Mogara Fulala: Sweet fragrance of sadhana

 

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

इवलेंसें रोप लाविलें द्वारी । त्याचा वेल गेला गगनावरीं ॥ १ ॥

 

 

मोगरा फुलला मोगरा फुलला ।

फुलें वेचिता अति भारू कळियासी आला ॥ २ ॥

 

 

मनाचिये गुंतीं गुंफियेला शेला ।

बापरखुमादेवीवरा विठ्ठलीं अर्पिला ॥ ३ ॥

 

 

श्री ज्ञानदेवांच्या वरील अभंगात साधनेचे रुप आपल्या जीवनात कसे बदलत जाते याचे अत्यंत सुरेख वर्णन करण्यात आलेले आहे. माऊली म्हणत आहे: `मोगऱ्याचे छोटेसे दाराबाहेर लावलेले रोप (म्हणजेच साधनेची सुरुवात) बघता बघता वाढत गगनावरी पोहोचले आहे (सर्व जीवन साधनामय झाले आहे). त्या वेलाला अगणित फुले आली आहेत, ती फुले वेचताना (म्हणजेच साधनेत आलेल्या अनुभवांद्वारे भगवंताचे दर्शन घेत असताना) असंख्य कळ्या बहराला आल्या आहेत (म्हणजे परमेश्वराचे रुप अजून पूर्ण कळले आहे असे त्यांना अजून वाटत नाही). (आणि साधना म्हणजे काय? तर) श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील गुंता सोडवून त्याचा शेला विणून विठ्ठलचरणीं अर्पण केला.

 

 

साधना कशी वाढते?

 

 

आपण काही जन्मल्यापासून ईश्वराचा शोध घ्यायला सुरुवात करत नाही. आपले सुरुवातीचे आयुष्य इतर लोकांप्रमाणेच व्यावहारिक जगात पुढे कसे जावे याचे चिंतन करण्यात व्यतीत होत असते. काही भाग्यवंतांवर लहानपणापासूनच संसारात यश मिळविण्याबरोबर अध्यात्मातही प्रगती करणे जरुरी आहे असे संस्कार घडत असतात परंतु सर्वसामान्यपणे आपण जीवनाची इतिकर्तव्यता स्वतःला एका ठराविक नैतिक चौकटीत बसवून जगात नाव आणि पैसा कमावण्यात मानत असतो, त्याच्या मागे आपण लागलेलो असतो. अशावेळी अचानक काही पूर्वसुकृतांमुळे आपल्या जीवनात परमार्थाची पहाट उगविते. आपल्या जीवनात अनपेक्षितपणे आलेला कठीण प्रसंग वा अचानक दैवी शक्‍तीची जाणीव घडवून देणारे प्रसंग आपणांस अंतर्मुख बनवितात व आयुष्याचा अर्थ केवळ चार जणांमध्ये लौकीक कमावण्यापेक्षा अजून गहन आहे असे वाटायला लागते. जीवनातील ह्या नाजूक क्षणी जर दैवयोगाने योग्य संगत लाभली तर आपल्या हातात एखाद्या संताचे साहित्य येते व आपली साधनेला सुरुवात होते. सुरुवातीला आपण आपला सर्व व्यवहार सांभाळून उरलेल्या वेळात, जमेल तशी भगवंताची आराधना करीत असतो. आपल्याला पूर्ण जाणीव असते की संसारात यश मिळविणे जरुरी आहे पण तरीसुध्दा कुठल्यातरी अनाकलनीय आकर्षणामुळे आपला काही वेळ आपण संतसाहित्याच्या अभ्यासात घालवित असतो. आपल्या जीवनातल्या दूरवरच्या कोपऱ्यात आपण साधनेचे रोप लावलेले असते. ही आपली `इवलेसे रोप लाविले द्वारी’ अवस्था होय.

यानंतर वाचनात आलेले एखादे संतवाक्य आपल्या ह्रुदयात घुसते. ते इतके मनापासून पटते की त्या वाक्याचा नाद आपल्या व्यावहारिक जीवनात घुमायला लागतो. व्यवहारातील एखाद्या प्रसंगावर तोड शोधताना अचानक ते वाक्य आठविते व आपले वर्तन शक्य तेवढे त्या वाक्याशी सुसंगत ठेवण्याचा आपण प्रयत्‍न करायला लागतो. पूर्वी लावलेले ते `इवलेसे रोप’ आता वाढायला लागले आहे याची ही खूण आहे. एक-दोन वेळा परमार्थाचा आपल्या व्यवहारात उपयोग केल्यावर आपल्या लक्षात येते की आपले सामाजिक वर्तन जेवढे परमार्थाशी सुसंगत असते तेवढे आपणांस जास्त समाधान मिळते. केवळ आपणांसच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व व्यक्‍तींचे जीवनही आपल्या अशा वर्तनाने प्रसन्न झाले आहे हे आपणांस जाणविते. ह्या स्वानुभूतीमध्ये तुम्ही दाराबाहेर लावलेल्या साधनारुपी वेलाच्या पहिल्या फुलाचा सुगंध तुम्हाला आलेला आहे असे समजण्यात काहीच हरकत नाही! स्वानुभूतीद्वारे फुले वेचताना आपल्याला अशी संपूर्ण जाणीव असते की ही तर एक सुरुवात आहे. साधनेचा खरा अर्थ अजून आपल्याला कळायचा आहे. अजून दिव्य अनुभव आपल्या पुढे आहेत याची एकप्रकारची जाणीव आपणांस होत असते. ते गूढ अनुभव घेण्यास आपले मन आसुसलेले असते आणि त्यातच आपल्या साधनेची वृध्दी होत असते. ही अवस्था म्हणजे `फुले वेचिता अति भारु कळियासी आला’ होय.

एकदा हा सुगंध दरवळला की आपणांस परमार्थाचा संसारात उपयोग करण्याची ओढ लागते. आधी वाचलेल्या पुस्तकांमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे न आढळण्यामुळे आपण दुसऱ्या संतांची पुस्तके वाचण्यास सुरुवात करतो. मग सत्संगतीची ओढ आपल्याला सज्जनांच्या संगतीत खेचू लागते. त्यांच्याबरोबर काही काळ घालविला की आपली अशी खात्री व्हायला लागते की सध्या आपण संसाराला महत्व देऊन उरलेला वेळ भगवंताच्या चिंतनात जो घालवित आहोत त्यापेक्षा भगवंताच्या चिंतनात बहुतांशी वेळ व्यतीत करुन जेवढा जरुरी आहे तेवढाच संसार केलेला उत्तम आहे. आपल्या जीवनात कुठली गोष्ट महत्वाची आहे याचे आपले निष्कर्ष बदलायला लागतात. साधनेचा, भगवंतप्राप्तीच्या प्रयत्‍नांचा वेल आता मोठा होऊन आपल्या सर्व जीवनावर छाया धरायला लागला आहे याचीच ही खूण असते. अशावेळी परमदयाळू सद्‌गुरु भेटतात आणि आपल्या साधनेला परंपरेचे सामर्थ्य लाभते. साधना अजून जोमाने वाढायला लागते आणि तुम्हांला आपल्या जन्माचे एकमेव कारण म्हणजे ईश्वरप्राप्ती करुन घेणे होय याची निःसंदेह खात्री पटते. तुम्ही नकळत आपल्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात लावलेले इवलेसे रोप आता गगनावर पोहोचले आहे यात काहीच शंका नाही!

 

 

वृध्दींगत होणारी तटस्थता ही साधना होय

 

 

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कुठली साधना केली हे त्यांनी शेवटच्या चरणात स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की मनात येणाऱ्या वासनांचा गुंता नीट उलगडून त्या धाग्यांनी मी एक सुंदर शेला विणला आणि माझ्या त्या कृतीमध्येसुध्दा न गुंतता मी तो विठ्ठलचरणीं अर्पण केला.

आपल्या सर्व इच्छा पूर्वजीवनातील अनुभवांवर अवलंबून असतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणायचे की `स्वतंत्र इच्छा (free will)’ ही कल्पनाच अस्तित्वात असू शकत नाही. सर्व इच्छा आपल्या भूतकाळावर अवलंबून असल्याने त्या स्वतंत्र कशा असतील? खरी स्वतंत्र गोष्ट कशावरही अवलंबून नसते. ती कल्पनेच्या बाहेर असते. म्हणूनच सद्‌गुरुंच्या कृपेचे वर्णन करताना माऊली `अकल्पनाप्य कल्पतरो’ असे उद्‌गार काढतात. म्हणून असे म्हणण्यास हरकत नाही की कुठल्याही प्रसंगावर पारमार्थिक उत्तर शोधण्यात आपण स्वतःच्या संकुचित अस्तित्वापासून दूर होत असतो. याचा अर्थ असा की ज्याक्षणी आपण श्रवणात आलेल्या परमार्थावर चिंतन व मनन करुन जीवनात वागण्यास योग्य असा निष्कर्ष काढीत असतो, त्याचक्षणी आपण स्वतःच्या आकांक्षांना कमी महत्व देत असतो. आपल्याच जीवनाकडे त्रयस्थासारखे पाहणे म्हणजे हेच होय. जेव्हा आपण असे वर्तन करतो तेव्हा (आणि तेव्हाच) आपल्याला स्वतःच्या मनातील विचारांच्या गुंतागुंतीचे ज्ञान होऊ लागते. तटस्थपणाने जे उत्तर आपणांस सापडलेले असते ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याची क्षमता आपल्यात नाही हे जाणवायला लागते आणि आपले डोळे उघडायला लागतात. आपली ही कमकुवतता मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्यात असतेच असे नाही. इथे आपण आपली साधना मध्येच सोडून देऊन आपल्या पूर्वजीवनात परत घुसण्याचा प्रचंड धोका असतो. अशावेळी सद्‌गुरुकृपेने जर आपणांस स्वतःबद्दल न्यूनगंड न वाटता आहे त्या मार्गावर चालत राहण्याचे धैर्य लाभले तर आपल्या मनातील वासनांकडे आपण तटस्थपणे पाहू शकतो.

ज्याप्रमाणे वरकरणी कुठलेही नियम न पाळणाऱ्या बंगलोरच्या वाहनचालकांच्या वागण्यातही काही ठराविक सवयी आपणांस कालांतराने दिसू लागतात त्याचप्रमाणे आपल्या मनातील प्रथमदर्शनी अगम्य वाटणाऱ्या वासना का उत्पन्न होत आहेत याचे उत्तर आपणांस दिसू लागते. आपली अशी खात्री पटते की आपल्या वासनांचे मूळ आपल्या मूळ ध्येयामध्ये आहे. लहानपणापासून पुरुषार्थ म्हणजे काय याची एक कल्पना आपल्या मनात विकसित होत असते. जीवनात सध्याच्या क्षणी त्या कल्पनेने कुठले रुप धारण केले आहे त्यावर आपल्या वासना अवलंबून आहेत हे साधकाला पूर्णपणे कळते. वासनांच्या जाळ्यात न अडकता त्या कुठल्या पायावर उभ्या आहेत हे कळणे म्हणजेच मनाचा गुंता सोडविणे होय. हा गुंता सुटला की साधकाला स्पष्ट जाणीव होते की एखादी ठराविक वासना दाबून ठेवणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय होय. आपण जसे आहोत तसे स्वीकारुन पुढील आयुष्यात आपले ध्येय उच्च ठेवणे जास्त श्रेयस्कर आहे याची खात्री त्याला मनोमन होते. आत्मरुपी भगवंतप्राप्तीचे ध्येय ठेवून जीवन जगणे ही पुरुषार्थाची परमसीमा आहे असे जेव्हा त्याला वाटते तेव्हा त्याने आपल्या मनाचा गुंत्यापासून पूर्ण सुटका प्राप्त करुन घेतलेली असते. स्वतःच्या वासनांच्या जंजाळातून दूर होऊन तटस्थपणे त्या कुठल्या पायावर उभ्या आहेत हे मी स्वतः पाहिले असे माऊली म्हणत आहे. अशा पाहण्याने जी शक्‍ती आपल्यात निर्माण होते त्याचाही त्याग करुन (गुंफलेला शेला विठ्ठलचरणीं अर्पण करुन) श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतः अत्यंत स्वतंत्र होतात. साधनेच्या वेलाला नित्यनूतन येणाऱ्या अनुभवरुपी कळ्यांचा आस्वाद घेण्यास ते मोकळे होतात!

 

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ६ जानेवारी २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

One Response to Mogara Fulala: Sweet fragrance of sadhana

  1. Omkar म्हणतो आहे:

    ॐ राम कृष्ण हरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: