(271+272)/2: Origin of our activities

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

देखें जेतुलाले कर्म निपजे । तेतुले आदिपुरुषी समर्पिजे ।

तरी परिपूर्ण सहजें । जाहलें जाण ॥ २७१:२ ॥

 

देखें सतासत कर्मीं । हे जे सरसेपण मनोधर्मीं ।

तेचि योगस्थिती उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२:२ ॥

 

काही साधकांच्या मनात परमार्थाच्या मार्गांबद्दल एकदम दृढ कल्पना असतात. भक्‍तियोग आणि बुध्दीयोग आणि ध्यानमार्ग हे वेगवेगळे आहेत असे कल्पून ते स्वतःला एका मार्गात सतत ठेवायचा प्रयत्‍न करीत असतात. खरी गोष्ट अशी आहे की अगदी टोकाला गेले की सर्व मार्ग एक होतात. एका लांब दोरीची दोन्ही टोके बांधलेली असली तर एक पूर्ण वर्तुळ तयार होते. मग त्या वर्तुळाच्या परीघावर एका दिशेने गेले तर भक्‍तीमार्ग आणि दुसऱ्या, वरकरणी विरुध्द दिसणाऱ्या, दिशेने गेले तर ज्ञानमार्ग (वा बुध्दीयोग) असे मानले तर दोन्ही तऱ्हेच्या साधकांना शेवटी बांधलेल्या एकाच गाठीवर यावे लागते हे जसे स्पष्ट आहे त्याचप्रमाणे सर्व साधकांना एकाच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. त्या प्राप्तीमध्ये त्या सर्व मार्गांची एकरुपता आहे. खरे म्हणजे आपल्यापैकी फार थोडे साधक पराकोटीची भक्‍ती वा बुध्दी वापरु शकतात. आपणासारख्या सर्वसामान्य साधकांना कधी मती तर कधी भक्‍ती वापरुनच परमार्थात प्रगती करणे शक्य असते. आपले मन आणि चित्त इतके शुध्द नाही की ते फक्‍त भक्‍ती वा फक्‍त बुध्दी पेलू शकेल. तेव्हा प्रत्यक्ष आचरणात आपण सर्वजण कधी भक्‍तासारखे वर्तन करीतो तर कधी विचारवंताचा पोशाख घालून जीवनात घडलेल्या घटनांतून विवेक जागृत ठेवत असतो. तेव्हा कुठल्याही साधकाने अमुक एक मार्ग आपल्या क्षमतेच्या पलिकडे आहे असे मानू नये वा मी एकाच मार्गाने जाईन असा आग्रह धरु नये. कारण सत्यपरिस्थिती तशी नाही. आपापल्या परीने आपण सर्वजण सर्व मार्गांचा उपयोग करुनच पुढे जात आहोत. स्वयंपाकातील काही पदार्थांमध्ये (उदा. चिवडा) सर्व चवींचे मिश्रण असते. आंबट, गोड, तिखट, खारट सर्व थोडे थोडे उपस्थित असते. असा पदार्थ बहुतेक सर्वांना आवडतो, कारण प्रत्येकाला आपल्याला आवडीची चव त्यात दिसत असते. त्याचप्रमाणे परमार्थातील आपला स्वतःचा मार्ग सर्व मार्गांचे मिश्रण करुन निर्माण झालेला आहे. तुम्हाला एखाद्या चवीचे खास आकर्षण असेल तर ती प्रामुख्याने आढळेल पण बाकी सर्व चवीसुध्दा आपल्या मार्गात आहेतच हे विसरु नका. आणि सर्वात शेवटी आपल्या प्रत्येकाच्या मार्गाचा शेवट `जयजयस्वसंवेद्या’ ह्या रुपातच होणार आहे.

आज निरुपणाला घेतलेल्या ओव्या भगवंतांनी अर्जुनाला बुध्दीयोग स्पष्ट करुन दाखविताना उच्चारलेल्या आहेत. वरकरणी कर्मयोगाचे सार सांगणाऱ्या ह्या ओव्यांतून भगवंतांना असे सांगायचे आहे की “जे काही कर्म तुझ्या हातून घडत आहे ते सर्व तू आदिपुरुषाला समर्पण केलेस तर ते आपोआपच परिपूर्ण झाले असे समज. हा विचार करुन चांगले कर्म आणि वाईट कर्म यातील फरक मनातून समूळ नष्ट झाला तर (मनाची जी स्थिती होते ती) योगमार्गातील साधकांना अपेक्षित असलेली सर्वोत्तम स्थिती तुझ्यात निर्माण झाली आहे (यात संदेह नाही).” एकदा अशी स्थिती निर्माण झाली की मग तू आपोआप बुध्दीयोगाचे सार प्राप्त करुन घेण्याजोगा होशील असे ते पुढे म्हणतात. ज्यांना कर्मयोगाची नैसर्गिक आवड आहे त्यांनी खास लक्षात ठेवण्यासारखे हे विचार आहेत. कुठलाही मार्ग महत्वाचा नसतो तर त्या मार्गाने जे ध्येय प्राप्त होणार असते ते महत्वाचे. कर्मयोगातच गुरफटू नका, आपण उत्तम कर्मयोगी आहोत याच्या आनंदात स्तब्ध होऊ नका. पुढे अजून बुध्दीयोग आहे, परमेश्वराचे मिलन आहे. अनिवार, अनाकलनीय आणि अपार आनंद आहे. ते सर्व मिळवा. परिपूर्ण व्हा.

 

कुठुनि हे कर्म उपजले? आहे का तुम्हां उमजले?

 

कल्पना करा, तुमचा शेजारी दोन महिने गावाला गेला आहे आणि जाताना त्याने आपल्या घरातील एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला सांभाळायला दिली आहे. शेजारधर्म म्हणून तुम्हाला त्या जबाबदारीला नाही म्हणता येत नाही. पण तुम्हाला शेजारी परत येईपर्यंत `समजा आपल्या हातून वस्तूचे नीट संरक्षण झाले नाही तर?’ ही काळजी सतत खात असते. शेवटी जेव्हा आपण ती वस्तू मालकाच्या ताब्यात परत करतो तेव्हा आपणास एका मानसिक तणावापासून सुटका मिळते. उगाच दुसऱ्याची गोष्ट स्वतःकडे सांभाळायला आली की जो तणाव निर्माण होतो तो माहिती असल्याने आपण अशी परिस्थिती यऊ नये असे बघतो. पण खरे बघायला गेले तर अशाच तणावाखाली आपले सर्व आयुष्य व्यतीत होत आहे. का आपण तणावाखाली आहोत? आपल्यापैकी फार थोड्या लोकांना दररोजच्या जेवणाची वा डोक्यावरच्या छप्पराची काळजी आहे. आपण सर्वजण मानवी अस्तित्वाच्या नैसर्गिक मागण्या आता सहज पुऱ्या करु शकतो अशा अवस्थेत आहोत. शरीर सांभाळायची काळजी आपणास नाही. आपल्या काळज्या आता सूक्ष्म झाल्या आहेत. आपल्या हातून घडणारे कर्म चांगले (म्हणजे आपल्या अपेक्षेनुसार) होत आहे का नाही याची काळजी आपल्याला सतत खात आहे. मी चांगला पालक आहे की नाही, चांगला मुलगा आहे की नाही, कंपनीत महत्वाचा भाग आहे की नाही इत्यादी काळजींनी आपणास पोखरुन काढले आहे. परंतु कधी विचार केलात का की आपले म्हणून जे कर्म आपण कवटाळलेले आहे त्याचा उदय कसा आणि कुठे झाला आहे? सर्व गोष्टी आदिपुरुषाने निर्माण केलेल्या आहेत. आपल्या आत्मरुपी स्थित असलेला तो आदिपुरुष म्हणजे वरील उदाहरणातील आपला शेजारी होय. त्याच्याकडची वस्तू, म्हणजे कर्म, आता तू घे असे आपल्याला म्हणून तो निवांत बसलेला आहे. आणि आपली अवस्था काय? आपण या कर्तव्याचे नीट पालन करु का या काळजीत आहोत!! देऊन टाका ते कर्म ज्याचे त्याला आणि व्हा मुक्त स्वतःवर घेतलेल्या बंधनातून.

वरील ओवी वाचल्यानंतर तुम्हाला कदाचित असे वाटले असेल की आदिपुरुषाला समर्पित केल्यावर कर्म परिपूर्ण होते? तुमच्या अपेक्षेनुसार ते पूर्ण झालेसुध्दा नसेल. तुमचा मुलगा वेडावाकडा वागत असेल, नोकरीत तुमची मानहानी झाली असेल वा आई-वडिलांकडून `तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती’ असे बोल ऐकावे लागले असतील. मग अशी कर्मेसुध्दा आदिपुरुषाला अर्पण केल्यावर परिपूर्ण कशी झाली? कारण जे काही घडत असते ते त्याच्या इच्छेने, त्याच्या अपेक्षेनुसार घडत असते आणि त्याची इच्छा तुम्हाला माहिती आहे का? त्याच्या आणि तुमच्या मध्ये तुमच्या अस्तित्वाचा पडदा उभारुन तुम्ही त्या कर्मांचे पडद्यावरील प्रक्षेपण आपले मानत होतात त्याला ह्या आदिपुरुषाने ना कधी महत्व दिलेले आहे ना कधी मंजुरी. आता तुम्ही विचार करायची वेळ आलेली आहे. जे कर्म आपण आपले म्हणतो ते खरोखर आपले आहे का? जर आपले असेल तर त्याची निर्मिती स्वतःच्या इच्छेने व्हायला हवी. तेव्हा आधी विचार करा की आपल्या हातून घडलेले कर्म कुठून उपजले आहे?

कुठल्याही कर्माची सुरुवात कुठे होते? आधी मनात एक विचार येतो की अमुक एक करायला हवे. त्या विचाराचे मूळ कधी दुसऱ्यांच्या शब्दात असते तर कधी आपल्याच बुध्दीत असते. आपले स्वतःचे विचारसुध्दा आपणास मनात काही शब्द निर्माण झाल्यावरच कळतात. चला जेवावे असा विचार तुम्हाला कसा कळला? हे शब्द मनात निर्माण झाले आणि तुम्ही ते ऐकले तेव्हा. (मनातील सगळेच विचार आपण ऐकतोच असे थोडे आहे?!) तेव्हा कुठल्याही कर्माची सुरुवात ऐकलेल्या शब्दात आहे. त्या शब्दांचे मूळ कुठे आहे? त्या शब्दांच्या पलिकडे त्यांना उच्चारणारा कोण आहे? कल्पना करा की आपले अस्तित्व एखाद्या अत्यंत खोल विहीरीसारखे आहे. त्यामध्ये अगदी आपणास माहितीसुध्दा नसलेल्या बुडाशी एक झरा आहे. नित्य विचार त्यातून प्रसवत आहेत. ते विचार शब्दरुपी बुडबुडे होऊन मनाच्या पृष्ठभागावर येतात आणि आपल्याला जाणवितात. पण या सर्वांचे मूळ कुठे असे विचाराल तर माहिती नाही! कुठेतरी खाली असेल बुवा. यापेक्षा तुम्ही अधिक काय सांगू शकाल? ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ, का म्हणून मी माझे विचार याच शब्दांनी प्रगट करीत आहे? शब्द लिहून झाल्यावरच मला कळते की ते बरोबर आहेत की नाही. शिवाय हेच विचार लिहायला अजून हजारो शब्द आहेत. मग हेच का? माहिती नाही. सुचले म्हणून लिहिले. जर उद्या मी याच विषयावर हेच विचार मांडायला बसलो तर भिन्न शब्द बाहेर यायची शक्यता आहेच. मग हेच शब्द आत्ता का सुचले? कुठून सुचले? माहिती नाही. मग लिहिलेले बरोबर आहे की नाही याची जबाबदारी मी स्वतःवर का घेऊ? ज्याने सुचविले त्याची जबाबदारी आहे ती. माझ्या श्रीधर इनामदार ह्या अस्तित्वाला का त्याचा ताण? एकदा ही वस्तुस्थिती लक्षात आली की ताण नाहीसा होतो. अर्थात त्याबरोबरच लोकांनी केलेल्या स्तुतीचे हारसुध्दा नाहीसे होतात. मी आहे तसा तटस्थ होतो. कर्मांमध्ये अजून काही करायला हवे असा आग्रह नाहीसा होतो. एखादे कर्म परिपूर्ण झाले असे आपण केव्हा मानतो तर जेव्हा आपल्या मनातील त्या कर्माला अजून चांगले करायला हवे ही भावना उठत नाही तेव्हा. म्हणजे जेव्हा `अजून काहीतरी करायला हवे बुवा’ असे वाटत नाही तेव्हाच ते कर्म परिपूर्ण होते. एकदा आदिपुरुषाला त्या कर्माचा निर्माता आणि कर्ता म्हणून आपण आपल्याजवळचे पार्सल देऊन टाकले की आपण या भावनेतून मोकळे झालो की नाही? म्हणजे कर्म परिपूर्ण झाले की.

आदिपुरुषाला कर्म समर्पण करणे म्हणजे काय? तर जीवनात आपल्या हातून घडलेल्या कुठल्याही कर्माची सुरुवात, मध्य आणि शेवट ज्या उर्मीने होतो ती उर्मी आपली नाही, आत्मरुपी भगवंताची आहे हे जाणून घेणे. आपला एखादे कर्म आपण करायलाच हवे हा अट्टाहास केव्हा आणि कधी निर्माण झाला? सर्वच आया आपल्या मुलाला एक वाजता जेवण दिलेच पाहिजे असे म्हणत नाहीत. म्हणजे तुमच्या अशा वेळच्यावेळी मुलाला भोजन देण्याचा अट्टाहासाचे मूळ आईपणात नाही. दुसरीकडे आहे. मनात उठलेल्या शब्दांमध्ये आहे. कुणी उच्चारले ते शब्द? द्या त्या वक्त्याला त्याची जबाबदारी. सैनिक अंदाधुंद गोळीबार करतात पण त्याची सर्व जबाबदारी तसा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर येते. त्याचप्रमाणे आपल्या हातून कर्मे घडतात हे खरे पण त्यांची जबाबदारी आपली नाही, आदिपुरुषाची आहे. स्वतःचे कोर्टमार्शल कशाला करविता?!! वा शौर्याची पदके का स्वतःच्या छातीवर मिरविता? दोन्हीकडे दुर्लक्ष करा आणि मनात उत्पन्न झालेल्या सर्व शब्दांमागील शक्‍तीकडे बघा. असे सतत बघणे म्हणजे सर्वोत्तम योगस्थिती आहे असे सर्वजणांनी प्रशंसिले आहे.

कर्मफळांचा त्याग करा असे जे तुम्ही ऐकले आहे ते मग आपोआप घडेल. ज्याप्रमाणे यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेल्या समिधांवरची धूळसुध्दा यज्ञात नष्ट होते (ती वेगळी नष्ट करावी लागत नाही), त्याचप्रमाणे एकदा कर्मेच अर्पण केल्यावर त्यांचे फळ आपणांस कसे मिळेल? गेले की ते त्याच्या जननी (म्हणजे कर्मां) बरोबर. आदिपुरुषाला कर्मे समर्पित करण्यात तुमचे मन सतत अनुसंधानात आपोआपच राहील कारण अर्पण कुणाला करायची आहेत त्या आदिपुरुषाचा विचार नेहमी जवळ आहेच. म्हणून असे कर्म आदिपुरुषाला समर्पण केल्यावर जी मनाची स्थिती निर्माण होते ती सर्व योग्यांनी वाखाणलेली आहे. तेव्हा आता `इदं न मम’ असे म्हणायला लागा आणि व्हा मुक्‍त.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २२ मार्च २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

One Response to (271+272)/2: Origin of our activities

  1. Prasanna Shembekar म्हणतो आहे:

    Apratim ! You are a good teacher !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: