(77to82)/13: Know thy egos (there are many!)

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आणि जागतिये दशे । स्वप्न लपाले असे ।

नातरी अंवसे । चंद्र गूढ ॥ ७७:१३ ॥

नाना अप्रौढबाळकी । तारुण्य राहे थोकी ।

कां न फुलतां कळिकी । आमोदु जैसा ॥ ७८:१३ ॥

किंबहुना काष्ठी । वन्ही जेवी किरीटी ।

तैवी प्रकृतीचिया पोटी । गोप्यु जो असे ॥ ७९:१३ ॥

जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचे मिष असे पहातु ।

जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥ ८०:१३ ॥

तैसी पांचाही गाठी पडे । जै देहाकारु उघडे ।

तै नाचवी चहूकडे । तो अहंकारु गा ॥ ८१:१३ ॥

नवल अहंकाराची गोठी । विशेषे न लगे अज्ञानापाठी ।

सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥ ८२:१३ ॥

भगवद्गीतेतील तेराव्या अध्यायात प्रकृतीला क्षेत्र असे नाव दिले आहे आणि तीला जाणणाऱ्या आपल्या आत्मरुपाला क्षेत्रज्ञ म्हणून पुकारले आहे. या अध्यायातील पाचव्या आणि सहव्या श्लोकात हे क्षेत्र म्हणजे काय याचे वर्णन केले आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे `अहंकार’ होय. अहंकार या शब्दाचे स्पष्टीकरण करण्यासाठी माउलींनी वरील ओव्या रचल्या आहेत. अतिशय सुरेख आणि सखोल परीक्षण करीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: `ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत स्वप्न लपलेले असते, किंवा अमावस्येच्या रात्री चंद्र लुप्त असतो, वा लहानपणी आणि वार्धक्यात तारुण्य दिसत नाही, उमलेपर्यंत सुवास जसा कळीच्या पोटातच सीमित असतो वा वाळलेल्या लाकडात अग्नी लपलेला असतो त्याचप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो लपलेला असतो. आणि अंगातील ज्वर अपथ्य होईपर्यंत सुप्तावस्थेत असतो आणि जरा कुपथ्य झाले की सर्वांगाला व्यापून टाकतो त्याचप्रमाणे देहाकार घेतल्याक्षणी जी गोष्ट त्याला सगळीकडे नाचवीते तो अहंकार होय. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अज्ञानी माणसाला फार छळत नाही पण ज्याला स्वतःच्या ज्ञानाची जाणीव आहे त्याच्या उरावर बसून वेगवेगळ्या संकटांना सामोरे करतो.’

नष्ट करण्यास स्वतःचा अहंकार । जेव्हढे कराल कठोर उपचार ।

होईल तो अधिकच अनिवार । गुरुकृपा हाच एक आधार ॥

परमार्थात अहंकार हा एक मोठा दुर्गुण मानला जातो. साधनेचे ध्येय भगवंतप्राप्ती असताना आपल्याला त्या ध्येयापासून पदच्युत करणाऱ्या शक्‍तींमध्ये आपल्या मनातील अहंकार फार प्रभावी आहे. भगवंतप्राप्ती आणि स्वतःचा अहंकार ह्या दोन गोष्टी संपूर्णपणे विरोधी असल्याने एक प्राप्त केली की दुसरी गमवावीच लागते. जसे कोल्हापूरला येण्यासाठी स्वतःचे बंगलोरमधील घर सोडावेच लागते तशी ही परिस्थिती आहे! अहंकार असला की आपले आहे ते अस्तित्व जपून ठेवण्याची धडपड येतेच. आणि स्वतःचे सद्यपरिस्थितीतील अस्तित्व जपून ठेवण्याची धडपड सर्व प्राण्यांना समान आहे. त्यामागील मूळ कारण म्हणजे अहंकार. त्याला पूर्णपणे नामोहरम केल्याशिवाय साधना करणे म्हणजे ग्रीष्मातील माध्यान्हीच्या अतिशय कडक सूर्यप्रकाशातून सावलीत न येता शरीराला थंडाव्याची अपेक्षा करण्यासारखे फोल आहे. ज्याप्रमाणे तप्त सूर्यकिरणांच्या दाहापासून सुटका मिळविण्याकरीता आपल्या आणि सूर्याच्यामध्ये आडोसा असणे जरुरी आहे, त्याचप्रमाणे स्वतःच्या अहंकारापासून सुटका होण्याकरीता गुरुकृपेची छत्री माथ्यावर असणे आवश्यक आहे! येथे असा संशय निर्माण होइल की गुरुकृपा दुसऱ्या व्यक्‍तीवर (म्हणजे गुरुंवर) अवलंबून आहे. मग आपले स्वरुप कळण्याकरीता दुसऱ्यांची मदत कशी उपयोगी येईल? परंतु गुरुकृपा ही सतत असतेच. ज्याप्रमाणे अतिशय कमी ताकतीचा इलेक्ट्रिक करंट हाताला जाणवित नाही परंतु योग्य उपकरणाने तो आहे हे सिध्द करता येते त्याचप्रमाणे अहंकारविरहीत मनाला गुरुकृपा जाणवायला लागते. तेव्हा ही थोडीशी गंमतीशीर गोष्ट आहे. गुरुकृपेशिवाय अहंकार जात नाही आणि अहंकार गेल्याशिवाय गुरुकृपा जाणवित नाही. परंतु चक्रातून बाहेर पडून शुध्द गुरुकृपा प्राप्त करायची असेल तर आपण आपले प्रयत्‍न संपूर्णपणे सोडून दिले पाहिजेत. अतिशय हताश परिस्थितीत अचानक जो मार्ग दिसतो तो मार्ग म्हणजे गुरुकृपेचे दृष्य स्वरुप होय. आपण अर्जुनासारखे (भगवद्गीतेच्या सुरुवातीला त्याच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडणे हे रुपकात्मक आहे!) गुरुकृपेला आवाहन केले पाहिजे. ज्या आर्ततेने द्रौपदीने श्रीकृष्णाची आळवणी केली त्याप्रमाणे आपण बोलाविले तरच सद्‌गुरु आपल्या पाठिशी येतात.

तेव्हा निखळ गुरुकृपेची शीतल सावली आपणास हवी असेल तर ती प्राप्त करण्यासाठी आपल्या हातात काय आहे? तर स्वतःच्या अहंकाराचा नाश आपल्या हातून होणार नाही याची संपूर्ण, निःसंदेह खात्री आपण आधी करुन घेतली पाहिजे. आत्तापर्यंत आपण संपूर्ण हताश कधीच झालेलो नाही. कुठेना कुठे आपल्या मनात स्वतःच्या क्षमतेची जाणीव असतेच. दुसऱ्यांची मदत आपण जरुर घेतली आहे पण तेव्हासुध्दा जर तूझ्या मदतीशिवाय मला काहीही दुसरा आसरा नाही असे आपण कितीवेळा म्हटले आहे? तेव्हा स्वतःच्या प्रयत्‍नांनी अहंकाराचा नाश होणार नाही असे आपण लगेच कबूल करणे कसे शक्य आहे? म्हणून जरा विचार करुन स्वतःची खात्री करुन घेऊ.

इथे विषय निघाला आहे म्हणून असे सांगता येईल की आपल्या गुरुंनीसुध्दा त्यांच्या गुरुंची मदत घेऊनच स्वतःच्या अहंकाराचा निरास केला होता. म्हणूनच `गुरुविण अनुभव कैसा कळे’ असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात (पहा अभंग ५). म्हणूनच परमार्थात परंपरेचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच स्वामी स्वरुपानंद `स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन । सद्‌गुरु-चरण उपासिता ॥’ असे उच्चारतात. तेव्हा सर्व संतांनी आपल्या गुरुंचे माहात्म्य निरंतर गाइले आहे यात आता आपणास नवल वाटणार नाही. असो.

वरील ओवींचा आधार घेऊन आपण असे सिध्द करु की `अकल्पनाप्य कल्पतरो’ अश्या गुरुंची कृपा झाल्याशिवाय आपणास परमार्थात खरी गती होणे शक्य नाही.

समजा आपणास अहंकार नष्ट करायचा असेल तर आधी त्याचे रुप जाणणे जरुरी आहे. वरील ओवींतून हे स्पष्ट होते की १. आपण रुप घेतल्याशिवाय अहंकार प्रगट होत नाही आणि २. प्रत्येक प्रगट रुपाबरोबर अहंकार असतोच. किंबहुना आपण असे ही म्हणू शकतो की आपणास रुप कळण्याचा मार्ग म्हणजेच त्याबरोबर असलेला अहंकार होय. ज्याप्रमाणे बाहेर गळलेला स्वयंपाकाचा गॅस त्याच्या वासावरुनच आपल्या लक्षात येतो त्याचप्रमाणे आपलेच रुप आपण त्याच्या अहंकाराद्वारेच ओळखतो! इथे हे लक्षात घ्या की आपली अनंत रुपे आहेत. आपला देह जरी एकच असला आणि सर्व रुपे या देहावर अवलंबून असली तरी आपल्या प्रत्येक रुपाचा अहंकार भिन्न असल्याने आजचा विवेचनामध्ये स्वतःची भिन्न रुपे आहेत असेच मानले पाहिजे. उदाहरणार्थ, माझे वडिल म्हणून एक रुप आहे, नवरा म्हणून एक रुप आहे, याशिवाय मुलगा, काका, भाचा, मामा, नोकर, वरिष्ठ, उच्चविद्याविभूषित, शिक्षक, विद्यार्थी, स्वच्छ, आंघोळ न केलेला, खेळाडू, आळशी इत्यादि अनंत रुपे आहेत. श्रीधर इनामदार या नावाने ओळखले जाणारे जे काही आहे ते या अनंत रुपामध्ये निरंतर फिरत असते. मग जेव्हा मी वडिल या रुपात असतो तेव्हा मला आनंद आणि दुःखाचे कारण माझा मुलगा होतो. नवरा म्हटला की जीवन पत्नीशी निगडीत होते. पण जेव्हा कामावर नोकर म्हणून असतो तेव्हा वरील दोन्ही रुपे नष्ट होऊन वरिष्ट माणसे माझे जीवन बनतात. साधना करीत असताना गुरु निर्माण होतात आणि पूजा करीत असताना देव निर्माण होतात! खरोखर ज्याक्षणी मी एखादे रुप धारण करतो त्याचक्षणी माझ्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी कुठल्या याची नोंद संपूर्णपणे बदलते. आपल्या जीवनात काय़ महत्वाचे आहे याची यादी म्हणजेच त्या रुपाच्या अहंकाराचे दृष्य स्वरुप होय. मी अमुक-अमुक आहे ही भावना जागृत होणे म्हणजे अहंकार होय. त्या अहंकाराबरोबर त्याला खुश ठेवण्यासाठी काय हवे याची यादी येतेच. विद्यार्थ्याला परीक्षेत खूप गुण हवेत, गरीब माणसाला पैसे हवेत, लग्नार्थ्याला मनपसंग पत्नी हवी, मुलाला प्रेमळ आई हवी इत्यादी. तेव्हा तुम्ही कुठला अहंकार नष्ट करणार? आपण एक आहोत, आपले एकच अस्तित्व आहे उआची इतकी संपूर्ण खात्री आपणास आहे की आपली इतकी अनंत रुपे आहेत आणि प्रत्येकाचा अहंकार ते रुप घेतल्यावरच जागृत होत आहे ही वस्तुस्थिती आपल्या ध्यानात येत नाही.

अहंकार नष्ट करायचा आहे असे साधकाचे रुप तुम्ही घेतले की बाकीचे अहंकार आहेत तरि कुठे?!! आणि ते अहंकार बघायला त्यांच्या अनुषंगाने जे रुप घ्यायला पाहिजे ते घेतले तर अहंकार मर्दन करणारा कुठे गेला?! ज्याप्रमाणे उंदराच्या एकाच बीळाला कित्येक तोंडे असतात त्याचप्रमाणे आपल्या एकाच अस्तित्वाला अहंकाररुपाने बाहेर येण्याकरीता अनंत रुपे असतात. त्यांचा नाश करणारा अजून एका वेगळ्याच रुपात असतो. मग आपण आपल्या अहंकाराचा नाश कसा करणार? ते शक्य आहे का?

रुपेच नष्ट झाली पाहिजेत. त्याशिवाय अहंकार नष्ट होणार नाही. मनरुपी पडदा फाटल्याशिवाय प्रकृती लोप पावत नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यामागील कारण आज आपणास कळले आहे. करा त्याग आपल्या विविध रुपांचा. व्यावहारिक रुपांचा त्याग म्हणजे काय? तर त्या रुपांपेक्षाही अजून जवळीक आपल्या भक्‍तरुपाबद्दल वाटली पाहिजे. भगवंताची भक्‍ती याशिवाय जगात दुसरे काहीही सत्य नाही ही गोष्ट जेव्हढी तुमच्या मनावर बिंबेल तेव्हढा तुमचा अहंकार कमी होईल. झालाच पाहिजे कारण भक्‍ताचा अहंकार भक्‍ताला जाळत नाही तर शीतल प्रकाश देऊन मार्ग दाखवितो. काजव्याला आपण हातात धरु शकतो पण अग्नीला नाही. तेव्हा आपल्या भक्‍तीचा मिणमिणता काजवा आपण जोपासला पाहिजे. ही जोपासना करण्यास जे धैर्य लागते (बाकी सर्व जग आपणास वेड्यात काढेल ही भीती नष्ट व्हायला धैर्याचीच जरुरी आहे.) ते अंगात येणे म्हणजे गुरुकृपा होय. हे धैर्य आपल्यात होतेच. फक्‍त ते बाहेर आले नव्हते. आता त्याच्याशी ओळख झाल्यावर आपण त्याचा वापर करु शकतो आणि स्वतःच्या साधनेतच रममाण होण्यात धन्यता मानू लागतो. अशी स्थिती निर्माण झाली की आपले क्षेत्रज्ञ हे रुप प्रगट होण्यास फार अवकाश नाही हे ध्यानात घ्या.

तेव्हा आज एवढेच आपण बघू की अहंकार नष्ट करणे शक्य नसेल तर आपण असे रुप धारण करु की ज्या रुपाचा अहंकार आपणास बोचणार नाही तर सुखावह असेल. भगवंतभक्‍ताचे रुप धारण करा. त्याकरीता जे योग्य आहे ते करा (नाम घेणे, व्यावहारिक आसक्तींचा त्याग करणे इत्यादी) आणि सुखी व्हा.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ७ सप्टेंबर २००८)

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s