(23+24)/15: Can You create something out of nothing? Guru Does!

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ ।

जै भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥ २३:१५ ॥

 

तयांपरी श्रीगुरु । करिती जै अंगीकारु ।

तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥ २४:१५ ॥

 

परवा श्री निसर्गदत्त महाराजांची प्रवचने वाचताना खालील वाक्य आढळले. ते म्हणत होते `श्री ज्ञानेश्वर म्हणतात की कंकर जरी हातात घेऊन पाण्यात टाकले आणि ते शिजवून खाण्याचा प्रयत्‍न केला तरी त्या वाळूच्या कणांचे तांदुळ होऊ शकते, जर सद्‌गुरुंची तशी इच्छा असेल तर. सद्‌गुरुकृपा अशी असते.’ ज्ञानेश्वरीतच हा संदर्भ आहे हे माहिती असल्याने तो शोधून काढला आणि आज आपण त्याच ओवीवर विचार करुया. माऊली म्हणत आहे `जर सर्व जगाचा नाथ तुमच्या भुकेचे हरण करण्यास आला तर तुमचे कुठलेही प्रयत्‍न यशस्वी होतात, अगदी वाळूच्या कणांतूनसुध्दा तुम्हाला अमृताच्या कणीसारख्या तांदुळाचा भात प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे श्रीगुरु ज्याला आपले म्हणतात त्याला मोक्ष प्राप्त करण्यास संसार उपयुक्‍त ठरतो (म्हणजे त्याला संन्यास घेण्याची वेगळी आवश्यकता नसते).’ श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की लहान मुलाने वडिलांचा हात धरुन चालले तर धोका असतो. मध्येच वाटेत आकर्षक वस्तू दिसली तर तो हात सोडून तिथे जाऊ शकतो. पण जर वडीलांनी मुलाचा हात धरला की तशी भिति नसते. त्याने वेडावाकडा हट्ट धरला तरी ते त्याचा हात सोडत नाहीत. त्याला त्याच्या ध्येयापाशी नेऊन सोडतातच. त्याचप्रमाणे इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की ज्याचा हात श्रीगुरुंनी धरला आहे त्याने संसारातील कुठल्याही वस्तू वा घटनेबद्दल वा व्यक्‍तीबद्दल अभिलाषा धरली तरी त्यात तो अडकणार नाही. त्याचा अंगीकार केलेले श्रीगुरु त्याला अडकून देणारच नाहीत. त्याचा संसारच त्याच्या मोक्षाची वाट बनतो.

 

जळो ती बुध्दी, करा वृध्दींगत भक्‍ती

 

तुम्हाला काय वाटते? साधना वाढविली म्हणजे साध्य प्राप्त होते? डोळ्यासमोर ठेवा आपले साध्य काय आहे ते. इथे आपणास स्वतःचे महत्व वाढवायचे नाही. कुठल्या सिध्दीची प्राप्ती करुन घ्यायची नाही. समाजातील मान्यवर व्यक्‍ती म्हणून नावाजून घ्यायचे नाही की आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ करवून घ्यायची नाही! व्यवहारातील कुठल्याही साच्यात, मग तो कितीही उच्चतम असो, स्वतःला बसवायचा प्रयत्‍न करणारे साधक आपण नाही. आपली अपेक्षा काय आहे? `नमो जी आद्या, वेदप्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’ अशा देवाशी अखंड जवळीक. पसायदानात `…भजिजो आदीपुरुखी अखंडित’ असे माऊलींनी आपल्याकरीता विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना केली आहे ते साधक आपण आहोत. आपली ही साधना सुरु होण्याआधी `किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होऊनी तिहीं लोकी’ अशी करणे हे आपले कर्तव्य आहे. याचा अर्थ असा की आदिपुरुषाला भजायचा विचार करण्याआधी व्यवहारातील सर्व खेळ आपणास निरर्थक वाटले पाहिजेत. वर नाकारलेल्या सर्व ध्येयांपासून आपणांस खरीखुरी विरक्‍ती बाणविली पाहिजे. नाहीतर जन्मापासून मनात असलेली या जगातील सर्वमान्यतेची अपेक्षा कशी जाईल? परंतु आपल्या बुध्दीचा वापर करुन, सारासार विचार करुन आता आपण हे ठरविले आहे की व्यवहारातील प्रगती कमळदळावरील पाण्याच्या थेंबासारखी अस्थिर आहे. जराशा वाऱ्याच्या झुळुकीने ती डळमळीत होणार आहे. हा तीचा स्वाभाविक गुणधर्म आहे. आपण काही केले तरी तो नाहीसा होणार नाही. ज्याप्रमाणे कारल्याचा कडुवटपणा आणि गुळाचा गोडपणा काही केले तरी नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे संसारातील प्रतिष्ठा कितीही योग्य वागले तरी टिकत नाही. अहो, इथे प्रत्यक्ष प्रभु श्रीरामचंद्रांच्या वागण्यावर आक्षेप घेणारे महाभाग आहेत! मर्यादापुरुषोत्तम म्हणून ज्याच्याकडे बोट दाखवायचे त्याच्या नैतिकतेबद्दल (वालीला झाडामागून बाण का मारला?, लोकापवादामुळे सीतेचा त्याग का केला? इत्यादी) शंका घेणाऱ्या लोकांकडून आपली प्रतिष्ठा सतत मानली जाईल असे मानणे म्हणजे स्वप्नराज्यात रमण्यासारखे आहे. असा विवेक करुन आपण आपल्या संसारातील मान्यतेच्या बंधनातून सुटका मिळविलेली आहे. आणि जगातील मान्यतेचा विचार करणे सोडून देणे म्हणजेच तिहीं लोकात पूर्ण होणे होय. मान्यता मिळविणे ही पूर्णता नव्हे, कारण मिळालेली मान्यता टिकवायला आपण बांधलेलो असतोच की. तेव्हा `तिहींलोकी पूर्ण’ होण्याच्या आपल्या कर्तव्याचे परिपालन करुन आता आपण आत्मरुपी देवाकडे जाण्याचा प्रयत्‍न करीत आहोत. अशी तुमची अवस्था असताना तुम्हाला काय वाटते? साधना वाढविली की ध्येयाची प्राप्ती होईल म्हणून? अजिबात नाही. चुकीचे आहेत हे विचार. शेवट जवळ आला की साधनासुध्दा सोडायची असते. माऊली अठराव्या अध्यायात म्हणते की ज्ञानास पात्र झालेला साधक हळूच साधना खाली ठेवतो. ज्याप्रमाणे गावाकडे सरळ जाणारी पायवाट गाव जवळ आल्यावर वळसा घालून वेशीतूनच आत शिरते अथवा गंगेचा प्रवाह सागरापाशी आल्यावर हळूवार होतो वा केळीच्या झाडाची वाढ फळे लागल्यावर थांबते तशी ही गोष्ट आहे.

साधनेमध्ये दोन महत्वाचे टप्पे असतात. पहिला टप्प्यात आपण स्वतः एक ठाम विचार करायचा असतो की परमार्थात मला नक्की काय हवे म्हणून. कित्येकदा एखादा विचार ठाम होतो पण तो निश्चय शाश्वत नसतो. उदाहरणार्थ, सुरुवातीला संपूर्ण खात्री होती की साधना करुन मनाची शांति मिळवायची आहे. वा साधना करुन अशी अवस्था बनवायची आहे की आपणास बघून लोकांची दुःखे हरण होतील. किंवा असे वाटते की साधना करुन आपल्या व्यक्‍तीमत्वाचा इतका छान विकास होईल की एखाद्या खोलीत शिरल्याशिरल्या लोकांना एक आधार प्राप्त झाला असे वाटेल. परंतु ही सर्व लक्ष्ये एका अल्पसंतुष्टी माणसाची आहेत हे लक्षात घ्या. याचे कारण असे की ह्या सर्व ध्येयांमध्ये आपल्या प्रगतीची खूण दुसऱ्या लोकांच्या हाती असते. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त महत्व दुसऱ्या लोकांना येते. कारण ते ठरविणार आपण किती चांगले म्हणून. ऑलिंपिकमध्ये जगावेगळ्या कसरती करुन देखील शेवटी परीक्षकांच्या गुणांची वाट बघणारे कसरतपटु असतात त्याप्रमाणे आपल्या सात्विक गुणांचे प्रदर्शन करुन जगाच्या निर्णयाची आपण वाट बघणार! कोण हे दुसरे लोक? का म्हणून त्यांच्याकडे तुमची साधनेतील प्रगती ठरविण्याचा अधिकार यावा? कल्पना करा की तुम्हाला सर्व जगाने उपेक्षिले आहे. कोणीही तुमची दखलसुध्दा घेत नाही मग बाकीची गोष्ट दूरच राहीली. अशावेळी तुम्ही खरे कोण आहात यात फरक पडतो का? तुमच्या मनात असलेले जगाबद्दलचे प्रेम जगाने तुमची उपेक्षा केली म्हणून कमी होते काय? नाही. तुम्ही जे कोणी आहात ते आहातच. तुमची इच्छा नसली तरी ते तुम्ही आहात! तुम्ही जसे आहात तसे असण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच तुम्हाला नाही!! मग जगाकडे बघून का ठरवावे आपण कोण आहेत म्हणून. जो तो आपापल्या मनाच्या साहाय्याने तुमची परीक्षा करणार आणि तुम्ही त्यांच्या अशा सापेक्ष निर्णयाला मान्यता का म्हणून द्यावी? साधनेच्या पहिल्या टप्प्यात असा विचार करावा लागतो. ह्या विचाराला आधार म्हणून आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात, ज्या कुठल्या व्यक्‍तींशी संबंध येतो त्यांचे यथायोग्य निरीक्षण करणे जरुरी असते. माऊली म्हणूनच म्हणते `जयजय स्वसंवेद्या’ स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे बघून वैराग्य प्राप्त करेपर्यंत आपल्याला बुध्दीचा आधार घ्यावा लागतो यात शंका नाही. मग नंतर काय होते?

बुध्दीला फेकून द्यावे लागते! एकदा विवेकाने वैराग्य अंगात बाणले की मग कठोरपणाने स्वतःच्या बुध्दीकडे दुर्लक्ष करावेच लागते. नाहीतर साधकाला फारमोठा धोका असतो. कारण वैराग्यात प्रचंड शक्‍ती असते. तटस्थपणा म्हणजे निश्क्रियता नव्हे. याउलट अलिप्ततेमध्ये स्वतःची शक्‍ती पूर्णपणे मोकळी होण्याचे सामर्थ्य आहे. तुमच्या तटस्थतेमुळे बाकी कुणीही माणसे तुमच्या भावनांना स्पर्शसुध्दा करु शकत नाहीत. तुम्ही सर्व बंध तोडल्यामुळे तुमच्याजवळ येण्यास कुणाला मार्गच नसतो. या अवस्थेचे `अनेक जणांत राहूनसुध्दा एकाकी’ असे वर्णन करतात. मग तुम्हाला माणसे आहेत तशी दिसू लागतात. मनुष्यजन्मात दोष असल्याशिवाय रहात नाहीत. म्हणून सर्व लोकांचे गुण आणि दोष तुम्हाला स्पष्ट दिसतात. मग त्यावर भाष्य करण्याचा, दोषांचे निवारण करण्याचा मोह होणे हा तो अत्यंत मोठा धोका बौध्दीक साधकांच्या समोर असतो. हा धोका का? कारण एकदा आपण दोष दाखविले आणि त्यानंतर दुसऱ्या माणसाने ते काढून टाकायचा प्रयत्‍न केला नाही तर आपल्या मनात त्या माणसाबद्दल अढी निर्माण होण्याची शक्यता असते. मग गेला की तुमचा तटस्थपणा. आणि आधी सांगावेसे वाटण्यामध्येच गुंतवणूक आहे. परंतू बुध्दीला स्वतःचे प्रदर्शन करण्याची अत्यंत जन्मजात हौस असण्याने बुध्दी जवळ ठेवली की स्वतःहून सल्ला देणे होणारच. आपण कितीही सावध राहीले तरी कोळशाच्या वखारीत गेल्यावर अंगाला थोडेतरी काळे लागतेच त्याचप्रमाणे बुध्दीवर कितीही अंकुश ठेवायचा प्रयत्‍न केला तरी ती आपल्याला फसवून मार्गदर्शक होण्याच्या रुपात टाकतेच. ह्या धोक्याबद्दल श्री गोंदवलेकर महाराज साधकांना सांगतात की परमार्थ हा स्वतःच्या कल्याणाकरीता करायचा असतो, दुसऱ्यांच्या हिताकरीता नव्हे हे कधीही विसरु नका. सांगण्याचा अर्थ हा की एकदा विवेकाने संसाराबद्दल वैराग्य अंगात भिनले की बुध्दीचा समूळ नाश होणे आवश्यक आहे. जळो ती बुध्दी या शब्दांचा अर्थ हा आहे. जोपर्यंत तुमच्या मनात संसारातील गोष्टींबद्दल ओढ आहे तोपर्यंत बुध्दीचा उपयोग आहे. एकदा वैराग्य अंगात भिनले की बुध्दीचा अडथळाच होतो.

आणखी एक मुद्दा पहा. पहिल्याच ओवीत आत्मरुपाला आदिपुरुष म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असे सूचित केले आहे की या जगातील सर्व वस्तूंच्या पलिकडे त्याचे अस्तित्व आहे. संपूर्ण संसाराची उत्पत्ती ज्यारुपातून होते त्या उत्पत्तीतच आपण रमलो तर त्याची जननी दिसेल काय? मन आणि बुध्दी या संसाराचेच भाग आहेत. ते जागृत अवस्थेतच दिसतात. गाढ झोपेत कुठे आहे तुमचे मन आणि बुध्दी? म्हणून आपल्या ध्येयाकडे जायचे असेल तर सर्वांत सूक्ष्म अशा बंधनांतूनसुध्दा आपणास मुक्‍त व्हायचे आहे. स्वतःचीच निष्कलंक बुध्दी हे ते अंतिम बंधन होय. आपल्या अस्तित्वातून बुध्दीला असलेले महत्व काढून टाकल्यावर जी पोकळी निर्माण होते, हे छिद्र पडते त्यातूनच ज्ञानसूर्याचा प्रकाश आत येणार आहे! हा ज्ञानसूर्य अगोदरपासूनच अस्तित्वात होता. आपण त्याला निर्माण केलेला नाही. बुध्दीने आपण फक्‍त पाण्यावरील जमलेले शेवाळ दूर केले मग त्या पाण्यात प्रतिबिंब पाडणारा सूर्य आपण तयार केलेला आहे का? आपले सर्व प्रयत्‍न म्हणजे पाण्यात शिजत टाकलेल्या वाळूच्या कणांसारखे होते. जी गोष्ट प्राप्त करायची आहे (शिजलेला भात) त्यापासून एका वेगळ्याच पातळीवर होते. त्या प्रयत्‍नांनी कधीही साध्य प्राप्त होणार नव्हते. परंतु झाले! भुकेची वेळ राखली गेली. कारण श्रीगुरु होते. जेव्हा बुध्दीला खाली ठेवण्याचे साधन पूर्ण होते तेव्हा आपला संसार मोक्षमय होतो. सदा तो तसाच होता. आपण आपल्या बुध्दीचा चश्मा डोळ्यावर ठेवल्याने संसार आहे तसा दिसत नव्हता एवढेच. भक्‍ती म्हणजे काय? तर स्वतःच्या बुध्दीच्या अभाव केल्याने जे भोक निर्माण झाले होते त्यातून येणारा सद्‌गुरुंच्या कृपेच्या वर्षावाची आपल्याला होणारी जाणीव म्हणजे भक्‍ती. आधी बुध्दीचा उपयोग करा आणि मग जाळून टाका ती बुध्दी. मग जे नवीन पीक येईल ते निखळ भक्‍तीचे आहे. अशा भक्‍तीमुळे आपल्या भोंवताली ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व सद्‌गुरुकृपेचेच दृष्य रुप आहे याची सतत जाणीव निर्माण होते. अखंड आपल्याबरोबर असलेल्या भगवंताची खात्री होते. ह्या भक्‍तीत खरी कृतज्ञता आहे. दुसरे काही नाही. स्वतःला बुध्दीमान समजता ना. मग करुन दाखवा तुमच्या बुध्दीचा खरा उपयोग. करा निर्माण डोळस भक्‍ती आणि जाळून टाका अर्धवट बुध्दी.

 

स्वतःच्या बुध्दीकडे दुर्लक्ष करायला लागलात की तुम्हाला खरी भूक लागली आहे असे भगवंताला जाणविते. `भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥’ या शब्दांच्या उच्चारणात तुम्हाला खरोखर भूक लागली आहे असे अध्यारुत धरले आहे. बाकी करायला काही नाही म्हणून `चला जाऊन मिसळ खावी. टाईमपास चांगला होईल.’ असे वाटणे म्हणजे खरी भूक नव्हे. स्वतःच्या बुध्दीचे (म्हणजे अहंकाराचे) अस्तित्व जवळ ठेवून `मला परमार्थातील अंतिम सत्य जाणायचे आहे’ असे म्हणणे म्हणजे चाळा म्हणून काहीतरी खावे अशी इच्छा धरणे आहे. ही खरी भूक नव्हे. खऱ्या भूकेत बाकी सर्व गोष्टींचा त्याग असतो. कधीकधी वेळप्रसंगी स्वतःचे शरीर तोडून खावेसे वाटते. अशी जीवघेणी भूक निर्माण करा. बुध्दीला सोडा. अहंकाराचा त्याग करा. मग त्या खऱ्याखुऱ्या भुकेची वेळ राखायला जगन्नाथ धावून येईल यात काही संदेह नाही.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ९ मार्च २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

2 thoughts on “(23+24)/15: Can You create something out of nothing? Guru Does!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s