81/3: What is sin and how to avoid it?

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञ जाण पां ।

म्हणौनि वर्तता तेथ पापा । संचारु नाही ॥ ८१ : ३ ॥

 

हा निजधर्म जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे ।

तैंचि बंधु पडे । सांसारिक ॥ ८२ : ३ ॥

 

ज्ञानेश्वर महाराजांनी तिसऱ्या अध्यायाच्या नवव्या श्लोकाचे विवरण करताना वरील उद्‌गार काढले आहेत. ह्या दोन ओव्यांचा अर्थ असा आहे: `अरे अर्जुना, आपला जो स्वधर्म आहे, तो एखाद्या निरंतर चालणाऱ्या यज्ञासारखा आहे, त्यामुळे तो आचरताना पाप लाभत नाही. हा निजधर्म सांडून दुसऱ्या कर्मांशी संगत केली तरच (जीवांना) या संसाराचे बंधन पडते.’ एखाद्या झाडाच्या मुळाशी पाणी घातले की आपोआपच त्याच्या पाना-फुलांना ते मिळते, त्या सारखेच स्वधर्माप्रमाणे आपण वागलो तर आपोआपच साधनेचा मार्ग सापडतो. स्वधर्माचे असे कौतुक ऐकल्यावर असा अत्यंत महत्वाचा स्वधर्म म्हणजे काय? तो ओळखायचा कसा? हे प्रश्न साहजिकच आपल्या मनात उद्भवतात. त्यांच्यावर आपण विचार करु.

 

पापाची व्याख्या

 

एखादी गोष्ट ओळखण्याचे दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे गोष्ट `हा सूर्य आणि हा जयद्रथ’ अशा रीतीने प्रत्यक्ष ओळखणे आणि दुसरा मार्ग म्हणजे जमिनीतील दडलेले पाणी जमिनीवरील असलेल्या हिरवळीवरुन आपण ओळखतो त्याप्रमाणे अप्रत्यक्षरीत्या ओळखणे. काही गोष्टी आपण फक्‍त दुसऱ्या मार्गानेच ओळखू शकतो. उदाहरणार्थ, दुसऱ्या व्यक्‍तीच्या मनातील भावना आपण त्या व्यक्‍तीच्या वागण्यावरुनच ओळखू शकतो. अप्रत्यक्ष ओळखण्यामधील मोठी उणीव म्हणजे आपल्याला ह्या रीतीने झालेल्या ज्ञानाबद्दल आपण कधीच निश्चित नसतो. वरील उदाहरणामध्ये दुसरी व्यक्‍ती हुशार असेल (आणि ती हुशार असतेच!) तर बाह्य वर्तणुकीत मनातील खरे विचार दिसणार नाहीत याची काळजी ती घेऊ शकते. परंतु तरीही दुसरा पर्याय नसल्याने आपल्याला अप्रत्यक्षरीत्याच लोकांच्या मनाचा अंदाज घ्यावा लागतो. स्वधर्माची ही गोष्ट दाखविण्यासारखी नसल्याने त्याची ओळख करुन घ्यायला आपल्याकडे वरीलपैकी दुसरा मार्गच उपलब्ध आहे. म्हणून आपण स्वधर्माने वागल्यावर कुठल्या गोष्टीची प्राप्ती होईल याचा विचार केला पाहिजे. मग आपल्या ज्या वागण्याने स्वधर्माने मिळणारी गोष्ट मिळत असेल त्या वागण्याला आपला स्वधर्म मानु शकू. वरीलपैकी ८१ व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वधर्माचे वर्णन करताना असे म्हणतात की १) `तोचि नित्ययज्ञ जाण पा’, आणि २) `म्हणौनि वर्तता तेथ पापा संचारु नाही.’ म्हणजे स्वधर्म हा असा यज्ञ आहे की तो करताना पापाचा संचार आपल्या जीवनात होत नाही. याचा अर्थ असा की ज्या वागण्याने आपण पापमुक्‍त जीवन जगतो ते वागणे म्हणजे आपला स्वधर्मच आहे असे आपण मानू शकतो. थोडक्यात म्हणजे स्वधर्माला अप्रत्यक्षरीत्या जाणण्याकरीता स्वधर्माचा `त्यामुळे जीवन पापविरहीत होणे’ हा गुण आपण घेऊ शकतो.

परंतु असे करण्यामध्ये आपण स्वतःला दुसऱ्या गुंत्यात पाडत आहोत. कारण पाप म्हणजे काय हे आपल्याला नक्की माहिती आहे का? प्राण्यांच्या कळपात एखादा वृध्द किंवा आजारी प्राणी असला तर ते त्याला मागे सोडून पुढे निघून जातात. असे करण्यामध्ये त्याचा मृत्यू अटळ आहे हे जाणून सुध्दा ते असे वागतात कारण तसे वागण्यातच त्यांच्या कळपाची सुरक्षितता असते. त्यांच्या असे वागण्यात पाप आहे असे आपण मानू शकत नाही. परंतु आपण आपल्या वृध्द वा अपंग नातेवाईकाकडे लक्ष दिले नाही तर ते पाप आहे असे मानतो. याचा अर्थ पापाची व्याख्या प्रत्येक प्राण्याकरीता भिन्न असते. एवढेच नव्हे तर मनुष्यांमध्येही प्रत्येक मनुष्याची पापाची व्याख्या एकच नसते. असे म्हणतात की पूर्वी रोम राज्यामध्ये प्रत्येक नवजात अर्भकाला पहिल्या रात्री घराबाहेर उघड्यावर ठेवायचे. जर पहिली रात्र अशा खडतर वातावरणात राहूनसुध्दा ते बाळ जिवंत राहिले तरच ते रोम राज्याचे नागरीक व्हायला पात्र आहे असा त्यांचा समज होता. आज ही गोष्ट करणे म्हणजे पापाचे लक्षण आहे असेच आपण मानू याबद्दल शंकाच नाही. म्हणून, पापाची व्याख्या काय आहे हे आपण स्वतः कुठल्या समाजात वाढलो आहोत, कुठल्या काळात आहोत, आपले त्या समाजामध्ये नक्की काय स्थान आहे वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून ठेवलेली आहे. पापाची व्याख्या अशी असल्याने पाप ह्या शब्दाचा अर्थ आपल्याकरीता नक्की काय आहे हे आपल्याला ठाउक नसतेच. म्हणून स्वधर्माची ओळख अप्रत्यक्षरीत्या करुन घेण्यातसुध्दा अडचणी आहेतच. परंतु आपल्याकरीता आश्वासक गोष्ट म्हणजे श्री निसर्गदत्त महाराजांनी केलेली पापाची व्याख्या. पूर्वी मुंबईतील गिरगांव भागात रहाणाऱ्या ह्या सिध्द पुरुषाने पापाची केलेली व्याख्या सर्व मानवांना लागू होईल अशी आहे. ते म्हणतात:

जी कुठली गोष्ट आपल्या परमेश्वरप्राप्तीच्या ध्येयाला अडथळा आणते ती गोष्ट पाप आहे. ज्या ज्या गोष्टीमुळे भगवंताचे विस्मरण आपल्याला होते ती ती गोष्ट पाप आहे.

ही व्याख्या अत्यंत सुंदर आहे कारण ही व्याख्या समाजावर अवलंबून नाही, काळावर अवलंबून नाही तर केवळ आपल्या स्वतःच्या जीवनावर अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर ही व्याख्या सहजरीत्या जीवनामध्ये पडताळून घेण्यासारखी आहे. ही व्याख्या जरी सर्वजणांना लागू पडते तरी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना ही व्याख्या लागू पडेल. म्हणजे भिन्न माणसांकरीता असलेले पापाचे वेगळेपण ह्या व्याख्येत अध्यारुत आहे. आणि केवळ आपणच खरे जाणू शकतो की आपले मन कुठे अडकत आहे. म्हणजे व्याख्येचा उपयोग करायला जरुरी असलेले स्वातंत्र्यसुध्दा आपल्याला दिलेले आहे! एखादी गोष्ट भले समाजमान्य असेल, नव्हे समाजाकडून त्या गोष्टीचे कौतुकसुध्दा होत असेल, तरीसुध्दा जर त्यामुळे आपले मन भगवंतापासून दूर होत आहे तर ती गोष्ट आपल्याकरीता पापच आहे. वरवर अत्यंत सोप्या आणि सरळ दिसणाऱ्या ह्या व्याख्येत खोल अर्थ दडलेला आहे. जर आपण `बायको-मुलांची काळजी घेणे’, `सामाजिकदृष्ट्या कमनशीबी व्यक्‍तींना मदत करणे’ अशा गोष्टींमुळे साधनेला वंचित होत असलो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याकरीता पापच आहेत! कितीजणांची हे कबूल करायची तयारी असेल?

पापाची ही व्याख्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात आहे. नाहीतर त्यांनी ८२ व्या ओवीत असे सांगितले नसते की हा स्वधर्म सोडला तरच कुकर्म होते व संसाराचे बंधन जीवांना पडते. असे पहा: ज्यावेळी मनुष्य परमेश्वरापासून दूर होतो तेव्हाच तो संसारात येतो. याचा अर्थ असा की स्वधर्म केला नाही तर संसाराचे बंधन का पडते? कारण आपण भगवंतापासून दूर होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात पापाच्या वरील व्याख्येशी मिळणारेच विचार आहेत. अशा रीतीने विचार केल्यास स्वधर्म म्हणजे काय हे अप्रत्यक्षरीत्या जाणून घेण्यासाठी ज्या कर्मांनी भगवंताचे विस्मरण आपल्यास होत नाही अशी सर्व कर्मे म्हणजे स्वधर्म आहे असे आपण मानण्यास हरकत नाही. याच्याही पुढे जाऊन असेसुध्दा म्हणता येईल की कुठलीही कर्मे करताना आपण परमेश्वराचे अनुसंधान ठेऊ शकलो तर ती सर्व कर्मे आपण आपला स्वधर्म मानू शकतो! आपला स्वधर्म स्वतःच ठरवायचे असे स्वातंत्र्यच जणू ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेले आहे. अर्थात्‌ प्रत्येक स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीसुध्दा येत असते. वरील दिलेल्या स्वातंत्र्याबरोबर आलेली जबाबदारी म्हणजे आपल्या अंगी बाणवायला लागणारा प्रामाणिकपणा होय. स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून वरीलप्रमाणे आपणच आपल्या स्वधर्माची ओळख करुन घेतली पाहिजे हे या ओवींचे मर्म आहे.

 

स्वधर्म आणि नित्ययज्ञ

 

स्वधर्माबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या `तोचि नित्ययज्ञ जाण पां’ ह्या वर्णनाबद्दल आपण अजून काहीच विचार केला नाही. आता त्याविषयी काही बोलू. यज्ञ शब्दामुळे आपल्या मनात एका वेगळ्याच प्रकारच्या वातावरणाची निर्मिती होते. मंडप घातला आहे, होम चालु आहे, यज्ञाचा यजमान सोवळे नेसून प्रसन्न मनाने ब्राह्मणाने सांगितलेल्या पवित्र मंत्रांचे भावपूर्ण उच्चारण करीत होमात आहुति अर्पण करीत आहे असे चित्र आपल्या डोळ्यासमोर साहजिकच उभे राहते. याशिवाय आपल्याला अशीसुध्दा जाणीव असते की एवढी उठाठेव करुन केलेला यज्ञ सर्वसाधारणपणे एका ठराविक मनोकामनेच्या पूर्णत्वाकरीताच केलेला असतो. हेतुशिवाय, केवळ गंमत म्हणून, कुणीही यज्ञ करत नाही. तेव्हा स्वधर्म हा यज्ञ मानला तर वरील भावनेप्रमाणे दिसणाऱ्या यज्ञाशी स्वधर्माची सांगड कशी घालणार असे वाटू लागते. म्हणून कुठल्या अर्थाने स्वधर्माला यज्ञाची उपमा दिली आहे हे आपण बघूया.

पहिल्यांदा आपण यज्ञाच्या हेतूबद्दल विचार करु. आपल्या हातून जीवनात पाप घडू नये हा हेतू स्वधर्म आचरण्यात असतो. खुद्द ब्रह्मदेवाने स्वधर्माची निर्मिती याच हेतूने केली होती. याच अध्यायातील पुढील काही ओव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जगातील जीवांना परमेश्वरप्राप्ती करीता योग, यागादी साधने करणे कठीण आहे म्हणून तुम्ही फक्‍त स्वधर्माचे आचरण केले तरी भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल असे जगाच्या निर्मित्याने सांगितले आहे. आपण पापाची व्याख्या अशीच केली आहे की जे कर्म भगवंतापासून आपल्याला दूर नेते ते पाप होय. म्हणजे स्वधर्म आचरल्याने भगवंत प्रसन्न होत असला तर स्वधर्माने वागताना पाप घडणार नाही हे स्पष्ट होते. तेव्हा स्वधर्माला यज्ञाची उपमा देताना त्या यज्ञाचा हेतु परमेश्वरप्राप्ती आहे हे सिध्द होते. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे खरे ध्येय आपल्या स्वरुपाची, म्हणजे परमेश्वराची ओळख करुन घेणे हेच असल्याने आपले जीवन वरील हेतूनेच आपण जगले पाहिजे. म्हणून स्वधर्माला यज्ञाची उपमा दिल्यावर स्वधर्म आचरण्यास जरुरी असलेला हेतू अशारीतीने स्पष्ट होतो.

आता यज्ञामध्ये महत्वाच्या असलेल्या दुसऱ्या गोष्टीबद्दल बघू. ही गोष्ट म्हणजे यज्ञातील होम व त्यात घालाव्या लागणाऱ्या समिधा. आयुष्यात समोर आलेली प्रत्येक गोष्ट खुद्द परमेश्वरानेच आपल्याकरीता केवळ साधना वाढवायला घडविली आहे ही भावना या यज्ञाचा होम आहे. अशी भावना दृढ करण्याकरीता लागणारे आपले सर्व प्रयत्‍न ह्या समिधा होय. कित्येक वेळा आपल्याला एखादी गोष्ट घडली पाहिजे असे मनापासून वाटत असते. विद्यार्थ्याला परीक्षेत यश हवे असते, संसारातील माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारा साथीदार हवा असतो वा सामाजिक मान्यता हवी असते इत्यादी अनेक हव्याहव्याशा गोष्टी आपण जवळ बाळगून असतो. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या ज्या वेळी आपण मनापासून इच्छा धरतो त्या प्रत्येक वेळी आपण वरील वर्णन केलेल्या होमात समिधा न घालता त्या बाजूला ठेवत असतो. जे काही होणार आहे ते आपल्या साधनेला योग्यच आहे अशी ज्याची संपूर्ण खात्री असते तो मनुष्य आत्यंतिकरीत्या एखादी गोष्ट हवीच असे कधीच मागणार नाही. त्याला तेवढी प्रबळ अशी इच्छाच होणार नाही. याचा अर्थ असा की आपली प्रत्येक आत्यंतिक इच्छा आपल्याला स्वधर्म आचरायला प्रतिबंध करत आहे असा होतो. हे पूर्णपणे जाणून घेतले की साधकाच्या मनात एखादी इच्छा जरी प्रबळ झाली तरी स्वधर्माकरीता त्या इच्छेचा त्याग तो करायला लागतो. हा त्याग करणे म्हणजेच होमात समिधा घालणे. ज्याप्रमाणे समिधा घातल्यावर होमातील अग्नी अधिक प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे जेवढा आपल्या मनापासून हव्या असणाऱ्या गोष्टींचा त्याग आपण करु तेवढा आपला स्वधर्म काय आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवायला लागते. आपल्या जीवनात समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला परमेश्वरानेच ही माझ्या जीवनात घडवून आणली आहे ह्या भावनेने सामोरे जाणे असे ह्या यज्ञाचे स्वरुप होते. हा यज्ञ सतत चालणारा असल्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज त्याला नित्ययज्ञ म्हणत आहेत.

ही गोष्ट आयुष्यात आचरणात आणणे वाटते तेवढे सोपे नाही! पहिला अडथळा म्हणजे असे वागायची आपल्याला गरजच भासत नाही. थोड्याशा, आपल्याला पूर्ण करता येतील अशा इच्छा समोर ठेवून जगायची आपल्याला एवढी सवय झाली आहे की कधीही, कुठलीही, इच्छा न ठेवता जगायला येते हे जरी आपण मान्य केले तरी त्या जगण्यातच खरा पुरुषार्थ आहे ही कल्पना आपल्याला हास्यास्पद वाटते. परमेश्वरप्राप्तीची साधना एवढी सोपी असली तर आत्तापर्यंत सगळ्यांनीच मोक्ष मिळवला असता असे वाटते. साधनेच्या मार्गावरचा आपला हा अविश्वास फार घातक असतो.

दुसरा आणि अत्यंत महत्वाचा अडथळा म्हणजे मार्ग अगदी सोपा आहे ही आपली कल्पना. आपल्या इच्छा आपण स्वतःच जवळ केल्या असल्याने असे वाटते की त्या आपण कधीही सोडू शकू. म्हणून ह्या मार्गावर जायचेच असे आपण ठरविले तरी वरील विचारामुळे आपल्याला असे वाटते की साधना लगेच संपेल. मग वर्षोनुवर्षे इच्छा सोडल्या तरी त्या कधी संपतच नाहीत असे जेव्हा जाणविते तेव्हा प्रचंड हिरेमोड होऊन आपण हा मार्गच सोडायची शक्यता असते. सुरुवातीच्या अवास्तव कल्पनेमुळे ही निराशा आली आहे हे आपल्याला जाणवत नाही. ह्या करीता हे आपण बघितले पाहिजे की जरी आपण स्वतःहूनच इच्छा जवळ केल्या आहेत तरी त्या इच्छा गोष्टीतील सिंदबादच्या खांद्यावर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या आहेत! त्या जवळ लगेच येतात पण `आता जा’ असे म्हटल्यावर आपली पकड अजूनच घट्ट करतात! आपल्या मनात त्यांना सोडण्याबद्दल संदेह उत्पन्न करतात. उदाहरणार्थ, आपल्यापैकी कितीजणांना `स्वतःच्या मुलाला लहानपणी मला जे मिळाले नाही ते पुरविन’ ही इच्छा काढता येईल? ही व बाकीच्या आपल्या कित्येक इच्छा इतक्या सर्वमान्य असतात की त्या काढण्याचा विचारसुध्दा आपण करु शकत नाही. आपले असे हे करणे म्हणजे असलेल्या समिधांपैकी ह्या चांगल्या आहेत असे म्हणून होमात न घालता त्या बाजूला ठेवण्यासारखे आहे. परंतु अशावेळी आपण हा विचार केला पाहिजे की होमाचा हेतु परमेश्वराचे दर्शन आहे. हे दर्शन संपूर्णपणे वैयक्‍तिक असल्याने त्यामध्ये समाजाचा वा सामाजिक मान्यतेचा काही संबंध नाही. म्हणूनच काही इच्छा जरी सामाजिकरीत्या चांगल्या असल्या तरी ह्या होमाकरीता त्यांच्यात आणि बाकीच्या इच्छांत फारसा फरक नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मुलांकडे काहीच लक्ष देऊ नये. शक्य असेल त्याप्रमाणे जरुर त्यांना सर्व सुखसोयी द्यायचा प्रयत्‍न आपण करावा. फक्‍त त्या सर्व सोयी देता आल्याच पाहीजेत असा आग्रह धरु नये हे आपण शिकले पाहिजे. एखाद्या घरात बरेच वर्षे काम करणारी बाई त्या घरातील सर्व कामे अगदी आपलेपणाने करते परंतु तीला हे माहिती असते की शेवटी रात्र झाली की आपल्या स्वतःच्या घरातच झोपायला जायचे आहे. त्याप्रमाणे आपल्या जीवनात, आपल्या स्वतःच्या घरात आपण वागायला शिकले पाहिजे. अशी बाई एखादप्रसंगी मालकीणीला कसे वागायला हवे याबद्दल अधिकाराने सल्लासुध्दा देईल, पण त्या सल्ल्याप्रमाणे मालकीण वागली नाही तरी फार त्रागा करीत नाही तसेच आपण आजूबाजूच्या लोकांशी वागायचे शिकले पाहिजे. परंतु आपल्या स्वतःच्या घरात असे वागणे आपल्याला अशक्य वाटते. जवळच्या माणसांच्या सुखासाठीच आपण आयुष्यभर झटत असल्याने त्यांच्याबद्दल असा त्रयस्थासारखा भाव आपल्याला बाळगता येत नाही. म्हणून प्रथमदर्शनी सोपी वाटणारी गोष्ट नंतर जमणारच नाही असे वाटण्याइतकी कठीण दिसायला लागते. स्वधर्माची यज्ञ ह्या शब्दाशी सांगड घातल्यावर अध्यारुत असलेला त्याचा कठीणपणा आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागतो.

परंतु परीस्थिती एवढी वाईट नाही! ह्या मार्गावर चालण्याकरीता आपण प्रारंभ जरी केला तरी एका वेगळ्याच शांतीचा अनुभव आपल्याला येतो. मनाला ह्या शांतीची एवढी आवड निर्माण होते की परिणामाची पर्वा न करीता आपण हा यज्ञ करायला लागतो. प्रत्येक साधकाच्या आवाक्यात असणारी ही साधना आहे. ती आयुष्यभर करायचा संयम तेवढा आपण ठेवायला हवा.

 

रोजची साधना व नित्ययज्ञ

 

ह्या नित्ययज्ञामध्ये आपल्या गुरुंनी दररोज करायला सांगितलेल्या साधनेचे काय महत्व आहे? आत्ताच आपण बघितले की स्वधर्म म्हणजे आपल्या जीवनातील घडत असलेल्या सर्व गोष्टींना परमेश्वरप्राप्तीचे साधन म्हणून सामोरे जाणे हा आहे. प्रत्येकाच्या जीवनात अगदी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वधर्म अगदी वेगळा असतो. परंतु आपल्या गुरुंनी सर्व साधकांना एकच साधना करायला सांगितलेली असते (एखाद्या मंत्राच्या ठराविक माळा, ठराविक वेळी ध्यान करणे इत्यादी). आपल्या परंपरेतील सर्व साधकांना गुरुंनी सांगितलेली एकच साधना प्रत्येकाला कशी लागू पडेल हा प्रश्न साधकाच्या मनात उद्‌भवू शकतो. विशेषतः ती साधना एका ठराविकवेळी करायचे बंधन जर असेल तर त्या बंधनाचा कंटाळा येऊन अनेकजणांना असे वाटते की ही साचेबध्द साधना मी नाही केली तरी चालेल. सबंध आयुष्य मी यज्ञ करण्यातच घालवित आहे, माझी साधना मुक्‍त व सतत आहे. त्यामुळे माझ्या स्वधर्मामध्ये ही बंधनयुक्‍त साधना येत नाही. ती मी केली नाही तरी फारसे बिघडणार नाही हा विचार मनात डोकावू लागतो. परंतु हा विचार संपूर्णपणे चुकीचा आहे. तो का चुकीचा आहे ते खालील दोन कारणांवरुन आपल्याला कळून येईल.

पहिले कारण म्हणजे वरील वर्णन केलेला हा नित्ययज्ञ साधकाला स्वतःच्या प्रयत्‍नांनी करायचा असतो. थोड्याच वेळात ह्रुदयातील सद्‌गुरु जी आज्ञा देतील त्या आज्ञेचे पालन करणे असे त्या यज्ञाचे स्वरुप होते. परंतु सर्व आपल्या प्रयत्‍नानेच होत आहे असा विचार मनात येऊन साधकाच्या मनात अहंकार यायचा संभव खूप जास्त असतो. हा अहंकार पुढील प्रगतीला फार मारक असतो. तो येऊ नये म्हणून दुसऱ्याने (म्हणजे गुरुंनी) सांगितलेली साधना जशी सांगितली आहे तशी, स्वतःचे काही डोके न वापरता करणे जरुरी असते. असे करण्याने आपल्या नित्ययज्ञाचे फळ जरी लाभले तरी ते फळ मिळण्यामध्ये सद्‌गुरुंच्या सांगितलेल्या साधनेचा किती भाग आहे हे आपल्याला माहिती नसल्याने आपल्या प्रयत्‍नांबद्दल गर्व होण्याची शक्यता कमी असते.

दुसरी, अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुंनी सांगितलेली साधना केल्याने आपल्या मनात एक वेगळाच कणखरपणा येतो. आपले साधनेचे रुप जरी भिन्न असले तरी साधना सतत करायला लागणारे धैर्य उत्पन्न व्हायला जरुरी असलेली साधना सर्वांकरीता एकच असते. हे स्पष्टपणे जाणून घ्यायला खालील उदाहरणाचा उपयोग होईल.

आपण बघितलेच असेल की मनुष्याच्या हाडांचा सापळा जर आपल्यापुढे ठेवला तर त्या मनुष्याचे रुपच काय, तो सापळा पुरुषाचा आहे की बाईचा आहे हेसुध्दा आपल्याला कळत नाही. प्रत्येक पुरुषाचे रुप इतके भिन्न असते परंतु त्या रुपाला कणखरपणा देणारी हाडे सर्वांची एकसारखीच असतात. त्यांच्या अस्तित्वाशिवाय मनुष्य म्हणजे नुसता मांसपेशींचा गोळा झाला असता. अगदी त्याचप्रमाणे, आपल्या सर्वांची स्वधर्मरुपी साधना जरी भिन्न असली तरी त्या साधनेकरीता लागणारा संयम, सातत्य अंगी बाणण्याकरीता जे धैर्य लागते ते ह्या सर्वांकरीता एक असलेल्या साधनेमुळेच मिळते. ह्या गुरुंकडून प्राप्त झालेल्या साधनेने आपल्या परंपरेतील सर्व सिध्द माणसांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात व त्यामुळे आपल्या मनात आपोआप धैर्य उत्पन्न होते. आजूबाजूची माणसे आपल्या साधनेबद्दल काहीही बोलली तरी त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या मार्गावर चालत रहायला हे धैर्य जवळ असणे अत्यंत जरुरी आहे. म्हणून स्वधर्म पाळत साधना करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी दिवसातले दोन तास तरी गुरुंनी सांगितलेली नित्य साधना मनोपूर्वक करावी व बाकीचा दिवस आपला नित्ययज्ञ करण्यात घालवावा. स्वतःचा कुठलाही विचार मनात न आणता केलेल्या या रोजच्या साधनेमुळेच स्वतःचा मार्ग शोधून काढण्याची धमक आपल्यात येते. दररोजच्या साधनेचे हे अनन्यसाधारण महत्व असे जाणून घेऊन, ती नियमित करुन, आपण आपली प्रगती करवून घेतली पाहीजे. आपले गुरु अशानेच खरे प्रसन्न होतील.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ३ फेब्रुवारी २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: