(1512+1513)/18: What it takes to explain Bhagavad Gita

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

ते हे मंत्ररहस्य गीता । मेळवी जो माझिया भक्‍ता ।

अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥ १५१२:१८ ॥

तैसी भक्‍तां गीतेसी । भेटी करी जो आदरेंसी ।

तो देहापाठी मजसी । एकचि होय ॥ १५१३:१८ ॥

भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्याच्या शेवटी भगवंत अर्जुनाला गीतेमधील तत्वज्ञान कुणाला सांगावे याचा उपदेश करतात. ज्या माणसात हे तत्वज्ञान ग्रहण करायची क्षमता आहे त्यालाच तू हे तत्वज्ञान विषद करुन सांग असे त्यांचा सांगण्याचा हेतू आहे. आता इथे कुणी असे विचारेल की भगवंत सर्वांसाठी आहे असे म्हणता आणि त्याच्या प्राप्तीचे हे तत्वज्ञान सर्वांकरीता नाही हे कसे? तर असे बघा, भगवंताला प्राप्त करण्याचे अनंत उपाय आहेत. गीतेमध्ये त्या सर्व उपायांचा उल्लेख आला आहे हे खरे असले तरी तो उल्लेख अत्यंत अमूर्त, बौध्दीक अशा तत्वज्ञानाच्या रुपात आला आहे. सबंध गीतेमध्ये एकाही देवाचे गुणगान नाही, स्तुती नाही. परमार्थातील मार्गांचे हे अमूर्त रुप प्रत्येकाला भावेल असे नाही. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की घरातील बाई एक मोठा मासा बाजारातून आणते आणि त्या एकाच माशाचे घरातील प्रत्येकाच्या पचनशक्‍तीप्रमाणे पदार्थ तयार करुन वाढते. लहान मुलाला व आजारी माणसाला पचायला हलके असे सूप तर कर्त्या माणसाला चमचमीत पुलाव करते त्याचप्रमाणे भगवंतप्राप्तीच्या अनंत मार्गांपैकी आपण आपल्याला सोपा पडेल असाच मार्ग शोधावा. तेव्हा भगवंतांच्या अर्जुनाला सबुरीचा सल्ला देण्यात त्यांच्या सर्वांभूती समभावाशी विसंगती नाही. ते म्हणतात की हे गीताशास्त्र तपोहीनांना सांगू नये. इथे तप म्हणजे एका पायावर उभे राहणे असा अघोरी अर्थ काढू नका. तापसी याचा अर्थ असा माणूस की जो स्वतःच्या शारिरीक सुखाला फार महत्व देत नाही. आपण असे तापसी केव्हाही बनू शकतो हे ध्यानात ठेवा. भगवंत पुढे काय सांगतात? आणि तापसी जरी असला तरी तो गुरुभक्‍तीत ढीला असेल तर त्याच्या वाटेलासुध्दा तू जाऊ नकोस. इथे गुरुभक्‍ती या शब्दाने गांगरुन जाऊ नका. गुरु म्हणजे सद्‌गुरु, जो आपल्या ह्रुदयात स्थित आहे. त्याची भक्‍ती म्हणजे जेव्हा आपणास अचानक अंतर्स्फुती होते त्याप्रमाणे वागण्याची आपली तयारी. कधीकधी अचानक, बुध्दीचा वापर न करीता आपणास एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान आपोआप होते. उदाहरणार्थ, समोरचा खरे बोलतो आहे (वा खोटे बोलतो आहे) हे अचानक जाणविणे, एखाद्या परिस्थितीत कसे वागायला हवे याचे अचानक ज्ञान होणे इत्यादी. हे विचार आपल्या सद्‌गुरुंनीच सुचविले आहेत असे आपण मानावे. त्या विचारांनुसार आयुष्य जगायची स्वतःची तयारी असणे म्हणजे गुरुभक्‍ती होय. आणि तापसू आहे, गुरुभक्‍तीही आहे पण नवीन ऐकण्याची आवड नसेल तर काय उपयोग? सतत स्वतःच्या शोधात असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. माऊली म्हणते की `समुद्र अगाध आहे, खोल आहे हे कोण नाही म्हणत आहे पण म्हणून तिथे पडलेला पाऊस वायाच जातो ना?!!’ याचा अर्थ असा की तापसी असून गुरुभक्‍ती असली तरी ज्यांना आयुष्यात स्वतःचा शोध घ्यावा असे वाटत नाही त्यांना तू टाळ. आणि हे तीन्ही गुण असूनही जो मला नावे ठेवतो त्याला अजिबात माझ्या वक्तव्याबद्दल ज्ञान देऊ नकोस. अहो, जर सांगणाऱ्या माणसाबद्दल आदर नसेल तर त्याच्या मुखातून ऐकलेल्या एखाद्या नवीन गोष्टीवर विश्वास बसेल का? समजा तुमच्या लहान मुलाने परमार्थाचे अंतिम तत्व तुम्हाला सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? त्याच्या शब्दांमध्ये कुठलीही चुक नसताना `मला शहाणपणा शिकवितोस?’ असेच तुम्ही म्हणाल ना. तशीच ही गोष्ट आहे. मग तापसीपणा, गुरुभक्‍ती, नवीन ऐकण्याची हौस आणि माझ्याबद्दल आदर हे चार गुण असलेल्या भक्‍तांना (म्हणजे काय? तर १. स्वतःच्या शारीरीक सुखाची फारशी पर्वा न करीता २. अंतर्स्फूर्तीनुसार जीवन जगत असताना मनात उद्बवलेल्या ३. नवीन विचारांचे जो स्वागत करीत असतो आणि ४. ज्याला भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाबद्दल पराकोटीचा आदर आहे अशा साधकांना) तू गीतेतील तत्वज्ञान जरुर सांग. खरे म्हणजे गीतेचा असा प्रसार करण्यातच सांगण्यातच मानवी जन्माचे सार्थक आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वरील ओव्यांतून ते असे सांगत आहेत की `जो गीतेतील रहस्य भक्‍तांना असे सांगतो की त्यांना अर्भकाला आईच्या स्तनाची ज्याप्रमाणे ओढ असते तेव्हढीच ओढ गीतेबद्दल वाटायला लागते तो देह ठेवल्यानंतर माझ्याशी एकरुप होतो.”

ज्ञानेश्वरीकडे तू अपार निर्मळ, प्रेमळ नजरेने जरा बघ ।

दिसतील ते तत्वज्ञान महासागरातील घनवटलेले हिमनग ॥

आता मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीतो म्हणून वरील ओव्या मला लागू पडत आहेत असे कुणी मानू नये! याचे कारण असे की वरील ओव्यांमध्ये एक मेख आहे. हा जो सांगणारा आहे तो गीतेचे तत्वज्ञान कसे सांगतो? तर `अनन्यजीवना माता बाळका जैसी. तैसी भक्‍तां गीतेसी, भेटी करी जो आदरेसी’. अत्यंत आदराने, स्वतःकडे महत्व न घेता, जो उच्च क्षमतेच्या साधकांची आणि भगवद्गीतेतील रहस्याची कुठलाही आडपडदा न ठेवता (अर्भकाचे मुख आणि आईचे स्तन यांच्यामध्ये काहीतरी असते काय? आणि तसे असले तर बालकाचे पोट भरेल काय?) भेट घालून देतो त्याच्याबद्दल माउलीने वर्णन केले आहे. खरे म्हणजे हे त्यांचे स्वतःचे वर्णन आहे, स्वामी स्वरुपानंदांचे वर्णन आहे, श्री रामकृष्ण परमहंसांचे वर्णन आहे, श्री गोंदवलेकर महाराजांचे वर्णन आहे. हे स्वतः आत्मानंदात मश्गुल असलेल्या अत्यंत दयाळू (कृपासिंधू) असलेल्या गुरुंचे वर्णन आहे. गीतेवर सर्वसाधारणपणे भाष्य करणाऱ्या हरि भक्त परायण (ह.भ.प.) यांचे नाही. माझे तर निश्चित नाही.

याचे कारण असे की वरील वर्णनाप्रमाणे भेट करुन देण्यास वक्त्याला उच्च प्रतीचे साधक ओळखायला यायला हवेत आणि भगवद्गीतेबद्दल अंतर्बाह्य ज्ञान हवे. या दोन्ही गोष्टी जाणल्याशिवाय तो त्यांची भेट कशी घालून देईल? जर मला ग्रीक भाषा माहिती नाही, तर मी ती कुणाला शिकवू शकीन का? तेव्हा भगवान श्रीकृष्णौक्त गीतेचे ज्ञान दुसऱ्यांस देण्याआधी तुम्हा स्वतःला हवे की नाही? आणि स्वतःकडे गुण असल्याशिवाय दुसऱ्यांत ते गुण कसे पाहू शकाल? भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या अंताला हा उपदेश केला आहे कारण आता अर्जुन या दोन्ही गोष्टी जाणतो आहे. तो स्वतः ज्ञानी आहे आणि भगवंताचे तत्वज्ञान त्याला मुखोद्गत आहे. अशावेळी केवळ आंतरीक कृपाळूपणाने तो दुसऱ्यांस उपदेश करणार आहे. त्याला काय स्वतःच्या आत्मानंदात विरुन जाणे अशक्य आहे का? का म्हणून त्याने आपली कदर राखावी? आपल्या दुःखांचे निरसन करावे असे वाटण्याची त्याला कुठलीही आवश्यकता नाही. तरीही केवळ स्वभावानुसार तो गुरु आपल्या संसाररुपी तापाचे निवारण करण्यास धावून येत आहे. कृपासिंधू. खरोखर, दुसरे काय वर्णन करु शकतो आपण? तेव्हा हे लक्षात घ्या, वरील वर्णन केवळ परमहंसी व्यक्‍तीमत्वाचे आहे. ऐऱ्यागैऱ्याचे नाही. मग दुसऱ्या ओवीत `देहापाठी मजसी, एकचि होय’ असे भगवान म्हणत आहे यात नवल काय? अहो, देह असतानासुध्दा त्याच्यात आणि भगवद्गीतेत काही फरक नाही. परंतु देहाच्या बंधनामुळे तो बिचारा मानवासारखा दिसत आहे. दररोज त्याला जेवायला हवे, झोपायला हवे असे दिसत आहे. त्याच्या शारिरीक सुखाची आवड दिसत आहे. परंतु त्याला त्याची जाणीव आहे काय? तो आपला सद्‌गुरुभक्‍तीत व्यग्र आहे. स्वतःच्या देहाला संपूर्ण मोकळे सोडून तो स्वानंदात मोकळा फिरत आहे. पण बाह्य जगाच्या दृष्टीतून त्याच्यात आणि भगवंतात फरक आहे. असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीरामचंद्र सीतेच्या वियोगात वेड्यासारखे हिंडत होते तेव्हा पार्वतीदेवी भगवान शंकरांना म्हणाली की `तुम्ही ज्याला आपले आराध्य दैवत मानता, तो अगदी सर्वसाधारण मानवासारखा दुःखाने व्याकुळ कसा झाला?’ यावर श्रीशंकरांनी तीला रामचंद्रांची परीक्षा घेण्यास सीतेचे रुप घ्यायला सांगितले. अचानक समोर सीता प्रगट झाली हे पाहून रामचंद्रांनी देवीला वंदन केले आणि आपले रुदन चालूच ठेवले असे म्हणतात! त्यांनी मानवी अवतार घेतला तेव्हाच त्यांच्या वागण्याची मर्यादा आखली गेलेली होती. ती त्यांना पाळावीच लागली. खरोखर, देहाच्या बंधनाने आपले वागणे ठरत असते. एकदा हे देहाचे बंधन सुटले की काय उरते? कुठल्याही संकुचित बंधनांशिवाय असलेले आपले अस्तित्व. त्याची जाणीव ज्याला जिवंतपणी आहे तो त्यातच विलीन होणार. भगवंताशी एकरुप होणार. दुसरा पर्याय आहे का?!!

पण मग आपल्याकरीता काय उरते? शेवटी यात मला काय मिळणार हा प्रश्न प्रत्येकाला विचारायचा आहे. असे खुशाल विचारा की, अनेक थोर संत या जगात जन्माला आले आणि त्यांचे कार्य करुन भगवंतात विलीन झाले हे ठीक आहे पण मला माझे आयुष्य जगायचे आहे त्यात काय फरक पडला? फरक पडला. कारण असे संत देह असतानाही भगवंताच्या सान्निध्यातच होते. देहाच्या बंधनांने ते बांधले गेले असले तरी तो बिचारा देह काही दिवसाचे चोवीस तास मागण्या करीत नाही. त्याला तुम्ही स्वच्छ ठेवले, खायला-प्यायला दिले की तो खुश असतो. मग आपण काहीही करायला मोकळे असतो की नाही? अशा मोकळ्या क्षणी संतांनी जी कृती केली ती भगवंतांची कृती होय असे मानण्यास काय हरकत आहे? आणि त्यातील ज्या काही मोकळ्या क्षणी त्यांना स्वतःला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होती त्यावेळचे त्यांचे कार्य देवाच्या अजूनही जवळ आहे. त्यामुळे संतांचे उपदेशपर भाष्य म्हणजे ते देहरुपात असताना भगवंतांची कृती आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हरिपाठ, निरनिराळे अभंग ह्या कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आहेत, श्री विठ्ठलाच्या आहेत. संतांना भगवंताचे जे अस्तित्व जाणविले ते त्यांनी त्यांच्या भक्‍तीने थंड करुन गोठविले आहे आणि आपल्यासमोर ठेवले आहे. तत्वज्ञानाच्या अथांग महासागरात मनमुराद भ्रमण करीताना त्यांना जिथेजिथे भगवंताचा साक्षात्कार झाला त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी भावपूर्ण नमस्कार केला. त्यायोगे जी साहित्यकृती निर्माण झाली आहे ती जणू या समुद्रातील त्यांनी निर्माण केलेले हिमनग आहेत. आपली दृष्टी इतकी पारदर्शक नाही की तत्वज्ञानाचा सागर आपणास दिसेल. पण हे गोठलेले हिमनग आपणास गोचर होतात. आणि हिमनगाप्रमाणेच ते जितके दिसतात त्यापेक्षा कितीतरीपट त्यांची व्याप्ती पाण्यात बुडालेली असते. म्हणजे, संतांच्या प्रत्येक उक्‍तीचा भावार्थ प्रचंड गहन असतो. तो भावार्थ प्राशन करायचा असेल, हिमनगातील पाणी प्यायचे असेल, अमृतरसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या भक्‍तीने, तापसी वृत्तीने आपण ते वितळविले पाहिजेत! तुमच्या जीवनात ज्ञानेश्वरीचा रस बघायचा असेल तर ऐका माउलींची भगवद्गीतेवरील प्रवचने, वाचा ज्ञानेश्वरी. करा त्या शब्दांवर विश्वास आणि द्या झोकून आपणास त्या अर्थानुसार वर्तन करण्यात. मग आपोआप तुम्हाला ज्ञानेश्वरीचे सार कळेल, गीतामंत्ररहस्याचा उलगडा होईल.

ज्ञानेश्वर आणि भगवान श्रीकृष्ण यांत काही फरक नाही. त्यांची भगवंताच्या जाणीवेत झालेली कृती आणि ते यांच्यात फरक नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता यांत भेदभाव नाही. ज्ञानेश्वरी वाचून मनात जी आवर्तने उठतात त्यांकडे लक्ष द्या. स्वतःला झालेल्या बोधाचे जीवनात आचरण करीता येईल असे छोटे छोटे तुकडे करा आणि आणा आचरणात तो बोधाचा एक छोटासा तुकडा. जो आपल्या जीवनात आमूलाग्र क्रांती आणण्याचा अट्टाहास न करीता छोटे छोटे बदल शांतपणे घडवून आणतो त्याची अध्यात्मात फार पटापट प्रगती होते. गुरुंचा उपदेश स्वतःच्या जीवनात कसा आणावा ही एक कलाच आहे. शाब्दीक अर्थात गुरफटून जाणाऱ्यांना ही कला जमणार नाही. भाव जागृत ठेवा. भावार्थ बघा. का म्हणून आपण ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा फक्‍त शाब्दीक अर्थ जाणून घेण्यात समाधान मानत नाही? आपल्या स्वतःच्या बुध्दीचे प्रदर्शन व्हावे म्हणून आपण हा शाब्दीक अर्थाच्या पलीकडे जाण्याचा उपचार करीत नाही. आपण असे करतो कारण भावार्थ जाणण्यातच खरी प्रगती आहे. आणि भावार्थ जाणल्यानंतर आपल्या जीवनात त्या भावार्थाचा उपयोग आणण्यातच ज्ञानेश्वरी ओवीरुपी हिमनगातून आपणास जीवन (म्हणजे जल) मिळणार आहे. चला त्या अमृताचे प्राशन करुया आणि स्वतःच्या कोमेजलेल्या अस्तित्वात परत नवीन टवटवी आणूया.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २९ मार्च २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

2 Responses to (1512+1513)/18: What it takes to explain Bhagavad Gita

 1. chinmay kulkarni म्हणतो आहे:

  chhan blog aahe. ekach gosht lihito
  ‘harer naam harer naam harer naam kevalam |
  kaalaayu naastu eva naastu eva naastu eva gatir anyatha ||
  mhanaje aajachya kaliyugaat harichyaa naamaashivaay kuthalaahi paryaayaat gati naahi.

  http://gandharvablog.blogspot.com

 2. Shreedhar म्हणतो आहे:

  This understanding of spiritual quest is too one dimensional and incorrect. How would you explain the existence of Bhagavan Sri Raman MaharshI, the great sages J. Krishnamurthy and Sri Nisargadaata Maharaj with your philosophy?

  As they say in science, one single observation may call for a completely new theory. Here are three obvious examples of great saints in your kaliyug who never chanted name of God and realised the ultimate goal. At best, you can say that taking name of God appeals to you. Can’t say that it is the ONLY way.

  This fanatic way of adhering to one’s own philosophy is for children. Grow up.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: