(50to54)/2: On Arjuna’s Question

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

ऐसे अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारी ।

परि ते मना नयेचि मुरारी । आइकोनिया ॥ ५०:२ ॥

हे जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलो लागला ।

म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१:२ ॥

येऱ्हवी माझां चित्ती जे होते । ते मी विचारुनि बोलिलो येथे ।

परि निके काय यापरौते । ते तुम्ही जाणा ॥ ५२:२ ॥

पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलीचि प्राणु सांडिजे ।

ते एथ संग्रामव्याजे । उभे आहाती ॥ ५३:२ ॥

आतां ऐसेयांते वधावे । की अव्हेरुनियां निघावे ।

या दोहोमाजीं काइ करावे? । ते नेणो आम्ही ॥ ५४:२ ॥

श्रीमद्भगवद्गीतेची सुरुवात अर्जुनाच्या विषादाने होते. भगवान श्रीकृष्ण त्याला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभे केल्यावर आपल्या आप्तजणांना वैऱ्याच्या रुपात समोर उभे बघून अर्जुन विस्मित होतो. स्वतःच्या नातेवाइकांचा वध करुन राज्य प्राप्त करावे हे त्याला पसंद पडत नाही व त्याच्या मनात स्वतःच्या वर्तनाबद्दल संदेह निर्माण होतो. ह्या घटनेच्या वर्णनात गीतेचा संपूर्ण पहिला अध्याय व दुसऱ्या अध्यायातील पहिले आठ श्लोक वापरले आहेत. त्या श्लोकांमध्ये अर्जुन आपले मन मोकळे करुन श्रीकृष्णांना सांगतो. परंतु त्याच्या ह्या संपूर्ण वक्तव्यामध्ये भगवंत स्वतःहुन एकही शब्द उच्चारित नाहीत. स्वतःच्याच दुःखात मग्न असलेल्या अर्जुनाला भगवंतांचे मौन आधी लक्षात येत नाही. परंतु काही काळाने स्वतःवर आलेल्या बिकट प्रसंगाबद्दलची त्याच्यी आत्मीयता जरा कमी झाल्यावर त्याच्या ध्यानात येते की भगवतांनी त्याच्या बोलण्याचे अजूनपर्यंत अनुमोदन केलेले नाही. ही वस्तुस्थिती जाणविल्यावर त्याची मानसिक अवस्था अजून बिकट होते. आज निरुपणाला घेतलेल्या ओव्या त्याची ही अवस्था स्पष्ट करुन सांगत आहेत. ओव्यांचा शब्दीक अर्थ असा आहे: `अर्जुनाने वारंवार युध्दाचा अनुचितपणा सांगूनही जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपले मौन सोडले नाही तेव्हा अर्जुनाच्या मनात भिती उत्पन्न झाली. तरीसुध्दा परत आपला धीर एकवटून तो म्हणाला की माझ्या मनात जे होते ते सर्व मी तुम्हाला सांगितले आहे. आता काय कर्म करणे उचित आहे हे तुम्हालाच माहित आहे पण ज्या लोकांशी वैर निर्माण झाले आहे हे ऐकल्यावरच प्राण सोडले पाहिजेत (त्यांच्या शौर्याला घाबरुन नव्हे, तर इतक्या सर्वगुणसंपन्न लोकांशी आपले शत्रुत्व निर्माण कसे झाले या विचाराने शरमिंदे होऊन प्राण सोडले पाहिजेत) ते इथे प्रत्यक्ष समोर उभे राहिले असताना त्यांचा वध करावा का हे युध्द न करीता निघून जावे हे मला मात्र कळत नाही.’

अकस्मात संकटे समोर येता । मनात येते चंचलता ।

पण स्वतःमध्ये क्षमता नसता । कधी न येते आपदा ॥

अध्यात्मात जन्मापासून गोडी कुणाला असते? श्री गोंदवलेकार महाराज वा श्री रामकृष्ण परमहंसांसारखी उदाहरणे सोडली तर बाकी सर्व संतांच्या जीवनात काही कठीण प्रसंगांना तोंड द्यायची वेळ आल्यावरच भगवंताबद्दलची अनन्य श्रध्दा निर्माण झाली असे दिसून येते. उदाहरणार्थ, भगवान श्री रमण महर्षी व स्वामी स्वरुपानंद यांच्या जीवनात त्यांच्या समोर साक्षात मृत्यू उभा राहिल्याचे निमित्त झाले, गौतम बुध्दाने स्वतःच्या डोळ्यांनी जगातील सुखांची अशाश्वतता पाहीली तर वाल्मिकींच्या जीवनात कुटुबियांचा स्वार्थ त्यांच्या नजरेसमोर आला. तेव्हा अर्जुनाचा आत्यंतिक विषादच त्याला अध्यात्मिक तत्वे जाणून घेण्यास सक्षम बनवित आहे यात नवल कसले? परंतु इथे अजून खोल विचार करावासा वाटतो. समोर आलेल्या संकटाने अर्जुनाचे मन तयार झाले असे म्हणण्यापेक्षा त्याचे मन आत्तापर्यंतच्या अनुभवांनी तयार झाले होते म्हणूनच त्याच्यासमोर मनाच्या चलबिचलतेचे संकट आले असे मला वाटते. म्हणजे खरी गोष्ट अशी आहे की अर्जुनाचे मन, त्याची बुध्दी, परमार्थ जाणून घेण्यास तयार झाले होते म्हणूनच त्याच्या जीवनात युध्दाबद्दलचा आत्यंतिक विषाद निर्माण झाला. स्वकियांशी युध्द करायचे आहे ही घटना केवळ अर्जुनाच्या जीवनातच आली होती का? ते युध्द करायला आलेल्या सर्वजणांच्या जीवनात हीच घटना नव्हती का?! परंतु या घटनेने मनात विचारांचे काहूर फक्त अर्जुनाच्या मनातच का उठले? कारण आयुष्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या घटनांनी तो श्रीकृष्णांकडून गीता ऐकण्यास तयार झाला होता म्हणून.

असे वाटायचे कारण की आपले सर्व जीवन ही एक गुरुकृपाच आहे. आयुष्यात घडलेल्या निव्वळ `चांगल्या’ गोष्टींना गुरुकृपा म्हणणे म्हणजे आपल्या सद्‍गुरुंची खरी क्षमता न जाणणे होय. आपण गुरुंना `माउली’ म्हणतो कारण त्यांचे आपल्यावरचे प्रेम आईसारखे आहे. तसे बघितल्यास कोमल प्रेम पहायचे असेल तर आजीकडे पहावे लागते, आईकडे नाही. परंतु आजीच्या त्या मृदू प्रेमात आपल्याला योग्य वळण लावण्याची क्षमता नसते. याउलट आईचे प्रेम मवाळ नसते पण त्या प्रेमामध्ये आपल्याला घडविण्याची शक्‍ती असते. भांड्याला ठोके देऊन आकार देतात त्याप्रमाणे आई आपल्या अयोग्य वर्तनाला शिक्षा करुन तयार करीत असते. चुकीच्या वर्तनाला कठोर शिक्षा करण्याची तयारी जी आईमध्ये असते ती आजीत नसते. म्हणून जर गुरु आपल्यावर आईसारखे प्रेम करीत असतात तर आपला मार्ग चुकल्यावर कठोर शिक्षा करायचा अधिकारही ते स्वतःजवळ ठेवणारच. आणि आपल्याला स्वतःचा मार्ग चुकला आहे हे केव्हा कळणार? जेव्हा त्या मार्गाने चालल्यावर तोटा होत आहे हे लक्षात आल्यावरच. कुठलाही तोटा हा कठीण प्रसंगच असतो. परंतु तो समोर आल्यावरच आपण आपल्या आयुष्याचा आढावा घेण्यास उद्युक्त होतो. म्हणून आत्तापर्यंतचे आपल्यावर आलेले सर्व बिकट प्रसंग म्हणजे आपली सद्‌गुरुमाउली आपल्याला चुकीचा मार्ग सोड असे सांगत आहे असे म्हटल्यास काय वावगे आहे? म्हणून जीवनातील सुखद प्रसंगांपेक्षा दुःखद प्रसंगांमध्येच गुरुकृपा जास्त दिसून येते असे आपण मानले पाहिजे.

तेव्हा अर्जुनाच्या मनातील हा विषाद त्याच्यावरच्या सद्‌गुरुकृपेचे निशाण आहे असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. परंतु आपला विचार इथे थांबवू नका. आता असे बघा की आई आपल्या मुलाला कुठला धडा शिकविण्याचा प्रयत्न करते? मुलाची क्षमता पूर्णपणे जणून जो धडा मुलगा शिकू शकेल असाच धडा आई शिकविते. आणि तो शिकावा या हेतूने केलेली शिक्षाही कशी असते? तर मुलाला त्रासतर झाला पाहिजे पण तो ती शिक्षा सोसूही शकेल अशीच असते. हा विचार आता आपल्या आधीच्या विचाराला जोडा. मग लक्षात येईल की जर आपल्यावरचा कठीण प्रसंग आपल्या सद्‌गुरुमाउलींनी दिलेला धडा असेल तर तो असाच असला पाहिजे की ज्याला आपण सामोरे जाऊ शकू आणि त्यातून काहीतरी शिकू.

या सर्व विचारांचा अर्थ असा की आपल्यावर आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला आपण स्वतः सामोरे जाऊ शकतो आणि त्यातून स्वतःच्या जीवनाला अजून समृध्द करु शकतो! म्हणजे काय तर एकदा आपले सद्‌गुरु आपल्या हृदयात वास्तव्य करुन आहेत हे आपण ध्यानात घेतले की आपणास कधीही दुसऱ्या व्यक्‍तीची वा शक्‍तीची वा आधाराची जरुरी नाही!!

किती जणांचा यावर पूर्ण विश्वास बसेल? विश्वास बसला आहे असे आपण म्हणू शकतो पण आपली कृती ह्या म्हणण्याचे समर्थन करीत नाही. कारण आपण सर्वजण सतत अशा शक्‍तीच्या शोधात आहोत की जीच्याने आपण जीवनातील सर्व संकटांचे निवारण करु शकतो. तारुण्यातील संकटे भौतिक असतात म्हणून ती शक्‍ती पैशाचे रुप घेते. आयुष्याच्या मध्यकाळात मानसिक शांतीची जरुरी भासते मग आपण चाललो कुठल्यातरी गुरुंच्या शोधात. त्यांनी सांगितलेले मंत्र, साधना नियमित करुन आपण त्यांना स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्‍न करतो ते मनातील शांती ढळू नये म्हणूनच ना. नंतर वृध्दापकाळात मृत्यू समोर आला आहे याची जाणीव झाली की भगवंताची आठवण येते कारण मृत्यूनंतरची अवस्था चांगली रहावी म्हणून. आपल्यावर जशी संकटे येतात त्याप्रमाणे आपण त्यांचे निवारण करण्यासाठी इकडे-तिकडे धावत असतो. या सर्वातून काय सिध्द होते तर स्वतःकडे आलेल्या बिकट प्रसंगाला तोंड द्यायची आपली अक्षमता. तेव्हा आपला वरील विचारांवर विश्वास बसला आहे असे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आणिबाणीच्या प्रसंगातही आपला स्वतःवरचा विश्वास ढळत नाही. व्यवस्थापनशास्त्रामध्ये `एव्हरी ऍडव्हर्सिटी इज ऍन ऑपोर्च्युनिटी’ असे म्हणतात त्याचा पारमार्थिक अर्थ असा आहे!

तेव्हा अर्जुनाने हा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारायची खरे म्हणजे गरज नव्हती! त्याला स्वतःला कळलेच असते की कुठला मार्ग उचित आहे. आणि हे भगवान श्रीकृष्णांना माहित आहे. म्हणूनच सबंध भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण त्याला `मी म्हणत आहे म्हणून युध्द कर’ असे म्हणत नाहीत. ते त्याला फक्‍त वस्तुस्थिती काय आहे, सत्य म्हणजे काय, वेदांतामध्ये काय सांगितले आहे, इत्यादी सांगतात. वस्तुस्थितीची जाणीव करुन देतात आणि विचारतात की `आता मला सांग तू काय करणार आहेस?’ जणू त्याच्याच मनाची सक्षमता त्याला दाखवून देऊन त्यालाच निर्णय घ्यायला लावतात! खरे गुरु असेच वागतात. आपल्या शिष्याला संपूर्णपणे मुक्त ठेवून शेवटी त्याच्या सद्सदविवेकबुध्दीला जे पटेल तेच वर्तन करण्यास त्याला सांगतात. आयुष्यात आलेल्या सर्व आपत्तींना सामोरे ज्यायची क्षमता आपल्या शिष्यात आहे याची जाणीव त्यांना असते आणि तीच जाणीव ते आपल्यात उत्पन्न करतात. त्यांचे काम एवढेच असते. वर्षोनुवर्षे गुरुंकडे जाऊनसुध्दा त्यांच्या सल्ल्यावर सतत अवलंबून राहणाऱ्या साधकांनी हा धडा अर्जुनाच्या विषादावरुन घेतला पाहिजे.

आणि कुठेतरी खोलवर अर्जुनालासुध्दा हे माहिती होतेच. नाहीतर हा प्रश्न त्याने श्रीकृष्णांना विचारलाच नसता. कारण भगवान काय उत्तर देणार आहेत याची कल्पना त्याला होतीच. कारण भगवंतांनी स्वतःच्या आयुष्यात काय केले आहे हे त्याला माहित नव्हते काय? अतिशय लहानपणीच स्वतःला दूध पाजणाऱ्या दाईची हत्यासुध्दा त्यांनी विनासंकोच केली होती (अर्थात तसे करण्याला कारण होते. पण अर्जुनाच्या युध्दालाही योग्य कारण होतेच की). नंतर जरा मोठे झाल्यावर आपल्या मामाची हत्या करुन राज्य स्वतःच्या वडिलांना दिले होते. परंतु एवढी लांबची गोष्ट कशाला, प्रत्यक्ष या कुरुक्षेत्रातील युध्दामध्ये देखील त्यांचे वर्तन काय होते? कौरवांचा पराजय होणार हे पूर्ण माहित असूनही त्यांनी आपली सर्व सेना हरणाऱ्यांच्या पक्षात उभी केली होतीच ना. यादवसैन्यामध्ये त्यांच्या ओळखीची माणसे नव्हती का? परंतु तरीही आपल्या सर्व सैन्याचे हनन होण्याची शक्यता आहे हे माहित असताना त्यांनी सहजपणे ते होऊन दिले. मग त्यांचा दुसऱ्याला सल्ला काय वेगळा असणार?! कुठलाही प्रामाणिक मनुष्य स्वतः जसे वागतो तसेच दुसऱ्यांना सांगतो (जर तो मनुष्य आयुष्यात यशस्वी असेल तर प्रत्येक गोष्टीत न विचारता सल्ला देऊन सर्वांना कंटाळा आणतो!!). तेव्हा प्रश्न विचारल्यावरच अर्जुनाला माहीत होते की भगवान काय म्हणणार ते. परंतु तरीसुध्दा त्याने सल्ला मागितला. म्हणजे त्यालासुध्दा माहित होते की काय योग्य आहे. फक्‍त त्या सत्याला सामोरे जाताना तो दुसऱ्याच्या शब्दाचा आधार मागत होता. कधी कधी योग्य मार्ग माहित असूनही आपण ती गोष्ट बाह्यजगाच्या दृष्टीने निर्दयी ठरेल या भितीने दुसऱ्याच्या मताचा आधार घेऊन करतो तशी ही गोष्ट आहे. आणि भगवंतांना हे माहित असल्यानेच त्यांनी तो आधार त्याला दिला. आणि त्यांनी तो इतका परिपूर्ण रीतीने दिला की अजूनही आपण सर्वजण त्या आधाराला धरुन आहोत! गीतेच्या शेवटी अर्जुन युध्दाला उद्युक्त झाला याचे कुणालाच नवल वाटत नाही याचे कारण हे आहे. अप्रूप वाटते ते गीतेमधील सिध्दांतांचे. अर्जुनाच्या सुपीक मनात पेरलेल्या बीजांचे. ह्या पेरणीआधीची मशागत म्हणजे अर्जुनाने तोपर्यंत व्यतीत केलेले आपले जीवन होय.

जर तुमच्या जीवनात एखादा आणिबाणीचा प्रसंग निर्माण झाला असेल तर लक्षात ठेवा की सद्‌गुरुंच्या मते तुम्ही परमार्थतत्वरुपी बीजांच्या पेरणीला तयार आहात आणि आलेला बिकट प्रसंग म्हणजे त्यांनी केलेली लावणी होय. लागवण करुन घ्यायची की नाही हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक २३ नोव्हेंबर २००८)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: