(1+2+19)/9: You always had what you want

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

तरी अवधान एकले दीजे । आणि सर्वसुखासि पात्र होईजे ।

हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥ १:९ ॥

परी प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी ।

देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २: ९ ॥

म्हणऊनि मज लेकुरवाचेनि बोलें । तुमचे कृपाळुपण निदैले ।

ते चेईले ऐसे जी जाणविले । यालागी बोलिलो मी ॥ १९:९ ॥

श्री ज्ञानेश्वरीतील कुठल्याही एका ओवीचा संपूर्ण अर्थ जाणून घेणे शक्य नाही असे संतमंडळी आपणास बजावितात. शहाण्या माणसाने कधीही असे म्हणू नये की मला ज्ञानेश्वरी समजली. परंतु याचा अर्थ असा नव्हे की ज्ञानेश्वरीतील ओव्या अगम्य आहेत. कुठल्याही वेळेला आपण ज्ञानेश्वरी वाचली तर ओव्यांचा अर्थ आपणास जाणवितोच. आणि प्रज्ञेला गोचर झालेला अर्थ अगदी बरोबर आहे ह्याबद्दल स्वतःच्या जीवनातील घटनांवरुन आपली पूर्ण खात्री झालेली असते. अशावेळी असे वाटण्याची शक्यता असते की अमुक एका ओवीचा अर्थ आता मला कळला. तो अर्थ किती बरोबर आहे हे स्वसंवेदनांनी जाणविल्याने आपली ज्ञानेश्वरीवरील प्रीती अजून दृढ, अजून खोल होते व आपण नित्यनैमित्तिक ज्ञानेश्वरी वाचायचीच असा जणू पणच करतो. परंतु काही काळाने असे लक्षात येते की जसजशी आपली विचारशक्‍ती प्रगल्भ होत आहे, अनुभवविश्व व्यापक होत आहे तसतसा ओव्यांचा अर्थ बदलत चालला आहे. पूर्वीचा अर्थ चुकीचा नव्हता हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा अजून अधिक खरा अर्थ आपणास आता सापडला आहे हे ध्यानात यायला लागते. मग श्रीसंत नामदेव महाराजांच्या `ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओवी अनुभवावी ॥’ या उक्‍तीची सत्यता जाणवू लागते. या विवेचनाचा अर्थ असा की ओव्यांचा अर्थ कळला असे म्हणू नये हे जरी खरे असले तरी आज जाणविलेला अर्थ आपणाकरीता बरोबर आहे हा विश्वाससुध्दा आपण स्वतःबरोबर ठेवावा. असा विश्वास जवळ नसेल तर पुढील प्रगती कशी होणार? फक्‍त आपल्या आजच्या या सार्थ विश्वासाचा उद्या एक गंड तयार होत नाही ना याकडे जागरुकतेने बघायला शिकणे जरुरी आहे. नाहीतर उद्या जेव्हा अधिक सुंदर, अधिक व्यापक अर्थ प्रगट होईल तेव्हा आपले त्याकडे (आपल्या पूर्वग्रहांमुळे) दुर्लक्ष होईल. असे करायचे नाही हे आपण शिकले पाहीजे. `ठिक आहे, काही काळापूर्वी कळलेला अर्थ बरोबर होताच परंतु आज लक्षात आलेला अर्थही तितकाच बरोबर आहे’ अशी मनाची ठेवण ठेवण्याचा प्रयत्‍न जो साधक सतत करतो त्या साधकावर ज्ञानेश्वरी प्रसन्न होऊन आपले अंतरंग दाखवायला लागते यात संदेह नाही. याउलट जो साधक काल मला (वा माझ्या सद्‌गुरुंना, वा कुणा दुसऱ्या अधिकारी व्यक्‍तीला) कळलेलाच अर्थ बरोबर आहे हा पूर्वग्रह ठेवून ज्ञानेश्वरी वाचतो त्याला अधिक खोल अर्थ समजणे कसे शक्य आहे?

ही गोष्ट आज सांगायचे कारण म्हणजे काही काळापूर्वी नवव्या अध्यायाच्या पहिल्या ओवीवर निरुपण झाले होते. परंतु परवा नववा अध्याय वाचताना एक नवीनच अर्थ समोर प्रगट झाला. या ओवीबद्दल आधी मी असे म्हटले होते की आपल्या पहिल्या ओवीतील प्रतिज्ञावचनाने संतमंडळींचा अपमान होत तर नाही ना या शंकेने श्री ज्ञानेश्वर महाराज पुढच्या अनेक ओवींत त्यांची क्षमा मागतात. परंतु आपण हे ध्यानात ठेवायचे आहे की म्हणून त्यांनी आपली पहिली ओवी बदलली नाही. तेव्हा ती सत्यच आहे. परंतु आता दृष्टीपत्त्यास आलेला अर्थ याहून खोल आहे. आता असे दिसून आले की ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढील सतरा ओव्याही खऱ्या आहेत. केवळ कुणाचा अपमान होईल म्हणून त्या सांगितल्या नाहीत तर आपल्या पहिल्या ओवीतील खरा अर्थ प्रगट करण्यासाठी त्यांनी त्या सांगितल्या आहेत. तेव्हा आज मी नवा जाणविलेला अर्थ आपणापुढे माडण्याचा प्रयास करणार आहे. अजून पुढे काय दिसेल ते स्वीकारायची तयारी ठेवून हा प्रयत्‍न चालला आहे!

प्रथमतः ओव्यांचा शाब्दीक अर्थ जाणून घेऊ. माउली म्हणत आहे: तुम्ही फक्‍त माझ्या सांगण्याकडे नीट लक्ष दिलेत तर तुम्हाला सर्वसुखाची प्राप्ती होईल हे मी उघडपणे प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे. परंतु ह्या बोलण्यात माझी प्रौढी मी मिरवित नाही तर तुम्हा सर्वज्ञ लोकांना `माझे बोलणे ऐका’ ही एक केवळ जवळीकीच्या नात्याने केलेली विनंती आहे. कारण माझ्या बोलण्याच्या निमित्ताने तुमचे सध्या निद्रित अवस्थेत असलेले खरे रुप जागृत होणार आहे याची जाणीव झाल्याने मी असे शब्द उद्गारले.

आहोत आपण सर्व गर्भश्रीमंत । पण नसे ह्याची जाणीव मनात ।

चला व्हा आता उत्तिष्ठ, जागृत । आणि भोगा जन्मजात संपत्तीस ॥

कल्पना करा की एक राजघराणे पिढ्यानपिढ्या राज्य करीत आहे. पूर्वापार चालत आलेल्या राज्यात पुढची पिढी अजून भर घालत आहे आणि आता आपल्या भरभराटीच्या अगदी परमोच्च अवस्थेत सध्याचा राजा सुखाने राज्य करीत आहे. अचानक त्याच्या मनात असा विचार येतो की आपल्याकडे एका ठराविक प्रकारचा मुकुट असता तर किती बरे झाले असते. चौकशी केल्यावर त्याच्या लक्षात येते की त्याच्या मनाप्रमाणे कारागिरी करणारे सोनार आता हयात नाहीत. काळावशात त्यांची खास कारागिरी (जी त्यांनी गुप्त ठेवली होती) नष्ट पावली आहे. आता त्या पध्दतीचा मुकुट तयार होणे शक्य नाही. ही वार्ता कळल्यावर राजाला काय करावे कळेना. बाकी सर्व सुखे हात जोडून समोर असताना त्याला आपल्याकडे नसलेल्या मुकुटाचे ध्यान लागून तो बिचारा व्याकूळ झाला. त्याची ती अवस्था बघून त्याच्या प्रधानमंत्र्याने सर्व खजिना नीट ढुंडाळला आणि त्याच्या लक्षात आले की राजाच्या पूर्वजांपैकी एकाने असा मुकुट तयार करुन घेतला होता. त्या गोष्टीचे विस्मरण सर्वांना झाले होते. मुकुटाला सुंदर झळाळी करुन प्रधानमंत्र्याने जेव्हा तो मुकुट राजाला सादर केला तेव्हा त्याचे सर्व दुःख क्षणात पळून गेले. त्याने मंत्र्याचा खूप सत्कार केला तेव्हा तो चतुर मंत्री म्हणाला `महाराज, मी काय केले? मी तुमचीच वस्तू तुम्हाला परत दाखविली आहे. तुम्हाला विस्मरण झाले होते म्हणून काय झाले? सत्य परिस्थिती बदलत नाही की मी काहीही निर्माण केलेले नाही. जे आहे तेच दाखविले. तेव्हा माझा सत्कार नको.’

राजाने तरीही मंत्र्याचा सन्मान केला असणारच यात शंका नाही. अगदी हीच गोष्ट आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांतून महाराज सांगत आहेत असे वाटते. ज्या परिपूर्ण शांतिसाठी, अखंड सुखासाठी आपण धडपडत आहोत ती शांति, ते सुख आता कुठे मिळत नाही असे आपले सर्व सहकारी, मित्रमंडळी सांगत आहेत. या कलियुगात कुणाला शांति मिळते? सर्व कुठल्याना कुठल्या दुःखात आहेतच. थोडक्यात समाधान मिळण्याचा काळ आता गेला असे आपणास आपले मन सांगते की नाही? मग अत्यंत उद्विग्न अवस्थेत असताना आपणासमोर श्री ज्ञानेश्वर महाराज येतात आणि त्या सर्वसुखाची प्राप्ती करवून देईन असे उघडपणे वचन देतात. आपली अवस्था वरील गोष्टीतील राजासारखीच आहे. परंतु त्यातील चतुर मंत्र्याप्रमाणेच माउलींना जाणीव आहे की त्यांनी काय केले आहे? आपल्यामध्येच सुप्त अवस्थेत असलेल्या सुखाला बाहेर व्यक्‍त व्हायला वाव दिला आहे एवढेच. त्यांनी ते सुख निर्माण केले आहे का? नाही. वस्तुस्थिती अशी आहे की आपण आत्ताच या क्षणी, कुठलाही नवा उपाय न करीता सुखी आहोत. समजा एखाद्या गरीब माणसाला झोपेत उचलून झोपडीतून राजवाड्यात नेऊन ठेवले तरी त्याच्या मनातील राजवाड्यात झोपण्याची इच्छा पुरी झाली असे तो केव्हा म्हणेल? जागे झाल्यावरच. जोपर्यंत तो जागा होत नाही तोपर्यंत त्याच्या आर्ततेची शांति होत नाही. शेजारच्या माणसाने जागा केल्यावर त्या माणसाला धन्यवाद दिले तर त्या सद्‌गृहस्थाची जशी अवस्था होईल तशी अवस्था सर्व संतांची होते हे ध्यानात घ्या. त्यांना पूर्ण जाणीव असते की त्यांनी फक्‍त झोपी गेलेल्याला जागे केले आहे. आपल्या सच्चिदानंदरुपी अस्तित्वाचे निर्माता ते नव्हेत. ते अस्तित्व स्वयंभू आहे, आपोआप निर्माण झालेले आहे. आपल्या ह्या जाणीवेतच ते अत्यंत नम्र होतात व सांगतात की `प्रौढी न बोले हो जी.’

कुठल्याही वस्तूचे मोल संसारातील प्रगतीमध्ये करायची आपली सवय म्हणजे आपली प्रगाढ निद्रा आहे. आपली व्यावहारिक जगात रमण्याची ही जी वृत्ती आहे ती म्हणजे आपल्या डोळ्याला जणू एक झापडच बांधले आहे. `अमुक एक मोठे संत होऊन गेले हे खरे पण शेवटपर्यंत जेवायला दोन घास मिळतील का नाही याची त्यांना भ्रांतीच हो.’ किंवा `ते थोर होते पण त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले?’ इत्यादी सर्व असा विचार आपण करतो की नाही हे सांगा. असेच विचार आपल्या मनात बाकी सर्वसामान्य माणसांबद्दलही येतात. म्हणजे काय, तर संतांचे मोजमापसुध्दा आपण सर्वसामान्यांसारखेच करतो. कुठल्याही घटनेला व्यावहारिक निकष लावल्याशिवाय ती कळणार कशी ही आपल्या मनात शंका असते. खरे आहे, व्यावहारिक निकषांचा एक मोठा फायदा म्हणजे आपण ते चारचौघांना सांगू शकतो. एखाद्या माणसाला तू का एवढा मानतोस असे आपल्या पत्नीने विचारले की त्याने आपल्या धंद्यात यश मिळविले आहे तसे मला मिळवायचे आहे असे सांगितले की पुढे प्रश्न उद्भवत नाहीत. कारण हे दुसऱ्या माणसाचे यश तीला (त्याच्या संपत्तिमध्ये) जाणवित असते. परंतु `त्याने मानसिक शांति प्राप्त करुन घेतली आहे म्हणून मी त्याला मानतो’ असे म्हटले की लगेच `हे तुला कशावरुन कळले?’ हा प्रश्न तिकडून येतोच! आणि तो बरोबरच आहे. असे होऊ नये हे टाळायचा आपण शक्य तितका प्रयत्‍न करीत असतो आणि ह्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजेच आपल्या मनाला सर्व गोष्टींना व्यावहारिक गोष्टींमध्ये मोजायची लागलेली सवय होय.

परंतु खरा परमार्थ हा फक्‍त स्वतःच्या उध्दाराकरीता असतो. त्यातील अद्वैत आनंदामध्ये दुसऱ्या व्यक्‍तीला सामील करणे तत्वतः अशक्य आहे. आपल्या कितीही जवळच्या, कितीही आवडत्या व्यक्तीचा सामावेश आपण त्या आनंदात करु शकत नाही. हा स्वयंभू आनंद कुणावरही वा कशावरही अवलंबून नाही. तो आपल्याला मिळतो याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे तो आपल्यामध्ये जन्मापासून सतत आहे. हे लक्षात घ्या, यावर विश्वास ठेवा.

लक्षात घ्या की विश्वास हे अध्यात्मिक प्रगतीचे मूळ आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो साधक स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवतो तो फार लवकर पुढे जातो. आपणास असे वाटत असते की मी फक्‍त स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवतो. उगाच अंधश्रध्दाळूपणा आपणास आवडत नाही. परंतु आपले वर्तन ह्या भूमिकेशी सुसंगत आहे का या गोष्टीचा विचार करायची वेळ आता आली आहे. का म्हणून देहाच्या त्रासाला दुःख म्हणायचे? स्वतःचा अनुभव काय आहे? आवडते पाहुणे आल्यावर त्यांच्या सरबराईला कितीतरी शारिरीक कष्ट घ्यावे लागतात. पण त्या सर्व कष्टांतून गृहीणीला वा त्यांच्या सोयीकरीता पैसे खर्च करताना कर्त्या माणसाला दुःख न होता आनंदच होतो. स्वतःच्या अशा अनंत अनुभवांवर विश्वास न ठेवता शरीरसुखाला अंतिम ध्येय मानणे हा अंधविश्वास नव्हे का? विचार करा. आयुष्यातील अनेक गोष्टी आपण समाजमान्य आहेत म्हणून करीत असतो. स्वतःला विपरीत अनुभव येऊनसुध्दा त्यांवर विश्वास ठेवत नाही. तेव्हा आपल्याजवळ स्वतःच्या अनुभवांवरचा विश्वास नाही हे ध्यानात घ्या आणि तो स्वानुभवावरील विश्वास परत मिळवा. खरे म्हणजे आपली सर्व साधना हा विश्वास मिळविण्यासाठीच आहे. एकदा हा विश्वास मिळविला की तुम्हाला जीवनातील कारणविरहीत सुख जाणविते त्यावर श्रध्दा ठेवावयासी वाटेल. बायको, मुले काय म्हणतील हा विचार येणे बंद होईल आणि अनिर्वाच्य सुखाचे महत्व जाणवेल. तसे बघायला गेले तर जी गोष्ट शब्दांत सांगता येते ती कधीही पूर्णपणे खरी नसते. घडलेल्या गोष्टीच्या आठवणींचे जवळपास खरे असलेले वर्णन फक्‍त आपण दुसऱ्यांस सांगू शकतो. खऱ्या गोष्टीचे वर्णन करता येईल असे शब्द अजून कुठल्याही भाषेत निर्माण झालेले नाहीत ना कधी होतील. ज्याप्रमाणे `ओम शांति ओम’ या चित्रपटात शाहरुख खान प्रेयसीला म्हणतो `तुझे वर्णन करु शकेल असे शब्द अजून झाले नाहीत’ अगदी तसेच सर्व वेद सत्याबद्दल म्हणत आहेत. `हे नाही, हे नाही’ असे नकारात्मक वर्णन करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहीला नाही. हेच शब्दांना न गवसणारे शाश्वत सत्य आपल्या जीवनात आनंदरुप घेऊन जन्माला आलेले आहे. सदा सर्वदा आपल्याजवळ असलेल्या ह्या सुखाला ओळखा आणि त्यात रमण्यातच जीवनाची सार्थकता माना. ज्ञानेश्वरीतील ओव्यांतून तुमच्या विचारांना ही नवी जाग देण्याचे काम माउली करीत आहेत. बाकी मूळ आनंद तुमच्याजवळ आहेच. फक्‍त तुम्हाला ना तो कधी कळला होता ना त्याच्यात स्वारस्य वाटले होते. ही आपली मानसिक स्थिती बदलण्याचे काम करणारे आपले पंतप्रधान म्हणजे संतमंडळी होय. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा व व्यावहारिक प्रगतीकरीता गहाण ठेवलेला स्वतःवरचा विश्वास परत मिळवा. तुमचे निदैले कृपाळूपण एकदा जागे झाले की कशाची कमतरता आहे? तुम्हांस सर्वसुखाचि प्राप्ती होणारच.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक २९ जुन २००८.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: