Haripath5: Who or what is Sadhu?

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

श्रीज्ञानदेव हरिपाठ – अभंग ५.

 

योगयागविधि येणें नोहे सिध्दी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥ १ ॥

 

भावेंविण देव न कळे निःसंदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥

 

तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥ ३ ॥

 

ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥

 

श्री ज्ञानदेवांच्या साहित्यातील भावार्थ दीपिका (म्हणजे ज्ञानेश्वरी) ही श्रीमद्‌भगवद्‌गीतेवरील टीका ज्याप्रमाणे जगप्रसिध्द आहे त्याचप्रमाणे त्यांचे हरिपाठातील अभंगही सर्वश्रुत आहेत. श्रीज्ञानदेवांनी २९ अभंगांची रचना करुन आपला हरिपाठ सजविला आहे, आज त्यामधील पाचव्या अभंगावर आपण विचार करु. या अभंगात श्रीज्ञानेश्वर महाराज असे म्हणत आहेत: `निव्वळ योग साधनेने वा यज्ञादी क्रियेने देव प्राप्त होत तर नाहीच याउलट साधक उगाचच बाह्य कर्मांमध्ये अडकून स्वतःचा अभिमान वाढवितो. जर देवाच्या खऱ्या दर्शनाची इच्छा असेल तर संत सज्जनांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. हे कसे? तर ज्याप्रमाणे मनात पूर्ण सात्विक भाव असल्याखेरीज देव दिसत नाही वा साधनेत आलेल्या अनुभवांचे महत्व गुरुंशिवाय कळत नाही, किंवा ज्याप्रमाणे तप केल्याशिवाय इष्टदेवता प्रसन्न होत नाही वा काहीतरी दिल्याशिवाय गोष्ट मिळत नाही आणि स्वतःच्या मनातली गोष्ट पूर्ण सांगितल्याशिवाय योग्य सल्ला मिळणे शक्य नाही त्याचप्रमाणे साधूंच्या संगतीशिवाय आत्मानंद प्राप्त होणे शक्य नाही.’

 

सत्संगाची आवश्यकता

 

आत्मरुपी देव जन्मापासून सतत आपल्याजवळ आहेच. परंतु `अतिपरिचयात्‌ अवज्ञा’ ह्या नियमाप्रमाणे आपणांस परमेश्वराच्या ह्या रुपाबद्दल आत्मीयता नाही. आपल्यापासून दूर असलेल्या शंख, चक्र, गदा आदि आयुधे धारण करुन भक्‍तांना वरदान देण्यास उत्सुक असलेल्या विष्णूच्या रुपाबद्दल आपल्या मनात एक नैसर्गिक ओढ आहे. तेवढीच आतुरता अमूर्त रुपात सतत आपल्याजवळ राहून आपणांस सद्यजीवन आहे तसे जगायचे सामर्थ्य देणाऱ्या (ते बदलायचा अजिबात प्रयत्‍न न करीता) देवाला बघायची आपल्यापैकी कोणात आहे? परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीतच आत्मरुपी देवाला नमस्कार केला आहे.

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जयजयस्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१:१॥

त्यांच्या दृष्टीकोनातून अमूर्त देवाला भजणे हेच परमार्थाचे अंतिम ध्येय आहे. म्हणजे परमार्थाच्या दृष्टीकोनातून बघितले तर आपले ध्येयच चुकीचे आहे असे दिसून येते. बहुतांशी साधक आपले ऐहीक जीवन सुखात जावून पुढे परलोकात स्वर्गलोकात जाण्याची मनोकामना धरुनच आपल्या गुरुंना भजताना आपण पाहतो. त्यांच्या लक्षात हे येत नाही की ज्ञानेश्वरीत असे सांगितले आहे की:

`मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हाटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५:९ ॥

आपल्या मनाची ऐहीक आणि परलोकातील सुखातच साधनेची फलश्रुती पहायची ही अवस्था निर्माण होण्यास एकमेव कारण म्हणजे केवळ व्यावहारीक जगात सुख बघणाऱ्या लोकांची संगत होय. समजा एखाद्या लहान मुलाला आपण विज्ञानातील शोधांबद्दल माहिती दिली तर त्याच्या मनात एकच प्रश्न उद्‌भवतो की त्यामुळे मला जास्त चांगली चॉकलेट मिळतील का?!! चॉकलेटशिवाय त्याच्या दुनियेत अजून महत्वाची आणि प्रिय गोष्टच नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तुलना तो केवळ चॉकलेटबरोबर करु शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण सर्व साधना करुन शेवटी त्या साधनेमुळे भौतिक आयुष्यात सुख मिळणार आहे का? असा विचार करतो. आता वरील उदाहरणातील लहान मुलगा मोठा झाल्यावर आयुष्यात चॉकलेटपेक्षा अजून चांगल्या गोष्टी आहेत हे जाणून आपला तो प्रश्न विचारणे बंद करतो, नवीन प्रश्न विचारतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःची `सर्व कर्मांचे फलित इह आणि परलोकातील स्वतःचे स्वास्थ्य’ ही भावना बदलण्यास त्याहून अधिक चांगल्या अवस्थेचे ज्ञान प्राप्त करुन घेतले पाहिजे. कुठलेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते ज्ञान ज्या गृहस्थाकडे आहे तिकडे जायला पाहिजे व त्याच्या पायाशी बसून शिकायला पहिजे हे स्पष्टच आहे. म्हणून साधूंच्या संगतीशिवाय आपणांस तरणोपाय नाही हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर साधूंकडे आपण का जावे हेसुध्दा यातून स्पष्ट होते. त्यांच्याकडे जाऊन आपणांस जीवन जगण्याचे नवीन ध्येय शिकायचे आहे. त्यांनी आपल्या जीवनात ज्या गोष्टीला प्राधान्य देऊन स्वतःचे जीवन समृध्द केले आहे त्या गोष्टीची माहिती मिळविण्यास आपण गुरुंकडे गेले पाहिजे. साधूंना त्यांच्या जन्मजात स्वभावाने इतर काही आवडी असू शकतात. उदाहरणार्थ, जे. कृष्णमूर्तींना आपले कपडे व्यवस्थित असावेत याबद्दल आत्मीयता होती. लंडनमधील सर्वात महाग शिंप्याकडे ते आपले शर्ट शिवायचे. स्वामी स्वरुपानंदांना स्वच्छतेची, वेळ सांभाळण्याची आवड होती, आपल्या पूज्य दादासाहेबांना सुगंधाचे वेड होते. साधूंकडे जाऊन आपण त्याच्या ह्या दुय्यम सवयी न उचलता त्यांनी आपले जीवन कुठल्या एका तत्वाकरीता वेचले आहे ते तत्व आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे खरी साधूंची संगत होय. आपल्या दररोजच्या आयुष्यात नवीन विचाराचा सुगंध दरवळण्याची इच्छा ज्यांच्या मनात आहे त्यांनी अशा माणसांची संगत धरणे आवश्यक आहे की ज्यांच्या कडे त्या सुगंधाची कधी न संपणारी कुपी आहे. खरोखर, व्यावहारीक जीवनातून वर उठण्यासाठी खऱ्या साधूच्या सच्च्या संगतीशिवाय तरणोपाय नाही.

 

आपल्या जीवनातील साधू

 

आता तुम्ही कदाचित असे म्हणाल की सत्संग हवा हे आम्हांला मान्य आहे पण ह्या कलियुगात खरा साधू अस्तित्वात आहे का? आणि तो असला तरी आमचे नेहमीचे जीवन जगताना आयुष्य इतके चाकोरीबध्द होते की त्याच्यात साधूशी भेट होणे आमच्या नशिबात दिसत नाही. बरोबर आहे. नेहमीच्या रहाटगाडग्यात आपण इतके गुरफटुन गेलो आहोत की तीच तीच माणसे आपल्याला भेटतात. यात नाविन्याला प्रवेश करायला जागाच दिसत नाही. परंतु असा विचार करुन निराश होऊ नका. जरा अजून सूक्ष्म विचार करा. मगाशी आपण बघितले की नुसत्या साधूशी भेट होऊन आपले काम भागत नाही, त्याच्याकडून काय शिकायचे आहे याची जाणीव आपणांस असणे आणि त्यानुसार नव्या ध्येयाची शिकवणुक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की याशिवाय तुम्हाला साधूचा सहवास लाभला आहे असे तुम्ही म्हणूच शकत नाही. स्वामी स्वरुपानंदांकडून तुम्ही फक्‍त स्वच्छतेचे धडे गिरविले तर तुम्हाला खरे स्वामी भेटलेच नाही असे होते. कृष्ण्मूर्तींकडून फक्‍त छानछोकीच्या कपड्यांची आवड तुम्ही घेतलीत तर काय उपयोग? वा दादासाहेब म्हटल्यावर त्यांच्या साधनेची आठवण न होता त्यांच्या अत्तराची आठवण झाली तर तुम्हाला त्यांच्या मनातील शांति कशी लाभणार? तेव्हा साधूची संगती म्हणजे काय तर आपला जगण्याचा जुना साचा मोडून अधिक भव्य, देवाच्या अधिक जवळ जाण्यास योग्य, असा नवा साचा निर्माण होणे होय. एकदा ही गोष्ट मनात पक्की ठसली की ज्या कुठल्या घटनांनी आपल्या जीवनात आमुलाग्र फरक पडून आपण भगवंताच्या अधिक जवळ जातो त्या सर्व घटना म्हणजे आपल्या जीवनातील संत मानायला काहीच हरकत दिसत नाही. थोडक्यात म्हणजे:

ठराविक माणसांना संत ही उपाधी देऊन त्यांच्या सहवासाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टींनी, ज्या घटनांनी देवाजवळ ढकलले आहे त्यांना संत माना!

आपण आपल्या जीवनाबद्दल गंभीरपणे विचार केव्हा करतो? आपली आधीची लक्ष्ये बरोबर आहेत की नाही याबद्दल संदेह केव्हा उत्पन्न होतो? तर जेव्हा जेव्हा तुम्हांला आत्यंतिक दुःख होते तेव्हा. जोपर्यंत तुमच्या जीवनात दुःख नाही तोपर्यंत आहे ते आयुष्य बदलावे असे कसे तुम्हांला वाटेल? ह्या नजरेने आयुष्यात आलेल्या आपत्तींकडे जर तुम्ही बघितलेत तर तुम्हांला कळेल की आत्तापर्यंत अचानक, अनपेक्षित आलेली सर्व संकटे तुम्हाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन गेलेली आहेत. मग तुम्ही तुमच्यावर अचानक आलेल्या संकटांना का साधू म्हणू नये?! असे बघा, आपल्या आत्मरुपी स्थित असलेल्या देवाकडे बघण्याकरीता आपले खरे रुप (म्हणजे आत्मरुप) आपणांस कळले पाहिजे. संकटाच्या क्षणीच आपल्याला कुठल्या वस्तूंबद्दल आत्मीयता होती हे जाणविते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाला प्रचंड विषाद झाला होता आणि त्या `सत्संगती’मुळेच त्याला परमार्थाचा बोध झाला! नाहीतर त्याच्याजवळ भगवान श्रीकृष्ण सततच होते. पण त्यांच्याकडून परमार्थाचा बोध करुन घ्यावा ही इच्छा त्याच्या चाकोरीबध्द जीवनात उत्पन्न व्हायलाच वाव नव्हता! काय गंमत आहे बघा. लहानपणापासून आपण आपले जीवन संकटे येऊ नयेत असे व्यतीत करायचा आपण प्रयत्‍न करीत आहोत आणि आपल्या अशा खटाटोपानेच आपण परमेश्वरापासून दूर होत आहोत!! आत्तापर्यंत हजार वेळा आपण `जे होते ते चांगल्याकरीताच होते’ हे शब्द ऐकले आहेत पण तरीसुध्दा स्वतःला दुख देणाऱ्या घटना घडल्या की या शब्दांवरचा आपला विश्वास डळमळीत व्हायला लागतो. खरे म्हणजे दुःखाच्या प्रत्येक क्षणात आपले जीवन आमुलाग्र बदलून अजून दिव्य, भव्य करण्याची शक्‍ती असते. त्याकडे दुर्लक्ष करून दुःखांना चुकवायचा आपला प्रयत्‍नच आपणांत बदल घडवून आणत नाही. जो गृहस्थ सतत भगवंताचा विचार करुन जीवनात आलेल्या प्रत्येक घटनेला उत्सुकतेने सामोरा जातो त्याने साधूंचा सहवास सतत प्राप्त करुन घेतला आहे असे समजा. दुःख देणाऱ्या घटना का घडल्या असे म्हणून परमेश्वराला गाऱ्हाणे घालण्याऐवजी आलेल्या दुःखाकडे, त्यात तुम्हाला नवीन जीवन प्रदान करण्याची शक्‍ती आहे असा विश्वास ठेवून, नीट बघा. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे `देवावर विश्वास ठेवून देह प्रारब्धावर सोडून दिलेला मला खूप आवडतो.’

तेव्हा सध्याच्या काळात खरे संत कुठे आढळतात असे म्हणून खंत करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनातील दुःखाच्या प्रत्येक क्षणाला आतुरतेने सामोरे जा. त्यातून जो बोध होईल त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करा. असे केलेत तर तुम्हांला देवाचा दृष्टांत झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवान श्री ज्ञानदेवांचे सांगणे आहे, माझे नाही!

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ३ नोव्हेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: