(21to25)/17: Why follow shaastra?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

तरि शोडषोध्यायशेखी । तिये समाप्तीच्या श्लोकी ।

जो ऐसा निर्णयो निष्टंकी । ठेविला देवें ॥ २१:१७ ॥

 

जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था ।

शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥ २२:१७ ॥

 

तेथ अर्जुन मानसे । म्हणे हे ऐसे कैसे ।

जे शास्त्रेवीण नसे । सुटिका कर्मे ॥ २३:१७ ॥

 

तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे ।

कैं नाकीचा केश जोडे । सिंहाचिये ॥ २४:१७ ॥

 

मग तेणे तो वोविजे । तरीच लेणे पाविजे ।

येऱ्हवी काय असिजे । रिक्‍तकंठी ॥ २५:१७ ॥

 

परमार्थ आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जीवनाचा परम अर्थ (म्हणजेच परमार्थ) काय आहे तर भगवंताची प्राप्ती. आणि ही प्राप्ती जर एका धर्माचे पालन करणाऱ्या लोकांनाच उपलब्ध असती तर कुठल्यातरी एका ठराविक धर्माखेरीज बाकी लोकांना परमेश्वराची प्राप्ती होण्याची शक्यताच नसती. आणि परमेश्वराचे भगवंतपण सर्वांना सर्वकाळी उपलब्ध असणे यात असल्याने त्याच्या देवपणावरच आक्षेप आला असता! परंतु धर्म आणि परमार्थ एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्या संपूर्णपणे भिन्न नाहीत, त्यांच्यात एक नाते आहे. ते नाते म्हणजे परमार्थ मिळविण्याची एक वाट म्हणजे धर्म होय. या जगातील अस्तित्वात असलेले सर्व धर्म एकाच परमेश्वराकडे जाणारे भिन्न मार्ग दाखवित आहेत. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एकाच नदीला, एकाच गावात निरनिराळे घाट असतात त्याचप्रमाणे एकाच भगवंताकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग मनुष्यजातीला वेगवेगळ्या धर्मांद्वारे उपलब्ध आहेत. या प्रत्येक धर्मात मनुष्याने सामाजिक जीवनात आणि वैयक्‍तिक जीवनात कसे वागावे याचे नियम घालून दिलेले आहेत. हे नियम म्हणजे त्या धर्माचे शास्त्र होय. काळानुसार शास्त्रांमध्ये बदल होत असल्याने जे धर्म पुरातन काळापासून चालत आलेले आहेत (जसा आपला हिंदू धर्म) त्यांची शास्त्रे इतकी प्रचंड वाढली आहेत की सामान्य माणसाला त्यामागील अर्थ कळणे तर सोडाच परंतु त्यांच्या बद्दल संपूर्ण माहिती असणे देखील असंभव झाले आहे. ही गोष्ट केवळ सध्याच्या काळातील नसून द्वापारयुगातीलही आहे हे अर्जुनाच्या मनातील भितीतून स्पष्ट होते! आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांतून अर्जुनाच्या मनातील काळजी स्पष्ट होत आहे. श्री ज्ञानेश्वरमाउलींच्या ओव्या म्हणत आहेत: ‘सोळाव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की कर्म आणि अकर्म यांच्या पलिकडे जायला तुला शास्त्रांनुसार वर्तन करणे जरुरी आहे. हे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणत आहे की हे असे कसे की शास्त्रानुसार वर्तन केल्याशिवाय कर्मांच्या बंधनांतून सुटका होणार नाही? (हे म्हणजे) नागराज तक्षकाला नमवून त्याच्या फडावर असलेला नागमणि काढून मग तो सिंहाच्या नाकातील केसांनी केलेल्या दोरीत ओवला तरच अलंकार मिळेल नाहीतर तू असाच मोकळ्या गळ्याचा रहा असे म्हणण्यासारखे आहे!’

ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत अलंकारिक भाषेतून किती थोड्या शब्दात अर्जुनाच्या मनाची असहाय्यता प्रगट होते हे बघण्यासारखे आहे. केवळ दोन ओव्यांमध्ये त्यांनी सामान्य माणसाला शास्त्रानुसार वर्तन करणे किती असंभव आहे हे स्पष्ट केले आहे आणि तेसुध्दा कवित्वाला अजिबात उणे न पडू देता! खरोखर ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही त्यांनी मराठी वाङ्गमयाचा खरा आस्वाद घेतला आहे असे म्हणणे संयुक्‍तिक आहे असे वाटत नाही. तुम्हाला कवित्व बघायचे असेल, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा इत्यादिक अलंकारांचा प्रासादिक उपयोग बघायचा असेल, खोल अर्थ बडेजाव न मिरविता समोर ठेवलेला बघायचा असेल तर श्रीज्ञानेश्वरी ही सर्वोत्तम कृती आहे यात कुणाला शंका असेल तर त्यांनी दुसरे इतके सुंदर उदाहरण माझ्यासमोर ठेवावे. ‘मराठी माणूस’ असल्याचा खरा अभिमान ज्ञानेश्वरी वाचल्यावर जागृत झाला नाही असा माणूस अस्तित्वातच असणार नाही! असो.

आपणास महत्वाचे काय आहे तर आपली साधना. ज्याप्रमाणे अत्यंत भुकेलेल्या मानवासमोर अतिशय सुंदररीत्या बनविलेली पाकक्रिया ठेवली तरी तो समोर ठेवलेल्या थाळीकडे केवळ पोट भरण्यास उपयुक्‍त गोष्ट या एकांगी नजरेनेच बघतो, बाकी गोष्टींचा रसिकतेने उपभोग घेत नाही, वा रात्री रहिवास कुठे असेल याचा पत्ता नसणाऱ्या पांथिकाला संध्याकाळ आली की रात्र जवळ आल्याची चिंता लागते, त्या संध्यासमयाच्या विहंगम दृष्याचा अस्वाद तो पूर्णपणे घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे भगवंतापासून दूर असल्यामुळे आत्यंतिकरीत्या दुःखी असलेल्या माझ्या मनात वरील ओव्यांकडे बघितल्यावर केवळ परमेश्वरप्राप्तीसाठी अजून एक मार्ग सापडला ह्या जाणिवेचा उद्भव होतो. त्या ओव्यांचा रसिकतेने उपभोग घेण्याची ओढ मला परवडत नाही! म्हणून आपण (नेहमीप्रमाणेच!) आज या ओव्यांमधून आपल्याला काय बोध होतो हे पाहूया. ज्ञानेश्वरीत ठासून भरलेल्या बाकी सर्व गोष्टी दूर सारत आहे याची जाणीव आहे पण असे म्हणून माझ्या मनाला दोष देण्यात काही अर्थ नाही. मन स्वतःला झेपेल इतकेच प्रयत्‍न करू शकते!!

 

आवडे ठेवणे भगवंताशी संबंध । आणि जीवनाचे असणे निर्बंध ।

यादोहांत आहे मूलभूत विसंवाद । ठेवा मनाला सत्संगाने बध्द ॥

 

अर्जुनासारखीच आपली अवस्था आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात देवाजवळ जाण्याची नैसर्गिक इच्छा आहे. खरे म्हणजे आपला जन्मच त्या कार्यासाठी झाला असल्याने साहजिकच आपण त्या मार्गाकडे ओढले जात असतो. असे बघा, आपण सर्वजण जीवनात आपापल्या परीने मनाची शांतिच शोधत आहोत. कितीही अघोरी कृत्ये करणारा मनुष्य असला तरी त्याच्या कृत्यांमागचा हेतू बघितला तर स्वतःच्या मनाची शांती मिळविणे हाच असतो. शांती मिळविण्याचा त्याचा मार्ग सामाजिकरीत्या अमान्य असल्याने आपण त्या व्यक्‍तीला गुन्हेगार ठरवित असतो ही गोष्ट वेगळी आहे. आणि आपणा सर्वांना हवी असणारी मनाची अचुंबित शांती म्हणजे काय तर परमेश्वराच्या घराचा उंबरठा होय. म्हणून असे म्हटले जाते की भगवंताशी संबंध ठेवणे आपणा सर्वांनाच प्रिय आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला निर्बंध जीवन जगायलाही आवडते. मनाच्या शांतीची ओढ नैसर्गिक आहे आणि अनिर्बंध जीवन जगायची आस्था सवयीने लागलेली आहे! त्यामुळे कुणी परमेश्वरप्राप्ती करीता साधना करायला सांगितली की आधी आपल्या नेहमीच्या जीवनात ती साधना करता येईल का असा विचार आपण करतो. साधनेला प्राधान्य देऊन ती साधना करायलाच हवी या हेतूने आपल्या नेहमीच्या जीवनात मूलभूत फरक करण्यास आपण सहसा तयार होत नाही. म्हणूनच सकाळचा ब्राह्ममुहूर्त (सकाळचा ३ ते ६ हा पहिला प्रहर (म्हणजे तीन तासांचा काळ) ब्राह्मप्रहर म्हणून ओळखला जातो) साधनेला अत्युत्तम असला तरी त्यामुळे रात्रीची जागरणे थांबवावी लागतात ह्या विचाराने ‘हे आपणास जमणार नाही’ असे आपण ठरवितो. म्हणजे काय तर आपल्या सर्वांना भगवंत हवा आहे पण कसा हवा आहे? तर सध्याचे जीवन सांभाळून. नेहमीच्या जीवनात थोडे थोडे पैसे साठवून मग जमा झालेल्या पैशातून टी.व्ही. सारखी वस्तू आपण घरी आणतो तसा आपल्याला भगवंत हवा आहे. म्हणूनच जीवनाला शास्त्रीय निर्बंध घालून जगायला हवे तरच भगवंत मिळेल असे कुणी सांगितले तर आपल्याला अर्जुनासारखेच दडपण वाटते.

आता सर्वसामान्य लोकांपेक्षा थोडे भिन्न असलेल्या कुणाची समजा तयारी असली की भगवंताकरीता मी काहीही करीन तरी त्यांनासुध्दा शास्त्राचे नाव ऐकून भिती वाटते. कारण इथे कुणाला शास्त्रांची माहिती आहे?! आणि माहिती करुन घ्यावी असे म्हटले तर नक्की कुणावर विश्वास ठेवावा? प्रत्येकजण शास्त्राचा आपापल्या मतिप्रमाणे अर्थ लावत आहे असे त्यांना दिसते. त्यातील कुणाचे बरोबर असे आपण मानावे? तेव्हा आपण सर्वच जण शास्त्रानुसार वर्तन करणे जरुरी आहे हे ऐकल्यावर गडबडून जातो. म्हणून ह्या ओव्यांतून आपल्या सर्वांची अवस्था दाखविली आहे असे वाटते.

ह्या भितीचे दृष्य रुप म्हणजे आपण भगवंतांच्या या वक्‍तव्यावर वाद घालतो. अर्जुनाप्रमाणेच आपणसुध्दा मनात असा विचार करतो की भगवंताकडे जायची प्रामाणिक इच्छा असली तर तेव्हढीच पुरेशी नाही का? त्यावर आणखी शास्त्रांचे बंधन कशाला पाळायला हवे?

अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांचे उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणतात की तुला असे वाटत आहे की मनात भक्‍ती ठेवून जीवन जगण्यात काय कमी आहे? परंतु भक्‍ती ही सर्वांच्याच मनात आहे. हे सर्व जग माझेच रुप आहे. म्हणून पैशाला महत्व देणारे, बायकोला कुठल्याही परिस्थितीत खुश ठेवणारेही माझ्याच भक्‍तीत रममाण आहेत! माझ्या त्या ठराविक रुपावर त्यांची भक्‍ती आहे आणि त्याप्रमाणे त्या रुपाची प्राप्ती त्यांना ‘जेव्हढी भक्‍ती तेव्हढी प्राप्ती’ या न्यायानुसार होईलच. परंतु माझ्या भगवंतरुपावर श्रध्दा असेल, निर्गुण रुपाबद्दल आस्था असेल तर ती भक्‍ती म्हणजेच शास्त्रानुसार वर्तन करणे होय! मला भगवंताचे खरे रुप जाणून घ्यायचे आहे ही इच्छा जर जवळ आसेल तर आपोआपच त्यानुसार वर्तन करण्यास संकोच वाटणार नाही, अडथळा येणार नाही.

दररोजच्या जीवनातलेच उदाहरण बघा. नेहमीच्या जीवनात दर अर्ध्या-एक तासाने दहा मिनिटे माझी प्रार्थना कर असे म्हटले तर आपल्याला ते शक्यच होणार नाही. परंतु काही कारणामुळे आपणास अपचन झाले तर तर दर तासाने कशाला दर दहा मिनिटांनी शौचालयाकडे जायला आपण वेळ काढतोच की. तेव्हा कुठे गेली तुमची बाकीची महत्वाची कार्ये? याचे कारण असे की ‘तिकडे’ गेलो नाही तर आपले जीवन असह्य होईल ही भावना आपल्या मनात इतकी प्रबळ झाली होती की आपोआपच आपण सर्वांना सांगतो की मला जायलाच हवे! मग बाकी कोण काय बोलेल याचा विचार न करीता आपण पाच मिनिटे वेळ काढतोच. हीच अवस्था जवळच्या व्यक्‍तीच्या आजारात होते. तीची शुश्रुषा करण्यासाठी बाकी सर्व कामे दूर सारणे भाग पडतेच की नाही? तेव्हा आपला हा संशय काय दर्शवित आहे तर आपली अपुरी भक्‍ती. अजून संसाराची आसक्‍ती कमी झालेली नाही ही वस्तुस्थिती शास्त्रानुसार वर्तन करणे अशक्य आहे ह्या भावनेच्या रुपात बाहेर येत आहे हे ध्यानात घ्या.

आता ज्यांच्या मनात ‘हो मी शास्त्रानुसार वर्तन करीन. पण शास्त्र म्हणजे काय?’ असा विचार आहे त्यांना एक सोपे उत्तर म्हणजे ‘शास्त्र = सत्संग’. शेवटी शास्त्र, शास्त्र म्हणजे काय? तर भगवंत प्राप्त केलेल्यांनी तयार केलेली एक नियमावळी. प्रत्येक थोर संताने भगवंत वश केलेला असल्याने त्यांचे दररोजचे वर्तन म्हणजे शास्त्रच होय! आपल्या दररोजच्या वागण्यात काय करावे हा संभ्रम मिटवायचा एकमेव उपाय म्हणजे संतांची संगत होय. म्हणूनच परमार्थात संतसंगतीला एवढे महत्व दिले आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्या जवळ कुठे संत आहेत की त्यांच्या वर्तनानुसार आम्ही वागू शकू. त्याला उत्तर म्हणजे संतचरित्रे तर तुम्ही जवळ ठेवू शकता ना. संतसाहित्य दररोजच्या वाचनात ठेवू शकता ना. त्यांच्यामार्फत ते संत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तुम्ही बघाल की सर्व संतांची व्यावहारिक आयुष्ये सामान्य माणसांसारखीच आहेत. कुणी फार श्रीमंत वा सिध्दी प्राप्त केलेले आहेत असे नाही. संतांचा जन्मच आपल्याला उदाहरण घालून देण्यासाठी झालेला असतो. गोरा कुंभारांनी स्वतःच्या मुलांचा मृत्यू बघितला, ज्ञानेश्वरांनी सामाजिक उपेक्षा सहन केली, स्वामी स्वरुपानंदांनी स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतला, विनोबा भाव्यांनी सामाजिक कार्य केले, तुकारामांनी बायकोचा छळ सहन केला तर एकनाथ, नामदेवांनी प्रेमळ बायकोबरोबर जीवन व्यतीत केले. हे प्रत्येक जीवन म्हणजे आपल्यापैकी कुणाच्या जीवनाची एक टोकाची आवृत्तीच आहे. त्या सर्वांची जीवने सर्वसामान्य जीवनांची पराकोटीची अवस्था होती. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या वागण्याने आपणा सर्वांना एक आदर्श घालून दिला आहे. ज्याप्रमाणे तुमचे आयुष्य आहे त्याच आयुष्याप्रमाणे कुठलातरी संताने आपले आयुष्य घालविले आहे. वागा त्यानुसार आणि मग बघा भगवंत भक्‍ती मनात उत्पन्न होते की नाही. आपले असे अनुकरण करणे म्हणजेच शास्त्रानुसार वर्तन करणे होय. श्रीसंत गोंदवलेकर महाराज भाऊबंदांशी शिवीगाळ करुन भांडायचे आणि त्यांनाच नंतर आग्रह करुन जेवायला घालायचे! करता येईल आपल्याला असे वर्तन स्वतःच्या भावांबरोबर? ना आपण शिव्या देतो ना त्यांना जेवायला बोलावितो. संबंधच तोडणे त्यापेक्षा सोपे. हो ना?! अशी कुठलीतरी पळवाट न शोधता संतांच्या चरित्राचे दररोज पठण करुन त्यानुसार वागायचा जो प्रयत्‍न करील त्याच्यापासून भगवंत फार दूर नाही. आपल्या मनातील शास्त्रानुसार वर्तन करण्याबद्दलच्या आशंकेचे हे खरे समाधान आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक २१ डिसेंबर २००८)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: