1/1: Consequences of acting on one’s beliefs

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जयजयस्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या टीकेची सुरुवात गणेश स्तवनाने न करीता निर्गुण परमेश्वराला वंदन करुन केले आहे. यातून त्यांच्या मनातील अद्वैत प्रणालीबद्दलचे अतीव प्रेम दिसून येते. संत साहित्याचे प्रगाढ अभ्यासक श्री शिरीषदादा कवडे महाराज यांनी असे म्हटले आहे की `ज्ञानेश्वरीतील काही ओव्या अशा आहेत कि त्यांमध्ये परमार्थाचे सर्व सार सांगितलेले आहे आणि वरील ओवी त्यापैकील एक आहे.’ अशा अर्थपूर्ण ओवीत माऊली म्हणत आहे `ज्या भगवंतापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, ज्याचे वर्णन करण्यासच वेद निर्माण झाले आहेत, जो प्रत्येक जीवाच्या आत्मरुपात स्थित आहे, ज्याला जाणून घेण्यास स्वतःच्या मनात उठलेल्या भावतरंगांशिवाय पर्याय नाही, अशा ॐकार रुपी भगवंताचा जयजयकार करुन, वंदन असो.’

 

चल अकेला, चल अकेला, चल अकेला

 

भगवान श्री रमण महर्षींची आवडती शिकवण म्हणजे `मी नक्की कोण आहे’ याचा विचार करा. हू ऍम आय? हा प्रश्न विचारा असे ते म्हणायचे. अश्या प्रश्नाने जी काही विचारांची अवर्तने उमटतात त्यांकडे शांतपणे पाहून स्वतःचे आत्मरुप जाणून घ्या असे त्यांचे सांगणे असायचे. एकदा त्यांना विचारण्यात आले की प्रत्येकाची इतकी अमूर्त विचार करायची तयारी नसते, तर मग परमार्थातील ध्येयाची प्राप्ती करण्याचा दुसरा काही उपाय नाही का? तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले की जरी आत्मरुपी देवाला जाणून घ्यायची शक्‍ती वा ओढ साधकाकडे ह्याक्षणी नसली तरी त्याचे सध्याचे सर्व मार्ग याच टप्प्यावर त्याला घेऊन येतील. शेवटी सर्वांना हाच प्रश्न विचारुन आत्मरुपी देव शोधायचा आहे. वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज हेच सांगत आहेत. वरील ओवीतील `जयजयस्वसंवेद्या’ तून ते म्हणत आहेत की आत्मरुपी भगवंताला जाणून घ्यायचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःच्या संवेदनांकडे (तटस्थपणे) लक्ष देणे.

एखादी गोष्ट वा कृती आपण मान्य केली की त्याबरोबर त्याच्या अनुषंगाने आलेल्या सर्व बाबींचा स्वीकार करावाच लागतो. तसे केले नाहीतर आपण ती गोष्ट मान्य केलेली नाही असेच म्हणावे लागते. उदाहरणार्थ, लग्न केल्यावर नवऱ्याला आपल्या बायकोच्या नातेवाईकांचा व पत्‍नीला सासरच्या माणसांचा स्वीकार करावाच लागतो. परीक्षेत चांगले गुण मिळवायला हवेत हे मान्य केल्यावर खूप अभ्यास करणे या गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. गुरुंनी भल्या पहाटे तीन वाजता उठून ध्यान कर असे सांगितल्यावर रात्री वेळच्यावेळी झोपणे भाग पडते, मग त्याकरीता मध्यरात्री सिनेमा बघणे सोडावे लागते इत्यादी. हाच नियम स्वसंवेद्या ह्या शब्दालासुध्दा लागू होतो. एकदा आपण दृढपणे ठरविले की खरोखर आपल्या खऱ्या सुखाची गुरुकिल्ली आपल्यामध्येच दडलेली आहे आणि ती शोधून काढायला हवी. एखाद्या गवताच्या गंजीतील सुई शोधण्यासारखे आपले स्वरुप शोधायला हवे हे एकदा पटले की त्याच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी येतात त्या सर्व आपणास स्वीकाराव्या लागतात. पुढील विवेचनामध्ये हे गृहीत धरले आहे की साधकाला पूर्ण खात्री झालेली आहे की आपल्याच अनंत इच्छा-आकांक्षांच्या जंजाळात आपले स्वातंत्र्य आपण गमावून बसलेलो आहोत. वासनांनी आपले मन इतके आच्छादीत झाले आहे की आपल्या खऱ्या अत्यंत सूक्ष्म अस्तित्वाला आपण हजारो फूट खोल गाडून टाकले आहे. गुरुंनी दिलेल्या मंत्ररुपी कुदळीने आघात करुन स्वरुपावरील सर्व आच्छादनांचा नाश करायची तयारी असलेल्या साधकाने कुठल्या गोष्टींना स्वीकारायचे आहे ते आपण बघू.

पहीली गोष्ट म्हणजे कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहणे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की कुठल्याही गोष्टीचा उपयोग करायचा नाही. असे जर असेल तर सत्संग या शब्दाला काही अर्थच उरणार नाही. परंतु एखाद्या गोष्टीशिवाय आपले काम होणार नाही हा विचार मनात आणणे महापाप आहे अशी समजूत साधकाने करुन घेतलीच पाहीजे. जर कुठल्या बाह्य घटनांवर आपले स्वरुप, आपले ज्ञान, आपली साधना अवलंबून असली तर ती घटना वा व्यक्‍ती साधनेपेक्षा, ज्ञानापेक्षा आणि स्वरुपापेक्षा जास्त महत्वाची ठरते. आणि वरील ओवीत म्हटले आहे की `नमोजी आद्या’. आपल्या स्वरुपातूनच सर्व विश्वाची निर्मिती झाली आहे, मग या विश्वातील कुठलीही गोष्ट वा व्यक्‍ती त्यापेक्षा समर्थ कशी? खरोखर, स्वतःच्या मनातील विचारांकडे तटस्थपणे पहायचे असेल तर, कुणाला काय वाटेल हा विचार मनातून काढून टाकणे जरुरी आहे. `मी हा आहे तसा आहे.’ असे निर्लज्जपणे सांगायची, मान्य करायची आणि त्या मान्य करण्याचे परीणाम भोगायची तयारी असल्याशिवाय आपणास पुढे जाता येणे शक्य नाही. सामाजिक वा नैतिक दृष्ट्या उत्तम मानलेल्या साच्यात स्वतःला घालायचा प्रयत्‍न करणे म्हणजे आत्मरुपी देवाशी प्रतारणा करणे होय. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही समाजात काय वाटेल तसे वागा. बाह्यजगात बंधने पाळून जगताना आपण तसेच आहोत असे स्वतःला फसवू नका असे सांगायचा उद्देश्य आहे. स्वतःशी प्रामाणिक रहायची हिम्मत ठेवा. उदाहरणार्थ, आज प्रवचनाला जायलाच हवे का असा विचार माझ्यामध्ये होताच. मस्त ढगाळ हवा आहे, गुलाबी थंडीत उबदार पाघरुण घेऊन पडून रहावे, कशाला तीस किलोमीटर ड्रायव्हींग करायला हवे? असा विचार गंभीरपणे करीत होतो. शेवटी नको, जावे असा विचार करुन मी प्रवचन रद्द केले नाही. आता अशी वस्तुस्थिती असताना, कुणी माझे कौतुक केले की कसे तुम्ही दर शनिवारी प्रवचन करायला वेळ काढता, तर मी त्याला कितपत लक्ष द्यावे? हा स्वतःशी प्रामाणिकपणा सतत जागृत ठेवायचा असेल तर बाह्य जगातील कुठल्याही गोष्टीला वा घटनेला वा व्यक्‍तीला प्राधान्य देणे सोडा. दुसऱ्या कुणाला त्रास न देता, स्वतःत मग्न रहा.

याचा एक परीणाम म्हणजे आपण स्वतः घेतलेले हे स्वतंत्र्य बाकी सर्वांना देणे होय. जर आपण कुणाला महत्व देत नसू तर का म्हणून आपण अपेक्षा ठेवावी की आपल्याला कुणी महत्व द्यावे? त्यांनापण त्यांच्या आत्मरुपी देवाकडे जायचे आहेच की. म्हणूनच लोकांकडून स्वतःला महत्व मिळावे ही भावना नष्ट होत आहे की नाही यात आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची खूण आहे. गीतेमध्ये `अमानित्व’ हा गुण ज्ञानी माणसाला ओळखायची खूण म्हणून का सांगितला आहे याचे एक कारण स्वसंवेद्या या शब्दात आढळते!

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक साधकाचा मार्ग भिन्न आहे याची जाणीव होणे. व्यक्‍ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. याचा अर्थ असा की प्रत्येक मानवाच्या मनातील भावनांचा गुंता भिन्न आहे. तो सोडवायचा असेल आणि माऊलींनी म्हटल्याप्रमाणे त्याचा सुंदर शेला विणायचा असेल तर प्रत्येक साधकाला स्वतःचे प्रयत्‍न करायला हवेत आणि ते प्रयत्‍न आपल्या मनातील गुंत्यावर अवलंबून हवेत.

इथे कदाचित तुम्ही म्हणाल की एखाद्या गुरुंचे अनेक शिष्य असतात आणि त्या सर्वांना गुरुंनी एकच मंत्र दिलेला असतो. त्या मंत्राचा पाठ करणे हा सर्वांचा एकच मार्ग दिसतो, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? याला उत्तर असे आहे की त्या एकाच मंत्राने प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळी विचारचक्रे घुमू लागतात. भले तुम्ही एकाच खोलीत, एकाच फोटोसमोर बसून एकाच उदबत्तीचा वास घेत एकच मंत्र म्हणत असाल. पण त्या मंत्राच्या उच्चारणाने तुमच्या मनात काय विचार येतात वा कुठले अनुभव येतात हे एक नसते. साधना म्हणजे काय? नुसता गुरुपोदिष्ट मंत्र लाखवेळा म्हणणे म्हणजे साधना नव्हे तर त्या मंत्राच्या उच्चारणाने आपल्या मनात जे विचार येतात त्यांच्याशी शक्य तितक्या प्रामाणिकपणे जीवन जगणे ही खरी साधना आहे. जर विचार भिन्न येत असतील (आणि ते भिन्न असतातच) तर त्यांच्याशी प्रामाणिक असणारे आपले वर्तनही भिन्न हवेच. म्हणजे प्रत्येकाचा मार्ग भिन्न झालाच की. गुरुवाक्याला महावाक्य म्हणतात. याचे कारण असे की त्या वाक्याचा पूर्ण अर्थ आपणास कळला आहे असे कधीही होत नाही. म्हणजे ते असे वाक्य आहे की ज्याला पूर्णविरामच नाही! आता बघा की गुरुंनी उपदेश केलेला मंत्राचा शाब्दीक अर्थावर आपण पूर्णविराम देऊ शकतो पण त्या मंत्राचा एकाग्रतेने उच्चार केल्यावर आपल्या मनात ज्या कुठल्या गोष्टी कळल्या असतील त्यांना अंत आहे का? दररोज नवीन घटनांचा अर्थ उलगडत आहे, जीवन अजून सुंदर बनत आहे. आणि हे सर्व कशाने, तर गुरुमंत्राने. म्हणजे हा सर्व झालेला उलगडा, मिळालेले स्पष्टीकरण गुरुमंत्राचा तुमच्या जीवनात झालेला अर्थ नव्हे काय? म्हणून गुरुमंत्र आपल्या जीवनातले महावाक्य आहे. आपले हे सर्व विवेचन स्वसंवेद्या ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतल्याने त्याचे काय परीणाम होतात हे बघण्यामुळे झाला आहे. पहा या एका शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे ते!

आता अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. कित्येक साधकांना ध्यानातील वा साधनेतील अनुभवांमध्ये अडकण्याची सवय असते. `स्वसंवेद्या’ या शब्दाने त्यांची ही सवय निघून जाण्यास मदत होईल. कारण एक म्हणजे आज आलेले अनुभव आले आणि गेले. त्याचा परत परत विचार करण्यात आत्ता ह्या क्षणी जे होत आहे त्याचे ज्ञान स्वसंवेदनांनी जाणण्यात अडथळा होत आहे. म्हणून असे गुंतणे किती चुकीचे आहे हे लक्षात येतेच. दुसरे म्हणजे अनुभवात गुंतण्यामुळे समजा दुसऱ्या कुणाला आपल्यापेक्षा भव्य, अधिक भावपूर्ण अनुभव आले की आपण स्वतःला त्या साधकापेक्षा कमी समजायचा संभव असतो. परंतु, स्वसंवेद्या ह्या शब्दाने आपले डोळे उघडले आहेत. जाणीव झाली आहे की प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे, मग मार्गावर दिसणारी विहंगम दृष्ये, म्हणजे साधनेतील दिव्य अनुभव, भिन्न असणारच की. जर मी बंगलोरहून मुंबईला कोल्हापूरमार्गे जात आहे तर मला सोलापूर का दिसावे? ते स्टेशन फक्‍त त्या मार्गाने जाणाऱ्या लोकांनाच दिसते. त्याचप्रमाणे आपली साधनेतील प्रगती दुसऱ्याचे अनुभव आपल्याला आले नाहीत म्हणून कमी का मानावी?

तेव्हा विचार करा. आपल्या जीवनात `जयजयस्वसंवेद्या’ ह्या शब्दाला संपूर्ण मान्यता द्या आणि मग वरील सर्व गोष्टी त्याच्या अनुषंगाने आपोआप तुमच्या जीवनात येतीलच. स्वतःला संपूर्ण स्वतंत्र करुन आपल्या मार्गावर आपण एकटेच चालत आहोत याची जाणीव ठेवा. निर्भेळ आनंद मिळण्याची गुरुकिल्ली यातच आहे.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २२ मार्च २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

One Response to 1/1: Consequences of acting on one’s beliefs

  1. कविता म्हणतो आहे:

    खूप सुंदर आणि भक्तीमय ब्लॉग आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: