haripath14: Unity in Diversity

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानदेव हरिपाठ — अभंग १४

 

नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी नहे पा दृष्टी ॥१॥

रामकृष्णी उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥

ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

 

हरीपाठाच्या चौदाव्या अभंगात माऊली असे म्हणत आहे की: `जो नित्यनियमितपणे, मनात भाव धरुन हरिपाठ म्हणतो त्याच्या नजरेला काळ दिसत नाही (म्हणजे तो मृत्यूच्या भयापासून सुटका मिळवितो). (अत्यंत दृढपणे) रामकृष्ण नामांच्या उच्चारणातच अमर्याद तप होते ज्याच्या बळाने (पूर्वी केलेल्या) पापांच्या फलांपासून संपूर्ण मुक्‍ती मिळते. `हरि’ `हरि’ `हरि’ असा जप निरंतर करण्यामुळे आपणांस शिवरुपाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो (म्हणजे जीव जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटतो). ज्ञानदेवांना केवळ नारायण नामच पाठ होते आणि त्यायोगे त्यांनी स्वतःचे `निजस्थान’ (म्हणजे आत्मरुप) जाणून घेतले.’

भक्‍तिमार्गावर चालणाऱ्या साधकांना उद्देशून असलेल्या हरिपाठात `भगवंताचे नाम घ्या’ हा एकच संदेश जरी वारंवार सांगितलेला असला तरी ज्ञानेश्वर महाराज (त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या) आत्मरुपी देवाची प्राप्ती होईपर्यंत नाम घ्यावे अशी सूचना देण्यास कधीही विसरीत नाहीत हे जाणविते. या हेतूनेच त्यांनी हरीचे नाम घेऊन आत्मरुपी देव प्रसन्न झाला असे (चौथ्या चरणात) सांगितले आहे असे वाटते. वरील अभंगातील अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यातील तिसऱ्या चरणात त्यांनी विष्णूचे नाम घेतल्यावर शिवाची प्राप्ती होईल असे प्रतिपादन केले आहे. यातून त्यांच्या दृष्टीकोनातील विशालपणा तात्काळ लक्षात येतोच पण त्याशिवाय भक्‍तिमार्गाने जाऊनसुध्दा योगमार्गातील सर्वांत उच्च अनुभवांचे ज्ञान होऊ शकते हे आश्वासन आपणांस मिळते. योग्यांच्या समाधीप्राप्तीबद्दल एक नैसर्गिक आकर्षण आपल्या मनात असेल आणि त्याचबरोबर भक्‍तिमार्ग सोपा असे वाटत असेल तर साधक गोंधळून जाण्याची शक्यता असते. स्वतःच्या मार्गाबद्दल सार्थ अभिमान असला तर मार्गक्रमण करण्यात एक सहज उत्साह येतो. दुसऱ्यांच्या मार्गातून जे मिळते तेसुध्दा आपल्या साधनेतून प्राप्त होणार आहे हे कळले तर साधकाची भक्‍ति आपोआप वृध्दींगत होते. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आपणा सर्वांना अत्यंत उपयुक्‍त आहे. ते कसे हे पाहायचा आज आपण प्रयत्‍न करु.

 

आत्यंतिक वैराग्यता म्हणजेच जीव आणि शिव यांचे मिलन

 

एखाद्या गोष्टीचे वर्णन आपणांस करायचे असेल तर साहजिकच आपण स्वतःला माहित असलेल्या शब्दांचा वापर करतो. त्यातून जर गोष्टीला अनेक पैलू असले तर साहजिकच आपण स्वतःला भावलेल्या पैलूंचे वर्णन करण्यात आपल्या शक्‍तीचा उपयोग करतो. ही गोष्ट व्यवहारातील घटनांमध्येही पाहता येते. कुणाला सचिन तेंडुलकरचा विनम्रपणा आवडतो तर कुणाला त्याची जगन्मान्यता तर कुणाला त्याची फलंदाजीतील परीपूर्णता. मग आपापल्या परीने आपण त्याचे कौतुक करीत असतो. आता एखाद्या खेळाडूच्या आयुष्याबद्दल इतकी मते असू शकतील तर परमार्थाचे अंतिम ध्येय काय आहे याबद्दल प्रत्येकाचे विश्लेषण आणि वर्णन भिन्न आहे यात काही वावगे दिसत नाही.

उदाहरणार्थ योगी म्हणतो की `निविकल्प समाधी’, भक्त प्रतिपादन करतो की `चराचरात भगवंत दिसणे’ व संन्यासी म्हणतो की `सर्व जग मिथ्या आहे हे कळून मायेपासून मुक्‍त होणे’ यातच साधकाला मोक्ष मिळतो. वरकरणी भिन्न वाटणारी ही सर्व वर्णने एकाच गोष्टीबद्दल सांगत आहेत, फक्‍त प्रत्येकाची भाषा भिन्न आहे आणि प्रत्येकाला स्वसंवेदनांनी आकलन झालेला पैलू वेगळा आहे असे संतमंडळी सांगतात हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. संतांना सर्व अनुभवांचे ज्ञान झालेले असल्याने त्यांना वरील वर्णनांतील एकत्व स्पष्टपणे दिसून येते. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवून येते. त्यांच्याकडे, अद्वैत विचारप्रणालीचे, वैष्णव प्रणालीचे, शाक्‍त पध्दतीने उपासना करणारे व इतरही अनेक प्रकारचे साधक आपल्या शंकांचे निरसन करण्यास यायचे व समाधानी होऊन आपली साधना उत्कर्षास न्यायचे. खरोखर, सर्व प्रकारच्या साधनेबद्दलची सहिष्णुता स्वतःच्या आचरणात आणून दाखविण्यामध्ये संतांचे आपल्यावर थोर उपकार आहेत यात संदेह नाही. एखाद्या कूपमंडूकाप्रमाणे `आपलीच साधना चांगली’ अशी वृत्ती होऊ नये यासाठी संतचरीत्र नियमित वाचणे हा एक रामबाण उपाय आहे. असो.

वरील अभंगातील तिसऱ्या चरणात माऊलींना हीच गोष्ट सांगायची आहे असे वाटते. वरकरणी पाहता वैष्णव व शैव भक्‍तांमध्ये वैमनस्य दिसते. थोर संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांना कित्येकवेळा अनेक दिवस सलग उपाशी राहण्याची पाळी वैष्णव ब्राह्मणांच्या कठोर आचरणामुळे आली होती. दारात आलेला भिक्षुक वैष्णव नाही या केवळ एका कारणामुळे त्यांना भिक्षा नाकारण्यात आली होती! विसाव्या शतकातील ही संकुचित वृत्ती पहा आणि कल्पना करा की सातशे वर्षांपूर्वी काय अवस्था असेल. अशा परीस्थितीत माऊलींनी काय सांगितले आहे ते बघा. `हरिनाम उच्चारणे हा शिवाचा मंत्र आहे!’ असे प्रतिपादन महाराजांनी केलेले आहे. समाजाला नवी दृष्टी देणे हे याहून भिन्न असेल असे वाटत नाही.

भारतीय विचारप्रणालीत ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे त्रिकुट जगाच्या उत्पत्तीला, संगोपनाला व विनाशाला कारणीभूत आहे असे मानले जाते. भगवान शंकरांचे कार्य विनाशाचे आहे. त्याला अनुसरुन त्यांची जीवनशैली आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण विराण हिमालयातील एका उत्तुंग पर्वताच्या शिखरावर आहे, त्यांना स्मशानातील राखेने अंग चर्चित करायला आवडते व त्यांचे गणही विक्राळ रुप धारण करुन मद्य-मांस याचे सेवन करण्यात गुंग असतात हे सर्वश्रुत आहे. आता कुठल्याही व्यक्‍तिचे वर्णन करताना आपण त्या व्यक्‍तीचे वैशिष्ठ्य काय आहे हे सांगतो. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरचे वर्णन एक फलंदाज म्हणून आपण करतो, पिकासोचे वर्णन एक चित्रकार म्हणून करतो व पु.लं.चे वर्णन एक ख्यातनाम लेखक म्हणून करतो. तसे पाहता सचिनने जितक्यावेळा बॅटींग केली अहे त्यापेक्षा जास्त वेळा दात घासले असतील, पिकासोने अजून अधिकवेळा भोजन केले असेल पण त्यांच्या जीवनातील ह्या घटनांना फार महत्व न देता ते कुठल्या तत्वांकरीता आपले आयुष्य जगले याचा विचार करुन आपण त्यांच्याबद्दल बोलतो. हाच विचार भगवान शंकरांबद्दल केला तर हे सहज स्पष्ट होते की शंकर म्हणजे `जगाचा विनाश’. याचा अर्थ असा की जर आपल्या मनात व्यवहारी जगाबद्दल अत्यंत वैराग्य उत्पन्न होऊन आपण जगाची फार पर्वा करणे बंद केले तर आपणांत शिवाचे अस्तित्व जागृत झाले आहे असे मानण्यात काहीच हरकत नाही. (जेव्हा आपण जवळच्या माणसांची काळजी घेत असतो तेव्हा आपण विष्णूरुपी असतो व कुठलीही नवीन क्रिया करताना ब्रह्मरुपी असतो हेसुध्दा खरे आहे.) तेव्हा हरिनाम घेण्याने आपल्या मनात जगाबद्दल वैराग्य उत्पन्न होऊन भगवंताबद्दल प्रेम जागृत झाले तर हरिनाम घेण्याने आपण शिवरुप होतो असे मान्य करावेच लागते! म्हणूनच माऊली म्हणत आहे की `हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा’. इथे असा संदर्भ द्यावासा वाटतो की शिवलीलामृतामध्येही शिवभक्‍तांची अंतिम स्थिती म्हणजे `शिवरुप होऊन’ शिवपदी स्थिर राहणे अशी वर्णिलेली आहे (पहा: ओवी १४५:९, १४४:१०, १६२:११, १००:१२ इत्यादि). तेव्हा आपण शिवरुप होतो हे मान्य करण्यास शास्त्राधारही आहे! खरोखर योगी लोकांचे `जीव आणि शिव याचे मिलन होणे’ हे वर्णन साधकाच्या मनात व्यावहारिक जगाबद्दल आत्यंतिक वैराग्यता स्थिर होणे सांगत आहे आणि हीच अवस्था सर्व जगात ईश्वर भरुन राहिलेला आहे ह्या शब्दात भक्‍तियोगी सांगत आहे असे वाटते.

आता मोक्ष मिळणे म्हणजे काय तर मनातील संकल्प-विकल्पांच्या फेऱ्यापासून आपणांस मुक्‍ती मिळणे. कुठल्याही गोष्टीपासून मुक्‍त होण्यास ती गोष्ट वा घटना आपल्या जीवनातून निघून जाणे आवश्यक नसते. आपले मन त्या गोष्टीपासून दूर होणे महत्वाचे असते. असे नसते तर अरण्यात गेल्याक्षणी आपण शिवरुप झालो असतो. तिथेही मनात कुटुंबाच्या कल्याणाचे विचार असतील तर जगातून आपण मुक्‍त झालो असे म्हणता येईल का? तेव्हा वैराग्य अंगात बाणणे आणि मोक्ष मिळणे यात काय़ फरक आहे? म्हणूनच माउली पुढे म्हणते की `म्हणती जे वाचा तया मोक्ष.’

सर्वांत शेवटी हरिनामाने परमार्थाचे ध्येय प्राप्त होणे हे निव्वळ तत्वज्ञान नसून मी स्वतः माझ्या जीवनात याच मार्गाने मोक्ष मिळविला आहे असे ज्ञानदेव महाराज सांगत आहेत. आपण सर्वांनी हरिनाम उच्चारण्यातील सर्व संदेह मूळापासून काढून टाकून माउलींच्या मार्गाचा मागोवा घेत साधना सुरु ठेवली पाहिजे. परमकृपाळू ज्ञानेश्वर महाराज आपली सर्व चिंता हरण करतील यात कुठला संदेह आहे?

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १३ जानेवारी २००८ रोजी झालेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: