Shloka7/13: Signs of Knower1-Amanitv

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग

 

गीतेतील प्रत्येक अध्याय साधकाच्या दृष्टीने परीपूर्ण आहे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात की गीतेच्या सातशे श्लोकांची विभागणी अठरा अध्यायात केली आहे ती केवळ श्रोत्यांच्या सोयीकरीता केली आहे. भगवंत एकच गोष्ट सर्व अध्यायात सांगत आहेत (पहा ओवी क्र. ५८-५९, अध्याय १८). साधकाच्या जन्मजात स्वभावाप्रमाणे त्याला एखाद्या अध्यायाबद्दल ममत्व वाटेल आणि सहजरीत्या त्या अध्यायात सादर केलेल्या मार्गावर तो पदार्पण करेल अशी आशा गीतामाईला आहे. ज्या साधकांना घटनेमागील कार्यकारणभाव जाणून घ्यायची स्वाभाविक ओढ असते त्यांच्या करीता या जगाचे वर्णन करुन या संसाराला जाणणारा कोण आहे याचा शोध घ्या अशी शिकवण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तेराव्या अध्यायात केली आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संसाराचे खरे रुप समजावून सांगताना जगाला एका क्षेत्राची उपमा देऊन आत्म्याला क्षेत्रज्ञ असे संबोधन देतात. क्षेत्र-क्षेत्रज्ञ यांतील भेद ज्या महानुभावाला निःसंदेह ज्ञात झाला आहे त्या साधकाला झालेल्या ज्ञानाचे वर्णन करताना माऊली अतिकौतुकाने खालील उद्गार उच्चारते:

 

जे संसाराते उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी ।

अनावरा वेंटाळी । ज्ञेयाते जे ॥ १७२:१३॥

 

जयाचेनि उजाळे । उघडती बुध्दीचे डोळे ।

जीवु दोंदावरी लोळे । आनंदाच्या ॥ १७३:१३ ॥

 

ऐसे जे ज्ञान । पवित्रैक निधान ।

जेथ विटाळले मन । चोख कीजे ॥ १७४:१३॥

ज्याच्या मनाला संसाराच्या ममत्वतेचा विटाळ झाला होता ते ज्ञानाच्या संपर्काने संपूर्ण सोवळे होऊन भगवंताच्या पूजेत मग्न झाले आहे अशी ज्ञानी माणसाची अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त झाल्यावर त्याचे वर्तन कसे असते याचे वर्णन करीत असताना महाराजांनी जवळपास ४५० ओव्यांची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वरीतील कितीतरी अध्यायांच्या ओव्यांची संख्या यापेक्षा कमी आहे! यावरुन माऊलींना भगवद्गीतेतील तेराव्या अध्यायातील या पाच श्लोकांबद्दल किती आत्मीयता आहे हे दिसून येते. परंतु केवळ आत्मीयता आहे म्हणून माउलींनी या श्लोकांवर सविस्तर भाष्य केले आहे असे नाही. नवव्या अध्यायातील राजमार्गावरील त्यांचे प्रेम काही कमी नाही. नवमीच्या अभिप्रायाला ते नवमीचा अभिप्राय याखेरीज दुसरी उपमा देऊ शकत नाही असे म्हणतात. परंतु तरीसुध्दा संपूर्ण नवव्या अध्यायावर त्यांनी ५३५ ओव्यांचीच टीका लिहिली आहे. तेव्हा एवढे विस्तारपूर्वक विवेचन करण्यामागे ज्ञानेश्वर महाराजांचा काहीतरी हेतू असणार हे नक्की. आपल्या पसायदानात त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हेतू म्हणजे साधकांची अध्यात्मिक प्रगती होण्यास मदत असा स्पष्ट केला आहे. तेव्हा ज्ञानी माणसाच्या लक्षणांतून आपणास स्वतःची अध्यात्मिक प्रगती करण्याची साधने उपलब्ध करुन द्यायचा महाराजांचा हेतू असणार असे वाटते. प्रस्तुत लेखमालेत आपण या लक्षणांवर वरील भावनेने विचार करायचा प्रयत्‍न करु आणि स्वतःची साधना समृध्द बनवायचा प्रामाणिक प्रयत्‍न करु. या प्रयत्‍नांमध्ये आपण ज्ञानी माणसामध्ये ही लक्षणे असणे का नैसर्गिक आहे हे बघू आणि त्यानंतर आपल्या जीवनात त्या लक्षणांचे प्रतिबिंब काय असेल याचे निरीक्षण करु.

अमानित्व: पहिले लक्षण आहे अमानित्व. लोकांकडून मानसन्मानाची अपेक्षा असणे या भावनेचा संपूर्ण अभाव मनात असणे म्हणजे अमानित्व होय. असे बघा, सचिन तेंडुलकरने विश्वविक्रम केला म्हणून तुमचे कुणी कौतुक करु लागला तर तुम्हाला कसे वाटेल? तो फलंदाजी करीत असताना तुम्ही दूरचित्रवाणीसमोरील आपली जागा कधीही बदलली नाही हे तुमचे कर्म त्याच्या विक्रमाला कारणीभूत आहे असे लोकांनी तुम्हाला आवर्जून सांगितले तरी तुमचा त्यावर विश्वास बसेल काय? ज्ञानी माणसाने स्वतःला क्षेत्रज्ञाशी इतके एकरुप केलेले असते की या देह-मन संकुलरुपी क्षेत्रामध्ये त्याच्या देहाद्वारे काही सत्कर्म घडले तरी ते तो परव्यक्‍तीनी केलेल्या कर्माप्रमाणेच आपल्याहून दूर करतो. अशा कर्माबद्दल कुणी त्याचे कौतुक करायला लागला की त्याला एवढेच वाईट वाटते जेव्हढे आपणास सचिनच्या विश्वविक्रमी फलंदाजीबद्दल स्वतः श्रेय घेण्यास वाटते (अर्थात, इथे सचिन स्वतःच हा लेख वाचत नाही हे मी गृहीत धरले आहे!) तेव्हा समाजात अमानित्व असणे हा ज्ञानी माणसाचा सहज स्वभाव होतो कारण तो ‘मी काहीही केलेले नाही. सगळे आपोआप घडले आहे’ ही सत्य परीस्थिती जाणत असतो. आपला देह जगात कर्मे करीत असताना आपण स्वतःची जागा कधीही सोडली नव्हती (जसे आपण सचिन फलंदाजीला की करतो!) याची त्याला इतकी खात्री असते की कर्मांच्या फळांबद्दलची संपूर्ण निरासक्‍ती त्याच्या अंगात भिनलेली असते. मग तो ‘चातुर्य लपवी । महत्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥’. त्याच्या मनात ‘माझे असतेपण लोपो । नामरुप हारपो । मज झणे वासिपो । भूतजात ॥’ ही इच्छा उपजते यात नवल ते काय? स्वतःच्या जीवनात याचा उपयोग करायचा एक मार्ग म्हणजे आपल्या हातून झालेल्या सर्व सत्कर्मांना भगवंतार्पण करणे. याचे कारण असे की जरी आपण स्वतःच्या क्षेत्रज्ञ रुपाला जाणले नसले तरी भगवंतावर आपला विश्वास आहे. त्याच्या कृपेनेच जीवनात सर्व काही घडत आहे यावर आपली श्रध्दा आहे तेव्हा या श्रध्देचा आधार घेऊन आपण स्वहस्ते घडलेल्या कर्मांपासून अलिप्त होऊ शकतो. साधनेच्या शेवटी भगवंत आणि आपण यातील द्वैत विरुन गेले की आपोआप ज्ञानी माणसाप्रमाणे आपण आत्मरुपी स्थित होऊ पण तोपर्यंत भगवंताच्या आधाराची आपणास गरज आहे. म्हणून थांबवा आपली श्रेय घेण्याची प्रवृत्ती. जरा बायकोला मदत केली, मुलाला शिकविले, नोकरीत सहकाऱ्याचे काम स्वतः केले की लगेच श्रेय घ्यायची आपली सवय मोडण्याकरीता ती कर्मे भगवंताने आपल्या हातून करुन घेतली याबद्दल आनंद माना आणि व्हा पुढे. केलेल्या कर्मांचे श्रेय जाणीवपूर्वक भगवंताला देणे म्हणजे आपल्या जीवनातले अमानित्व या गुणाचे प्रतिबिंब होय.

One Response to Shloka7/13: Signs of Knower1-Amanitv

  1. शेखर जोशी म्हणतो आहे:

    नमस्कार
    अवघड विषय साधा-सोपा करून सांगितला आहे.
    शेखर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: