(328+329)/10: Beware of Expectations

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

पै राया तो पंडुसुत । ऐसिये प्रतीतीसि जाहाला वरैत ।

या संजयाचिया बोला निवांत । धृतराष्ट्र राहे ॥ ३२८:१० ॥

कीं संजय दुखावलेनि अंतःकरणे । म्हणतसे नवल नव्हे दैवा दवडणे ।

हा जीवीं धडसा आहे मी म्हणे । तंव आंतही आंधळा ॥ ३२९:१० ॥

प्राचीन काळी सर्व वेद मुखोद्गत असायचे. गुरुंकडून ज्ञान ग्रहण करायचे म्हणजे काय तर श्रीगुरुंची बोधवाक्ये (कुठलाही संशय न घेता) घोकून घोकून पाठ करायची व त्यांच्याकडून त्यांचा अर्थ समजावून घ्यायचा अशी प्रथा होती. म्हणूनच आपण पुराणात अगदी राजे-महाराजांची मुलेसुध्दा गुरुकुलात राहून शिकल्याचा उल्लेख पाहतो. पाठ करायला सोपे म्हणून सनातन धर्माचे सर्व लिखाण पद्यात आहे. पद्यात लिहिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे क्रियापदे वगैरे व्याकरणाचे नियम कवितेच्या बाबतीत शिथिल करता येतात. त्यामुळे वाक्यरचना सुटसुटीत होते एवढेच नव्हे तर शब्दसंख्याही कमी होते (पाठांतराला सुलभ!). शब्दसंख्या कमी करण्याकरीता अजून एक उपाय म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पष्ट न सांगता बरेचसे मुद्दे वाचक विचार करतील व आपणहून समजून घेतील या भावनेने अध्यारुत धरणे होय. अशा अध्यारुत धरण्याने जे मुद्दे लेखकाला महत्वाचे वाटले तेवढेच फक्‍त लिखाणात येतात. आणि सर्व अभ्यास गुरुंच्या हाताखाली (स्वतःच शिकणे सामाजिकरीत्या मंजूर नव्हते) होणार असल्याने लेखकाला अशी खात्रीसुध्दा होती की जरी एखाद्या वाचकाला एखादा मुद्दा कळला नाही तरी त्याचा गुरु त्याला समजावून देईल. ह्या खात्रीमुळे वेदसुत्रे वा गीतेतील श्लोक एवढे संक्षिप्त झाले आहेत की सर्वसाधारण वाचकाला त्याचे पूर्ण आकलन होणे अशक्यच आहे. (म्हणूनच आपण असे बघू शकतो की गीतेचा आधार घेऊन कुणीही काहीही सिध्द करु शकतो! चिन्मयानंदांसारखे भक्‍तीमार्गाचा उपदेश करणारेही भगवद्गीतेचा आधार घेतात आणि लोकमान्य टिळकांसारखे कर्मयोग चोखाळणारेही भगवान श्रीकृष्णांचा हवाला देतात!) गीतेवरील अनेक भाष्यांपैकी श्री ज्ञानेश्वरीचे माहात्म्य थोर व्हायचे एक महत्वाचे कारण म्हणजे माऊलींनी स्वतःचा कुठलातरी मार्ग पुढे करण्याकरीता हे भाष्य लिहिले नाही तर भगवंताचे सर्व सांगणे लोकांपुढे यावे या एकाच उद्देशाने आपली भावार्थ दिपिका लिहिली आहे. त्यामुळे जे मुद्दे श्री व्यासमहर्षींनी अध्यारुत धरले आहेत त्यांचाही स्पष्ट उल्लेख माऊली श्री ज्ञानेश्वरीत करते (अर्थात तरीपण सगळेच मुद्दे सांगणे शक्य नाही!). याकरीता गीतेतील दोन श्लोकांमधील शांततेत काय घडले असेल याचा मागोवाही श्री ज्ञानेश्वर वारंवार घेतात. म्हणून ज्ञानेश्वरीत आपण वारंवार गीतेत न सांगितलेल्या गोष्टी बघतो. दोन श्लोकांतील घटना अशा दर्शविल्याने कृष्णार्जुनांचे संभाषण कळण्यास निश्चित मदत होते. आज निरुपणाला घेतलेल्या दोन ओव्या अशाच आहेत.

कल्पना करा, एवढे गूढ तत्वज्ञान अर्जुनाला भगवान सांगत आहेत ते त्याचवेळी दुसऱ्या कुणी ऐकले असेल तर त्याची अवस्था काय झाली असेल? शाळेत वर्गाबाहेर उभा राहून शिक्षकाला ऐकले तरी आपणांस ज्ञान हे होतेच ना? हा विचार आपण संजय आणि धृतराष्ट्रा बाबत करु शकतो. भगवद्गीता आपल्यापर्यंत कशी आली, तर संजय धृतराष्ट्राला रणाचा वृत्तांत देत आहे ह्या घटनेतून. म्हणजे अर्जुनाबरोबरच संजय आणि धृतराष्ट्र या दोघांनीसुध्दा गीता ऐकलीच की. भले वर्गाबाहेरुन असेल पण ऐकलीच ना. मग त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल? वेळोवेळी ज्ञानेश्वर त्यांच्याकडे जाऊन हे पाहतात. दहाव्या अध्यायाचा अंत होताना संजयाला अर्जुनाच्या प्रेमाचे भरते आले आहे. `भगवंताच्या विभूति अर्जुनाला गोचर झाल्याने त्याला आता विश्वातील सर्वांमध्ये भगवंताचे रुप दिसत आहे असे मोठ्या कौतुकाने संजय धृतराष्ट्राला सांगू पाहतो आणि धृतराष्ट्राचा थंडपणा पाहून त्याला मनोमन दुःख होते. तो आपल्या मनात म्हणतो की ह्याचे केवळ बाह्यचक्षू आंधळे नाहीत तर हा आतूनसुध्दा आंधळाच आहे.’ हा झाला ओवींचा शाब्दीक अर्थ. माउलींचे कुठलेही शब्द उगाच उद्गारलेले नाहीत. जी गोष्ट मगाशी आपण गीतेच्या श्लोकांबाबत बघितली ती ज्ञानेश्वरीलाही लागू होते. तेव्हा संजयाच्या मनातील हा खेद (धृतराष्ट्राच्या मनातील गीतेच्या उपेक्षेबद्दल) ज्ञानेश्वर महाराजांना महत्वाचा का वाटला हे आता आपण बघू.

दुसऱ्याचे भले करु इच्छिता । नमागता सल्ला देऊ करता ।

देता रत्नहार रानातील मर्कटा । खेदच पुढे असे ठेविला ॥

स्वतःच्या जीवनात एखादा आणीबाणीचा प्रसंग आल्यावर आपली (दृश्य) साधना सुरु होते. आपल्या जीवनातील तो बिकट प्रसंग दुसऱ्यांना कठीण वाटतोच असे नाही. परंतु आपल्याकरीता सत्वपरिक्षा पाहणाराच तो प्रसंग असतो. अशावेळी दैवयोगाने कुणा सज्जन माणसाची संगत लाभली तर आपले पाय परमार्थाच्या मार्गावर येतात. त्यानंतर पूर्वकर्मांप्रमाणे योग्य वेळ येताच आपल्या गुरुंची भेट होते व आपल्या साधनेला आकार यायला सुरुवात होते. त्यानंतर, आपले प्रयत्‍न प्रामाणिक असतील तर, साधनेत प्रगती होऊन अनुभव यायला सुरुवात होते. दहाव्या अध्यायाच्या अंती संजयाची अवस्था अशी झाली आहे. त्याआधीच नवव्या अध्यायातील अत्यंत गुह्यतम परमार्थ कानी पडल्यावर त्याच्या अंगावर सात्विकतेने रोमांच आले, श्वास जलद झाला व त्याचे भान हरपायला लागले होते. माऊलींनी त्याच्या अवस्थेचे वर्णन अत्यंत सुंदरपणे करताना म्हटले आहे:

परी बाप भाग्य माझे । जे वृत्तांत सांगावयाचेनि व्याजे ।

कैसा रक्षिलो मुनिराजे । श्रीव्यासदेवे ॥ ५२५:९ ॥

येतुले हे वाड सायासें । जंव बोलत असे दृढमानसें ।

तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विकें केले ॥ ५२६:९ ॥

चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।

आपादकंचुकित । रोमांच आले ॥ ५२७:९ ॥

अर्धोन्मीलित डोळें । वर्षताति आनंदजळें ।

आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ ५२८:९ ॥

पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळीं ।

लेइला मोतियाचि कडियाळी । आवडे तैसा ॥ ५२९:९ ॥

ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हो पाहे जीवदशें ।

तेथ निरोविलें व्यासें । तें नेदीच हो ॥ ५३०:९ ॥

आणिक श्रीकृष्णांचे बोलणें । घोकरी आले श्रवणें ।

कीं देहस्मृतींचा तेणें । वापसा केला ॥ ५३१:९ ॥

अष्टसात्विक भावांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी वरील ओवींमध्ये केले आहे. त्या सात्विक भावांत विरुन जात असता त्याच्या हातून जे कार्य व्हायला हवे होते ते होणार नाही की काय असा संशय निर्माण होत होता तेवढ्यात भगवंताचे पुढील बोलणे त्याच्या कानात घुसले आणि तो `मी संजय आहे’ ह्या भूमिकेत परत आला असे ते म्हणतात (बरे झाले, नाहीतर आपल्याकरीता महाभारत तिथेच संपले असते!). ह्या पार्श्वभूमीवर दहाव्या अध्यायाच्या अंती त्याला अर्जुनाबद्दल प्रेम वाटणे साहजिकच आहे!

आता हे असेच कशावरुन घडले असेल अशी शंका ज्यांच्या मनात उद्भवली आहे त्यांनी अठराव्या अध्यायाच्या शेवटी धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न (संजया, युध्दात कुणाचा जय होईल हे तू मला सांग) आणि त्याला संजयाने दिलेले उत्तर पहावे (जिथे योगींद्र कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे तिथे विजय आहे हे माझे धृवासारखे दृढ मत आहे.) त्यावरुन सबंध गीता ऐकल्यानंतरसुध्दा धृतराष्ट्राला ओढ कुठल्या गोष्टीची राहीली हे सिध्द होइल आणि आपल्या राजाला `तुझ्या मुलांचा पराभव होईल’ हे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस करणारा संजय दिसू लागेल. धृतराष्ट्राची अवस्था बघूनच कदाचित मराठीत `गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता’ ही म्हण उत्पन्न झाली असेल! असे अगदी उघडपणे धृतराष्ट्राला दोष देण्यात काही हरकत नाही कारण मी स्वतःला धृतराष्ट्र आहे असेच समजतो. याचे कारण असे की मी इतक्या वेळा गीता ऐकली, वाचली आहे, ज्ञानेश्वरीची पारायणे केली आहेत पण या जगावरचा माझा मोह कमी झाला आहे का? मग माझ्यात आणि धृतराष्ट्रात काय फरक? तेव्हा त्याचे दोष जेव्हा समोर येतात ते माझेच दोष आहेत हे सहज आहे. त्यामुळे ते स्पष्टपणे सांगण्यातच माझी प्रगती आहे! असो, भगवंताने ज्याप्रमाणे धृतराष्ट्राची काळजी घेतली तशी माझीपण कधीतरी घेईल या आशेवरच मी जगतो आहे.

तर अशा रीतीने संजय स्वतःचा उध्दार करुन घेत असताना तो परमार्थाच्या मार्गावरील एका मोठ्या खड्यात पडतो! तो अत्यंत नैसर्गिक धोका म्हणजे आपल्याला झालेली प्रगती दुसऱ्यांना वाटायची इच्छा. आपण सर्वजण ह्यापासून अत्यंत सावध राहिले पाहिजे.

असे बघा, लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही एकतरी गोष्ट स्वतः उपभोगून केवळ त्यातच समाधान मानले आहे काय? अतिशय सुंदर सूर्यास्त अचानक दिसला तरी बरोबर अमुक एक व्यक्‍ती हवी होती, अजून मजा आली असती असा विचार मनात येतोच ना. मग ती व्यक्‍ती भेटल्यानंतर आपण उत्साहाने त्या विहंगम दृष्याचे वर्णन करुन आपल्या आनंदात तीला सहभागी करुन घ्यायचा प्रयत्‍न करतोच की नाही? खरे म्हणजे आपला कुठलाच आनंद जवळच्या व्यक्‍तींबरोबर उपभोगल्याशिवाय पूर्ण होत नाही. तेव्हा ज्यांना आपण आपले मानतो त्यांचे भले करण्याची आत्यंतिक इच्छा आपण सतत जवळ बाळगत असतो. व्यावहारिकरीत्या यात काहीच चुक नाही. परंतु परमार्थामध्ये कुठलीही इच्छा जवळ ठेवणे बरोबर नाही. अगदी दुसऱ्यांच्या भल्याची सुध्दा! इच्छा आली की अपेक्षा आली. आणि अपेक्षा असली की दुःख फार दूर नाही (कारण कुठल्याही दुःखाचे मूळ बघितलेत तर ते म्हणजे आपल्या कुठल्यातरी अपेक्षेला ठेच लागणे हेच असते.). आणि दुःखात कुठे परमार्थ आहे? खऱ्या परमार्थात फक्‍त सुख आहे, आनंद आहे, शांति आहे, पराकोटीचे समाधान आहे. तेव्हा कुठलीही अपेक्षा ठेवणे बरोबर नाही हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला संजयाच्या रुपकातून सुचवित आहेत असे वाटते.

जरा विचार करा, अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी अनेकांचा उध्दार केला पण किती संतांच्या कुटुंबियांनी आपला उध्दार करुन घेतला? श्री संत एकनाथ व नामदेव यांचे उदाहरण सोडले तर फार थोड्या संतांच्या मुला-बाळांनी भगवंताची प्राप्ती करुन घेतली आहे असे दिसून येते. ज्या संतांनी परक्या शिष्यांचा उध्दार केला त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांच्या मागे लागून त्यांना ध्येयप्राप्ती का करुन दिली नाही हा प्रश्न ज्यांना आला आहे त्यांच्याकरीता हे उत्तर आहे. (श्री निसर्गदत्त महाराज एकदा म्हणाले होते की `तुम्ही इतक्या दुरुन येऊन आपले काम करुन गेलात पण माझा — तसाच आहे.’ यावरुन संतांच्या मनात जवळच्या माणसांच्या उध्दाराची इच्छा नसते असे नव्हे तर `आत्यंतिक इच्छा’ नसते, `दुराग्रह’ नसतो.) संतमंडळी सहज जगत असतात, कुणाचा उध्दार करावा असे त्यांना वाटले तरी ते क्षणिक असते. ज्या भगवंताने आपला उध्दार केला आहे तो दुसऱ्यांचा उध्दार करण्यास समर्थ आहे याची त्यांना इतकी परिपूर्ण खात्री असते की ते शांतपणे प्रत्येकाला आहे तसे स्वीकारत असतात. मग कुणी आपणहून आपली प्रगती करुन घेतली की त्यांना आनंदाचे भरते येते. स्वतःकडे कुणाच्याही प्रगतीचा कर्तेपणा ते घेत नसल्याने आपण कुणाची प्रगती करावी ह्या इच्छेतून ते मुक्‍त असतात. आपण सर्वांनी संजयाच्या `दुखावलेल्या अंतःकरणाकडे’ बघून हे शिकले पाहिजे की या जगातील प्रत्येक व्यक्‍ती स्वतःचे ध्येय ठरवायला मोकळी आहे, स्वतंत्र आहे. आपल्या दृष्टीकोणातून एखादी गोष्ट त्याज्य असली (आणि त्याबद्दल आपण कितीही शास्त्रीय पुरावा देऊ शकत असलो) तरीही त्यानुसार दुसऱ्यांनी वर्तन करायलाच पाहिजे हा आग्रह धरणे चुकीचे आहे. प्रत्येकजण स्वतः चुका करुनच शिकणार आहे (`स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ असे म्हणतातच की) तेव्हा आपण दुसऱ्यांना त्यांच्या नजरेने जे योग्य आहे ते वागण्यास मोकळीक दिली पाहिजे. कालच भारताचा स्वतंत्रता दिन साजरा करुन लोकशाहीत आपण जगत आहोत याचा आनंद मानला ना? मग वैयक्‍तिक आयुष्यातही वागा की खऱ्या लोकशाहीप्रमाणे! `अत्यंत योग्य इच्छासुध्दा अतिरेकी नसाव्यात, एकदा सांगून पटले नाही तर सोडून द्यावे. असे वर्तन करणेच परमार्थाला योग्य आहे’ हे एक बोधवाक्य आपण सतत ध्यानात ठेवावे. आज एवढेच!

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक १६ ऑगस्ट २००८)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: