(232to259)/3: Truth is ever new

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अर्जुन उवाच – अथ केन प्रयुक्‍तोऽयं पापं चरति पूरुषः ।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित: ॥ भगवद्गीता, श्लोक ३६ : ३ ॥

श्रीभगवानुवाच – काम एष क्रोध एव रजोगुणसमुद्भव: ।

महाशनो महापाप्मा विध्द्येनमिह वैरिणम्‌ ॥ भगवद्गीता, श्लोक ३७:३ ॥

श्री रामकृष्ण परमहंसांंच्या जीवनातील घटना अलौकिक आहेत. ज्यावेळी त्यांच्या मनात एखादी साधना करायची इच्छा निर्माण व्हायची त्यावेळी त्या ठराविक साधनेतील परमोच्च ज्ञान झालेला साधू त्यांच्याकडे आपणहून यायचा व ती विद्या त्यांना शिकवून व स्वतःचे ज्ञान आणखी सखोल करुन आपल्या मार्गाला चालू पडायचा. आपल्या कालीमातेचे कलकत्याजवळील दक्षिणेश्वर येथील मंदीर न सोडता त्यांनी साधनेतील सर्व मार्ग पडताळून पाहिले. ज्यावेळी साधक उच्चप्रतीचा असतो तेव्हा गुरु आपणहून त्याच्याकडे हजर होतात या म्हणीचा साक्षात प्रत्यय म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांचे जीवन होय. असाच एके दिवशी त्यांच्याकडे एक योगी आला. त्याचे नाव होते तोतापुरी. संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेला तो नागा योगी नग्न अवस्थेत आपला मध्यभारतातील आश्रम सोडून संपूर्ण भारतवर्षभर विनाहेतु, मनमानी भ्रमण करीत असताना कलकत्याजवळच्या दक्षिणेश्वर येथील कालीच्या देवळात आला. येथील पुजारी म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. त्यांना गंगाकाठी चिंतन करताना बघितल्यावर त्या योग्याच्या मनात अत्यंत आपुलकी निर्माण झाली. अद्वैत प्रणाली शिकण्यास अत्यंत योग्य असा शिष्य आपणासमोर आलेला आहे याची संपूर्ण खात्री पटून त्यांनी श्री रामकृष्णांना विचारले की तू माझा शिष्य होणार का? काली मातेची अनुमती (`तुला शिकविण्याकरीताच मी त्याला इथे आणला आहे’ असे मातेने उत्तर दिले!) घेऊन रामकृष्णांनी स्वतःला नंगटाच्या (नंतर ह्या नावाने श्री रामकृष्ण परमहंस त्यांना संबोधायचे) हवाली केले. शास्त्रोक्त विधीनुसार संन्यासाश्रम स्वीकारल्यावर नंगटाने `या जगातील सर्व नश्वर गोष्टी ज्या शाश्वत वस्तूच्या पायावर उभ्या आहेत त्याचे ध्यान कर’ असा उपदेश केल्यावर त्याचदिवशी रामकृष्ण परमहंस निर्विकल्प समाधीत स्थित झाले! नंगटाने तीन दिवसानंतर त्यांना बंद करुन ठेवलेल्या झोपडीचे दार उघडले व तो आश्चर्यचकित झाला की जी अवस्था तीस वर्षांच्या अथक तपानंतर आपणास मिळाली ती ह्या साधकाला एका क्षणात कशी मिळाली?! नंतर नंगटा त्या देवळात सहा महिने राहीला व स्वतःच्या अद्वैत ज्ञानात भक्‍तीची भर घालून हिमालयात गेला. एकदा सकाळी नेहमीप्रमाणे आपला पितळी कमंडलू धुनीतील राखेने साफ करीत असताना रामकृष्ण परमहंस तिथे आल्यावर त्याने उपदेश केला: `ज्ञान प्राप्त झाल्यावर दररोजची नित्यनैमित्तिक साधना करणे आवश्यक आहे नाहीतर या कमंडलूप्रमाणे त्या ज्ञानावर परत काजळी येईल.’ यावर त्याला प्रत्युत्तर मिळाले की `पण सोन्याच्या भांड्यांना साफ करीत बसायची गरज नसते!’ श्री रामकृष्ण परमहंस सोन्याचे भांडे होते हे खरे आहे परंतु त्यांच्या अद्वैत साधनेचे गुरु श्रीतोतापुरी स्वतःला पितळी भांडे समजायचे हेही तितकेच खरे आहे. तीस वर्षे खडतर तपश्चर्या करुन ज्ञान प्राप्त केलेल्या त्यांच्यासारख्यांची ही अवस्था तर सर्वसाधारण साधकाची काय गती असेल?

आज निरुपणाला घेतलेल्या पहिल्या श्लोकावरून अर्जुनाला ही वस्तुस्थिती जाणविलेली दिसत आहे. तो म्हणत आहे:

तरी देवा हे ऐसे कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे ।

मार्ग सांडूनि अनारिसे । चालत देखो ॥ २३२:३ ॥

सर्वज्ञही जे होती । हे उपायही जाणती ।

तेही परधर्मे व्यभिचरती । कवणे गुणें ॥ २३३:३ ॥

जे असता संग सांडिती । तेचि संसर्ग करितां न धाती ।

वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५:३ ॥

ऐसा बलात्कारु एक दिसें । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।

हे बोलावे ह्रुषीकेशें । पार्थ म्हणे ॥ २३८:३ ॥

`हे देवा, ज्ञानीलोकांची मती विचलित कशी होते? चांगला मार्ग सोडून वाकड्या मार्गात ते का घुसतात? सर्वकाही माहित असून आणि काय करायला हवे हे जाणत असून, कुठल्या शक्‍तीमुळे ते परधर्म आचरतात? असलेला संग टाकून देऊन भगवंताचे ध्यान करीत असताना परत नवीन संगत का जोडतात? वनवासाश्रम स्वीकारलेले साधूही परत जनलोकात का येतात? हा अत्याचार कुणाचा आग्रह आहे हे तुम्हीच मला सांगा.’ असे तो म्हणत आहे.

सत्य असते नित्यनूतन । गतज्ञानाचे सोडा भान, मान ।

वर्तमानात ठेवा मन । तरीच राहील अखंड अनुसंधान ॥

समजा आयुष्यभर एखाद्या विचारसरणीची आपल्याला सवय असेल तर कुठल्याही नवीन गोष्टीचे ज्ञान करण्यासाठी आपण तीचाच वापर करतो. विशेषतः त्या सवयीचा आत्तापर्यंत फायदाच झाला असेल तर आपल्या मनात तीच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झालेली असते आणि तो स्नेह तोडणे फार अवघड होते. हा मुद्दा आपल्या ज्ञान म्हणजे काय व ज्ञान झाले म्हणजे काय याबद्दलच्या मानदंडांना लागू होतो. आत्तापर्यंत निव्वळ व्यवहारातीलच गोष्टी निरंतर करीत असल्याने आपल्या मनात १. ज्ञान म्हणजे कुठल्यातरी गोष्टीवर प्रभुत्व मिळविणे (उदाहरणार्थ, परिक्षेत चांगले मिळविणे म्हणजे त्या विषयाबद्दलचे ज्ञान चांगले असेच आपण मानतो) आणि २. एकदा ज्ञान प्राप्त झाले की मग आयुष्यभर ते तसेच राहणार हे दोन पूर्वग्रह दृढ आहेत. असे बघा, मी ३० वर्षांपूर्वी दहावी पास झालो आहे आणि आज आत्ता याक्षणी दहावीच्या परिक्षेला बसलो तर उत्तीर्ण होईन की नाही याबद्दल शंकाच आहे, तरी मी स्वतःला दहावी पास आहे असेच म्हणतो! नुसते तसे म्हणत नाही, तर त्या कधीकाळी दिलेल्या परिक्षेतील गुणांच्या जोरावर आजही स्वतःला हुशार आहे असे मानायला मी कमी करीत नाही. एकदा स्वतःची हुशारी परिक्षेत चांगले गुण मिळवून सिध्द केली की आयुष्यभर मी हुशार! नुकतेच मी वाचले आहे की जर्मनीत संशोधकांनी दोन दिवस समुद्रकिनाऱ्यावर जाऊन नुसता आराम केलेल्या माणसांवर संशोधन करुन असे सिध्द केले आहे की दोन दिवस न वापरल्याने त्यांच्या मेंदूची क्षमता दहा टक्के कमी होते. परंतु त्या माहितीमुळे मी स्वतःची हुशारी तीस वर्षात कमी झाली असेल असे मानतो का? नाही. मी आपला आयुष्यभर हुशार! आपली ही ज्ञानाला शाश्वत मानायची सवय इतकी अंगात भिनली आहे की आपली विचारसरणी त्या सवयीवर आधारीत आहे हेसुध्दा आपण विसरलो आहोत. परमार्थातही आपण आपले मानदंड लावतोच.

उदाहरणार्थ बघा, भगवंताची प्राप्ती करायची आहे असे सर्वोत्तम ध्येय जरी आपण ठेवले तरी प्राप्ती म्हणजे काय याचा निकष कुठला ठेवतो? ज्याप्रमाणे घरात टी.व्ही. आणायचा आहे हे ठरविल्यावर तो एकदा घरात आणून ठेवला की आपले काम होते त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्याजवळ गेलो की काम झाले असा विचार आपल्या मनात असतो. हो की नाही? पाच मिनिटापूर्वी भगवंताचे दर्शन झाले होते. ते दर्शन आता भूतकाळात जमा झाले आहे. आत्ता याक्षणी भगवंत आपल्यापासून दूरच आहे तेव्हा आता परत साधना सुरु करायला हवी असे तुम्हाला वाटते का? असे होईल हा विचार तरी तुम्ही केला आहे का?! जशी नोकरी मिळवायची तसा भगवंत मिळवायचा, परिक्षेत गुण प्राप्त करायचे तसा भगवान प्राप्त करायचा हीच भावना आपल्या मनात असते. हो ना? खेळामध्ये भोज्याला हात लावला की आपण सुटतो तसेच काहीतरी करुन एकदा भगवंताची प्राप्ती झाली की आपले आयुष्य निरंतर उज्वल, भव्य शांत सर्वगुणसंपन्न होईल आणि मग आयुष्याचा अंत होईपर्यंत तसेच राहील ही भावना आपल्या प्रयत्‍नांपाठी आहे. खरे ना? एका अर्थाने आपली ही खात्री आपल्या साधनेचे मूळ आहे. कारण साधना करीत असताना आपण अशा टप्प्याची वाट पाहत असतो की एक दिव्य स्थिती प्राप्त होईल आणि त्यानंतर आपले आयुष्य अत्यंत उज्वल राहील. साधनेबद्दल अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे आपल्या साधनेचा हा पायाच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा जेव्हा पायाच चुकीचा आहे तर त्यावर उभारलेला साधनारुपी इमारतीचा डोलारा सुरक्षित कसा राहील? म्हणून वर्षोनुवर्षे व्यवस्थित चाललेली साधना काही दिवसात नष्ट झालेली आपण बघतो. विश्वामित्राची तपस्या एका क्षणात भंग का झाली? विश्वामित्र ऋषींची साधना एका नृत्याने भंग झाली या घटनेपेक्षा ती अशी भंग होऊ शकते या शक्यतेची भिती आपणास वाटली पाहिजे. ही शक्यता का अस्तित्वात आहे हे जाणून घ्या. जाणून घ्या की पाया डळमळीत होता म्हणून उंच इमारत कोसळली. दुसरे काही नाही. दुसरे उदाहरण म्हणजे श्रीसंत नामदेवांचे होय. लहानपणापासून भगवंतांशी जवळीकीचे नाते जोडलेल्या नामदेवांनाही चिमुरड्या मुलीकडून `मडके अजून कच्चे आहे’ अशी योग्य टिंगल ऐकावी का लागली याचे कारण त्यांच्या साधनेचे त्यावेळचे ध्येय चुकीच्या पायावर उभारलेले होते हेच आहे. नंतर श्रीसंत विसोबा खेचरांकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांना कधीही असे कठोर शब्द परत ऐकावे लागले नाहीत ही बाब विचारनीय आहे.

सर्व संतांना या वस्तुस्थितीची जाणीव होती हे स्पष्ट दिसते. श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानेश्वर महाराज या पदाला योग्य झाल्यानंतरही म्हणतात `तैसा मी एक पतित, परि तुझा मुद्रांकित.’ श्रीसंत तुकाराम महाराज भगवंतदर्शन झाल्यानंतरही म्हणतात की `पतित, पतित, पतित. मी त्रिवाचा पतित.’ भगवंतांनी त्यांना दर्शन दिले त्यायोगे त्यांचे पुढील जीवन पवित्र का झाले नाही? कारण ती गोष्ट भूतकाळातील होती, तीची आठवण म्हणजे उधारीवर जगणे आहे!! आत्ता याक्षणी रोकडे काय दिसत आहे? माझे संकुचित देह-मन संकुलाचे अस्तित्व. म्हणजे मी पतित झालोच की. भगवंत ही एकच गोष्ट आपल्या आयुष्यात खरी आहे आणि त्या सत्यतेचे रुप दरक्षणी बदलत आहे. भगवान श्री रमण महर्षींना एकदा एकाने विचारले की `कुणीही साधना कुठली करावी असा प्रश्न विचारला की तुम्ही `मी कोण आहे’ याचा विचार कर असेच का सांगता?’ त्याला भगवानांनी उत्तर दिले की `सत्य हे नित्यनूतन असते!’ म्हणजे मी जरी एकच वाक्य बोललो तरी त्याचा अर्थ साधकाच्या मनात दरवेळी वेगळा असल्याने तो सल्ला खऱ्या अर्थाने कालच्या उपदेशापेक्षा वेगळा होता असे त्यांना म्हणायचे होते! त्या दोन सल्ल्यांचे बाह्य अंग, म्हणजे श्री रमणमहर्षींनी उच्चारलेले शब्द, एकच होते पण त्यामागची शक्‍ती नूतन असल्याने त्याच वाक्याचा बोध साधकाच्या दृष्टीने निराळा होता. भगवंताची प्राप्ती अशीच असते हे लक्षात घ्या.

भगवान या शब्दाचा अर्थच आपल्या जीवनात क्षणोक्षणी बदलत असतो. ज्याक्षणी त्याचे रुप निर्गुण होईल, आत्मरुपी होईल तेव्हा तो सतत तुमच्याजवळ राहू शकतो आणि मग तुम्ही कधीही पदच्युत होणार नाही हे अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर आहे. जोपर्यंत भगवंत तुमच्याहून कुणी अन्य व्यक्‍ती (जसे की तुमचे गुरु, काही इष्टदेवता इत्यादी) वा शक्‍ती आहे (जसे `न्याय’, `नीती’ ने वागणे, प्रकृतीवर ताबा ठेवण्याची पात्रता येणे इत्यादी) तोपर्यंत तुम्हाला पदच्युत होण्याची भिती आहे. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की तसे तुम्ही पदच्युत होणारच. कारण काम आणि क्रोध तुमच्यामध्ये अजून शिल्लक आहेत. याचे कारण असे:

१. तुमच्याहून अन्य काहीतरी प्राप्त करायचे आहे ही इच्छेत आहे काम आणि

२. ती दुसरी गोष्ट आपल्याजवळच सतत राहीली पाहिजे या आग्रहात आहे दडलेला क्रोध.

जोपर्यंत साधनेचा अंत म्हणजे एक काहीतरी एक चमत्कार होईल, दिव्य प्रकाश वा दर्शन होईल आणि त्यानंतर आपले आयुष्य नितांत सुंदर, संपूर्णपणे परिपूर्ण होईल ही अपेक्षा आपल्या मनात दडलेली आहे तोपर्यंत खरा भगवंत आपल्यापासून दूर आहे. साधनेला अंतच नाही. दररोजचा श्वास घेणे हे जसे आपण थांबवित नाही कारण मगाशी घेतलेल्या श्वासाचा उपयोग होऊन आता तो निष्फळ झालेला आहे याची खात्री आपणास नवीन श्वास घ्यायला भाग पाडते. त्याचप्रमाणे आपली साधना नित्यनूतन आणि चेतनादायी राहणार आहे हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा तुमचे ध्येय तुमच्या साधनेतच सामाविले जाईल. आयुष्यभर साधना चालू राहू दे ही एकच मागणी जेव्हा तुम्ही साधनेला कराल तेव्हा ती प्रसन्न होऊन तुमच्या रोमारोमात भिनेल आणि त्यात तुम्हाला वर्तमानकाळात जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. कुठल्याही मूर्तीमध्ये, व्यक्‍तीमध्ये न अडकता आपले जीवन संपूर्णपणे जगण्याचे आनंददायी स्वातंत्र्य तेव्हा तुम्हाला प्राप्त होईल. मग आणि मगच काम आणि क्रोध तुमच्याजवळ राहू शकणार नाहीत. सूर्य उगविल्यावर अंधार राहू शकत नाही त्याचप्रमाणे साधना करण्यासाठी साधना करायला सुरुवात झाली की अपेक्षा मावळतात आणि अपेक्षांचा आधार घेऊन असलेले सर्व रिपु नष्ट होतात.

भगवंताची प्राप्ती करणे हे साधनेचे प्राथमिक ध्येय असले तरी प्राप्ती म्हणजे काय यावर खोल विचार करा आणि त्या ध्येयाला दरवेळी नवीन अर्थ देत रहा. त्याने तुमचे जीवन कल्हई लावलेल्या भांड्यासारखे काळीमारहित होईल असे भगवंतांचे म्हणणे आहे.

॥ हरि ॐ ॥

( बंगळुरु, दिनांक ११ ऑक्टोबर, २००८ )

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s