(446to451)/11: On Arjuna’s fear

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मियां होआवया समाधान । जी पुसिले विश्वरुपधान ।

आणि एकेचि काळें त्रिभुवन । गिळितचि उठिलासि ॥ ४४६:११ ॥

तरि तू कोण का येतुली । इये भ्यासुरे मुखें मेळविली ।

अवघियाचि करीं परजिली । शस्त्रे काह्या ॥ ४४७:११ ॥

जी जंव तंव रागीटपणे । वाढोनि गगना आणितोसि उणे ।

का डोळे करुन भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८:११ ॥

एथ कृतांतेसि देवा । कासया किजतसे हेवा ।

हा आपुला तुवा सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९:११ ॥

या बोला म्हणे अनंत । मी कोण हे आहासी पुसत ।

आणि कायिसयालागी असे वाढत । उग्रतेसी ॥ ४५०:११ ॥

तरि मी काळ गा हे पुढे । लोकसंहारालागी वाढे ।

सैंघ पसरली आहाती तोंडे । आता ग्रासीन हे आघवे ॥ ४५१:११ ॥

भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायात अर्जुनाला भगवंताच्या विश्वरुपाचे दर्शन होते. दहाव्या अध्यायातील विभूतींचे वर्णन ऐकून अर्जुनाच्या मनात अशी पूर्ण खात्री झाली की या चराचरातील प्रत्येक अणूरेणूंत श्रीकृष्ण ठासून भरलेले आहेत. परंतु अजून साधना परिपक्व न झाल्याने त्याच्या मनाचे संपूर्ण समाधान झाले नाही. आयुष्यभर प्रत्यक्ष जे पाहिले आहे त्यावरच संपूर्ण विश्वास असल्याने सर्वजीवांमध्ये भगवंत स्थित आहे हे कळले तरी `वळले’ नव्हते. आपला विश्वास अजून दृढ होण्याकरीता अत्यंत लडिवाळपणे तो भगवंताना प्रार्थना करीतो की आपले विश्वरुप याची देही याची डोळा बघावे ही इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे तरी ती बरोबर आहे की नाही हे आपणच ठरवा (जर ती योग्य असेल तर आपण पूर्ण करालच!). भगवंतांचे अर्जुनावर इतके प्रेम आहे की जी गोष्ट त्यांनी आपल्या माता-पित्यांना, बंधू-सहोदरांना, सनक-सनांदन सारख्या अनन्य भक्‍तांना उघड करुन दाखविली नाही ती अर्जुनाला दाखविली. माउली म्हणते की यात नवल काही नाही कारण अर्जुनाने स्वतःच्या जीवनात श्रीकृष्णाशिवाय दुसरे काहीही महत्वाचे मानले नव्हते. संसारात राहूनदेखील इतकी अनन्य भक्‍ती जो करतो त्याला भगवंत अंकीतच होतो. असो. परंतु एकदा विश्वरुप दिसायला लागल्यावर अर्जुनाच्या लक्षात आले की हे रुप सावळ्या कृष्णासारखे सौ‍म्य नाही तर अत्यंत भ्यासुर आहे. जिकडे बघावे तिकडे हे रुप संहार करीत आहे. मोठ-मोठे ऋषीमुनी याच्या मुखात शिरत नष्ट होत आहेच आणि बाकीच्यांची वार्ता तर अगदीच केविलवाणी झाली आहे. जन्माला आल्याक्षणीच जणू त्यांचा विनाश होत आहे असे दिसत आहे. आणि ज्याप्रमाणे अग्नीत इंधन घातल्यावर (त्याचे समाधान न होता) तो अधिकच भडकतो त्याचप्रमाणे जेव्हढा संहार होत आहे तेव्हढीच याची भूक प्रज्वलीत होत आहे. हे सर्व बघून त्याच्या मनात अत्यंत भय निर्माण झाले. त्याला वाटले की गंमत म्हणून आपण विश्वरुप बघावे असे ठरविले आणि त्यात सर्व जगाचा अंतच व्हायला लागला! म्हणून तो भगवंतांना भयपूर्वक विचारीत आहे : `मी मनाचे समाधान करण्यासाठी विश्वरुप बघायचा हट्ट धरला आणि तू सर्व त्रिभुवन का गिळायला लागलास (खात असे न म्हणता, नुसते गिळतो आहे असे लिहिले आहे! किती समर्पक शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले आहेत बघा!). तू खरा कोण आहेस आणि का म्हणून इतका संहार करीत आहेस? आणि तुझ्या उग्रपणाला अंतच का दिसत नाही. अधिकाधिक डोळे मोठे-मोठे करुन का सर्वांना भेडसावत आहेस? प्रत्यक्ष कृतांताला तुझा हेवा वाटावा असे रुप का धारण केलेस? यावर अनंतरुपी भगवंत उत्तर देतात की अरे मी प्रत्यक्ष काळ आहे आणि माझी वृध्दी निव्वळ लोकसंहारासाठीच आहे आणि एक क्षण लागता हे सर्व चराचर मी भक्षण करणार आहे.’

संसार-परमार्थातील अंतर । कळे तो खरा चतुर ।

न लावता दोघांमध्ये पदर । घोटाळा ठेविला असे ॥

करुन सांसारिक प्रगती । होईल अध्यात्मिक उन्नती ।

असे म्हणताक्षणी अधोगती । निश्चितच होतसे ॥

अनेकवेळा आपण गंमत म्हणून एखादी गोष्ट सुरु करतो आणि त्याचे एकदम भयंकर परिणाम होतात. त्यांना सामोरे जाण्याखेरीज दुसरा पर्याय आपणासमोर नसतो. सुरुवातीला गंमत म्हणून क्वचित सिगारेट ओढणारे पुढे आयुष्यभर त्या पांढऱ्या नळकांडीचे गुलाम होऊन जगतात. वा लहानपणी कुणाएकाची जीवाला बोचणारी चेष्टा केली तर तो आयुष्यभर आपल्याशी संबंध तोडतो इत्यादी घटना आपण सर्व अनुभवतो. परमार्थातही हा नियम लागू पडतो. अर्जुनाच्या मनातील भिती अगदी अशा प्रकारचीच आहे. गीतेच्या सुरुवातीला त्याला फक्‍त हे जाणून घ्यायचे होते की आपल्या सुह्रुदांशी लढणे नैतिकदृष्टीने बरोबर आहे की चूक आहे. यावर नैतिकता म्हणजे काय इथपासूनच भगवंताचा उपदेश सुरु झाला! आणि भगवंतांचे सर्व बोलणे इतके पटत होते की नकळत अर्जुन अशा स्थितीला पोहोचला की आजच्या युध्दाची गोष्ट बाजूला राहीली आणि गूढ अध्यात्मिक तत्वज्ञानाचा उदय झाला. परंतु अजूनही जगाबद्दलची आस्था संपूर्ण नष्ट झाली नसल्याने त्याला स्वतःच्या ज्ञानासाठी चराचराचा नाश होणे मंजूर झाले नाही. म्हणूनच त्याच्या मनात भिती उत्पन्न झाली. कुठलीही भिती प्रिय वस्तूच्या, वा तत्वाच्या नाश होणार या कल्पनेने निर्माण होते (प्रत्यक्ष विनाश झाला की भिती जाऊन विषाद निर्माण होतो). घटना घडण्याच्या शक्यतेने भय निर्माण होते आणि आपले हात-पाय गळून जातात (ज्यांना बुध्दीबळ खेळायला आवडत असेल त्यांना हे माहितच असेल की प्रत्यक्ष आक्रमणापेक्षा `मी आक्रमण करीन’ अशी शक्यता निर्माण करणे ज्याला जमते त्याचे डावपेच अधिक कुटील असतात!). असो. आज आपण अर्जुनाला सर्व जगाचा विनाश होत आहे असे का दिसले असेल याबद्दल विचार करु.

जन्मापासून आपण स्वतःला एकसंध मानत असतो. खरोखर माझ्या मनात अजिबात संदेह नाही की श्रीधर इनामदार म्हणून ज्या अस्तित्वाला पुकारले जात आहे ते एक आहे. दोन श्रीधर माझ्यामध्ये वसत नाहीत हे मला स्वानुभवाने, कुठल्याही इंद्रियाचा उपयोग न करीता (अपरोक्ष ज्ञान) कळत आहे. म्हणूनच जर मी केस कापले वा नखे कापली तरी मला स्वतःला कमी झालो असे मानत नाही वा व्यायामशाळेत जाऊन स्नायू मजबूत बनविले तर स्वतःला दुसरे नाव देत नाही. परंतु माझ्या देहात निश्चितच बदल होत आहे. पहिल्या घटनेत देह कमी झाला तर दुसऱ्यात त्यात वर्धन झाले. क्षणोक्षणी देहात परिवर्तन होत असताना देखील मी स्वतःला एक मानत आहे यात मला काहीही विसंवाद भासत नाही. हे माझ्याकरीता शाश्वत सत्य आहे की मी एक आहे आणि लहानपण, तारुण्य वगैरे माझी रुपे आहेत. अध्यात्माचे ध्येय काय आहे तर आपले हे `एक’रुप जाणणे. गंमत म्हणून मी सुरुवात केली की बघायला पाहिजे की खरोखर मी स्वतःला का एक समजत आहे. का म्हणून माझ्या मनात मी काल अमुक सांगितले या विचाराऐवजी कालचा श्रीधर अमुक-अमुक म्हणत होता अशी भावना येत नाही? आणि समजा मला माझे ते आत्मरुप मला सापडले तर काय होइल हा विचार मी तेव्हा केला नव्हता. करायची आवश्यकता वाटली नाही म्हणा वा सद्‌गुरुंनी हा संदेह उत्पन्न होऊ दिला नाही म्हणा. वस्तुस्थिती आहे की परमार्थातील अंतिम ध्येय आहे तरी काय असा विचार करुन मी साधना सुरु केली तेव्हा ध्येय कळल्यावर काय होईल याची फारशी पर्वा नव्हती. अर्जुनाने खरे काय आहे हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मिळाले तर काय होइल हा विचार केला होता का?!

कधीही न बदलणारे आत्मरुप सापडले वा त्याच्याबद्दल आत्यंतिक जिव्हाळा उत्पन्न झाला की आपल्या बाकीच्या निरंतर बदलणाऱ्या रुपांबद्दलचे ममत्व नष्ट व्हायला लागते. शेवटी मनाचा स्वभाव असा आहे की एकावेळी एकच गोष्ट त्याला पटते. तेव्हा आत्मरुपाचे ज्ञान होणे यातच माझे शिक्षक, वा पती वा भाचा वा मामा ही रुपे नष्ट होणे लिहिले आहे. आत्मरुपात घुसल्यावर होणारा अनिर्वार्य परिणाम आहे तो. मग मी भाचा राहिलो नाही तर मामा नष्टच झाला की! मी माझ्या मामा या रुपापासून मुक्‍तता करण्यामध्येच माझ्या भाच्यांचा विनाश होतो. हो की नाही? तेव्हा अकराव्या अध्यायात अर्जुनाला सर्व जगाचा नाश होत आहे असे दिसले याचे कारण असे असू शकेल की या जगाशी जोडणारे त्याच्याच विविध दृष्य रुपाचे धागे तुटत होते. ते धागे ज्या रीळाला गुंडाळले आहेत त्या रिळाशी संबंध जोडल्यावर होणारा परिणाम आहे हा. म्हणूनच अर्जुनाने घाबरुन परत पूर्वीसारखा हो अशी विनंती केल्यावर श्रीकृष्णाने आपले अतिसुंदर घनश्याम चतुर्भुज रुप धारण केले आणि अर्जुनाला जग आहे तसे दिसायला लागले. अहो, जगात फरक झालाच नव्हता, फरक पडला होता अर्जुनात. ज्याप्रमाणे जत्रेतील चित्रविचित्र आकाराचा आरशांमध्ये आपला देह वेगवेगळे रुप धारण करतो त्याचप्रमाणे आपल्या मनरुपी आरशावर जे जगाचे प्रतिबिंब पडत असते त्याचा नाश मनाच्या नाशाबरोबर लिहिलेलाच आहे. तेव्हा अर्जुनाला चराचराचा नाश दिसला यात नवल ते काय?!

लक्षात ठेवा की अध्यात्मात प्रगतीचा निकष व्यावहारिक गोष्टीत बघणे संपूर्ण चुकीचे आहे. परमार्थात प्रगती केल्यावर जगाबद्दलची आसक्‍ती कमी व्हायला लागते, जगात उन्नती होत नाही. श्रीसंत गोंदवलेकर महाराजांना एका माणसाने सांगितले की `मी तुमच्याकडे येणे बंद केले कारण तुम्ही सांगितल्यानुसार नाम घ्यायला सुरुवात केल्यावर जगावरची आसक्ती कमी व्हायला लागली हो!’ अर्जुनाची भिती आणि वरील उद्‍गार यात प्रचंड साम्य आहे. उगाच खेळ म्हणून, ज्ञानेश्वर महाराज आहेत तरी कोण, ते काय सांगताहेत अशा कुतुहलाने जरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आणि जगाचा वीट येऊन ज्ञानेश्वरी पारायण केले तरी त्यांचा परिणाम एकच होतो. पहिल्या साधकाला भिती वाटेल तर दुसऱ्याला आनंद! मनाची तयारी ठेवा की शाश्वत आनंद भोगायचा असेल तर अशाश्वत आनंदाची आवड सोडली पाहिजे. दोन्ही एकाच काळी, एकाच स्थळी एकत्र नांदू शकत नाहीत. तेव्हा परमार्थात पाउल टाकण्याआधी जरा विचार करा की आपल्याकडे जे काही आहे त्याची किती अभिलाषा आपणास आहे. बहुतांशी लोक आहे त्यात सुख मानण्यातच आयुष्याची परमावधी मानतात. तोंडातल्या गळाला जे आमीष लावले आहे त्याचा त्याग केल्याशिवाय पाण्यातील माशाला स्वातंत्र्य मिळेल काय? व्यावहारिक जगातील गोष्टींने जे सुख मिळते त्यातील अनित्यता जाणून घ्या. मग तरीही त्यात तुम्हाला गंमत वाटत असेल तर खुशाल रमा आपल्या जीवनात. परंतु आज जे काही वाचले आहे ते मनात ठेवा. योग्य वेळ येईल तेव्हा त्याचा उपयोग होइल.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ३१ ऑगस्ट, २००८)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: