(354to367)/13: Real meaning of “Arjav”

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

तरि आर्जव ते ऐसे । प्राणाचे सौजन्य जैसे ।

आवडे तयाही दोषे । एकचि गा ॥ ३५४:१३ ॥

 

का तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवी चंडाशु ।

जगा एकुचि अवकाशु । आकाश जैसे ॥ ३५५:१३ ॥

 

तैसे जयाचे मन । माणुसाप्रती आनआन ।

नव्हे आणि वर्तन । ऐसे पै ते ॥ ३५६:१३ ॥

 

जे जगचि सनोळख । जगेसि जुनाट सोयरिक ।

आपपर हे भाख । जाणणे नाही ॥ ३५७:१३ ॥

 

भलतेणेसी मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।

कवणेविखी आडळु । नेघे चित्त ॥ ३५८:१३ ॥

 

दिठी नोहे मिणधी । बोलणे नाही संदिग्धी ।

कवणेसी हीनबुध्दी । राहाटीजे ना ॥ ३५९:१३ ॥

 

अमृताची धार । तैसे उजू अंतर ।

किंबहुना माहेर । या चिन्हांचे ॥ ३६६:१३ ॥

 

तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवठा ।

जाण तेथेचि घरटा । ज्ञाने केला ॥ ३६७: १३ ॥

 

तेराव्या अध्यायात क्षेत्र म्हणजे काय आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणून जी काही शक्ती आहे त्याचे वर्णन केले आहे. अर्थात हे सांगण्यामागे भगवंतांचा हेतु असा हे शब्द अपरोक्षपणे जाणून घेणे हा साधनेचा एक मार्ग अर्जुनास खुला करणे. या मार्गाने चालून ज्या साधकाला ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानी माणसाच्या अंगभूत गुणांचे वर्णन करीत असताना भगवान श्रीकृष्णांनी `आर्जव’ हा शब्द वापरला आहे. ज्ञानी मनुष्यामध्ये आर्जव भिनलेले असते. आज आपण आर्जव म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु.

एकाच शब्दाचे प्रत्येक माणसाच्या जीवनात भिन्न पडसाद उमटत असतात. शेवटी शब्द म्हणजे काय तर आपल्या मनातील अमूर्त भावनांना दिलेले दृष्य रुप होय. रुप-रंग-गंध नसलेल्या मनातील विचाराला आवाजाचे कवच घालून दुसऱ्यांच्या कानावर घालण्याच्या ह्या क्रियेमध्ये मूळ भावना कितपत प्रगटली आहे हे बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणून पारमार्थिक दृष्टीकोणातून बघितल्यास अर्जुनाचा थोरपणा त्याच्या धनुर्धरपणात वा श्रीकृष्णाशी असलेल्या जवळिकीत नसून त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेमध्ये आहे असे वाटते. श्रीज्ञानेश्वरीतही वारंवार अर्जुनाने आपले अवधान आकाशाएवढे मोठे केले आहे, तो संपूर्णपणे आपले मन देऊन ऐकत आहे इत्यादी उल्लेख आपणास पहावयास मिळतात. ज्या कुणा भक्‍तांना स्वतःचे श्रीगुरु आपल्याकडे कमी लक्ष देत आहेत, वा त्यांचे कुणा दुसऱ्यावर खास प्रेम आहे असे वाटत आहे त्यांनी स्वतःचे ऐकणे सुधरविले पाहिजे. खरे गुरु कधीही पक्षपात करीत नाहीत. परंतु त्यांचे पूर्वीचे बोलणे आपण ज्या पध्दतीने ऐकतो (आपण केवळ शाब्दीक अर्थ घेतो का व्यावहारिक अर्थ घेतो वा त्यांच्या मनात काय असेल याचा विचार करतो यावर आपले खरे ऐकणे अवलंबून असते) त्याप्रमाणे त्यांचे पुढील बोलणे आपणास ऐकायला येते, वर्तन दिसते. असो.

तर सांगायचा मुद्दा असा की आर्जव हा शब्द ज्ञानी माणसाच्या एका गुणाला कवटाळून आहे असे आपण ऐकले आहे आणि ज्ञानी माणसाचा प्रत्येक गुण म्हणजे आपणास मिळणारा साधनेचा मार्ग. त्यामुळे हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात जे भाव उत्पन्न होतात त्याप्रमाणेच तुमची साधना होणार. हो की नाही? पण आपल्याला उमजलेला अर्थ आणि भगवंतांच्या मनात अभिप्रेत असलेला अर्थ जर वेगळा असेल तर आपली साधना योग्य दिशेला कशी जाईल? म्हणून आधी आपण कुठला अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या मनात आहे याबद्दल जरा संदर्भ बघितले पाहिजेत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आर्जव या शब्दाची फार सविस्तर व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये आपणाकरीता केली आहे. ते म्हणत आहेत: `आर्जव म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे प्राण सर्वांना एकसारखे जीवन देतो (चांगल्या माणसाला जास्त जिवंत आणि वाईट माणसाला कमी जिवंत ठेवित नाही!) किंवा सूर्य काही कुणाचे तोंड पाहून प्रकाश द्यावा का नाही याचा निर्णय घेत नाही, वा सर्व जगाला (मग त्यात एखादा सुंदर बगिचा असो वा घाणेरडा उकीरडा असो) कवटाळून आकाश असते त्याप्रमाणे सर्वभूतांशी समान वर्तन ठेवणे म्हणजे आर्जव होय. (आणि असे वर्तन ठेवण्याचे कारण काय, तर) या सर्व जगाशी त्याची एवढी जुनी ओळख असते की हा माझा आणि हा परका ही भाषासुध्दा तो विसरलेला असतो (मग त्या भाषेप्रमाणे वर्तन करणे दूरच राहिले!). ज्याप्रमाणे पाणि जवळ आलेल्या सर्वांची तहान भागविते (तसे करण्याआधी पाणि तुमच्या लायकीचा हिशोब मागत नाही!) त्याप्रमाणे तो सर्वांची मानसिक आर्तता शमवितो. कुणाकडे तो मिंध्या नजरेने पाहत नसतो (म्हणजे अमुक एका व्यक्‍तीचे मन सांभाळायला पाहिजे हा विचार त्याच्या मनात अजिबात येत नाही), उगाच गूढ बोलत नाही व कुणाला तो हीन मानत नाही. ज्याप्रमाणे अमृताचा कलश सर्वांना सुख देतो त्याप्रमाणे त्याचे अंतर्मन (सर्वभूतांबाबत) निर्मळ असते. या चिन्हसमुच्चयांचे माहेर (म्हणजे जणू याच्यातूनच हे गुण निपजले आहेत! `माहेर’ हा शब्द किती सुंदर आहे बघा. शेवटी हे गुण या जगात अस्तित्वात आहेत हे आपणास कळते केव्हा, तर अशा माणसाचे वर्तन बघितल्यावरच. तोपर्यंत हे गुण आपल्याकरीता सशाच्या शिंगासारखेच काल्पनिक असतात. म्हणून हे गुण त्याने जन्माला घतले आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणून तो स्वतः या गुणांचे माहेर आहे!!! माउली एका शब्दातून किती खोल अर्थ अत्यंत सुंदरपणे व्यक्‍त करीत आहे हे बघितल्यास डोळे पाणाविल्याशिवाय रहात नाहीत.) जो गृहस्थ आहे तिथे आर्जव वास करीत आहे आणि त्याठिकाणी ज्ञानाने आपले घर बसविले आहे असे तू खुशाल मान.’

 

आपण होतो जेव्हा मोठे । बाळपणीचे खेळ भासतात छोटे ।

मनाची ओढ होता भगवंताकडे । व्यवहाराचे आकर्षण आपोआप घटे ॥

 

काही भक्‍तांना असा प्रश्न पडलेला असतो की जर अमुक एक व्यक्ती संतपदाला पोहोचलेली आहे तर त्यांच्या आजूबाजूची माणसे अगदी सर्वसाधारण माणसांसारखी कशी वागतात? त्याहून मुख्य प्रश्न म्हणजे, ती माणसे आपल्या डोळ्यादेखत अशी सामान्यपणे वागत आहेत हे बघितल्यावरसुध्दा संत त्यांना आपल्याजवळ का ठेवतात?

खरे म्हणजे ह्या प्रश्नाचे मूळ आपल्या अपेक्षेत आहे. आपल्या मनात कुठेतरी संत म्हणजे एक आदर्श व्यक्‍ती असा विचार असतो. आणि आदर्श म्हणजे काय ह्याबद्दलचे प्रमाणसुध्दा आपणच ठरविलेले असते! आपल्या ह्या घट्ट धरलेल्या कल्पनांमध्ये जर संत बसले नाहीत तर आपण त्यांचा संतपणासुध्दा हिरावून घेण्यास कमी करीत नाही. वरील प्रश्नामध्ये `संतांनी स्वतःचे व आपल्या शिष्यांचे बाह्य वर्तन जगन्मान्य ठेविले पाहिजे’ ही आपली अपेक्षा आपणास दिसतसुध्दा नाही इतकी ती आपण गृहीत धरली आहे. हा आपला पूर्वग्रह मनात इतका रुजला आहे की तो `असत्य’ आहे हे आपण मानू शकत नाही. परंतु संतांच्या आर्जव या गुणाकडे बघून आपणास हे पटले पाहिजे की कुठलाही गृहस्थ संतांच्या जवळ असू शकतो. ज्याप्रमाणे पाणि तहान भागवण्याआधी आपल्याकडे योग्यतेचे सर्टिफिकेट मागत नाही त्याचप्रमाणे कुठलाही संत त्यांच्याजवळ जाण्याकरीता अमुक एक मानदंड ठेवित नाही. खरे म्हणजे बाकी कितीही अवगुण असले तरी `त्या संताच्या जवळ जाण्याची इच्छा असणे’ हा एक गुण जरुर त्यांच्याजवळ असलेल्या माणसांमध्ये असतो. तो एकच गुण पुरेसा असतो. लोखंडाचे सोन्यामध्ये परिवर्तन होण्यास त्याचे लोखंडपणाचे अवगुण काढायचे नसतात तर परिसाजवळ जायचे असते. तशीच ही घटना आहे. फरक इतकाच आहे की परीस एका क्षणात लोखंडाला बदलतो पण शिष्य स्वतःला हळूहळू बदलतात कारण ते लोखंडाप्रमाणे अनन्यभावाने संताजवळ आलेले नसतात. म्हणून बाकी सर्व अवगुणांना पुरुन उरणारा ह्या गुणाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. अनुयायांच्या बाह्य वर्तनामधील इतर अवगुणांकडे नाही!

कधी काही भक्‍तांना असे वाटते की आपली योग्यता एवढी चांगली आहे की संतांनी आपल्याशी बाकी साधकांपेक्षा वेगळे वागावे. जे लोक संतांजवळच्या माणसांच्या वागण्यात दोष बघत असतात त्यांच्यात हीच एक भावना सुप्त स्वरुपात असते! किंवा जो मनुष्य आत्ताच साधना करायला लागला आहे त्याच्याशी आणि माझ्याशी एकसारखेच वर्तन ठेवले की यांना संताप येतो. परंतु माउलींनी आर्जव या शब्दाच्या व्याख्येतच आपल्या अशा अपेक्षेचा फोलपणा सिध्द केला आहे. खरे संत कुणाचे मिंधे नसतात. केवळ व्यवहारात खूप संपत्ती वा मानसन्मान असलेल्या लोकांबरोबरच ते मिंधे नसतात असे नव्हे तर स्वतः साधनेत उच्च स्थिती प्राप्त केलेल्या साधकांबरोबरसुध्दा ते मिंधेपणाने वागत नाहीत. तुम्हाला जास्त वेळ द्यावा असे त्यांना केव्हा वाटते? जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा. म्हणून शहाण्या माणसाने एकदा संतांची कृपा हस्तगत केली (म्हणजे एकदा त्यांनी आपल्याकडे बघितले) की नंतर त्यांनी आपल्याला फार वेळ देऊ नये असे वागावे!!! म्हणजे आपल्या नैसरगिक अपेक्षेच्या अगदी उलट अनुभव येतील अशी साधना करावी.

आता विवेचन थांबविण्याआधी आपण संतांच्या आर्जवाचे कारण काय असेल याबद्दल विचार करु. जर आपल्या मनातसुध्दा हे आर्जव उत्पन्न करायचे असेल तर त्यामागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे कारण मनाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता पटली की आपणहून ते त्या वस्तूमागे धावते. संतांनी या जगाचे मिथ्यत्व संपूर्णपणे, स्वसंवेदनांनी, जाणलेले असते. हे जग मिथ्या आहे ही भावना वरकरणी दुःखदायक वाटली तरी त्यात भगवंताच्या सान्निध्याचे खरे सुख दडलेले आहे हे त्यांनी स्वतःच्या अनुभवाने पटवून घेतलेले असते. त्या सुखाची चटक त्यांना लागली असल्याने ती तल्लफ भागविण्याकरीता जे काही करावे लागते ते त्यांच्या हातून घडते. म्हणून या जगातील कुणा एका व्यक्‍तीला वा घटनेला वा वस्तूला खूप महत्व द्यावे हे त्यांच्या मनात येत नाही. ज्याप्रमाणे प्रौढत्व आल्यावर तारुण्यात ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत होत्या त्यांचे महत्व आपोआप कमी होते (जसे दर संध्याकाळी नाक्यावर जाणे!) वा तारुण्यात पदार्पण केल्यावर बाळपणातील खेळांमधील स्वारस्य निघून जाऊन नवीन गोष्टी हव्याशा वाटतात तशी ही गोष्ट आहे. आपल्या अंगात आर्जव बाणवायचे असेल तर आधी ही जगापलिकडील गोष्ट आहे (जीला आपण भगवंत हे नाव दिले आहे!) त्यात स्वारस्य निर्माण करा. त्या परमार्थात संपूर्णपणे रमणे म्हणजेच ज्ञानी होणे होय. दुसरे काही नाही. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीवर प्रवचने देणारा माझ्यासारखा गृहस्थ ज्ञानी आहे याची खात्री नसते. प्रवचन देणे, दुसऱ्याला उपदेश करणे हे ज्ञान आहे असे कुठेही उल्लेखिलेले नाही. कारण बुध्दीने काही ठराविक गोष्टी आत्मसात करुन त्यावर व्याख्यान देणे म्हणजे ज्ञान नव्हे. बुध्दीपलिकडील गोष्टीमध्ये रस वाटणे म्हणजे ज्ञानी होणे. किती संत प्रवचने देत हिंडली आहेत? स्वामी स्वरुपानंदांनी सबंध आयुष्यात तीन प्रवचने दिली होती. भगवान रमण महर्षी, श्री रामकृष्ण परमहंस यांनी एकही प्रवचन दिले नाही. खरी संतमंडळी स्वतःच्या नैसर्गिक वागण्यानेच एक असे वातावरण अवतिभवती तयार करतात की त्या वर्तुळात येणाऱ्या कुणाचेही मन शांत होते. तृप्त होते. मग जगाच्या दृष्टीकोणातून तो वाल्याकोळ्यासारखा पापी असला तरी फरक पडत नाही. जरुरी काय आहे तर आपल्या मनात संतांच्या जवळ जावे ही इच्छा वा तहान निर्माण होणे. ज्याप्रमाणे पाणि आपणहून कुणाजवळ जात नाही, सूर्य कुणाला झोपेतून उठवायला जात नाही त्याचप्रमाणे कुठलाही संत तुम्हाला व्यावहारिक बंधनांतून आपणहून सोडविणार नाही. पण जरा तुम्ही आपल्याला तहान लागली आहे हे कबूल करुन पाण्याजवळ गेलात वा आता झोप पुरी झाली असे मानून डोळे उघडले की तुमची तहान शमली आणि डोळ्यासमोरील अंधकार दूर झालाच हे समजा. संतांचे आर्जव त्यांच्याकडून हे सत्कर्म करवेलच! तेव्हा आर्जव अंगात बाणवायचे असेल तर भगवंताचे अनुसंधान ठऊन संसारात तटस्थ व्हा वा तसे तटस्थ व्हायला हवे ही इच्छा आत्यंतिकरीत्या जवळ बाळगा. संत तुमच्यापासून दूर नाहीत याची प्रतीती तुम्हाला येईलच.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक १६ नोव्हेंबर २००८)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: