(49+50)/5: Don’t stop till your ego drops!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

दीपाचेनि प्रकाशे । गृहींचे व्यापार जैसे ।

देहीं कर्मजात तैसे । योगयुक्‍ता ॥ ४९:५ ॥

तो कर्मे करी सकळें । परि कर्मबंधा नाकळे ।

जैसे न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५०:५ ॥

आज निरुपणाला घेतलेल्या दोन ओव्या पाचव्या अध्यायात योगयुक्‍त मानवाचे दैनंदिन वर्तन कसे असते याचे वर्णन करणाऱ्या ओव्यांपैकी आहेत. जो साधक आत्मानुसंधानात निमग्न असतो त्याला स्वतःच्या देहाची फारशी पर्वा नसते. स्वतःच्या मुखातून उद्भव पावलेल्या शब्दांवर वा आपल्या कर्मेंद्रीयांतर्फे घडणाऱ्या कृतींवर तो मालकीहक्क गाजवित नाही. कल्पना करा की तुम्ही स्वतःच्या तंद्रीत चालत असताना तुमचा पाय एका मुंगीवर पडता पडता वाचला म्हणून ती मुंगी तुम्हाला धन्यवाद देऊ लागली तर तुमची काय अवस्था होईल? तुम्ही प्रामाणिक असाल तर सत्कर्माचे श्रेय न घेता कबूल कराल की `बाई मुंगे, मला तुझे अस्तित्वदेखील माहिती नव्हते मग तुला मी वाचविले असे मी कसे म्हणू?’ अगदी तशीच अवस्था ज्या साधकाचे सर्व लक्ष आत्मानंदाचा आस्वाद घेण्यात गुंतले आहे त्याची होते. माउली म्हणत आहे की `ज्याप्रमाणे घरातील एका कोपऱ्यात दिवा लावलेला असतो आणि त्याच्या उजेडाच्या जोरावर घरात निरनिराळे व्यापार चालू असतात पण त्याचे श्रेय दिवा स्वतःकडे घेत नाही. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वाच्या आनंदात गर्क असणाऱ्या साधकाकडून नित्यनैमित्तिक कर्मे घडत असतात. ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर सतत पाण्याचा शिडकावा होत असूनदेखील ते ओले होत नाही (पाण्याशी संबंध जोडत नाही) त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनांप्रमाणे कर्मे करुनदेखील योगयुक्‍त साधक त्या कर्मांच्या बंधनांना सापडत नाही.’

रहा निरंतर साधनेत मस्त । नका थांबवू कधी कष्ट ।

थांबतो तो अल्पसंतुष्ट । जो स्वरुपी गुंग तोची संत ॥

परमार्थातील बोध स्पष्ट करण्यासाठी संतांनी दिलेल्या उदाहरणांमध्ये काही सर्वमान्य आहेत असे आढळते. स्वतःच्या अनुसंधानात राहून जगात सर्वांशी समभावाने वर्तन करणे या उच्च साधकांच्या गुणाला स्पष्ट करण्यासाठी काही ठराविक उदाहरणे देतात. अशा साधकाचे वागणे १. ज्याप्रमाणे वृक्ष लावणी करण्याऱ्याला सावली व लाकूडतोड्याला सावली नाही असा भेदभाव करीत नाही, किंवा २. ज्याप्रमाणे नदी मी गाईंची तृषा हरण करीन पण वाघाची करणार नाही असे म्हणत नाही वा ३. दिनकर मी फक्‍त संतांना उजेड दाखविन आणि दुष्टांना दाखविणार नाही असे म्हणत नाही असे असते असे सांगितलेले आढळून येते. त्याचप्रमाणे माउलींच्या वरील ओव्यांमधील योगयुक्‍ताचे वर्णन करणारी घरातील दिपाची उपमा व कमळपत्राची उपमा सर्वमान्य आहे. याच दीपाची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायात अज्ञानी लोकांचे वर्णन करण्यास दिलेली आहे ती मात्र केवळ माऊलींच्या दिव्य प्रतिभेलाच दिसलेली आहे. तेराव्या अध्यायातील ७२० ते ७२२ ओव्यांमध्ये महाराज म्हणतात ` ज्याप्रमाणे थोडासा उजेड देऊन लगेच स्वतः गरम होतो (म्हणजे अहंकार), त्याची ज्योत थोडीशी असली तरी सर्व घराला आग लावायचे सामर्थ्य त्याच्यात असते (दुसऱ्यांच्या जीवनात गोंधळ करणारा), तो कापूसाची वात नष्ट करतो (गुण खातो), तूप जाळतो (स्नेह संपवितो), जरा पाणी शिंपडले तर तडतड आवाज करतो (योग्य उपदेशाला उलट उत्तर देतो) आणि शितल वारा आला तर प्राणच सांडतो (ज्यांच्या सहवासाने आत्मरुप प्राप्त होईल अशा सत्संगाला तो पूर्ण डावलतो) अशा दीपासारखे ज्याचे ज्ञान आहे त्याला अज्ञानी समज!! इतक्या सुंदर तऱ्हेने दिलेली दीपाच्या अवगुणांची ही उपमा बाकी कुठेही आढळत नाही. असो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. जेव्हा वक्‍ता एखादे उदाहरण देत असतो तेव्हा त्या उदाहरणात आपण फार गुंतायचे नसते. कारण उदाहरणाला वापरलेल्या रुपकात सांगितलेल्या गुण वा अवगुणांव्यतिरिक्‍त अजून अनेक गुण असतात. संस्कृतमध्ये ह्या परिस्थितीचे वर्णन करणारा शब्द आहे. तो म्हणजे `एकदेशी’. कुठलेही उदाहरण एकदेशी असते. त्यातील एकाच गुणाकडे तेव्हा लक्ष द्यायचे असते. आता दीपाच्या उजेड देण्याच्या गुणाला माउलींनी प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे तो गरम होतो, त्याची ज्योत जवळच्या पडद्याला लागली तर घराला आग लागते इत्यादी अवगुणांकडे आपण सध्या दुर्लक्ष करायचे आहे. स्वतःला बुध्दीवादी समजणाऱ्या बहुतांशी लोकांचे वादविवाद उदाहरणांतील एकदेशीयता ध्यानात न घेतल्याने होत असतात!

परत मूळ मुद्याकडे वळू. तेव्हा दिपाच्या तटस्थतेबद्दल आपण आज विचार केला पाहिजे. त्याच्या बाकीच्या गुणांबद्दल सध्या आपणास रस नाही. बघा योगी कसा असतो. त्याचे लक्ष स्वरुपानुसंधानात एवढे रमलेले आहे की त्याच्या देहाने केलेल्या कर्मांची त्याला पर्वा नाही. कोणी त्याचा महान मानव म्हणून गौरव केला काय वा त्याच्या कुटुंबियांनी घरात का लक्ष घालत नाहीस म्हणून निंदा केली काय, त्याला काही फरक पडत नाही. या दोन्ही गोष्टींमागे असलेला देवाचा हात त्याला सतत दिसत असतो. जे काही होत आहे ते सर्व, अगदी कुठलाही अपवाद न ठेवता सर्व गोष्टी अगदी बरोबर होत आहे अशी त्याची पूर्ण खात्री झालेली असते. ज्या लोकांनी `दिल चाहता है’ हा चित्रपट बघितला आहे त्यांच्या करीता मला आवडलेला अमीर खानचा डायलॉग सांगतो. चित्रपटाच्या शेवटी अक्षय खन्ना दवाखान्यात बऱ्याच काळाने अमीर खानला भेटतो आणि म्हणतो `तू आहे तसाच आहेस. काही बदलला नाहीस.’ तेव्हा त्याला उत्तर मिळते `यु कान्ट इंप्रूव्ह ऑन परफेक्शन!’ जे परफेक्ट आहे ते अजून चांगले कसे होईल? योगी माणूस जेव्हा जगाकडे बघतो तेव्हा त्याला सर्व गोष्टींत परफेक्शन दिसत असते. अजून काही करायला हवे असे त्याला वाटण्याचा संभवच नसतो. त्यामुळे तो अगदी तटस्थ राहू शकतो. त्याच्या मनाची तटस्थता हे सुध्दा एक बाह्य अंग आहे हे लक्षात घ्या. स्वतःमध्ये तटस्थता मुरवण्याआधी योगी लोकांच्या तटस्थतेचे कारण काय याचा विचार करा. काही करायला नको असे जेव्हा आपणास मनापासून वाटते तेव्हा जसे आपण संपूर्णपणे निष्क्रिय होतो, तशी दिपाची तटस्थता आहे. माझे काम उजेड देण्याचे आहे या गोष्टीची जाणीव त्याला इतकी भिनलेली आहे की अजून पुढे त्या उजेडाचा सदुपयोग होत आहे की नाही याची पर्वा त्याला नसते. आपल्या मनातही अशी तटस्थता वारंवार येत असते, पण आपणच तीला फार महत्व देत नाही.

मला स्वानुभवाने हे माहिती आहे. जेव्हा जेव्हा मी केस कापण्यास न्हाव्याकडे जातो तेव्हा दरवेळी त्याच्या समोरच्या खुर्चीत बसल्यावर एक वेगळीच शांतता मनात येते! आता पुढे दहा एक मिनिटे मला काहीही करायचे नाही, नुसते बसायचे आहे बाकी सर्व त्या न्हाव्याच्या हातात आहे याची इतकी खोल जाणीव मनाला झालेली असते की ते शांत होऊन दहा मिनिटे आता काय करायला हवे ह्या चिंतेतून मुक्‍तता पावते व एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. मला माहिती नाही की तुमच्यापैकी कितीजणांना हा अनुभव आला आहे. पण मला दरवेळी हा येतो. मग त्या सलूनमध्ये चालू असलेल्या कुठल्यातरी भयानक गाण्यांमध्येसुध्दा रस वाटायला लागतो! इथे आपण फक्‍त दहा मिनिटे राहणार आहोत, इथे माझे काम त्या न्हाव्यासमोर बसणे एवढेच आहे, नंतर त्याच्या दुकानाशी माझा काही संबंध नाही हे इतके पटलेले असते की आजूबाजूला काय चालले आहे हे लक्षात आले तरी मनाची शांति ढळत नाही. अगदी त्याचप्रमाणे योगी स्वतःला भगवंतासमोर बसवून आपण निष्क्रिय होतात. जे सर्व होत आहे ते सर्व त्याच्या हातात आहे. आपण फक्‍त समोर बसायचे आहे ही जाणीव त्यांच्या मनात इतकी खोलवर रुजलेली असते की त्यांचे मन अगदी शांत आणि आनंदमय होते. मग आजूबाजूला जे काय होत आहे त्यात त्यांच्या देहाचा सहभाग असला तरी त्यांच्या मनाचा समतोल ढळत नाही. अशी योग्यांची अवस्था असते. तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे? मग चला केस कापायला भगवंताकडे. आयुष्यभर वाढवलेली अहंकाराची लव आता इतकी मोठी झाली आहे की त्याने आपले स्वरुप संपूर्ण झाकले गेले आहे. अत्यंत चिवट आणि जलद वाढ असणारी ही लव काढण्याकरीता लागणारे साहित्य जवळ असणारे एक भगवंताचेच दुकान आहे. त्यात संतमंडळी काम करीत आहेत. त्यांच्याकडेच एवढे कौशल्य आहे की ते आपल्या अहंकाराला संपूर्ण काढून आतील स्वरुप आपणांस दाखवतील. जन्मजात अहंकाराचा नायनाट करण्यास हा एकच पर्याय आपणापुढे आहे. बसा संतांसमोर आणि व्हा शरणागत. असे केलेत तर तुमच्यात आणि योगीलोकांत काही फरक नाही.

वरील विवेचन नीट जाणून घ्या. मग तुमच्यामध्ये जोपर्यंत आयुष्यात संपूर्ण निष्क्रियता येत नाही, तटस्थता जाणवित नाही तोपर्यंत आपली साधना आपण चालू ठेवली पाहिजे ही जाणीव उत्पन्न होईल. का म्हणून आपण साधनेत चांगले अनुभव आले म्हणून आनंदित होऊन परत परत त्यांच्या पुनरावृत्तीची वाट बघावी? ही अपेक्षा चुकीची आहे. बघायचेच असेल तर तुम्ही बघा की स्वतःची तटस्थता वाढत आहे का. दररोजच्या जीवनात मनाला आनंदित करणाऱ्या घटनांनी किती हुरळता आणि दुःखदायक गोष्टींनी किती खचून जाता याचा विचार करा. जर तुमच्या मनाची घडाळ्यातील लोलकासारखी दोलायमान अवस्था असेल तर साधना चालूच ठेवली पाहिजे. चावी संपल्यावर लोलक पूर्ण थांबतो तसे आपले मन स्तब्ध होत नाही तोपर्यंत साधना चालूच ठेवली पाहिजे. असे उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवा. बाकी सर्व ध्येये अल्पसंतुष्ट माणसांची आहेत. त्यात आपल्याला गुंतायचे नाही. आपल्या मार्गावर स्वतःला सतत चालत ठेवायचे आहे हे ध्यानात ठेवा. एकदा ही खात्री झाली की मग अजून करायचे राहिले काय?

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक १९ एप्रिल २००८.)

Advertisements

One Response to (49+50)/5: Don’t stop till your ego drops!

 1. Uday म्हणतो आहे:

  Hi,

  This is awesome…

  I would like to have your writing in Book format.
  Is it available in book format or in future could you publish them ?
  Please inform me if you have any such plan..

  Thanks,
  — Uday

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: