(117+118)/10: The final form of devotion

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय़ नमः ॥

 

ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखे त्रिभुवनी ।

जगद्रूपा मनी । सांठऊनि मातें ॥ ११७:१० ॥

 

जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।

हा भक्‍तियोग निश्चित । जाण माझा ॥ ११८:१० ॥

 

दहाव्या अध्यायात भक्‍तीयोगाने भगवंताच्या जवळ पोहोचलेल्या साधकाच्या स्थितीचे वर्णन करताना माऊलींनी वरील उद्‌गार काढले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: जगातील यच्चयावत घटनांमधून केवळ भगवंताचेच रुप प्रगट होत आहे या ज्ञानाच्या अखंड प्रकाशात सतत न्हाऊन जे साधक नित्य आनंदी असतात त्यांनाच खरा भक्‍तियोग कळला आहे असे ठामपणे समज.

 

भगवंताला कुठली भक्‍ति आवडते?

 

भगवंताची भक्‍ति कशी करावी याबद्दल अनेक गैरसमजुती सर्वसाधारणतः आढळतात. कुणाला ठराविक वेळी पूजापाठ करण्यात भक्‍तिचे रुप दिसते तर कुणाला रात्री झोपताना दिवसातील गोष्टी देवाला सांगण्यात धन्यता वाटते. याशिवाय ठरलेल्या तिथींना उपवास करणारे अनेक आहेत. प्रत्येकाला भक्‍ति म्हणजे काय हे कळले आहे असे वाटत असल्याने भक्‍तियोग सोपा आहे असे वाटते. त्यातच सर्व संतांनी देवाचे नाम घेणे हा अगदी सोपा(?) उपाय सांगितलेला असल्याने स्वतःला जमेल तेव्हा देवाचे नाव घेणारेही आहेतच. या सर्व समजुतींकडे तटस्थपणे पाहिल्यास असे आढळून येते की यातील प्रत्येकाची समजुत स्वतःला अभिप्रेत असलेल्या देवाला अनुसरुन आहे. उदाहरणार्थ, जे सद्यपरिस्थितीत सुखी आहेत ते भगवंताकडे `आहे तसेच चालू ठेवण्याची शक्‍ती असणारा’ असे बघतात व ज्याप्रमाणे आपण सरकाराच्या चांगल्या कामासाठी आयकर किंवा `इनकम टॅक्स’ भरतो त्याप्रमाणे ठराविक तिथींना उपवास करुन देवाचे देणे भागवितात. याउलट ज्यांना काही गोष्टींची अपेक्षा आहे ते देवाच्या दातृत्वाकडे आकर्षित होऊन त्याला प्रसन्न करण्याकरीता वा त्याने दिलेल्या सौभाग्याबद्दल आपल्या मनातील सद्भावना प्रदर्शित करण्यासाठी पूजापाठ करीत असतात. कुणाला सध्या कुठलीही अपेक्षा नसली तरी पुढे कधीही देवाची मदत लागू शकेल याची जाणीव असल्याने संभाव्य अपघाताबद्दल जसा आपण विमा उतरवितो त्याचप्रमाणे जमेल तसे देवाचे नाव घेतात. प्रत्येकाला भावलेली ही रुपे एकाच देवाची असल्याने आपण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अजिबात शंका घेऊ शकत नाही. जोपर्यंत त्यांच्या देवाचे रुप बदलत नाही तोपर्यंत त्यांच्या भक्‍तिचे रुप बदलूच शकत नाही. अगदी हीच गोष्ट आपल्या जीवनातही आढळून येते. कुणी आपणावर `डोक्यावर छत्र देणारा’ म्हणून प्रेम करतो तर कुणी त्याच्या महत्वकांक्षेला साकार करण्यास मदत करणारा म्हणून. आपल्याला जीवनात भेटलेल्या या सर्व व्यक्‍ती आवडल्या तरी खरे प्रेम कुणाबद्दल वाटेल? जी व्यक्‍ती आपल्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, आपण आहे तसे स्वीकारुन, आपल्यावर ममत्व ठेवेल तीच्याबद्दलच. त्याचप्रमाणे परमेश्वराला वरील सर्व प्रकारचे भक्‍त प्रिय असले तरी स्वतःजवळ बसण्याचा मान तो कुणाला देतो? तर ज्याची भक्‍ति वरील ओवींमध्ये वर्णन केल्यासारखी आहे त्यालाच. भक्‍तियोगाने देवाला आपलेसे करण्यापूर्वी आपण सर्वांनी देवाचे कुठले रुप हवेसे वाटत आहे यावर विचार करणे आवश्यक आहे. ज्या साधकांना संतांनी वर्णन केलेला आनंद उपभोगायची अभिलाषा आहे त्यांनी आधी देवावर प्रेम करणे योग्य आहे म्हणून प्रेम करायला शिकले पाहिजे. त्याकरीता देवाचे असे रुप आपण बघायला पाहिजे की ते बघूनच आपल्याला भगवंताबद्दल प्रेम भरुन येईल.

वरील ओवींमध्ये माऊलींनी आपणास भगवंताचे असेच रुप दाखविले आहे. ते म्हणत आहेत `जगद्रूपा मनीं सांठऊनि’. या जगातील सर्व घटनांमध्ये देवाचा हात पहायला शिकणे हा खऱ्या भक्‍तियोगाचा पाया आहे हे लक्षात घ्या. कुठल्याही घटनेला चांगली किंवा वाईट असा शिक्का न मारता ती बघायला आपण शिकले पाहिजे. याचे कारण असे कि जर देवानेच ती घटना घडविली असेल तर त्यात चुक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपणांस ती चुकीची वाटली तर दोष आपल्यात आहे, घडलेल्या घटनेत नाही! ही जाणीव जागृत होऊन आपले नित्य जीवन जो जगतो त्याला भगवंत आपला मानतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत.

 

संसारातील घडामोडींतून आपले मन काढायला शिका

 

भगवंताचे विश्वरुप बघायला शिका असे म्हणणे सोपे आहे पण ते कसे शिकायला हवे हा प्रश्न उरतोच. खरे म्हणजे हे प्रत्येकाला स्वतःच शिकायचे आहे परंतु आज आपण एक मार्ग पाहूया. तुम्हांला तो आपलासा वाटला तर तुम्ही जरुर तो आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करा. हा मार्ग म्हणजे `व्यवहारातील गोष्टी करीत असताना आपले मन त्या गोष्टींमधुन हळूहळू काढून घेणे’ हा होय. आपल्या नवऱ्याला चहा करुन देताना तो मनापासून केलाच पाहिजे असे थोडेच असते?!! कित्येकवेळा त्याच्या उशीरा घरी येण्याचा राग आलेला असताना सुध्दा आपण चहा करुन देतोच ना? तेव्हा आपले मन खरे म्हणजे त्याच्यावरील रोषाने भरलेले असते तरी आपल्या क्रियेत त्याची चाहूलसुध्दा लागत नाही कारण तो वेळेवर आला तरी आपण तसाच चहा करत असतो (स्वतःच्या चेहऱ्यावरील भावाने आपले मन आपण दुसऱ्यास मुद्दाम जाणवून देतो ही बाब वेगळीच आहे!!). मग मनात देवाचा विचार जागृत ठेवून आपले नेहमीचे जीवन जगणे कठीण आहे असे आपणांस का वाटते?

असे बघा, कुठलीही गोष्ट करण्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे शारीरीक कष्ट आणि दुसरा म्हणजे आपली मानसिक गुंतणूक. आपल्यापैकी कुणीही काबाडकष्ट करुन जगणारे नाहीत. त्यामुळे आपल्या जीवनातील बहुतांशी गोष्टींमध्ये शारीरीक कष्ट फारसे नसतात. परंतु तरीही दिवसाच्या शेवटी आपले शरीर थकलेले असतेच. याचे कारण असे की गोष्टींमध्ये आपले मन अडकलेले असते. मानसिक तणावामुळे आपली शारीरीक थकावट होत असते. म्हणूनच आपल्यात दररोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडण्याची शक्‍ती नसते. मग आपण भगवंताची उपासना आपले व्यावहारिक जीवन सांभाळून कसे करु शकू? याकरीता आधी आपल्या मनाला दररोजच्या कर्मांतून सुटका दिली पाहिजे. दररोजच्या क्षुल्लक गोष्टींमधून आधी आपले मन काढून घ्या. उदाहरणार्थ, घरात किंवा ऑफिसमध्ये लिफ्टमध्ये शिरल्यावर तेथील आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यापेक्षा स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या! किंवा चार मजले उतरुन जाताना देवाच्या नावाचा जप करा वा संतांच्या जीवनाबद्दल विचार करा. देवाचा विचार करणे म्हणजे केवळ त्याचे नाम घेणे नव्हे तर त्याच्या जवळपासच्या गोष्टींबद्दल विचार करणे होय. आपला श्वास, संतांचे वास्तव्य देवाच्या निकट असल्याने त्यांच्याकडे लक्ष देऊनसुध्दा आपण देवाचा विचार करु शकतो. कुणा भाग्यवंताला ध्यानात काही सुविचार सुचला असेल तर त्यावर मनन करणे म्हणजेसुध्दा देवाच्या जवळ जाणे होय. तात्पर्य हे की काही ना काही उपायाने नेहमीचे जीवन जगताना आपले मन देवाच्या जवळ ठेवण्यास शिका. एकदा आपल्या मनाला अशी सवय लागली की आपले जीवन मूलभूतरीत्या बदलून जाते.

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येते की मनात देवाचा विचार ठेवून बाह्य कर्मे केली तरी त्या कर्मांत कमीपणा येत नाही. मनापासून काम केले तरच चांगले होते या आपल्या विश्वासाला तडा जातो. काही काळाने अशी जाणीव व्हायला लागते की खरे म्हणजे कर्मे आपोआप घडत आहेत, ती करणारे आपण केवळ निमित्तमात्र आहोत. आत्तापर्यंतच्या जीवनात उगाचच (सवयीमुळे) आपण स्वतःकडे कर्तेपणा घेत आलो होतो. उदाहरणार्थ, आज जे काही माझ्या तोंडातून बाहेर येत आहे ते तसेच येणार होते याची जाणीव मला अजिबात नव्हती. परंतु एकदा मी बोलून गेल्यावर `मी अमुक अमुक बोललो’ असेच मी म्हणतो. हे शब्द बाहेर काढणारा जो होता त्याच्याशी संलग्न होऊन हा कर्तेपणा मी घेतो. असा कर्तेपणा घेणे थांबवायला हरकत नाही असे जेव्हा जाणविते तेव्हा साधकाने अर्धी बाजी मारल्यासारखी असते. स्वसंवेदनांनी हे एकदा जाणविले की आपले मन संसारातील घडामोडींतून मुक्‍त व्हायला लागते. याशिवाय जर मी ही कर्मे करीत नाही तर ती कशी घडतात हा प्रश्न उद्भवून प्रत्येक कर्मामागील भगवंताचे अधिष्ठान आपणास जाणवायला लागते. देवाचे विश्वरुप म्हणजे काय याची थोडीशी जाणीव आपल्याला होऊन मग आपल्यामध्ये निरंतर परमेश्वराचा विचार करायची ताकद येते.

या मार्गामध्ये असे सुध्दा लक्षात येते की जगातील फार कमी लोकांना आपण किती मनापासून काम करीत आहोत याची पर्वा असते. जोपर्यंत आपल्या हातून काम होत आहेत तोपर्यंत ते सुखी असतात. आपणच उगाच `मी मनापासून काम केले नाही तर अप्रामाणिक होईन’ अशी भिती बाळगून असतो. रोजच्या गोष्टीत जीव ओतून काम करणे म्हणजे एखादी पाच रुपयाची वस्तू पाचशे रुपयात विकत घेण्यासारखे आहे. पाच रुपयाच्या कर्मांकरीता आपली चारशे पंच्याण्णव रुपयाची मानसिक गुंतवणूक आपण व्यर्थ घालवित असतो. आणि हे सर्व कुणाकरीता? तर ज्या व्यक्‍तीला आपल्या ह्या अमूल्य गुंतवणूकीची जाणीवसुध्दा नाही अशांकरीता! हीच गुंतवणूक आपण भगवंताकडे केली तर त्याला ह्याची जाणीव असेल असेच नव्हे तर तो ती भावना हजारपटीने आपणास परत करील! मनात सतत आनंद जागॄत राहणे हे आपल्या भक्‍तिचा भगवंताने केलेल्या स्वीकाराचेच निदर्शन आहे हे ध्यानात ठेवा. म्हणूनच असे भक्‍त `खेळत सुखे त्रिभुवनी’ असे आयुष्य जगतात. जोपर्यंत आपल्या मनात कुठल्याही कारणविरहीत आनंदाचा उदय होत नाही तोपर्यंत आपली भक्‍ति विश्वरुपी भगवंताच्या चरणी रुजू झाली नाही असे समजा. भगवंताच्या एखाद्या ठराविक रुपाकडे आपली भक्‍ति जरूर पोहोचली असेल परंतु अमूर्त, अव्यय भगवंताच्या जवळ अजून आपण गेलेलो नाही. भगवंताच्या विश्वरुपाजवळ जाण्याकरीता प्रयत्‍न करण्याची शक्‍ती व विवेक आपल्यात येऊदे अशी प्रार्थना दररोज करुन समोर आलेली कर्मे मनाने न गुंतता पार पाडण्याचा आपला क्रम चालू ठेवा. यातच यशाची गुरुकिल्ली आहे.

श्रोत्यांचा एक प्रश्न : आत्तापर्यंत आम्हांला असेच शिकविण्यात आले आहे की कुठलेही कर्म करताना मनापासून करा. टाकणे टाकल्यासारखे करु नका. परंतु तुम्ही म्हणता की आपले मन काढून घेऊन काम करा. यात विसंगती नाही का?

उत्तर : आज जेव्हा मन काढून घ्या असे सांगितले होते तेव्हा असेही सांगितले होते की ते कर्मांतून काढलेले मन भगवंताच्या जवळ ठेवा. तुम्हांला आत्तापर्यंतचा मिळालेला सल्लासुध्दा बरोबर होता कारण तेव्हा तुम्ही आपले मन व्यवहारातीलच दुसऱ्या एका गोष्टीवर ठेवून हातातील काम करीत होता. त्यामुळे तुमची काम करण्याची शक्‍ती कमी होत होती. परंतु भगवंताच्या जवळ मन ठेवण्याने आपली शक्‍ती कमी न होता द्विगुणित होते. स्वतः भगवंतच जणू आपली कर्मे करायला धावून येत असतो. त्यामुळे आधीचा सल्लासुध्दा एका दृष्टीने बरोबर होता आणि आज ऐकलेलेपण चुकीचे नाही! भगवंताकडे जाणे हे बाकीच्या गोष्टींकडे जाण्यापासून इतके भिन्न आहे की नेहमीचे नियम त्याला लागू होत नाहीत.

खरी गोष्ट अशी आहे की कुणी स्वतःची जीभ तुटेपर्यंत तुमच्या शंकांचे निरसन केले तरी तुमच्या मनात नवीन संशय निर्माण होतातच. सर्व शंका निवारण करायच्या असतील तर एकच पर्याय आहे. आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः प्रयत्‍न करुन बघणे. त्यातून तुम्हाला जे कळेल त्यावरच तुमचा पूर्ण आणि निःसंदेह विश्वास बसेल. एकदा प्रयत्‍न तरी करुन पहा. माझे एवढेच सांगणे आहे.

 

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १४ डिसेंबर २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: