(22to26)/6: How to read Dnynaneshwari

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

हे असो तयां बोलांची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं ।

ही प्रतिपत्ती मियां केलीं । निष्कामासी ॥ २२:६ ॥

आतां आत्मप्रभा नित्य नवी । तेचि करुनि ठाणदिवी ।

जो इंद्रियांते चोरुनि जेवी । तयासिच फावे ॥ २३:६ ॥

अहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे ।

मग सुखेंसि सुरवाडिजे । सुखाचिमाजि ॥ २५:६ ॥

ऐसे हळुवारपण आंगा येईल । तरीच हे उपेगा जाईल ।

येऱ्हवी आघवी गोष्टी होईल । मुकया बहिरयाची ॥ २६:६ ॥

जरा डोळे उघडून बघितले की असे दिसून येते की या जगात (जवळ-जवळ) प्रत्येकजण कुठल्यातरी शोधात आहे. काहीतरी प्राप्तीची आस धरुन आपले या जगात वावरणे सुरु असते. जी माणसे थोर म्हणून गणली जातात त्यांच्या मनातील आशा इतर जणांच्या भल्याकरीता असतात, परंतु कुठलीच आशा नसते अशी माणसे विरळा. आशा नसणे आणि निराश असणे यात फरक आहे हे इथे लक्षात घ्या. निराश, दुःखी माणसांच्या मनात आशा असतेच, फक्‍त त्याबरोबर ती आस कधीही पूर्ण होणार नाही याची जाणीवही असते. तेव्हा संपूर्णपणे अपेक्षाविरहीत मानवाचे दर्शन अत्यंत दुर्लभ, दुर्मिळ व पराकोटीचे भाग्य आहे. परमार्थातही आपले भले व्हावे ही अपेक्षा असतेच. भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षाही अखेर एक अपेक्षाच आहे. परंतु बाकी सर्व अपेक्षांपेक्षा ही वेगळी आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ज्याप्रमाणे `मला कधीतरी भीती वाटेल ही भीती बाकी सर्व भयापेक्षा वेगळी आहे त्याचप्रमाणे मला कुठलीही अपेक्षा असू नये ही अपेक्षा बाकी अपेक्षांपेक्षा वेगळी आहे.’ सर्वच अपेक्षा एकसारख्या नसतात हे आपण मान्य करतोच ना. कारण असे आपण बघतो की काही अपेक्षांमुळे आपल्या मनात सहिष्णुता येते तर काहींनी संकुचितपणा. तेव्हा अपेक्षा ठेवायचीच आहे, त्याशिवाय जगण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो की त्यायोगे आपले जीवन सर्वसमृध्द होईल, परिपूर्ण होईल. अशी एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे भगवंतप्राप्तीची. भगवंताचे स्थान व्यावहारिक जगापासून दूर असल्याने त्याच्या प्राप्तीची आस ठेवली की आपोआप दृष्य जगताबद्दलची आत्मीयता दूर होऊ लागते. बाह्यजनांच्या दृष्टीकोणातून आपण निरिच्छ, निष्काम बनायला लागतो. आज निरुपणाला घेतलेल्या वरील ओवींतील पहिल्या ओवीमधील `निष्काम’ या शब्दाचा हा अर्थ आहे. निष्काम म्हणजे ज्याची कामना भगवंतप्राप्ती आहे असा. ज्याच्या मनात याशिवाय़ दुसऱ्या गोष्टीच्या इच्छेची भेसळ नसणारा असा. नाहीतर सर्व संतांना निरिच्छ म्हणतात पण त्यांच्या मनातसुध्दा `पाहिन श्रीमुख आवडीने’ अशी इच्छा आहे की असे काही बुध्दीवादी म्हणतात. (मग आमच्या मनातील संसारसुखाच्या अभिलाषेला का नावे ठेवता? असा त्यांच्या मनातील भावार्थ!).

असे बघा, शब्द हे केवळ माध्यम आहे. माझ्या मनातील विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवणे हे कार्य करण्याकरीता मी शब्दांचा उपयोग करतो. आता असे करण्यामध्ये १. माझे मराठीचे ज्ञान २. माझ्या विचारांचे मला झालेले आकलन, ३. तुम्हाला कुठले शब्द कळतील याबद्दलचे माझे ज्ञान आणि ४. एका शब्दाचा माझ्या मनातील आणि तुमच्या मनातील अर्थ एकच आहे ही समजुत इतक्या गोष्टी अध्यारुत असतात. याशिवाय तुमचे लक्ष कितपत आहे यावर तुम्हाला सर्व शब्द ऐकायला येतात की नाही हे अवलंबून आहे. म्हणून शहाण्या माणसाने शब्दांत न गुंतता त्यामागील अर्थ जाणून घेण्याकडे आपले लक्ष ठेवले पाहिजे. `अहाच बोलाची वालीफ फेडिजे’ या ओवीत माऊली फार सुंदरतेने या वस्तुस्थितीचे वर्णन करीत आहेत. ते म्हणत आहेत शब्द म्हणजे जणू पिकलेल्या फळाची साल आहे. त्या सालीमुळे आतील गर सुरक्षित राहून खायला मिळतो, पण खायच्या वेळी ते साल काढायचे असते तसे `माझ्या शब्दांची साले तुम्ही हळुवारपणे (अहाच) काढून त्यातील ब्रह्मरसाचा आस्वाद घ्या व त्यायोगे सुखात सुखामध्ये लोळत रहा.’ किती सुंदररीत्या त्यांनी आपणास शब्दात न अडकण्यास सांगितले आहे! असा प्रतिभेचा विलास आपणास पहावयास मिळतो हेसुध्दा आपले भाग्यच आहे. `अहाच बोलाची वालीफ (साल,आच्छादन) फेडीजे’. खरोखर ज्याप्रमाणे संतचरणस्पर्शाने तीर्थस्थळांना तीर्थरुप प्राप्त होते त्याचप्रमाणे अशा प्रतिभाविलासाने भाषेला भाषेपण मिळत असते. असो. माझ्या मनात असे शब्द ऐकल्यावर जी भावना उत्पन्न झाली तीचे वर्णन करण्यास मी अपुरा आहे. वारंवार `अतिसुंदर, अतिसुंदर’ असेच फक्‍त मी म्हणू शकतो.

असो. भावनाविवश होण्यात आपले भले नाही. तेव्हा शांत होऊन विचार करावे हेच योग्य होय. आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: ती (श्रीकृष्णार्जुनांच्या) संवादरुपी ताटे मोक्षरसाने भरलेली आहेत, आणि ती मी निष्काम (म्हणजे भगवंतप्राप्तीसाठी आसुसलेल्या) जीवांसाठीच मांडली आहेत. जी माणसे स्वतःच्या नित्य नूतन आत्मरुपाकडेच सतत लक्ष ठेवून आहेत, जे इंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानामध्ये खरे ज्ञान आहे असे मानत नाहीत (अपरोक्ष ज्ञानच खरे ज्ञान आहे अशि ज्यांची खात्री आहे) त्यांनाच हे भोजन पचेल (बाकीच्यांना अपचन!). हळुवारपणे शब्दांच्या पलिकडे जाऊन (ते शब्द काय दाखवायचा प्रयत्‍न करीत आहेत ते पाहीले) ब्रह्मज्ञान प्राप्त करा आणि मग सुखात सुखामध्ये गुंगून जा! आणि असे जर केले नाहीत तर ही सर्व योजना व्यर्थ होईल आणि जणू मुका मनुष्य बहिऱ्या माणसाशी गप्पा मारतो आहे अशी आपली स्थिती होईल.’

ठेवा एक नियम सत्य । रोज वाचा ज्ञानेश्वरी नित्य ।

दिसेल मार्ग सुंदर अत्यंत । अज्ञानाचा होईल संपूर्ण अंत ॥

अध्यात्मिक पुस्तके वाचताना अशी शंका उत्पन्न होते की आपल्याला या शब्दांचा अर्थ पूर्णपणे कळला आहे की नाही? माझ्या मनातील या शब्दांचा अर्थ बरोबर आहे का? खरा परमार्थ आपल्याला जो काही बोध झालेला आहे तो आचरणात आणण्यामध्ये असतो. परंतु वरील कुशंकेने आपल्यामध्ये घर केले की आपली झालेला बोध आचरणात आणण्याची शक्‍ती नाहीशी होते. स्वतःवर विश्वास नसल्याने मग आपण दुसऱ्यांच्या आचरणाचे अनुकरण करण्यात सुरक्षितता मानू लागतो. परक्याचे अनुकरण करणे हे स्वतःच्या अध्यात्मिक प्रगतीला अत्यंत धोकादायक असल्याने आपली प्रगती खुंटते व आपला आत्मविश्वास अजून कमी होतो. एकदा ह्या दुष्टचक्रात अडकले की त्यातून बाहेर पडणे केवळ गुरुकृपेनेच शक्य होते. अशी गुरुकृपा किती जणांच्या भाग्यात लिहीली आहे? म्हणून आपण ह्या चक्रात न अडकणेच इष्ट आहे. हे कसे करावे?

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्या की कुठल्याही गूढ तत्वज्ञानाचा एकच अर्थ नसतो. खुद्द सनातन धर्मामध्ये (ज्याला सध्या हिंदू धर्म असे म्हणतात) अनेक दृष्टीकोण आढळतात. द्वैत, अद्वैत, विशिष्टद्वैत, केवलद्वैत हे ढोबळ भेद झाले. यातील प्रत्येकामध्ये अनेक मार्ग, अनेक अर्थ आहेत. आणि हे सर्व लोक आम्ही एकाच तत्वज्ञानाचा खरा अर्थ आहोत असे प्रतिपादन करतात. यातील कुठला खरा हा विचार करायचीवेळ आज नाही. आज आपण एवढेच बघू की एकाच गीतेचे अनेक अर्थ लोकांनी काढले आहेत. तेव्हा आधी आपण ही गोष्ट ठामपणे पटवून घेऊया की वाचलेल्या ओवीचा एक खरा अर्थ आहे आणि तो आपल्याला समजला तरच आपली भलाई आहे ही समजूत चुकीची आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या योग्यतेप्रमाणे सद्‌गुरु आपल्याला अर्थ दाखवित असतात. जो अर्थ कुठलाही विचार न करीता आपल्याला समजतो तो कुठून येतो? बुध्दीचा वापर न करीता जो अर्थ गोचर होतो तो आपल्या ह्रुदयी स्थित असणाऱ्या सद्‌गुरुंनी दाखविला आहे असे समजतात. आपली आचरणात आणण्याची जेव्हढी क्षमता असते तेव्हढाच अर्थ आपणास अशा तऱ्हेने उमगतो. तेव्हा अचानक समजलेला अर्थ खरा आहे असे आपण सर्वांनी मानावे. मग भले या विषयावरची अधिकारी व्यक्‍ती काही वेगळे सांगत असेल. आपण त्याकडे फारसे लक्ष देऊ नये. तो अर्थ त्या व्यक्‍तीसाठी बरोबर असेल पण माझ्याकरीता हा अर्थच सध्या बरोबर आहे असे समजून आचरणात आणावा.

इथे आपण स्वकेंद्रित व्हायची शक्यता आहे. दुसऱ्या कुणाचे न ऐकण्याची शक्यता आहे. ह्या धोक्याचे परीमार्जन म्हणून आपण अशी प्रार्थना (मनातल्या मनात) करावी की `आज मला अत्यंत प्रामाणिकपणे असे वाटत आहे की अमुक ओवीचा अर्थ अमुक अमुक आहे. त्यात माझी चुकी झाली असेल तर हे आत्मरुपी देवा मला क्षमा कर व खरा अर्थ मला दाखव.’ ह्या प्रार्थनेमुळे आपण बदलाला तयार होतो. मला काल असे कळले होते म्हणून आजसुध्दा तोच अर्थ गृहीत धरणे बंद करतो. नित्यनेमाने ज्ञानेश्वरी का वाचावी? का म्हणून परत परत त्याच त्याच ओव्या पठन कराव्या? तर त्यायोगे आपणास ओव्यांचे आपल्या जीवनातील सध्याचे अर्थ कळत राहतात म्हणून! नाहीतर काही काळापूर्वी वाचलेल्या ओव्यांचे अर्थ तसेच आपल्या जीवनात स्थिर राहतील आणि आपली `आत्मप्रभा नित्य नवी’ आहे, बदलत आहे आणि आपणास `तेचि करुनि ठाणदिवी’ रहायचे आहे. मग आपल्याला साजेसा ओवीचा अर्थ का म्हणून एकच राहील? सतत बदलाची शक्यता गृहीत धरुन आज समजलेला अर्थ शक्य तेवढा आचरणात आणण्याचा प्रयत्न जो साधक करतो तो वरील वर्णन केलेल्या दुष्टचक्रात अडकत नाही.

इथे अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. आपले सद्‌गुरु आपले भले इच्छीत असतात आणि त्याकरीता ते कधी कधी कठोर शिक्षाही करतात. ज्ञानेश्वर महाराजांना `माउली’ असे म्हणतात. त्यांचे प्रेम मातृवत आहे. आजीसारखे दंतहीन नाही. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाच्या भल्याकरीता अत्यंत कठोर शासन करु शकते त्याचप्रमाणे आपले सद्‌गुरुही आपल्या जीवनात आणीबाणीचे प्रसंग आणतात. ज्याप्रमाणे जीवनात अचानक आलेल्या सुखदायक क्षणांमध्ये सद्‌गुरुंचा हात आहे अशी आपली खात्री असते त्याचप्रमाणे अचानक निर्माण झालेल्या विघ्नांमागेही सद्‌गुरुंचीच इच्छा आहे असे आपण बघितले पाहिजे. खरी समज कठीण समयानंतरच येते. सुखाने मनुष्य मृदू होतो. अशा नाजूक, पोकळ मानवाला सक्षम बनविण्याची क्षमता दुःखांमध्ये असते. तेव्हा `मी प्रामाणिकपणे साधना करीत असताना देखील संकटे माझ्यावर का येतात?’ हा प्रश्न मुळातच चुकीचा आहे. आता तुमच्यात काहीतरी नवीन शिकायची क्षमता निर्माण झाली आहे म्हणून ती शिकवण अंगात भिनण्यासाठी संकटे आली आहेत असे आपण समजावे. यात `मी सामोऱ्या आलेल्या परिस्थितीला मात देण्यालायक झालो आहे म्हणूनच ही परिस्थिती माझ्यासमोर आली आहे’ अशीही खात्रीही आहे. तेव्हा झालेला बोध आचरणात आणताना (भौतिकदृष्ट्या) सुखच प्राप्त होईल असे नाही. तरीही आपले प्रयत्‍न आपण सोडू नये. नित्यनैमित्तिक ज्ञानेश्वरी वाचत रहावी आणि जेव्हा केव्हा अचानक अर्थ प्रगट होईल त्याच्याशी प्रामाणिक जीवन जगावे म्हणजे तुम्ही सुखात आकंठ बुडून रहाल हे माउलींचे आश्वासन आहे. बौध्दीकरीत्या ज्ञानेश्वरीचे विश्लेषण करीत बसलात तर मुक्या-बहिऱ्यांच्या संभाषणाने जेव्हढे ज्ञान मिळते तेव्हढेसुध्दा मिळणार नाही हा मातृप्रेमाने केलेला माउलींचा इशारा आपण विसरु नये ही प्रार्थना.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक २३ ऑगस्ट २००८)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: