेतील खरी प्रगती आपल्या नकळत आपोआप होते. लहानपणी आपले अवयव कसे व कधी वाढले हे आपणांस कळत नाही, ते मोठे झाल्यावरच शरीर वाढले आहे याची जाणीव होते. त्याचप्रमाणे साधनेतील प्रगती अचानक अनुभव आल्यावरच कळते. उदाहरणार्थ, दररोजचे ध्यान करताना अचानक अशी शांत अवस्था प्राप्त होते की शब्दात त्या अवस्थेचे वर्णन करणे आपणांस शक्य होत नाही. ध्यान छान झाले एवढेच आपण म्हणू शकतो. वा साधना चालू असताना अचानक सुगंध दरवळतो किंवा आपल्या गुरुंचे आपणांस दर्शन होते. साधनेतील हे सर्व अनुभव आपल्या प्रगतीची लक्षणे आहेत. किंवा दररोजच्या जीवनात प्रतिकूल परिस्थितीला शांतपणे तोंड दिल्यानंतर आपणांस हे धैर्य कुठून आले असा विचार मनात उद्‌भवतो. कालपर्यंत स्वतःला अशा विपरीत घटनेला आपण शांतपणे सामोरे गेलो नव्हतो मग आज ही शक्‍ती कशी निर्माण झाली असा प्रश्न पडून आपण आश्चर्यचकीत होतो. हीसुध्दा आपल्या साधनेच्या प्रगतीचीच खूण आहे, वरील ओवीतील `अनुभवसुख’ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की जेव्हा आपले मन साधना करण्यास उत्सुक नसेल तेव्हा आपल्या जीवनातील अशा अनुभवांच्या आठवणी आपण जागृत करुन मनाला साधना करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. ते अनुभव परत येत राहतील अशी अपेक्षा न ठेवता त्यांची आठवण काढत राहणे म्हणजे `अनुभवसुखचि कवतिके दावित जाइजे’ होय. अनुभव सतत आले पाहिजेत हा हव्यास न बाळगता आपण आलेल्या अनुभवांकडे आत्मीयतेने पहायला शिकले पाहिजे. एखाद्या सार्वजनिक बागेतील फुले बघून आपण आनंदित होतो, ती फुले तोडून आपल्या घरी नेण्याचा हव्यास न बाळगता केवळ ती फुले बघण्यातच आपण आनंद मानतो व परत परत त्या बागेत जातो. त्याचप्रमाणे जीवनात आलेल्या ठराविक (वर वर्णन केलेल्या) सुखद क्षणांचे श्रेय गुरुपोर्निर्दीष्ट साधनेला देऊन आपण स्वतःच्या साधनेची गोडी वाढविली पाहिजे. स्वतःच्या जीवनात क्वचितच आलेल्या अशा अनुभवांत, त्यांच्या पुनरावृत्तीची अपेक्षा न ठेवता, आनंद मानून रमायला आपण शिकले पाहिजे!

ह्या ठिकाणी काही साधकांना असे वाटेल की वर्षोनुवर्षे साधना करुनसुध्दा आम्हांला फार अनुभव आले आहेत असे दिसत नाही. याशिवाय कल्पनेबाहेर आलेले सुख इतके क्षणिक असते की ते जाणवायच्या आतच नाहीसे होते. उदाहरणार्थ, ध्यानातील शांत मनःस्थिती कळण्याच्या प्रक्रियेतच तीचा अंत असतो! किंवा जीवनातील अनेक कठीण आपत्तींपैकी काहींनाच आपण धैर्याने तोंड देऊ शकतो इत्यादी. बरोबर आहे. संतांना जी अवस्था दिवसाचे चोवीस तास प्राप्त असते ती आपणांस फार थोड्या वेळा व अत्यंत अल्पवेळच प्राप्त होते यात शंका नाही. परंतु साधकांनी धीर न सोडणे जरुरी आहे. याचे कारण असे की कुठल्याही नवीन घटनेची सुरुवात अल्पप्रमाणातच होत असते. असे बघा की आज आपण विमान प्रवासाला फार महत्व देत नाही. कुठेही न थांबता भारतातून अमेरीकेत जाणारी विमाने आहेत यात आपणांस आश्चर्य वाटत नाही. परंतु राईट बंधूंनी पहिले उड्डाण केले ते फक्‍त ५५ सेकंद टिकले होते. यात खेद न मानता आनंद मानून माणसांनी अथक परिश्रम करुन हळूहळू विमानाची उड्डाणक्षमता वाढविली व आता हवेत स्वतःचे इंधन भरुन घेणारी विमाने तयार झाली आहेत. पहिली मोटारगाडी, पहिला फोन, पहिला विजेचा दिवा ह्या सर्वांचे अस्तित्व स्वल्प प्रमाणातच सुरु झालेले आहे. आज त्या सर्व गोष्टी सामान्य वाटत आहेत! त्याचप्रमाणे आज कधीतरी क्षणिक लाभणारा भगवंताचा सहवास आपण प्रयत्‍न चालू ठेवले तर सतत मिळत राहील अशी खात्री बाळगून आपण आपले प्रयत्‍न सतत चालू ठेवले पाहिजेत असे या ओवीचे सांगणे आहे असे वाटते.

 

मनावर बळजबरी नको

 

इथे अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते. ती म्हणजे भगवंतांनी मनावर बळजबरी करायला सांगितलेले नाही हे आपण ध्यानात ठेवणे जरुरी आहे. किंवा स्वतःच्या बुध्दीने मनाला समजवावे हा सल्लासुध्दा अर्जुनाला मिळालेला नाही. याचा अर्थ असा की साधना करण्यास आपण बुध्दीने स्वतःला समजावयाचा वा ती केली नाही तर शिक्षा करीन अशी भिती दाखवायचा आपण प्रयत्‍न करु नये. अशा प्रयत्‍नांनी तात्पुरते मनाला वळण लागले तरी त्याने कायमचे मन बदलण्याचा संभव नाही हा अर्थ भगवंतांना सांगायचा आहे असे वाटते. एखाद्या कुत्र्याची वाकडी शेपटी सरळ करण्याकरीता कितीही काळ काठीला बांधून ठेवली तरी ती काठी काढल्यावर ती परत वाकडी होतेच. त्याचप्रमाणे आपला धाक वा बुध्दीने समजावणे जरा कमी झाले की आपले मन परत आपल्याला व्यावहारीक जीवनाकडे खेचून आणेल यात शंका नाही. म्हणूनच कुठल्याही संताने साधकाला आपली बुध्दी वाढवा असे सांगितलेले आढळत नाही. भगवंताच्या भक्‍तीत, त्याच्यावर असलेल्या आपल्या प्रेमात वृध्दी करा हाच सल्ला सर्व संतांनी आपणांस दिलेला आहे. आपल्या मनाला भगवंताची गोडी लावूनच भगवंताकडे वळविले पाहिजे. आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्‍तीतील दोष आपण तीचे मन न दुखविता प्रेमाने हळूहळू बदलतो त्याचप्रमाणे स्वतःच्या मनाला आपण शिस्त लावली पाहिजे. साधनेचा अतिरेक न करीता आहे त्या परिस्थितीत देवाबद्दलची गोडी थोडी वाढविणे यासारखा दुसरा उपाय नाही हे जाणून आपले प्रयत्‍न निरंतर चालू ठेवण्याचे धैर्य ज्या साधकाकडे आहे त्याला कशाची भिती आहे?

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १३ ऑक्टोबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: