708/11: Key To Renunciation (Tyag)

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां ओवियां फुले मोकळी ।

अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्वरुपाच्या ॥ ७०८:११ ॥

 

अकराव्या अध्यायाचा समारोप करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वरील उद्‌गार काढले आहेत. माऊलींची अतिशय उच्च अशी योगीक स्थिती या ओवीतून प्रगट होत आहे. यातून स्वतःचे आत्मरुप निर्गुण `सत-चित-आनंद’ रुपी आहे. आपला देह व त्याच्या अनुषंगाने आलेले हे सर्व जग केवळ मिथ्या असून त्याचा मूळ पाया आपले आत्मरुपच आहे याची संपूर्ण जाणीव ठेवूनच त्यांनी भावार्थदीपिका सांगितली होती हे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे तर संसारात राहील्यामुळे कळत नकळत आपल्या हातून जी काही कर्मे घडत असतात त्यांच्या फळापासून मुक्‍त होण्याचा कुठला मार्ग आहे हेसुध्दा या ओवीतून स्पष्ट होत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत `माझे `सत्‌ भाव’ या रुपातील (म्हणजे स्वतःचे निर्गुण आत्मरुपी) अस्तित्व (म्हणजे ओंजळ) ही (ज्ञानदेव या माझ्या देहरुपाने) भरुन गेल्याने ही जी भावार्थदीपिका निर्माण होत आहे तीला मी स्वतःच्या मनाने कुठेलेही रुप न देता (`ओवीरुपी मोकळीं फुले’) ती आहे तशी विश्वरुपी देवाच्या चरणकमळी अर्पण करीत आहे (म्हणजे कर्तृत्वाच्या भावनेतून मला मुक्‍त करुन घेत आहे!).

 

विश्वाच्या पायात मुरण्यातच दानशूरता आहे

 

अनिर्वाच्य, निर्गुण अशा सत्यस्थितीचे वर्णन करण्याचा प्रयत्‍न प्राचीन काळापासून चालू आहे. वेदांमध्ये `नेति, नेति’ ह्या शब्दांतून त्या स्थितीचे वर्णन करण्यास ती काय नाही हे सांगितले आहे. ज्याप्रमाणे एखादी नववधू सासरी आपल्या पतिला ओळखून दाखविण्याचा खेळ खेळताना जे गृहस्थ पति नाहीत त्यांच्यासमोर नेल्यावर नकारात्मक मान डोलावते व आपल्या पतिसमोर आल्यावर लाजेने केवळ स्तब्ध राहून आपला होकार दर्शविते त्याप्रमाणे ही गोष्ट आहे. परंतु निर्गुण देवाचे केवळ नकारात्मक वर्णन वेदात केलेले नाही तर `सत-चित-आनंद’ असे सकारात्मक वर्णनही दिसते. जगद्गुरु आदी शंकराचार्य म्हणतात `सच्चिदानंदकंदाय जगदंकुर हेतवे, सदोदिताय पूर्णाय नमोऽनंताय विष्णवे ॥श्लोक १॥’. जगरुपी वृक्षाचे मूळ हे सच्चिदानंद या कंदरुपात आहे असे ते म्हणत आहेत. त्याला नमन करुन आपले सदाचाराचे श्लोक त्यांनी प्रारंभ केले आहेत. यातील सत म्हणजे `निव्वळ अस्तित्व’, चित म्हणजे `अस्तित्वाची जाणीव’ आणि आनंद म्हणजे `अस्तित्वाच्या जाणीवेत मुरुन गेल्यावर आपल्या देह-मनाची जी अवस्था होते ती होय’. प्रत्येक जीवाने आपल्याभोवताली जो विश्वाचा प्रचंड पसारा घातला आहे तो त्या जीवापुरताच मर्यादित आहे. अशा सर्व सृष्टींचा, पसाराचा जो पाया आहे त्याचे हे वर्णन आहे. आपल्या सर्वांचे जग भिन्न आहे, अगदी बहीण-भावांचे वा पति-पत्‍नीचे वा आई-मुलाचे विश्व एकमेकांपासून भिन्न आहे. खूपशा गोष्टी कदाचित समान असतील परंतु संपूर्ण विश्व एकसारखे असणे कसे शक्य आहे? तुम्ही एखाद्या माणसाच्या कितीही जवळ असा, परंतु तुमचे विश्व हे त्याच्या जगापासून भिन्नच आहे हे सतत लक्षात ठेवा. परंतु अशा अनंत संसारांचे मूळ एकच आहे. `नमे अनंताय विष्णवे!’ त्या अनंत, अगणित विश्वांचा पाया म्हणून असलेल्या सच्चिदानंदकंदरुपी विष्णूला नमन असो. हा एक पाया कुठला? तर सच्चिदानंद. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात `भरुनि सतभावाची अंजुळी’. माझ्या विश्वाचे मूळ सच्चिदानंद आहे त्यात माझ्या ज्ञानदेवरुपाने निर्माण झालेले विश्व भरुन जे काही निर्माण झालेले आहे ते. म्हणजे ज्ञानेश्वरी. ती परत त्या मूळाला अर्पण करीत आहे. `अर्पिली अंघ्रियुगुलीं, विश्वरुपाच्या’. मग मध्ये मी कुठे उरलो? माझे श्री संत ज्ञानदेव म्हणून जे अस्तित्व आहे त्याला ह्या कर्तृत्वाचे श्रेय लाभत असले तरी `खुद्द मी’, `निव्वळ मी’ त्यापासून निराळा आहे. जो होतो तसाच आहे आणि त्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही, हे मला जाणविले म्हणजेच मी ही कृती अर्पण केली असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या की अर्पण करणे आपोआप घडत आहे. कुणी स्वतःला भिन्न मानून दुसऱ्या जीवाच्या चरणाशी दान देत नाही. स्वतःचे खरे रुप जाणल्याने आपली जी अवस्था होते त्यालाच अर्पण करणे असे म्हणायला हवे. शरीराने घडलेल्या गोष्टी आपल्या संसारात्मक अस्तित्वाला देऊन स्वतः नामानिराळे राहणे हे खरे अर्पण करणे होय. विचार करा. खरे म्हणजे गोष्टींवर उदक सोडायला आपली पात्रता काय आहे? काय आपण निर्माण केले आहे की ज्याच्यावर आपले कर्तृत्व आपण आरोपू शकू?

तुम्ही म्हणाल परीक्षेत मी गुण मिळविले आहेत, स्वतःच्या कष्टाने काही गोष्टी प्राप्त केल्या आहेत त्यातर माझ्या आहेत ना? जर तुम्ही गुण मिळविले असतील तर गुण मिळायच्या आधी तुम्हाला संपूर्ण कल्पना असायला हवी की परीक्षेत किती गुण मिळतील ते. फारफारतर तुम्ही मी पहिला येईन असे म्हणू शकता पण प्रत्येक विषयात किती गुण पडतील हे आधीच वर्तवू शकता का? पण जेव्हढे मिळाले आहेत ते सर्व माझे असे म्हणायला तुम्ही तयार असता. कुठले प्रश्न येणार आहेत यावर तुमचे नियंत्रण नाही, उत्तरपत्रिका तपासणारा कोण आहे यावर तुमचे नियंत्रण नाही, त्याने आपली उत्तरे मन शांत ठेवून वाचायलाच पाहीजेत असेसुध्दा तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. कदाचित त्याला सकाळी नाश्ता चांगला झाला होता म्हणून त्याने तुम्हाला चांगले मार्कस्‌ दिले असतील, कोणास ठाऊक? पण मिळालेले गुण माझे!!! सर्व जग तुमचे म्हणणे मान्य करते म्हणून मूलतः असत्य असलेली गोष्ट सत्य होत नाही, सत होत नाही! आपणांस सत्यस्थितीचा शोध घ्यायचा आहे. जगन्मान्य गोष्टीचा नव्हे. वरील आक्षेप तुमच्या जीवनातील सर्व अगदी सर्व म्हणजे तुमच्या जन्मापासून सर्व गोष्टींना लागू पडतो हे लक्षात घ्या म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की अर्पण करण्याजोगी आपल्याकडे एकच वस्तू आहे. ती म्हणजे आपले संकुचित, स्वतः कवटाळलेले सांसारिक अस्तित्व. भरा तुम्ही आपल्या निर्गुण अस्तित्वाची जाणीव. त्यामध्येच अर्पणता आहे, दानशूरता आहे, सत्यता आहे. भरोनि सद्भावाची अंजुळी तुम्ही जे काही करता ते सर्व विश्वरुपाला अर्पण आहे. आणि याशिवाय जे काही करता ते केवळ आभासात्मक आहे. अशाश्वत आहे, मग कुठले दान करणार?

आपले सर्व कार्य `मी आहे’ या जाणीवेवर अवलंबून आहे. कुठल्याही कारणाशिवाय तुम्ही एकच गोष्ट जाहीर करु शकता. ती म्हणजे `मी जिवंत आहे’ अशी आपल्या मनातील जाणीव. श्वासोश्वास होत आहे म्हणून मी आहे असे म्हणत असाल तर केवळ कुंभकात राहणाऱ्या समाधिस्थ योगीजनांना अस्तित्व नाही असे मानायला हवे. स्वतःच्या अस्तित्वाचा कुठलाही निकष लावला तर त्याच्याशिवायही आपण जिवंत आहोत ही कल्पना अस्तित्वात राहते हे तुमच्या लक्षात राहील. स्वतःच्या देह-मनाच्या संकुलापासून अलिप्त असलेली ही एकच जाणीव तुमच्या अस्तित्वात आहे. एवढेच नव्हे तर तुमचे सर्व विश्व `मी आहे’ या विश्वासावर अवलंबून आहे. या दृष्टीने तुमच्या विश्वाचा पाया कुठला तर तुमचा `आहेपणा’. मी आहे हा विश्वास झाल्याशिवाय कुठल्या गोष्टीला प्रारंभ होतो? परंतु ही जाणीव नव्हती तेव्हा काय होते? निव्वळ विश्वास होता. प्रेम होते. एकपणा होता. मग त्या विश्वासाचे प्रगट रुप, त्या प्रेमाची आत्मीयता आणि एकपणाचे द्वैत म्हणून आपण आहोत ही जाणीव निर्माण झाली असे शास्त्र सांगते. या सर्व सृष्टीचे मूळ प्रेम आहे, विश्वास आहे. जगात जे काही घडत आहे ते सर्वकाही प्रेमाचेच सगुण रुप आहे.

संतमंडळी सर्वांशी समभावाने वागतात, निरपेक्ष बुध्दीने वागतात असे म्हणतात. यात मोठे काय आहे? ज्यांना प्रेमच दिसत आहे ते प्रेमानेच वागणार की! जे सर्वदा परिपूर्ण आहेत त्यांनी निरपेक्ष रहावे यात काय विशेष? `सदोदिताय, पूर्णाय’ अशा विष्णूरुपात जे मग्न आहेत त्या अवस्थेत त्यांनी तसे वागले नाही तरच नवल. ही त्यांची सहज अवस्था आहे. त्याचे कौतुक करणे म्हणजे पाण्याचे पातळपणाबद्दल कौतुक करण्यासारखे आहे. कौतुक करायचे ते त्यांच्या वर्तनाचे नाही तर अवस्थेचे. आपण कुठल्या हेतूने संतांकडे जातो हे महत्वाचे आहे. स्वतःला त्यांच्या साच्यात घालायला आपण सदा उत्सुक असतो. जर त्यांच्या बाह्यवर्तनावर भाळून आपण त्यांचा जयजयकार केला तर जास्तीत जास्त आपण त्यांच्या सारखे वागू शकतो. पण त्यांच्या सच्चिदानंद अवस्थेबद्दल काहीही माहिती नसताना केवळ बाह्य अंगाने सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे मृत देहाला शृंगारण्यासारखे आहे. त्याचा काही उपयोग आहे का? आतील चैतन्य निघून गेलेले आहे ते परत येणार आहे का? म्हणून आपण संतांच्या अवस्थेबद्दल सतत आत्मीयता ठेवावी. त्यांच्या बाह्य वर्तणुकीबद्दल नव्हे. भरोनि सद्भावाचि अंजुळी अशी अवस्था ज्याची आहे त्याने आपले सर्व अस्तित्वच विश्वरुपाला अर्पण केले आहे. सर्व संतांनी हेच केले आहे. आपणां सर्वांना हाच दानशूरपणा शिकविण्यास ते उत्सुक आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की मी स्वतः फक्‍त तेच करीत आहे.

दृष्टांत बघा. विवाहामध्ये वधूचा पिता `इदं न मम’ असे म्हणून कन्यादान करतो आणि स्वतः आपल्या मुलीच्या सर्व जबाबदारीतून मुक्‍त होतो. त्याने आपल्या अस्तित्वात काय फरक केलेला आहे? तो आहे तसाच आहे. त्यात काही फरक पडलेला नाही. हे वाक्य म्हणण्याच्या आधी त्याची सांसारिक स्थिती आणि आत्ताचि त्याची अवस्था यात काय फरक पडला हो? पण झाले काय? स्वतःच्या मुलीच्या संपूर्ण जबाबदारीतून त्याने सुटका मिळविली. इथे हा एक मुद्दा लक्षात घ्या की आपण आपल्या कन्येचे ज्या आत्मीयतेने, दक्षतेने प्रतिपालन करतो तेव्हढे आपल्या मुलाचे करीत नाही. त्याला त्याच्या पायावर उभे रहायचे आहे म्हणून थोडेबहुत दुर्लक्षच करीत असतो. तसे आपण आपल्या कन्येबद्दल करीत नाही. म्हणजे एवढ्या जाणीवपूर्वक वाढविलेल्या कन्येबद्दल आपली जी आत्मीयता होती, बंधने होती त्या सर्वांपासून आपण क्षणात मुक्‍त होतो. असे जावयाच्या चरणावर आपले कन्यारत्न अर्पण करण्याकरीता काय केले? स्वतः सासरा या रुपात प्रवेश करता झाला. बस्स इतकेच. बाकी आणखी काही करायची आवश्यकता आहे काय? तसेच आपण आपल्या देहरुपी कन्येचा काळजीपूर्वक प्रतिपाळ करण्यात जे आयुष्य घालविले आहे त्यातून मुक्तता मिळविण्यास आपण सच्चिदानंदरुपी अस्तित्वात प्रवेश केला पाहिजे. दुसरे काही नाही. मग आपल्या मुलीची जबाबदारी विश्वरुपी जावई घेईल. घ्यायलाच पाहिजे! नाहीतर जावई म्हणून त्याने स्वीकार का केला?! श्री संत गोंदवलेकर महाराज ह्या अवस्थेला उद्देशून म्हणतात `स्वतःचे चित्त रामनामात ठेवून देह प्रारब्धावर सोडून द्यायला मला खूप आवडते.’ आपले लक्ष स्वतःच्या निर्गुण स्वरुपाकडे ठेवा. सतत ध्यानात ठेवा की जगातील कुठलीही गोष्ट माझ्या आहेपणाचा नाश करु शकत नाही. `नैनं छिन्दंती शस्त्राणि’ असे ज्याने स्वतः जाणून घेतले त्याने वरील ओवीचा अर्थ ऐकला असे म्हणता येईल. बाकीचे सर्व दान, सर्व गुरुसेवा तुम्हाला बांधूनच ठेवत आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्‍त व्हायला मदत करणाऱ्या ओवीकडे नीट बघा. स्वतःच्या आयुष्यातील सद्भावाचे महत्व जाणून घ्या. मग बाकी काही करायला नको. आज एवढेच.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक १६ फेब्रुवारी २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

2 Responses to 708/11: Key To Renunciation (Tyag)

  1. वैभव नरवडे म्हणतो आहे:

    अत्यंत सुंदर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: